मायमराठी..मायबोली

Submitted by स्मिता द on 1 March, 2010 - 00:36

मायमराठी..मायबोली

नुकताच विविध मराठीप्रेमी संस्थांनी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा 'मायबोली मराठी सप्ताह' म्हणून साजरा केला. त्या निमित्त्याने मराठी विषयी लिहावेसे वाटले म्हणून हे ललित

मायमराठी माझी माउली
अमृतधारा झरती बोली
मनात फुलती वसंत गाणी

माय जशी वत्सल, स्नेहमयी, अवर्णनीय अवीट अशी मायेची सावली असते तशीच आहे माझी माय मराठी. माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असे ज्ञानदेव म्हणून गेले, ते अगदी मनाच्या गाभ्यापासून. भाषेचा उगम माणसाच्या निर्मिती बरोबरच झाला असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही. ध्वनीद्वारे व्यक्त होता होता मग विशिष्ट सांकेतिक ध्वनीचा एक समुदाय तयार झाला व त्यातून भाषा जन्माला आली. मग त्या भाषेला प्रत्येक टोळी द्वारे वेगवेगळे संकेत ठरले आणि तिथून मग भाषेचे निरनिराळे प्रकार उद्भवले. अशी एक ढोबळ संकल्पना भाषेच्या उगमा विषयी आपण बांधू शकतो. मानवाचा जसा जसा विकास घडत गेला तस तशी भाषा सुद्धा विकास पावत गेली. भाषेची अनेकविध स्थित्यंतरे घडत गेली. अगदी गर्भावस्थेपासून मुलाच्या कानावर जे ध्वनी पडतात ते भाषेच्या माध्यमातून. "भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. " सुरुवातीला मौखिक असणारी भाषा सांकेतिक ध्वनीचिन्हाच्या रूपात अक्षय म्हणजे अक्षर लिपीमध्ये बद्ध झाली. मूल जन्माला आल्यापासून सतत कानावर पडणारी भाषा मूल आपोआप आत्मसात करते आणि मग तिच त्याची मातृभाषा ठरते. अन प्रत्येकाला आपली मातृभाषा मातेसारखीच असते. भाषेतून समाजाची जडणघडण दिसते, प्रगतीची अवस्था स्पष्ट होतात. आपली मराठी भाषा म्हणजे इंडो इराणियन गटातली आर्य भारतीय शाखेतील अर्वाचीन अवस्था.

माझी माय म्हणजे मायमराठी. मायेच्या ममतेचा ठायी ठायी प्रत्यय देणारी. अंगभूत गोडवा असणारी, अगदी भुईकमळा सारखी उमललेली माझी मराठी... आईमध्ये जशी विविध रुपे एकवटलेली असतात तशी विविधरूपे माझ्या मराठीची आहेत. भाषिक वाग्मय अक्षर होण्या आधीपासूनचा प्रवास पाहिला तर अनेकांगी रूपे मराठीची दिसतात. प्रत्येक बारा मैलावर भाषा बदलते म्हणतात आपल्या मराठीची पण अगदी थोड्या थोड्या स्वरूपाचे ढोबळ बदल दाखवणाऱ्या बोलीभाषा आहेत जसे अहिराणी, वऱ्हाडी, मालवणी, कोकणी. बोलीभाषा आणि लोक साहित्य ह्या खरेतर त्या त्या समाज जीवनाचा आरसाच! प्रमाण भाषा अन बोली भाषा असे दोन प्रकार भाषेचे आहेत. लोककथा, लोकगीते, कहाण्या, उखाणे, कोडी, कूटे, म्हणी, वाक्प्रचार, पोवाडे, अभंग, ओव्या, आख्यायने अशी समृद्ध लोकसाहित्याची परंपरा मराठी भाषेची आहे. मराठी मनाच्या मानसिक जडणघडणीचा प्रवास मराठी भाषा दाखवते.

मराठी भाषा सप्ताहामूळे एक मराठीच्या इतिहासाला उजाळा देताना जाणवते काय समृद्ध परंपरा आहे आपली मराठीची. काळाच्या ओघात काही परंपरा लोप पावल्या जातात की काय अशी भीतीही निर्माण झाली आहे. जातेच नष्ट झाल्यामुळे जात्यावरच्या ओव्या गेल्या. हल्लीच्या धावपळीत जगण्यातला निवांतपणा च हरवत चाललाय त्यामूळे झोपाळ्यावरची गाणी कालबाह्य झाली आहे. मराठी लोकगीतातून मानवी मनाचे ऋणानुबंध मोठ्या जिव्हाळ्याने गुंफलेले आहेत. समाजाचे अंतरंग, समाजाची भावना, चालीरीती, संस्कृती याचे प्रतिबिंब माझ्या मराठीत पडलेले आहे. महाराष्ट्राची लौकिक परंपरा मराठी भाषेतून अगदी सुंदरपणे व्यक्त झाली आहे. या मराठीच्या लोकपरंपरेचा मागोवा घेतल्यास दिसते.

रात्री दिवसा आम्हां युद्धाचा प्रसंग अंर्तबाह्य जग आणि मन
जीवाही अगोज पडती आघात येऊनियां नित्य नित्य करी

असा तुकोबरायाचा अभंग असू दे नाहीतर

जात्या तू ईसवरा नको मला जड जाऊ
वयाच्या दुधाचा सया पाहतात आनुभुनू
यासारख्या जात्यावरच्या ओव्या असू दे नाही तर

कमळाच्या फुलावर बसले पक्षी
... रावांच नाव घेत चंद्र सुर्य आहे साक्षी

यासारखे उखाणे असू दे अत्यंत सुगम सुलभ पद्धतीने ही माय मावली आपल्यापर्यंत पोचते. अगदी आतल्या गाभ्यातून स्रवणारी मराठी तिच्या अंगभूत गोडव्यामूळे मराठी मनाशी अजून जवळीक साधते. मराठी मनाचे समर्थन, माध्यम, वाहक, स्वप्नरंजन, मनोरंजन करणार्या या माझ्या मायेला शतश: प्रणाम.

खूप प्रकार कालबाह्य ठरले आहे त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच संकल्प आपण मराठी भाषीकांनी घेतला तर काही अवघड नाही. मराठी भाषेच्या कौतुका संबंधी मला वेळो वेळो प्रकर्षाने आठवता त्या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी..
"लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी "

काळाप्रमाणे सूक्ष्मसे बदल दाखवत हा मराठीचा प्रवास अखंड चालू आहे. मनामनाचे सृजन घडवणार्‍या या अनुकूल भूमीला माय मराठीला म्हणावेसे वाटते

"आई हा शब्दांचा मुजरा
देखील तुझीच देणं आहे
आम्हा लेकरांच्या ओठी
केवळ तुझे नाव आहे"

गुलमोहर: