वेडा

Submitted by नितीनचंद्र on 14 February, 2010 - 11:29

तो मुळचा कुठला, त्याच खर नाव काय गावात कुणालाच माहित नव्ह्त. आमच्या शंभर उंबर्‍यांच्या गावात हे शोधायाची आवश्यकता कधी कुणाला वाटली नाही. कुणी विचारलही असेल त्याला, पण तो माणसांच्या दुनियेत रहाणारा नव्ह्ता. भुक लागली की कुणाच्याही दरवाज्यात येऊन म्हणे " माय खायला दे " मग याला नाहीतर त्याला ज्याला लक्षात येई तो खायला वाढी. देवळाच्या ओसरीवर रात्री स्वारी आडवी होई. दिवाळी शिमग्याला कोणी देईल ते कपडे अंगावर चढवी. कायम अर्धी चड्डी आणि साधारण कोपरी सारखा सदरा हा त्याचा वेष. इतक असुन रोज अंघोळ मात्र नेमाने करी. वेडा माणसांशी फारसा बोलत नसे. पण मुके प्राणी त्याच्या आवडीचा विषय. गाभण गाईकडे पाहुन तीला म्हणे " होशील बर मोकळी दोन दिसात" त्याचा हा अभ्यास त्याला जगण्याचे साधन पुरवी. प्राण्यांचे रोग तो पटकन ओळखी. यातुन गावच्या लोकांना त्याची मदत होई.

मी जेव्हा दहावी नतरच्या सुट्टीत दापोलीला आजोळी गेलो तेव्हा वेड्याची, त्याच्या खर्‍या नावाची, तो कुठुन आला याची विचारणा आजी आजोबा सगळ्यांकडे केली. जेव्हा फारसे कोणी सांगु शकले नाही तेव्हा मग वेड्यालाच विचारायचे ठरवले. एक दिवस दुपारी आमच्या दारात येउन " माय खायला दे "म्हणाल्यावर मी जिंकत असलेला लिगोरीचा डाव सोडुन आजीकडे धाव घेतली. " आजी लवकर त्या वेड्याला जेवायला दे" "हो तुला भारीच कणव त्याची. अजुन चट्णी व्हायची आहे. तु केळीचे पान आण." मी परसात केळीचे पान आणायला पळालो. जाताना वेड्याला थांबायची खुण केल्यावर तो हसला आणि दरवाज्यासमोर उकीडवा बसला. आजीने भरपुर भात, त्यावर आमटी घालुन दिला." फार जवळ जाऊ नकोस हो त्याच्या. बोलुन चालुन वेडाच तो" आजीने सावधान रहाण्याचा इशारा दिला. मी तो फारसा मानला नाही. वेड्याकडे मी केळीचे पान देताच वेडा ते घेऊन बाजुला बसला. बहुधा खुप भुकेला असावा. घास तोंडात घालणार तोच त्याला काजुच्या झाडावर कावळ्यांच्या हालचाली काही सांगुन गेल्या. तारसप्तकातल ते कावळ्यांच ओरडण्याचा अर्थ जाणुन वेडा उठला. त्याच्या डोळ्यांना आंब्याच्या पानाआड दडलेला बहिरी ससाणा दिसला. चिमण्या बेसावध होत्या. परसात शांतपणे दाणे टिपत होत्या. वेडा तिकडे धावला. चिमण्या घाबरुन उडाल्या. बघता बघता सुरक्षित जागी पोहोचल्या. त्यांना ना ससाणा दिसला ना वेड्याच्या क्रुतीतला अर्थ उमगला. जगाच्या द्रुष्टीने असलेला वेडा माञ स्वतःच्या क्रुतीवर खुश होता. ससाणा उडुन निघुन गेला. कावळ्यानी ऑल वेल चा इशारा दिल्यावरच मग वेड्याला पुन्हा भुकेची जाणीव झाली असावी.

