http://harkatnay.blogspot.com/2010/02/blog-post_20.html
आता १० महिन्याच्या मुलाचे पहिले २-३-४ दात येणं या विषयावर पोस्ट होऊ शकतं का? आणि समजा कोणी लिहिलंच तर कोणी वाचेल तरी का ते? हे असे आणि अस्सेच काहीसे विचार होते माझ्या मनात पाहिलं पोस्ट लिहिताना. पण एक(चि)दंतच्या अभूतपूर्व यशानंतर (हे असं म्हंटलं की हे पोस्ट किंवा एकुणातच हा ब्लॉग पहिल्यांदा वाचणा-याला वाटतं की या महामानवाने लहान मुलांचे दात येणे, दातदुखी, दंतोपचार अशा विषयांवर पूर्वी एखादा (किंवा अनेक) महान लेख लिहिला असावा आणि हा नवीन लेख वाचणा-या जुन्या वाचकांना जुन्या लेखाच्या उल्लेखामुळे त्याची आठवण होऊन आपोआपच नवीन लेख आवडायला लागतो. तर असे आपले माझे एका दातात दोन लेख किंवा एका लेखात दोन दात वगैरे.. लेख संपेपर्यंत माझेच दात घशात गेले नाहीत किंवा दाती तृण धरण्याची वेळ आली नाही म्हणजे मिळवलं) चिरंजीवांनी त्यांच्या साडे तीनच दातांनी आमच्या दोन --म्हणजे माझ्या आणि बायकोच्या प्रत्येकी एक-- नाकी आणलेल्या नवाचं वर्णन करणं हे क्रमप्राप्तच आहे.
सुरवंटाचं फुलपाखरू होणं किंवा 'कु. अमुकतमुक'चं-- व्हाया चि. सौ. कां. -- 'सौ. फलाणा फलाणा' होणं या हळुवार संक्रमणांइतकंच बाळराजांचं दात येण्यापूर्वीच्या डोनाल्ड डकसदृश्य अवताराचं साडेतीन-चार दातांचं हत्यार हाती आल्यावर मिकी माउस मध्ये होणारं संक्रमण हे एकाच वेळी हळुवार, टोकदार, बोचदार, चावदार असं होतं. आता 'चावदार' या सर्वस्वी नवीन शब्दाची मराठी साहित्यात, भाषेत भर घालण्याचं कृत्य अनवधानाने का होईना माझ्या हातून झालं असलं तरी त्याच्या उत्पत्तीचं समग्र श्रेय हे आमच्या मिकी माउसलाच जातं हे माझं म्हणणं तुम्ही, "आपल्या धारदार आणि टोकदार दातांनी दार चावणा-याला काय म्हणायचं?" असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर शोधताना तुमची जी दमछाक होईल ती लक्षात घेऊन आधीच, मान्य कराल आणि हे श्रेय ज्याचं त्याला (म्हणजे बाळराजांना) क्षणभराचाही विलंब न करता देऊन टाकाल याची मी, मिकी आणि डोनाल्ड यांना खात्री आहे.
तर जगातलं सर्वात धारदार नैसर्गिक शस्त्र म्हणजे 'दहा महिन्यांच्या बाळाचे नुकतेच येणारे दात' हे मला कोणी महिनाभरापूर्वी सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यातच काढलं असतं. पण अनुभव हीच खात्री हे स्वानुभवाने सिद्ध झाल्याने असं वेड्यात काढणं म्हणजे वेड्यात निघाण्यासारखं आहे हे मला आता पुरेपूर पटलं आहे. तर आमचे हात, मनगट, दंड, गाल, खांदे, बोटं, पोट, मान असे सगळे अवयव यथेच्छ चावून झाल्यावर साहजिकच तोचतोचपणाचा कंटाळा आल्याने (Life can be so monotonous at times) बाळराजांनी आपलं लक्ष अनेक चमचमणा-या रंगीबेरंगी गाड्या, सॉफ्ट टॉईज, लहान-मोठे रबरी/कापडी चेंडू, पुस्तकं, वृत्तपत्रं, टिश्यूज, वाईप्स असे कागदांचे विविध प्रकार, लाळेरी, शाली, दुपटी, मोजे असे कपड्यांचे विविध प्रकार आणि मोबाईल, रिमोट, किल्ल्या, घड्याळ असे इलेक्ट्रॉनिक्सचे विविध प्रकार किंवा सोफा, गादी, उशा, दारं, ड्रॉवर अशा अनेक निरुपद्रवी, निरुपयोगी आणि आमच्या मान ते पोट यामधल्या अवयवांपेक्षा रंगीबेरंगी आणि चविष्ट भासणा-या गोष्टींकडे वळवलं. परंतु निळकंठ महादेवाने आपला तिसरा नेत्र उघडल्यानंतर ज्याप्रमाणे मृत्यूलोकातले, स्वर्गातले सर्व देव, मानव भयातिशयाने जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागत त्याप्रमाणे वरील सर्व वस्तूंची या (साडे) त्रिदंतापासून शक्य तेवढे दूर पळून जाण्याची अपार इच्छा असूनही अंगभूत जडत्वामुळे ते शक्य न झाल्याने मिकीपुढे संपूर्ण शरणागती स्विकारण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्यासाठी उरला नाही.
