पोटचा - भाग १

Submitted by दाद on 30 March, 2008 - 23:31

"उद्याला संजूबाबा येईल..... उद्या कुठचा... आजच येतोय. त्याच्या हाती सोपवलं सगळं की सुटल्ये.... कसा संभाळला हा डोलारा आपण....", नर्मदाबाईंनी पडल्या जागेवरून नजर जाईल तितकं घर बघून घेतलं. जवळ जवळ महिन्यानंतर बघत होत्या आपलं घर. त्यांचा ल्युकेमिया कुणाला कळलाच नाही. एव्हढ्या थोरल्या वाड्यात, एकट्याच रहात होत्या. घरचं कुणीच नही, दारचीच जास्तं. आजूबाजूला माणसं होती खूप... पण नाही लक्षात आलं कुणाच्या. एकदिवस कोसळल्या.... शुद्ध आली तेव्हा कमरेखालचं लुळं पडलेलं शरीर बघून असहाय्यपणे रडल्या... असं अजून काही आठवडेच जगतिल हे कळल्यावर मात्रं समाधान वाटलं त्यांना. इतकं होऊनही कामानिमित्त परदेशी असलेल्या संजयला त्यांनी कळू दिलं नाही. साठे वकील, अगदी जवळचे नातेवाईक ह्यांना तशी सक्त ताकीद होती. घरी परतलो की बघू....

*********************
दोनच दिवसांपूर्वी घरी आलो. आपल्या घरी.....घर कसलं? वाडा. केळशीकरांचा वाडा.
पहिल्यांदा बघितला तेव्हा अंगावर आला होता नाही? येईल नाहीतर काय? वर्‍हाडाबरोबर तसे कडुसं पडायच्या आधी आलो होतो गावाजवळ. पण उगीच गावात बोभाटा नको म्हणून नदीपल्याडच्या देवळातच थांबलो सगळेच.
आठवतय ते... देवळाच्या ओसरीत मान खाली घालून बसलेल्या आपण आणि चारी बाजूंना कधी न बघितलेली, माहीत नसलेली माणसं... अगदी दादासाहेबांसकट.
दादासाहेब, वयाने वीसेक तरी वर्षांनी मोठे. मी वीसाची तेव्हा त्यांची चाळिशी उलटून गेलेली. मोठ्या बाई.... त्यांच्या पहिल्या पत्नी कँन्सरसारख्या आजाराने झिजून गेल्या. एक मुलगा, अगदी लहान...... मग घरातल्यांच्या आग्रहावरून हे लग्नं.

आपल्यासारखीचं लग्न झालं हेच मुळी खूप होतं... हेच नाही का आई, ताता सारखे सांगायचे? आपल्याला अजून सहा बहिणी. सगळ्यांना उजवायचं ह्या नुसत्या विचारानेच ताता खचलेले दिसायचे. एक रूप सोडल्यास बाकी काही जमेची बाजू नव्हतीच, नाहीतरी. त्यामुळे वरती अजून दोन बहिणी असूनही... मध्यस्थाने विचारलं म्हणताना, नारळ-मुलगी इतकंच ठरलं. अशी भली सोयरिक ठरली तर पुढे-मागे उरलेल्यांची जमूनही जातील असा तातांचा विचार.... काय चुकलं त्यांच?.....
काय वाईट होतं ह्या स्थळात? हा! जरा वयाचा फरक.... खूपच म्हणायचा, अगदी त्या काळातही.... शिवाय पदरात एक मूल. त्यामुळे असेल कदाचित.... कारण केळशीकर तालेवार असूनही लग्नं अगदी साधं, तिसयाच गावी, देवळात केलं.
कितीही साधं म्हटलं तरी शंभर पान जेवलं त्यांच्याच घरातलं.... खर्च त्यांचाच. म्हटल्यासारखी फक्त नारळ आणि मुलगी यावेगळं काही काही घेतलं नाही.... मामंजींनी. शास्त्राची म्हणून रुपया वरदक्षिणा घेतली होता.

******************
’बाईसाहेब,...., बाईसाहेब... ऐकलं का? तीर्थं आणलय....’. पुरोहित सोवळ्यात उभे होते. त्यांना आजूबाजूला शांता, मंगला कुणीच दिसत नव्हत्या. त्यांनी आधी हाक मारायचा विचार केला...

.....हल्ली असं होतं.... कुठे मागे भरकटतं मन, असं मनात म्हणत नर्मदाबाई जराशा बसत्या झाल्या. त्यातही झालेल्या श्रमाने कपाळावर घाम डवरून आला.

’कुठे आहेत सगळे? आज संजूबाबासाहेब येतायत ना? तुमच्या कामाच्या बाई, दिसत नाहीत बाईसाहेब?’, इकडे तिकडे बघत सखेद आश्चर्याने पुरोहीत म्हणाले.

’नर्सबाई यायला हव्या होत्या एव्हाना... येतील... एव्हढ्यात. बाकी सगळ्या गावात गेल्या आहेत जत्रेला. दोन दिवसांत येतिल. माणसांना विरंगुळा लागतो, बुवा....’, नर्मदाबाईनी त्यांची अन स्वत:चीही समजूत काढली.
’जेवणाचं बघायला गडीबाबू आहे, आणि माझं बघायला नर्सबाई.... आणि घरचा मालक येतोच आहे...’, नर्मदाबाईंच्या थकल्या बोलण्यात संजूबाबाचं नाव निघताच आनंद पाझरू लागला.

’सुनबाई दुसयांदा भरल्या दिवसांची आहे म्हणून मीच नको म्हटलं... तरी....’, नर्मदाबाई थोडी तक्रार थोडा असहाय्यपणा अन थोडा आनंद अशा स्वरात म्हणाल्या.

’अहो, न येऊन कसं भागेल? कामासाठी दूर असले तरी लक्षं सगळं इकडे आहे, बाबासाहेबांचं..... आणि आता त्यांनाच बघायचंय....’, अनवधानाने निघून गेलं पुरोहितांच्या तोंडातून. तटकन थांबले ते अन पाणीही आलं डोळ्यात. दोन क्षण स्तब्धं उभे राहिले. अन एक निश्वास सोडून पुढे झाले.

’तुम्ही वाईट नका वाटून घेऊ बुवा, हे अटळ आहे.’, असं म्हणून अतिशय कष्टाने त्यांनी हाताच्या थरथरत्या द्रोणात तीर्थं घेतलं. पिऊन, तेच हात डोळ्यांना लावीत डोळ्यातलं पाणीही निपटलं आणि परत कशाबशा आडव्या झाल्या. त्यालाही मंगलची मदत घ्यावी लागायची.....
परत भूतकाळात हरवल्या....
**********
मोठ्ठ्या आतीबाईनी असंच डोळ्यांना पाणी लावून जागं केलं होतं वर्‍हाड वाड्यावर आलं तेव्हा..... धमणीत मागे.... कधी डोळा लागला कळलच नव्हतं. सासूबाई मागे कधीच वारल्या होत्या. घरात मोठ्या अशा आतीबाईच. हा सगळा बारदाना बघायचं त्यांच्याकडेच शिकल्ये तर काय? मोठया दोन नणंदा, आपल्या आईच्या वयाच्या म्हणायच्या. तोंडात सदैव मिरी भिजू घातलेल्या.... पण आतिबाईच्या पदराखाली निभवलं आपण. जाऊबाई एकच, धाकट्या. धाकट्या, मानाने म्हणायच्या. वयाने, खूप वडील. सदा आजारी. त्यांचं त्यांनाच निभायचं नाही.

शेवटची पंगत उठेस्तवर थांबले, तर भुकेनं जीव जाईल असं वाटत होतं. कळमळत असताना, आतिबाईंनी आपल्या खोलीत बोलावून नेलं अन, पदराखालून गोड शिर्‍याचा द्रोण काढून पुढ्यात ठेवला. हाताला धरून पलंगावर बसवलं नि, पाठीवरून हात फिरवून म्हणाल्या, "खाऊन घे, पोरी. बायकांची पंगत बसायला अजून दोन तास तरी जातिल. भुकेनं कळ्हो कळ्हो झाली असशील ना? घे...."

पोटातल्या भुकेपेक्षा आपली मायेची भूक मोठी होती हे त्या क्षणी कळलं. शिरा खाण्याआधी, त्यांच्या कुशीत शिरून पोटभर रडलो होतो आपण.
जेवणं झाल्यावर, काय करायचं ते न सुचून, एव्हढ्या मोठ्ठ्या स्वयंपाकघराच्या कुठल्यातरी कोपर्‍यात हरवून, चुळबुळत उभी होते. अगदी घरातल्यासारखी म्हणून पन्नास एक माणसं ये-जा करत होती. हे सगळं आपलं आहे, हे घर आपलं आहे ह्याचं कौतुक वाटण्याचं, अभिमान वाटण्याचं वयही नव्हतं तेव्हा.... त्यामुळे दडपण मात्रं खूप आलं होतं.

तितक्यात अंगात जरिचा अंगरखा, डोक्यावर जरिची टोपी, डोळ्यात काजळ असा किरकिरणारा सव्वा वर्षाचा संजूबाबा मोठ्या नणंदबाईंनी समोर आणून ठेवला.
"वैनी, हा तुझा मुलगा. संभाळ. आजपासून तू ह्याची आई... घे".... परक्याच्या हातात जायचं म्हणून त्यांच्याच खांद्यावर संजूबाबा तर रडायला लागलाच पण मलाही सुचेना काय करावं! मुलं संभाळली नव्हती असं नाही.... पण ती दुसर्‍यांची.

