सावध ऐका (मागल्या) हाका!

Submitted by भोचक on 22 April, 2010 - 06:39

पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते. सबब, यापुढे कधीही इंदूरला आल्यास हा दिलेला गृहपाठ केल्याशिवाय येऊ नये असा खास सल्ला दिल्याशिवाय रहावत नाही.

आता हेच पहा ना. एरवी भाऊ असा सरळ सोपा नि साधा अर्थ असलेल्या भय्या या हिंदीभाषक शब्दाचे 'नवनिर्माण' झाल्याचे आपण पहातो आहोतच. भय्या या संबोधनात 'बिहार' नि 'उत्तर प्रदेश'च सामावल्याचे दिसते. पण मध्य देशी आल्यानंतर मात्र भय्यात किती विश्व सामावले आहे, याचा अंदाज येतो.

एरवी आपल्याकडे अपरिचित, अल्पपरिचित मंडळींना हाक मारण्यासाठी काका, मामा, दादा, भाऊ, अप्पा, अण्णा, ताई, काकू, मावशी, मामी या शब्दांची रास आहे. अगदीच गेला बाजार 'अहो, शूक शूक तुम्ही तुम्ही' यानेही काम भागते. पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही. दादा, भाऊमध्ये ती सर नाही. याउलट भय्यांत किती छटा लपल्यात म्हणून सांगू? नुसती हाक म्हणून, आदर म्हणून, नातं आड आलं म्हणून, नातं आड यावं म्हणून, नुसता 'आड' आला म्हणून हा शब्द बाहेर पडतोच. पण राग-चीड-द्वेष- हिणविणे या आणि अशा अनेक भावनांत बुडूनही हा शब्द तोंडातून 'फुटतो'. पण या शब्दांतल्या भावनांचा अदमास त्याचे उच्चारण समजून कळल्याशिवाय तुम्ही इंदौरात रूळलात असे म्हणताच येणार नाही, महाराजा.

आता तुम्ही इथल्या कुठल्याही चांगल्या-चुंगल्या दुकानात खरेदीला गेलात तर हाच शब्द 'भय्या, जरा वो कपडा दे ना'. म्हणून सोज्वळ रूप धारण करतो. रस्त्यावरच्या पोहेवाल्याकडे, पाणीपुरीच्या ठेलेवाल्याकडे, गल्लीत आलेल्या तरकारीवाल्याकडे नि पानटपरीत राजेशाही थाटात बसलेल्या पानवाल्याकडे हाच शब्द विठ्ठलाला 'विठू' म्हणावे अशा लयदार पद्धतीने 'भिया' असा प्रेमळ होतो. इथल्या ब्ल्यू लाईन बसमध्ये बसून कुठे चालले असलात की त्यातला 'भय्याही' प्रेमळ असतो. पण बस 'नगरसेवा' (खासगी वाहतुकदाराची) असेल तर मग त्यातल्या तिकीटफाडू पंटरच्या तोंडून आपला उच्चार 'भियाव, जरा खिसको ना' असा भ्यावणारा झाल्यास भिऊन जायचे कारण नाही. ही इंदूरी त्र्यागाची 'भियाव' आवृत्ती असते. पण ती इतक्यावरच थांबत नाही. भर ट्रॅफीकमध्ये कुणी धडक मारल्यानंतर झालेल्या भांडणातही हा 'भिया'च कामी येतो. 'भिया, गाडी चला रिया या क्या कर रिया था? या वाक्यासरशी दोन भियातले भांडण पुढे कितीही काळ रंगू शकते. रस्त्यात चालता-चालता किंवा चालवता चालवता तुमचा 'ओ भिया हटो ना' असा उद्धार झाल्याशिवाय तुम्ही इंदुरात असल्याचा फिल अजिबात येणार नाही. शब्द साधा 'भिया' असला तरी त्याच्या उच्चारणाची न्यारी ढब तो 'फिल' नक्कीच देईल.

नात्या-गोत्यातही भय्या असतोच. पण अनेकदा नाती निर्माण करताना तो गोत्यातही आणतो. समवयस्क मुलाला हाक मारताना नाव घेऊन पुढे भय्या लावण्याची ही प्रथा अनेक पोरीबाळींसाठी सोयीची ठरत असली तरी त्या 'भय्या'चा मात्र 'वडा' होतो. पण वय वाढल्याचं अनुक्रमे तुमचे डोईवरचे केस 'दिसत नसल्यासारखे' झाल्यास वा ते पांढर्‍या रंगाला पर्याय ठरल्याचे वाटताक्षणी तुम्ही 'भाईसाब' म्हणून 'कन्व्हर्ट' होता ते तुमचं तुम्हालाही कधी कळत नाही. भाई या खास हिंदी शब्दाची मुंबई आवृत्ती इथे वापरात नाही, पण त्याचा मूळ अर्थ पकडूनही हा शब्द केवळ नातेनिदर्शक एवढाच उरला आहे. गेला बाजार अगदीच सार्वजनिक कार्यक्रमात आदरार्थी उच्चार म्हणून 'भाई प्रवीणजी', 'भाई दिलीपजी' असे ऐकायला येते. पण तो शब्द जपून ठेवायचा म्हणूनच. बाकी काही नाही.

