वृक्षारोपण

Submitted by नितीनचंद्र on 20 April, 2010 - 09:54

वालीया उद्योगसमुहाच्या पुण्यातल्या वालीया इंजिन्समध्ये आज फारच गडबड चालली होती. वालीया उद्योगसमुहाच्या तरुण मॅनेजींग डायरेक्टरने - हर्षद वालीयाने कंपनीला भेट देण्याचे मान्य केले होते. कंपनीच्या मालकाने कंपनीला भेट देण्याचा हा योग अनेक वर्षांनी म्हणजे जवळ जवळ १७ वर्षांनी येणार होता.

५०- ६० वर्षापुर्वी स्थापन झालेल्या या सर्वात जुन्या कंपनीत गेले १२-१५ वर्षे अनुत्साहाच वातावरण असायच. ही कंपनी जेव्हा सुरु झाली, शेती साठी लागणारे ऑइल इंजिन व त्याला जोडला जाणारा पाण्याचा पंप तयार करणारी कंपनी होती. त्या नंतर इलेट्रीकल मोटर्स व त्याला जोडण्याचे पाण्याचे पंप आल्याने ह्या छोट्या इंजिन ऑईलवर चालणार्‍या क्रुषी पंपाची मागणी घटली. नंतर या कंपनीने डिझेल इंजिने बनवायला सुरवात केली. लहान आकाराचे डिझेल पंप बनवणे त्या काळी सुरु झालेले नव्हते त्यामुळे शेतीसाठीचे पंप हा धंदा वालीयाकडुन गेला.

नंतरच्या काळात ही मोठी डिझेल इंजिने दुसर्‍या कंपनीने बनवलेल्या जनरेटरला जोडुन डिफेन्ससाठी विकली जाऊ लागली. हे काम याच उद्योगातली दुसरी कंपनी करु लागली. वालीया इंजिन्समधुन इंजिन घ्यायचे, दुसर्‍याच उद्योगातुन जनरेटर आणायचे. हे फक्त जोडुन विकणारी वालीया जनरेटर्स ही कंपनी फायद्यात चालायची पण वालीया इंजिन्स मात्र दरवर्षी तोट्यात चालायची. यात मालकाच काय गणित होत न कळे. पण हे असच अनेक वर्ष चालु होत. नाही म्हणायला वीस वर्षापुर्वी जेव्हा ऑईल इंजिनचा जोर कमी होऊन डिझेल इंजिन आल तेव्हा नवा प्लॅन्ट उभा राहिला होता. या नवीन प्लॅट्च्या उदघाटनाला या कंपनीचे दुसर्‍या पिढीतले मालक अशोक वालीया आले होते. सर्व कामगार व स्टाफ यांच्यासोबत ते जेवले होते. पण त्या नंतर कुणीच कधीच आले नाही. कामगारांची वेतन वाढ सुध्दा स्थानिक मॅनेजमेंट करीत असे.

दर वेतन वाढीला हेच कारण सांगितले जाई. कंपनी तोट्यात आहे. कशी बशी पगारवाढीची बोलणी होत. त्या कराराने कामगारात फारसा उत्साह येत नसे. मागील पानावरुन पुढे चालु अशी रोजची कामाची आखणी असे. दर चार पाच वर्षांनंतर नवीन जनरल मॅनेजर येत. सुरवातीला उत्साह दाखवत परंतु मालकांच्या धोरणाने गळचेपी झाली की सोडुन जात.

वरूण गुप्ता जेव्हा जनरल मॅनेजर म्हणुन इथे आला त्याने हर्षल वालीया या तिसर्‍या पिढीतल्या मालकाशी चांगला संबंध प्रस्थापीत केला. अशोक वालीया आता फक्त चेअरमन होते. हर्षद वालीया सर्व उद्योगात आता मॅनेजिंग डायरेक्टर झाले होते. त्यांचा विचार हा आधीच्या पिढीतील लोकांपेक्षा जास्त व्यवहारी होता. हर्षद वालीयाच्या काळात आर्थीक विकास वेगाने झाल्याने विद्युत निर्मीती आणि मागणी यातले व्यस्त प्रमाण वाढल्याने छोटे उद्योग आता डिझेल जनसेट्सची मागणी त्यांच्या करु लागले होते. यामुळे डिझेल जनसेट्स याची मागणी वाढली होती.

डिफेन्स बरोबरच आता छोट्या उद्योगांना डिझेल जनसेट्सचा पुरवठा करण्याचा विचार जेव्हा वरुण गुप्ताने हर्षद वालीयाला सांगीतला तेव्हा हर्षद वालीयाला वरूण गुप्ताच्या हुशारीचे कौतुक वाटले. हर्षद वालीया जेव्हा वरुण गुप्ताला म्हणाला की यावर तयारी करुन ये आपण विस्तारने बोलु, वरुण गुप्ताने सगळा प्लॅन हर्षद वालीयाच्या समोर ठेवला. यावर विचार करुन मी आठ दिवसात सांगतो असे हर्षद वालीया म्हणाला.

आठच दिवसात हर्षद वालीयाने प्लॅन मंजुर करुन उत्पादन वाढीसाठी लागणारी सर्व साधने देण्याचे मान्य केले. वरुण गुप्ताने यासाठी हर्षद वालीयाला पुण्याला बोलावले जेणेकरुन कामगार व स्टाफ यांच्यात उत्साह निर्माण होऊन एका वर्षात उत्पादकता दुप्पट वाढावी. ही मागणीसुध्दा हर्षद वालीयाने मान्य केली व मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात बुधवारी हर्षद वालीया पुण्यातल्या वालीया इंजिन्सला भेट देण्याचे सुचीत केले. या पत्रात फक्त एकच अडचणीची गोष्ट हर्षद वालीयाने लिहीली होती की त्यांच्या वडीलांनी केलेल्या वृक्षारोपणाचा आता मोठा वृक्ष झाला असेल तो सुध्दा त्यांना पहायचा आहे.

वरुण गुप्तांनी हे पत्र सर्व डिपार्ट्मेंट मॅनेजर्सच्या मिटींगमध्ये वाचले. एक गोष्ट वाचायची टाळली ती म्हणजे व्रुक्षारोपणाची. सर्व डिपार्ट्मेंट मॅनेजर्सच्या मिटींगमध्ये उत्साह पसरला. कोणाला काही सुचवायचे असल्यास बोलावे असे वरुण गुप्ता म्हणताच पर्सोनेल मॅनेजर कुलकर्णी म्हणाले की अशीच युनीयनची मिटींग बोलावु व त्यांना देखील विश्वासात घेऊ. यावर वरुण गुप्तांनी मान डोलावली व सदर मिटींग तातडीने आयोजीत करायला कुलकर्णींनाच सांगीतले. मिटींग संपताना मेंटेनंन्स मॅनेजर डांगेला गुप्तांनी थांबवले व त्या पत्रातली हर्षद वालीयांना हवा असलेला व्रुक्षारोपणाचा व्रुक्ष कोठे आहे ते विचारले.

डांगेंला आठवावे लागले की हे व्रुक्षारोपण नेमके कोठे झाले. सावकाश पणे एक एक शब्द योजत डांगे बोलला "व्रुवृक्षारोपणाचा जो कट्टा बांधला होता त्यावरच अशोक वालीयांनी लावलेल झाड बहुदा एका वर्षाच्या आत जळाल. या चौकोनी कट्ट्याला चारी बाजुनी व वरुन पत्रे लाऊन त्याच आता गोडाउन बनवलय. यात आता साईनाईड ट्रीटमेंटचे स्क्रॅप बाथ म्हणजे वेसल्स तिथ स्टोअर केले जातात. वर्षातुन एकदा ते उचलुन डिस्पोजल करणारा कॉट्रॅक्टर आला म्हणजे त्याला दिले जातात. सर या कट्याच्या पुढच्या बाजुला संगमरवरी पाटी आहे, श्री अशोक वालीया यांच्या नावाची व तारीख ज्या दिवशी झाड लावल ती."

"डांगे हे अस का झाल असेल मागच्या काळात ? तुम्ही जुने आणि कंपनीच्या सर्व भागात तुमचा वावर म्हणुन विचारतो" वरुण गुप्तांनी डोक्याला हात लावत विचारल. " मालकांनी लावलेल झाड, तो संगमरवरी बोर्ड याची कुणालाच काळजी, आस्था का नाही वाटली ?"

सर त्याच काय आहे, जे काय घडल त्याला मी सुध्दा तितकाच जबाबदार आहे. दहा वर्षापुर्वी फॅक्टरी इन्स्पेक्टर आला. त्याने साईनाईड ट्रीटमेंटचे स्क्रॅप बाथ उघड्यावर पडलेले पाहीले आणि ऑबजेक्शन घेतल. हे साईनाईड ट्रीटमेंटचे स्क्रॅप बाथ एका बंद खोलीत असले पाहिजेत असा आदेश दिला. आपली कंपनी कायमच तोट्यात. पगार, इतर ख्रर्चाचा मेळ लावताना फायनान्स मॅनेजर आणि जनरल मॅनेजर यांच्या नाकी नऊ यायचे. त्यात या कामाचे बजेट नव्हते. मग मीच ही कल्पना मांडली. तेव्हाचे जनरल मॅनेजर म्हणाले कर काय करायचे ते. मग या कट्ट्यावर हे गोडाऊन तयार केले.

