सल्ला

Submitted by कौतुक शिरोडकर on 29 April, 2010 - 05:04

तोंडातला मावा थुकण्यासाठी हवालदार सरफरे ऑफिसच्या बाहेर आले. बाहेरच्या बाजूस नेहमीच दिसणार्‍या गदारोळावरील त्यांची नजर पॅसेजमधल्या शेवटच्या खोलीकडे वळली. तिथे दारावर कोणी नव्हतं. म्हणजे मोठे साहेब आत नाहीत. निवांतपणे कठड्यावर किंचित झुकून त्यांनी जास्वंदाच्या झाडाखाली पिचकारी मारली. नंतर हातानेच ओठावर राहीलेले शिंतोडे पुसले आणि हात पँटवर फिरवला. नित्यनेमाने फिरणार्‍या त्या हातामुळे खाकी पँटचा तेवढा भाग बराच उठावदार झाला होता. सरफरेंनी पुन्हा एकदा नजर चौफेर फिरवली. दोघा तिघांना हात दाखवला आणि त्यांची नजर गेटच्या दिशेने जात असलेल्या हॉटेल सिद्धार्थच्या कळपट मरून रंगाच्या युनिफॉर्मवर पडली. तो पोरगा हातातल्या ट्रेमधील उर्वरीत खाद्यपदार्थांच्या प्लेटस सावरत लगबगीने निघाला होता.

"ये वेटर..." बाण मारावा तशी त्यांनी हाक फेकून मारली. पोरगा दचकून वळला. " दोन ठंडा घेऊन ये... सायबांसाठी..चल पटापट...." मान डोलावून पोरगा गेटकडे वळला आणि सरफरे आत जायला वळणार तोच त्यांना समोर तो दिसला. तीन पायर्‍या चढून वर आलेला. सडपातळ शरीरयष्टी, वय वर्षे अंदाजे ४५-४६, नीट तेल लावून विंचरलेले केस, इस्त्री केलेला चौकड्यांचा इन केलेला फिकट निळा शर्ट, इस्त्री केलेली काळी पँट, पायात काळे लेदर शुज, खिशाला अडकवलेले दोन पेन, नाकावर सावरलेला काड्यांचा जुन्या पद्धतीचा चष्मा, डाव्या बगलेत छोटी काळी बॅग, किंचित घाबरलेला चेहरा. आयुष्यात पहिल्यांदा पोलिस स्टेशनची पायरी चढत असावा असा अविर्भाव. सरफरेंनी एका नजरेत त्याला नखशिखांत क्लिक केलं.

"बोला." सरफरे त्यांच्या ठेवणीतल्या आवाजात बोलले.
"परब. निशिकांत परब." तो गडबडून बोलला.
"परब.......निशिकांत....." सरफरे कपाळावर आठ्यांच जाळ आणून आठवायला लागले. पण त्या नावाचा त्यांना कोणी आठवेच ना.
"नाय. या नावाचा इथं कोण नाय." सरफरेंनी जिभेने तोंडात माव्याचे कुठे काही अवशेष राहीलेत का ते पाहायला सुरुवात केली.
"माझं.... माझं नाव.... निशिकांत..... परब." तो चाचरत बोलला.
"अस्स हाय का ? मी आपला उगाच...." सरफरे स्वतःशीच हसावं तसे हसले. "बोला, काय काम काढलत ?"
"रिपोर्ट.... करायचा होता." उरलेल्या पायर्‍या चढून परब सरफरेंच्या समोर आले.
"रिपोर्ट ?..... पाकीट मारलं कुणी का मोबाईल चोरलाय का शेजार्‍याशी भांडण वगैरे ?" सरफरे त्या कारकुनासारख्या दिसणार्‍या सामान्य माणसाला भेडसावणार्‍या सर्वसामान्य गुन्ह्यावरून सुरु झाले.
"खून....."
"खून ? कुठे ? कधी ? कोणाचा ? " सरफरेंना हे अनपेक्षित होतं. त्यांच्या मुखातून प्रश्नांची सरबत्तीच सुरु झाली. नेमके तेव्हाच बाहेर आलेले इन्स्पे. भांबरे थबकले.
"घरी... अर्ध्या तासापुर्वी..... माझ्या बायकोचा." परबांनी प्रामाणिकपणे तिन्ही प्रश्नांची उत्तरे तेवढ्याच वेगाने दिली.
"काय झाल सरफरे ?" भांबरेनी संभाषणात उडी घेतली.
"यांच्या बायकोचा खून झालाय."
"खून ? दिवसाढवळ्या. कोणी केला ? " भांबरेंना हा प्रकार नवा नसला तरी धक्कादायक होता. पुढचा सगळा त्रास चटकन डोळ्यासमोर तरळून गेला.
"मीच." बोलण्यापुर्वी दोघांपैकी कोणीतरी एक कानफाडात देतील या भीतीने परब मागे सरले.
"काय ? " दोघे एकत्रच किंचाळले.

थोड्या वेळाने परब भांबरेंच्यासमोर बसले होते. टेबलावर मघाशी ऑर्डर केलेले दोन्ही ठंडा होते. भांबरेंनी एक परबांच्या समोर ठेवला. त्यांनी तो उचलून एका दमात संपवला. भांबरे परबांच्या हालचाली न्याहाळत होते. परबांनी बाटली टेबलावर ठेवून ओठांवरून जीभ फिरवली. त्यांच्या चेहर्‍यावरची भीती बरीच ओसरली होती. ते आता फार रिलॅक्स्ड वाटत होते.
"बोला."
"मी परब... निशिकांत परब. गोलवाला लेनच्या कोपर्‍यावर असलेल्या शिवसदनमध्ये राहतो. दुसरा माळा. दोनशे चार मध्ये. घरी मी आणि माझी बायको. दोघेच. आम्हाला मुल बाळ नाही. फॉल्ट माझ्यातच आहे. पण मला ते लग्नाआधी माहीत नव्हतं." परब श्वास घेण्यासाठी क्षणभर थांबले. "सहा महिन्यापुर्वीच माझी नोकरी गेली. कंपनी बंद पडली. तेव्हापासून काम शोधतोय. पण आता या वयात नोकरी देणार कोण ? घरातल्या कर्त्या पुरुषाला नोकरी नसून कसं चालेल ? नोकरी पाहीजेच."
"खून का केलात तुम्ही ? " भांबरे मुळ मुद्द्यावर आले.
"मी घरी बसून. मग रोजची भाडणं. पण त्यामुळे केला नाही. तिचे तिच्या बॉसशी संबंध होते. हे फार धक्कादायक होतं. मी तिच्याशिवाय कधी दुसर्‍या कोणाचा विचार केलाच नाही आणि ती मात्र.... मी तिला खुप समजावलं. पण ती ऐकायला तयार नव्हती. तिच्यामते मी फार बोअर माणूस आहे. म्हणाली, जमत नसेल तर मग घटस्फोट घ्या. त्यापेक्षा खून केलेला काय वाईट ?" शेवट्च्या प्रश्नावर परबांनी भांबरेंवरची नजर सरफरेंकडे वळवली. आपल्याला आता त्या प्रश्नाचं उत्तर द्याव लागणारं या कल्पनेनेच सरफरे गोंधळले. भांबरेंच्या त्यांच्याशी नेत्रपल्लवी झाली.
"चला, आपण तुमच्या घरी जाऊ." सरफरेंनी तयारी झाल्याचा इशारा करताच भांबरें परबांकडे वळले.

वीस पंचवीस मिनिटातच गाडी शिवसदनच्या समोर उभी होती. सगळ्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. भांबरेंचा हात परबांच्या खांद्यावर होता. परबांची मान खाली. भांबरेंची पोलिसी नजर आवारातल्या नजरा जोखत होती. त्या विस्फारलेल्या नजरा 'परबासारख्या निरुपद्रवी माणसाबरोबर पोलिस कसे ?' हे कळवळून विचारत होत्या. सगळी मंडळी बिल्डिंगच्या दिशेने वळली. सगळे फक्त बघ्याचीच भुमिका घेऊन उभे. कुजबुजीला उत आलेला.
"काय झाल परब ? " विंगमध्ये शिरत असताना एकाने शेवटी हिमतीने विचारलच.
"या, सांगतो." भांबरे त्याच्याकडे वळले तसा तो मागे सरला. भांबरेंची टीम दोनशेचारच्या दिशेला वळले. तेवढ्यात पुढे धावत गेलेल्या सोसायटीतील एकाने त्यांच्या दाराची बेल वाजवली.
'बिच्चारा, त्याला काय माहीत आत दरवाजा उघडणारा कोणी नाही ते...' भांबरे त्या उत्साही तरुणाकडे पाहून स्वतःशीच बोलले. त्याचवेळेस दार उघडलं गेलं. समोर एक साधारण चाळीस-बेचाळीस वयाची स्त्री उभी होती. शेलाट्या बांध्याची, बर्‍याच प्रमाणात बांधेसुद म्हणता येईल अशी, बॉब केलेले केस, नीटनेटकी साडी, पावडर लिपस्टिक यांचा तोलूनमापून केलेला वापर आणि युनिफॉर्ममधल्या मंडळीबरोबर असलेल्या परंबाकडे पहात विस्फारलेले डोळे.....
"अहो, काय झाल ? काय झाल ? " ती धावतच बाहेर आली. एव्हाना फ्लोरवरचे इतर दरवाजेही उघडले होतेच. भांबरे आणि टिम आता पुर्णपणे गोंधळलेल्या मन:स्थितीत. काय बोलावं तेच कळेना. त्यांनी सरफरेंकडे पाहीलं. सरफरेनी नजर दुसरीकडे वळवली. परब मात्र स्थितप्रज्ञ. आपण त्या गावचेच नसल्यासारखा. चौकीवर पोपटासारखा बोलणारा परब आता मात्र मुकबधिर असावा तसा. ती बाई 'काय झाल?' म्हणत परबांना चाचपत होती.
"तुम्ही ? " प्रश्नाचे उत्तर काय मिळेल याची कल्पना असूनही भांबरेंनी प्रश्न विचारलाच.
"मिसेस परब." शक्य तेवढा आपला आवाज नियंत्रणात ठेवत ती बाई बोलली. "काय झाल ? काय केलं ह्यांनी ? "
"चला, आत बसून बोलूया." भांबरेंनी परिस्थितीचं गांभिर्य जाणलं. शेजार्‍यावर नजर टाकत ते आपल्या टिमसोबत परबला जवळजवळ खेचतच आत घेऊन गेले आणि पाठीमागे दार बंद केलं. त्या बंद दारावर आता किती नजरा खिळल्या असतील त्याचा विचार करण्याची काही गरज नव्हती.
"केव्हापासून व्हायला लागलं हे असं ? " भांबरेंनी पाण्याचा रिकामा ग्लास टिपॉयवर ठेवत मिसेस. परबना विचारलं.
"त्यांची कंपनी बंद पडणार ही बातमी कानावर आली तेव्हाच त्याचं मन:स्वास्थ ढळायला लागलं होतं. छोट्याछोट्या गोष्टीत चिडचिड. त्यानंतर कंपनी बंद झाली आणि हे घरी बसले. मग हळूहळू सगळं थंडावलं. चिडचिड नाही की बडबड नाही. नेहमी शुन्यात नजर टाकून बसायचं. इतकी वर्षे त्या एका नोकरीतच काढलेली. दुसरं कधी काही केलच नाही. घर आणि कंपनी. इतरांशी जेवढ्यास तेवढं. आता फक्त घर एके घर."
"डॉक्टर कोण आहेत ? "
"डॉ. मानकर, अपना बाजारच्या पलिकडले."
"तुम्ही घरीच असता का ?"
"नाही. जॉब करते. महालक्ष्मीच्या शाह एन्ड नाहरमधल्या टेक्नोग्लोबमध्ये. सेक्रेटरी म्हणून."
"मग यांच करायला कोणी असतं का घरी ? " भांबरेनी आरामखुर्चीत झुलत असलेल्या परबांकडे नजर टाकली.
"मोलकरीण आहे एक. ती येऊन जाऊन असते. सोसायटीतील बरीच काम आहेत तिच्याकडे. तशी यांची विशेष काळजी करण्यासारखं काही नाहीच मुळी. हा असला प्रकार पहिल्यांदाच घडलाय."
"पुन्हा घडू शकतो." खात्री असावी तसे भांबरे बोलले. " शक्य झाल्यास कोणाची तरी नेमणूक करा."
"बरं." मिसेस परब अविश्वासाने परबांकडे पहात होत्या.
"बरं, येतो आम्ही." भांबरे दाराकडे वळले.
"तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल सॉरी सर." मिसेस परबांच्या चेहर्‍यावर दिलगिरी जाणवत होती.
"सॉरी कशाला ? आम्ही आमची ड्युटीच करतोय." परब आता बरेच लांब राहीलेत हे लक्षात येताच भांबरे थोडे पुढे झुकले."तुम्हाला कधी खुनाची धमकी दिलीय का ? "
"नाही. किरकोळ भांडणातही नाही." मिसेस परब नीट आठवून बोलल्या.
"कधी कोणती अशी घटना जी नेहमीपेक्षा वेगळी वाटली असेल ? वागण्यातला एखादा सुक्ष्म बदल ? एखादा अतिरेकी प्रयत्न ? हल्ला वगैरे ? " भांबरेंनी शक्य तेवढ्या बाबी पडताळण्याचा प्रयत्न केला.
"नाही. तसे ते पुर्वीही शांतच होते. आता जास्त शांत झालेत इतकेच. बाकी मला इजा होईल असं कधी वागले नाहीत की तसा उल्लेख नाही."
"तुमचा नंबर देऊन ठेवा. सरफरे लिहून घ्या." निघता निघता भांबरेंनी आरामखुर्चीत डोलत बसलेल्या निशिकांत परबाकडे एक नजर टाकली.

"फालतू टाईमपास केला त्या येडयाने." सरफरे बाहेर पडताच पचकले. भांबरे मात्र वेगळ्याच विचारात होते.
"सरफरे, त्या डॉ. मानकरांना भेटा जरा. बघा काय म्हणताहेत ते. आणि टेक्नोग्लोबमध्ये पण फेरी मारून या."
"मी काय म्हणतो साहेब. त्या परबाच डोकं फिरलय. उगाच कशाला तंगडतोड करायची म्हणतो मी. साध कारकुंड आहे ते."
"सरफरे, पाऊस निरोप देऊन पडत नसला तरी आभाळ भरलं की अंदाज बांधला जातोच. आपणं आपलं काम करावं. संध्याकाळपर्यंत कळवा मला." भांबरे गाडीत बसले आणि सरफरे सोसायटीकडे वळले.

"बोला सरफरे, काय खबर ? "
"शेजारी-पाजारी, मोलकरीण सगळ्यांशी बोललो. दोघात छोटीछोटी भांडण होतात. विशेष नाही. परबाचा सोसायटीच्या मिटिंगमध्ये कधीच आवाज चढलेला नाही. मुल नसल्याचं मात्र परब बोलतात कधी कधी. मोलकरणीला त्या दोघात काही वेडंवाकडं जाणवलं नाही. डॉक्टरांची ट्रिटमेंट चालू आहे. काळजी करण्यासारखं काही नाही नॉर्मल डिप्रेसनची केस आहे. अचानक बराच वेळ रिकामा जात असल्याने व इतर कोणत्याच कामाची आवड वा सवय नसल्याने आपण निरुपयोगी असल्याची भावना बळावत जाते. हा त्याचा परिणाम." सरफरेंनी खिशातला कागद काढून शेवटचं वाक्य वाचलं.
"हे काय ? "
"ते डॉक्टर काय म्हणते होते ते लक्षात राहील ना राहील म्हणून एका ओळीत लिहून घेतलं. काहीतरी इंग्रजी नावही घेतल होतं त्यांनी. पण जे आहे ते हेच आहे."
"बरं आणखी काही ?"
"बाईची जवळीक आहे म्हणे बॉसशी. कदम नावाचा प्युन आहे टेक्नोग्लोबमध्ये. त्याला चहा पाजला तेव्हा कळलं. सोसायटीत थोडी चर्चा आहे. एक दोनदा गाडी येऊन सोडून गेलीय बाहेर रात्रीची."
"सेक्रेटरी म्हटल्यावर बॉसशी जवळीक असणारचं. ही जवळीक तसलीच आहे की आणखी काही ? "
"आहे म्हणतात सगळे ऑफिसमध्ये. खात्रीलायक असं कोणाला माहीत नाही. पण इकडे तिकडे बघितलं असं म्हणणारे बरेच आहेत."
"म्हणजे नॉर्मल अफवा वगैरे... ठिक आहे सरफरे. मला का कुणास ठाऊक पण हा परब पुन्हा लवकरच भेटेल याची खात्री आहे." भांबरे खिडकीबाहेर पहात म्हणाले. जणूकाही परब गेटवरूनच डोकावत होता.

सरफरेनी खिडकीतून बाहेर नजर टाकली तेव्हा परब गेटजवळ घुटमळताना दिसला. हातातलं रजिस्टर टेबलावर ठेवत सरफरे खिडकीकडे वळले. परब अजूनही गेटजवळच घुटमळत होता. त्याच्या चेहर्‍यावरचा गोंधळ सरफरेंना तिथूनही स्पष्ट दिसत होता. खिशातली डायरी काढून सरफरेंनी मागे वळून चोरघेंना आवाज दिला. चोरघे थोडे धावतच त्यांच्यापर्यंत आले.
"चोरघे, या नंबरवर फोन करा. मिसेस परब असतील. त्यांना चौकीवर यायला सांगा." सरफरेंची नजर मात्र गेटच्या आत पाऊल टाकलेल्या परबांवर होती. परब आता एखाद्या चोरासारखे चोहीकडे बघत चौकीच्या दिशेने येत होते. मागच्यावेळेसारखं त्यांच दारात जाऊन स्वागत करावं असं क्षणभर सरफरेच्या मनात आलं पण त्यांनी तो विचार बाजूस ढकलला. भांबरे दहा मिनिटापुर्वॉच बाहेर गेलेले. सरफरेंनी नजर परबांवर केंदित केली. परब आता पायर्‍या चढत होते.
"फोन लागला का चोरघे ?"
"नाही. सेल बंद आहे आणि घरचा फोन कोणी उचलत नाही."
"च्यायला, याने खरच मारलं की काय बायकोला ? भांबरेसाहेबांना फोन लावा." परब आता चौकीच्या आत होते. सरफरे त्यांच्यासमोर जाऊन उभे राहीले.
"बोला."
"मी परब...... निशिकांत परब....... खुनाचा... रिपोर्ट..... करायचा आहे." परब चाचरत म्हणाले.
"कुणाचा खून ?" सरफरेना त्याच्या नजरेत ओळख असल्याची कोणतीही खूण का दिसत नाही याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं.
"माझ्या..... बायकोचा." परबांच चाचरणं चालूच होतं.
"कोणी केला ? "
"मीच." परबाच्या कपाळावर घाम थरथरत होता.
"सरफरे, साहेब आहेत लाईनवर." चोरघेंनी आवाज देताच सरफरे त्यांच्या टेबलाकडे वळले. भांबरेंना त्यांनी कल्पना दिली आणि दहाव्या मिनिटाला ते परबांच्या घरी निघाले. चित्रात काही फारसा बदल नव्हता. जवळपास तेच चेहरे, तेच हावभाव, त्याच प्रतिक्रिया. तसं सरफरेंना हे सगळं सवयीचं होतं. ते दाराकडे वळले. एक बाई परबांच्या दाराला किल्ली लावत होती. सरफरेंनी तिला ओळखलं.
"ओ बाई..." ती त्यांची मोलकरीण होती."थांबा जरा."
"काय झाल साहेब ? "तिने परबांकडे पाहून सरफरेंना विचारलं. परबांच्या डोळ्यात ओळखीचं काहीच चिन्ह नव्हतचं.
"मिसेस परब आहेत का आत ? "
"नाही. त्या सकाळीच कामावर गेल्यात." घरचा फोन कोणीच का उचलत नाही याचं उत्तर मिळाल सरफरेंना.
"त्यांचा मोबाईल लागत नाहीए."
