एका शर्टाची गोष्ट

Submitted by ललिता-प्रीति on 24 February, 2010 - 05:16

नुकतीच एका लग्नाला जाऊन आले. लग्नासारखे समारंभ म्हणजे एकत्र भेटण्याचे, गप्पाटप्पा करण्याचे अगदी हुकुमी प्रसंग. अशा कुठल्याही समारंभाला हजेरी लावण्यामागे निदान माझं तरी हेच प्रमुख उद्दीष्ट असतं. एकाच ठिकाणी, एकाच वेळी अनेक नातेवाईक, सुहृद, मित्रमैत्रिणी भेटतात. सर्वजण बोलावल्यासरशी आले म्हणून यजमानही खूष असतात (निदान तसं दाखवतात) आणि याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे एक साग्रसंगीत जेवणाचं ताट आयतं पुढ्यात येतं! मला माहितीय, मनातल्या मनात सर्वांना हे कारण अगदी पुरेपूर पटलेलं आहे. विशेषतः दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघरातल्या ओट्याशी झुंजणार्‍या तमाम महिलावर्गाला... आणि काही अपवादात्मक पुरूषांनाही. (हो! आजकाल या रटरटत्या क्षेत्रात ही जमातही हळूहळू पाय रोवते आहे.)
तर असंच ते ही एक लग्न होतं. ‘लग्न’ नामक मोतीचुराचा हा लाडू खाऊन पस्तावलेले, पस्तावूनही काही उपयोग नसतो हे उमगलेले अनेकजण आपापसांत गप्पा मारण्यात, सुखदुःखाच्या गोष्टी करण्यात मग्न होते. पस्तावलेली इतकी माणसं आसपास असूनही डोळ्यांवर कातडं ओढून घेऊन त्या मोतीचुराच्या लाडूची चव घेण्यास आसुसलेलं त्यादिवशीचं ‘उत्सवमूर्ती’ जोडपं एकीकडे लग्नविधींमधे मग्न होतं.
या सगळ्यांतच अजून लग्नबंधनात न अडकलेलं एक सूट-टाय आणि साडीयुक्त ‘जोडपं’ सारखं माझं लक्ष वेधून घेत होतं. म्हणजे त्यांच्या एकंदर अवतारावरून आणि देहबोलीतून तो प्रसिध्द लाडू त्यांनी अजून खाल्लेला नाही हे कळत होतं. बहुधा वधूवरांपैकी कुणाच्यातरी मित्र-मैत्रिण परिवारापैकी असावेत. मैत्रीण आणि मैत्रिणीचा ‘तो’ किंवा त्याच्या उलट... असंच काहीसं असावं. बराच वेळ मी त्यांच्या हालचाली, त्यांचं आपापसांतलं (मला ऐकू न येणारं) संभाषण निरखत होते. सार्वजनिक ठिकाणी मनाला हा विरंगुळा आपला बरा असतो. एखादी व्यक्ती हेरायची आणि तिचं किंवा त्याचं तिला किंवा त्याला कळू न देता निरिक्षण करायचं. तो चेहरा वाचायचा प्रयत्न करायचा. उगीच स्वतःशी अंदाज बांधत बसायचं - त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, छंद, आवडीनिवडी काय असतील वगैरे वगैरे. आपल्याला कंटाळा येईपर्यंत किंवा समोरच्याच्या लक्षात येईपर्यंत हे चालू ठेवता येतं. तसंच माझं चालू होतं.
त्या नादातच की काय कोण जाणे पण बुफे जेवणाच्या वेळीही मी त्यांच्या आगेमागेच होते. ते दोघं आपापसांत मग्न असल्यामुळे माझी उपस्थिती त्यांच्या गावीही नव्हती आणि येत्या काही मिनिटांतच माझं असं त्यांना निरखणं मला माझ्या स्वतःच्याच वैवाहिक आयुष्यातल्या खूप पूर्वी घडून गेलेल्या आणि नंतर (चक्क) विस्मृतीत गेलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेची आठवण करून देणार होतं ही गोष्ट माझ्या गावी नव्हती!
त्या एका घटनेनंतर खर्‍या अर्थानं आमचा मधुचंद्र संपून ‘संसार’ सुरू झाला होता. ‘लग्न म्हणजे तडजोड’ हे त्या प्रसंगानंतर मला लख्ख कळलं होतं. ‘संसारात आपल्या माणसासाठी काय काय करावं लागतं!’ या वाक्यातलं ‘काय काय’ म्हणजे नक्की काय काय ते त्यानंतर मला उमगलं होतं. आता, हे सगळं कळायला, उमगायला लावणारा प्रसंग गंभीरच असला पाहीजे असं काही नाही ना! तो गमतीशीर असू शकतो, विनोदी असू शकतो...
धमाल विनोदीही असू शकतो!
तर, त्या धमाल विनोदी प्रसंगाला कारणीभूत होता एक शर्ट - माझ्या नवर्‍याचा! आणि त्या प्रसंगाची इतक्या वर्षांनी मला पुन्हा आठवण करून द्यायला कारणीभूत होता अजून एक शर्टच - मी निरखत असलेल्या त्या सूट-टायचा!!

बुफेच्या रांगेत मी हळूहळू पुढे सरकत होते. माझ्या पुढे अजून एकदोघंजण आणि त्यांच्यापुढे ते जोडपं होतं. कुठल्याही लग्नातला बुफे मेनू हा साधारण एकसारखाच असतो असं माझं प्रांजळ मत आहे. त्यामुळे साहजिकच आताही समोरच्या पदार्थांऐवजी माझं लक्ष त्या दोघांकडेच होतं. सूट-टायनं आपला ब्लेझर काढून डाव्या हातावर तोलला होता आणि त्याच हातात त्यानं जेवणाची ताटली धरलेली होती.
त्यांच्या पुढ्यातल्या वाढप्यानं हातातल्या लांबलचक दांड्याच्या चमच्यानं सूट-टायच्या ताटलीत फस्सकन्‌ कुठलातरी रस्सा वाढला. त्यासरशी तक्रारीच्या सुरात कुजबुजत साडी सूट-टायला म्हणाली, "डिश लांब धर ना जरा... मी एवढा गिफ्ट म्हणून दिलेला शर्ट, खराब होईल ना तो..!!" दरम्यानच्या काळात त्यांच्या आणि माझ्या मधले इतर दोनतीनजण निघून गेल्यामुळे मी आता अगदी त्यांच्या मागेच उभी होते. त्यामुळे ती कुजबुज मला स्पष्टपणे ऐकू आली.
ते ऐकलं मात्र... पडद्यावरच्या चालू चित्रपटात फ्लॅशबॅक दाखवायचा असेल की कसं वेगात कुठूनतरी कुठेतरी निघाल्याचा आभास निर्माण केला जातो किंवा समोरची चित्र गोलगोल फिरत आपापसांत मिसळली जाऊन एकदम निराळी जुनी फ्लॅशबॅकची चित्रं, पात्रं दिसायला लागतात तसं काहीसं माझ्या डोक्यात झालं.
वाटलं की अरे, साधारण असाच प्रसंग या आधी कुठेतरी घडलेला आहे, आपण पाहीलेला आहे... संवाद वेगळे असतील, कदाचित नसतीलही, पण याआधी नक्की या सम काहीतरी घडलंय जे आपल्याला चांगलंच परिचित आहे...
‘कुठेतरी’ कुठला? तो प्रसंग हाका मारायला आमच्याच घरात घडला होता...!
मला ते चांगलंच परिचित वाटलं कारण ते माझ्याच बाबतीत घडलेलं होतं...!
ते ‘या सम’ होतं कारण त्यातही एका नुकतंच लग्न झालेल्या बायकोनं (पक्षि : मी) आपल्या तितक्याच नवीन नवर्‍यासाठी एक शर्ट गिफ्ट म्हणून आणला होता...
त्या प्रसंगात विशेष उल्लेखनीय असे संवाद नव्हते... किंबहुना अशा कुठल्याही संवादांची तिथे गरजच नव्हती कारण तो शर्ट त्या नव्या नवर्‍यानं अंगात चढवण्याआधीच एका डु...
जाऊ दे!
त्या जोडप्यावरून माझं लक्ष आता उडालं होतं. ही गोष्ट आपण विसरलो कशा असं वाटून स्वतःचंच नवलही वाटत होतं आणि तेव्हाचा सगळा घटनाक्रम आठवून पुन्हा नव्यानं हसूही येत होतं!
मनात आलं की नवर्‍याच्या तरी लक्षात असेल का आता तो प्रसंग? पण त्यानं का म्हणून लक्षात ठेवावा? त्या प्रसंगातून संसाराचं इंगित तर आपल्याला समजलं होतं, त्याला काहीही फरक पडला नसेल तेव्हा. मग तो कशाला लक्षात ठेवेल?...
खरंतर तो शर्ट आपल्या नवर्‍याला किती आवडायचा, पुढे कितीतरी वर्षं त्यानं तो वापरला, टिकलाही चांगला. पण जेव्हा जेव्हा तो कपाटातून बाहेर काढला जायचा तेव्हा आधी हेच आठवायचं की हाच तो शर्ट जो डु...
छे! केवढा हास्यास्पद प्रसंग तो... पण आपण निभावून नेला... नवरा खो खो हसत होता; शेजारीच धाकटी बहीणही मज्जा बघायला उभी होती... त्यांच्या हसण्या-खिजवण्याकडे दुर्लक्ष करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आपण गेलो सरळ आणि डुक...
रामराम! रामराम! स्वप्नात तरी वाटलं होतं का की असलं काहीतरी करावं लागेल! हेच ते; आपल्या माणसासाठी संसारात करावं लागतं ते; ज्याचा खंत, खेद न बाळगता, लाज-लज्जा-शरम काहीही न वाटून घेता केलं जातं ते, परिणामांचा विचार न करता आपण स्वतःला ज्यात झोकून देतो ते...
