'पाऊस मनातला!'

Submitted by अनामिका on 6 February, 2010 - 06:11

( ही मी लिहलेली कविता नसून माझी मैत्रीण रसिका वैद्य हिने लिहलेली आहे. )

सुरु झाला पाऊस अचानक
कळालच नाही 'त्याला' काही
कुठे गुंगलो होतो?
कुठे गुंतलो होतो?
कुठे हरवलो होतो?
इतक्या वेळ आपण
विजेची ती सोनसळा कडाडली अचानक
मग आला तो भानावर
कळायलाच मार्ग नाही काही
खरच पाऊस पडतोय?
की रडतयं आभाळही विरहाच्या दु:खात
सारखाच असतो का वेळ विरहाचा?
की विरह होतो अशाच वेळी?
ती वेळही अशीच
तिन्ही सांजेची पावसाची
कडाडणार्‍या विजेच्या सोनसळांची
आणि हं ! फक्त एकच फरक होता
नाही तोही नसावा बहुधा
कारण तेव्हाही 'ती' नव्हती
आणि आता, आताही ती नाही
तो जगतोयं आता निरर्थक,
त्याचं आयुष्य मेलेलं
सवय आहे या सर्वांची आता
त्याच्या जगात.
दररोज पडतो असा आसवांचा पाऊस
दररोज दाटतं असं भावनांचं आभाळ
दररोज कडाडतात अशा
'तिच्या' आठवणींच्या विजा पण,
सवय आहे आता या सर्वांचीच
कुठलाच ऋतु वेगळा नाही
सर्व ऋतु पावसाळे
अरे! झाला पाऊस बंद
बाहेरचा
पण कधीच होणार नाही
बंद पाऊस मनातला !

- रसिका वैद्य.

गुलमोहर: