प्राचीन भारतीय साहित्यातील वसंतोत्सव

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 17 March, 2010 - 05:14

वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात.

पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र! रूप व सौंदर्याचा साक्षात आविष्कार असलेल्या कामदेवाच्या घरी पुत्रजन्म झाल्यावर सारा निसर्ग बहरून येतो. वृक्ष त्याच्यासाठी नव्या पालवीचा पाळणा बांधतात, पुष्प-कुसुमे त्याचेसाठी नव्या वस्त्रांची भेट घेऊन येतात, शीतल-सुगंधित वारा त्याला झोका देतो आणि कोकिळ पक्षी आपल्या सुमधुर स्वरांनी त्याचे मनोरंजन करतो. असा हा सृजनोत्सव! म्हणूनच बहुधा वसंताला ऋतुराज म्हणत असावेत! त्याच्यावर आधारित संगीत राग 'बसंत बहार' ह्या नवचैतन्याचीच प्रचीती देतो.

प्राचीन साहित्यात वसंत ऋतूमध्ये 'वनविहार', 'डोलोत्सव', 'पुष्पशृंगार' व 'मदनोत्सव' मोठ्या प्रमाणावर नागरजनांमध्ये साजरा केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.संस्कृत साहित्यात माघ शुक्ल पंचमीला मदनोत्सव साजरा केला जात असल्याची सुरेख वर्णने आहेत. सुगंधित केशर व कुंकवाच्या सड्यांनी सर्व नगर, रस्ते सुगंधित केले जात असत. त्या पीत-आरक्त वर्णाने सारे नगर जणू सुवर्णमयी भासत असे. सर्व जाती, लिंग, वय, श्रेणीचे लोक आपापसातले भेद विसरून ह्या वसंतोत्सवात सामील होत असत. नृत्य, गायन, वाद्यसंगीत, नाट्य इत्यादींचा आस्वाद घेत असत. केसांमध्ये फुले माळून हळद, कुंकू व तांदळाचे चूर्ण विखरून रंगांचा खेळ खेळत असत. वसंत विहारात स्त्रिया फुले, पाने गोळा करत; त्यांच्या आकर्षक माळा गुंफत; आम्रमंजिरी तोडत, केशर-कुंकुमाचे तिलक लावून कधी आपल्या प्रियतमाच्या कानावर फूल खोचून त्याला दृढालिंगन देत. उद्यानयात्रांत, वन-विहारांत स्त्री-पुरुष एकत्रितपणे मद्यपान करीत असत. सर्व स्तरांचे नागरिक वसंतोत्सवात सामील होत असत. रमणी, सुंदर स्त्रियांनी अशोक वृक्षाला लत्ताप्रहार करून त्याला 'फुलविण्या'चाही खास सोहळा असे. हिंदोळ्यांवर झुलणे हा ही वसंत ऋतूतील एक अविभाज्य भाग! त्यावेळी म्हणे 'हिंदोल' राग गायला जाई.

वसंतात व ग्रीष्मात पाण्यात वाळा, नागरमोथा, सुगंधी पुष्पे घालून तसे सुगंधित पाणी प्यायले जात असे. दुपारीही सर्वांगाला चंदनाची उटी लावून, अंगावर तलम वस्त्रे लेऊन, पंख्याचा वारा घेत रमणी विश्राम करीत असत. एका वर्णनात वसंत ऋतूतील सायंकाळी अभिजन आपला वेळ कसा व्यतीत करत ह्याचे फार मनोहर चित्र रंगविले आहे. सायंकाळी सौधावर सुगंधित जलाचे सडे घालून पांढर्‍या शुभ्र बैठकी मांडल्या जात. तिथे किंवा नगराबाहेरच्या उपवनांत, आम्रवाटिकेत सर्व अभिजन गायन, नृत्य, वादन, काव्य-श्रवण इत्यादी कलांचा आस्वाद घेत, मधुर फळांचे थंड रस अथवा सुरा नक्षीदार रजतपात्रांमधून प्राशन करत असत. त्याअगोदर सायंकाळी शीतल, सुगंधित पाण्याने स्नान करून, तलम मलमलीची वस्त्रे परिधान करून, गळ्यात मोगरा - जाई-जुई सारख्या शीतलता प्रदान करणार्‍या पुष्पांच्या माळा घालून, अंगाला चंदन-केशराची उटी, तिलक लावून ते ह्या सायंकालीन कार्यक्रमास सज्ज होत. मनोरंजन, तांबूलसेवन, शुकसारिका यांद्वारे रंजन अशा विविध मार्गांनी वसंत ऋतूमधील सायंकाळी व्यतीत होत असत.

आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशी वर्णने वाचूनही मन उल्हसित होते. मदनोत्सव, दोलोत्सव, रंगोत्सव एवढ्या रसिकतेने साजरे करणारे हे लोक आपल्यापेक्षा एका परीने विचारांनी व आचरणाने प्रगत व अभिरुचीसंपन्नच म्हणावे लागतील ह्यात शंकाच नाही!

