http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_14.html
"आज आपण बघणार आहोत पास्तुला कसा करायचा" झगावाल्या बाई हात जोडून सुहास्य वदनाने वदत्या झाल्या.
पोस्टची सुरुवातच ढळढळीत खोट्या वाक्याने करू शकत नसल्याने आधीच कन्फेशन देऊन टाकतो की असं काहीसं त्या झगावाल्या बाई न कळणार्या विंग्रजीत (की स्पॅनिशात ?) म्हणाल्या असाव्यात असा तर्क मांडून मी या वरच्या वाक्याने सुरुवात करून पुढची प्रक्रिया बायकोला सांगायला सज्ज झालो. काही नीट कळत नाहीये ना मी काय बडबडतोय ते? माझं पण अगदी अस्संच झालं होतं ती रेसिपी बघताना आणि त्याचं धावतं समालोचन बायकोला देताना.
पुन्हा सुरुवात करू.. म्हणजे रेसिपीची नव्हे, प्रसंगाची.. झालं काय की परवा सुदैवाने (की दुर्दैवाने?) आमचा रिमोट हरवला न.. व्ह.. ता... आणि आम्ही चक्क चॅनेल सर्फिंगची लक्जरी उपभोगत होतो आणि अचानक (माझ्या) दुर्दैवाने मी एका इटालियन रेसिपीच्या चॅनेलवर स्थिरावलो. 'अडकलो' हा शब्द जास्त समर्पक आणि वस्तूस्थिती-निदर्शक आहे खरा पण असुदे.. उगाच कशाला खाडाखोड.. तर त्या अडक्या चॅनेलवर कसले कसले भन्नाट (येथे भन्नाट हा विचित्र या अर्थी वापरला आहे याची कृपया समस्त रसिकांनी आणि खादाडांनी नोंद घ्यावी. आमचे सगळे वाचक हे एकतर रसिक तरी असतात किंवा खादाड तरी त्यामुळे आम्ही 'वाचक' हा गुळमुळीत वृत्तपत्रीय शब्द वापरत नाही याचीही इथे नोंद घ्यावी. भरली आजची नोंदवही.. आता पुढे.) पदार्थ घालून कायतरी वाफवून, तापवून, ढवळून 'पास्तुला' (आता हाही शब्द माझाच याचीही नोंद तमाम ........ घ्यावी वगैरे वगैरे) नावाचा पदार्थ करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात होतं. ते पाहून बायकोने मला तिथेच थांबण्याची (टीव्हीच्या चॅनेलवर याअर्थी) खुण केली. आणि अर्थातच मी त्या चॅनेलवरच थांबलो. आता हे काय वेगळं सांगण्याची गरज होती का? उगाच 'पुन्हा' पुनरुक्ती.. 'पुन्हा' पुनरुक्ती, 'पाठीमागची' बॅकग्राउंड , 'खरी' फॅक्ट वगैरे वगैरे वगैरे.. असो.
तर ते 'पास्तुला' नामक भयंकर खाद्यान्न आणि त्याहूनही भयंकर त्याची कृती बघावी लागणार अशा विचारात असताना युवराजांनी तोंड वेडंवाकडं करून निसर्गराजाने त्यांच्या डायपरमध्ये अनंतहस्तांनी दान दिल्याची वर्दी दिली. बायको डायपर बदलायला धावली आणि मी चॅनेल बदलायला. पण माझा आनंद नशिबाला (आणि बायकोला) बघवला नाही. बायकोने हुकुम सोडला की "चॅनेल बदलू नकोस. ती रेसिपी नीट बघ आणि एकीकडे मला सांग ते काय आणि कसं करतायत ते.."... "अरे कर्मा.. आली का पंचाईत.. आता डायपर बदलताना तू ती रेसिपी ऐकून काय करणार आहेस?" वगैरे प्रश्न मी (नेहमीप्रमाणे) गिळून टाकून 'हो' म्हटलं.
तर यानंतर त्या सुरुवातीला सांगितलेल्या काल्पनिक वाक्याचा जन्म झाला. तेच ते हो 'हात जोडून', 'पास्तुला' वगैरे.. ही पोस्ट म्हणजे रामूच्या किंवा एखाद्या विंग्रजी पिक्चरासारखी होतेय नाही? जसं ते म्हणतात (समजतात) की कुठलाही प्रसंग मी कुठेही, कशाही क्रमाने दाखवणार आणि प्रेक्षकांनी (आपल्या इथे रसिकांनी, खादाडांनी) आपलं डोकं वापरून क्रम जुळवायचा. असो. आचरटपणात तेवढाच काहीतरी वेगळेपणा..
