राखण

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2010 - 22:57

"काय रे उम्या आज एकदम खासा बेत? काय सुमा तुझ्या नवर्‍याला लॉटरी लागली की काय ?" जेवणाच्या टेबलवर बसता बसता माझा जिवश्य कंठश्य मित्र अवनिश मला म्हणाला. " काय काय बनवलय ? आमरस आणि पुरणपोळी सुध्दा ?याशिवाय चटणी, कोशिंबीर, वरण भात जेवायला घालुन सदेह स्वर्गात पाठ्वायचा विचार दिसतोय तुझा "? अवनिश सर्व अन्न पाहुन मनापासुन दाद देत म्हणला.

"काही खास नाही रे. तु रहातोस दुबईला. त्यातुन असा सडाफटिंग, लग्न कर म्हणतो तर ... पुढ्चे शब्द सुमीच्या डोळ्यांकडे पहात गिळावे लागले. हा विषय काढ्ला की तो म्हणायचा ".....असताना म्हैस कोण विकत घेईल". हा डायलॉग सुमीला असंसदीय वाटायचा विशेषकरुन जेवणाच्या वेळेस व मुलांच्या समोर. मग मी पुढे शब्द बदलत म्हणल" हा आता एक वेळ दुबईला आंबे मिळतील पण पुरणपोळी कुठे मिळणार तुला अवनिश ? अनि तु पुण्याला माझ्याकडे येणार आणि पुरणपोळी न खाता जाणार म्हणजे सुधामावशींच्या आत्म्याला काय वाटेल ?"

"ही सुधामावशी कोण "? सुमाने जेवायला वाढ्ता वाढ्ता विचारले. तुला सांगितले नाही मी सुधामावशी कोण अजुनपर्यत? मी सुमाला विचारले ? सुमाने आश्चर्य व नकार अश्या समिश्र भावना दाखवत मान हलवली. " मी आणि अवनिश दोघेही हॉस्टेलला रुम पार्टनर होतो हे तुला माहीतच आहे. तेव्हा आम्ही सुधामावशीच्या मेस मध्ये जेवायला जायचो. अतिशय सुंदर रुचकर जेवण बनवयची सुधामावशी शिवाय सणासुदीला फिस्ट असायची. पुरणपोळी क्वचितच, येव्ह्ड्या माणसांना पुरणपोळी द्यायची म्हणजे सुधामावशी जमत ही नसे अन परवडत नसाव. मग ती श्रीखंड पुरी, खिर असे साधे सोपे बेत करायची. अवनिशला पुरणपोळीच खाविशी वाटायची. मग आम्ही नाटक करायचो काय रे अनी, मी अवनिशला कोपरखळी मारली. अवनिश म्हणाला "पण हे नाटक एकदाच फिट जमल."

काय केल काय तुम्ही ? न राहवुन सुमीन विचारल. अग हा जेवताना नेहमी गप्पामारायचा, हसवायचा सगळ्यांना. एक दिवस एकदम गप्प. सुधामावशीन विचारल काय रे अवनिश एकदम गप्प ? तब्येत बरी नाहीका ? तो तरीही गप्प. मग मावशीन विचारल भाजी आवडली नाहीका? तर म्हणाला भाजी चांगली आहे पण जेवल्यावर सांगतो.
जेवण झाल मग पुन्हा मावशीन विचारल काय रे सांगतो म्हणालास मग गप्प का? मग ह्याने लांबड लावली. मावशी वर गेलेली माणस स्वप्नात येतात व बोलतात ते खर मानायच का ? मावशीन विचारल " कोण आल होत तुझ्या स्वप्नात ? हा म्हणाला मला सांगता नाही येणार पण समोरच्या फोटोत दिसतात तसे होते. समोर सुधामावशीच्या दिवंगत सासर्‍यांचा फोटो होता.

सुधामावशीन कपाळाला हात लावला हे अस वागण आमच्या सासर्‍यांच. मी काय परकी होते. जिवंत असताना नुसत घड्याळ्याकडे पहायचे. आपण समजुन घ्यायच, दुपारचे चार वाजले, यांनी घड्याळाकडे पाहिल म्हणजे यांना चहा हवा आहे. संध्याकाळी सात वाजले यांनी घड्याळाकडे पाहिल म्हणजे यांना रात्रीच जेवण हव आहे. कधी काही तोंड उघडुन मागितल नाही. इथे अन्नपुर्णा वास करते. काही कमी नव्हत आणि पडणार ही नाही. पण तोंडाने मागतील तर ना. ह्ह्म्म्म... स्वभाव माणसाचा दुसर काय ? आम्ही दोघ एकमेकांकडे पहात राहीलो. मनात म्हणल बार फुसका निघाला बहुदा. मग दोन क्षणांनी मावशी म्हणाली काय म्हणत होते रे बाबा माझे सासरे. मग अवनिश म्हणाला अहो जाउद्या. मला जे काय दिसल ते काय खर नसाव. मी तर त्यांना जिवंत पाहिलही नाही. अरे सांगतर खर, काय दिसल स्वप्नात तुला ? मग अवनिश म्हणाला ते काही बोलले नाहीत. स्वप्नात मी इथच जेवायला बसलो होतो. काय होत त्यादिवशी माहित नाही पण तुम्ही पुरणपोळी केलेली होती. मी जेवत होतो आणि ते माझ्याकडे नुसते पहात होते. ऐन वेळी, वेळ पाहुन या अवनिशन नाटकाचे संवाद बदलले. तुला सांगतो सुमे, ही अ‍ॅडीशन फिट्ट बसली.
" खर आहे रे बाबा " मावशी म्हणाली "त्यांना पण पुरणपोळी आवडायची पण डायबेटीस मुळे खाऊ शकत नव्हते." पुढ्च्या आठवदड्यात त्यांचा वाढदिवस आहे करुयात पुरणाच्या पोळ्या. " हसत हसत मी स्टोरी सांगीतली.

सुमा पुरणपोळी माझ्यासाठी केली हे कळल पण त्याच्या जोडीला हा आमरस म्हणजे वर्‍हाडी बेत झाला. याचा कारण काय ? अवनिश अरे छान लागते आमरसाबरोबर पुरणपोळी दुसर काय. मी सारवा सारव करु लागलो. सुमाला लक्षात आल की मी माझी सर्व स्टोरी बाहेर न येऊ देण्याच्या प्रयत्नात आहे. अवनिश म्हणाला हे आंबे कुठले आहेत ? छान चव आहे रसाची. "उमेशच्या अनेक वर्षांच्या मेहनतीच फळ आहे अवनिश" सुमा हसत म्हणाली. मी रागाने सुमाकडे पाहिले. रागावतोस काय ? तुझ्या सगळया गोष्टी एकतर मला किंवा अवनिशला माहिती असतात अस तुझ म्हणण असत ना ? सुमा म्हणाली. यावर मी काय बोलणार कप्पाळ ? यावाक्यावर जास्त बोलण म्हणजे काही गोष्टी सुमाला व काही अवनिशला हे उघड सांगण झाल असत. लग्नाआधीच्या सर्वच गोष्टी सुमाला माहित नव्हत्या. याउलट लग्नानंतरच्या सर्वच गोष्टी अवनिशला माहित नव्हत्या.
बर बर सांगतो सर्व जेवल्यानंतर अस म्हणुन तेव्हाड्यापुरता विषय थांबवला.

जेवण झाली, आम्हा दोघांची १२० - ३०० पाने रंगली. मग बैठक बसली. मी सांगु लागलो. तुला माहित आहे अवनिश की मला २००१ साली अचानक व्ही. आर. एस, घ्यावी लागली. पुढे काय करायच मोठा यक्ष प्रश्न होता. नोकर्‍या मिळत नव्ह्त्या. आमच्या आईचे आई -वडील दापोलीला एक घर आणि एक वाडी माझ्या आईच्या नावाने करुन गेले. घरात एक भाडेकरु होता. त्यामुळे चिंता नव्हती. वाडी घरापासुन लांब आहे, दाभोळ रस्त्यावर त्यावेळेला काही आंब्याची कलम होती पण लांब असल्यामुळे आम्हाला आंबे पहायला सुध्दा मिळत नव्हते. शिवाय लांब असल्यावर शेजारी त्यांचा गडगा दरवर्षी पुढे पुढे सरकवतात. जागेचे वाद सुरु होतात. विचार आला तिच वाडी डेव्हलप करु. अजुन आंब्याची कलम लाऊ. मी दापोलीच्या नातेवाईकांना सल्ला विचारला. जवळजवळ सर्वच नातेवाईक म्हणाले की ही कलमे म्हणजे चोरांची धन होणार. वाडी डोळ्यासमोर हवी. आमच्या वाड्या डोळ्यासमोर असुन चोर्‍या होतात. तिथे गावाबाहेर लांबच्या वाडीत कोण राखण राहील ? गडी ठेऊन काही उपयो़ग नाही. चोरांनी नेल सांगुन तोच नेईल सगळे आंबे.

मी विचार केला स्थानिक लोक असच म्हणणार. काहीतरी निघेल मार्ग. असा विचार करुन आधी विहीर काढ्ली. खुप पाणी लागल. हाच शुभशकुन मानुन मी पुढ्च्या तीन वर्षात तिनशे कलम लावली. बघता बघता माझी वाडी हिरवी झाली. छान गडगा घातला चारी बाजुनी. गडगा म्हणजे कुंपण. सर्व काही ठिक झाल. पहीले मोहोर व आंबे खुडले कलमं चांगली वाढावी म्हणुन. सातव्या वर्षी पहिल्या शंबर कलमांना चांगला मोहोर आला. आंबा लागला. मी दापोलीला जाऊन राहीलो. रोज रात्रीसाठी राखणीला गडी ठेवले. आता आंबा उतरवणार तोच एक दिवस गड्यांना काही लोकांनी दारु पाजली. मी एकच रात्र दापोलीला नाही हे पाहुन चोरांनी डाव साधला. सर्व आंबे चोरीला गेले.

पोलिस आले. पंचनामा झाला. पोलिस म्हणाला साहेब हा शाप आहे कोकणाला. को़कणात येवढी अजुन जमिन शिल्लक आहे की इथे आंबा पिकवुन आपण अख्या भारतात पुरवुन परदेशतही पाठवु. पण इथल्या लोकांना कष्ट नको. याकारणाने लोक जमिनी पाडुन ठेवतात. काही दुसरा उपाय करा. मोहोर लागल्यावर वाडी विका आंब्यांच्या व्यापार्‍यांना दरवर्षी. व्यापारी राखण करतात, फळ उतरवतात आणि विकतात. शंभर दोनशे फळ आपल्याला खायला देतात वर वाडीला भाव ही चांगला मिळतो. तीनशे कलमांचे पंधरा हजार देतील. बघा पटतका? चार व्यापारी माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. मी सांगीतल तर चांगला भाव देतील तुम्हाला.

मी निराश मनाने परत आलो. या वर्षी दुसरे गडी ठेवले राखणीला. यावेळेला जवळ जवळ दोनशे कलमांना मोहोर आला होता. फळ ही धरल होत. दरम्यान मला नोकरी लागली होती. मी रजा काढुन पुण्याहुन जाऊन येऊन पहात होतो. एकदा सुट्टी घेऊन चाललो असताना पुणे दापोली गाडी महाडला आली. एक चाळीशीचे ग्रुहस्थ माझ्या शेजारी बसले. बोलता बोलत मी सगळी व्यथा त्यांना सांगितली. ते म्हणाले " गडी असुद्यात राखणीला पण त्यावर आणखी रा़खण ठेवा हो. मी विचारले कोणाची ? ते म्हणाले भुतांची. हे गडी किंवा चोर भुतांना भितात. ज्या वाडीत भुत असतात त्या वाडीत चोर्‍या कमी होतात. मी हसायला लागलो. त्यावर ते म्हणाले तुम्ही हसा हसा खुशाल हसा. शहरातली माणस तुम्ही. तुम्ही यावर काय विश्वास ठेवणार ?

मी विचार करु लागलो, काय हरकत आहे याचा विचार करायला ? मी विचारले " तुम्हाला अनुभव आहे ? ते म्हणाले "हो तर त्या शिवाय का मी हे सांगिन ?. माझ्या सासर्‍यांची मोठी वाडी आहे कोळबांद्रे गावाजवळ. ही सगळी प्रॉपर्टी माझ्या बायकोला मिळाली भाऊ नसल्यामुळे. मी महाड्ला शाळामास्तर, सांगा, कस मी पहात असेल. मी जाऊन येऊन पहातो. दापोली जवळ दाभोळ रस्त्यावर एक जुन घर आहे. त्यात एक मांत्रीक रहातो. त्याला सांगतो चोरांचा बंदोबस्त करायला. या मांत्रीकाने भुत बाळगली आहेत. वर्षाला हजार रुपये मांत्रीकाला दक्षिणा अन भुतांना चार कोंबड्या देतो. सांगा काय वाईट आहे ?

मी विचार करत होतो तोवर दापोली आले. मास्तर उठ्ले. मी म्हणालो "मास्तर या भुतांनी आपल काम घेतल हे समजण्यासाठी काय पुरावा ? मास्तर म्हणाले होतर. भुते देतात हो प्रचिती.

मी विचारले "प्रचिती ? ती कशी काय ? मास्तर म्हणाले "ते सांगता नाही येणार पण परमेश्वराची जशी प्रचिती स्वतंत्र असते तसाच हो हा प्रकार. तुमची खात्री पटेल की तुम्ही दिलेल त्यांना मिळाल आणि राखण करायला ते तयार आहेत. मी आता तिकडेच चाललो आहे. तुम्ही येणार असाल तर चला. सक्ती नाही. दापोलीस चार कोंबड्या घेऊ पुढे रिक्षाने जाऊ दाभोळ रस्त्यावर. अंघार पडलाय. तुमची सोबत होईल रिक्षाचे भाडे अर्धे अर्धे वाटुन घेऊ कसे ?खास कोकणी अविर्भावात मास्तर बोलले.

मी चला म्हणले. आम्ही एस.टी. स्टॅड समोरच्या कोंबडी अंडी विकणार्‍या दुकानात गेलो. दुकानदारकडुन चार जिवंत कोंबड्या पाय पंख बांधुन घेतल्या. रिक्षात बसलो. मास्तरांनी कुठे जायच ते सांगितल. भाड ठरल. रिक्षा त्या जुन्या घरापाशी पोचली तोवर अंधार गडद झाला होता. मी रिक्षावाल्याचे पैसे दिले. मास्तरांनी गेट उघडले. करर.... आवाज करीत गेट उघडल. मास्तर मला म्हणाले तुम्ही इथेच थांबा. कोंबड्या, दक्षिणा माझ्या़कडे द्या. मी आधी आत जातो, बोलतो त्या मांत्रीकाशी, मग तुम्हाला बोलावतो.