तर या अशा तुच्छ, मर्त्य गोष्टींपैकी ज्या काही निवडक आणि अनपेक्षित गोष्टींच्या अस्तित्वावरच आमच्या मिकीने प्रश्नचिन्ह लावलं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक क्षुद्रसा थर्माकोल कप. परवा हॉटेल मध्ये गेलो असताना इडली/वड्याबरोबर मिळणा-या सांबारासाठी आम्ही प्रत्येकी एक आणि मिकीला खेळायला एक असे तीन कप घेतले. पण आमच्या इडली/वड्याचा पहिला घास संपायच्या आधीच आपल्या तोंडातील छुप्या वाघनखांनी आपलं दातांनी त्याने त्या कपावर सपासप असे एवढे वार केले की तो कप होत्याचा नव्हता झाला आणि प्रमोद नवलकरांच्या 'भटक्याची भ्रमंती' मध्ये किंवा 'पोलीस टाईम्स', 'दक्षता' सारख्या मासिकांमधल्या लेखांमधल्या फोटोंच्या खाली आढळणारी 'हाच तो ट्रक ज्याच्यावर पोलिसांनी धाड टाकली ' किंवा 'हेच ते घर ज्या घरात अतिरेकी राहत होते' अशा तालावर वाचण्याचं हे पुढचं वाक्य जन्माला आलं. तर "हाच तो कप ज्याला कप प्रजातीतून हद्दपार व्हावं लागलं"
अशा दुस-या विस्थापिताचं नाव होतं चॉकलेट. तो टेबलावर ठेवलेला चॉकलेट बार कसा त्याच्या हातात लागला देव जाणे. तर हा बराच वेळ शांत का बसलाय, काही आवाज वगैरे का येत नाहीये असा विचार करून मी (लॅपटॉप मधून डोकं बाहेर काढून) त्याच्याकडे बघितलं आणि बघतो तो काय. मिकीने तोंडात चॉकलेटच्या पाकिटाचं एक टोक धरलं होतं, ते फटाफटा चावत होता आणि दुस-या हाताने पाकिटाचं दुसरं टोक पिरगाळत होता. थोडक्यात काथ्याचे दोर वळणे याचं सॉफीस्टीकेटेड रूप आणि कचाकचा चावणे याचं हार्श रूप याचा अनोखा संगम माझ्यापासून तीन फुटावर घडत होता. आणि चॉकलेट कोको परिवारातून 'सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही' वाल्या सुंभ उर्फ सुतळ/दोर परिवारात जाऊन स्थिरावलं.
तिसरी शिकार होती कानाला लावायच्या मलमाची ट्यूब. आणि तीही मेटल किंवा पत्र्याची. म्हणजे आपल्या टूथपेस्ट किंवा इतर मलमांच्या प्लास्टिक/रबरी ट्यूब सारखीही नाही. तिच्यावर तर दातांच्या एवढ्या खुणा आहेत की ते Manufacture's Design वाटावं आणि एका ठिकाणी तर त्या चाव्यांमुळे (आता यात किल्ली कुठे आली विचाराल म्हणून सांगतो, चावाचं अनेकवचन) ट्यूबला चीर जाऊन मलम बाहेर आलं. अर्थात ताबडतोब त्याच्या हातातून ती ट्यूब हिसकावून घेण्यात आम्ही यशस्वीही झालो. पण 'कसं फसवलं' असे जे भाव त्याच्या चेह-यावर आणि (नको तितक्या) बोलक्या डोळ्यांत होते त्यावर एक मोठ्ठा सुस्कारा सोडण्याखेरीज आमच्या हाती काहीच नव्हतं.. 
अर्थात यातल्या एकाही शिकारीचे 'केस उगवण्याच्या औषधांच्या' किंवा 'बारीक होण्याच्या गोळ्यांच्या' जाहिरातीच्या स्टाईलचे 'द बिफोर' आणि 'द आफ्टर' असे फोटोज नाहीत. कारण कुठल्या कुठल्या वस्तूचे पूर्वाश्रमीचे फोटोज काढून ठेवणार? संपूर्ण घरच शूट (पक्षी कॅमकॉर्डरने.. 'ओक म्हनत्यात मला' आन म्या त्येररिश्त न्हाय.) करून ठेवावं लागेल. कारण हल्ला कधीही आणि कुठल्याही वस्तूवर होऊ शकतो त्यामुळेच ..... अरे अरे थांब.... आँ आँ आ SSSSS
हे ही क्यूट्..फोटोसकट टाक ना
पुन्हा आभार .. लवकरच टाकतो
पुन्हा आभार
.. लवकरच टाकतो फोटोही ..
हा हा हा.... मस्त!! क्यूटच!
हा हा हा.... मस्त!! क्यूटच!
मस्त, एन्जॉय इट यार.
मस्त, एन्जॉय इट यार.
एल ओ एल
एल ओ एल
मस्त
मस्त
ग्रेट
ग्रेट
मस्त
मस्त
मस्तच... मुलाचा फोटो टाका
मस्तच...
मुलाचा फोटो टाका साडेतीन दातासकट...
वा छानैत फोटो?? आणी गोड गोड
वा छानैत फोटो?? आणी गोड गोड बाळाचे फोटो????????? क्लिक हिम इन अॅक्शन.. धमाल येईल
सगळ्यांचे मनापासून आभार.
सगळ्यांचे मनापासून आभार. टाकतो फोटोज लवकरच ..
(No subject)
(No subject)
क्युट