बिलंदर : भाग १

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 February, 2010 - 01:45

पहाटे साधारण साडेसहा-पावणेसातच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस कल्याण स्टेशनावर थांबली. उतरणार्‍या प्रवाशांची घाई सुरू झाली, तशी तिथे दरवाजातच पोटाशी पाय घेवून झोपलेल्या शिर्‍याला जाग आली. जाग आल्याक्षणी आधी त्याने पोटाशी घेतलेली पत्र्याची ट्रंक आणि गळ्यात अडकवलेली शबनम तपासली. दोन्ही वस्तु जागच्या जागी आहेत हे बघितल्यावर शांतपणे एक सुस्कारा सोडत उतरणार्‍यांपैकी एकाला त्याने विचारलं..

"कोणतं स्टेशन आहे हो भाऊ? कल्याण आलं का?"

"कल्याण स्टेशन कल्याणलाच येतं!" उत्तर देणारा बहुदा पुण्याचा असावा.

आलेलं स्टेशन कल्याण आहे हे कळालं तसा शिर्‍या धडपडत उठला. गळ्यातली शबनम सांभाळत एका हाताने त्याने आपली ट्रंक उचलली आणि फलाटावर उतरला.

काळा डगला समोर दिसला तशी शिर्‍या त्याला चुकवून फलाटावरच्या एका 'खानपान' गृहाकडे वळला. आत शिरल्या शिरल्या शिर्‍याने सगळ्या टेबलांकडे एक नजर टाकली. एका कोपर्‍यातल्या टेबलापाशी एकटाच बसलेला एक म्हातारा त्याला दिसला, त्याच्याकडे पाहीले आणि शिर्‍याच्या चेहर्‍यावर प्रसन्न हास्य आले.

"नमस्कार दादासाहेब, इकडे कुठे?"

शिर्‍याने लांबूनच हात दाखवत त्याला हाक मारली आणि प्रसन्न चेहर्‍याने लगबगीनेच त्याच्याकडे निघाला. टेबलापाशी पोचल्या पोचल्या काखेतली शबनम त्याने टेबलावर ठेवली, हातातली ट्रंक तिथेच बाजुला ठेवली आणि खाली वाकून म्हातार्‍याच्या पायावर डोके ठेवले. म्हातारा बावचळल्यासारखा त्याच्याकडे बघत होता.

आता आजुबाजुचे लोकही काहीशा कौतूकानेच त्याच्याकडे पाहायला लागले होते. चार चौघात अगदी वाकुन, पायावर डोके ठेवून नमस्कार हा प्रकार तसा सदैव घाईत असलेल्या, पंजाबी स्टाईलने नुसते कंबरेत वाकून "पैरी पौना" करणार्‍या बहुतांशी मुंबईकरांसाठी नवीनच होता.

"ओळखलं का नाही दादासाहेब ? अहो, मी शिर्‍या, राजाभाऊंचा धाकटा लेक. बाबा खुप सांगतात तुमच्याबद्दल. त्यांना विलक्षण आदर आहे तुमच्याबद्दल. अगदी त्यांच्या दिवसाची सुरूवात देवाबरोबर तुमच्या फोटोला नमस्कार करूनच होते."

शिर्‍याच्या चेहर्‍यावरून दादासाहेबांबद्दलचा आदर अगदी भरून वाहात होता. दादासाहेब काहीही न कळल्यामुळे आपला राजाभाऊ नावाचा कोण स्नेही आहे हे आठवण्याचा प्रयत्न करत होते.

"ए भाऊ, बघतो काय फडका मार. एक स्पेशल चहा आणि उपमा घेवून ये. दादासाहेब, तुम्ही काय घेणार. ये भावड्या, यांच्यासाठी पण एक उपमा आण रे." शिर्‍याने दादासाहेबांसमोर बसता बसता वेटरकडे आपली ऑर्डर नोंदवली.

"नाही, नाही मला फक्त चहा चालेल." दादा बोलते झाले.

"असं म्हणता, बरं ठिक आहे, ए भाऊ... दादांसाठी फक्त चहा आण."

चहा आणि उपमावर ताव मारता मारता शिर्‍या बोलत राहीला. ज्या व्यक्तीला फक्त फोटोत पाहीलय त्याला प्रत्यक्ष भेटल्यावर होणारा आनंद त्याच्या शब्दा शब्दातुन व्यक्त होत होता. दादासाहेबही आता खुलायला लागले होते. खाणे आणि चहा संपल्यावर शिर्‍याने बिल मागवले.

"छब्बीस रुपये...., वेटरने बिल आणून ठेवले.

"बस फक्त सव्वीस रुपये? स्वस्त आहे यार तुमची मुंबई."

आश्चर्य व्यक्त करीत शिर्‍याने विजारीच्या चोरखिशातून एक प्लास्टिकची छोटीशी पिशवी बाहेर काढली. ती उघडून त्यात घड्या करून ठेवलेली एक पाचशेची नोट बाहेर काढली. आणि हसतमुखाने वेटरच्या हातात दिली.

"ओ साब, सुबे सुबे पाचसो का चेंज नै होता है गल्लेमें, छुट्टा दे दो, होर लोग का खोटी मत करो."
वेटर आपल्या वळणावर आला तसे शिर्‍या वैतागला.

"साला इतना बडा हॉटेल चलाता है और ५०० का छुट्टा नही करके बोलता है"

काय तुमची ही मुंबई अशा नजरेने त्याने सहजच दादासाहेबांकडे पाहीले. आता त्यांनाही राहवले नाही.

"अरे राहू दे रे, सव्वीस रुपये तर बिल झालय, मी देतो ना. त्यात काय एवढं?"

शिर्‍याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

"नाय, नाय दादा, अहो मी चहा पाजलाय तुम्हाला, तुम्ही का म्हणून बिल देणार? ए भावड्या, बघ रे असतील गल्ल्यात सुट्टे." त्याने नोट जबरदस्ती वेटरच्या हातात कोंबली.

"अरे राजा, काही होत नाही त्याने", दादासाहेबांनी खिशातून पैसे काढले आणि वेटरला दिले. त्यावर उदारपणे शिर्‍याने खिशातून एक रुपया काढून टिप ठेवली. पाचशेची नोट परत घेतली. दोघेही "खानपान गृहाच्या" बाहेर पडले.

"आपण बाहेर कुठेतरी सुट्टे करुन घेवू ५०० रुपये आणि तुमचे पैसे देवून टाकतो." शिर्‍या खंतावलेल्या आवाजाने बोलला.

"राहू दे रे. सव्वीस रुपयांचं ते काय? राजाभाऊ कसे आहेत? त्यांना माझा नमस्कार सांग. आणि हो इथे, मुंबईत कुठे उतरणार आहेस? ये की एक दिवस घरी?" दादासाहेबांनी उदारपणे आमंत्रण दिले तसा शिर्‍या उदगारला.

"इथेच टिळक चौकात लेलेंच्या वाड्यात एक मित्र राहतो तिथे उतरणार आहे." सत्याच्या तोंडुन एकदा टिळकचौकातल्या सु (?) प्रसिद्ध लेल्यांच्या वाड्याबद्दल ऐकले होते ते कामी आले.

"अरे मग ये ना, आपलं घर सुभेदारवाड्यापाशीच आहे. अनंत कुलकर्णी कुठे राहतात म्हणुन विचारलं की समोरचा पानवालासुद्धा सांगेल."

"येइन दादा, जरुर येइन."

त्याक्षणीच शिर्‍याने मनात ठरवून टाकले होते की चुकूनही टिळकचौकाकडे फिरकायचे नाही. उगाच पुन्हा मोह व्हायचा.

आणि खरे सांगायचे तर त्या गोड म्हातार्‍याला पुन्हा एकदा उल्लू बनवायचे त्याच्या खरोखरच जिवावर आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील 'गारगोटी'तून नशिब कमावण्यासाठी मुंबईत आलेला शिर्‍या चांगला बी.एस्.सी. होता. सहा फुट उंची, मुळचा गोरा पान पण गावच्या मातीमुळे थोडासा रापलेला रंग, देखणा चेहरा आणि तालमीच्या लाल मातीत कसलेलं शरीर ... असा हा शिरीष भोसले कल्याणच्या खडकपाड्यात कुठेतरी राहणार्‍या एका मित्राच्या भरवशावर मुंबईला पैसे कमावण्यासाठी म्हणून आला होता. चांगले-वाईट, सत्य-असत्य, धर्म्-अधर्म असल्या खुळचट समजूतींपासुन खुप दूर होता. तरीही मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात सद सद विवेकबुद्धी जागी होती. मनोमन म्हातार्‍या आजोंबांना नमस्कार करून आणि त्यांची माफी मागून शिर्‍याने स्टेशनच्या बाहेर पाऊल टाकले. गाडी जावून तासभर होवून गेला होता, त्यामुळे काळे डगलेवालेही थोडे ढिले पडले होते. त्याचा फायदा घेवून बिनधास्तपणे शिर्‍या बाहेर पडला.

"मुंबई नगरी बडा बाका.... ! मावले, लेकराला पदरात घे."

एक क्षणभरच त्याच्या नजरेवर सौम्य भाव आले. दुसर्‍याच क्षणी जग विकायला निघालेल्या चार्ल्स शोभराजचा बिलंदरपणा त्याच्या देखण्या चेहर्‍यावर विलसायला लागला.

*****************************************************************
"थांबा जरा, उघडतोय दार! " आतुन आवाज आला तसा शिर्‍या थोडा मागे सरकला.

आतुन कडी काढल्याचा आवाज झाला. दारात सत्या नव्हता, दुसराच कुणीतरी एक काळासावळा मुलगा दारात उभा होता.

"अं... सतीश.....

शिर्‍याने काही बोलायचे आधीच त्याने विचारले....

"तुम्ही शिरीष ना, शिरीष भोसले."

"शिर्‍याचा वासलेला आ तसाच राहीला...!" तसा तो समोरचा तरूण हळुच हसला.

"असे चमत्कारिकपणे काय बघताय माझ्याकडे . तुमचा फोटो बघितला होता सत्याकडे. दिवसातून एकदा का होइना तुमची आठवण निघायचीच. अर्थात तो तुम्हा दोघांचा बारावी झाल्यावर काढलेला फोटो आहे असे सतीशने सांगितले होते. त्यात तुम्ही बर्‍यापैकी बारीक दिसत होता."

"मग बरोबर.... आज समोर एकदम हा वळु कोण उभा राहीला असेच वाटले असेल तुम्हाला." शिर्‍या मोठ्याने हसुन म्हणाला.

"नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला." त्या तरुणाने सावरुन घ्यायचा प्रयत्न केला. पण तोवर शिर्‍याचा पुढचा यॉर्कर आला होता.

"का तुमच्या मुंबईत वळूला मोर म्हणतात का? का अजुन काही....?"

तसा तो तरूणही हसायला लागला.

"या आत या, मी अवधूत, अवधूत कामत. सतीषचा रुम पार्टनर. सतीष नेहमी सांगत असतो तुमच्याबद्दल."

"कमाल आहे, मग एकदा ओळख झाल्यावर पुन्हा अहो-जाहो करणार्‍याचे मी दात पाडतो... मैत्रीखात्यात, हे नाय सांगितले तुला सत्याने."

अवधूत क्षणभर त्याच्याकडे बघतच राहीला.....आणि मग त्याने जोरजोरात हसायला सुरूवात केली.

"तुझ्या तर, तू बी आमच्याच कॅटेगरीतला आहेस तर...!"

तशी शिर्‍याने त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली.... "आत्ता कस्सं?"

शिर्‍याने त्याच्या पाठीत थाप मारली तशी अवधूत धडपडलाच.

"च्यायला पैलवानकी करतो का बे तू?" आणि शिर्‍या खदखदून हसायला लागला.

" असो, कुठायत धर्मराज?"

"धर्मराज?".... अवधूत विचारात पडला.

"सत्या बे...; भाऊ, आम्ही शाळेत असताना सत्याच्या बापाला यम म्हणायचो. तसाच रंग आणि सारखा त्याच्या म्हशींसोबत असायचा ना... म्हणून. आणि यमाचा पोरगा म्हणून सत्या धर्मराज!"

"च्यायला कुठल्याकुठे जातो बे तू...!"

"कुठेपण! आता हेच बघ ना, दोन्-तीन महिन्यापुर्वी सत्याचे पत्र आले होते. ये मुंबईला. रुम आहेच आपली. इथे नोकरी मिळून जाईल सहज. गेल्या महिन्यात आमचा बाप गेला फुकटातलं बाल्कनीचं तिकीट मिळवून ! त्याच्याशिवाय आपल्याला एक सत्या सोडला तर दुसरं कोणी नाही. उचलली धोकटी आणि गाठली मुंबई !"

डोळ्यात येवु पाहणारं पाणी निग्रहाने परतवुन लावत शिर्‍या बळेबळेच हसला तसा अवधुतही गंभीर झाला.

"सोड बे आता इथे आलोय पैसा कमावायला ! मुंबईकर्स सावध आय एम इन युअर सिटी ! बाय द वे सत्या गेला काय ऑफीसला? त्याचा मोबाईलही लागत नाहीये साला सकाळपासुन. त्याच्या ऑफीसचा नंबर आहे काय तुझ्याकडे. त्याला निदान कळवून टाकतो की शिरीष भोसले दस्तुरखुद्द डेरेदाखल झालेले आहेत. काय...?"

अवधुत त्याच्या तोंडाकडे पाहातच राहीला.

क्रमशः
विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

आजच सभासद झालेलो आहे . संपुर्ण १ ते ६ भाग वाचुन एकत्रित प्रतिक्रिया देत आहे .

विशाल दादा काय लिहिले आहेस रे ....लय भारी.... 1 नंबर तुला सरस्वती चा वरदहस्त लाभलाय खूप छान लिहितोस माझी नम्र विनंती तुझे साहित्य तू प्रकाशित कर खूप खूप वाचक लाभतील तुला

Pages