समवयस्क विवाहित महिला आपल्याकडे वहिनी असतात, इकडे त्यांचे कन्वर्जन 'भाभी' किंवा 'भाभीजीं' मध्ये होत असले तरी त्याहीपेक्षा 'बेहेनजी' ही खास इथली साद ऐकण्यासारखी असते. बायकांचे कपडे विकणार्‍या दुकानात याचा वापर बराच होतो. पण त्यातही गिर्‍हाईक गटवायचे या भावनेने पेटलेला दुकानदार 'दिदी दिदी' म्हणूनही रूंजी घालत बसतो. पण हल्ली त्याही पलीकडे 'मेडम' हा शब्द रूळलाय. विशेषतः सहकारी किंवा अनोळखी महिलांसाठी. सायकलवरून जाणाराही समोर स्कूटी घेऊन जाणार्‍या महिलेला 'मेडम, जरा हटो', किंवा गाडी ठोकल्यास, 'ओ मेडम केसे गाडी चला रही हो', म्हणून पुकारा करेल. काही ठिकाणी या 'मेडम'च्या पुढे 'जी' जोडून भिजलेला आदर दर्शवला जाईल. लिखित भाषेत ही मेडम 'मैडम' अशी अंमळ वाकल्यासारखी दिसते.

आपल्याकडचे 'काका-काकू' इकडे 'अंकल-आंटी' म्हणून उरलेत. त्यामुळे थोड्या मोठ्या पुरूषांना अंकल नि बायकांना आंटी असा सर्रास उच्चार आहे. त्यामुळेच की काय कुणीही 'सोळावं वरिस' ओलांडलेली कन्या अस्मादिकांच्या माथ्यापर्यंत रूंदावलेल्या विस्तीर्ण भालप्रदेशाकडे पाहून 'अंकल' म्हणते तेव्हा तोपर्यंत अभिमानाने उंचावलेले मोजके चार केसही मान टाकतात. पण कधी तरी वाहतुकीच्या भर गर्दीत कॉलेज कन्यकांचा अडसर होत असला की 'आंटी, बाजू हटो' म्हणून कधीचा तरी सूड कुठे तरी नि केव्हा तरी अखेर उगविण्याची संधी मिळते. उगाचच 'आंटी' संबोधून समोरचीच्या चेहर्‍यावरचे बदलते भाव पाहून, त्याला अजिबात भाव न देण्याइतकी इंदौरची नवी पिढी सोकावलीय. पण तरीही 'आंटी मत कहो ना, असा लाडीक स्वर सहसा कुठे ऐकल्याचे आठवत नाही. एकुणात सध्या या अंकल नि आंटीचा आख्ख्या इंदौरमध्ये उच्छाद आहे.

दुकानदारी भाषेतले काही शब्दही खास आहेत. आपला माणूस इथे 'अपना आदमी' होतो, पण त्याहीपेक्षा 'अपना बंदा आएगा, सम्हलके लेना' हा उल्लेख खास इथला आहे. हा 'बंदा रूपया' इथल्या व्यावसायिक कट्ट्यावर टण्णकन आवाजानिशी आदळला नाही, तरच नवल. मग त्याच धरतीवर कधी कधी 'मुलींचा' उल्लेखही चक्क 'बंदी' असाही होऊन जातो. एखाद्या 'चाय'च्या 'गुमटी'वर गेल्यास तिथल्या 'पिंट्या'ला 'बालक' होतो. 'ए बालक, इधर आ' अशी हाक आपसूक निघून जाते.

आणि हो, इकडे आलात तर महाराष्ट्रातली मराठी शब्दांचे हिंदी भाषांतर करून बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी. एरवी मराठी धाटणीचेच भाषांतरीत हिंदी रेटून नेऊन बोलण्याच्या मराठी सवयीला असाच योगायोगाने चाप बसला. आमचा एक मित्र खरेदीसाठी कपडा बाजारात गेला. खरेदी करता करता त्याने 'काका' या मराठी शब्दाचं भाषांतर करून 'चाचा, कुछ किमत कम करो' असं फर्मान सोडलं. झालं. समोरच्या दुकानदाराचं टाळकं सणकलं. चाचा? संतापून तो म्हणाला? मै क्या चाचा दिखता हूँ' इकडे मित्र गार. त्याला कळेचना. हा का चिडला ते? दुकानदाराचा संताप गळणे सुरूच, ' आपने दुकान नहीं देखी? महावीरजी का फोटो नही देखा? बाकी सारे जैन मुनियोंके फोटो नहीं देखें' तरीही मित्राचा डोक्यात काही शिरेचना. त्याने विचारलेच, लेकिन मैने गलत क्या कहा? तोपर्यंत त्या दुकानदाराला अंदाज आलेला की 'बेणं' बाहेरचं दिसतंय. तो म्हणाला, भाईसाब, यहॉं चाचा मतलब मुसलमान आदमी को बोलते है. मै जैन हूँ. समझे? मित्राच्या ज्ञानात भर पडली. शिवाय नको तिथे संबोधनांचे भाषांतर करणे टाळा हा धडा मिळाला.

