दुस्तर

Submitted by हायझेनबर्ग on 22 December, 2009 - 20:43

सदोदित अंधार भरून राहिलेल्या धान्याच्या खोलीतला दिवा लाऊन कुठल्याश्या तंद्रीतच तांदुळाच्या गोण्या ठेवायच्या कोपर्‍याकडे ती वळली आणि क्षणभर तिच्या छातीत धस्स झाले. रोज दिवेलागणीला देवघरातल्या समईत तेल घालून वात मोठी करून देवाला हात जोडायचे आणि उपड्या कांडणाच्या उखळावर ठेवलेली, माईंच्या हातची, वजनाला चांगली सव्वाकिलो तरी भरेल अशी पितळेची परात घेऊन धान्याच्या खोलीतून संध्याकाळच्या रांधण्यासाठी पसाभर तांदूळ घेऊन यायचे, हा क्रम जणू शरीरधर्माचा एक भाग असल्यासारखाच तिच्या अंगवळणी पडला होता. तेरा वर्षांपूर्वी हळदीचा पिवळसर रंगही पुरता न उतरलेल्या नाजूक थरथरत्या हातांनी तिने ती परात पहिल्यांदा हातात घेतली होती तो दिवस तिला अगदी कालच घडून गेल्यासारखा आठवला. एखादं वतन लिहून द्यावं तसं परात आपल्या हातात देतांना त्या पहिल्या दिवशी माईंनी ह्याच देवघरात आईच्या मायेनं घालून दिलेला वस्तूपाठही तिला अगदी कालच ऐकल्यासारखा आठवला,
'बाई , वाण्याच्या घरी सून म्हणून आल्या आहात तर ही धान्याची खोली तिजोरी सारखी सांभाळावी लागेल बरं! ह्या परातीत पडलेलं तोळाभर धान्यसुद्धा सोन्याच्या मोलाचं आहे. ते कसोशीनं जपाल तर आयुष्यभर मिजाशीनं रहाल. एकदा का ह्या खोलीला डंक लागला की घराच्या भिंती खचे पर्यंतही तो निस्तरणार नाही.'

माईंचे शब्द आठवताच, आपण करंटे, अपेशी ठरल्याची प्रचंड ओशाळवाणी जाणीव तिच्या उरात भरून आली आणि पाठोपाठ एक भयंकर अपराधी भावना. कितीतरी वाणसामानांचा वास खच्चून भरलेल्या आणि मालांच्या थेट छताला भिडणार्‍या थप्प्यांमधून वाट काढतांना या खोलीत आजही आपला उर दडपतो आहे असाच भास क्षणभर तिला झाला. तिला वाटले, खोलीतल्या फरशीवर आणि भिंतींवर, कधीकाळी उंचचउंच रचलेल्या थप्प्यांचे डाग अजूनही जिवंत आहेत पण सुबत्तेचा कधीच उडून गेलेला तो वास किंचितही येथे नाही, आता या भकास खोलीत मागे उरला आहे जळमटांचा फक्त कुबट आणि कुजकट वास.

गोणीतले तांदूळ काढायला खाली वाकतांना तेरा वर्षे हातात वागवलेली परात तिला मणभर ओझे तोलून धरल्यासारखी जड वाटली, पायातलं बळ क्षीण होतंय की काय वाटून भोवळ आल्यासारखी खांबाचा आधार घेत ती घसरत खालीच बसली. खोलीच्या एकेका अंधार्‍या कोपर्‍यात भिरभिरत्या नजरेनं बघतांना तिला वाटले, इथल्या जुन्या आठवणींनी आता आपल्याला भडभडून येणार, कधीकाळच्या भरल्या घराच्या सयींनी जिवाची कोण घालमेल होणार! पण दिवेलागणीला आपले असे अभद्र वागणे बरे नाही. माई असत्या तर म्हणाल्या असत्या, 'बाई! अशा सांजवेळी लक्ष्मी घरात येते आणि तुम्ही का उदास बसता? माहेरची आठवण येत असेल तर पत्र धाडा, देऊ का कार्ड, पेन आणून? मी ठेवलंय एक पेन नानांपासून चोरून, धान्याच्या खोलीच्या कोनाड्यात, आणू?', आणि आता? आता ही काय आपल्या मनाची दरिद्री अवस्था? कसली ही अपशकुनी हूरहूर. आपल्याला असं रडतांना पाहिलं तर नाना काय म्हणतील?....कसेसेच वाटून तिने आपली नजर दुसरीकडे वळवली.

