हिशोब

Submitted by नितीनचंद्र on 4 April, 2010 - 02:09

विमल नर्सींग होमच्या वेटींग रुम मध्ये अतुल बसुन होता. आत्ताच त्याच्या बायकोला - अश्विनीला त्याने कळा सुरु झाल्या म्हणुन अ‍ॅड्मिट केल होत. संध्याकाळचे सात वाजले होते. अजुन चार पास तास लागतील डिलीव्हरी व्हायला असा अंदाज अटेंडिंग डॉक्टर्सनी सांगीतला होता. अश्विनी काही खाऊन निघाली होती. लेबर रुमच्या बाहेर एक रुम होती. त्यातल्या एका बेडवर अश्विनी झोपली होती.

अश्विनीची ही पहिलीच वेळ पण अतुलच जरा जास्त धास्तावला होता. जेव्हा तिचा ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह आहे आणि स्वतःचा ए पॉझेटिव्ह आहे कळल्यापासुन तर त्याची चिंता वाढली होती. जर बाळाचा ब्लड ग्रुप ए पॉझेटिव्ह निघाला तर अ‍ॅटीबॉडी तयार होऊ नयेत म्हणुन अश्विनीला लगेचच एक इंजेक्शन द्याव लागणार होत. सगळ सगळ माहित असुन त्याच मन धास्तावल होत. शिवाय आता आणखी एक नविन गोष्टीची भर पडली जेव्हा त्याला कळल की ए निगेटिव्ह ह्या ग्रुपची माणस कमी असतात. अश्विनीच्या भावाला त्याने तयार रहायला सांगितल होत कारण त्याचाही ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह होता.

हे कमी की काय त्याने जवळपासच्या सगळ्या ब्लड बँकामध्ये ए निगेटिव्ह रक्ताच्या उपलब्धतेबाबत चौकशी करुन ठेवली होती. अश्विनीला अतुलच्या यासर्व प्रकाराची गंमत वाटत होती. तिच्या मोठ्या बहिणीच्या डिलिव्हरीच्या वेळेला ती ताईच्या जवळ होती. एक प्रकाराने ही वेळ स्वतः नाही, पण अनुभवली होती. यामुळे तिचे मन प्रसन्न नसले तरी चिंतामुक्त होते.

अतुलने अश्विनीला अ‍ॅड्मिट केल तेव्हा साधारण एका अर्ध्या तासाच्या अंतराने कळा येत होत्या. आता दोन कळामधले अंतर आता हळु हळळु कमी होत होते. कळ येताच अश्विनीचा चेहर्‍यावर वेदना दिसायच्या. ते पाहुन अतुल अश्विनीला विचारायचा " फार त्रास होतोय का ? " ती नकारार्थी मान हलवायची. अतुलची ही अवस्था पाहुन अश्विनी म्हणाली " अतुल तु जरा बाहेर जाऊन थांब. काही लागलच तर मी तुला बोलावते.

अतुल बाहेर आला. ओ.पी.डी.त अनेक स्त्रिया बसल्या होत्या. कोणी आपल्या नवर्‍याबरोबर तर कोणी आई, सासु या सारख्या मोठ्या वयाच्या स्त्रियांबरोबर आल्या होत्या. कोणी कोणी एकट्याच होत्या. पहिल्यावेळेला अश्विनीला घेऊन आल्यावर डॉ. अनुराधा म्हणाल्या "डिलीव्हरी कुठे करायची ते ठरवुन सावकाश सांगा." यावर अतुल म्हणाला "इथेच करायची." डॉ. अनुराधा अश्विनीकडे पहात म्हणाल्या
"अहो हिला तिच्या माहेरी करायची असेल तर तिला विचारु द्या तिच्या माहेरच्यांना."

अतुल लगेच म्हणाला "काय आहे तिच्या गावी ? साधे रस्ते नाहीत, मॅटेर्निटी होम आहे का नाही माहित नाही." अश्विनी त्याच्या टिप्प्णीवर हसत होती. तिच्या मनात येत होत किती काळजी आहे याला आपली.

अश्विनीची आई तीच्या लहान पणीच देवाघरी गेली होती. माहेरची कोणी असेल तर एक मोठी बहिण. तिच्या सासरी ती एकटीच स्त्री. एक धाकटा भाऊ, त्याच अद्याप लग्न व्हायच होत. तो आणि वडिल रहात होते. स्वतः बनवुन जेवत होते. माहेरी जाऊन तरी काय होणार होत. इथे काही दिवस सासु आली असती मदतीला. शेवटी निर्णय झाला सासरीच डिलीव्हरी करण्याचा.

अश्विनीने अतुलला सांगितले, पटकन सगळ्यांना सांगु नकोस सगळ्यांना. चार महिने होऊन जाऊ देत. अतुलला कसली घाई, तो बोललाच एक दिवस. बोलला असा की सगळ्यांच्या चेष्टेचा विषय झाला. त्याच्या पेक्षा वयाने मोठा असलेला रवि म्हणाला "अरे काळजीच काही नसत, बायकोला द्यायच माहेरी पाठवुन आणि आपण पुन्हा जायच नाक्यावर शिट्या मारायला. अस समजायच आपल लग्न झालच नाही" अतुलला ते पटल नाही आणि अतुल काळजी पोटी माहिती जमा करत, अश्विनीची काळजी घेत राहीला.

डॉ. अनुराधा व डॉ सुरज विमल नर्सींग होमच्या वरच्या भागात रहायचे. तळ मजल्याला मॅटेर्निटी होम, पहिल्या मजल्यावर जनरल हॉस्पिटल जे डॉ. सुरज पहायचे व त्याच्या वरच्या मजल्यावर डॉ सुरज व डॉ. अनुराधा यांच घर असा विमल नर्सींग होमचा पसारा होता. त्या दिवशी डॉ.सुरज व डॉ. अनुराधा हॉस्पीटलमधे नव्हते. एक नवशिकी नर्स अश्विनीच्या पोटाला स्टेथोस्कोप लाऊन बाळाची हालचाल पहात होती. तिच्या चेहर्‍यावरुन काही गडबड दिसत होती.

अश्विनी पडल्या पडल्या हे पहात होती. काय झालय ? या अर्थाने अश्विनी भुवया उचलत अश्विनीने त्या नर्स ला प्रश्न केला. सगळ ट्रेनींग देऊन तिच्या तोंडतुन नको ते बाहेर पडलच. "बाळाचे ह्रदयाचे ठोके ऐकु येत नाहीत." अटेंडिंग डॉक्टर बाहेर गेलेले. अश्विनी घाबरली. तिने अतुलला बोलावणे पाठवले. मग काय एकच गोंधळ झाला. तेव्हड्यात एक सिनीयर नर्स तिथे आली. तिने तिन वेळा चेक करुन सर्व ठिक असल्याचा निर्वाळा दिला. वरुन नवशिकी नर्सला स्टेथोस्कोप कुठे कसा लावायचा याचही शिक्षण दिल.

अतुलचा जीव भांड्यात पडला. अश्विनीही आता निर्धास्त होऊन कळा सहन करु लागली. " तुम्हाला काही समजत का ?" अतुल त्या नवशिक्या नर्सची खरडपट्टी करु पहात होता. मग पुन्हा सिनीयर नर्स पुढे झाली आणि अतुलला शांत करुन गेली.

अतुल पुन्हा बाहेर येऊन बसला. पोटाची जाणीव होत होती. काही खाव अस वाटत होत. पण एकट्याला खायची सवयच राहिली नव्हती. अश्विनीला कल्पना होती म्हणुन ती सांगत होती कि काहीतरी खाऊन ये. रात्रीचे दहा वाजले होते. दिवस थंडीचे होते. रस्त्यावरची वर्दळ जवळ जवळ बंद झाली होती. हॉटेल्सची शटर्स बंद होत होती. नाही म्हणायला अंडा बुर्जीच्या हातगाड्या चालु होत्या. अडचणीत असलेल्या प्रत्येकाची सर्व सोय इथे होती. चला अंडा - बुर्जी पाव खाऊ म्हणुन तो गाडी पाशी आला आणि आश्चर्यचकित झाला. गाडीवाला नजरेन विचारत होता काय पाहिजे ? बाजुला तीन चार युव़क स्टिलचे ग्लास, सोड्याच्या रिकाम्या बाटल्या, चकना पाहुन त्याच्या लक्षात आला इथे काय काय मिळत. तो तसाच माघारी फिरणार तोच त्याचा बेत पाहुन गाडीवाला म्हणाला तुम्ही बुर्जी खा. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही.

अतुलने कशी बशी बुर्जी दोन पाव खाल्ले आणि माघारी परत हॉस्पिटलला आला. त्याचा चेहेर्‍यावर आता पोट भरल्याचे नाही पण भुक भागल्याचे समाधान होते. अश्विनीला आज उपाशीच रहायचे होते याचे त्याला कसेतरी वाटत होते. तिचा हात हातात घेत तो म्हणाला " तुला नाही भुक लागली ?" अश्विनी काहीच बोलली नाही. मग जरा वेळाने ती म्हणाली तु जरा त्या बाहेरच्या ओ.पी.डी.च्या वेटींग रुममधे आडवा हो. अजुन दोन तास जातील. बाहेर आल्या आल्या त्याने प्रसादला अश्विनीच्या भावाला फोन केला. तो निघाला आहे याची खात्री केल्यावर अतुल शांत झाला.