मास्तर आत गेले त्याघराचा दरवाजा गेट च्या समोर नव्हता. त्या घराला बाजुने प्रवेश असावा. घरात लाईट्सुध्दा नसावा. काहीच अंदाज येत नव्हता. ग्रामपंचायतीच्या रस्त्यावरच्या दिव्याचा उजेड जेमतेम त्या घराच्या अंगणात पोचत होता. मध्येच कुत्र्यांचे भेसुर ओरडणे मग शांतता. समोरच्या झाडावरुन एक वटवाघुळ उडाले ते थेट माझ्याकडे आले. मी घाबरलो आणि वाकलो. ते वटवाघुळ माझ्या डोक्यावरुन उडत रस्त्यावरच्या लाईट्च्या तारेला उलटे लटकले. मी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. मला मास्तरांची काळजी वाटु लागली. किती वेळ इथेच उभे रहावे हे कळत नव्हते. रस्त्यावर वर्दळ नव्हतीच. अजुन थोडा वेळ गेला. मी विचार केला कानोसा घ्यावा.

मी पुढे झालो. घराच्या दाराच्या बाजुला आलो. पहातो तर काय दरवाज्याला बाहेरुन कुलुप. अस कस झाल ? मास्तर कुठे गेले मी विचार करत असताना एक आवाज झाला. मी त्या दिशेने पाहिल. चमत्कारिक उजेड दिसला . मी त्या दिशेने चालत गेलो. आता भिती वाटत नव्हती. होती फक्त उत्सुकता. ते एक दगडी घंगाळ होते. कोकणात याला द्रोणी म्हणतात. त्यात पाणी होते. त्यात वेगवेगळ्या रंगाचे मासे होते. हे मासे प्रकाश बाहेर सोडत होते जो मला लांबुन दिसला. मी मंत्रमुग्ध होऊन मासेच पाहत राहिलो. कितीतरी वेळाने मला भान आले. मी मागे गेट पर्यत आलो.

गेट्पाशी एक वेगळाच माणुस उभा होता. एखादा गुन्हेगार असावा तसा. कमरेला धोतर गुडघ्यापर्यत. अंगात बंडी सारख काहीतरी. झुपकेदार मिश्या. राकट चेहरा. खांद्यावर फरशी कुर्‍हाड. मला भिती वाटु लागली हा लुटतो की काय आपल्याला. जरा धिर करुन मी त्यालाच विचारले ते मास्तर कुठे गेले ? गडगडाटासारखे हास्य करीत तो म्हणाला " दापोलीला, तुमाला आवाज दिला पन तुमी मास पाहात होता." मी घड्याळाकडे पाहिल रात्रीचे बारा वाजले होते. तहान भुक हरपुन मी तीन तास मासे पाहत होतो ? तुम्ही कोण ? मी विचारल ? मी हित राखणीला हाय. त्याने झुपकेदार मिशांवर ताव काढ्त हसत उत्तर दिल." मग आम्ही दोघ आलो तेव्हा तुम्ही कुठे होता ?. मी व्हय मागल्या बाजुला." मोजक उत्तर देऊन तो थांबला. चला तुमी पण, जायच नाई का घरी ? माझ्याकडे पहात तो म्हणाला.

मी त्या घराच्या आवारातुन बाहेर पड्लो. तो म्हणला सोबत करतो थोडी तुमाला. मालकाची शेवा करायला नको का ? मी म्हणालो तुम्ही कोकणी वाटत नाही. हा बराबर मी तिकड कोल्हापुरकडचा. राखणीच्या कामाला इ़कड आलो, अन इकडच राहिलो. रहाता कुठे मी विचारल ? हा हा । हितच की याघराच्या माग, मागे पडलेल्या त्या घराकडे त्याने बोट दाखवल. खाता काय ? म्हणजे या घरात तर कोणी दिसत नाही. कोण जेवायला वाढ्त तुम्हाला ? मी परत विचारल. त्यावर तो नुसताच हसला. बोलता बोलता तो म्हणाला तुमच काम झाल. मी म्हणल तुमाला कस माहित काय काम होत? तो म्हणाला " मास्तर लई वेळा येतात कुना कुनाची काम घेऊन. आज म्हणल मला जाताना, खोताला सांग काम झाल म्हणुन." मी म्हणलो तुम्हाला माझ नाव खोत आहे हे तुला सांगुन गेले मास्तर ? त्यावर तो नुसताच हसला. तोवर दापोलीतले दिवे दिसु लागले, तो म्हणाला " मालक मला माघारी जायला हव. मी त्याला म्हणल " काय हो माझ काम झाल हे खात्रीन कस समजाव ? त्यावर तो म्हणाला " उद्या या सकाळच, समद कळल"

मी दापोलीच्या घरी आलो. माझ्या घरातला भाडेकरु काळजीत होता. माझी वाट पाहत बाहेरच थांबला होता. मला रस्त्याच्या दुसर्‍या बाजुने येताना पाहुन म्हणाला खोत हे हो काय इ़कडे कुठे गेला होतात ? मी म्हणालो " सांगतो, जेवायला वाढा, भुक लागली आहे." जेवण झाल, मी सर्व हकिकत त्याला सांगीतली. त्यावर तो म्हणाला "उद्या मला नेऊ नका त्या घरात. मी येणार नाही. मी म्हणालो का हो ? तो म्हणाला " दिवसा कुणी जायला मागत नाही अश्या ठिकाणी रात्री जाऊन तुम्ही सुखरुप आलात ? मला नको विषाची परिक्षा." मी आज फार मोठे धाडस केल हे मला कळल.

दुसर्‍या दिवशी सकाळी मी एकटाच त्या घरी गेलो. मागच्या दारी चार कोंबड्या मेलेल्या दिसल्या. त्यांच्या मुंड्या मुरगळुन मारलेल दिसत होत. घराला कुलुप तसच होत. द्रोणीतल पाणी काळपट होत. त्यात मासे नव्हते. एकुण माणसाचा वावर नव्हताच. जवळच विचारपुस केल्यावर कळल या घरात गेले वीस वर्षे कोणीच रहात नाही. मग प्रचिती आली हा मास्तरच मांत्रीक असावा, आणि तो रखवालदार भुत. या मांत्रिकाला भुत वश असावित. आत्ता पर्यत गप्प बसलेला अवनिश उठुन उभा राहिला. " काय सांगतोस उमेश, माझा विश्वास नाही बसत." मी म्हणालो " मी कुठ म्हणतोय विश्वास ठेव पण फॅक्ट अशी आहे त्या नंतर माझ्या वाडीत चोरी झाली नाही. सगळ्यांचा ठाम विश्वास आहे की खोत भुत बाळगुन आहे. आपल्याला काय हेच पाहिजे ना ?

रस पचला ना अवनिश ? मी त्याला विचारले "पचला म्हणजे काय पचलाच रे. बर मी दिवसा आणि तुझ्या पुण्यातल्या घरी जेवायला आहे". हसत हसत तो म्हणाला. बर मला सांग मागची दोन तीन वर्ष तो मास्तर भेटला का पुन्हा ? का एकदा कोंबड्या देऊन भागल ? परत नाही भेटला, मी म्हणल. तो खरा मांत्रीक असेल तर त्याने धंदा बदलला असेल. वर्षाला हजार रुपयात काय होणार आणि माझ्यासारखे विश्वास ठेवणारे किती भेटणार ? जर तो मांत्रीक नसेल तर सफाईने वेषांतर करणार नजरबंदी करणारा जादुगार असेल.