बाजूला ठिकठिकाणी भोकं पडलेल्या जाजमावर तिच्या मुलाची कुणाकडून तरी अर्ध्या किंमतीत विकत घेतलेली चौथीची पुस्तकं विखुरलेली होती. त्यावरून हलकेच हात फिरवतांना मात्र बराच वेळ आवरून धरलेला हुंदका तिच्याकडून निसटला आणि कित्येक दिवस दाबून ठेवलेला उमाळा आसवांबरोबर बाहेर पडला. पदरानं डोळे टिपतांना तिला वाटले, माईंनी आखून दिलेली वाट चालणे आपल्याला जमलेच नाही. त्यांनी उभा केलेला नानांचा संसार, हे घर हा हा म्हणता त्यांच्यानंतर आपल्या डोळ्यांदेखत खचलं, कुठलासा डंक लागून ही खोली दुष्काळ पडावा तशी भगभगीत झाली, हौसेनं ज्याच्यासाठी माईंनी सोन्याच्या बिंदल्या केल्या त्याच्यासाठी आपल्याला नवी पुस्तकंही घेता येऊ नयेत? एवढे का ह्या संसारात आपण नालायक ठरलो आहोत? ह्या दुभत्या, नांदत्या घराचा आपल्या नजरेसमोर असा धुराळा उडाला आणि आसवं गाळण्याशिवाय काहीच आपण करू शकलो नाही ? आपल्यासाठी ही लाज आहे.

एवढ्यात वरून अंगावर चांगली ओंजळभर माती पडली आणि विचारांच्या तंद्रीतून ती एकदम बाहेर आली, क्षणभर काय होते आहे हे न कळून चांगलीच दचकली. खोलीच्या दोन कोपर्‍यातल्या दोन, देवघराच्या दाराजवळ एक आणि ज्याच्या आधारानं ती बसली होती, अशा चार खांबांवर तोलून धरलेला वरच्या धाब्याच्या माळ्याला जागोजागी चार-चार बोट रुंदीचे तडे गेले होते. वर नजर जाताच भितीने तिच्या पोटात गोळाच उठला. ह्या माळ्याखाली आपला मुलगा पहाटे ऊठून अभ्यासाला बसतो? उमजून तिचे अवसानच गळाले.
तिला आठवले, चुरमुर्‍याच्या वजनानं हलक्या पोत्यांना खालची जागा वाया जाऊ नये म्हणून नानांनी हा माळा बनवून घेतला होता. चार-पाच वर्षांचा असतांना तिचा मुलगा बाजूच्या थप्प्यांवरून सरसर वर चढत नानांना चोरून पोत्यांतून चुरमुरे काढून आणे आणि ती दोघे परसातल्या पायर्‍यांवर बसून खिदळत खडीसाखरेबरोबर चुरमुरे खात. नानांनी एकदिवस त्याला चढतांना पाहिले आणि त्यांच्या रागाचा भडकाच उडाला. कधीही स्वैपाकघरात पाऊल न ठेवणारे नाना त्याला बखोटीला धरून ओढतच आत आले,
'तुम्ही अक्कल काय चुरमुर्‍यांच्या पोत्यात गुंडाळून ठेवलीये? की बालिशपण गेला नाही अजून? पाय निसटून तो पडला किंवा गर्‍याची ही थप्पी त्याच्या अंगावर कलंडली तर काय भावात पडेल माहितेय का? तो लहान आहे त्याला काही कळत नाही पण तुम्हाला तरी काही अक्कल हुशारी नको? बेजबाबदारपणे वागणं सोडा आता आणि शहाण्या व्हा थोड्या. ए भीमा! वरून चुरमुर्‍याचं एक पोतं काढ आणि ठेव स्वैपाकघरात नेऊन, खा म्हणावं दिवसभर चुरमुरे. पण खबरदार तो पुन्हा वरती चढतांना दिसला तर!'
आपल्याला तर बाई रडूच आलं तेव्हा. काय तो नानांचा उग्र चेहरा, मोठे डोळे! नानांसमोरून निघून जाण्याचेही सुचेना. त्यांच्या आवाजाच्या जरबेनं डोळे केव्हाच घळघळा वहायला लागले होते. माई होत्या म्हणून त्यांनी सांभाळून घेतलं. पण त्यानंतर खरं कित्येकदा चुका होऊनही नाना पुन्हा कधी चिडले नाहीत की रागावले नाहीत. नातवावरच्या मायेपोटीच त्यादिवशी त्यांचा तोल गेला खरा.

एवढ्या महिन्यात ह्या माळ्याकडे तिची नजर कशी गेलीच नव्हती. नाना तर हल्ली ह्या खोलीत फिरकतही नसत. दुकान बंद झाल्यापसून ह्या खोलीत येणेच त्यांनी टाकले.
मुलाला आता इथे आजिबात अभ्यासाला बसू द्यायचे नाही ठरवून वर पहातंच एका हातात परात आणि पदराने डोक्यावरची धूळ पुसत खांबाच्या आधारानं ती उठली. अचानक देवघरात कुणाचीतरी चाहूल लागली आणि उठताच ती जागीच थबकली. ह्यावेळी आपल्याशिवाय घरात अजूनही कोणी आहे उमजून तिचा उरच भितीने धपापला, तोंडातून शब्दही फुटेना. खोलीतून देवघरात भरून राहिलेला अंधार फक्त दिसत होता आणि समईत तेवणार्‍या वातीच्या भिंतीवर पडलेल्या कवडशावर हलणारी काळसर सावली. तिचे पाय पुन्हा त्राण जाऊन लटपटल्यासारखे झाले, कपाळावर दरदरून आलेले घामाचे थेंब नकळत कानांजवळून ओघळले. छातीतून भितीची हलकी कळ पोटात सरपटत जातेय की काय वाटून तिने पदराचा शेव तोंडावर गच्च धरला. हातातल्या बांगड्या परातीवर आपटत किणकिणल्या आणि ती अजूनच घाबरी झाली. उजव्या हाताच्या बोटात मंगळसुत्राच्या वाट्या कधी आल्या त्याचेही भान तिला राहिले नाही. क्षण दोनक्षण हादरलेल्या स्थितीत गेले तेव्हा तिला ती भिती सोसवेना, भितीने अर्धमेल्या झालेल्या अस्पष्ट आवाजातच ती पुटपुटली,
'कोण आहे तिकडे देवघरात?' आता डोळ्यांसमोर काय येऊन उभे राहणार वाटून तिला डोळे गच्च मिटून घ्यावेसे वाटले, पण पुसटश्या हुंदक्याच्या आवाजाशिवाय देवघरात पुन्हा हालचाल दिसली नाही.

'कोण? तू आहेस का रे? आईला घाबरवतोयेस? पुढं ये बघू, मला अंधारात भिती वाटते.'
उसनं अवसान आणून ती म्हणाली पण पुन्हा अस्फुट हुंदक्याच्या आवाजाशिवाय तिला काहीच ऐकू आले नाही, तेव्हा मात्र तिची खात्रीच झाली की तोच असणार,
'थांब बघते तुझ्याकडे, तू असा ऐकणार नाहीस, ही आले मी..' म्हणत छातीसमोर परात धरून तरातरा ती देवघरात आली आणि समोरचं दृष्य बघताच जागीच थबकली.

