पुन्हा एकदा पिकनीक !

Submitted by कवठीचाफा on 25 March, 2008 - 14:50

'आमची(ही) पिकनीक' फ़ारशी वाचनीय झाली ( म्हणजे वाचल्या गेली नसली ) तरी मला मात्र ती लिहीताना आणि वाचताना खुप मजा वाटली कारण ते सगळे प्रसंग अनुभवायचे भाग्य मला मिळालेय ना ! आता 'पुन्हा एकदा पिकनीक 'लिहीताना मला तशीच मजा वाटतेय ( घाबरु नका पिकनिकचा पार्ट थ्री नाही येणार ). या कथेत मात्र पक्याचं खरं नाव 'शल्या' वापरले आहे आता त्याचे नाव लिहीले म्हणुन बाकिच्या मंडळींचीही नावे लिहून टाकली. त्यामुळे त्यातली आणि यातली नावे वेगवेगळी आली आहेत. बस्स आणि काय लिहू बरं वाईट जे काही आहे ते पुढे कथेत आहेच.
http://www.maayboli.com/node/550 पहील्या भागाची ही लिंक !
********
"च्यामारी वैताग आणलाय रे माझ्या खटल्यानी एखादी पिकनीक काढा रे कुठेतरी". लग्नानंतर सहाच महीन्यात सहधर्मचारीणीचा उल्लेख खटलं असा करत संज्या फ़ोनवर करवादला.
" लेका, आता ते सोप काम आहे का? तुम्हा सगळ्यांची लग्न झालियेत, शल्याच ब्रम्हचर्य संपायची लक्षण दिसत नाहीयेत." मी मागच्या आठवणीने शहारत म्हणालो.
" त्याची तु का काळजी करतो? निली आणि तेजुला मी आधीच बोललोय त्यांच्या लोढण्यांना घेउन त्या यायला तयार आहेत" हे ऐकायला तेजु हवी होती क्षणभर वाटून गेलं.
"एखादा फ़क्कडसा शनीवार रविवार बघ" महाराज आदेश देउन मोकळे.
"गध्ध्या फ़क्कड असायला काय शनिवार रविवार श्रीखंडपुरीचा बेत आहे का? " मी (आपला उगीचच) उवाच.
" ए, ते ईयत्ता दुसरी ब सारखे जोक्स बंद कर आणि तयारीला लाग बघु".
"मी काय ईथे मक्षीका पालन करतोय का? जरा तुम्ही पण स्पॉट निवडा की नाहीतरी ऑफ़ीसमधे बसुन नेटच बिलच वाढवत असता" मी चरफ़डलो. आणि फ़ोन कट केला. मला माहीत होतच की आता ठीकाण ठरवल्याशीवाय स्वारी गप्प बसायची नाही. आणि तेच घडलं.
एका भल्या रात्री फ़ोन आला अर्थात संज्याच. "महाबळेश्वर फ़िक्स केलाय रे"," आता बाकी तु बघायचं"
हा एक मोठा व्याप, आता सगळ्या व्यवस्था करायच्या म्हणजे.......... मागच्या सगळ्या पिकनीक आठवल्या. पण हे असं वाटणं तात्पुरतच असतं कारण सगळेच मदतीला तयार असतात शक्य तसे. हळुहळु एकेकाचे फ़ोन यायला लागले, सगळ्यात आधी नेहमी प्रमाणेच निली, "आम्ही येतोय रे !" आता ती मी ची आम्ही झाली होती." आणि या रविवारी आपण सगळे जमतोय तेजुकडे लक्षात आहे ना ?"
" हो माझे आई, पण कुठल्या? " माझा निरागस प्रश्न. कारण तेजुचे सासर माहेर दोन्ही नवी मुंबईत.
" कुठल्या काय? आता ती कुठे असणार?"
"अर्थात संदेशच्या घरी म्हणजे त्याला झापडवुन माहेरी आली नसेल तर". तेजुच्या रागाचे काही सांगता येत नाही.
"मग तिथेच येण्याची कृपा असावी".
"येतोय पण उशीर होईल!" बाजु सेफ़ केलेली बरी.
'येशील नक्की ना ? मग उशीरा आलास तरी चालेल". 'तथास्तु' म्हणावे तसे निली म्हणाली.

कामाच्या व्यापात आणि अधुन मधुन येणार्‍या ( अर्थात ऑफ़ीसातुन फ़ुकट केलेल्या ) एकेका मेंबरच्या फ़ोनच्या गडबडीत रविवार कसा उजाडला ते कळलच नाही.

सकाळी उशीरा उठून ( हे उशीर होण्याचे खरे कारण ! ) मस्तपैकी आवराआवर करुन मग गाडीच्या पेकाटात लाथ घातली. आणि शक्य तितक्या लवकर तेजुच्या ( तेजुचेच म्हणायचे बिच्चार्‍या संदेशचे ती कुठे काय चालुन देते ! ) घरी पोहोचलो हे माझं शक्य तितक्या लवकर दुपारी तीन वाजेपर्यंत असतं याचा अंदाज बाकी भैरवांना होताच ते मस्त जेउन खाउन तृप्त होवुन बसले होते. अर्थात हा दोष टोळक्याचा नाहीच तेजुने केलेल्या बटाटेवड्यांचा.
माझे हादडून झाल्यावर ( संज्या कुणालाच साधंसरळ खाउ देत नाही हादडायला लावतो ) मैफ़ील बसली पिकनीक या अती महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करायला. लोकसभेत मंत्री सुध्दा असेच बसत असतील असे मला उगीचच वाटत असते.
" शुक्रवारी संध्याकाळी आम्ही तुझ्याकडे टच होतोय." शल्याने सिगारेटच्या धुराच्या फ़वार्‍यासकट फ़र्मान सोडले.
चला म्हणजे आईला गुरुवारीच मावशीकडे नेउन सोडायला हवे. मनातल्या मनात मी समिकरणे जुळवत होतो. कारण आमच्या ह्या फ़ैय्यर समोर घरातलं म्हणजे कुणाच्याही घरातलं भलं बुजुर्ग टिकणं शक्य नसतच. आणि आमच्या सगळ्यांच्या घरातले वडिलधारे भले आहेत. आपले गुपचुप देवळात नाहीतर नातेवाईकांकडे सटकतात. आमचा गोंधळच असा असतो की पंचक्रोशीतले तमाम गोंधळी हात टेकतील.
" ते मरो, बुकिंगचे काय? ते कोण करणार? यावेळी आम्ही सेकंड हनिमुनला येतोय." तेजुने नेहमी प्रमाणेच खाडकन हुकुमाचा पत्ता टाकला. मी चोरुन संदेशकडे पाहीले तोच लाजताना दिसला आता कपाळावर सरळसरळ हात मारणे शक्य नव्हते म्हणुन हात आवरला.
उघडपणे फ़क्त ईतकेच म्हणालो " म्हणजे तुम्हा दोघांसाठी हनिमुन स्विट बुक करायला लागणार तर."
" एक नाही दोन निली आणि गिरी काय निसर्ग कविता करायला येणार नाहीयेत".तेजुच्या तडक्यामुळे आता लाजायची पाळी निलीची होती.
" वा ! म्हणजे तुम्ही तिकडे हातात हात घालुन सकाळी बाहेर पडा ते थेट संध्याकाळी दर्शन दिल्यासारखे करुन पुन्हा गायबा मग मी आणि हा हातात दांडके घेउन बाहेर गुरखेगीरी करतो" नेहमीप्रमाणे शल्याचा राग उफ़ाळला.
" शल्या, गाढवा आता तिथे काय तंबु ठोकणार आहेस का ? रुम तर बुक करावेच लागणार". मी त्याच्या डोक्यात तेजुच्या बोलण्यातली खोच शिरवण्याचा निष्फ़ळ प्रयत्न केला.
" मग ते या पिंट्याला सांगा हा त्यात माहीर मनुष्य आहे " शल्याच्या वाक्याबरोबर सगळ्यांच्या नजरा पिंट्याकडे वळल्या.
" माहीर? रुम बुक करण्यात ? हे काय प्रकरण असते बुवा? " ईतकावेळ गप्प बसलेला संज्या डोक्यात वळवळता किडा सहन न झाल्याने बोलला.
" लेको, कंपनीच्या सेमीनारला हा आणि मी एकत्र होतो. आता पैसा कंपनिचा तर याला म्हणालो आपल्यासाठी सगळ्यात महागडा रुम बुक करुन टाक. तिथे पोहोचलो तर तिथला सगळा स्टाफ़ आमच्याकडे विचीत्र नजरेने पहायला लागला. मी आपला कुठे पॅंटची चेन तपास तर कुठे शिवण चाचपड असे करत वर गेलो तेंव्हा या सगळ्याचा शोध लागला. या गृहस्थाने चक्क हनिमुन स्विट बुक करुन ठेवला होता आमच्या दोघांसाठी. आयुष्यात पहील्यांदा लाज कशाला म्हणतात ते समजलं" शल्या आजुनही त्या आठवणीने भडकला होता त्याचा बदललेला आवाज सांगत होताच.
" पण तुच म्हणाला की सगळ्यात महागडा रुम बुक कर म्हणुन मी फ़क्त रेटसच बघितले " वर पिंट्याचे हे दुर्बोध स्पष्टिकरण.
" ए धुरांड्या गंम्मत केली रे ! तुम्ही आपले नेहमी सारखे बुकिंग करा " गाडी ट्रॅक बदलुन भलत्याच मुडमधे जाताना पाहुन तेजुने हस्तक्षेप केला.
आता गाडी शल्याच्या धुरांड्याकडे म्हणजेच सिगारेटकडे वळली.
" शल्या, तु सोडणार होतास ना सिगारेट ?" एक चिंतायुक्त आवाज निली कडुन.
"मी ढीग सोडेन पण या बयेने मला सोडायला हवे ना! " शल्याचं ठरलेलं उत्तर.
" मग प्रयत्न कर की !" निलीने प्रांजळपणे सुचवले.
" आयला लेका, तु मागे एका व्यसनमुक्ती शिबीरात गेला होतास ना?" संज्याने त्याची 'होम्स'गीरी दाखवली.
" गेलो होतो रे ! पण पैसे फ़ुकट गेले." शल्याचा चडफ़डाट.
"म्हणजे नेमकं काय झालं?"
" अरे तिथे पहील्यांदाच सांगीतलं होतं की तुम्ही एक आठवडा सिगारेट सोडा आणि मग त्याच पैशातुन तुमच्यासाठी हविहवीशी वाटणारी एखादी भेटवस्तु खरेदी करा."
" मग ? तुझ्याच्याने एक आठवडापण सिगारेट सुटली नाही असंच ना?" संज्याने तोंड टाकले.
" सोडली होती रे ! पण पुढेच सगळा घोळ झाला."
" म्हणजे?" आता माझी उत्सुकता पणाला लागली.
" भेटवस्तु घ्यायला गेलो आणि विचार करत होतो आपल्याला काय घ्यावसं वाटत होतं ईतके दिवस ? पटकन आठवलं आयला चांदीचा लायटर घ्यायची ईच्छा बरेच दिवस पडीक होती". पुढे शल्या काहीच बोलु शकला नाही कारण हास्याचा धबधबा फ़ुल्ल फ़्लो ने वहायला लागला.

कामांची जमवाजमव करुन ती एकमेकांच्या गळ्यात मारल्यावर आमची सभा संपली ( एकदाची). ठरलेला शुक्रवार संध्याकाळचा बेत शेवटी फ़िसकटलाच कारण महाबळेश्वर मध्यावर पडतं महाड आणि पुण्याला म्हणुन शनीवारी सकाळी थेट हॉटेलवर जमा व्हायचं ठरलं पण तो शनिवार येईपर्यंत कंपन्यांची फ़ोनबिले आणखी पाच सहाशेनं वाढली असावीत.

महाबळेश्वरला जायला आम्हाला एका ठीकाणी जमायची गरज नव्हतीच कारण पिंट्या-पल्लु, शल्या आणि संज्या-माधवी पुण्यावरुन परस्पर यायचे होते. तेजु- संदेश आणि निली- गिरी जोडपी फ़क्त माझ्याकडे यायची होती तीही फ़क्त काही वेळासाठी एकाच गाडीतुन जायचे होतो ना आम्ही. हॉटेलवर वेळेवर पोहोचायचे ईतकेच महत्वाचे होते.

खरा घोळ झालेला तो हॉटेलच्या बुकिंगचा आता ईतकी मंडळी एकत्रच येणार म्हणजे बुकिंग एकाच मजल्यावर ठेवायचं ना ? तर पिंट्याभाव ने डोके चालवुन ते असे सागरगोटे पसरवल्यासारखे सगळ्या हॉटेलभर पसरवले होते. आणि मुख्य म्हणजे मला आणि शल्याला एकाच रुम मधे कोंबले. यथेच्छ शिव्या दिल्या ( आर्थात मनातल्या मनात पल्लुसमोर काय शिव्या देणार मी पिंट्याला? ). आता रात्रभर शल्याचं घोरणं ऐकायला लागणार होतं. 'हंऽऽऽऽ नाईलाज को क्या ईलाज?'.

एकदाचा घोळ निस्तरुन कसला, सांभाळुन घेउन आम्ही एकदाचे स्थाईक झालो ( हा शब्द शल्या स्पेशल ) आणि मग हा एकेकाळचा कॉलेजातल्या मैत्रीची घट्ट विण असलेला आणि मुख्य म्हणजे आता नवे सभासद सामिल करुन घेउनही पुर्वीसारखा जिव्हाळा कायम ठेवलेला कंपु महाबळेश्वर दर्शनाला निघाला. आता आमचे महाबळेश्वर दर्शन म्हणजे काय असायचे म्हणा, प्रत्येक जण अनेकदा ईथे येउन गेला होता, आता फ़क्त उनाडक्या जुन्या मित्रांबरोबर.
" चला सनसेट पॉइंटला जाउ" शल्याने डोके चालवले.
" भर दुपारी ?" संज्याची शंका.
" मरो ती सकाळ संध्याकाळ ईथे गावात या असल्या भयाण गर्दीत काय फ़िरायचं रे ? " शल्याचं म्हणणं पटेबल होतं.
" ए ! नको च्यामारी मला जेवायचय. भुक लागलेय कडाडुन" तेजु आणि मी एकदमच म्हणालो.
मग जरा टवाळक्या करुन पुन्हा हॉटेलवर जेवायला गेलो. मग वाद घालायला मोठ्ठा मुददा सापडला तो म्हणजे सामान टाकल्या टाकल्या बाहेर पडायचं डोकं कुणाचं असावं. एकमेकांवर जबाबदारी ढकलत जेवण आटोपलं. आणि पुन्हा संध्याकाळ व्हायच्या आत मुद्दाम वेण्णा लेक कडे रवाना ! गर्दी नको ना ! तिथे एक मोठ आकर्षण घोड्यावर बसायचं . आता ज्यांची लग्न झाली ते काही घोड्यावर बसले नाहीत शब्दशः त्यामुळे आणखी हौसलेली मंडळी घोडेवाल्यांच्या शोधात. माझं आणि घोड्याचं ( कुठल्याच त्या ठ्ठोऽऽ आवाज करणार्‍यापण ) कधी पटत नाही म्हणुन मग मी, निली आणि संदेश बाजुलाच थांबलो.
पाच दहा मिनीटं गप्पा मारल्या असतील नसतील शल्याच्या किंकाळीने आणि मग दिलेल्या शिव्यांच्या गजराने कान फ़ुटायची वेळ आली. नक्की काय झालं ते कळल्यावर शल्याचे कान आमच्या हसण्याने नक्की काहीवेळ बधिर झाले असणार.
आता आपल्याला सिगारेट ओढायची सवय आहे हे मान्य पण निदान घोड्यावर बसल्यावर तरी सिगारेट पेटवु नये ना ! याने मारले दोन-चार कश बरं रजनीकांत स्टाईल म्हणुन ते पण मान्य करु पण म्हणुन घोड्याला चटका बसेपर्यंत निष्काळजी रहावे ? शेवटी व्हायचे तेच झालं घोडा बिथरला आणि शल्याचं पोतं धारातिर्थी पडलं. एव्हाना बाकी सगळे पुढे गेल्याने घटनास्थळी फ़क्त आम्ही चौघेच हजर होतो. पण गोंधळ अजुन संपायचे होते संज्या- माधवी मारे रोज रपेट मारत असावेत तसे चालले होते ईतक्यात संज्याच्या अश्वराजांना तलावाकडे जायची लहर आली. बहुतेक या दोघांच्या गप्पा ऐकुन तो व्याकुळ झाला असेल तहानेने. तर तो अश्वराज आता आपल्याला पाण्यात नेणार या कल्पनेनेच संज्याने तिकडुन हाका मारायचा सपाटा लावला. आता हे सगळे घोडे शिकवलेले असतात मालकाने शिट्टी मारली की परत येतात. पण या स्वारीचा काही तसा मुड दिसेना उलट माधवी आणि पल्लुच्या घोड्यांनी परत फ़िरुन त्यांची नवर्‍यांशी ताटातुट करुन टाकली. बरं संज्यापण असा धन्य माणुस की त्या घोड्यावरुन पाय उतारही व्हायला तयार नाही. शेवटी कसाबसा तो आणि त्याचा घोडा एकदाचा पाण्यात न बुचकळता परत आले आणि आम्ही सुस्कारा सोडला माधवीने तर त्याला मिठी मारायचीच बाकी ठेवली ( अर्थात पुढे कधीतरी त्याची भरपाई केली असेल पण आम्हाला माहीत नाही ,त्या घोड्यांची शपथ ).

तर एकंदरीत हा घोटाळा झाल्यावर पुढे बोटींग करायची हिंमत होईना. म्हणुन मग मोहरा सनसेट पॉईंटकडे वळवला ( तेंव्हा संध्याकाळ झाली होती ). संध्याकाळी उशीरापर्यंत मार्केट पालथे घालत बायकांनी आपापल्या नवर्‍यांचे खिसे गाऽऽर पाडले मग पुन्हा हॉटेल, आमच्या रुममधे रात्री बारा एक वाजेपर्यंत हशा आणि धुर भरलेला होता त्याची विभागणी हशा आमचा आणि हशासहीत धुर शल्या कडुन. कारण झाले होते या पुणेकर मंडळींच्या प्रवासातल्या गंमती त्यापण संज्या स्टाईलने.
" भावराव ( आयला चा पर्यायी शब्द म्हणुन ताबडतोब नोंद घेतली गेली ) मधेच येताना माधवी म्हणाली "जरा थांबा मला गाडी लागतेय".
"गडबडीत गाडी थांबवली पण माधवी फ़क्त रस्त्याची टेहळणी करुन परत "." आपण बाबा घाबरलो म्हंटल हिने जर खाल्लेला नास्ता माधवीच्या नव्या साडीवर पुन्हा काढून दिला तर मला आणखी एका साडिचा फ़टका बसायचा, म्हणुन तिला आपली खीडकीजवळ बसवली काय उपद्व्याप करायचे ते बाहेर तोंड काढून करा म्हंटलं" दोन्ही हात डोक्यावर गच्च आवळत संज्या म्हणाला.
" अरे, पण मला गाडी लागतच नाही". ईती माधवी.
" मग माते, आपण असे का बरे केलेत ?" संज्या हतबल.
" नाहीतर मला खिडकीजवळ कशी जागा मिळाली असती?" माधवीने गौप्यस्फ़ोट केला.
" धन्य आहात आपण आता पिंट्याची काळजी मिटली आमच्या कडून." संज्याची सफ़शेल माघार.
मघाशी डोकयावर आवळलेले हात आता संज्या कपाळावर मारुन घेत होता.

आता उद्या पहाटे सुर्योदय पहायला जायचं म्हणुन गप्पा आटोपत्या घेत सगळे कटले. आणि मी शल्याच्या घोरण्यासह मी त्या रुममधे एकटाच राहीलो.
सुर्योदय पहायला कशाला ?पार सुर्यकिरणंच आम्हाला भेटायला रुममधे येईपर्यंत आम्ही ठार मग बाहेर येउन अंदाज घेणं आलं कोणी आपल्या आधी उठून गेलं तर नाही ना? पण सगळीकडे झेरॉक्स काढल्यासारखी तीच परीस्थीती.