अरे पण दोन तीन वर्षान हे उघड होईल की असा कोणी मांत्रीक आजकाल फिरकत नाही इकडे. लोकांची भिती कमी होत पुन्हा चोर्‍या सुरु होतील. अवनिश म्हणाला. मी म्हणालो, साल्या तुला घरच्या आंब्याचा रस काय उगाच खायला घातला ? नाटक करण्यात तु एक्स्पर्ट, चल माझ्याबरोबर दापोलीला. तु मांत्रीक हो. मी तुला घेऊन जातो ज्यांच्या वाड्या आहेत आणि ज्यांच्याकडे चोर्‍या होतात अश्या लोकांकडे. पैसे आणि कोंबड्या मिळतील. पैसे मी ठेवतो. कोंबड्या तु खा. काय सॉलीड प्लॅन आहे ? अवनिश म्हणाला आणि आम्ही हास्यरंगात बुडालो. पण काय रे ही गोष्ट सांगायची टाळत का होतास ? अवनिशन विचारल ?
सुमा तोंडावर हात ठेऊन आत पळाली. त्याच काय आहे अनी, तो रखवालदार पाहुन मी त्याच्याशी बोललो धीर करुन पण माझी पिवळी झाली होती. हि गोष्ट तुला सांगायची नव्हती ना. मग पुन्हा एकदा हास्यकल्लोळ झाला.

गुलमोहर: 

'' एक चाळीसिचे गृहस्थ माझ्या शेजारी बसले '' या वाक्यापासून कथेला छान कलाटणी आली आहे .
छान , कथा आवडली .

मस्त कथा आहे...पण जरा परिच्छेद नीट करा ना राव Happy ...जवळ जवळ संपुर्ण कथा संवादात होत आहे..पण ती अशी सलग वाचताना मजा नाही येत...बाकी कथा एकदम सही....एकदम वेगळि आणि छान Happy

छान Happy

लेका, नितिन, तू म्हणजे एकदम versatile लेखकू झालास की! अभिनंदन, अभिनंदन. असाच जगाला आनंद देत राहा.
जरा फिनिशिंग टचेस्‌ पाह्यजेत म्हणा . . . जसं की, कथेचा वेग आरंभापासून अंतापर्यंत सारखा असला तर जरा वरं वाटतं, सुरुवातीला जरा पाल्हाळिक आणि मंद, मध्यापासून एकाएकी वेगवान, शेवट खूपच घाईत - लिहायचा कंटाळा आल्यावर ‘आटपून’ टाकल्यासारखी अशी वाटते कथा. त्या मागच्या शिक्षकाच्या कथेतही असंच सुरुवात मंद आणि मग एकाएकी वेगवान असं काहीसं वाटलं होतं
पण कथेचा मूळ ढाचाच फंटास्टिक असल्यामुळे या गोष्टी ‘धकून’ जातात.
पण तुझी कथा वाचली की एकाएकी पुढचा दिवस झकास जातो, त्या कथेच्या नादात. धन्यवाद.

कथा चांगली आहे. पण नोकरदारांना आपल्या घामाने हिरवी केलेली वाडी नजरेसमोर ठेवता येत नाही याची खंत वाटत्ये.

मजा आली नितीन;
कोकणात भुता-खेतांचं प्रस्थ फार आहेच. अरे राजापूरजवळ गोळवशी नावाचं गाव आहे. तिथे भूतं विकत मिळतात म्हणे. एकदा खरंच जाऊन बघायचंय.

कमाल आहे तुमच्या माहितीची. मी फक्त कल्पना केली. तुम्ही तर हे वास्तव आहे म्हणुन सांगताय. अहो, मी फक्त कथेत भुताशी बोलतो. वास्तवात नाही. आपल्या बा च्यान जमायच नाय्. बोलायच राहुदे तिकडे जायला पण नको.

नितीन,
तू वेगळेच विषय हाताळतोस रे, आणी तुला मस्तच जमत ते. मधे जरा वाट चुकल्यासारखी झाली पण शेवटी जमून आलीय.

काय ओली झाली आणि पिवळी झाली करताय राव . एवढ्या छोट्या गोष्टीना घाबरलाय लेका. दरवाज्यामागून कोणी भॉ केलं तर हार्ट अटॅक यायचा तुम्हाला.