अतुलची दिवसभर शॉपमधे धावपळ झाली होती. जरा पाठ ठेकवु म्हणताना त्याला क्षणात झोप लागली. अश्विनीच्या कळा आता वेगाने येत होत्या. त्या तिला सहन होत नव्हत्या. सिनीयर नर्स तिला सांगत होत्या सहन कर अजुन वेळ आहे. अश्चिनीला आता सहन होत नव्हत. ती डोळे मिटुन सहन करण्याचा प्रयत्न करत होती.

सिनीयर नर्स अंदाज घेऊन तिला लेबर रुम मध्ये शिफ्ट करायला सांगुन गेली. मॅटेर्निटी होम नध्ये वॉर्ड बॉय स्ट्रेचर्स, ट्रॉली काहीच नसल्यामुळे अश्चिनीला दिन्ही बाजुंनी नर्स धरुन लेबर रुम मध्ये घेऊन गेल्या. अतुलला काहीच पत्ता नव्हता तो गाढ झोपला होता.

अतुलला जेव्हा जाग आली तेव्हा काही गोंधळ चालु होता. ओ.पी.डी.च्या वेटींग रुमचा मोठा दरवाजा उघडुन एका पेशंटला आत आणल जात होत. त्याला धाप लागली होती. डॉ. सुरज दरवाज्यातच उभे होते. त्यांनी त्या पेशंटला ओ.पी.डी.च्या वेटींग रुम मध्येच आडव करायला सांगितल. ते तपासत असतानाच पेशंटने मान टाकली. डॉ. सुरजने दोन ठोसे पेशंटच्या छातीवर लगावत हाताने ह्रदयाला मसाज करायला सुरवात केली. असीस्टंट डॉक्टरने ह्रदयात आतवर जाणारे मोठ्या सिरींजचे इंजेक्शन आणले. ते डॉ. सुरजने ह्रदयात टोचले पण व्यर्थ. तो पेशंट डॉ. सुरजच्या समोर दगावला.

डॉ. सुरजने त्या पेशंटला घेऊन आलेल्या समोर मान हलवुन इशारा केला. चार लोकांपैकी दोन समजले आता सर्व व्यर्थ आहे . दोघे पळत डॉ. सुरजच्या मागे त्यांच्या ऑफिसमधे गेले. डॉ. सुरजला त्यांनी सांगितले " अहो अस काय करता त्यांना वाचवा. मागल्या वेळेला तुम्ही वाचवला म्हणुन चांगला चार वर्ष जगला. यासाठीच तर तुमच्या कडे आणल. आता तुम्ही नाही म्हणला तर आम्ही कुठ जायच ?"

डॉ. सुरज म्हणाला" अहो डॉक्टर म्हणजे काही देवदुत असतो का ? या वेळेला हार्ट अ‍ॅटॅक येव्हढा गंभीर होता की काही उपयोग झाला नाही. त्यांचा नातेवाईकांना जमा करा. मी सर्टीफिकीट देतो. त्यांना घेऊन जा." ते दोघे नाईलाजाने पुढच्या तयारीला लागले.

लेबर रुम मध्ये आता अश्विनीच्या कळा अंतिम टप्यात होत्या. सिनीयर नर्स ओरडत होत्या. जोर दे जोर दे. एका मिनीटात रिकामी होशील. अश्विनीची सगळी शक्ती संपली होती. शेवटी फोरसेप लावावा की काय असा विचार डॉ. अनुराधा करत होत्या. सिनीयर नर्स पुन्हा पुन्हा अश्विनीला सांगत होत्या. जोर दे जोर दे. क्षणात अश्विनीला शक्ती संचारली आणि तीन जोर दिला. आता बाळ सिनीयर नर्सच्या हातात होत. अश्विनीची त्या श्रमाने शुध्द हरपेल अशी स्थिती झाली होती.

सिनीयर नर्सने बाळाच आईला जोडलेल कनेक्शन कापल. आता आई आणि बाळ यांच कनेक्शन संपुन रिलेशन सुरु झाल होत. काही क्षण आधी जे बाळ आईच्या जीवन मरणाशी आपले जीवन मरण अवलंबुन अस जीवन जगत होत, ते आता स्वतंत्र झाल होत.