दुसरा दिवसपण असाच गोंधळ घालण्यात आणि निस्तरण्यात गेला. पण संध्याकाळचा वेण्णालेकवर बोटींग करायची हौस आजुन फ़िटली नव्हती मग मोहरे तिकडे वळले. तिथे आणखी एक प्रॉब्लेम समोर उभा राहीला दोघे बसु शकतील अश्या चार बोटी सापडायला तयार नाहीत आणि मोठ्या बोटीत फ़क्त आठच जण बसु शकतो हा जावईशोध लागला. मग नावाडी कुठून आणायचा? क्लबवाले तर नावाडी द्यायला तयार होईनात ! बोट तुम्ही वल्हवणार असाल तर देतो हा घोशा. शेवटी शल्या, संज्या, संदेश यांच्याशी सल्लामसलत करुन मोठी एकच बोट घ्यायचे ठरवले. यात तेजु, माधवी, पल्लु , निली यांचा वल्हवण्यात उपयोग नाही म्हणुन त्यांना चर्चेतुन बाद करण्यात आलं होतं त्याचा त्यांनी मस्त फ़ायदा घेतला. बोटीत खायला आईसक्रीमची सोय करुन घेतली.
आता बोट ताब्यात घेतली शल्या संज्या एका वल्ह्यावर आणि मी संदेश एका वल्ह्यावर ताबा मिळवला आणि बोट एकदाची पाण्यात ढकलली. ईतपत सगळं ठिकठाक होतं पण पुढे खरी ठेच लागायची होती. बोट पाण्यात ढकलली खरी पण ती पुढे न्यायला दोन्ही वल्ह्यांचा काही ताळमेळ असावा लागतो या महत्वाच्या गोष्टीचा विसर पडला होता. संदेश नाही म्हंटल तरी मला छान साथ देत होता. महाडात बराच काळ घालवल्यामुळे गरमपाण्याचे झरे असलेल्या 'सव' ला जाउन जाउन वल्हे मारायची मोडकी तोडकी प्रॅक्टीस माझी होतीच पण ते धुड पाण्यातुन उचलुन पुन्हा मागे ढकलायला संदेशचा हातभार लागत होता. आणि दुसर्‍या बाजुला नुसता राडा चालु होता. शल्या संज्या पाण्यात चमचा ढवळावा तसे वल्हे पाण्यात ढवळत होते. परीणाम ? बोट जागच्या जागी 'गोल गोल राणी' टाईप गिरक्या घ्यायला लागली. किनारा सोडायचे नाव घेईच ना ! मग जिथपत शक्य होतं तिथपत वल्ह्याच्या रेट्याने बोट किनार्‍यापासुन दुर ढकलण्यात यशस्वी झालो पण आता मध्यभागी अडकुन पुन्हा फ़ुगडी सुरु. असं करता करता ठरवलेला तास कधीच संपला पण बोट काही फ़ुटभर सरकली नाही. आता किनार्‍यावरुन क्लबच्या लोकांनी बोट परत आणा म्हणुन खाणाखुणा सुरु केल्या होत्या.
" भाईसाब, हम ईधर अटके है ! आपही हमे किनारेपे लावो ". आता गिरीचा धीर सुटला.
" ये गिर्‍या गप ना ! लेका आजुबाजुचे लोक आपल्याकडे बघुन हसतायत " संज्या करवादला.
शेवटी कसे बसे आम्ही एकदाचे ते तारु किनार्‍याला लावले. पण क्लबच्या कट्ट्याला नाही तर भलतीकडेच. ही आठवण निघाली तरी आजुनही आम्ही हसतो.
" च्या मारी ईथे एक बोट वल्हवायला जिव जातो मग ते तापोळ्याचे लोक रोज होडीने अपडाउन करत असतील रे ?" सुखरुप किनार्‍याला लागल्याची खात्री झाल्यावर संज्याने पहीले वाक्य उच्चारले.
" तापोळं कुठे आलं रे " माझा भाबडासा सवाल.
" ईथेच महाबळेश्वरच्या पुढे माधवीच्या मुंबईच्या मावशीचे खरेखुरे सासर ना ते !" संधर्भासह स्पष्टीकरण.
" तिथे पण याने एक गंमत केली होती " माधवी काहीतरी गुपित फ़ोडायच्या तयारीत दिसत होती.
" काय " एकसाथ अनेक आवाज.
" तिथे एक बेट आहे किनार्‍यापासुन विसएक मिनिटाच्या अंतरावर लॉंचने हं ".
"त्याचं काय "? एक आधिरा आवाज शल्याचा आता संज्यला छळायला नविन काहीतरी मिळणार या आनंदात तो खुष.
" तर आम्ही तिथे गेलो आणि लॉंचवाला आम्हाला परत न्यायला यायलाच विसरला. "
" अय्या, मगं?" निलीला गप्प बसवेना.
" मग काय, आख्खी रात्र काढली तिथे आणि सकाळी पहाटे पहाटे लॉंच आली तेंव्हा आम्ही बेटाच्या दुसर्‍या टोकावर होतो आणि तिथुन चक्क एक कुत्रा पाण्यातुन चालत चालत येत होता. आणि बेटावर अडकलो म्हणुन आम्ही रात्रभर लॉंच वाल्याला लाखोली वहात होतो". माधवीने संज्याच्या किश्श्यात आणखी एकाची भर घातली.