-- अरुंधती

गुलमोहर: 

धन्यवाद! Happy

@प्रयोग, अजूनही शहरीकरणाचा जास्त स्पर्श न झालेल्या गावांमध्ये हा 'फागुन मास' उत्सव बर्‍याच मोठ्या प्रमाणात साजरा होतो बरं का! पूर्वीप्रमाणे नक्कीच नाही, पण तरुणी-बाला-तरुण-वृध्दा-प्रौढा सगळेजण झुल्यावर झुलण्याचा आनंद घेतात. त्यावेळची म्हणायची गाणीही वेगळी असतात म्हणे! मथुरा, वृंदावन येथेही वसंतोत्सव, होळी फार सुंदर साजरी होते असे ऐकले आहे. उत्तरेकडे हा उत्सव अधिक 'रंगतदार' पध्दतीने साजरा होतो. संस्कृती अजून तरी लुप्त झालेली नाही. फक्त तिची परिमाणे बदलली असे वाटते. आपल्या सभ्यासभ्यतेच्या कल्पना बदलल्या. जीवनाची शैली बदलली. पण अशी ही leisure and pleasure ची वर्णने वाचली तरी मन प्रसन्न होते! Happy

मी तरी पूर्वीच्या काळातल्या वसंतोत्सवाबद्दल एकदम 'डेंजर' माहिती वाचलेली..
डेंजर म्हणजे, दृष्टीकोनावर अवलंबून.. पण सध्याच्या आपल्या समाजातल्या रुढ कल्पनांच्या दृष्टीनं डेंजर!

उत्सव सिनेमात हा असा वसंतोत्सव आहे ना. अगदी स्त्युत्य उपक्रम आहे. परत चालु करायला हवा. होळी पेक्षा सुन्दर वाट्तो.
ही छानशी संस्कृती कशी बरं कालौघात लुप्त झाली?>> अरे एक त्याचे विश्लेषण असे आहे कि ब्रिटिश आक्रमणा बरोबरच त्यांची विक्टोरियन मते आपल्या नेटिवांवर लादली गेली. शरीर - मनाला आनंद देणे म्हण्जे सिन त्यावर कन्फेशन दिलेच पाहिजे नाहीतर नरकात रवानगी असे सांगणारे पाद्रीबाबा आले. त्या संस्क्रुतीचा एक भाग म्हणजे अति घट्ट अशी अंतर्वस्त्रे - जी आपल्या भारतीय गरम हवेस अगदी उपयुक्त नाहीत. पण इंग्लंडातील गार हवेसाठी त्यांची रचना केली गेली होती. पण जे साहेब करतो ते श्रेष्ठ असे आपल्यावर लादले गेले. नाहीतर आपल्या कडील पुरुषांची लुन्गी/ धोतर, स्त्रीयांची गाठ मारायची कंचुकी हे
आपल्या देशासाठी, हवामानासाठी योग्य कपडे होते. त्यावर कड्क उन्हा पासून संरक्षण अशी ओढ्णी/ पदर असे. उत्सव मध्ये असेच कपडे दाखविले आहेत.

इस्लामिक राज्य कर्ते किंवा मोगलाइत तर विचारूच नका. ते राजे सर्व उपभोग घेत पण प्रजेसाठी जाचक नियम होते. ज्या धर्मात चित्रकला संगीत वगैरेतून व्यक्तीला सेल्फ एक्स्प्रेशन करता येत नाही( देवाच्या स्तुती शिवाय) त्यात असे सुंदर सोहळे कुठुन येणार.

वरील उत्सव म्हणजे क्षण भंगुर जीवनातील काही आनंदाचे सुन्दर क्षण टिपणे, आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर
ते शेअर करणे उत्तम अन्न, कलेचा आस्वाद घेणे, सुगंध लावणे, उत्तम दर्शन, रेशमी कपडे असे पंचेंद्रियांना सुखी करणे हे किती छान नाही का? पब मध्ये जावून दारू पिण्या पेक्षा!

शांतिनिकेतनमधे अजूनही वसंतोत्सव साजरा करतात.
लेख वाचून BA करताना अभ्यासाला असलेले 'मेघदूत' आणि भासाचे 'प्रतिमा' आठवले.
खरं तर प्राचीन साहित्यातील संदर्भ देऊन हा लेख अजून चांगला होईल. अभ्यास केला पाहिजे पुन्हा एकदा!

@नानबा : 'डेंजर'! Happy बोल्ड म्हणता येईल. उत्सव चित्रपटातील मदनोत्सवाचे दृश्य व गाणे आठवून पहा! 'मेरे मन बाजा मिरदंग, मंजिरा खनके रे अंग अंग, अजब मद छाया रे, मदन रंग लाया रे'......
@ अश्विनीमामी: अनुमोदन!!!!
@ खादाडमावशी : खूप खूप लिहिता येण्यासारखं आहे.... मालविकाग्निमित्र, मृच्छकटिक, कादंबरी, रत्नावली मध्ये काय काय वर्णन केलं आहे!! या ठिकाणी वरचं जे काही लिहिलं तेही मी थोडंसं बिचकतच लिहिलं. पण तेही लिहिताना मजा आली. प्रत्येक साहित्यप्रकाराचा, ग्रंथाचा संदर्भ देऊन अजून तपशीलवार लिहिता येईल खरे!

वसंतपंचमी आली की हा लेख नेहमी आठवतो..... ,>>>
खरे आहे.
अतिशय नेटके वर्णन. कालिदासाच्या काळातील भारतीय अभिजात जनांची जीवनपद्धतीचे यथार्थ चित्रण केले आहे.
अरूंधती कुलकर्णी आणि अमा, दोघीही मायबोलीवरची रत्ने होत्या. सध्या दोघींचेही जुने लेखन पुनः पुन्हा वाचते आहे

छान वाटलं वाचून.. Happy

सामो तू.वर काढलास म्हणून हा वाचायला मिळाला. Thanks