दोन बाजू... क्षणाच्या....

Submitted by झुलेलाल on 15 March, 2008 - 09:55

....सिग्नलच्या हिरव्या दिव्याची वाट पाहात दाटीवाटीनं, एकमेकांशी लगट करत ताटकळलेल्या गाड्यांचे कर्कश हॊर्न वाजायला लागले आणि रस्ता ओलांडायच्या प्रयत्नातली गर्दी जागच्या जागी थबकली...
हुतात्मा चौकातला तो मैदानी रस्ता आता क्षणभरात गाड्यांच्या गर्दीखाली दिसेनासा होणार होता.
सिग्नलचा हिरवा बाण लकाकला आणि पलीकडच्या गाड्यांनी वेग घेतला.
पण नुकत्याच चार पायांवर चालायला लागलेल्या त्या इवल्या जिवाला त्याची जाणीवही नव्हती. धडपडत्या पायांनी तो जीव पलीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होता...
आणि अचानक गाड्यांचा ओघ सुरु झाला..
...एक निसटतं, केविल्वाणं म्यांव करून मांजराचं ते पिल्लू जागच्या जागीच दबून बसलं...
स्वत:च्या पायांवर चालण्याचा पहिलाच प्रसंग अनुभवताना त्याला माहीतही नसलेला मृत्यूचा नाच त्याच्या चोहोबाजूंनी सुरू झाला होता...
....सिग्नलच्या दिव्यातला हिरवा माणूस प्रकट व्हायची वाट पाहात रस्त्याच्या दोहोबाजूंना उभी असलेली गर्दी त्याकडे पाहात थिजली होती...
हुतात्मा चौकातल्या कारंज्याअडे पाठ करून कॆमे-यासमोर उभ्या असलेल्या त्या हसया डोळ्यांच्या विदेशी, गोया तरुणीचं लक्ष अचानक त्या मांजराच्या पिल्लाकडे गेलं आणि एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली... आपली दोन्ही कानशिलं तळव्यांखाली झाकून भयभरल्या नजरेनं ती रस्त्याच्या मधोमध, गाड्यांच्या गर्दीत अडकलेल्या त्या इवल्या पिल्लाकडे पाहात होती...
भोवतीच्या गर्दीत उमटलेलं थिजलेपण तिच्याही नजरेत उतरलं होतं....
... पुढच्या कुठल्याहि क्षणी आपल्याला ते अघटित पाहावं लागेल, अशी भीती आख्ख्या गर्दीत दाटली होती....
सिग्नल बंद व्हायच्या आत रस्ता पार करायच्या गडबडीतल्या गाड्या, पिल्लाजवळ येताच, आकांतानं कसरत करीत त्याला वाचवायचाही प्रयत्न करत होत्या... पिल्लाचा भयभरला आक्रोश त्या कर्णकर्कश आवाजात थिजून गेला होता...
...अचानक गर्दीतली एक झुकल्या वयाची महिला वाहनांच्या रहदारीची पर्वा न करता रस्त्यावर घुसली... उजव्या हाताने गाड्यांना थाबायचा इशारा करीत ती पावलापावलानं त्या पिल्लाच्या दिशेनं पुढंपुढं सरकत होती...
आणि वाहनांचा वेगही मंदावला....
रस्त्यावरचा, वाहनांसाठीचा हिरवा सिग्नल सुरु असतानाही, गाड्यांनी ओसंडून वाहणारा तो रस्ता जागच्या जागी थबकला.
पलीकडच्या गर्दीला रस्ता क्रॊस करायचं भान नव्हतं....
रस्त्यावर दबून बसलेलं ते पिल्लू पुन्हा लडबडत्या पायांवर उभं राहिलं आणि मागं जावं, की पुढं, अशा संभ्रमात सापडल्यासारखं इकडंतिकडं पाहू लागलं...
एव्हाना ती महिला त्या पिल्लाजवळ पोहोचली होती...
मायेनं तिनं हात पुढे केला, आणि त्या पिल्लाला उचलून तिनं छातीशी धरलं... ते भेदरलेलं पिल्लूही, तिच्या कुशीत विसावलं होतं...
जगण्यामरण्याच्या अंतराची जरादेखील जाणीव नसलेला एक जीव वाचवल्याचं समाधान त्या महिलेच्या डोळ्यांत उमटलं होतं...
त्या पिल्लाला कुशीत घेऊन ती महिला मागं परतली आणि रस्त्यावरच्या गाड्यांनी पुन्हा वेग घेतला...
एक असाहाय्य, जन्माला येताच या अफाट दुनियेत एकटा पडलेला एक जीव त्या क्षणाला तरी वाचला होता....
ते पिल्लू घेऊन ती महिला हुतात्मा चौकाजवळच्या पोलिस चौकीजवळ आली, आणि त्याच्या पाठीवर हलकेच गोंजारत तिनं ते पिल्लू पोलिस चौकीच्या दरवाज्याशी ठेवलं...
कायद्याचं रक्षण करणायाच्या हाती जणू तिनं त्या नवजात जिवाचं जीवनही सोपवलं होतं, आणि ती निर्धास्त झाली होती....
..... सिग्नलच्या खांबावरचा हिरवा माणूस दिसताच, गर्दीनं रस्ता ओलांडला....
अन थिजलेला तो क्षण संपून, नवा क्षण जिवंत झाला....
... नव्या गर्दीनं पहिल्या गर्दीची जागा घेतली, तेव्हा अगोदरच्या त्या क्षणाच्या खाणाखुणादेखील तिथे उरल्या नव्हत्या....
हस-या डोळ्यांची ती गोरी, विदेशी तरुणी अजून्ही तिच्या साथीदारासोबत तिथे उभीच होती...
गाड्यांच्या गर्दीत जिवंत झालेल्या माणुसकीच्या एका स्पर्शामुळे, जिवाची बाजी लावून जिवंत परतलेलं ते पिल्लू पोलिस चौकीच्या दाराशी निर्धास्त झाल्यांचं तिनं बघितलं, आणि तिच्या कानशिलावरचे भीतीनं थरथरणारे हात बाजूला झाले... डोळ्यातलं थिजलेपणही हळुहळू मावळलं, आणि नजर पुन्हा पहिल्यासारखी हसरी झाली...
एका स्वस्थ समाधानाची छटा चेहयावर उमटवत तिनं साथीदाराकडे पाहिलं... त्यानंही हळुवारपणे तिचा हात हातात घेऊन थोपटला...
घड्याळाच्या वेगाशीही सामना करत पळणाया गर्दीत हरवलेल्या माणुसकीच्या नकळतपणे झालेल्या दर्शनानं ते जोडपं भारावून गेलं होतं....
पाठीमागच्या उसळणाया कारंज्याकडे पहात त्यानं कॆमेरा बंद केला आणि हातात हात घालून ते दोघही रस्ता ओलांडू लागले...
पलीकडच्या फूटपाथवर येताच, फाटक्या, मळक्या कपड्यांतली, अस्ताव्यस्त जटांची आणि फक्तं नजरेतलं बालपण जिवंत असलेली दोनचार मुलं धावत त्यांच्यासमोर आली, आणि हात पसरून आशाळभूतपणे त्यांच्याकडे बघत राहिली...
तिच्या डोळ्यातलं मघाचं समाधान अजूनही टवटवीत होतं...
पर्समध्ये हात घालून तिनं दोनचार नोटा काढून त्या मुलांच्या हातावर ठेवल्या...
हातातले पैसे घट्ट पकडून क्षणात त्यांच्याकडे पाठ फिरवून पळालेल्या त्या मुलांचा पाठमोया आकतीकडे पाहाताना पुन्हा तिच्या डोळ्यातलं हास्य फुललं, आणि त्याच नजरेनं तिनं पुन्हा जोडीदाराकडे बघितलं...
भारतात आल्यावर कायकाय पाहायला, अनुभवायला मिळेल, याचा कधीकाळी केलेला गृहपाठ जणू त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता....
नेहेमीप्रमाणंच उजाडलेल्या आणि मावळलेल्या रोजच्यासारख्या त्या दिवशीचा तो क्षण अनुभवणाया गर्दीतल्या प्रत्येक साक्षीदाराच्या मनात तो कायम्चा अधोरेखित होऊन राहिलेला असेल...

------------- ------------------------ ------------------------
-२-

नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष त्या सण्ध्याकाळपासूनच तरुणाईच्या उत्साहातून सांडत होता...
गेट-वेच्या समुद्रात सूर्य मावळला, आणि सरत्या वर्षासोबत संपणारी रात्र हळुहळू वर सरकू लागली...
गर्दीचे थवे रस्त्यावर उतरले... रस्ते फुलून गेले...
रात्रीच्या धुंदीची नशा गर्दीच्या डोळ्यात उतरू लागली...
नव्या वर्षाचं स्वागत आपापल्या परीनं करण्यासाठी प्रत्येकजण आतुरलेला होता...
लग्नानंतर लगेचच भारतात फिरायला आलेलं ते विदेशी जोडपंही, भारताच्या भूमीवरून नव्या वर्षाचं स्वागत करायाच्या कल्पनेनं थ्रिल होऊन बाहेरच्या गर्दीत मनापासून मिसळून गेलं होतं...
इथल्या मातीशी जुनं नातं असल्यानं, नवखेपणाची पुसटशी जाणीवही त्यांच्या हालचालीत नव्हती.
नव्या वर्षाच्या आगमनाची वर्दी देणारा तो क्षण अवतरला, आणि गर्दीचं भारावलेपण तिच्याही हालचालीत सहजपणे उतरलं...
त्या अपेक्षित जल्लोषात तीही अभावितपणे सामील झाली....
त्याच क्षणाला, भोवतीच्या गर्दीत क्ठेतरी, रात्रीची नशा अनावर होत होती...
दिवसाच्या उजेडात कुठे माणुसकीची झरे कुण्या असहाय जिवाला जगण्याची उमेद देत होते, आणि त्याच मातीत, रात्रीच्या अंधारात त्याच क्षणाची दुसरी बाजू काळीकुट्ट होऊन भेसूरपणे खदखदत होती....
माणुसकीचं अनोखं दर्शन घडवणारी,
एका नवजात जिवाला संकटातून वाचवण्यासाठी स्वत:चा जीव संकटात ढकलणारी,
माणसाच्या वंशाशी नातंही नसलेल्या कुणाच्या जिवावरचं संकट टळावं, म्हणून मनशक्ती पणाला लावणारी,
संवेदनशील गर्दीही, रात्रीच्या त्या काळ्या अंधारात मूढासारखी थिजून गेली...
एका मांजराच्या पिल्लाला संकटातून सोडवण्यासाठी एका हृदयातला माणुसकीचा झरा जिवंत झाला, तेव्हा त्या क्षणाच्या असंख्य साक्षीदारंनी किमान सुटकेचा नि:श्वास तरी टाकला...
आणि, संवेदनांच्या जागेपणाची साक्ष दिली होती...
त्या रात्री मात्र, गर्दीच्या संवेदना थिजून गेल्या....
आणि माणुसकी पुसून पशू पेटून उठला...

-------------- -------------------- ---------------------
हुतात्मा स्मारकाजवळ्च्या माणुसकीच्या दर्शनानं भारावलेलं ते जोडपं आजही आपल्या मायदेशात भारताचे गोडवे गात असेल...
आणि नववर्षाच्या स्वगताच्या काळ्या आठवणींचे चटकी सोसत कुणी एकजण अजूनही जळत असेल...
.... ....
क्षणाच्या या दोन बाजूंचा माझ्याभोवतीचा विळखा मात्र, दररोज घट्टघट्ट होत चाललाय...
आकाशाकडे पाहात ओरडावंसं वाटतंय, ’आम्हाला माफच करा’....
---------- ----------------------

गुलमोहर: 

क्षणाची पहिली बाजू अगदी खास उतरलीय .. नुसत्या शब्दांतून एव्हढं वेधक वर्णन निर्माण करणं किती कठिण असेल पण तुम्ही छान उभं केलंय ..

पण दुसरी बाजू मात्र थोडी अजून रंगवायला पाहिजे होती असं वाटलं ..

पण एकूण सुंदरंच लिहीलंय .. Happy

झुलेलाल, पहिला क्षण खूप सुंदर लिहिलास. दुसरा जरा पहिल्याच्या तुलनेने कमी पडला. शेवट इतका नाही आवडला.. पण पहिला क्षण वाचून शेवटपर्यंत त्याचा प्रभाव राहतो.
-- बी

धारधार सुर्‍याने खून करणारा माणूस पुढे जाऊन एका अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो.
तसचं आहे हे.

अनिकेत वैद्य.