आता मात्र हद्द झाली होती. पण वरुण गुप्तांना राग मुळी येतच नसे त्यातुन खर बोलाणार्‍या माणसावर ते कधीही रागावत नसत. अनेक असे चुकीचे निर्णय त्यांनी त्यांच्या काळात सुधारले होते. आता आणखी हा एक. "डांगे तु येव्हडा क्रिएटीव्ह असशील तर आता काय करशील ते मला संध्याकाळपर्यंत सांग. आपल्याला त्या कट्ट्यावर आता झाड पण लावायच आहे साधारण पंधरा वर्ष इथे आहे अस वाटणार झाड हव आहे." क्षणभर या मागणीने डांगे गोधळला पण असली जुगाड बनवण्याच्या बाबतीत त्याचा अनुभव चांगलाच होता. डांगेचे डोळे लकाकले. आपण हे काम नक्की करणार या खात्रीने तो उत्साहात म्हणाला
"सर पण झाड कुठल लावायच ? म्हणजे या कट्ट्यावर मुळच झाड कुठल होत हे कुणालाच आठवत नसणार. मालकांनी काही उल्लेख केलाय का या पत्रात ?"

"डांगे एकच अडचण आहे. ह्या झाडाचा उल्लेख करताना हर्षलसाहेबांनी फक्त जुने फोटो पहाताना त्यात त्यांचे वडिल म्हणजे अशोक वालीयांनी एका झाडाचे वृक्षारोपण केले ते झाड येव्हडाच उल्लेख पत्रात केला आहे. एक काम कर आपल्या अ‍ॅडमिनीस्ट्रेशन डिपार्ट्मेंट्ला जुने फोटो आहेत का पहा. सापडत नसतील तर वेळ देऊन शोध आणि संध्याकाळी भेटु तेव्हा सांग. ओके ?" ओके हा इशारा डांगेसाठी मिटींग संपल्याचा होता.

डांगे निघाला आणि जाताना विचार करत राहिला, गुप्तांच्या आधीचा जनरल मॅनेजर असता तर फोटोचा विषय सगळ्यांसमोर बोलला असता. कट्ट्यावर गोडाऊन बांधले ऐकुन थयथयाट केला असता. त्यांच्याही आधीचा जनरल मॅनेजर व माझ्या दहा पिढ्यांचा उध्दार केला असता. गुप्तासाहेबांची स्टाईलच वेगळी. डेलीगेशन वुइथ कंट्रोल यांच्याकडुनच शिकावे लागेल.

संध्याकाळी डांगे जेव्हा गुप्तासाहेबांना भेटायला आला तेव्हा सगळा प्लॅन व तो फोटोचा अल्बम घेऊनच आला होता. गुप्तासाहेबांनी डांगेचा चेहरा पाहुनच ओळखले होते की हे काम पुर्ण होणार. ह सांग डांगे, काय प्लॅन आहे ? गुप्तासाहेबांनी विचारले.

गुप्तासाहेब, या गोडाऊनमध्ये आता साईनाईड ट्रीटमेंटचे स्क्रॅप बाथ शिल्लक नाहीत. गोडाउन पुर्ण रिकामे आहे. बनवताना पत्र्याचे बनवले आहे. काहीतासात त्याचे पत्रे काढुन टाकता येतील. ही जागा काळजीपुर्वक स्वच्छ केली आणि झाडाच्या खड्यातली संपुर्ण माती बदलली की पुन्हा नवीन झाड लावता येईल. या जुन्या अल्बम मधे जे झाड दिसतय ते अशोकाच वाटतय. तुम्हीपण खात्री करा. आपल्या कंपनीत याच सुमारास लावलेली अनेक अशोकाची झाडे आहेत. त्यातल एखाद मुळासकट काढुन लावतो या जागी. हे करताना काही अडचण आल्यास हा कट्टा फोडतो झाड लावतो आणि पुन्हा कट्टा बांधुन घेतो. कोणालाही समजणार नाही अस बेमालुम काम करतो साहेब." गुप्तांना डांगेला आपल्याला काय करायच आहे ते नेमक समजल्यामुळे बर वाटल. आता चष्मा डोळ्यावर मागे सरकवत त्यांनी वृक्षारोपणाच्या वेळेचे अल्बम पहायला सुरवात केली.

