जनार्दनस्वामी

Submitted by नरेंद्र गोळे on 19 April, 2010 - 03:47

नुकताच काही व्यक्तीगत कारणांमुळे नागपूरला जाण्याचा योग आला. तेव्हा एके दिवशी सकाळीच जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या एका शाखेत अगदी योगायोगानेच जाऊन पोहोचलो. मी शाळेत असतांना (१९७३-७४ चा सुमार असेल) स्वतः जनार्दनस्वामी आमच्या शाळेत येऊन आम्हाला सुलभ सांघिक योगासने शिकवत असत. तेव्हाची आठवण जागी झाली. आज नागपूरच्या रामनगरातील त्यांच्या योगाभ्यासी मंडळाच्या कार्याचे, एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले दिसून येते. नागपूर व विदर्भात मिळून मंडळाच्या ९४ शाखांतून दररोज सांघिक योगसाधनेची नि:शुल्क सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सांघिक योगासने, योगोपचार, योगाभ्यास व योगसाधना या सर्वच उपक्रमांद्वारे नागपूरात या योगपीठाचे कार्य सिद्धीस पोहोचलेले दिसून येते. त्याच अनुषंगाने श्री.जनार्दनस्वामींचा अल्पपरिचय इथे करून देत आहे.

योगमूर्ती परमपूजनीय श्री जनार्दनस्वामीजींचा जन्म, कार्तिक वद्य १४, शके १८१४ (इसवी सन १८९२) या दिवशी, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कवठे गावी झाला. कुशाग्र बुद्धी व बहुविध व्यक्तित्व असलेल्या स्वामीजींनी अल्पवयातच चतुर्विध वेद-वेदान्त, अन्वय-व्यतिरेक, श्रृती-स्मृती, व्याकरण, आयुर्वेद, ज्योतिषविद्या, इत्यादी विषयांचे सखोल अध्ययन करून शास्त्रशुद्ध ज्ञान प्राप्त केले.

स्वामीजी स्वतःच एक चालते बोलते तीर्थक्षेत्र होते. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊन, संन्याशाश्रमाची दीक्षा घेतली होती. भारतभ्रमण व नर्मदा परिक्रमा करत असतांना, एका अज्ञात संन्याश्याने त्यांना योगविषयक ज्ञान प्रदान केले.

नंतर स्वामीजी नागपूरात आले. तो सूर्योदय नागपूरकरांसाठी भाग्यशाली ठरला. नागपूर ही कर्मभूमी मानलेल्या स्वामीजींनी ’शिवभावे जीवसेवा’ हे परमहंसांचे ब्रीद हृदयाशी बाळगून, आबालवृद्धांना व्याधिमुक्त होण्याचा महामंत्र देण्यास प्रारंभ केला. तो मंत्र होता: करा हो नियमित योगासने! धर्म, संप्रदाय, भाषा, लिंग, आयु, आर्थिक परिस्थिती या सर्व भेदभावांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी समाधान, सौख्य व निरोगत्व ही उद्दिष्टे साधण्याकरता योगसाधना अंगिकारण्याचा महामंत्र वायुवेगाने आबालवृद्धांपर्यंत पोहोचवण्याचे महत्कार्य करणारी ही महान विभूती नागपूर शहराचे भूषण ठरली आहे!

त्यांनी योगप्रसार व योगोपचार हे जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून, घरोघरी योगगंगा पोहोचवण्याकरता, १९५१ साली "योगाभ्यासी मंडळा"ची स्थापना केली. प्रत्येकाला समाधान, सुख व निरोगी जीवन लाभावे म्हणून, सेवाभावाने, निःशुल्क योगप्रशिक्षण देणे, योगप्रसार करणे, हे योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने । योगमेवाभ्यसेत प्राज्ञः यथाशक्ति निरंतरः ॥ हा स्वामीजींचा संदेश हेच मंडळाचे घोषवाक्य बनलेले आहे.

स्वामीजी वीतराग, अनिकेत व अयाचित वृत्तीने कठोर संन्यस्त जीवन जगले. त्यांचे आयुष्य अनेकांच्या स्मृतीपटलावर आजही कोरलेले आहे. नागपूरला ’योगपीठ’ स्थापन करणारी ही ’युगनिर्माता’ विभूती, वैशाख कृष्ण १२, शके १९००, अर्थात २ जून १९७८ रोजी समाधिस्थ झाली. मंडळ परिसरातील स्वामीजींची समाधी योगसाधकांना सतत प्रेरणा देत आहे.

जनार्दनस्वामींचे समाजकार्य

त्यांनी वडिलांच्या अस्थी-विसर्जनाच्या निमित्ताने पायी हरिद्वारची यात्रा केली. परततांना हिमालयातही खूप प्रवास केला. सिद्धपूर येथे एका मंदिरात राहत असतांना स्वामीजींना अज्ञात गुरूंकडून योगाभ्यासाची दीक्षा मिळाली. त्यांनी दोनदा नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. मग नर्मदाकिनारीच हुशंगाबादच्या दत्तमंदिरात त्यांनी योगासने शिकवण्यास सुरूवात केली.

आज दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे, मासिके इत्यादी माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर योगप्रचार सुरू असतांना, स्वामीजींनी त्या काळात योगासने शिकवतांना किती खदतर परिश्रम घेतले असतील याची कल्पनाही करणे कठिन आहे. ज्या काळात योगाविषयी अज्ञान होते, समाजात उपेक्षेची वृत्ती होती, त्या काळात धीरोदात्तपणे व अत्यंत चिकाटीने स्वामीजींनी लहान मुलांपासून, मोठी माणसे व महिला यांच्यापर्यंत सर्वांना योगासने शिकवली. त्यांची आसने शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी होती. योगासने करून अनेक आजार बरे होऊ शकतात याचा विश्वास त्यांच्या कार्यामुळे लोकांमध्ये निर्माण झाला. त्यांनी प्रामुख्याने मध्यप्रदेश, बिहार व महाराष्ट्र या राज्यांमध्ये पायी फिरून योगासने शिकवली.

स्वामीजींची योगप्रसार-प्रचाराबाबतची श्रद्धा आणि चिकाटी दांडगी होती. त्या काळी खांडव्याला श्री तोमर या नावाचे नॉर्मल स्कूल अधिक्षक होते. त्यांना शाळांतून योगप्रसार करावा ही स्वामीजींची कल्पना पसंत पडली. त्यांच्याच सहकार्याने १९४८ मध्ये स्वामीजींनी शाळांतून योगप्रसार स्करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याकरता सूर्यनमस्कारादी १२ आसनांच्या सामुहिक व्यायामाचे एक प्रात्यक्षिकच त्यांनी सादर

केले. नॉर्मल स्कूल शिक्षकांना सुमारे दहा मिनिटांची ही योग-ड्रील स्वामीजींनी शिकवली. फक्त दहा मिनिटेच. किती अल्प काळ. पण तेवढ्या वेळातच जमिनिवर घामाने आकृती निघे. या ड्रीलसोबतच मयुरासन, सर्वांगासन, हलासन, शीर्षासन, शवासन अशा काही महत्त्वाच्या आसनांचा सुमारे २०-२५ मिनिटांचा कार्यक्रमही स्वामिजींनी तयार करून दिला. श्री. तोमर फारच प्रभावित झाले होते. १५ दिवसांनंतर तोमर यांच्या आग्रहावरून एका हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. गुप्ता यांनी तोच कार्यक्रम त्यांच्या शाळेत राबवला. पुढे मध्यप्रदेशातील एक जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एन. एच. मुजुमदार यांच्या शिफारशीवरून त्या काळचे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. एम. एस. मोडक यांनी शाळांना पत्र पाठवून सांघिक योग-कवायतींचा कार्यक्रम राबवण्यास सांगितले.