हे झाले हिंदी बांधवांचे. आपल्या मराठमोळ्या मंडळींही 'सावध ऐका पुढल्या हाका' अशीच आहेत. इथल्या मराठी बांधवांची हिंदीवगुंठीत मराठी नात्यांची संबोधने जणू सराफ्यातल्या रसोत्पादीत जिलेबीचा थाट घेऊन तोंडातून टपकतात. आणि मग 'काका, मावशी के लिए मेसेज है', काकू आपको आईने हल्दीकुंकू के लिए बुलाया है'. 'मामा, तुम मामी को लेकर आओ, मैं आजी के साथ हूँ ही हिंदीच्या पुडीतली मराठी संबोधने ऐकायलाही मजा येते.

आताशा ही संबोधने आमच्याही 'कानवळणी' पडलीत. या संबोधनातली वळणेही आता जाणवू लागली आहेत नि त्याला प्रत्त्युतर करण्याची भाषाही आडवळणाने का होईना समजू लागली आहे. म्हणू

नच रस्त्यावर सवयीप्रमाणे मध्येच गाडी घालून रस्ता तयार करण्याची खास इंदौरी प्रथा पाळणारा गाडीस्वार आला, की 'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज', अशी इंदौरी भाषा तोंडातून बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही.

आमच्या इंदौरी झाल्याचा आणखी काय पुरावा द्यायला हवा काय? चला भय्या, थांबतो आता, सराफ्यात जाईन म्हणतो.

गुलमोहर: 

छान.

मस्त रे Happy

>>'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज'<< Happy

>>मग त्याच धरतीवर कधी कधी 'मुलींचा' उल्लेखही चक्क 'बंदी' असाही होऊन जातो. << Lol अगदी खरय आम्ही ऑफिसमध्ये हिंदिभाषिकांबरोबर बोलताना असाच उल्लेख करतो.

जबर्‍या. Wink

बालक!
भियाव.
बंदा. (हे युपीवाले, दिल्लीवालेपण फार वापरतात... बंदा आया था. बंदी आई थी... )

लय भारी Happy

<< त्यामुळेच की काय कुणीही 'सोळावं वरिस' ओलांडलेली कन्या अस्मादिकांच्या माथ्यापर्यंत रूंदावलेल्या विस्तीर्ण भालप्रदेशाकडे पाहून 'अंकल' म्हणते तेव्हा तोपर्यंत अभिमानाने उंचावलेले मोजके चार केसही मान टाकतात. >>

<< 'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज'>>

मस्त! Happy

मस्तच.
माझी मैत्रीण MP ची आहे. तिला हे वाचुन दाखवाव म्हणते. पण सगळ हिंदीत ट्रांसलेट कराव लागणार . काही मज्जाच रहाणार नाही मग. पण तिला सांगायच तर आहे कि आम्हा महाराष्ट्रियन लोकांना इंदोरी लोकांच किती कौतुक आहे. उफ्फ कैसी दुविधा है ये. Happy

इंदोरी खाणे यावर एक काय चार ललित होतील. एक साधा पदार्थ- फरसाण त्याच्या १५० व्हरायटी ? अजब आहे हे इंदोर

भोचक, अप्रतिम लिहीलेय.

एरवी भाऊ असा सरळ सोपा नि साधा अर्थ असलेल्या भय्या या हिंदीभाषक शब्दाचे 'नवनिर्माण' झाल्याचे आपण पहातो आहोतच. भय्या या संबोधनात 'बिहार' नि 'उत्तर प्रदेश'च सामावल्याचे दिसते. >> Lol

भय्यांत किती छटा लपल्यात म्हणून सांगू? नुसती हाक म्हणून, आदर म्हणून, नातं आड आलं म्हणून, नातं आड यावं म्हणून, नुसता 'आड' आला म्हणून हा शब्द बाहेर पडतोच. पण राग-चीड-द्वेष- हिणविणे या आणि अशा अनेक भावनांत बुडूनही हा शब्द तोंडातून 'फुटतो'. >> खरंय.. Happy

महाराष्ट्रातली मराठी शब्दांचे हिंदी भाषांतर करून बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी. >> Lol

लोकसत्ताला सराफ गल्लीतील खाऊवर खुप छान लेख आला होता.
तुम्ही का लिहीत नाही इंदौरी सराफ गल्लीवर आणि खाद्यसंस्कृतीवर? वाचायला जरूर आवडेल.

इंदोरी खाणे यावर एक काय चार ललित होतील. एक साधा पदार्थ- फरसाण त्याच्या १५० व्हरायटी ? अजब आहे हे इंदोर>> नितीन अनुमोदन!

ड्रीमगर्ल
भोचक यांचे २ दिवसांपूर्वी धुळे येथे अपघाती निधन झाले. ते नाही लिहू शकणार आता. Sad