केल्याने देवदर्शन:-केदारनाथ-तुंगनाथ

Submitted by आऊटडोअर्स on 1 February, 2010 - 01:49

एप्रिल उजाडताच मनात या वर्षी हिमालयात कुठे जाता येईल याचा विचार यायला सुरुवात झाली. यावेळेस कुमाऊ गढवालचा एखादा ट्रेक करावा असं खूप मनात होतं. पण त्याला किमान १५ दिवस तरी लागणार होतेच. मला तसा सुटटीचा काहीच प्रश्न नव्हता, पण बाकीच्या सर्व मंडळींनी १५ दिवस म्हटल्यावर तिथल्या तिथेच तो बेत हाणून पाडला. मग काय परत गढवाल मधलेच ट्रेक शोधायला सुरूवात केली. मागच्या २-३ वर्षींच्या ट्रेकवारीत आम्ही लगे हाथो देवदर्शन ही उरकल्यामुळे उत्तरांचल मधल्या छोट्या चारधाममधली २ धामं करून झाली होती. या चारधाम मध्ये केदारनाथ हे धाम सगळ्यात उंचावर व चाल ही खूप असल्याने या वर्षी केदारनाथ व त्याच्या जोडीला वासुकीताल करायचं असं सर्वानुमते ठरलं. झालं ठरल्याबरोबर रिझर्वेशन्स वगैरे केली. यावेळेस आम्ही खूप विचार करून श्रावण सुरु व्हायच्या आधीच ट्रेक करून यायचं ठरवलं होतं. कारण श्रावणात हरिद्वारला कावड यात्रा सुरु झाली की तुफान गर्दी असते. मागच्या दोन वर्षांचा अनुभव होता. त्या गर्दीत जीव अगदी नकोसा झाला होता.

नेहमीप्रमाणेच राजधानीने दिल्लीला पोचलो. सालाबादप्रमाणे स्टेशनवर शीतल आला होताच. मागच्या वर्षीचा देहरादून पर्यंतचा बस प्रवास झकास झाला होता, तो अनुभव गाठीशी बांधुन सामानासकट आय.एस.बी.टी. ला रवाना झालो. बर्‍याच वेळाच्या प्रतिक्षेनंतर हरिद्वारला जाणारी एसी बस आली. आम्ही चपळाई करून पुढच्या सीट्स पटकावल्या. सगळे पासिंजर आल्यावर एकदाची बस हलली. थोडा प्रवास चांगला झाला, आणि बसमधल्या एसी ने दगा दिला. खिडक्याही उघडता येत नव्हत्या. ड्रायव्हरने मधले दार उघडले. नशीबाने आम्ही पुढे होतो त्यामुळे थोडासा वारा तरी येत होता. पण तरीही दुपारची वेळ होती आणि त्यात दिल्लीतल्या ट्रॅफीकची भर. एसी बंद होऊन बराच वेळ झाला तरी ड्रायव्हर रिपेअरींगसाठी बस थांबवत नाही म्हटल्यावर इतका वेळ मागच्या प्रवाशांनी दाखवलेला संयम सुटला व त्यांनी आरडाओरडा सुरु केला व ड्रायव्हरला लगेच बस थांबवायला सांगितली. शेवटी हो नाही करता करता ड्रायव्हरने खतौली बस डेपोला बस नेली. बराच वेळाने एसी दुरूस्त झाला व थंडगार प्रवाशांबरोबर बस पुढे निघाली. थोड्याच अंतरावरील हॉटेल चितल ग्रॅन्ड मध्ये आम्ही जेवायला थांबलो.

जेवायला थांबलो असताना तिथलीच एक बाई म्हणाली, की कावड यात्रेसाठी उद्यापासून रस्ते बंद करणार आहेत. कावड यात्रा सुरू होत होती. उत्तरेला आपल्या आधी एक महिना श्रावण सुरु होतो ह्या माहितीने आमच्या ज्ञानात अमूल्य भर पडली होती. आम्ही जे चुकविण्याचा प्रयत्न केला होता, ते चुकलं नव्हतंच शेवटी. त्याचा प्रत्यय आम्हांला थोड्या वेळात आलाच. ऋषीकेशच्या ही बरंच आधीपासून म्हणजे मुझफ्फरनगर, रुडकी पासूनच कावडवाल्यांचे जथ्थे दिसायला सुरुवात झाली होती. आणि त्यांच्यासाठी बरेच रस्ते बंद केले होते/दुसरीकडून वळवले होते. आमच्या बसचा ड्रायव्हर पण इकडून तिकडून बस काढण्याचा बराच प्रयत्न करत होता. पण छे, सगळं व्यर्थ. या वेळेपर्यंत आम्हांला कळून चुकलं होतं, की ६ वाजेपर्यंत हरिद्वारला पोचणं काही शक्य नाही. पण आम्ही आशा सोडली नव्हती. सहा नाही तर सात वाजेपर्यंत पोचू नां, चाललं असतं. कारण हॉटेलची शोधाशोध तर करायची नव्हती, ते तर ठरलेलंच होतं. पण छे, सहा चे सात, सात चे आठ, आठ चे नऊ झाले तर हरिद्वार यायची चिन्ह नव्हती. इतक्या वेळेच्या मनस्तापाने तर माझं डोकं चांगलंच ठणकायला लागलं होतं. शेवटी एकदाचे ११ वाजता आम्ही हरिद्वारच्या स्टॅंडवर पोचलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. आता नेहमीच्या हॉटेलवर जाण्यात काहीच मतलब नव्हता. शेवटी त्यातल्या त्यात बस स्टॅन्डजवळ असलेल्या गढवाल मंडलच्याच राही मोटेल मध्ये आजची रात्र काढायची असं ठरलं. हॉटेल मध्ये सामान टाकतानाच त्यांना जेवण देण्याची विनंती केली. नशिबाने ते तयार झाले. उद्या परत पूर्ण दिवसाचा बसचा प्रवास करायचा होता. मला खरं आता उद्याचा दिवस आराम करून परवा निघावं असं वाटत होतं. पण इथे खालीच दिवस फुकट घालविण्यापेक्षा प्रवास सुरू करणंच हिताचं होतं. शेवटी जेवण आवरून झोपायला १२.३०‍-१२.४५ वाजलेच.

सकाळी लवकर उठून सगळं आवरलं व सामान घेऊन निघालो. बस पकडण्याआधी जरा चहा वगैरे घेऊन पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. इथल्या एकंदर प्रवासाची माहिती झाल्यामुळे बस छान असेल अशा वायफळ अपेक्षा नव्हत्याच. आपला प्रवास सुखरूप व्हावा हीच इच्छा होती. इथून आम्हांला गौरीकुंड या गावात जायचे होते. हरिद्वार-गौरीकुंड अंतर २३० कि.मी होतं. मधे एकदा रुद्रप्रयागला जेवणाच्या वेळात बस थांबली. पण आजूबाजूला काही चांगलं जेवायला मिळेल असं दिसत नव्हतं, त्यामुळे मग एखादं केळं खाऊन वेळ मारून नेली. त्यानंतर संध्याकाळी गुप्तकाशी गावात चहाला बस थांबली. इथे पाऊस सुरू झाला होता. गुप्तकाशी-गौरीकुंड अंतर फार नव्हतं. गौरीकुंडला उतरलो ते पाऊस होताच. तसंच गढवाल निगमचं रेस्ट हाऊस कुठे दिसतंय कां ते शोधत निघालो. गौरीकुंड हे गाव फारच छोटं असून नदीच्या एका काठावर वसलं आहे. चारधामची यात्रा सुरु होते तेवढ्यापुरतीच लोकं या गावात राहात असावीत. पुराणकाळातील कथांप्रमाणे याच ठिकाणी देवी पार्वतीने भगवान शंकराचे मन जिंकण्यासाठी बराच काळ तपश्चर्या केली होती. तिचे इथे मंदिर ही आहे. गढवालचं रेस्ट हाऊस मिळण्याआधी आम्हांला एक हॉटेल दिसलं. दर ही खूप वाजवी होता आणि मुख्य म्हणजे स्वच्छही होतं. म्हणून मग तिथेच राहायचं ठरवलं. इथे पाऊसही पडून गेला होता व बर्‍यापैकी उंचीवर (जवळपास ६५०० फूट) होतो, त्यामुळे चांगलंच गार होतं. पोचल्यावर सगळ्यांनी घरी फोन केले. मग मस्त गरम पाण्याने आंघोळ झाल्यावर कपडे वगैरे बदलून जेवणाच्या शोधात बाहेर पडलो. बरीच शोधाशोध केल्यावर एक छोटं हॉटेल दिसलं. जेवण छान होतं. जेवल्यावर जरा गावात आजूबाजूला चक्कर टाकली व हॉटेलवर परतलो. उद्याचा दिवस आमच्या परिक्षेचा होता. गौरीकुंड हे केदारनाथ च्या पायथ्याचं गाव आहे. इथून केदारनाथ १४ कि.मी. आहे. पण हा रस्ता पूर्ण चढणीचा आहे.

दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे उठलो व आवरून ७.३० वाजता निघालो. थोडं पुढे गेल्यावर आमच्या सॅक्सकरिता २ घोडे (खच्चर) केले. आता आमच्या पाठीला फक्त पिट्टू (छोटी सॅक) होती. नशिबाने आकाश अगदी निरभ्र होतं.

झकास सुरुवात
Kedarnath-start.jpg

सुरुवातीपासूनच पूर्ण चढ होता. आम्हांला ही अजिबात घाई नव्हती. आम्ही हळूहळू आमच्या चालीने चाललो होतो. बर्‍यापैकी वेळेत निघालो होतो त्यामुळे घोडे व डंडी-कंडी वाल्यांची कटकट (?) नव्हती. हो खरंच, कारण त्यांचा आपल्याला धक्का लागू नये म्हणून आपल्यालाच सांभाळून चालावं लागतं (हे घोड्यांच्या बाबतीत). सकाळी फ्रेश होतो त्यामुळे तीन-साडेतीन तासातच ७ कि.मी अंतरावरील रामबारा इथे पोहोचलो.

चले चलो
On our way to kedarnath.jpg

इथेही गढवाल निगमचं छोटं रेस्ट हाऊस आहे. इथे जरा चहा-बिस्कीट्स वगैरे खाल्लं. गौरीकुंड ते रामबारा हे अंतर चांगल्या चालीने पार केलं त्यामुळे आम्हांला हुरूप आला होता. याच चालीने गेलो तर आपण २-३ वाजेपर्यंत केदारनाथला पोचू अशी आम्हांला आशा वाटायला लागली. गौरीकुंड ते केदारनाथ हा पूर्ण रस्ता मंदाकिनी नदीच्या कडेकडेने जातो. रामबाराहून निघाल्यावर थोड्याच वेळात हवामान एकदम पालटले व पावसाला सुरुवात झाली. इथपर्यंत येईतो आमचीही चाल चांगलीच मंदावली होती. पायांचीही कुरकुर सुरू झाली होती. त्यात पाऊस सुरू झाल्यावर हातपाय चांगलेच गारठले. शेवटी रडत-खडत कसेबसे एकदाचे आम्ही ४.३० च्या आसपास केदारनाथला पोहोचलो. आता खरंतर पायात एकही पाऊल पुढे टाकायचे त्राण नव्हते. म्हणून तिथे जवळच असलेल्या महाराष्ट्र मंडळाच्या हॉटेल/गेस्ट हाऊस वर सामान टाकले. त्यांनी पोचल्या पोचल्या आम्हांला गरम पाणी प्यायला दिले. इथे राहाण्याची व्यवस्था नि:शुल्क आहे. पण खरंतर आम्हांला रुम्स अजिबात आवडल्या नाहीत. रुममधलं कार्पेट पायाला ओलं लागत होतं. आणि रुमही एवढी छोटी होती की वावरायला तर सोडाच पण सामान ठेवायलाही जागा नव्हती. सामान तसेच ठेऊन आम्ही जेवायला परत खाली आलो. त्यांच्या हॉटेलच्या बाहेरच त्यांनी जेवायची सोय ही केलेली आहे. अर्थात त्याचे पैसे द्यावे लागतात. जेवण मात्र चांगले होते. माझ्या तर पायात इतके गोळे आले होते की उतरताना दोन्ही रेलिंग्जना पकडून उतरावे लागत होते. त्यात आम्हांला दिलेली रुम दुसर्‍या मजल्यावर होती. जेवल्यावर थोड्या वेळाने आम्ही जरा फ्रेश होऊन देवळाकडे निघालो. सकाळी आंघोळ करून निघालो होतो त्यामुळे दर्शन घेऊ शकत होतो. ह्या वेळेस देवळात गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन खूप छान झाले. इतकं श्रम घेतल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. देवळातून निघालो ते गढवाल निगमचं रेस्ट हाऊस शोधायला. थोडी शोधाशोध केल्यावर सापडलं. हे रेस्ट हाऊस खूपच प्रशस्त व ऐसपैस होतं. आम्ही पाच जण होतो. मग सरळ ८ जणांची मोठी डॉरमेटरीच बुक केली. व त्याला उद्या सकाळी सामान घेऊन येतो असं सांगितलं. रेस्ट हाऊस पूर्ण रिकामंच दिसत होतं. तसंही इथे चारधाम करणारे यात्रेकरूच येतात व त्यातही राहणारी लोकं कमीच. देवळाच्या आसपासच्याच एका हॉटेलमध्ये खाल्लं व परत महाराष्ट्र मंडळला हॉटेलवर परतलो.

सकाळी काकांनी लवकरच दरवाजा अक्षरश: बडवला व लगेच बाहेर यायला सांगितलं. आम्ही तसंच ब्रशही न करता कॅमेरा घेऊन पळालो. काल पाऊस पडल्याचा मागमूसही दिसत नव्हता. समोर सगळी हिमाच्छादित शिखरं दिसत होती. पटापट फोटो काढले व आवराआवरीला लागलो. महाराष्ट्र मंडळाच्या गेस्ट हाऊसवरच आंघोळी उरकल्या व गेस्ट हाऊसचा निरोप घेऊन गढवाल निगमच्या रेस्ट हाऊसकडे रवाना झालो. रेस्ट हाऊसमधल्या डॉरमेटरी मध्ये सामान टाकलं व परत केदारनाथ देवळाकडे गेलो. आज देवळात चांगलीच गर्दी होती. आम्हीही अभिषेक करण्याकरिता त्या गर्दीत सामील झालो. मनाजोगं दर्शन झाल्यावर बाहेर आलो.

सकाळी सकाळी हिमाच्छादित शिखरांचं पहिलं दर्शन
Kedarnath-view3.jpgKedarnath-view from maharashtra mandal.jpg

केदारनाथाचे मंदिर
Kedarnath temple.jpg

'केदारनाथ' हे १२ ज्योतिर्लिंगामधील एक आहे. ह्याची उंची ३५८४ मीटर (जवळपास ११८०० फूट) आहे. केदारनाथाचे हे मंदिर आदि शंकराचार्यांनी इ.स. ८ पूर्वी बांधलेलं आहे. या ठिकाणी त्यांची समाधीही आहे. पुराणकथांनुसार पांडव कुरूक्षेत्राच्या लढाईतील विजयानंतर आपल्या बांधवाच्या (कौरव) हत्येच्या पापक्षालनासाठी इथेच आले व त्यांनी भगवान शंकराचे आशिर्वाद मागितले. भगवान शंकरांनी त्यांना टाळण्याचे अनेक प्रयत्न केले व त्याकरिता त्यांनी गुप्तकाशी येथे आश्रय घेतला. तिथेही त्यांचा पाठलाग झाल्यावर त्यांनी जमिनीत उडी घेतली पण रेड्याच्या रुपातील त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग चार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. केदारनाथ येथे पाठीवरचं वशिंड, तुंगनाथ या ठिकाणी त्यांचे बाहू, रुद्रनाथ येथे डोकं, मदमहेश्वर येथे नाभी आणि पोट व कल्पेश्वर येथे जटा. त्यामुळे या पाचही ठिकाणांना 'पंचकेदार' म्हणतात. मंदिराच्या बाहेरच भगवान शंकरांचा अंगरक्षक नंदी आहे. त्याचं दर्शन घेताना सगळी लोकं त्यावर तुपाचा अभिषेक करतात.

केदारनाथ नंतर आम्ही वासुकीताल येथे जायचं ठरवलं होतं. वासुकीताल केदारनाथ पासून पुढे ८ कि.मी वर आहे. म्हणून तिथल्या स्थानिक लोकांकडे गाईड वगैरे मिळेल कां याची चौकशी केली असता सगळ्यांनी सांगितलं की हवामान चांगलं नाहीये त्यामुळे तुम्ही शक्यतोवर वासुकीतालला जाऊ नका. असं सांगितल्यावर आता काय करायचं हा आमच्यापुढे प्रश्नच होता. पण आमच्याबरोबरच्या काकांचा इथे फिरण्याचा अनुभव कामी आला. त्यांनी लगेच आम्हांला सुचवलं की ठीक आहे, आपल्याला वासुकीतालला जाता येणार नसेल तर आपण पंचकेदार मधल्या तुंगनाथला जाऊया. ते ठिकाणही बघण्यासारखं आहे व ह्या निमित्ताने आमचं पंचकेदार मधलं दुसरं केदारही झालं असतं. आमची काहीच हरकत नव्हती. मग मुख्य केदारनाथाचं दर्शन घेऊन झाल्यावर तिथून जवळच असलेल्या भैरवनाथ मंदिराचे दर्शन घ्यायला गेलो. ह्या देवळात जाण्यासाठी थोडं चढून जावं लागतं. पण तिथून पूर्ण केदारनाथ मंदिराच्या आसपासचा परिसर छान नजरेस पडत होता. तिथून परत रेस्ट हाऊसवर आलो व उरलेला दिवस फक्त पत्ते खेळणे, गाणी म्हणणे ह्यात घालविला. उद्या आम्ही चोरबारी ताल (हल्लीचं नाव गांधी सरोवर) ला जाणार होतो.