योगप्रसारार्थ, १९४८ साली त्यांनी अमरावतीला योगसंमेलन भरवले व भारतीय योगाभ्यासी मंडळाची स्थापना केली. त्यानंतरच त्यांनी ’सुलभ सांघिक आसने’ व ’प्राणायाम’ ही पुस्तके लिहीली. शास्त्रीय संशोधन करून योगासनांच्या स्वरूपात सूर्यनमस्कार विकसित केला. त्याचे सचित्र तक्ते तयार केले. या सर्व साहित्याची किंमत ते अत्यल्प ठेवत असत. ते स्वतःच अशा साहित्याची विक्रीही करत. योगाभ्यास मात्र निःशुल्क शिकवत असत. १९५१ च्या संक्रांतीस स्वामीजी नागपुरात आले. नागपूरला त्यांनी दुसरे ’भारतीय योग संमेलन’ आयोजित केले.

योगासनांच्या प्रसारात स्वामीजींचे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे ’सांघिक आसने’ होय. आतापर्यंत योगासनाविषयी, ती एकट्याने करावयाची मोक्षप्राप्तीची कठोर तपस्या आहे असेच वातावरण होते. परंतु स्वामीजींच्या सोप्या सांघिक पद्धतीमुळे गावोगावी योगाचा प्रचार सुलभ झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शारीरिक शिक्षण कार्यक्रमात योगासनांचा समावेश करण्याचे ठरल्यावर परमपूजनीय सरसंघचालक श्री. गुरूजींनी जनार्दनस्वामींनाच प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांकरता आसनांची निवड व क्रम ठरवून पुस्तक लिहीण्यास सांगितले. त्याप्रमाणे जनार्दनस्वामींनी संघाच्या शारीरिक शिक्षण कार्यक्रमाची योजना करून दिलेली आहे. जानेवारी २००२ मध्ये रा. स्व. संघाच्या भारतात ३३, ००० गावी शाखा आहेत. जगभर ३५ देशांमध्ये संघाचे काम सुरू आहे. या शाखांच्या माध्यमातून लाखो स्वयंसेवकांपर्यंत योगासनाचा प्रचार होत आहे.

श्री. एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारीच्या श्रीपाद शिलेवर विवेकानंदांचे अप्रतिम स्मारक उभारल्यानंतर, ’विवेकानंद केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना १९५८ मध्ये केली. या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणात योगासनांना अग्रक्रम देण्याचे श्री. एकनाथजींनी ठरवले. त्याकरता व विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांना योगासने व इतर योगक्रियांचे यथोचित मार्गदर्शन करण्यासाठी, स्वामीजींना त्यांनी कन्याकुमारीस येऊन राहण्याची विनंती केली. त्यासाठी ते प्रत्यक्ष नागपूरला येऊन स्वामीजींना भेटले. स्वामीजींनी हे दायित्व तात्काळ स्वीकारले. विवेकानंद केंद्राच्या पहिल्या शिबिराच्या उद्घाटनाला स्वामीजी उपस्थित राहिले. त्यानंतर महिनाभर तेथेच मुक्काम करून, त्यांनी आपल्या पद्धतीप्रमाणे जीवनव्रतींना सर्व प्रकारच्या योगक्रिया स्वतः शिकवल्या. त्यानंतर प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन जीवनव्रतींना सतत काही वर्षे स्वामीजींचे मार्गदर्शन लाभले.

विवेकानंद केंद्राच्या या प्रशिक्षण वर्गात स्वामीजींच्या साहाय्याला, इंग्लंडमधून काही काळासाठी भरतात आलेले तरूण इंजिनियर श्री. कनू गोविल व मुंबईचे श्री. कोठारी हे असत. आज विवेकानंद केंद्राच्या सर्व शाखांतून स्त्री-पुरूषांना योगासनांचे प्रशिक्षण देण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यात स्वामीजींच्या तालीमीत तयार झालेले काही कार्यकर्ते आहेत.