"काल पाण्यात पडला व्हता फोन. मीच टाकलाय रिपेरिंगला. पुढच्या गल्लीतल्या रमेशकडे." सरफरेंची चौकशी संपली. परबांना घरात सोडून ते खाली उतरले. गाडी पुन्हा चौकीकडे वळणार तोच त्यांनी पुढच्या गल्लीकडे वळवली. निघता-निघता रमेशकडे मोबाईलची खात्री करून घेतली. परबमुळे विनाकारण दुसरी फेरी झाली होती. हातातली कामं सोडून धावपळ करायची आणि इथे डोंगर पोखरून साधा उंदीरही निघत नाही. 'परब' आता एखाद्या वैर्‍यासारखा वाटायला लागला सरफरेंना. दुर्दैव हे की तो नेमका त्यांच्याच ड्युटीच्या वेळेला पोहोचत असे. आता पुन्हा हे परब प्रकरण नकोच.

दुसर्‍या दिवशी सकाळी मिसेस परब चौकीवर "सॉरी" म्हणायला हजर होत्या. भांबरेंनी पुन्हा त्यांना काळजी घेण्याच्या सुचना केल्या. सरफरे शांतपणे त्यांच्या हालचाली न्याहाळत बसले.

रजिस्टरमधल्या नोंदी संपवून सरफरे आता निघायच्या तयारीत होते. शरीर आंबल होतं. कालपासून नाईट सुरु झाली होती. त्यात कालचा आख्खा दिवस पार्कवर हजेरी होती. मुख्यमंत्र्यांची सभा. क्षणाची उसंत मिळाली नव्हती. त्यात रात्री बारमध्ये झालेल्या मारामारीत तीन-चार डोकी फुटली होती. रात्र सगळी त्या धावपळीत गेलेली. कधी एकदा 'लवंडतो' असं झाल होत सरफरेंना. फोन वाजला. भांबरे साहेब दुसर्‍या बाजूला होते.
"सरफरे, साहेबांचा फोन लागत नाहीए. त्यांना निरोप द्या की तासाभरात पोहोचतोच आणि तुम्हाला थांबता येईल का ? वाटल्यास मागच्या रेस्टरुममध्ये झोपा तोपर्यंत. " सरफरेंनी मुकाट फोन खाली ठेवला आणि ते मोठ्या साहेबांच्या कॅबिनकडे जायला उठले. तर समोर परब. आता पुन्हा तेच नेहमीचं रडगाणं. उगाचची धावपळ. सरफरेंमध्ये फुकटच्या उठाठेवींसाठी त्राण शिल्लक नव्हतं. फक्त मोठ्या साहेबांना निरोप द्यायचा आणि मग झोपायचं. बस्स. दुसरं आता काही नाही.
"मी परब. निशिकांत परब." तेच वाक्य. तीच चाचरण्याची सवय. आणि तोच पडलेला चेहरा.
"बायकोचा खून करून आला असाल." सरफरेंच्या बोलण्यावर परबांची नजर आश्चर्याने विस्फारली. त्यांनी होकारार्थी मान डोलावली.
"बायकोचे बॉसशी लफडं आहे म्हणून ?" परबांना आता सरफरेंच्या दिव्यदृष्टीचं आश्चर्य वाटत होतं.
"मग यात तुमच्या बायकोचा काय दोष ? चुक तिच्या बॉसची आहे, त्याला कशाला सोडलत ?" परबांनी पटल्यासारखी मान डोलावली आणि ते बाहेरचा दिशेला वळले. निघताना कदाचित ते 'थॅंक्यु' बोलले असल्याचा सरफरेंना भास झाला. गेटकडे निघालेल्या पाठमोर्‍या परबांकडे पहात सरफरे पॅसेजमधल्या मोठ्या साहेबांच्या ऑफिसकडे वळले. झोप आता बळावयास लागलेली.

रेस्ट रुममधला जुनाट पंखा घोंगावत होता. आधीच तिघे जण आत विसावले होते. पंख्याखालच्या मोक्याच्या जागा हातच्या गेल्या होत्या. सरफरेंनी चटई अंथरली आणि ते चटईला टेकले. त्यांनी डोळे मिटले आणि डोळ्यासमोर परब उभा. 'भेदरलेला, चाचरणारा, डोळ्यात अनोळखी भाव असलेला ' झोपेला बाजूला सारून विचार हलकेच रांगेत शिरले. काय प्रॉब्लेम असेल त्या परबाचा ? खरचं त्याला वेड लागलं असेल का ? वागणूक तर तशीच आहे त्याची. जेव्हा भेटतो तेव्हा डोळ्यात अनोळखी भाव ? खरचं ओळखत नसेल तो आपल्याला. मग घरी बायकोला कसा काय ओळखतो ? इतकी वर्षे एकत्रित संसार केला म्हणून की तिचा तिरस्कार हेच जगण्याच ध्येय होऊ लागलं असेल म्हणून. कदाचित त्याच्या बायकोचं पाऊल पडलं असेल वाकडं. म्हणून तिच्या खुनाचा विचार मनातल्या मनात योजत असावा तो. नेमका आपल्याच पोलिस स्टेशनला पोहोचतो कसा ? रोजच्या रस्त्यावर आहे म्हणून. तिसरी भेट आपली. तरी ओळखत नाही तो. पण खुन केल्यावर पोलिस स्टेशनला जायला हवं हे कसं कळतं ? आपण केला तो गुन्हा आहे याची जाणिव होत असेल का त्याच्या सुप्त मनाला ? चाकोरीत जगलेल्या माणसाला चाकोरीबाहेरचं वागणं झेपत नसेल. म्हणून केल्या पापाची कबूली देत असावा तो. कदाचित जे गरजेचं आहे तेच लक्षात ठेवत असेल त्याचा मेंदू. गुन्हा आणि कबूली. बाकी आपण गौण. असलं काही ? काय असेल ? सरफरेंच्या शरीराबरोबरच आता मनाचा थकवा वाढायला लागला आणि ते झोपी गेले.