भैरवनाथ मंदिरातून दिसणारे केदारनाथ मंदिर
Kedarnath-view2.jpg

सकाळी आवरून ८ च्या सुमारास चोरबारी ताल कडे कूच केले. इथे जायलाही थोडं चढायचं होतं. पण २ दिवस आराम करून पायही दुखायचे थांबले होते. जाताना रस्त्यात विविध प्रकारची फुलं पसरलेली होती. निसर्गाचा आस्वाद घेत घेत आरामात चोरबारी तालला पोचलो. हा ताल खूपच सुंदर होता. पाणी एकदम नितळ व सगळीकडे शांतता होती. व मुख्य म्हणजे शांतता भंग करायला कोणीही आसपास नव्हतं. तळ्याच्या पलिकडील बाजूस थोडा बर्फ दिसत होता. आमच्यातली उत्साही मंडळी तिथे जाऊन बर्फात खेळून आली. तास-दीड तास निवांत बसलो. बरोबर नेलेले लाडू-चिवडा खाल्लं.

चोरबारी तालकडे जाताना
Kedarnath-on our way to Chorbari Taal.jpg

वरून होणारं केदारनाथ गावाचं दर्शन
Kedarnath-view.jpg

हा बर्फाळ पाण्याचा ओढा पार करायचा होता
Kedarnath-gng to Chorbari taal.jpg

वाटेत फुललेली फुलं
Kedarnath-Flower2.jpgKedarnath-Flower1.jpgKedarnath-Flower3.jpgKedarnath-Flower4.jpg

साधारणपणे या काळात या ठिकाणी (उत्तरांचल) खूप एकसारखी फुलं पाहायला मिळतात.

चोरबारी ताल
Kedarnath-Gandhi sarovar.jpg

तेवढ्यात एक साधुमहाराज तिथे आले. त्यांच्या चेहर्‍यावर विलक्षण तेज होतं. ते तलावात आंघोळीसाठी आले होते. त्यांच्याशी थोडं बोलणं झाल्यावर आम्ही तिथून निघालो. खाली आल्यावर देवळाच्या आसपासच्या हॉटेलमध्येच जेवलो व रेस्ट हाऊसवर परतलो. आज आमचा इथला शेवटचा दिवस होता. संध्याकाळी सगळं सामान आवरलं व परत एकदा देवळात आरतीसाठी गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे आटोपून निघालो. उतरताना मात्र आम्ही दोघीजणींनी घोड्यांवरून उतरायचं ठरवलं होतं. कारण तुंगनाथला जायचं तर आमच्याकडे जास्त दिवस नव्हते, त्यामुळे गौरीकुंडला लवकरात लवकर पोहोचून पुढचा प्रवास सुरु करणं गरजेचं होतं. २ घोड्यांवर आम्ही दोघी व २-२ सॅक्स टाकल्या व केदारनाथाचा जड अंत:करणाने निरोप घेतला. घोडे होते त्यामुळे २.३०-३ तासांतच गौरीकुंडला पोचलो. आमच्या बरोबरचे तिघेजण तर पायी उतरून आमच्याही आधी पोचले होते. गौरीकुंडला खरंतर आम्हांला खरेदी करायची होती पण उखीमठला जाणारी बस उभीच होती. व ती सोडून देणं आम्हांला परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे इच्छेला आवर घालून लगेचच बसमध्ये विराजमान झालो. इथून आम्हांला उखीमठहून दुसरी बस पकडून चोपता या गावी पोचायचं होतं. उखीमठ थोड्या अंतरावर राहिले असताना बघितलं तर लॅंडस्लाईडमुळे सगळी वाहतूक ठप्प झाली होती. समोरून येणार्‍या तसेच पुढच्या-मागच्या सर्व गाड्या अडकून पडल्या होत्या. आमच्या बसमधलेही सर्व प्रवासी उतरले व सगळ्यांनी रस्त्यावरचे दगड बाजूला करायला सुरूवात केली. त्यामुळे छोट्या गाड्यांची वाहतूक सुरू झाली. पण मोठे धोंडे बाजूला करणं कठीणच होतं. बराच वेळ गेल्यावर आपली बस काही जाणार नाही हे कळून चुकलं. मग आमच्या काकांनी तिथे असलेल्या एका जीपवाल्याशी बोलून त्याला आम्हांला चोपत्याला सोडायची विनंती केली. तो ही तयार झाला. आम्ही लगेच सामान जीपमध्ये चढवलं व निघालो. एका अर्थाने हे बरंच झालं. आता उखीमठला आमचा वेळ मोडणार नव्हता. चोपत्याला पोचता पोचताच हवामान एकदम पालटलं. सगळा रस्ता देवदार, पाईन व र्‍होडोडेंड्रॉनच्या दाट झाडांमधनं जात होता. उत्तराखंडमध्ये बरीच बुग्याल आहेत. चोपता हे उत्तराखंडमधील बुग्याल म्हणून ओळखलं जातं. बुग्याल म्हणजे उंचीवरील गवताळ जमीन किंवा चरण्यासाठी असणारी कुरणं. ही बुग्याल्स साधारणपणे ३३०० ते ४००० मीटर उंचीवर असतात व थंडीच्या मोसमात ती पूर्णपणे बर्फाने आच्छादलेली असतात. चोपत्याला सगळं एकदम ढगाळ झालं होतं. थोड्याच वेळापूर्वी पाऊसही पडून गेला असावा. चोपता हे गाव अगदी छोटं होतं. पंचकेदार साठी येणारी लोकंच फक्त येथे येत असावीत. गावात १-२ हॉटेल्स दिसत होती. त्यातल्या त्यात बर्‍या हॉटेलमध्ये आम्ही एक रूम घेतली. सामान टाकले व हॉटेल मध्येच जेवलो. गढवाल निगमचं रेस्ट हाऊस इथे आहे असं वाचनात होतं म्हणून चौकशी करून शोधायला बाहेर पडलो. चोपत्याचं लोकेशन एकदम पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात तसं होतं. सगळीकडे हिरवंगार होतं. गढवाल निगमच्या रेस्ट हाऊसचं लोकेशनही एकदम भारी होतं. पण काही वर्षांपूर्वी वादाच्या भोवर्‍यात सापडल्यापासून ते बंदच होतं. रात्री परत हॉटेलवरच जेऊन आडवे झालो. उद्या तुंगनाथला जायची खूप उत्सुकता लागून राहिली होती. चोपता ते तुंगनाथ हे अंतर फक्त ४ कि.मी. आहे.

सकाळी लवकर उठून आवरलं व ८.३० च्या सुमारास चहा वगैरे घेऊन निघालो. चोपता ते तुंगनाथ हाही रस्ता र्‍होडोडेंड्रॉनच्या दाट जंगलातून आहे. चालायला सुरुवात केल्यावर दूरच्या हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झाल्यावर खूप आनंद झाला पण हा आनंद फार काळ टिकला नाही. नंतर नंतर तर वातावरण इतकं ढगाळ झालं की २० फूटांवरचंही दिसत नव्हतं. त्यामुळे चढताना आजूबाजूचा निसर्ग दिसण्याचा काहीच प्रश्न नव्हता. मग आसपासच्या फुलापानांचे फोटो काढायला सुरुवात केली. रमतगमत झाडांवरच्या चेरी खात खात अडीच-तीन तासांनी देवळापाशी आलो. दर्शन वगैरे घेतलं. थोड्या वेळापुरता ढगांचा पडदा बाजूला झाला व तेवढ्यात मिळतील तेवढे फोटो काढून घेतले.

तुंगनाथला जाताना
on our way to tungnath.jpgTungnath-Flower2.jpgTungnath-spider net.jpgTungnath-Flower.jpg

तुंगनाथ मंदिर
Tungnath1.jpg

तुंगनाथ हे पंचकेदार मधील सर्वात जास्त उंचीवरील देवस्थान आहे. उंची १२०७३ फूट. हिंदू पुराणकथांनुसार पंचकेदार पांडवांनी स्थापली आहेत व तुंगनाथ हे अर्जुनाने. मंदिराचा गाभारा खूपच छोटा आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला बरीच छोटी छोटी देवळं आहेत. तुंगनाथच्या पुढे २ कि.मी. वर चंद्रशीला शिखर आहे. इथे रामाने तपश्चर्या केली आहे असे सांगितले जाते. दर्शन घेऊन निघेपर्यंत हलका पाऊस सुरू झाला होता. म्हणून मग देवळाच्या आसपासच्या एखाद्या टपरीमध्ये चहा घ्यावा म्हणजे थोडा वेळ जाईल व पाऊसही थांबेल असा विचार केला व एका टपरीवर हल्ला चढविला. तोपर्यंत पावसाने चांगलाच जोर धरला होता. तेवढ्यात टपरीमधलं मॅगी आमच्या नजरेला पडलं. खरंतर आता जेवणाची वेळ झाली होती व आम्ही आमच्याबरोबर खायलाही काहीच घेतलं नव्हतं. मग टपरीच्या मालकाकडे टॉमेटो, कांदे आहेत कां याची विचारणा केली व त्याला मॅगी मिळेल कां विचारलं. त्याचा होकार मिळताच आमच्या डोक्यात कल्पना आली. त्याला म्हटलं आम्हांला सामान दे, आम्हीच आमचं मॅगी करून घेतो. मग काय त्याने सामान देण्याचाच अवकाश आम्ही लगेच जेवणाच्या तयारीला लागलो. बाहेर धो-धो पाऊस कोसळत असताना अशा ठिकाणी गरम गरम मॅगीचा आस्वाद घेण्याचा अनुभव असा शब्दांत मांडण्यासारखा नाहीच. पोटात अन्न गेल्यावर आता मात्र झोप यायला लागली होती. पाऊस एवढ्यात थांबण्याचं लक्षण दिसत नव्हतं. मग टपरीवाल्याला पत्ते आहेत कां विचारलं. त्या बिचार्‍याने समोरच्या टपरीतून जुनाट, विटलेले, ओलसर झालेले पत्ते आम्हांला आणून दिले व टपरी आमच्या हवाली करून समोरच्या टपरीत जाऊन बसला. तशाच पत्त्यांनी थोडा वेळ खेळल्यावर आणखी एक चहाचा राऊंड झाला. पाऊस थांबलाय हे बघून आम्हीही आमचा गाशा गुंडाळतोय बघितल्यावर टपरीवाल्याच्या जिवात जीव आला. आम्ही इतका वेळ थांबल्याचं मात्र सार्थक झालं. येताना आम्ही ज्या निसर्गाला मुकलो होतो तो मात्र आम्हांला बघायला मिळाला. मनसोक्त फोटो काढून घेतले व ५.३० वाजेपर्यंत चोपत्याला पोचलो. फ्रेश होऊन परत पत्त्यांचा डाव मांडला. रात्री जेवणं झाल्यावर सामान आवरलं. कारण उद्या परत जायला निघायचं होतं.

तुंगनाथहून परतताना दिसलेला निसर्ग
Tungnath2.jpgTungnath-view२.jpgTungnath-view.jpgTungnath-view4.jpgTungnath-view3.jpgTungnath.jpgBack to Chopta.jpgDescending from Tungnath_0.jpg

सकाळी आवरून सामान घेऊन खाली आलो. आम्हांला परत उखीमठला जाऊन दुसरी बस घ्यावी लागणार होती. पण कोणती जीप दिसत नव्हती. जीप मिळेपर्यंत आजूबाजूच्या हॉटेलमध्ये जरा चरून घेतलं. बर्‍याच प्रतिक्षेनंतर एकदाचा एक जीपवाला सोडायला तयार झाला. तासाभराने उखीमठला पोचलो. यावेळेस आम्ही रुद्रप्रयाग या ठिकाणी एक हॉल्ट घेणार होतो. उखीमठला बसची वाट बघण्यात अजिबात वेळ गेला नाही. तिथे एक बस उभीच होती. सामान टाकून सीटांवर स्थानापन्न झालो. दोन-अडीच तासांत रुद्रप्रयागला पोचलो. इथेही आम्ही निगमच्या रेस्टहाऊसमध्येच राहाणार होतो. हे रेस्टहाऊस नदीच्या काठाशी आहे व चांगलं आहे. इथेही आम्ही मोठी डॉरमेटरीच घेतली व सामान टाकून डायनिंग हॉलमध्ये जेवायला गेलो. जेवणही छान होतं त्यामुळे भरपेट खाल्ल्यावर रुममध्ये येऊन गप्पा मारत बसलो. जोशीमठ या गावी मराठी हॉटेल सुरु केलं तर खायला काय काय पदार्थ ठेवायचे व बाकी हॉटेल कोणी व कसं मॅनेज करायचं या कल्पनेवर जोरदार चर्चा झडल्यावर मग थोडावेळ आराम केला. संध्याकाळी गावात फेरफटका मारायचा ठरवलं होतं म्हणून निघालो. रुद्रप्रयाग हे गांव जिल्ह्याचं ठिकाण आहे तसंच पाच प्रयागांपैकी एक आहे. इथे अलकनंदा व मंदाकिनी या नद्यांचा संगम होतो. हीच अलकनंदा नदी पुढे जाऊन देवप्रयाग येथे भागिरथी नदीला मिळते. संगमावरच एक सुंदरसं देऊळ आहे. दर्शन घेतल्यावर बराच वेळ त्या संगमाच्या ठिकाणी बसून राहिलो. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की नजर ठरत नव्हती. रात्री आल्यावर मस्त हॉटेलच्या खोलीतच भेळ केली व जेवण झाल्यावर झोपून गेलो.

सकाळी आन्हिकं आवरून निघालो व बसस्टॅन्डपाशी आलो. हरिद्वारला जाण्यासाठी बसेस उभ्याच होत्या. पुढच्या सीट्स पकडून विराजमान झालो. थोड्याच वेळात बस सुटली व रुद्रप्रयागचा निरोप घेतला. अर्ध अंतर आलोच होतो त्यामुळे या बसप्रवासाचा फार कंटाळा येणार नव्हता. मधेच एका ठिकाणी लॅंडस्लाईडमुळे वेळ गेला पण तरीही ४-४.३० च्या सुमारास हरिद्वारला पोचलो. हॉटेलवर सामान टाकलं. कावडवाल्यांची गर्दी दिसत होतीच त्यामुळे नेहमीसारखं न भटकता रात्रीच जेवायला बाहेर पडलो. उद्या आमचा परतीचा प्रवास सुरु होणार होता.

सकाळी लवकर उठलो व ६.३० वा. ची दिल्लीला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस पकडली. दिल्लीला नेहमीप्रमाणेच प्रचंड उकाडा होता. स्टेशनवरच्या क्लोकरूममध्ये सामान टाकून सालाबादप्रमाणे कॅनॉट प्लेसमध्ये खरेदी केली. आणखीन एक ट्रेक कोणतीही विघ्नं न येता पार पडला या खुषीत संध्याकाळची राजधानी पकडून मुंबईकडे कूच केले.

गुलमोहर: 

फोटो आणि माहिती दोन्ही छान.
उखीमठचं जंगल खूप सुंदर आहे. तिथल्या अभयारण्यात राहण्याची उत्तम सोय आहे.
चोपताही अतिशय देखणं असं गाव आहे. तुंगनाथ आणि त्यापुढचं चंद्रशिला म्हणजे स्वर्गच.
बाकी, गौरीकुंडला तशी बरीच हॉटेलं आहेत. तिथे खाण्याची आबाळ सहसा होत नाही.

वा!!! काय फिरता तुम्ही खरं!! असं वाटतं इथलं सर्व सोडून आपणही फिरायला निघावं.

मला यातलं एक गणिक कळंल नाही: "'केदारनाथ' हे १२ ज्योतिर्लिंगामधील एक आहे. ह्याची उंची ३५८४ मीटर (जवळपास ११८०० फूट) आहे. केदारनाथाचे हे मंदिर आदि शंकराचार्यांनी इ.स. ८ पूर्वी बांधलेलं आहे. या ठिकाणी त्यांची समाधीही आहे. हे मंदिर जवळपास १००० वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं. पुराणकथांनुसार पांडव कुरूक्षेत्राच्या लढाईतील विजयानंतर आपल्या बांधवाच्या (कौरव) हत्येच्या पापक्षालनासाठी इथेच आले व त्यांनी भगवान शंकराचे आशिर्वाद मागितले."

जर मंदीर इ.स. पुर्व ८ मधे जर बांधलेंल असेल तर ते फक्त १००० वर्ष जुनं कसे असेल? कमीतकमी (२०१०+८ = २०१८) वर्ष तरी जुन असायला हव ना?

खूप छान वर्णन आणि फोटोज. मी ५वीत असताना आम्ही चारधाम यात्रा केली होती. केदारनाथला जाताना असाच पाऊस लागला आणि वाटेत मुक्काम करावा लागला होता.

हो. हा प्रश्नही मलाही पडलाय. टायपत होते तेव्हा ही मनात सारखं हेच होतं. पण ट्रेकच्या पूर्वी जेव्हा माहिती काढली होती त्यात सगळीकडे हीच माहिती मिळाली होती.

मस्त वर्णन आणि फोटो .. मी बहुतेक २०-२१ वर्षांपुर्वी (:अओ:) गेले होते चार धाम यात्रेला, गढवाल मंडल विकास निगम बरोबरच गेलो होतो .. सुंदर होता प्रवास .. केदारनाथ चं मंदिर तसंच दिसलं .. छान वाटलं बघून .. Happy

प्रवास वर्नन सुन्दर आहे. मि वाचलेल्य मद्ये हे खुप चन्गले आहे. महितित भर पदलि. फोतो सुद्ध खुप चन्ग्अले आहेत. अप्रतिम. मला सुद्ध केदार नथ ला जयाचे आहे. या माहितिचा चन्गला फायदा होएइल.
आभारि आहे.
समीर म्हात्रे.