विश्वास - अविश्वास

Submitted by सुनिल परचुरे on 2 January, 2010 - 04:57

विश्वास - अविश्वास
``काय आजि ? झाल कां जेवण ?``
``हो, मगाशीच. मी तर काही रात्री जेवत नाही. ह्यांनी थोडासा भात खाल्ला. तुमच झाल कां?"
``अहो किति वेळा मी सांगितल की मला अहो जाहो करु नका म्हणून``.
`` बर .आत तर या. आजच सकाळी आमच्यात बोलण झाल की ह्या टुरचा हा शेवटचा दिवस आहे. तर जेवण झाल्यावर थोडावेळ गप्पा मारायला तुम्हाला, नाही तुला बोलवाव म्हणुन."
``आलोच ह दोन मिनिटात`` अस म्हणून डॉ. आनंद कुलकर्णी आपल्या रुमवर गेले.

``हं, बोला आता. खरतर मीच तुमच्याकडे येणार होतो. म्हणजे अगदी मनापासून सांगु ? तुम्हा दोघांना बघितल्यावर मला माझ्या आईवडलांची आठवण होते. वडील तर मी अगदीच पाच वर्षाचा असतांना गेले. त्यामुळे मला तेवढे ते आठवत नाहीत. पण तुम्ही म्हणजे तुम्हाला बघितल्यावर बराचसा मला माझ्या आईचाच भास होतो. तुमचे बोलणे , हसण पाहिल न कि अगदी तिची आठवण येते." आनंदला आईच्या आठवणीने थोडेसे गलबल्यासारखे झाले.
``अरे व्वा. म्हणजे आम्हाला इथलाहि एक मुलगा मिळाला तर.``आजी म्हणजे सौ. नातु म्हणाल्या.
``इथला म्हणजे ?``
``अरे म्हणजे आम्ही दोघेच जण इथे राहतो. आम्हाला एक मुलगा आहे, पण तो असतो अमेरिकेत. सुन आहे, एक नातही आहे, म्हणजे तो सारखा बोलावतो आम्हाला . पण आम्ही तिथे समरमध्ये जातो कारण हिला तिथली थंडी झेपत नाही. अरे आपण मुंबईच्या माणसांना एक दिवस बर्फात खेळायला मजा येते पण दुस-याच दिवसापासून जे पाय आखडतात न `` हसत हसत नातु आजोबा म्हणाले.
``एक विचारु रागावणार नाही नं? म्हणजे आजीपेक्षा तुम्हाला आई म्हटलेल चालेल ?"
``अरे म्हणजे काय ? मला आनंद होईल तुझ्या नांवाप्रमाणे. खरच , तु अगदी असा नेहमी रसरसलेला असतोय``
``म्हणजे काय ? असणारच, माझा वजनच 80 किलो आहे. "
"अरे तस नाहीरे, म्हणजे मुलांत मुल होऊन आणि मोठयात मोठा होऊन वागतोस अगदी माझ्या मुलासारखा. आणि काय योगायोग बघ, त्याचही नांव आनंदच आहे. पण तु म्हणालास की मी एकटा आहे. तर तुझ लग्नच झालं नाही की.. ..?"

आलाच शेवटी हा प्रश्न. खरतर मला आता ह्याची सवय झाली आहे. पण ही गोष्ट मी कुणापासून लपवून ठेवत नाही. उलट सर्वांना सांगतो. त्याला कारण ही तसच आहे. अरे त्यात काय, तुम्हालाही सांगतो न.
मी वयाचा पाच वर्षाचा असतानांच माझे वडिल गेले. म्हणजे माझ्या आठवणीत त्यांचा अंधुकसा चेहरा येतो, पण त्यांचा सहवास मला तसा लाभलाच नाही. ते सरकारी कार्यालयात ऑफिसरच्या हुद्यावर होते. ते गेल्यावर आईला त्यांच्याच ऑफिसमध्ये पिटी केस म्हणून क्लेरीकल स्टाफमध्ये नोकरि मिळाली. वडलांचे सर्वांशी चांगले असणारे संबंध , त्यांची हुषारी हि अशी कामी आली. तेव्हापासून आईच माझे वडील, भाउ, बहीण, सर्वच. लहानपणापासून तिची होणारी धावपळ, कुतरओढ मी पहात आलो. त्यावेळीही तिला दुसरे लग्न करण्या करता काही प्रपोजल्स आली होती. पण तिने ठामपणे सर्वांना नकार दिला. पण त्यामुळेच असेल लहानपणापासूनच एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आल्यासारखी मला वाटायची. मी कधीही आईकडे कसलाहि हट्ट केला नाही की मी वेगळे काही मागितले नाही. लहानपणीच मी प्रौढ झालो. मला सतत विचार करायची सवय लागली. चांगल काय वाईट काय ह्याचा सारसार विचार करण्याची सवय . म्हणजे लहापणापासून हे माझ्या डोक्यात इतके फिट्ट झाले की मेंदु व हृदय ह्यात दोन वितिचच अंतर असत. पण एखादी गोष्ट विचार करुन करतांना मी डोक्याचा हृदयावर वा हृदयाचा डोक्यावर प्रभाव पडु दिला नाही. एकदम बॅलन्स विचार करण्याची सवय होत गेली. कारण तेव्हापासून मला वाटायच की मेंदु डोक्यात असतो तो विचार करतो, त्याला आपण बघु शकतो. हृदयहि बघु शकतो पण मन नांवाची खुप मोठी गोष्ट आहे ती आपल्या शरिरात अवयवरुपी नसते. एखाद्या प्रसंगी माणुस असा विचित्र कां वागला अस आपल्याला वाटत पण तो जे वागला ते आपल्या दृष्टीने विचित्र असेल पण त्याच्या दृष्टीने कदाचित बरोबर असेल. म्हणजे कधी तो मेंदुप्रमाणे तर कधी हृदय सांगतो त्याप्रमाणे वागला असेल. त्यामुळे मला लहानपणापासूनच आपण सायकियाट्रीस्ट व्हाव्ह हे मनात पक्क ठरल होत. तसा मी हुषार असल्याने बारावीनंतर सीईटीमध्ये ही प्राविण्य मिळाल्याने एम.बी.बी. एस. ला सहज ऍडमीशन मिळाली. पुढे एम.एस.करतांना नशीबाने मला ह्याच विषयात पदवी घेऊन मी डॉ. आनंद कुलकर्णी, सायकियाट्रिस्ट झालो. पण एम.एस. होतानाची गोष्ट. आईला अचानक पॅरेलेसिसचा ऍटॅक आला. संपूर्ण डावी बाजू चेतनाहीन झाली. कशिबशि उठुन बसे. बोलण्यावरहि थोडासा परिणाम झाला होता. त्यामुळे तिला व्हॉलंटरी रिटायरमेन्ट घ्यावी लागली. तसा तिला फंड मिळाला,पेंशनही सुरु झाल. पण मला दिवसभर एक नर्सकम आया ठेवावी लागली. दिवसभर तिला हव नको ते ती बघे. रात्री मी घरीच असायचो. स्वयंपाकाला एक बाईही ठेवली. त्यामुळे पुढे तिची भुणभुण सुरु झाली की लग्न कर, लग्न कर म्हणून. तस म्हणजे आपल्याकडे एम.एस. होईस्तो साधारणपणे लग्नाच वय सरलेल असत. सकाळ संध्याकाळ एका पॉलीक्लीनीकमध्येहि बसायला सुरुवात केली होती. कारण स्वतच क्लिनीक काढण इतक्यात शक्य नव्हत.

मधल्या काही दिवसात दोन-चार मुली बघुनही झाल्या.ज्या काही मला पसंत होत्या त्यांचा नकार आला. म्हणजे काही जणींना दिसायला मी आवडलो नाही तर काहिंनि लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सासुची सेवा कोण करणार म्हणून नकार दिला. शिवाय त्यांची करियरही महत्वाचि होति. मी स्वतही काही ठिकाणी लग्न जुळवणा-या संस्थांमध्ये नांव देऊन आलो. हल्ली नेटवरही ब-याच साईटस उपलब्ध आहेत. तिथे एके दिवशी सर्फींग करता करता एका मुलीचे डिटेल्स मला चांगले वाटले. फोटोही सुंदर होता. ति गोव्याची म्हणजे पणजीची नुकतेच एम.एस. गायनिक झालेली डॉ. कौमुदी पेडणेकर. लगेच मी माझ्या डिटेलसहीत मेल पाठवला. दुस-याच दिवशी तिच्या वडलांचा मला मेल आला. फोनवर त्यांनी लौकर येऊन तिला प्रत्यक्ष बघण्याची विनंती केली. मुंबईतच माझी काकु रहात होती. तिला एक दिवस घरी थांबण्याची विनंती करुन गोव्याला गेलो. घरी वडिल होते. त्यांनीच सर्व तिची माहिती सांगितली. थोडया वेळाने मुलगीही आली. काय माहीत नाही पण तिचा चेहरा बघितला आणि म्हणतात न अगदी तस्स झाल. माझ्या दृदयातली घंटी वाजली. चेहरा इतका मोहक होता की मी कुठलाही विचार न करता मनात ठरवल की लग्न करायच तर हिच्याशीच. तासभर मी तिच्याशी गप्पा मारल्या. आधी इथले शिक्षण , तिथले शिक्षण, मग इथली कॉलेजेस व तिथली ह्यावर मी बोललो. माझ्या घरची परिस्थिती सांगितली. आईची अवस्था, माझ आता आर्थिक स्थिरावणार आयुष्य ह्यावर बोललो. का माहीत नाही पण तेवढया दिलखुलासपणे ति बोलतांना दिसली नाही. म्हणजे तिच्या चेह-या मागची भितीची भावना लपत नव्हती. मी मिला विचारलेही. तेव्हा म्हणाली की तिचे वडील म्हणजे जमदग्नीचे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना ति खुप घाबरुन असते. चेष्टेत मी तिला म्हटले सुध्दा की चला त्यांच्या पासून आता तु लौकरच सुटशील म्हणून.
निघतांना मी वडलांना सांगितले की पत्रिका ह्यावर माझा विश्वास नाही. तेव्हा ति जुळते की जुळत नाही हे मला तरी बघायच नाही. जर तीला मी पसंत असेन तर माझ्या आईला दाखवण्याकरता एकदा मुंबईला या.
दोन दिवसातच वडिलांचा फोन आला की येत्या रविवारी ते तिला घेऊन येतायत. झाल लगेच आईनेही तिला बघितली. खर सांगु कुणालाही आवडण्या सारखीच होती ती. का कोण जाणे मला कळत होत की माझ मन हे त्रयस्थाप्रमाणे विचार करत नव्हते, हृदयाकडे झुकत होते. पण तिथे पहिल्यांदाच मी माझ्या सवयीला मोडता घातला.

आठवडयातच साखरपुडा झाला. मिच सांगितल की लग्नावर लाखो रुपये उधळण्यापेक्षा रजिस्टर लग्न करु. ति काहीच म्हणाली नाही. वडिलांनीही आक्षेप घेतला नाही. फक्त आईच म्हणण पडल म्हणून साखरपुड्यापासुन पंधरा दिवसांनी लग्न रजिस्टर केल्यावर दुस-या दिवशी अगदी फक्त सख्खे नातेवाईक व जवळच्या ओळखिच्या मंडळीकरता एक छोटेसे रिसेश्पन टाईप फंक्शन ठेवले. मधल्या दोन आठवडयात आमचे रोज फोनवर बोलणे होत होते. म्हणजे मिच फोन करायचो. मध्ये एक दिवस ती इथे येऊन गेली. म्हणजे सकाळच्या लौकरच्या फ्लाईटने आली व रात्रीच्याने परत गेली. तिच्या साडया, रेडिमेड दागिने, माझे कपडे ह्याची त्या दिवशी खरेदी केली. का कोण जाणे पण ती मनापासून बोलत नव्हती. तिला विचारल्यावर म्हणाली की मुळातच तिचा स्वभाव बोलका नाही म्हणून. फक्त हनिमुनला कुठे जायच हा विषय निघाल्यावर फक्त म्हणाली की आधी पणजीत एक दिवस राहू व तिथून पुढे कुठे जायचे असेल तिथे जाऊ. कारण पणजीत त्यांची कुलस्वामिनी आहे, तिचे दर्शन घेऊनच पुढे जाव लागेल.

माझ रजिस्टर लग्नही झाली. अक्षरश सगळ स्वप्नवतच वाटत होत. इतके सर्व पटापट होईल अशी कधी शंकाही मनात आली नाही. लग्नाच्या रात्री मला म्हणाली की देवीचे दर्शन झाल्याशिवाय मी तुम्हाला जवळ येऊ देणार नाही. तिला मी म्हटल सुध्दा की अग हल्ली लग्नाच्या आधीच मुलांची मनच नाही तर शरिरही ब-याच जणात जुळतात, इथे तर तु म्हणतेस... पण म्हटल जाऊ दे पहिल्या दिवसापासून मारामारी नको. दुस-या दिवशी छोटेसे रिसेप्शनही झाले .सगळ्यांनि खुप कौतुक केले. म्हणाले नशिबवान आहेस, जोडा अगदी छान दिसतोय. सकाळीच जेवण ठेवले होते. रिसेप्शन नंतर पणजीत जायला लगेच विमानात बसलो. पण माझ विमान तर आधीच हवेत उडत होत. पुढे 2-2 दिवस सिमला, कुलु व 5 दिवस मनाली अस बुकींगही केले होत.

संध्याकाळी आधी त्यांच्या देवीला जाऊन आलो. पणजीतही एका चांगल्या हॉटेलमध्ये हनिमुन स्विट बुक केला होता.देविच दर्शन करुन रुमवर गेल्या गेल्या आधी तिला घट्ट मिठीत घेतली. म्हटल हे कौमुदी देवी , आता तरी मला तुमचे दर्शन होईल का ? तर म्हणाली आपण इतके थकलोत तर आधी आंघोळ करुया. म्हटल अग कसली आंघोळ बिंघोळ घेऊन बसलीयस ? पण म्हणाली आधी टबमध्ये गरमपाणी काढा , आलेच मी. अगदि जबरदस्तीने मला ढकलच बाथरुममध्ये नेले. मी मिठीत घ्यायचा प्रयत्न करतोय अस बघितल्यावर धावत बाथरुमबाहेर येऊन कडीच लावली. म्हणाली टब भरला की मला सांगा मी येतेच.