'भाऊजी तुम्ही? तुम्ही काय करताय इथे? अहो किती घाबरले मी, जीव जातो की रहातो झालं होतं. सांगायचं तरी तुम्ही आहात, किती विचारलं मी, ऐकू आलं नाही का? ' प्रत्येक शब्दागणिक तिच्या आवाजातली रागाची धार वाढत होती. अंग रागानं थरथरत होतं. ह्या माणसाच्या कानात ओरडून 'अरे मूर्ख माणसा हाकेला ओ तरी द्यायचीस, घुम्या सारखा बसलायेस काय नुसता?' असे म्हणायची तिला अनिवार लहर झाली पण त्याचा एकंदर अविर्भाव पाहून ते विक्षिप्त विचार तिने बाजूला सारले.

'अहो काय झालं भाऊजी केव्हा आलात तुम्ही? इथे अंधारात का बसलात मान खाली घालून? आणि हे काय रडताय की काय तुम्ही? अहो काय झालं?' हातातली परात उखळावर ठेऊन झटकन तिने देवघरातला दिवा लावला आणि त्याच्याकडे बघतच राहिली. गुडघ्यात मुडपलेल्या पायांना दोन्ही हातांनी वेढा घालून त्यात मान खूपसून तो हमसाहमशी रडत होता. केस विस्कटलेले, शर्टाची एक बाही कोपरापर्यंत फाटलेली, विजारीला सगळीकडे माती चिकटलेली, त्याचा चेहरा मात्र तिला दिसत नव्हता.

'अहो काय झालं भाऊजी, रडताय काय असे? काही सांगा तरी ! बघा इकडे वर बघा माझ्याकडे, बघा वर....' म्हणत तिने खाली वाकून त्याच्या हनुवटीला हात घातला, तसा 'वहिनी...' म्हणून हंबरडा फोडत त्याने तिच्या पायांना मिठी मारली. आता आपला तोल जातोय की वाटून झटकन भिंतीचा आधार घेत ती म्हणाली,
'अहो असं काय करताय तुम्ही? काही सांगाल का? शांत व्हा पाहू, तुमच्यासारख्या तरण्याताठ्या मुलाला असं रडणं शोभतं का? शांत व्हा पाहू. काय म्हणतेय मी भाउजी. उठा बरं दिवेलागणीला अशी लक्षणं बरी नाहीत. उठा पाहू' तशा अवस्थेत तिला अतिशय अवघडल्यासारखं झालं होतं.

तिच्या पायांची मिठी सोडून बळेच तो उठला आणि त्याचा चेहरा पाहताच ती मुळापासून हादरली. कपाळाला डावीकडे मोठी खोक पडलेली, खालचा ओठ फुटून त्यावर रक्त साकळलं होतं, उजवा डोळा सुजून काळानिळा झाला होता..ती जवळजवळ किंचाळलीच,
'अहो हे काय भाऊजी? काय झालं! अरे देवा! केवढी मोठी खोक पडलीये ही, डोळापण सुजलाय, काय झालं भाऊजी? मारामारी केलीत का तुम्ही? नाना कुठेत?. अहो बोलाना भाऊजी. काय झालं काही सांगाल का? काय विचारतेय मी? नुसते रडताय काय असे?' तिच्या नकळत तिचाही आवाज चढताचढताच रडवेला होत होता. पदराने त्याच्या कपाळावरच्या जखमेतून ओघळू पाहणारे रक्त टिपत कासावीस अंतःकरणाने ती त्याच्या विनवण्या करीत होती. त्याच्याकडून मात्र कण्हण्याशिवाय एकही शब्द फुटत नव्हता.

'भाऊजी नका हो अशी परीक्षा बघू माझी, सांगा ना काय झालं? नाना कुठेत? पेठेतंच गेला होतात ना तुम्ही?'

'वहिनी नानांनी सगळ्यांच्या देखत मला मारलं' तो रडतारडताच शर्टाच्या बाहीनं डोळे पुसत म्हणाला.

'नानांनी मारलं? एवढं? खोक पडून रक्त येईपर्यंत?'

'नाही! नानांनी भर पेठेत सगळ्यांदेखत माझ्या तोंडात मारली.

'अहो पण मग ह्या एवढ्या जखमा कशा झाल्या? पडलात का तुम्ही कुठे?'

'नाही! त्या पेढीवरच्या बापूबरोबर माझी मारामारी झाली....त्याच्या भावाने माझ्या डोक्यात काठी मारली.'

'मारामारी!! अहो पण भाऊजी मारामारी का केलीत तुम्ही? आणि नानांनी का मारलं तुम्हाला? चौदा-पंधरा वर्षांचे लहान का आहात भाऊजी तुम्ही आता मारामारी करायला? काय झालं नीट सांगाल का, माझा जीव बघा कसा टांगणीला लागलाय.

देवघराच्या चौकटी आडून दोन्ही पाय एकमेकांवर ठेऊन वाकून आपला मुलगा भेदरलेल्या नजरेनं आत बघतोय हे कळूनसुद्धा त्याच्याकडे निर्विकार कटाक्ष टाकण्यापलिकडे काय करावे तिला सुचले नाही.

'अहो भाऊजी बोला ना, पुन्हा रडताय काय असे, असं काय करताय भाऊजी'

'वहिनी...तो पेढीवरचा बापू तीन महिन्यांमागे मला म्हणाला, माझ्या स्कीममध्ये पैसे टाक मी तीन महिन्यात दुप्पट करून देतो'

'मग तुम्ही टाकले? टाकले ? टाकले का भाऊजी तुम्ही? अहो बोला ना टाकले का? किती टाकले?

'पाच हजार'

'अरे देवा! काय केलंत हे भाऊजी. अहो ते पेढीवरचे पुंड लोकं माहित नाही का तुम्हाला? आणि त्या बापूंचं घराणं? आजपर्यंत लबाड्या करूनच तर त्यांनी माड्या चढवल्या ना घरावर. आख्या गावाला त्यांचे चोरटे धंदे माहिती आहेत. कितीजणांना आजपर्यंत त्यांनी गोत्यात आणलंय. अब्रू जाऊन फेफे होईल म्हणून कोणी पुढे येऊन बोलत नाही, अहो पण तुम्ही कसे त्यांच्या नादाला लागलात? आणि एवढे पैसे तुम्ही आणले तरी कुठून भाऊजी?'

त्याचे स्फुंदून स्फुंदून रडणे अजूनही चालूच होते. हाताच्या कोपरावर खरचटल्याच्या जखमा पाहून त्याच्यावरच्या मायेनं तिला भरून आलं. धाकटा दीर असला तरी सात वर्षाचा असल्यापासून पोटच्या पोरासारखा तिने त्याला वाढवला होता. त्याची अशी अवस्था पाहून तिच्याही नकळत तिचे डोळे पाणावले. रडता रडताच शर्टाच्या बाहीने डोळे पुसत तो म्हणाला,

'गल्ल्यातून उचलले'

'काssय? भाऊजी तुम्ही नानांना न सांगता गल्ल्यातून पैसे काढलेत. अहो ही तर चोरी झाली. असं कसं करू धजलात तुम्ही? एवढ्या वर्षांचा नानांचा विश्वास तुम्ही मातीमोल ठरवलात, हे काय करून बसलात भाऊजी.'

'मग मी काय करू? नानांना मी किती वेळा तरी पैसे मागितले स्पेअर पार्टाचा धंदा टाकायला, पण ते म्हणतात तुला धंदा करायची अक्कल नाही'

अहो म्हणून आपल्याच घरात चोरी केली तुम्ही?

'मी ते माझ्या चैनीसाठी का गं उचलले होते? तीन महिन्यात दुप्पट झाले की ठेवणार होतो परत गल्ल्यात पण त्या भोसडीच्यांनी दगा दिला.'

'अहो पण म्हणून नानांच्या गल्ल्याला हात घातलात? अजून ह्यांची सुद्धा नानांना न विचारता गल्ल्याला हात घालायची छाती नाही, आणि तुम्ही सरळ..'

'दादाचं काही सांगू नकोस तू मला वहिनी, कपटी आहे तो एक नंबरचा. इथे होता तेव्हा नानांची हाजी हाजी करून नानांना आपल्याकडे फितूर केलं आणि आता शहरात राहून करतोय मजा.

'अहो भाऊजी शुद्धीत आहात का तुम्ही काय बोलताय हे. त्यांनी किंवा नानांनी ऐकलं तर काय वाटेल त्यांना...'