आपल्या समाजात जुन्या काळी काही अज्ञानी व अविवेकी लोकांनी योगासंबंधी बराच अपप्रचार केला होता. त्यामुळे समाजात एक अपसमज रूढ झालेला होता की, योगासने स्त्रियांना शिकवू नयेत. स्वामीजींनी या रूढीविरुद्ध कुठलाही आरडाओरदा न करता, महिलांना योगासने शिकवण्यास सुरूवात केली. आपल्या देशातील कुटुंबरचना अशी आहे की घरातील स्त्री वर विविध जबाबदाऱ्यांचा भार येत असतो. हा सर्व ताण सहन करतांना तिची प्रकृती ढासळते. तिला अनेक आजार होतात. त्यावर केवळ औषध उपयोगी नसते. घरातील स्त्री दुःखी असेल तर संपूर्ण कुटुंबावरच त्याची छाया पडत असते. त्यामुळे स्त्री चे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. स्त्री सुखी-आनंदी तर सारे कुटुंब सुखी व आनंदी राहू शकते. स्वामीजींनी घरोघरी जाऊन तसेच महिलांकरता स्वतंत्र सांघिक योगासनांचे वर्ग सुरू करून एक मौन क्रांती घडवून आणली. नागपूरच्या महाल भागात श्री. लक्ष्मीनारायण मंदिरातील सभामंडपात योगाभ्यासी मंडळाच्या वतीने महिलांकरता योगासनांचे वर्ग सुरू झाले.

डॉ. श्री. भा. वर्णेकर नागपूर विद्यापीठात संस्कृत विभागप्रमुख होते. ते एके दिवशी योगाभ्यासी मंडळात स्वामींना भेटण्यासाठी गेले असता, स्वामीजींनी एक कागद त्यांच्या हाती दिला. त्यात लिहीले होते की, ’जीवनात आरोग्य, सुख आणि समाधान प्राप्त करण्याचा एकमात्र उपाय योगाभ्यास हाच आहे. प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे नित्य योगाभ्यास करावयास हवा. ’ डॉ. वर्णेकर हा मजकूर वाचून स्वामीजींकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले. स्वामीजी हसून म्हणाले, ’पाहता काय असे, या अर्थाचा संस्कृत श्लोक आताच्या आता करून दाखवा. ’ डॉ. वर्णेकरांनी लगेचच त्या संदेशाचा एक श्लोक तयार केला. तो असाः

समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने ।
योगमेवाभ्यसेत् प्राज्ञः यथाशक्ति निरंतरः ॥

योगाभ्यासी मंडळाच्या मुद्रेवर हाच संदेश कोरल्या गेला. पुढे नागपूरच्या रामनगरातील योगाभ्यासी मंडळात स्वामीजींच्या समाधीस्थळावरही हाच संदेश अंकित केला आहे. योगाभ्यासी मंडळाचे ते बोधवाक्य म्हणूनच प्रचलित झालेले आहे. अतिशय सोप्या भाषेतील स्वामीजींची आसनांवरील पुस्तके हा आपल्यासाठी त्यांचा खूप मोठा ठेवा आहे. आसने व तीही ’सांघिक’ करण्याविषयी स्वामीजी आग्रही असत. कुणी त्यांना विचारले की हीच आसने घरी केली तर चालणार नाही का? त्यावर स्वामीजी उत्तर देत की, चालेल. पण सामुदायिक आसनांच्या ठिकाणी आसने केल्यास आळस येत नाही आणि नियमितपणात घरच्यासारखा व्यत्यय येत नाही.

त्यांनी वयाच्या ८५व्या वर्षापर्यंत घरोघरी जाऊन आसने शिकवली. परंतु प्रारंभापासूनच वेगवेगळ्या मोहोल्ल्यात जायचे, तेथे आसनांसाठी उपयुक्त जागा शोधायची व योगाभ्यासाचे केंद्र असे स्वरूप त्याला आणायचे अशी योगविस्ताराची त्यांची पद्धत होती. समाजात योगासने शिकवतांना वय, जात-पात, स्री-पुरूष असा कुठलाही भेद ते ठेवत नसत.

एकदा एका वर्गात स्वामीजींनी प्रात्यक्षिके स्वतःच करून दाखवली. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. एका मानसाने त्यांना प्रश्न विचारला की, ’स्वामीजी, वयाच्या कोणत्या वर्षी आसने सुरू करावित? ’ स्वामीजींनी त्याचे मोठे मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले की मनुष्य जन्माला येण्यापूर्वी गर्भासनात असतो आणि अंतीम श्वास गेला की शवासनात असतो. त्यामुळे वयाच्या कोणत्या वर्षी आसने सुरू करावी हा प्रश्न चुकीचा आहे. कोणत्या वयात कोणती आसने करावित, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो! स्वामीजींच्या या उत्तराने वर्गातील साऱ्याच योगप्रेमींचे डोळे उघडले.