आता संध्याकाळ उलटली होती आणि आम्हाला पुन्हा घराकडे परतायलाच हवे होते. मनात आणखी एका पिकनीकच्या ताज्या ताज्या आठवणी घेउन आम्ही आपापल्या रुम मधुन बोर्‍याबिस्तारा गुंडाळुन आपापल्या गाड्यांकडे रवाना झालो आणि पुन्हा भेटायचचं असं एकमेकांना बजावत आपापल्या रस्त्याने रवाना झालो.
मित्रांच्या संगतीत घालवलेल्या दोन दिवसांनी मागचा सगळा ताण थकवा दुर सारुन पुन्हा आपापल्या चाकोरीत शिरायला आम्ही तयार झालो.

या पिकनीक नंतर बरोबर नऊ महीन्यांनी निली एका गोंडस मुलीची आई झाली. या वरुन आजही आम्ही निली आणि गिरीला चिडवत असतो की खरी पिकनीक त्या दोघांनीच 'एंजॉय' केली म्हणुन.

गुलमोहर: 

चाफ्या, मस्त लिहिलयस रे!! पण अजुन एखादा एपिसोड झाला असता!

आयला चाफ्या बरेच दिवसांनी रे. :))

झोकात लिवलस एकदम :))

एकूण बूधवार (सुट्टी म्हणतो मी) सार्थकी लावलास रे :))

मस्त धमाल लिहिले आहेस अगदी!! Happy

छान चाफा, घोड्यांची आणि बोटीची गंमत सुंदर ऐकवलीत, शेवटही गोड.

एक नाही दोन निली आणि गिरी काय निसर्ग कविता करायला येणार नाहीयेत>>>>> lol
या गृहस्थाने चक्क हनिमुन स्विट बुक करुन ठेवला होता आमच्या दोघांसाठी. >>> rofl

चांगल लिहिल आहेस रे पण
मला पार्ट वन जास्त भावला.
त्यात पुरेपुर इब्लिसपणा होता आणि चढत्या श्रेणीने हसु होते Happy

निली आणि गिरी काय निसर्ग कविता करायला येणार नाहीयेत>>>ह.ह.पु.वा.
जबरी जमलिय पिकनिक..घोडेस्वारी आणी बोटिंग दोन्ही मस्त जमलेत..
घाबरु नका पिकनिकचा पार्ट थ्री नाही येणार >>>अस कस! चढत्या भाजणिने पुढ्चाही पार्ट यायलाच हवा

बर्‍याच दिवसांनी तु काहीतरी लिहीलयस. पुनरागमनाबद्दल धन्स रे.
छान जमलीये भट्टी.

तापोळ्यातलं बेट आणि कुत्रा, बोटींग, घोडेस्वारी सगळंच छान. पण झ म्हणतो तसा पिकनिक - १ जास्त छान झाली होती.

मजा आली वाचताना... काय राव, पुढला भाग नाही कसं म्हणता? इतकी इरसाल पात्रं आहेत...
पुढला भाग जुळवायला घ्या... ही सगळी पात्रं आणि ती गोंडस मुलगी... आणि अजून कुणाला झालेली अजून काही....

समीर पुढ्च्या वेळी पिकनिक ला जातांना आम्हाला पण न्या !!!

आणी हो, तो सर्वात महागडा सूट बूक करा !!! Happy

पिकनिक - ३ येऊ द्या लवकर.

सबंध लेखन प्रचंड म्हणजे प्रचंड धम्माल...!!!!!!!! Rofl Lol Biggrin Proud :तुफान हसण्याच्या सगळ्या स्मायली:

तिसरा पार्ट यायलाच हवा : सुचनावजा सक्ती

कचा लेख विनोदी लेखनात हलव आधी.