आता पंधरा सोळा वर्षांनी खरंतर छे, जाऊ दे म्हणून तरी काय उपयोग आहे? नवर्‍यानं तो शर्ट भरपूर वापरला, नंतर त्याची फडकी, पोतेरी करूनही आम्ही वापरली...
पण तरी हे सत्य तर कुठे लपत नाही ना की तो शर्ट डुक...
शी! तो गार, गिळगिळीत स्पर्श... पुन्हा बोटांना जाणवतोय...
सुखी संसाराचं गुपित, रहस्य इतर अनेक प्रसंगांमधून मी अगदी नीट, व्यवस्थित, इमानदारीत समजावून घेतलं असतं. पण नाही! सोसायटीचा आख्खा परिसर सोडून त्या शर्टालाही तीच एक जागा सापडली...
नवर्‍याच्या नकळत त्याच्यासाठी भेट म्हणून मी आणलेला तो शर्ट. त्याच्या वाढदिवसादिवशी बाहेर जेवायला जाताना घाल, घाल म्हणून मीच त्याच्या मागे लागले होते. घालून बघण्यासाठी त्यानं तो उलगडला तर नेमका एका बाहीला कसलातरी काळा डाग पडलेला दिसला. डाग अगदी दर्शनी भागावरच होता शिवाय शर्टही फिक्या रंगाचा. म्हणून मी त्याच्या हातून शर्ट घेऊन लगेच ती एकच बाही धुवून टाकली आणि शर्ट बाहेर बाल्कनीत हॅन्गरला लटकवून ठेवला. जोडीला हॅन्गरला आठवणीनं चिमटाही लावून ठेवला. जेमतेम अर्ध्या तासाचा प्रश्न होता... एक ओली बाही वाळायला तितका वेळ पुरेसा होता. पण मग पुढचं दिव्य माझ्या पुढ्यात कसं उभं ठाकलं असतं!
नंतरच्या पाच मिनिटांतच जोरात वारा सुटला... अगदी सोसाट्याचा, वळवाच्या पावसापूर्वी सुटतो तसा. मी शर्ट काढून आत घ्यावा म्हणून धावलेच लगेच बाल्कनीत तर... तिथे हॅन्गर नव्हता, चिमटा नव्हता आणि शर्टही नव्हता! वार्‍यामुळे तो खाली पडला असणार हे लक्षात आल्यावर मी ताबडतोब चौथ्या मजल्यावरच्या आमच्या बाल्कनीतून खाली वाकून बघीतलं आणि मला जे दिसलं ते पाहून माझा चेहरा खर्रकन्‌ उतरला. "शीऽऽ! काय हे..." असं म्हणून मी वैतागून जोरात ओरडले. हसावं, चिडचिडावं, वैतागावं की अजून काही करावं तेच मला कळेनासं झालं. माझा आवाज ऐकून माझा नवरा आणि माझी बहीण दोघंही धावतच बाल्कनीत आले आणि खाली वाकून बघायला लागले. त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांचा असा काही हास्यस्फोट झाला की विचारू नका.
आमच्या इमारतीच्या मागच्या बाजूला एक गलिच्छ उकीरडा होता. फुटक्या पाईपमधून वाहणारं सांडपाणी इ.इ. सार्वजनिक स्वच्छतेच्या नावाने ढोल बडवत तिथे निवांतपणे साचलेलं असायचं आणि तितक्याच आनंदात त्यात तीन-चार डुकरं सतत बसलेली असायची. तो शर्ट उडून त्यातल्याच एका डुकराच्या अंगावर पडला होता!!
मी हताशपणे त्या शर्टाकडे बघत थोडावेळ उभी राहीले. एकीकडे हसू दाबत दाबत नवर्‍यानं माझी समजूत काढायला सुरूवात केली... तो शर्ट जाऊ दे, पुढच्या रविवारी जाऊन आपण दुसरा एखादा घेऊन येऊ, तू वाईट वाटून घेऊ नकोस वगैरे, वगैरे. पण मला ते पटलं नाही. शर्ट थेट चिखला-घाणीतच पडला असता तर कदाचित मी नवर्‍याचं ऐकलंही असतं. पण इथे नजरेसमोर तो चांगला कोरडा ठणठणीत दिसत होता. फक्त इतकंच की आता तो एका डुकरानं पांघरलेला होता. आणि तुका म्हणे त्यातल्या त्यात - ते विशिष्ट डुक्कर उकीरड्याच्या बर्‍यापैकी काठावरच बसलं होतं.
शर्टापर्यंत पोचणं शक्य आहे याची लुकलुकती आशा दिसताच मी तडक निघाले. आता माझ्या हालचालींत यमाकडून सत्यवानाचा सदरा परत मागणार्‍या सावित्रीची तडफ होती, तळमळ होती, निर्धार होता! मी खाली गेले. वर बाल्कनीत माझा नवरा आणि बहीण तिकीट काढून स्टेडियमच्या एक्झिक्युटीव्ह बॉक्समधे बसल्याच्या थाटात खालची सर्कस बघायच्या तयारीत होते. जोडीला हसणं, खिजवणं चालूच होतं.
शेवटच्या क्षणी माघार घ्यावी का असा एक विचार मनाला चाटून गेला. पण आता तर तो शर्ट अगदी हाताच्या अंतरावर होता. मी डुकराकडे पाहीलं. स्वतःच्या नवीन वेशभूषेबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ होतं. शर्टही त्याच्या अंगावर अशा पध्दतीनं पडला होता की त्यासकट ते अगदी मारवाडी बायका चेहर्‍यावर घूंघट पुढेपर्यंत ओढून घेतात ना तस्सं दिसत होतं. चिखल-राडा चिवडणारं त्याचं नाक फक्त शर्टाच्या आडून दिसत होतं.
अजूनही मी पुढे जायला तशी बिचकतच होते. मुळातच मला लहानपणापासूनच चतुष्पाद प्राण्यांचा फोबिया आहे. एखादं लहानसं कुत्र्याचं किंवा मांजराचं गोजिरवाणं पिल्लू जरी पायात घुटमळलं तरी माझी भंबेरी उडते, अंगावर शहारे येतात. इथे तर शहारे येण्यासाठी भरपूर आणि रास्त कारणं होती. डुकराच्या शक्य तितक्या जवळ जाऊन शर्टाला हात घालणं हेच मुळात कठीण काम होतं. त्यातून त्याच क्षणी ते चित्कारून माझ्या अंगावर आलं असतं तर मग माझी पुरती तंतरली असती. मनात अजूनही ‘जाऊ की नको, जाऊ की नको’ असं तळ्यात-मळ्यात (किंवा उकीरड्यात-मळ्यात म्हणूया हवं तर!) चाललं होतं. लहान शाळकरी मुलं उदबत्ती घेऊन फटाका लावायला खाली वाकली की मोठी माणसं मागून कसं त्यांना दचकवायचा प्रयत्न करतात तसं मी जरा दोन पावलं पुढे टाकली, जरा हात उचलला की माझा नवरा वरून ओरडून मला दचकवत होता.
शेवटी एका क्षणी मी कान बंद करून घेतले. अर्जुन आणि पोपटाचा डोळा या जोडीप्रमाणेच आता ‘मी आणि डुकराचं हलणारं तोंड’ अशी अजून एक जोडी तयार झाली. नवर्‍याचाच काय, पुढ्यातल्या चिवडल्या जाणार्‍या चिखलाचाही आवाज आता मला ऐकू येईनासा झाला. फोबिया वगैरे सगळं मागे पडलं. मी दबकत दबकत तीनचार पावलं पुढे सरकले. आता माझं एक पाऊल जवळजवळ चिखलातच होतं. डावा हात लांब करून पुढे वाकून मी अंतराचा अंदाज घेतला. (आपसूक डावाच हात पुढे आला. सवय! दुसरं काय!) हात शर्टापर्यंत अगदी सहज पोचत होता.
दीर्घ श्वास घेऊन, धीर एकवटून मी पुढे झाले. दोन बोटांच्या चिमटीत पकडून शर्ट ओढता येणं आता शक्य होतं. मी चिमटीच्या तयारीत तर्जनी आणि मधलं बोट ताणलं. आता शर्ट पकडणार इतक्यात डुकरानं मान जोरात हलवली. त्याक्षणी मागे फिरून मी जी तीनताड लांब पळत गेले की ते पाहून वरच्या बाल्कनीतल्या दोन प्रेक्षकांनी हसून हसून लोळण घेतली.
एकदा तशी मान हलवून डुकराचा पुन्हा ‘स्टॅच्यू’ झाला. गंमत म्हणजे ती हालचाल डुकरानं माझ्या अथवा शर्टाच्या उपस्थितीची जाणीव होऊन केलीच नव्हती, नाकावर बसलेली माशी किंवा काहीतरी उडवण्यासाठी केली होती आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्यात तो शर्ट त्याच्या अंगावरून इंचभरही ढळला नव्हता.
ड्रेस-रिहर्सल झाल्यामुळे मी आता नव्या उमेदीनं पुन्हा एकदा पुढे सरसावले. या खेपेला माशी-बिशी कुठलाही व्यत्यय आला नाही आणि मी ठरवल्याप्रमाणे दोन बोटांच्या चिमटीत पकडून तो शर्ट ओढला. शर्ट बोटांत पकडताना डुकराच्या नाकाला माझ्या मधल्या बोटाचा निसटता स्पर्श झाला...

...इतक्या वर्षांनंतर तो गार, गिळगिळीत स्पर्श आठवून मी नव्यानं शहारले. त्यापायी हातातली जेवणाची ताटली जवळजवळ निसटलीच होती!
एकदा तो शर्ट हस्तगत केल्यावर नंतर जे काही झालं ते ‘उपसंहार’ या शीर्षकाखाली टाकता येईल. आणि हो... त्या प्रसंगात तडजोड मी एकटीनंच कशी काय केली? किळस या शब्दाची व्याख्या कायमची बदलून माझ्या नवर्‍यानंही तो डेटॉलमधे तीनचारदा धुतलेला शर्ट नंतर वापरलाच की... आणि अगदी प्रेमानं वापरला!
मी त्याच्यासाठी आणि त्यानं माझ्यासाठी प्रथमच ‘काहीतरी’ केलं आणि मी वर म्हटलं तसं आमचा संसार सुरळीत सुरू झाला. (तो सुरळीतपणा आता पंधरा वर्षांच्या मुलाच्या रुपात घरभर वावरत असतो!)

लग्नाचं जेवण उरकून, यजमानांचा निरोप घेऊन मी निघाले. कार्यालयातून बाहेर पडल्यावर नवर्‍याला फक्त ‘डुकराच्या अंगावर पडलेला शर्ट आठवला’ असा एस.एम.एस. केला. आता संध्याकाळी घरी परतल्यावर आम्ही तो प्रसंग आठवून पुन्हा एकदा मनमुराद हसणार होतो...
पण तत्पूर्वी, नवर्‍यासाठी एक नवा शर्ट मी विकत घेणार होते... त्याला सरप्राईझ म्हणून, ‘त्या’ प्रसंगाची नव्यानं आठवण म्हणून!

(समाप्त)
(या लेखात कुठल्याही प्रकारचं अतिरंजीत वर्णन केलेलं नाही याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. डुक्कर आणि शर्टाचा किस्सा जसा लिहीलाय अगदी तस्साच घडला होता.)

गुलमोहर: 

ललेsssssssssssssssss, Rofl माझ्या डोळ्यासमोर जशाचा तसा उभा राहिलाय तो प्रसंग..........
मी साक्षीदार आहे त्याची

Rofl Rofl

आता काय केलं ग त्या शर्टाचं???

सही! Proud

मंजे ssssssss Rofl काल मी आणि अजयपण जाम हसलो ते आठवून Rofl Rofl Rofl

आता काय केलं ग त्या शर्टाचं?? >>> लिहीलंय ना वर... फडकी, पोतेरी करून झाली त्याची Lol

लले लै भारी लिहिल आहेस... साडी आणि सुट्-बुट , तुका म्हणे त्यातल्या त्यात - ते विशिष्ट डुक्कर उकीरड्याच्या बर्‍यापैकी काठावरच बसलं होतं. ... Rofl Rofl

जबरी जबरी एकदम.

आत्या,
बाल्कनीचं तिकीट वसूल ना? >>>

हो रे, शँकी! Lol दोघं वरून असले खिजवत होते ना मला... त्यानं माझी जास्त चिडचीड होत होती Rofl

स्मिता Lol पटलं की नाही तुला पण... Lol

तो शर्ट नवर्‍याला नको होता खरं तर. पण ललीच्या तोंडी कोण लागणार म्हणून त्यानं हँगरला लावलेला शर्ट हळूच खाली टाकून दिला. पण लली कसली खमकी. तिनं डुकराशी फाईट करून तो परत मिळवला. आता नवर्‍याला काय करावं ते कळत नाहीये. प्लीज हेल्प हिम

दोघं वरून असले खिजवत होते ना मला.>>>> त्यात आणि नविन लग्न झालेलं असताना नवरा असा सालीबरोबर टीपी करतोय आणि मला मात्र डुक्कर-डुक्कर खेळावं लागतंय याचं वैषम्य जास्त होतं लली ला....... आता तिला नवर्‍यापेक्षा डुक्कर च बरं असं वाटतं तो भाग वेगळा! Lol

खाकोटीला मारुन वर घेऊन यायचस ना त्या पिल्लाला मग शर्टासकट >>> स्मि, अगं पिल्लू कुठलं? भलामोठा डुकरोबा होता तो... म्हणून तर माझी जाम फाटली होती Rofl

मंजे Rofl

... आणि मला मात्र डुक्कर-डुक्कर खेळावं लागतंय >>> Rofl Rofl Rofl Rofl Rofl

Rofl

लले, ताबडतोब वर वैधानिक इशारा दे.

मी एका निरुपयोगी, निरुद्देश मिटींगमध्ये असताना वाचलं आणि हसू दाबून दाबून माझे गाल आणि जबडा जबरी दुखायला लागलेत.

Pages