'काय वाटणारे? वाईटच वाटेल ना? वाटलंच पाहिजे. मी पडलो असा शिक्षणाने अर्धवट ना नोकरीची लायकी ना धंद्यासाठी मुद्दल, म्हणून तुम्ही सगळे मला अडवून अडवून घेतात माहितेय मला. नाना तर आजवर कमावलेल्या पैशांच्या राशी नुसते दाबून बसलेत. पोटच्या मुलाच्या भविष्यासाठी चार पैसे लावायचीही त्यांची तयारी नाही. सगळा जीव नातवात.... मला तर ओसरीवरच्या कुत्र्याएवढीही किंमत देत नाहीत ते. तू जेवायला वाढतेस आणि ते तुला अडवत नाही तेवढेच त्यांचे उपकार.'

'तुमचं डोकं फिरलंय का भाऊजी? अहो एवढा का त्रागा करताय? खुद्द वडिलांबद्दल किती वाईट साईट बोलताय? आणि कुठल्या पैशांच्या राशी? जेव्हा तुम्हाला खाता आणि धुता हातही समजत नव्हता तेव्हा माईंच्या आजारपणात पाण्यासारखा पैसा खर्च केला नानांनी. किती खस्ता खाल्ल्या त्या दोघांनी त्यावेळी आणि तुम्ही अशी किंमत करताय आज त्यांची?'

'तुला काही माहित नाही वहिनी, नाना आणि दादा वरून दिसतात तसे आजिबात नाहीत, दोघेही पक्के आतल्या गाठीचे आहेत. तू एक साधी भोळी म्हणून माझ्यावर माया करतेस पण त्यांना तर मी नकोच आहे.
आज नानांना कुठून त्या पाच हजारांचा सुगावा लागला तर त्यांनी मला पेठेतंच गाठून त्याचा हिशेब मागितला. स्कीमचं नाव काढलं तर त्यांनी पेठेत सगळ्यांदेखत माझ्या तोंडात ठेऊन दिली. मग माझंही डोकं गरम झालं, वाटलं, 'असा कसा हा बाप? पैशांपुढे ह्याला पोराच्या अब्रूचीही फिकीर नाही?'
मी म्हंटलं. 'देतो आत्ता आणून तुमचे पैसे आणि फेकतो तुमच्या तोंडावर, मी काही ते गांजादारूवर उडवले नाहीत'.
तर मला म्हणाले 'चालता हो रांडीच्या इथून'.
मी फणफणत पेढीवर जाऊन बापूला पैसे मागितले तर तो माझ्याकडे बघायलाही तयार नाही. मी त्याला परोपरीनं विनंती केली, 'बापू दे रे माझे पैसे, नको मला दुप्पट वगैरे माझे मुद्दलाचे तेवढे दे फक्त, बाकीचे राहूदेत तुला', पण तो साला पैशाचं नावही काढायला तयार होईना मग माझंही डोकं असं फिरलं, अशी तिडीक गेली डोक्यात की धरली त्याची मानगूट आणि तुडवला चांगला. पण तेवढ्यात त्याचा भाऊ काठी घेऊन माझ्या अंगावर धावला. गावातले सगळे हरामखोर लोक नुसते तमाशा बघत होते, एक जण कोणी पुढे येऊन माझी बाजू घेईना. मग मी सगळ्यांना शिव्या दिल्या आणि पळून आलो.'