मी वाट पहात होतो वेड्याचे जेवण संपण्याची. शेवटच्या घासाला मी विचारले भात आणु अजुन ? वेड्याला असल्या प्रश्नांना उत्तर देण्याची बहुधा सवय नसावी. त्याने माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत खुणेने पाणी मागितले. मी तांब्या आणला व त्याच्या ओंजळीत रीता केला. पाणी पिऊन वेडा उठला. आता तो निघणार तेव्हा मी त्याला विचारल " तुझ नाव काय ? तुझ गाव कोणतं ?" वेड्याला बहुदा काही समजल नसाव पण त्याच्या मेंदुने माझ्या विचारण्याची नोंद घेतली असावी. यानंतर वेडा माझ्याकडे बघुन ओळख दाखवु लागला.

आजोबांचे शेजारी रुईकरकाका मुळचे देशावरचे. दापोली तालुका कोर्टात नाझर. प्रत्येकाकडे साशंकतेने पहाण्याचा त्यांचा स्वभाव. शेती, बाग गुर्-ढोर काहीच नाही. नोकरीवर पोट त्यांच. त्यांनावाटे हा वेड्याच्या नादी लागुन त्याच्यासारखाच वेडा होणार. मला सारखे म्हणत " त्या वेड्याच्या मागे फिरुन काय करणार ?" मी म्हणायचो त्याला पशु पक्षांची भाषा येते. मला शिकायची आहे." मग रुईकरकाका माझ्या आजोबांकडे बोलायचे. आजोबा म्हणायचे उमगेल त्याला एक दिवस सगळं. सुट्टीला आलाय. पुण्याला कुठल्या बागा, आंब्याची झाडे अन वाडे ( गुरांचे गोठे ) सगळ्याच अपरुक त्याला. परत जायचा सुट्टी संपल्यावर. कशाला हिरमोड. मग रुईकरकाका माझ्याशी बोलायचे." कायरे काय बोलतो वेडा प्राण्यांशी ? " मी म्हणायचो "तस बोलत काहीच नाही पण समजत त्याला पक्षी-प्राणी आपापसात काय बोलतात ते."मग रुईकरकाकांना वकिली पॉईंट सुचायचा. ते म्हणायचे " नक्की काय ते सांग. त्याला पक्षी-प्राणी यांच्याशी बोलता येत की फक्त समजतं ? " जर त्याला नुसतच समजत असेल तर तो तुला काय सांगणार ? "अशी माणसं मुळात जगण्यास लायक नसतात. त्यांच्या खुळेपणात काहीच उपयोगी नसत." त्याच्या नादी लागुन तु खुळा होशील मात्र. मी काही जुजबी गोष्टी त्यांना सांगायचो पण ते वकिलीस्टाईल ने खोटे किंवा योगायोग ठरवुन मोकळे व्हायचे. मला नेमकेपणाने वेडा कसा हुशार वा वेगळा आहे हे पटवता येत नसे. पुढे मी रुईकरकाकांना टाळुन वेड्याबरोबर फिरु लागलो. मग वेडाही आमच्याकडे दिवसाचा जास्त काळ घालवु लागला.

आमच्या आजोबांकडे तीन गाई, प्रत्येकीच एक वासरु,दोन म्ह्शी व दोन बैल होते. गाईच्या तीन वासरात एक बैल होता. आता चांगला वर्षाचा झाल्याने व तिसरा बैल म्हणुन उपयोगाचा नसल्याने आजोबांनी त्याला विकायचे ठरवले. गावात अपेक्षित किंमत मिळेना म्हणुन बाहेरगावाच्या बाजारात विकण्याचे ठरवले. आजोबांनी गड्याला सांगुन बैल गाडीला जुंपले. बैलगाडी चालवायला गडी बसला. आजोबा कोट टोपी घालुन बैलगाडीत बसले. विकायला न्यावयाचा खोंड बैलगाडीला मागे बांधला.मी ,रुईकरकाका व वेडा आंगणात उभे राहुन हे सर्व पहात होतो. रुईकरकाकांना हुक्की आली ते म्हणाले "विचार त्या वेड्याला, विकला जाईल का खोंड ?" मला विचारायची गरज पड्ली नाही. वेडा हे सर्व पाहुन नकारार्थी मान हलवता झाला.
'बघा बघा कसा मस्तवाल आहे. ज्याच अन्न खातो त्याच चांगल चिंतत नाही हा वेडा"रुईकरकाका ओरड्ले. "नाझर साहेब माझी खोंड विकायची मुळीच तयारी नाही पण बैलगाडीचे दोन बैल असताना तिसरा काय कामाचा ? आम्हाला शेती फार नाही. वैरण विकत घ्यावी लागते." आजोबा व्यथित झाले होते. बैलगाडी चालु लागली. आजीने डोळ्याला पदर लावला. दिवस फारच वाईट गेला. पण घड्ल वेगळच. खोंड विकला गेलाच नाही. हे एकदा नाही तर तीन वेळा घडल. तीनही वेळा मी,रुईकरकाका आणि वेडा याला साक्षी होतो. दरवेळेला रुईकरकाका हाच प्रश्न विचारीत व वेडा नाही म्हणे.

आजोबा विचारात पडले. खोंड विकण त्यांना योग्य वाट्त नव्ह्त. आजी आजोबा या प्राण्यांवर आपल्या मुलांसारखे प्रेम करीत. खोंड विकण एक व्यवहारीक बाजु होती. पण नियतीच्या मनात काय आहे हा प्रश्न त्यांना पडला होता. शेवटी त्यांनी अजुन एक प्रयत्न करायचा ठरवला. या वेळेस रुईकरकाका गप्प राहीले पण वेडा मात्र रडु लागला. पुढे होऊन त्याने खोंडाला कुरवाळले. आपल्या हाताने चारा खाउ घातला. कोणालाही त्या क्रुतीचे आश्चर्य वाटले नाही. वेडाच तो करु दे काय करतो ते या भावनेने सर्व गप्प होते. संध्याकाळी गाडीला जोडलेल्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज आला. मी खेळ सोडुन गाडीकडे पळालो. पाह्तो तो काय आज गाडी खोंडा शिवाय परत आलेली. आजी दरवज्यात आली. मला वाटले आजोबांनी खोंड तसाच सोड्ला की काय. "गेलाहो शेवटी विकला. अपेक्षेपेक्षा पैसे ही जास्तच आले." आजोबा म्हणाले.

दुसर्‍या दिवशी मी वेड्याला म्हणालो "तुला काल कळले काय रे खोंड आज परत येणार नाही ते ? त्याने होकारार्थी मान हलवली. मी म्हणालो ते कसे ? वेडा म्हणाला "खोंडाने सकाळपासुन चार्‍याला तोंड लावल नाही. बैलगाडी मागे पाय ओढीत चालला होता." मग मला उमगले पहिल्या तीन वेळेस खोंड उड्या मारत मारत बाजारात गेला जणुकाही फिरायला गेला.यावेळेस त्याची हालचाल तो दु:खी असल्याच दाखवत होती. हे समजायला फक्त वेडाच समर्थ होता.

गुलमोहर: 

छान!

छान

मस्त Happy

छान Happy

मंजुडी,
प्रतिसादाबाबत धन्यवाद ! हा ञ नाही का? मला त्र लिहीताना ञ सोपा वाटतो. सुचना चांगली आहे. आमलात आणेन.

वेड्याचे खोंडप्रेम वाचुन टिंग्याची आठवण झाली. छान लेखनशैली नितीन. लेखाची लांबी हळुहळु वाढवा. पुलेशु.

तुम्हाला लिहायला 'ञ' सोपा वाटला तरी त्याचा उच्चार वेगळा आहे त्यामुळे 'त्र' च्या ऐवजी 'ञ' लिहीणं पूर्णपणे चूकीचं आहे.