------------------------------------------------------------------------------------
यमाने आपल दिवसभराच काम संपवल जाता एक जीव तो आपल्या सोबत घेऊन आला होता आणि विधात्याने त्याच ठिकाणी आणखी एक नवा जीव जन्माला घातला होता. एकाच ठिकाणी एका जीवाचा हिशोब संपला होता तर दुसर्‍या जीवाचा हिशोब आताच सुरु झाला होता.
-----------------------------------------------------------------------------------
अतुलला लेबररुम मध्ये काय चाललय याची माहिती नव्हती. डोळ्यावर अर्धवट झोप होती. आत्ताच मरण पावलेल्या पेशंट्चे नातेवाईक आले होते. त्याला त्याच्या घरी नेण्याची तयारी चालु होती. मगाचा रिक्षावाला भाड न मागताच गेला होता. मगाशी त्या पेशंटला या रिक्षाने आणल तेव्हा तो जिवंत होता. पण आता त्याला घरी पोचवण्याची गळ कुणी घातली तर अडचण नको म्हणुन तो निघुन गेला होता. रिक्षा हे जिवंत माणसाच्या वाह्तुकीचे साधन आहे असा त्या रिक्षावाल्याचा ठाम विश्वास असावा. त्याच्या घरचे आता वाहन शोधत होते. त्याच्या पत्नीच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. हे पाहुन अतुलचे मन खिन्न झाले होते. त्याच्या समोरच ही घटना घडली होती. आयुष्यात प्रथमच अतुलने माणसाचे मरण पाहिले होते.

लेबररुम मध्ये नाळ कापल्यानंतर बाळाला स्वच्छ करुन सिनीयर नर्सने बाळाने बाळाच्या पाठीवर थोपटले. या हालचालीने आईच्या रक्ताबरोबर आलेल्या प्राणवायुची रक्तातली पातळी कमी कमी होत होती. बाळाच्या मेंदुने याची नोंद घेत आपली फुफ्फुसे प्राणवायुने भरण्याचा प्रयत्न केला. कधीच न वापरलेली फुफ्फुसे उघडण्यासाठी त्याला आकांत करावा लागला. त्याचा आकांत अतुलच्या कानावर पडला. तो मगाचा खिन्न भाव व जवळच पडलेल्या अचेतन देहाचा विचार न करता लेबर रुम कडे धावला. लेबररुमचा दरवाजा उघडला होता. सिनीयर नर्सच्या हातात तो चिमुकला जीव आता शांतपणे श्वासोश्वास करत होता.सिनीयर नर्सने त्याला अभिनंदन करत म्हणले "अभिनंदन! तुम्ही या मुलीचे बाप झालात."

अतुलचा चेहेरा औत्सुख्याने भारला होता. आपल्या मुलीकडे तो मोठ्या प्रेमाने पहात होता. मगाचा खिन्नपणा जाउन आता आनंदाचे भाव त्याच्या मनात होते. मग त्याने श्रमलेल्या अश्विनीकडे पहात त्याने तिचा हातात हात दिला. दोघे एकमेकांकडे व नुकत्याच जन्मलेल्या मुलीकडे पहात होते.

गुलमोहर: 

<<एकाच ठिकाणी एका जीवाचा हिशोब संपला होता तर दुसर्‍या जीवाचा हिशोब आताच सुरु झाला होता.>> निसर्गचक्र! दुसर काय? छान लिहिलय Happy

फारच छान आणि वेगळा विषय आहे, उगाच काही रडके नाही , कोणी दुखी नाही पण तरीसुद्धा मृत्यूचे वातावरण बनलंय . अप्रतिम !!! फारच आवडले . नवीन लिखाण करेन नक्कीच . नवीन काही लिहित नाही आहे हे अगदी खरे आहे , थोडा वेळ काढून काहीतरी छान लवकरच आणेन Happy

यमाने आपल दिवसभराच काम संपवल जाता एक जीव तो आपल्या सोबत घेऊन आला होता आणि विधात्याने त्याच ठिकाणी आणखी एक नवा जीव जन्माला घातला होता. एकाच ठिकाणी एका जीवाचा हिशोब संपला होता तर दुसर्‍या जीवाचा हिशोब आताच सुरु झाला होता.

खरचं वेगळाच अनूभव.

कथा आवडली, मस्तच लिहिता तुम्ही.

आता आई आणि बाळ यांच कनेक्शन संपुन रिलेशन सुरु झाल होत. काही क्षण आधी जे बाळ आईच्या जीवन मरणाशी आपले जीवन मरण अवलंबुन अस जीवन जगत होत, ते आता स्वतंत्र झाल होत.>>>>आवडलं Happy

छान..

छान .

आवडली कथा.... खुपच सरळ, साध्या भाषेत तिथलं वातावरण निर्माण केलं आहेत... Happy

<<एकाच ठिकाणी एका जीवाचा हिशोब संपला होता तर दुसर्‍या जीवाचा हिशोब आताच सुरु झाला होता.>> अगदी पटलं..... लिहित राहा..... Happy