'मूर्ख आहात तुम्ही भाऊजी म्हणूनच नाना म्हणाले तुम्हाला धंदा करायची अक्कल नाही. तिन्ही त्रिकाळ पेढीवरच्या ज्या माणसांच्या मांडीला मांडी लाऊन तुम्ही बसता, त्यांच्याच नादी लागून तुम्ही बहकलात? त्यांची नाडी एवढ्या वर्षातही तुम्हाला कळू नये ह्यातंच सगळं आलं. स्वतःच्या अर्धवट शिक्षणावर एवढीच दया येत असेल तर कॉलेजच्या बहाण्याने शहरात राहून गुलछबूपणा करत उंडारत होता ते दिवस आठवा जरा. तरी नानांनी एका शब्दानंही तुम्हाला कधी सुनावलं नाही की रागराग केला नाही. तीनदा नापास झाल्यावर कॉलेजात तोंड दाखवायची लाज वाटली तेव्हा माघारी पळून आलात की नाही?
मांजर कितीही डोळे झाकून दूध पित होती तरी सारं जग उघड्या डोळ्यांनी पहातच होतं भाऊजी. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या शहरातल्या पराक्रमाच्या गोष्टी, सिग्रेटी, व्हिडीओ हॉलच्या भेटी नानांना इकडे कळत नव्हत्या?
ह्यांचं शहरात रहाणं एवढंच डोळ्यात खुपतंय तुमच्या तर जा ना तुम्हीही, करा पडेल ते काम, मिळवा पैसे, नाही कोण म्हणातोय? पण अंगाला रग लागेल असं काम उभ्या जन्मात तरी केलंय का तुम्ही? सोसणं म्हणजे काय हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला?
नव्या हमरस्त्यावर मारवाड्यांची नवनवी चकचकीत दुकानं उभी राहिली, पेठेतल्या दुकानांकडे कोणी गिर्‍हाईक फिरकेनासे झाले, बाईबाप्यांनी भरभरून वाहणार्‍या पेठा ओस पडल्या तेव्हा नानांनी मागच्या दिवाळीला लक्ष्मीपुजन करून दुकानाला टाळं लावलं ठाऊक आहे ना तुम्हाला? मग कोण कुठले पुंड लोक तुम्हाला 'तुझा बाप पैशाच्या राशी दाबून बसलाय आणि तुला काही देत नाही' म्हणून सांगतात आणि तुम्ही अक्कल गहाण ठेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवता? अहो हे हिकमती आहेत म्हणून आज आपण दोन वेळचं खातोय तरी! पण त्यांच्याही नशिबी वयाच्या पस्तिशीत शहरात जाऊन मिळेल ती नोकरी करायची वेळ आली की नाही? '

'वहिनी, तू पण त्या दोघांसारखीच मतलबी निघालीस. तुम्ही सगळे माझे वैरी आहात. वैरी आहात माझे सगळे तुम्ही. आज माझी माई असती तर माझ्यावर अशी वेळ आली असती? सांग! सांग! आली असती अशी वेळ? तुम्ही सगळेच माझे वैरी आहात. तुम्ही सगळे! हा वीतभर पोरटा सुद्धा.
मी पण दाखवतोच तुम्हाला आता मी काय चीज आहे ते. ह्या घरावर माझा ही हक्क आहे की नाही? मला धंदा करायची अक्कल नाही म्हणता काय? भांडवलासाठी माझी अडवणूक करता काय? नाही आठवड्यात स्पेअर पार्टाचा धंदा टाकून दाखवला नानांना तर बघशीलंच तू....बघच तू आता मी काय करतो ते.' म्हणत चिडलेला तो रडतरडतंच लांब लांब पावलं टाकत दिवाणखान्यातून ओसरीवर आला. डोक्याला पडलेली खोक एव्हाना पुन्हा भळाभळा वहायला लागली होती. ओसरीवरून लांबच्या लांबच्या ढांगेत त्याने जमीनीवर उडी टाकली. चालतांनाही राहून राहून फुटणारे त्याचे अस्पष्ट हुंदके तिला देवघरातही ऐकू येत होते.