मंजुडी,

जेव्हा मराठी बाराखडी शिकलो तेव्हा तारे जमिनीवर होते. काल पुन्हा शिकलो. आई व मावशीला एकच प्रश्न विचारला "ञ" मुळाक्षर असलेला एक शब्द सांग. त्यांनी सांगीतले. हे मुळाक्षर सहसा मराठीत वापरले जात नाही. मला संत, सन्त, याप्रमाणे त्र व ञ वापरता येईल असे वाट्ले. चुक ते चुकच. सोईने सर्व चुका दुरुस्त करतो. नवीन ज्ञान दिल्याबद्द्ल धन्यवाद.

प्रचंड मस्त गोष्टय. तू तर लेका लेखकूच झालास की. उद्या नावारूपाला आलास की आमची ओळख ठेव बाबा!

आणि खरंच, अजून असा खूप खजाना असणार तुझ्याकडे. येऊदे बाहेर पोतडीतून.

हो वेड्याबाबत अजून ऐकायला मलाही आवडेल. पण माझ्यातला किरकिरा जंतू म्हणाला की, कुणाच्या तरी दर्दभर्‍या कहाण्या ऐकायला का आवडत असावं माणसाला? काय प्रकारचं समाधान असावं हे?

आणि अजून एक - (देवा! मूळ सादापेक्षा प्रतिसादच मोठा होतोय की काय?!)
ञ चा उच्चार पंच या शब्दामध्ये प आणि च यांच्या मधल्या अनुनासिक अक्षरासारखा आहे, तर त्र हे अक्षर त्‌ + र्‌ यांच्यापासून बनलंय. त्यामुळे ञ आणि त्र हे संपूर्ण भिन्नच आहेत.
जरा उजळणी करुया -
मराठीमध्ये क, च, ट, त, प या वर्णावली आहेत. (serials)
क - क, ख, ग, घ, ङ (shift+1 डावीकडची की, आणि नंतर shift सोडून G, असं केल्यावर ङ येतो)
च - च, छ, ज, झ, ञ (shift+1 डावीकडची की, आणि नंतर shift सोडून J, असं केल्यावर ञ येतो)
ट - ट, ठ, ड, ढ, ण
त - त, थ, द, ध, न
प - प, फ, ब, भ, म
या सगळ्या वर्णावलींचं शेवटचं अक्षर अनुनासिक आहे. च या वर्णावलीचं शेवटचं अक्षर ञ आहे. हे अक्षर या वर्णावलीच्या कोणत्याही अक्षराच्या अलिकडे अनुस्वार आल्यावर वापरतात, जसं की,
पंकज - पङ्‌कज, गंगा - गङ्‌गा, वाङ्‌मय (वाक्‌ + मय),
पंच - पञ्च, चंची - चञ्ची,
थंड - थंण्ड, घंटा - घण्टा
कुंती - कुन्ती,
अंबु - अम्बु,
पंच हा शब्द पञ्च असा पूर्वी लिहित असत. शासनाने सोपे व्याकरण आणल्यापासून हा प्रकार बंद झाला. पण श्लोकांमध्ये अजूनही सापडतं हे अक्षर.
पंच हा शब्द उच्चारताना प आणि च यांच्यामधला अनुनासिक उच्चार म्हणजे ञ. या अक्षरापासून सुरु होणारा शब्द नाही. (नसावा)
आम्ही लहानपणी भेंड्या खेळताना एखाद्या गाण्याच्या शेवटी ण किंवा न आल्यावर हे गाणंम्हणत असू -
ण णा णि णी चा परिपाठ केला, मागील सारे विसरोनी गेला, अशा मुलाला काय करावे, मागील विहिरीत ढकलोनी द्यावे Happy

नितीन खुप छान्! असामान्यत्व एखाद्यात असतं म्हणजे ते वेडच ना एकप्रकारचं.. ते दिसतय त्या वेड्यात म्हणुन तो वेडा अन आपल्याला ते कळत नाहि म्हणुन इतर सारे शहाणे.. शेवट मनाला भिडला.. असच लिहि..

Pages