"सुख" म्हणजे नेमक काय असतं ?

Submitted by अनिल७६ on 23 April, 2010 - 00:13

सुख या शब्दाचा संबध सगळ्यांचाच येतो अस मला वाटतं, आपल्या रोजच्या आयुष्यात आपण बरयाच वेळा "सुख" या शब्दाबद्दल बरंच ऐकलंही असेल,(जसं मला लग्न केल्यापासुन सुख म्हणुन काही मिळालं नाही इत्यादी .) वाचलं असेल ,तर तुमची सुखाची नक्की व्याख्या काय ? ती थोडक्यात कशी करता येईल , ती कोणत्या गोष्टींवर अवलंबुन असते का ? यावर ही चर्चा,सुख हे नेमक कोणत्या गोष्टीतुन मिळतं ? त्याचा पैशाशी किती संबध आहे, या बद्दल तुमच्या मतांच इथ स्वागत आहे ..!

गुलमोहर: 

मला नेमका संदर्भ आठवत नाहि, पण बहुतेक ज्यूंचा छळछावणीशी संबंधित असावा. तिथे एका माणसाचा छळ केल्यावरदेखील तो आनंदीच असतो. (लाईफ इज ब्यूटीफूल मधे पण हेच आहे कि) तर त्याला विचारल्यावर तो म्हणतो, कि तूम्ही माझ्या शरिराला यातना देऊ शकाल, मनाला नाही. मी आनंदी रहायचे कि नाही, हे माझे मीच ठरवणार !
वेल, सुखाचे पण तसेच आहे. सुख मानायचे ठरवले, तर पहाट झाली अन जाग आली, हि घटना पण सुखकारक असू शकते. आणि दु:खच करत बसले तर, "अरे देवा, दुसरा दिवस उजाडला", याने पण यातना होतात.

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते ?? मिळालंय म्हणे स्तोवेर हातात काही नसते Happy असे एक गाणे " एका लग्नाची गोष्ट " मध्ये होते. तर सुख म्हणजे आत्ता होते आणि आत्ता गेले असे ज्याच्याबद्दल वाटते ते सगळे असा एक अर्थ !!

सध्या तरी आय्_पील चे सामने बघण्यात ( मैदानावर व मैदानाबाहेरील ) सुख आहे. Happy

अमोल केळकर
-----------------------------------------------------------------
मला इथे भेटा

माझ्या गुरुजींनी ( श्री. विश्वासराव मंडलिक - योग विद्या धाम - नाशिक ) यांचा विचार सांगतो. ते म्हणतात सुख हे subjective & relative आहे. जसे मला जी गोष्ट सुखदायक वाटते ती दुसर्‍याला वाटेलच असे नाही.

उदा १. मी सिलींग फॅनच पाहिला नाही पण तुझ्या जन्मापासुन तु एअर कंडिशन्ड घरात, ऑफिसमधे आहेस. अश्या वेळी मला भर उन्हाळ्यात सिलींग फॅन सुखदायक तर तुला फारसा सुख देऊ शकणार नाही.

उदा २. मला पुरणपोळी खुप आवडते. मी जेव्हा तीन पोळ्या खातो तेव्हा मला सुख मिळते अशी माझी यासंदर्भातली व्याख्या. जेव्हा मी पोटभर जेवण करुन तुझ्या घरी येतो आणि तु मला पुरणपोळी जेवायचा आग्रह करतोस तेव्हा तीच पुरणपोळी दुखदायक ठरते कारण मी या क्षणाला खाऊ शकत नाही.

जगी शाश्वत सुख आणि अशाश्वत सुख असे दोन प्रकार सांगितले आहे पैकी परमेश्वराचे चिंतन, मनन हे subjective जरी असले तरी शाश्वत सुख मानले आहे. या उलट भौतीक गोष्टींपासुन मिळणारे सुख हे कालांतराने सुखच असेल असे नाही. याला अशाश्वत सुख म्हणले आहे.

मन हे दिनेशदाने म्हणल्याप्रमाणे ठरवते की काय सुखकारक व काय दु:खकारक ते ठरवते. आपल्या मनाची ठेवण कशी ठेवायची ह्यावर आपल्या आयुष्यात किती सुख व दु:ख हे ठरते.

सुख हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं असं मला वाटतं. दिवसभर नुसतं गेट उघडबंद करणे असलं अतिशय नीरस काम करणारा वॉचमन तुम्हाला पाहून येताजाता तोंडभरून हसतो तेंव्हा मला त्याचं कौतुक वाटतं. तसेच सतत कपाळावर आठ्या घेऊन, मर्सी. मधून हिंडणार्‍या एखाद्या धनाढ्य व्यक्ती ला पाहिलं कि त्याचं सुख कुठेतरी हरवलय असं वाटतं. तर सुखाचा लिटरली पैशाशी संबंध जोडता येत नाही . माणसाला हवा तेंव्हा मिळणारा मानसिक आधार , त्याच्या सुखदु:खाशी निगडित आहे.
मन जर आनंदी असेल तर कोणतेही शारीरिक/मानसिक कष्ट जाणवत नाहीत. लहान सहान गोष्टीतही सुख (शोधलं तर) सापडतं. जसं खूप दिवसापासून हरवलेले अत्यंत आवडतं पुस्तक अचानक सापडतं तेंव्हा, ट्रॅफिक जॅम मधे फसले असता, शेजारच्या गाडीतलं लहान मूल माझ्याकडे बघून गोड हसतं तेंव्हा,
आकाशात पूर्ण गोल चंद्र दिसतो तेंव्हा जे काही मनाला होतं ना तेच सुख असेल.
थोड्या बहुत प्रमाणात सर्वांच्याच वाटेला कष्ट, दु:ख येत असतं त्यावेळी मन प्रसन्न ,आनंदी ठेवलं कि सुख आपोआप आपल्याला शोधत येतं.

हसरी अन दिनेशभाऊच्या पोस्ट नन्तर लिहीण्यासारखे शिल्लकच काय उरले? Happy
तरीही,
अ‍ॅम्बिशन विरुद्ध ग्रीड, अर्थात महत्वाकान्क्षा/जगण्याचा उद्देश विरुद्ध "हव्यास" यातील सन्घर्ष दु:खाचे मूळ कारण ठरतो असे मला वाटते!
[कालच तिन तास मनोचेर पटेल चे लेक्चर हसत खेळत ऐकुन आलोय Proud ]

सुख हे खरच असते का ? हे अगोदर तपासून पहावे लागेल !
बोटांना चावणारा बूट पायातू काढल्यावर किती सुख मिळते ? आणि पायात असताना असते ते दुख !
बस सुख असेच आहे !

आताच ओशोंचे विचार वाचले - सुखी होण्यासाठी आधी समाधानी व्हा, आणि समाधानी तेव्हाच व्हाल जेव्हा जी काय परिस्थिती तुमच्या वाट्याला आलीय ती विनातक्रार निमुटपणे स्विकाराल आणि त्यातही आनंद शोधाल.. समाधान सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल.

दिनेश तुमच्याशी पुर्णपणे सहमत. माझ्या आजुबाजुला सुखी माणसे कोण आणि किती आहेत असा विचार करते तेव्हा सर्वप्रथम तुमचाच आनंदी हसरा चेहरा समोर येतो.

सुख हे भोगण्यापेक्षा " समजण्यात अधिक " असते. एखादि गोष्ट आपल्याकडे नसलि कि आपण दु:खि होऊन ति मिळवण्याच्या मागे लागतो.ज्या क्षणि ति मिळते तो सुखाचा क्षण ,परत पुढल्या क्षणि त्या गोष्टीचि ओढ संपते व नविन एखादया गोष्टीचि ओढ लागुन ति मिळवण्या करता परत आपण दु:खि होतो. अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणुन दु:ख करत बसण्यापेक्षा अर्धा ग्लास भरलेला आहे हे बघुन सुख का मानु नये किंवा तो कसा भरेल हा प्रयत्न करावा. मराठि लिपि बनवताना सुख हा शब्द र्‍हस्व व सहज बोलायला सोपा केला पण दु:ख हा शब्द बोलतानाहि जरा जड व दु पुढे दोन टिंबरुपि अश्रुंचे थेंब दिले आहेत. सुख म्हणजे फुलपाखरासारख..मोहक, चंचल .निसटतच हातात येते. पण ते पकडताना बोटातुन ऊडाले म्हणुन दु:खि झालो तर बोटांना त्याच्या लागलेल्या रंगाकडे , त्या सुखाकडे लक्षच न दिले , तर नुस्ते नशिबाला दोष देण्यात काय अर्थ. म्हणुन सुख हे भोगण्यापेक्षा " समजण्यात अधिक " असते. नाहितर आपण "समजण्यातच ऊणे" होऊ.

लिंबू आणि साधना, मला हा आनंदाचा वसा देणारे, काहि मायबोलीकरच आहेत.
पण मी फारच स्वार्थी आणि ते नि:स्वार्थी असल्याने, त्यांची नावे उघड करत नाही.
फक्त हा वसा, सगळ्यांना वाटून टाकायचे, काम मात्र करत असतो.

हसायाचे आहे मला !

लताचे हे गाणे, खरे तर केविलवाणे आहे. मला वाटते, या कवितेच्या मागे
कविच्या पूत्रवियोगाची पार्श्वभूमी आहे. वैयक्तीक दु:ख विसरून, समाजासाठी
हसावे लागते, असा काहिसा आशय आहे.

आणि एक वेगळे, अगदी उलट उदाहरण म्हणजे, लताच्याच, ए मेरे वतन के लोगो,
या गाण्याचे आहे. नाही, गाणे उत्तम आहे, ते तिने उत्तम गायलेय, त्याबद्दल वादच
नाही. पण या गाण्याची दुसरी ओळ आहे, जरा आँखमे भरलो पानी ....
अरे बाबानो, जरा रडा तरि, कळत नाही का, केवढा त्याग केलाय त्यानी तो !!
मला हे आव्हान, केविलवाणे वाटते. जसे रडणे, आतून यायला हवे, तसेच
हसणे, देखील.

मला लहानपणापासून हसऱ्या चेहर्‍याची देणगी मिळाली आहे. मला अनेकजण
विचारत असतात, अरे कश्याने एवढा खुष असतोस ? माझा प्रतिप्रश्ण असतो,
दु:ख होण्यासारखे, असे काय घडलेय ?

खरे सांगू, आपण आतल्या आत खूप स्वार्थी असतो. दुसरा आपल्यापेक्षा जास्त
दु:खी असल्याचा, आपल्याला आनंदच होतो. पण मला आयुष्यात असे काही
मित्रर्मैत्रिणी भेटले, कि त्यांच्यापुढे मला माझीच कीव वाटायला लागली.
आणि ठरवले कि मनाला दु:ख होतेय, अशी शंका जरी आली, कि या
मंडळींची आठवण काढायची. (म्हणजे, त्यांचे हसरे चेहरे, डोळ्यासमोर आणायचे)
या व्यक्ती इतक्या ग्रेट आहेत, की त्या कधी आपले दु:ख इतरांना सांगतदेखील नाही.
माझ्यापुढे त्यानी मन मोकळे केले असेल, तर ते केवळ, मला धीर देण्यासाठी.
आणि म्हणूनच, मी त्यांची नावे घेत नाही.

यांच्याप्रमाणेच, मला अनेक हसरे चेहरे आवडतात, जयमाला शिलेदार, परवीन
सुलताना. लिना चंदावरकर, जुहि चावला, किरण वैराळे, मधुबाला,
यांना कधी दु:खी बघितलेय ? मला वाटतं, दु:खी दिसण्यासाठी, त्याना खास प्रयास
करावे लागत असतील.

याउलट, डिंपल, तिच्या चेहर्‍यावर एक कायम उदासी असते. मला तरी
तिचे हसणे, मुद्दाम प्रयासाने आणल्यासारखे वाटते.

काहिकाही बाळंच, कशी मूळातच हसरी असतात. बघितल्याबरोबर, त्याना
उचलून घ्यावेसे वाटते. तर काहिकाही बाळं, कायम रडवी आणि किरकिरी.
अजिबात जवळ येणार नाहीत.
आणि बाळांच्या बाबतीत तरी, प्रत्यक्ष चेहर्‍याच्या सौंदर्याचा, काहि संबंधच नसतो.
केवळ, निरागस हास्य, हेच त्यांचे सौंदर्य असते. आणि हे हास्य मोठेपणी कायम
राखणे, गरजेचे असते.

आणि यास कारणासाठी मला फ़ूले आवडतात. पूर्ण उमललेले फ़ूल, कधी उदासवाणे
दिसू शकते का ?

मी वर लिहिलेय तसे, हास्य कसे आतून यायला हवे. ते एअर होस्टेस सारखे
कृत्रिम आणि कमावलेले नसावे. (काहि अपवाद आहेतच.)

कधी कधी एखादा देशाचा तो स्वभाव असतो. मला तरी सिंगापूरमधला सामान्य
माणूस, कधी हसरा वाटला नाही. याउलट स्विस माणूस, तो कायम हसराच
असतो. ( अर्थात हे माझे मत आहे. )

मला चेहरा हसरा चेहरा , कुठलेच प्रयास करावे लागत नाहीत. अनेकदा
गाडीतून जाताना, माझ्या शेजारी बसलेला विचारतो, अरे कश्याने हसतो आहेस ?
अनेकदा, त्याला सांगण्यासारखे काहिही नसतेच.
त्या झाडाला खूप पेरु लगडलेत, काल वाटलं होतं, आज हि कळी उमललेली दिसेल,
आता तीन दिवसानी रविवार असेल, समोर विमान उडताना दिसतेय, समोरच्या
गाडिचा ब्रेकलाईट काम करत नाही, आज घरी जाऊन मस्त कॉफ़ि पिणार आहे,
या ढगाचा आकार बघ कसा वेगळाच आहे, या गाडीचा नंबर बघ, कसा वेगळा
आहे, असे कुठलेही कारण, मला हसण्यासाठी पुरते. इतराना नसेलच.

हसणे, म्हणजे सुखी असणे हे खरे आहे का ?
एका गझलेची सुरवात आहे, तूम इतना जो मुस्कुरा रहे हो, कहो के क्या गम
छुपा रहे हो.

समोरच्याला अशी शंका येणे, हे काहि खरे नाहि बाप्पा ! पण जर तूमचे
हास्य कृत्रिम असेल. बळेबळे आणलेले असेल, तर तूमच्या मित्राला वा
मैत्रिणीला, ते कळतेच. त्याला वा तिला फ़सवणे जितके कठीण, तितकेच
अयोग्य देखील. त्याचा वा तिचा, तूमच्या दु:खात हक्काचा वाटा असतो.
आणि तो त्याना द्यावाच लागतो. (न दिलात तर त्याना दु:ख होते.)
दिल्याने कदाचित तूमचे दु:ख कमी होणार नाही. पण त्याची धार
नक्कीच बोथट होईल. अशी, दु:खात हक्काचा वाटा मागणारी मित्रमंडळी
असावीत, यासारखे दुसरे सुख नाही.

पण मग, असे असल्यावर बाकि सगळ्याना, का हो, दु:ख दाखवावे ?
कळा ज्या लागल्या जीवा, मला कि ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या ?
हे खरे.
प्रत्येकाला आपले, आपल्या प्रियजनांचे दु:ख असतेच. त्याला
आणखी भार का द्यावा ?
परत प्रश्ण उरतोच, कि हसणे म्हणजेच सुखी असणे, हे खरे आहे का ?
माझ्यापुरते तरी याचे उत्तर हो असेच आहे. मनाला फ़सवण्याची गरज
नाही. मग मला काय सुखी माणसाचा सदरा मिळालाय का ?

खरे तर असा सदरा नसतोच. आणि हे माहित असण्यातच सुख आहे.
आपल्या पायात काटा रुतला, तर आपण काट्याने का होईना तो काढतोच.
म्हणजे प्रत्येक दु:खाला उपाय असतोच, तो शोधावा लागतो. आणि
शोधल्यावर सापडतोच.
कठीण वा गूढ वाटतेय का हे सगळॆ ?
आपल्याला कशाचे दु:ख झालेय, याचा शोध घेणे महत्वाचे असते.
याची अगदी पूर्ण, नव्हे पण त्रोटक यादी तरी, आपल्यापूरती तयार
करता येते.
आपल्याला, खुपदा दु:ख होते, ते एखाद्या व्यक्तिच्या वागणुकीचे !
याला अनेक उपाय आहेत. त्या व्यक्तीला तसे सांगा.
समजा असे वाटत असेल, कि असे सांगितल्याने, त्या व्यक्तीला
वाईट वाटेल, तर तूमचे तिच्यावरचे प्रेम खोटे आहे असे समजा.
असे सांगितल्याने, ती व्यक्ती तूमच्याही मैत्री तोडेल, असे वाटत
असेल, तर तिचे तूमच्यावरचे प्रेम, खोटे आहे असे समजा.
जर ती व्यकी ऐकणार नाही असे वाटले, तर तिचा नाद सोडा.
जर त्या व्यक्तीला सांगण्याइतके बळ नसेल, तर आडवळणाने,
सांगायचा प्रयत्न करा. आणि ते नाहीच जमले, तर तेवढे बळ
मिळवण्याचा प्रयत्न करा.
आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा मार्ग नसेल, तर वेल, तूम्हाला
दु:खी करण्याचा, त्या व्यक्तीला काहीही हक्क नाही असे समजा.
आणि अर्थातच, त्या व्यक्तीला, मनातून कायमचे पूसुन टाका.

एखाद्या घटनेचे दु:ख होत असेल, तर कालांतराने तिचे विस्मरण
होते हे लक्षात घ्या. त्या घटनेच्या तूलनेत, तुम्हाला आनंद देणार्‍याही
काहि घटना होत्या, आहेत, हे ध्यानात घ्या. नाहीच सापडल्या तर
प्रयत्नपूर्वक शोधा. त्या तूलनेने नक्कीच जास्त सापडतील.
ती घटना, टाळता येण्यासारखी होती का, याचा विचार करा.
काय केले असते तर टळली असती, याचा विचार करा. स्वत:च्या
बाबतीत तर हि काळजी घ्याच, पण इतरानाहि सावध करा.
माझ्यावर विश्वास ठेवा, इतराना प्रकाश देण्याचे सुख, स्वत:च्या
जळण्याच्या दु:खापेक्षा कैकपटीने जास्त असते.

एखाद्या शारिरीक व्याधीचे दु:ख आहे का ? औषधोपचार करा.
आजकाल मनोवेदनेवर देखील औषधे उपलब्ध आहेत. आधी
कबूल करा, कि आपल्याला उपाययोजनेची गरज आहे. पुढचे
सोपे असते, सगळे.
आणि जर ती व्याधी, बरी होण्यासारखी नसेल, त्यावर उपाय
नसेल, तर हे सत्य स्विकारा. तूम्ही न स्वीकारल्याने, सत्य
बदलणार नाही.
हळू हळू, तूम्हाला त्याची सवय होईल. शारिरीक व्याधी, या वाटतात
तितक्या दु:खदायी नसतात. आपणच त्याचा बाऊ करत असतो.
खरे तर उपाययोजनेची वा औषधोपचाराची गरज आहे, हे कबूल
करण्यातच सगळी उर्जा खर्च होते.

एखाद्या अभावाचे दु:ख आहे का ? खूपदा असते. अभिलाषा,
आकांषा बाळगण्यात काहीच गैर नाही. पण ते मिळवण्यासाठी
प्रयत्नच न करणे, हे जास्त तापदायक असते.
आपल्या नीतिमत्तेत आणि क्षमतेत जे प्रयत्न बसतात, ते तर
करायलाच हवेत ना ? जर नितिमत्तेत बसत नसेल, तर एक तर
प्रयत्न सोडा वा नीतिमत्ता सोडा. पण सुखी व्हा बॉ.

अभावाचे दू:ख हे कायम, त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही.
याने असते. मग यावर उपाय कोण करणार ? तो तो आहे आणि
मी मी आहे. हिंमत असेल तर विचारा कि, बाबा कसे रे मिळवलेस ?
शक्य असेल तर करा प्रयत्न. नसेल तर निदान एक करा, तूलना
करणे सोडा. त्याच्याकडे काय आहे, यापेक्षा माझ्याकडे काय आहे,
हा विचार करणे जास्त महत्वाचे आहे.

हुश्श ! झाली कि यादी पूर्ण ! तूमची पण करा बघू !

प्रत्येक प्रश्णाला उत्तर असतेच. आणि उत्तर नसले, तर तेच एक उत्तर
असते !!

सगळ्यांनीच इतके भरभरुन आणि परिपूर्ण लिहिले आहे, की ह्या सुखाच्या व्याख्या वाचणे म्हणजेच सुख की काय असे वाटायला लागले...
मीही वेगळे काही नाही पण थोडक्यात इतकेच म्हणेन..."ज्या वेळी ज्या गोष्टीची गरज असते त्या 'नेमक्या' वेळी ती गोष्ट मिळणे म्हणजेच सुख" मग ती गोष्ट भौतिक असो वा मानसिक...

जवळच्या व्यक्तींना आपल्या मुळे आनंद मिळाल्याने मनाला जी शांती मिळते .. ते कदाचीत सुख आसावं..
कारण तशी सुखाची व्याख्या आजुन समजलीच नाही... Happy

सुख ही मनाची एक अवस्था आहे. त्याचा मिळण्याशी/न मिळण्याशी काहीही संबंध नाही.
दिनेशने दिलेली पहिली व्याख्या पटली...:)

दिनेश धन्यवाद... तुम्ही लिहिलेत ते अगदी पटले. पण खुप वेळा आहे ती परिस्थिती स्विकारणे म्हणजे आपला पराभव असे मन आपल्याला बजावते. खरे तर आपल्या हातात काहीच नसते, पण चांगल्या गोष्टी घडत असताना आपला तो हक्कच आहे असे आपण मानतो, i deserve the best in life आणि आपल्या दृष्टीने वाईट गोष्टी घडल्या की मग सगळ्यांना दोष देणे चालु, आणि त्यातुन मग शेवटी आपण दु:खी व्हायचे आणि इतरांचे सुखही हिसकावुन घ्यायचे.

तुम्ही लिहिलेले वाचुन मलाही मी काही काही गोष्टींचे उगाचच दु:ख करतेय असे वाटायला लागले.... तसे फंडामेंटली काहीही झालेले नाहीय, उगीच एखाद्या गोष्टीकडे वरवर पाहायचे, त्यातुन फक्त आपल्याला हवाय तोच अर्थ काढायचा, समोरचा दुसरी बाजुही दाखवतोय तिकडे मुद्दाम दुर्लक्ष करायचे, वर त्याला 'तुला कळत नाहीय मला कशाचे वाईट वाटतेय' हे ऐकवायचे आणि बसायचे उदास चेहरा करुन..... हे केल्याने आपल्या जवळच्या माणसाला किती दु:ख होतेय हे अजीबात लक्षात घ्यायचे नाही... केवळ मी दु:खी आहे म्हणुन कोणीतरी दु:खी होतय ही गोष्टच किती भाग्याची आहे. आणि अशी व्यक्ती आयुष्यात असताना कसले दु:ख करायचे???????

आधीच आयुष्य लहान, त्यात आहे ते रडण्यात घालवायचे यापेक्षा मुर्खपणा दुसरा नसेल...

रुपाली, अमोल,नितीन,मंदार,वर्षु,श्री,स्नेहा,लिंबुटिंबु,संतोष्,सुनील, साधना, सानी,किरुती,परदेसाई,बाईमाणुस ,सुर्यकिरण आणि परत एकदा "दिनेशदा" ...!
तुमच्या प्रतिसादामध्ये बरचं सुख दडलेलं आहे ..हे नक्की !
सर्वांचे मनापासुन आभार !

सुख म्हणजे, असते तरी काय? रखरखीत उन्हात क्षणभर विसाव्याची जागा म्हणजे सुख, आगीच्या ज्वालांमधे हलकेसे थेंबांचे तूषार, निर्जन वाळवंटात दोन घोट पाणी म्हणजे सुख, सुखाची परिभाषा अन त्याची व्यापती खूप छोटी आहे. तेव्हा जेवढं आहे तेवढं सुखं.

सुख म्हणजे मनाचे समाधान.
"ज्या बिंदूवर हवे ते प्राप्त होवून तृप्ती झाल्याची जाणीव होते, तो बिंदू म्हणजे सुख"
आणि ते व्यक्तीनुसार वेगवेगळे असते.

आय्-पियल..धन्स हा धागा सुरु केल्या बद्दल.. फारच छान विचार वाचायला मिळाले सर्वा>चे..
दिनेशदा.. खुप छान मांडलत.. हे सर्व वाचुन नक्किच अधिक आनंद मिळवता येइल आता Happy