तर त्या काल्पनिक वाक्याकडे अर्थातच दुर्लक्ष करून बायकोने महत्वाच्या कामाकडे लक्ष वळवलं आणि मी त्या झगावाल्या बयेकडे.. म्हणजे रेसिपीकडे.. कायतरी उगाच.. ती बया पास्तुला करण्यासाठी आवश्यक पदार्थ (इन्ग्रिडियंट्स व्हो) सांगताना असले काही भन्नाट पदार्थ आणि शब्द वापरत होती की असे काही पदार्थ अस्तित्वात आहेत आणि ते पदार्थ (या आपल्याच मनुष्यलोकात) खाण्यासाठी वापरतात हे मला पहिल्यांदाच कळलं. आणि तेही सबटायटल्स ऑन असल्याने ते शब्द निदान कळले तरी, कारण उच्चारांच्या नावाने बोंबच होती.
तर सुरुवातीचे (काल्पनिक) नमस्कार-चमत्कार झाल्यावर, इन्ग्रिडियंट्स सांगून झाल्यावर झब (झगावाली बया) कृतीकडे वळली.
१. एका पातेल्यात भरपूर (किती ते तिने आमचा त्या चॅनेलवर प्रवेश होण्याआधी सांगितलं होतं. त्यामुळे मी भरपूर असा सर्वसमावेशक शब्द वापरतो आहे) पाणी घेऊन ते रटारटा उकळत ठेवा. (पातेलं, रटारटा आणि उकळत हे अर्थातच झबच्या शब्दांचं मराठीकरण आहे)
२. आता सगळा (आम्या.. म्हणजे 'भरपूर'वाला) पास्ता घेऊन तो फेका... फेका? फेका?? वा वा .. फेका .. "पास्ता फेका" हे असं मी मोठ्याने ओरडून बायकोला सांगितलं तेवढ्यात झब पुढे म्हणाली "into container" .. म्हणजे "Throw the pasta into the container".. च्यायला त्या विंग्रजी भाषेच्या.
३. एकेक करत समोर दिसतील तेवढे (झबकडे सुदैवाने (फक्त?) चारच होते.) सगळे टिन्स, कॅन्स धडाधड उघडा आणि मिसळा. एकमेकांत नव्हे हो. पास्तुल्याच्या पातेल्यातल्या पाण्यात. (प प प... आता पुढची सगळी वाक्यं 'प' ने सुरु होणारी लिहू का? पको.. पाऊदे पुढच्या पेळी पधीतरी. पाहीतर पात्ता पेवटी "पास्तुला खा" प्या पैवजी "पास्तुला प्या" पसं पिहावं पागेल.. परं पाटतंय.. आपलं सॉरी.. बरं वाटतंय. पुढच्या वेळी नक्की ट्राय करतो. ).. आणि हो ते टिन्स, कॅन्स कसले होते याची नक्की कल्पना नाही कारण आम्या. पण वाण्याच्या दुकानात गेल्यावर 'पास्ता सॉस' लिहिलेले कुठलेही (त्यातल्या त्यात जरा 'दिसायला आणि रंगाने' बरे असलेले. 'वधू-वर पाहिजे' ची अॅड वाटतेय.) टिन्स/कॅन्स उचललेत तरी चवीत काडीमात्रही फरक पडणार नाही ही आमची (म्हणजे माझी, झब ची नव्हे) 'गॅरंटेड' खात्री. ('पुन्हा' पुनरुक्ती, 'पाठीमागची' बॅकग्राउंड , 'खरी' फॅक्ट, गॅरंटेड खात्री वगैरे वगैरे वगैरे.. )
४. ते सगळं मिश्रण ढवळा. कारण ढवळलं नाहीत तर आजचा पदार्थ 'पास्तुला'च्या ऐवजी 'सॉसचा डोंगर' हा आहे असं वाटेल.
५. त्यात ते खरवडलेलं खोबरं, वितळलेलं चीज आणि किसलेले बदाम घाला आणि ढवळत रहा.
झालं.. त्या झब ने एवढं म्हणताक्षणी स्क्रीनवर कुठलीतरी झाडं दिसायला लागली. मी--आधी मनात आणि मग मोठ्याने ओरडून--म्हटलं "संपली रेसिपी."
"संपेल कशी?"
"मग ही झाडं कुठून आली मधेच? पुढचा प्रोग्राम सुरु झाला."
"ती त्या बदामाची झाडं आहेत. त्या बदामांची पैदास कशी होते, ती झाडं कुठे, कशी असतात, त्यावर कशी प्रक्रिया करतात आणि मग ते बदाम आपल्यापर्यंत कसे येतात, त्यांचा दर्जा कसा उच्च प्रतीचा आहे हे सगळं ते सांगतायत"
डायपर बदलण्याचं काम मगाशीच संपलं असल्याने बायकोही माझ्याबरोबर त्या झब चं प्रवचन ऐकते आहे हे माझ्या लक्षातच न आल्याने मी उगाचच धावतं समालोचन देत बसलो होतो एवढा वेळ. आता एवढा वेळ बघितलंच आहे तर पुढेही बघू आणि हा पास्तुला नक्की दिसतो कसा तेही बघू अशा विचाराने मी वेगवेगळ्या ३९४ (अंअं) कोनातून दाखवली जाणारी ती बदामाची झाडं बघत बसलो. अचानक (अं) सव्वाचार मिनिटांनी स्क्रीनवरची झाडं धुरकट पुसट होत जात जात गोल गोल फिरत खोल खोल जायला लागली आणि तोवर उलट्या दिशेने पांढर्या रंगाचं काहीतरी गोल गोल फिरत बाहेर येताना दिसलं. ती 'गरगर' थांबून सगळी चित्रं स्थिर झाल्यावर तो पांढरा रंग म्हणजे पांढरं वाडगं (झबच्या भाषेत बौल) आणि त्या पांढर्या रंगाच्या वाडग्यातला पांढरा पास्तुला आहे हे कळलं.

"हा चीजसॉस मध्ये केला असल्याने पांढरा दिसतोय. आपण टोमॅटो सॉस मध्येही करू शकतो आणि टोमॅटो सॉस घालून केल्यावर पास्ता छान लाल आणि जरा तिखट होतो" अशी (तिच्या मते) अत्यंत उपयुक्त माहिती बायकोने पुरवली. डोळे फाडफाडून बघितलं तरीही त्या चार टिन्समधले ते विविध रंगांचे पदार्थ आणि ते बदामाचं झाड मला त्या पास्तुल्यात कुठेही दिसलं नाही.
"कोण खाणार हा पास्तुला?" असं मी म्हटल्यावर बायकोने "ए ते 'पास्तुला पास्तुला' म्हणणं बंद कर बघू आधी. त्याला सरळ सुटसुटीत भाषेत 'पास्ता' म्हणतात सगळेजण. तुही तसंच म्हणालास तर जरा बरं वाटेल. तुझं तुलाच." असे शालजोडीतले हाणेपर्यंत झब ने स्क्रीनच्या उजव्या कोपर्यात दिसणार्या नंबरवर फोन करण्याविषयी सुचवलं.
"ते वेगवेगळे सॉसेस, चीज, बदाम आणि पास्ता असं सगळ्याचं एकत्र पॅकेज मिळतं फक्त $१९.९९ ला. ते ज्यांना हवं असेल त्यांनी त्या नंबरवर फोन करायचा " असं बायकोने झब च्या भाषेत सांगितलं.
माझ्या आधीच्या प्रश्नातला 'खाणार' काढून तिथे 'घेणार ' टाकून आधीचा प्रश्न मी 'पुन्हा' रिपीट केला. ('पुन्हा' पुनरुक्ती... ते ... 'पुन्हा' रिपीट.. चालू द्या..)
आणि माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर बायकोऐवजी झब नेच दिलं. ती सुहास्य वदनाने वदती झाली की २४ कॉलर्स वेटिंगमध्ये आहेत आणि अजून फक्त ९ मिनिटंच ही ऑफर आहे.
मी वैतागून जाऊन आणि यावेळी बायकोला न जुमानता चॅनेल बदलायला धावलो. आयुष्यात पुन्हा कधीही हे चॅनेल लावायचं नाही हे लक्षात ठेवून , त्याला अॅडल्ट-लॉक लावायचं हे ठरवून ते चॅनेल कुठलं आहे ते बघायला गेलो तर चॅनेल होतं Thirteen .... थर्टीन.... तेरा... १३....
आणि सायबाच्या शुभ-अशुभाच्या कल्पनांना मी मनोमन दंडवत घातलं !!!!!
तळटीप : हा ब्लॉग पहिल्यांदा वाचणार्या रसिकां/खादाडांसाठी हे काही सुटसुटीत कं-फॉर्म
आम्या : आधीचा म्याटर
अंअं : अंदाजे अंक
अं : अंदाजे
(No subject)
(No subject)