"हमम... अशोकाचच झाड आहे " फोटो पहात गुप्तांची प्रतिक्रीया समाधानाची होती. मला दोन प्रश्न आहेत डांगे, पहिला प्रश्न हे काम कधी करणार ? दुसरा प्रश्न की हीच जागा तु त्या वेळी का निवडलीस ? जमिनीवर हे गोडाऊन बांधता आले असते ना ?

सर तुमच्या पहिल्या प्रश्नाच उत्तर हे काम येत्या शनिवारी म्हणजे १ मे या सुट्टीच्या दिवशी करणार आहे. गरज लागलीच तर २ मे च्या रविवारी म्हणजे आठवड्याचा सुट्टीचा दिवस आहेच हातात. फायदा असा की फॅक्टरीत या वेळेला कुणीच नसाल्यामुळे याची चर्चा होणार नाही.
दुसर्‍या प्रश्नाच उत्तर ही जागा मी अशासाठी निवडली की कट्यामुळे ही जागा उंच होते. इथे पावसाच पाणी येऊन पाण्याबरोबर साईनाईड पसरायची शक्यता रहात नाही. फॅक्टरी इन्स्पेक्टरलाही हेच अपेक्षीत होत.

अजुन काही अडचणी येतील का ज्या साठी माझा निर्णय तुला घ्यावा लागेल ? लागलाच तर तु मला विचार कोणत्याही वेळी आणि कॅश ठेव जवळ काही लागलच तर आणायला. नवीन गोडाऊन साठी जागा शोधुन त्याच प्रपोजल बनवुन तयार ठेव पण हर्षदसाहेबांच्या व्हिजीटनंतरच ते माझ्याकडे घेऊन ये.

हर्षदसाहेबांच्या व्हिजीटचा दिवस उजाडला. अ‍ॅडमिनीस्ट्रेशन मॅनेजर स्वतः त्यांना घ्यायला लोहगाव विमानतळावर गेले होते. पारंपारिक पध्दतिन त्यांच कुंकुमतिलक लाऊन कंपनीच्या मेनगेटवर स्वागत झाल. कामगार युनीयनचे ही लोक स्वागताला उभे होते. त्यांनी हर्षदसाहेबांना मराठी पध्दतीचा फेटा बांधला. युनीयनच लिडर शिंदे याने हर्षदसाहेबांना नमस्कार करताना हर्षदसाहेबांच्या कानात म्हणाला "हा स्वागताचा फेटा आहे. थोड्यावेळाने काढला तरी चालेल. तुम्हाला सवय नाही याची पण दोन चार फोटो झाले की मला इशारा करा." हर्षदला ही स्वागताची पध्दत व लिडरचा मनमो़कळेपणा दोनीही आवडले.

पोर्च मध्ये वरूण गुप्ता व सर्व मॅनेजर्स स्वागताला उभे होते. गुप्तासाहेबांनी सर्वांची ओळख करुन दिली. प्रत्येकाशी हस्तांदोलन झाल्यावर सर्व मंडळी कॉन्फरन्स हॉल मधे आली. सुरवातीला गुप्ता साहेबांनी स्वागताच भाषण केल. सर्वांच्या वतीने हर्षदसाहेबांना पुष्पगुच्छ दिला व त्यांना बोलयला सांगितल.

हर्षदसाहेबांनी बोलायला सुरवात केली माफी मागुन. ते म्हणाले आमच्या पॉलीसीमुळे या फॅक्टरीला वनवास भोगावा लागला. तुमची क्षमता असुन तुम्हाला कोणतेही आव्हानात्मक काम आम्ही दिले नाही. पर्यायी तुम्ही अनिच्छेने कामावर येत राहिलात आणि प्रामाणिकपणे एकमेकांची काळजी घेत काम करत राहीलात.

आता ही परिस्थिती आपण बदलणार आहोत. मध्यम आकाराचे डिझेल - जनरेटर्स सेट या कंपनीत आपण बनवणार आहोत. अर्थात जनरेटर्स बाहेरुन येतील. डिझेल इंजिनाबरोबर जुळणी आपल्याला करायची आहे. तुमच्या पुढे आव्हान आहे की उपलब्ध मनुष्यबळातच सुरवातीला हे काम करायचे आहे. डिफेन्सचे कामही चालु राहील आणि कंपनी फायद्यात चालु लागेल. मी खात्री देतो की याचा फायदा तुमच्या पर्यंत नक्की पोहोचेल. आज आपल्या कामगारांचे /कर्मचार्‍यांचे पगार हे इतरांच्या तुलनेत कमी आहेत ते नक्की वाढतील. यासाठी तुमच्या सर्वांचे सहकार्य तुम्ही गुप्तासाहेबांना द्या जे हे काम नेमके कसे करायचे याचा प्लॅन करणार आहेत.