अशा विविध वर्गांचे आयोजन करतांना स्वामीजींच्या कर्मठतेचा अनुभव लोकांना आला आहे. नागपूरच्या माधवनगर मध्ये असाच एक वर्ग सुरू झाला. स्वामीजी दर मंगळवारी त्या वर्गात योगासने शिकवण्यासाठी जात असत. एके दिवशी त्या वर्गात स्वामीजी एकटेच आसने करत होते.

त्याबद्दल डॉ. वर्णेकरांनी त्यांना प्रश्न विचारला की, ’स्वामीजी, या वर्गात जर कोणीच उपस्थित राहत नाही, तर आपण आपला वेळ येथे का घालवता? ’ स्वामीजी त्यावर शांतपणे म्हणाले की, ’हा वर्ग जाहीरपणे सुरू झाला आहे, तसा तो जाहीरपणे बंद झालेला नाही. त्यामुळे कोणीही उपस्थित नसले तरीही वर्ग चालू आहे. वर्गात आसने करणारा कोणी नसला तरी मी हजर असतो तेव्हा आसने करून वर्ग चालू ठेवतो. स्वामीजींनी योगप्रचार करतांना सुरूवातीपासूनच अशी निष्ठा ठेवल्यामुळेच गावोगावी योगासनांचे वर्ग चालवतांना शिक्षकांसाठी एक आदर्श उदाहरण निर्माण झाले.

१९७१-७२ मध्ये इंग्लंडमधून श्री. कनू गोविल या तरुणाचे नागपुरात आगमन झाले. ते इंजिनियर होते. योगासने शिकण्याकरताच आलेले होते. योगाभ्यासी मंडळातील पहिल्या दिवशी त्यांना धड मांडी घालून बसताही येत नव्हते. पाश्चात्य देशांतील जीवनशैलीमुळे तेथील सर्वांचीच अशी अवस्था असते. गोविल यांची योगासने शिकण्यातील अपार रुची आणि स्वामीजींच्या शिकवणुकीमुळे एक-दीड वर्षात अत्यंत कठीणात कठीण आसन त्यांनी शिकून घेतले. प्रत्येक आसनाची पूर्ण स्थिती त्यांना सहजपणे येऊ लागली. योगाभ्यासी मंडळात विविध आसनांच्या प्रात्यक्षिकांची त्यांचीच प्रकाशचित्रे आजही लावलेली आहेत. अन्य कुणाचीही नाहीत. इंग्लंडला परततांना स्वामीजींनी त्यांना उपदेश केला की या विद्येचा व्यापार करू नको. केल्यास ती विद्या समाप्त होईल.

हे वेचे खालील पुस्तकातून घेतलेल्या माहितीवर आधारलेले आहेत.

पुस्तकः योगमूर्ती श्री. जनार्दनस्वामी
लेखकः श्री. रविंद्र शंकर जोशी
प्रकाशकः भारतीय विचारसाधना, नागपूर
प्रकाशनकाळः प्रथमावृत्ती, जानेवारी २००९
किंमत रु. ६/- फक्त

जनार्दनस्वामी, योगाभ्यासी मंडळ व त्यांच्या कार्यांसंबंधी अधिक माहिती, पुस्तके, अभ्यासक्रमांचे तपशील इत्यादी खालील पत्यावर मिळू शकेल.

जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ
योगमंदीर, रामनगर, नागपूर-४४००३३
दूरध्वनीः ०७१२-२५३२३२९
ई-मेलः jsyog@rediffmail.com
संकेतस्थळः www.jsyog.org

http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे नातेवाईक श्री. पटवर्धन ९० वर्षांचे असोन स्वमींचे शिष्य आहेत. तब्ब्येत ठणठणीत व स्वभाव निवृत्त, शांत आहे.