आपल्याला कोणीतरी गदागदा हलवत आहे हे सरफरेना जाणवलं. पण डोळे उघडायची इच्छा होत नव्हती. त्यात आवाजांची भर पडली. त्यातही परब त्यांना दिसला. त्यांना गदागदा हलवणारा. त्यांनी त्याला दूर सारला.
"सरफरे" परब त्यांना धरून हलवत होता. याला आपलं नावं कोणी सांगितलं ? सरफरेंना प्रश्न पडला. त्यांनी नीट पाहीलं. परबचा चेहरा धुसर होत गेला. नवा चेहरा दिसू लागला. हा कोण ? सरफरेंना डोळे उघडून पाहायची इच्छा होती. पण शक्य होत नव्हतं. पण त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. 'चोरघे' पटकन क्लिक झालं त्यांना. 'हा आपल्या घरी काय करतोय ?' सरफरे पुन्हा प्रश्नात. बायको एवजी हा कशाला उठवतोय ? आधी परब आता हा. काय चाललय ?
"सरफरे उठा. साहेब बोलवताहेत." चोरघेंचा आवाज स्पष्ट आला. सरफरे हडबडून उठले. समोर पाहीलं. चोरघे समोर होते. घर नव्हतं. ते रेस्टरुममध्ये होते. एकटेच. बाकीचे केव्हाच निघून गेलेले. चोरघेंच्या हातात पाण्याची बाटली होती. तोंडावर पाण्याचा हपकारा मारून रुमालाने टिपत ते भांबरे साहेबांसमोर पोहोचले.
"बोला साहेब."
"सरफरे, सकाळी परब आले होते ?"
"हो. त्याला मी परत पाठवला."
"कुठे ? "
"का ? काय झाल ? " झोप अजूनही अवतीभवती रेंगाळत होती.
"सरफरे, त्याने खरच खून केलाय त्याच्या बायकोचा."
"काय ? " सरफरे किंचाळले. कान वाजल्यामुळे भांबरें मागे झाले. सरफरेंची झोप उडाली होती. मागे बसलेली परबांची दचकलेली मोलकरीण बाकड्यावर स्वतःला नीट सावरून बसली.

परबाने त्याच्या बायकोचा खून का केला ? कसा केला ? कधी केला ? याच्याशी सरफरेंना काहीच घेणदेणं नव्हतं. फक्त आपण परबाला दिलेला सल्ला त्याने अमलात आणला आणि जर ते भांबरेसाहेबांना कळल तर काय होईल ? सरफरेंच्या डोळ्यासमोर धुकं दाटायला लागलं.

समाप्त

गुलमोहर: 

चिंगी, लघुकथेचा एक वेगळा फॉर्म हाताळण्याचा हा प्रयत्न. जास्त फुलवणं म्हणजे वरणात पाणी घालून वाढवण्यासारखं झालं.
मीरा, परबाचा आजार इथे मह्त्त्वाचा नाही. मी ते स्पष्ट नमुद केल्याने काही कथेत फरक पडणार नाही.
टण्या, परबापेक्षा सरफरे माझ्या दृष्टीकोनातून इथे मुख्य पात्र आहे. 'लांडगा आला' या कथेप्रमाणे इथे सरफरे परबाकडे लक्ष न देता त्याला एक भलताच सल्ला देतो. तेच टिपण्याचा प्रयत्न. 'शेवट गंडला' हे शक्य आहे. कारण लिहिणार्‍याचा आणि वाचणार्‍याचा दृष्टीकोन सारखाच असतो असे नाही. पण तसे घडत नाही याचा अर्थ कथानकाचं रेखाटन अचूक दिशेने झालेले नाही. थोडक्यात वेगळ्या लघुकथेचा पहिलाच प्रयत्न फसला असं म्हणायला हरकत नाही.

मला आवडली! लघुकथा असल्याने कथा पटकन संपल्यासारखी वाटते पण, यापेक्षा ताणली तर अपेक्षित परिणाम साधणार नाही.
पात्र उभी करण्याची हातोटी उल्लेखनीय.

after reading u r explanation

i got meaning of all story....

Nice attempt

thnks for nice story

कौतुक, बायकोच्या साहेबाला मारायचा सल्ला दिला होता मग साहेबाला मारलेला का नाहि दाखवले???...........तुमचे लिखाण समोर चित्र उभे करते......तुम्हि screenplay खुप छान लिहु शकता........सही.