या मिटींग मधे मॅनेजमेंटचे प्रतिनीधी म्हणुन सिनीयर मॅनेजर प्रॉड्क्शन-पवारसाहेब यांनी सर्व मॅनेजर्स गुप्तासाहेबांना सहकार्य देतील तर युनीयन लिडर शिंदे यांनीही अशीच ग्वाही दिली. यावर संतोष व्यक्त करून हर्षदसाहेबांनी खात्री दिली की माझ्या बाजुने मी सर्व साधने पुरवीन.

मिटींग संपली, मो़जक्या लोकांसमवेत हर्षदसाहेबांचा फॅक्टरी राउंड सुरु झाला. प्रत्येक विभाग आज सजला होता. सिनीयर वर्कर्स हर्षदसाहेबांचे त्यांच्या विभागात स्वागत करत होते. नवीन कामाची माहिती आधीच कळल्यामुळे होकारात्मक प्रतिसाद देत होते. असे होता होता ही मंडळी फॅक्टरीबाहेरच्या मो़कळ्या जागेत आली. याच ठिकाणी तो कट्टा व अशोकाचा नवा वृक्ष मोठ्या दिमाखात डौलत उभा होता. हा वृक्ष निरखुन पहात हर्षदसाहेबांनी या झाडाच्या खाली उभे राहुन स्वतःचे काही फोटो काढुन घेतले.

तिथुन परत आल्यानंतर जेवणाच्या आधी जेव्हा गुप्तासाहेबांच्या केबीनमध्ये हर्षदसाहेबांशिवाय अन्य कोणी नसताना गुप्तासाहेबांनी नम्रपणे वृक्षारोपणाची खरी परिस्थीती सांगीतली. यावर क्षणभर विचारात पडलेले हर्षदसाहेब म्हणाले आम्ही जिवंत माणसांच्या स्वप्नांचा अनेक वर्ष चुराडा केला. लोक खाजगी कंपनीत का काम करतात ? जास्त उत्पन्न मिळावे या साध्या उद्देशाने. याची सजा तुम्ही लोकांनी फारच सौम्य दिलीत. पण मला एक खात्री झाली ज्या प्रमाणे ही व्रुक्षारोपणाच्या गोष्टीवर तुम्ही पर्याय काढलात त्याच प्रमाणे उत्पादन वाढीत येणार्‍या प्रत्येक अडचणींवर तुम्ही परिणामकारक तोडगा काढाल व आपली कंपनी तुमच्या नेत्रुत्वाखाली नावारुपाला येईल. गुप्तासाहेब यावर धन्यावाद देऊन त्यांना जेवायला घेऊन गेले. वालीया उद्योगातली वालीया इंजिन्स पुन्हा नवीन आव्हाने पेलायला सज्ज झाली.

हर्षद वालीया गेले. वालीया इंजिन्स पुन्हा उत्साहात सुरु झाली. डांगेकडे आणखी एक नवीन डिपार्ट्मेंट आल ते म्हणजे गार्डनिंग. पुढच्या काळात जर हर्षद वालीया परत आलेच तर त्यांना फॅक्टरी हिरवी हिरवी दिसायला हवी ही गरज वरुण गुप्तांनी जाणली होती. अनेक मालकांचे वेडेवाकुडे छंद पुरवण्याचे काम गुप्तांनी या आधीच्या कंपन्यात जातीने लक्ष देऊन केले होते. हर्षद वालीयांचा हा वृक्षारोपणाचा छंद त्यामानाने साधा व कोणत्याही फॅक्टरीसाठीचा आवश्यकच उपक्रम होता.

गुलमोहर: 

सरकारि व प्रायव्हेट नोकरिमध्ये हाच तर फरक असतो. तुमच्या कल्पनाशक्तिला ,कामाला प्रतिसाद चांगला व लवकर मिळतो.

लपवाछपवी करण्यापेक्षा गोड शब्दात का होईना.. पण कथेतील प्रत्येकाने खरे बोलण्याचा कल ठेवला हि गोष्ट खुप म्हणजे खुपच आवडली. आणि समोरच्या वरीष्ठानेही समजुन घेऊन आकांडतांडव केले नाही हेही वाखाणण्याजोगे.