परत एकदा आतिबाई आल्या होत्या, देवासारख्या धावून, ’काय गं प्रतिभा हे असं.... धसाधसा काय म्हणून? बावरला ना पोर....’

त्यांनी हळूवारपणे संजूबाबाला जवळ घेतला होता आणि म्हटलं, ’अरे तुला चांदोमामा बघायचाय ना? ही छोटी आई घेऊन जाते बघ तुला’

त्यादिवशी हात पसरून झेपावलेला संजूबाबा मग चिकटलाच, आपलाच झाला. हे असं सहज जुळवुन घेण्याचं अन जुळवून देण्याचं आतिबाईंना अगदी अवगत होतं. समज येत गेली, रुळले, तशी हे ही शिकले. नात्याने मोठी पण वयाने लहान अशा दुबेळक्यात अनेकवेळा सापडले पण आतिबाईंची शिकवण, कधी त्यांची पाखर, अन कधी नुस्तं दैवं ह्यावर निभावलं.

आपलं म्हणायचं ते माणुस आपलं म्हणायला होतच कुठे जवळ?....

नर्मदाबाईना, दादासाहेबांची, आपल्या कुंकवाच्या धन्याची आठवण आली.....

इथला ओटीवरचा कारभार धाकटे भाऊजी अन मामंजी बघायचे, पण बाकी गावचा व्यापार, शेती ह्यांच्या भरवशावर. मोठ्या बाईंचं तसं झाल्यापासून तर जास्तच घराबाहेर पाऊल. मुलगा वाढतोय आपसुक... घरात इतर बघतायत....परणुन आणलेली दुसरी.... ती तरी बायको म्हणून कुठे आणलीये? ती आणलीये मुलाची दुसरी आई म्हणून... देखभालीला....
......सुरूवाती सुरूवातीला असलं सगळं होतं. खूप कठिण गेलं तेव्हा... पण विचार करायलाही वेळ मिळायचा नाही. तांबडं फुटल्यापासून रात्री, आधीच पेंगुळलेल्या संजूबाबाला कुशीत घेई पर्यंत दिवस कसा मागे पडायचा कळत नव्हतं....
माहेरचे, घरचे, नातलग सगळेच आपल्या भाग्याचा हेवा करत होते. पावणे-रावणे, आलं-गेलं, घरच्या माहेरवाशिणींची माघारपणं, ह्यात पाच-सात वर्षं कशी गेली कळलीच नाहीत.....

संजूबाबाला त्याच्या छोट्या आईशिवाय कुणीच चालायचं नाही. शाळेतून आल्यावर दिसले नाही, तर रडायचा. अभ्यासाला हुशार, गुणी लेकरू पण अवखळही वयानुसार. शाळेतून आला की दप्तर भिरकावून देऊन आधी ’छोट्या आईला’ मिठी, मग शाळेतल्या गमती-जमती सांगत खाणं-पिणं.....
शाळेच्या सुट्टीच्या दिवशी मळ्यावर जायला खूप आवडायचं त्याला. विहिरीत डोकावणार नाही, नांगराला लोंबकळणार नाही, मारक्या साहेब्या बैलाच्या जवळ जाणार नाही, पेरूच्या झाडावर चढणार नाही.... लाडीगोडी लावून, असली वचन देऊन जायचा. किती लाघवी....
........................

क्रमश:

भाग २ - http://www.maayboli.com/node/1566
भाग ३ - http://www.maayboli.com/node/1586

गुलमोहर: 

अग हे तू जुन्या हितगुजवर लिहिलं होतस ना?

सायोनारा, नाही, गं. इथेच. पण जुनी आहे म्हणून तुला तसं वाटतय. आणि काहीतरी होऊन मी ती तीन भागात पोस्टली होती.

पूर्वा, हे पुढले भाग.
भाग २ - http://www.maayboli.com/node/1566

भाग ३ -
http://www.maayboli.com/node/1586

मस्त!
उत्कंठा लागून राहिलीय.

शरद

"नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरल्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!"

मला सगळी कथा एकत्र वाचायला मिळाली - या भागात सर्व कथेच्या लिंक्स असल्यामुळे वर आणत आहे - नवीन वाचकांसाठी.
कथेविषयीचा माझा अभिप्राय तिसर्‍या भागावर देत आहे.
"आफ्टर ऑल दाद इज दाद" - एवढेच म्हणू शकतो.

माफ करा, शशांक. इतर भागांच्या लिन्क्स द्यायचं... माझ्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं.
खूप धन्यवाद तुमचे... खणून खणून काढ्ताय, वाचताय आणि अभिप्रायही देताय. (छान वाटतय...).

लेखणी लाभली सरस्वतीची |
वीणाही देत माता स्वहस्तीची |
दादनामे आविष्कार येणेचि |
अनुभविती रसिकजन ||