पाच मिनीटात टब भरला .मी दारावर टकटक केले, तिला हाक मारली. म्हटल अशी जीवघेणी मस्करी करु नकोस ग. पण बाहेर काही हालचालच एकु येईना. आधी प्रेमाने मग रागावूनहि हाका मारल्या. मला कळेना काय झालय ते. नशिबाने बाथरुममध्येही फोनच कनेक्शन होते. त्यातुन मी रिसेप्शनला कुणाला तरी पाठवा म्हणून सांगितले. हाऊस किपिंगच्या माणसाने चावीने बाहेरील दार उघडले व नंतर माझ्या बाथरुमची कडीही काढली. नुस्ता टॉवेलवर बाहेर येऊन बघतो तर कौमुदी दिसेना. मला क्षणभर कळेचना काय झाल ते. त्या माणसाला विचारले की अरे माझी बायको आत्ता इथे होती तिला कुठे बाहेर जाताना बघितल कां ? तर म्हणाला एका बाईला हातात बॅग घेऊन एका पुरुषा बरोबर बाहेर जाताना पाहिल. लगेच रिसेप्शनलाही फोन लावला , त्यांनीही तसेच सांगितले. माझ्या अंगातली शक्तिच गेल्यासारखी झाली. म्हणजे ही आत्ता ह्यावेळेला कोणाबरोबर गेली असेल ? माझा डोक्यात एकदम गोंधळ झाला. रुममध्ये तिची बँग दिसत नव्हती. त्यात तिचे सर्व नवीन कपडे, दागिने होते. पण मग ही कुणाबरोबर गेली असेल?

कपडे केले व तडक तिच्या वडिलांकडे आलो. म्हटले कौमुदी इथे आलीय का? तर त्यांना कळेचना. ते ही गांगरल्या सारखे झाले. तेवढयात माझ्या मोबाईलवर एक एस.एम.एस. आला. कौमुदीचाच होता. ``प्लिज मला समजून घ्या. गेल्याच महिन्यात माझ जॉन फर्नांडिसशी लग्न झाल आहे. पण वडिलांच्या धाकापाई मी त्यांना हे सांगू शकले नाही. त्यांना माझ जॉनवर प्रेम आहे हे माहीत होत. मी तुमची अपराधी आहे. मला माफ करा. मी जॉन बरोबरच गेले आहे, माझा शोध घेऊ नका``.
तिच्या वडलांना मी तो वाचुन दाखवला. ते एकदम रडायलाच लागले, म्हणाले तिच त्याच्यावर प्रेम आहे हे मला माहीत होत. पण मला ती दुस-या जातीत जावी हे मंजूर नव्हत. पण तिच्या लग्नाची त्यांना काहीच कल्पना नव्हती. ते रडतच माझ्या पायाहि पडले.

मला एकेक धक्यावर धक्के बसत होते. पहिल्या प्रथमच मी फक्त हृदयाचा कौल घेतला आणि अपयशी झालो. पण मग वडिलांना जरी ती घाबरत होती तरी मला तिने तसे सांगायलाच हवे होते. अगदी लग्न होईस्तोपर्यंत वाट बघायचा , माझ्या आयुष्याला असा जबरदस्त धक्का देण्याचा तिला काहीच हक्क नव्हता.
आईला पॅरेलिसिसचा ऍटॅक आला तेव्हाही मी असा डगमगलो नाही. पण आता एकदम कोलॅप्सच झालो. इतका माझ्यावर तिने अविश्वास दाखवावा ? लग्न हा काय पोरखेळ समजते ? बापरे आता घरी कसा जाऊ ? आईला काय सांगु ? समाजाला कसा सामोरे जाऊ ? ति रात्र मी न त्यांच्या घरी राहलो न होटेलवर गेलो. वेड लागल्या सारखा पणजितल्या रस्त्यावर भटकत होतो.

दुस-या दिवशी जरा मीच स्वतला सावरुन घेतले. म्हटले ह्या सर्व प्रकारात माझी काय चुक ? हा.. आता तिची जास्त माहिती न काढता तिच्याशी लग्न केले हे खरं, पण लग्न ही संस्था फक्त एकमेकांवरच्या विश्वासावर शाश्वत असते . इथे तर तिने त्याला सुरंगच लावला.

घरी गेलो. आजुबाजुला सगळ्यांनाच आश्चर्य वाटले की मी एक दिवसातच बायकोला न घेता घरी कसा आलो. सर्वांच्या चर्चेला ऊत आला. आईला सर्व सांगितले. तिला समजावले. ह्या सर्व प्रकारात चुक असेल तर ति कौमुदीचीच आणि थोडी माझी ही की मी काही जास्त चौकशी केली नाही. पण आईने हे खापर स्वतच्याच डोक्यावर फोडले. म्हणाली मी जर व्यवस्थित असते तर अस मुळीच होऊ दिल नसत. सर्व चौकशी करुनच मुलगी आणली असती. आणि हा तिने जो स्वतवर धक्का घेतला त्यानंतर महिन्याभरातच हार्टऍटॅक ने ति गेली.

माझ सर्वस्वच गेल. लहानपणापासून जी माझ सर्वस्व होती तिलाच मी घालवून बसलो. बायको नाही तर नाहीच ,आईही गेली. तुम्हाला खोट वाटेल पण त्यावेळी मी माझ्या स्वतवरच एका सायकियास्ट्रिट डॉक्टर मित्राकडून दोन सेशन्स घेतली इतका मी उध्वस्त झाल्या सारखा झालो होतो.

हळुहळु काही महिन्यात मी स्वतला प्रॅक्टीसमध्ये बुडवून घेतले. काही महिन्यांनी परत नातेवाईकांनी मला माझ्या लग्नाबद्दल आडुन आडुन चौकशी सुरु केली. सर्वांच मत मि परत लग्न कराव असच होत. सुरवातीला मी ठामपणे नकार दिला, पण खरच काही काही वेळा अस वाटायच की आपलही सुखदुःख शेअर करायला कोणीतरी कम्पॅनियन हवा.

पण मी जेव्हा लग्न करीन अस म्हटल्यावर माझ तस वय झाल असल्याने म्हणा किंवा आधी लग्नाचा असा प्रसंग झाल्याने म्हणा ज्या दोन-तिन मुली आल्या त्या डिव्होर्सीच होत्या. प्रत्येकिच दुःख वेगळ. कुणाला सासुबाईचा खुप त्रास होत होता म्हणून तर कुणाला नवर्‍याच्या त्रासापाइ डिवोर्स घ्यावा लागला होता. पण जेव्हा एका मुलीने ..मुलीने कसले , बाईनेच मला विचारले की माझ्या हनिमुनच्याच दिवशी माझि बायको पळुन गेली , म्हणजे तुम्ही पुरुष आहात न ? तेव्हा मी लग्न ह्या चॅफ्टरवर फुलीच मारली.

पण मग मनात ठरवले की जे आपल्या आयुष्यात घडल ते कधीही दुस-याच्या आयुष्यात घडु नये म्हणून हळुहळु मी जिथे लग्नाच्या मुला मुलींच संमेलन असेल तिथे आवर्जुन जाऊन लग्न म्हणजे काय, मुलांनी काय किंवा मुलींनी काय एकमेकांना विश्वास, आधार कसा द्यावा ह्यावर व्याख्यान देऊ लागलो. माझ्या आयुष्यात जे घडले तो ही प्रसंग सर्वांना सांगत होतो. असलिच किंवा कुठलीही गोष्ट एकमेकांपासून , घरच्यांपासून दडवून ठेवुन कुणाच्याही आयुष्याची वाताहात करुन देऊ नका म्हणून सांगायला लागलो. कदाचित माझ्या आयुष्या सारखी एखादी घडणारी गोष्ट मी ति सांगण्याने कुणाच्यातरि आयुष्यात टळली तरी मला माझ आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटेल.

``अरे आनंद कुठे हरवलायस ?``
``अं हो सांगतोन`` अस म्हणून त्या दोघांना थोडक्यात मि हे सर्व सांगितले .
``बापरे अरे माझा विश्वासच बसत नाही, पण एक विचारु ?"आइ म्हणालि.
``हो विचार नां ?``
``परत कधी तुला ती कौमुदी भेटली कां रे ?``
``भेटली ? माझ्या त्या लग्नानंतर जवळजवळ पाच एक वर्षानी मला तिचा फोन आला. सेलफोनवर नांव आल "कौमुदी" तिच नांव मी फोनवरुन सुध्दा डिलिट केल नव्हत. रडत होती. म्हणाली ति जरी एम.एस. झाली तरी तो ,तिचा नवरा म्हणजे जॉन, एम.बी.बी.एस.च शिकला होता. त्याची प्रॅक्टीसही धड चालेना. ही इतकी शिकलेली शिवाय तिच्या हाताला यशही होत. शेवटी पुरुषी अहंकार नडला. हिला दारु पिऊन मारु लागला. पदरात एक मुलगी, शेवटी त्याला सोडून ति वडिलांकडे राहायला गेली. वडिलहि प्रथम तयार नव्हते पण नातिकडे बघुन त्यांनि तिला घरात गेतलि. एक क्षणभर कुठेतरी मी सुखावलो की माझ्या एवढाच तिलाहि त्रास झाला. पण लगेच माझ्यातला डॉक्टर जागा झाला. ति इथे आलि. तिलाही त्यावेळी मी काही सिटिंग्स दिल्या. तिनेही नंतर स्वतला सावरल. आता फक्त आम्ही चांगले मित्र आहोत``.

``डॉक्टर साहेब अहो येताय ना बाहेर? कॅम्पफायरला सगळेच जमलेत. चला``, टुरचा गाईड सांगायला आला.

हो चला आलोच म्हणत पाठमो-या जाणा-या डॉक्टरांकडे आजी आजोबा नुसते पाहातच राहायले.

गुलमोहर: 

कथा सत्य घटनेवर आधारीत असण्याची दाट शक्यता आहे.. मांडणी नेहमीप्रमाणेच उत्तम, न भरकटता... straight to the point... कथानायकाची विमनस्क मनःस्थिती उत्त्म शब्दबद्ध!

आता थोडंसं विषयांतर!
मला नेहमी एक आश्चर्य वाटते... एवढ्या शिकल्यासवरलेल्या मुली, यांना स्वतःचा जोडीदार ठामपणे निवडता येऊ नये?

घरच्यांचे नाव पुढे करून लग्न तर करतात, दोन्ही घरे आणि मने उध्वस्त करून स्वताचं घरटं उभारायला जातात...

कायद्याने अशा फसवणूकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी काहीच तरतूद नाहीय का?

माझ्या मैत्रीणीसाठी विवाहमंडळात नाव नोंद्णी करायला गेलेलो तेव्हाचा किस्सा... त्यांनी सरळ विचारलं, बाहेर कुठे लफडं वगैरे नाही ना? असेल तर त्याच मुलाशी लग्न करा... लग्नाची नाटकं करून बाकीच्यांना त्रास नको...

त्यांनी सांगीतलेले लग्नातील किस्से...
मंगलाष्टका चालू झाल्यावर नवरी मुलगी मांडव सोडून रिक्षात बसून पळाली...

दुसरी तर अगदी बॉलीवूड स्टाईल कथा... मंगलाष्टका संपल्या... मुहुर्ताची वेळ झाली आणि नवरा नवरीच्या गळ्यात माळ घालणार तेवढयात नवर्‍याच्या बाजूने एक तरूण वेगाने पुढे सरसावला आणि नवरी त्याला माळ घालून मोकळी झाली...
ते दोघे सगळ्या उपस्थितांच्या पाया पडेपर्यंत नवरा म्लगा आ वासून हार हातात घेऊन उभाच होता आणि मग लग्न जमवणारे मध्यस्त आणि मुलाकड्च्यांची जुंपली...

वधुपित्यांना एक सल्ला...
मुली हल्ली स्वतःच्या पायावर उभ्या असतात... ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं तो माणूस अथवा ती नाती त्यांच्यावर लादू नका.. सगळ्यांच्याच आयुष्याचा सत्यानाश होतो... मुलगा, मुलगी... (मुलगी लग्नाआधी किंवा नंतर पळाली तर) वर-वधूंची घरची माणसे... आणि कुरकुरत नांदले तर... त्यांच्या भांडणांमुळे मुले.... (अर्थात... हा एक वेगळा पॉईंट होउ शकतो) सगळ्यांच्याच!

उपवर-वधूंना एक सल्ला

तुमचं दुसर्‍या कोणावर प्रेम आहे, घरच्यांना ते पटवून द्या... दबावाखाली लग्न करून नंतर सोडूया आणि आपल्या आवडीच्या मुलीशी लग्न करूया असा स्वार्थी विचार करण्यापूर्वी समोरच्या माणसाच्या मनस्थितीचा... त्याची फसवणूक झाल्यानंतर त्याचं काय होईल याचा माणूसकीच्या नात्यातून विचार करा... न जाणो उद्या परवा तुमच्या मुलावर्/मुलीवर हीच वेळ येऊ शकते...

आणि असं भेकडासारखं प्रेम करून नाईलाजाने दुसर्‍याशी लग्न करून पुन्हा त्याला सोडून पळून जाण्याचे उपद्व्याप करण्यापेक्षा लग्न न करता एकटे राहा किंवा ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याशीच लग्न करेन असं ठामपणे आईवडीलांना पटवून द्या.

*********************************************
Overseas Education, Study Abroad, Work and Study in Summer, International colleges universities, Overseas career consultancy @ www.nicheducation.com

ड्रिमगर्लसारखं मलाही वाटलं की ही सत्यकथा आहे. हे असं घडतं. शिकल्या सवरलेल्या मुलीही पायावर धोंडा मारून घेतात. उदाहरणं कमी नाहीत समाजात.
एकंदरीत कथा आवडली.

dreemgirl यांच्यशी सहमत.
वरील सुनिल च्या कथेतीलच उदाहरण घ्या ना! त्या बयेनं एका निरपराध माणसाच आयुष्य तर बरबाद केलच शिवाय स्वतः च्या आयुष्याची सुध्दा वाट लावली.
दुसरी गोष्ट! आपले आई वडील आपले शत्रुच आहेत आणि आपल्या भल्याचा विचार करण्याची त्यांना कवडीचीही अक्कल नाही अशी negative विचार सरणी नसावी.

बापरे- कसल्या डँजर आहेत ह्या ड्रीमगर्लन सांगितलेल्या कथा..
माझ्या एका मित्राची होणारी बायको - लग्नाआधी एक आठवडा पळून गेली.. तो इतका डिप्रेस्ड होता..
पण लग्न करून मग नंतर घटस्फोट /मनस्ताप होण्यापेक्षा (म्हणजे सुनिल च्या कथतल्या सारखं) हे थोडं आधी पळून जाणं परवडलं - नाही का?

मलादेखील एक स्थळ आले होते.. मी मुंबईत नोकरी करत होतो. ती धुळे का कुठे तरी सर्विस करत होती.. पहाण्याचा कार्यक्रम आमच्या घरी एका रविवारी झाला. पसंती झाली. आम्ही दोघे आपापल्या सर्विसला निघून गेलो. बुधवारी तिचे वडील आमच्या घरी जाणार होते, फायनल करायला. सकाळी मुलीचा मला फोन आला की ती मेधा पाटकरच्या एका आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ती आहे. हे काम आणि तो एरिया दोन्ही सोडायचा नसल्याने ती लग्नाला तयार नाही....... वडिलांच्या दबावाखाली मुलगा पाहिला. पण आता आईवडील, नवरा काहीच नको. मी आंदोलनातच रहाणार आहे...... लग्नाच्या आधीच स्पष्ट सांगितले हे बरे झाले.... वडिलाना मग फोन करुन कळवलं. ते तरीही लग्न कराच , मी पहातो सगळे, म्हणत होते. पण आम्ही नाही म्हणून सांगितले.