त्याला तसा डोक्यात राख घालून जातांना पाहून तिचं अवसानच गळालं. देवघराच्या दरवाजाच्या चौकटीवर डोकं टेकवतांना मगासारखंच आपल्या पायातलं बळ क्षीण होतंय का वाटून तिनं अडखळतच दरवाजाचा आधार घेतला. मुलगा धावत येऊन तिच्या पायांना बिलगला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवतांना तिला त्याचं 'आज माझी माई असती तर माझ्यावेळ अशी वेळ आली असती?' वाक्य आठवलं आणि अनावधानाने पराकोटीचा मोठा गुन्हा हातून घडून गेल्यानंतर वाटावं तसं कुठलंतरी ठसठसणारं ओशाळवाणं दु:ख उमळून येतंय असं तिला वाटलं,
आज आपण माईंनी शेवटचा श्वास घेतांना आपल्या हातात मोठ्या विश्वासानं दिलेला त्याच्या जबाबदारीचा हातही नकळत झटकून टाकला, असा धगधगत्या रागानं कुठे गेला असेल तो? त्याच्या कपाळावर हळदीची चिमूट धरायचंही सुचलं नाही. उजव्या हाताच्या कोपरावर खरचटलेलं, खालचा ओठही फाटलेला, रागाच्या भरात आपण साधी सायदेखील त्याला ओठांवर लावायला आणून दिली नाही. माई असत्या तर? आपण निर्दयी आपण कोडगे. माईंचा लाडका तो आणि आज आपण असा लाथाडला. डोक्याने तो जरा कोपिष्ट आहे, लहानपासून लाडातच वाढला, लाड तरी कसले होते त्याचे? खाण्याचेच! त्याने काही कुणी असा बिथरत नाही. ह्या पेढीवरच्या लोकांनीच त्याला नाना आणि ह्यांच्याबद्दल फितवलं असणार. नानांशी आपण संध्याकाळी बोलणं केलं पाहिजे.
पण आहे का आपल्यात हिम्मत नानांना प्रश्न विचारण्याची? आजपर्यंत आपण आंघोळीला पाणी काढू का नाना? पानं घ्यायची का नाना? गोळ्या घेतल्या का नाना? याऊपर चौथा प्रश्न विचारला नाही. माई असतांनाही दोन दिवस माहेरी जायचं असलं तरी आपण माईंनाच पुढे घालून देवघराच्या दाराआडून ऐकायचो. आहे नानांशी दाराआडून का होईना दोन सरळ वाक्य बोलायची हिम्मत आपल्यात? आज हे इथे असायला हवे होते.

तेवढ्यात तिचा मुलगा म्हणाला, आई काकांना कोणी मारलं?

'कोणी नाही ! तू माझं काम करतोस एक? पेठेत जातोस? आपले नाना असतील होनरावांच्या दुकानात बसलेले. त्यांना म्हणावं आईनं जेवायला बोलावलं आहे. जातोस?

'जातो, ते होनराव आजोबा मला छोटे शेठ म्हणतात, आणि म्हणतात, एवढा हिशेब कर पाहू! गणितात किती मार्क मिळाले तुला? मग मला तिथून पळून जावसं वाटतं.'

'अरे ते प्रेमाने विचारतात, आपल्या नानांसारखेच नाही का तेही?. तुझ्या बाबांना खूप मानतात बरं ते. त्यांना कोणी मूलबाळ नाही म्हणून ह्यांचा फार लळा होता त्यांना.

'पण मग मी त्यांना कितीवेळा सांगतो मला नेहमी पैकीच्या पैकी मिळतात गणितात, तर ते मुद्दाम म्हणतात, बापासारखाच हुशार आहेस लेका, तुझ्या आजोबांनं तुझ्या बापाला दुकानात अडकवला नसता तर तुझा बाप शहराच्या गावात आज मोठा ऑफिसर असता पण त्यानं काही ऐकलं नाही माझं तेव्हा आणि आता बसलाय पतसंस्थेत कारकुनाची नोकरी धरून.
मग नाना लगेच तिथून उठतात आणि घरी येईपर्यंतपण माझ्याशी काही बोलतच नाहीत'

'बरं बरं जा बरं तू आता, आणि नानांना घेऊनच ये, जा पटकन. तोवर मी भात टाकते.'

'आणि फोडणीचं वरण पण, मला ते साधं वरण नको'

'बरं बरं फोडणीचं करते, आता जातोस का?'

'हो जातो'

तो दरवाजातून बाहेर पळतांना त्याच्या पाठमोर्‍या, शिडशिडीत गोर्‍या मांड्यांकडे बघतांना तिला भरून आलं. काही झालं तरी हा शेवटचा किरण, ही शेवटची आशा जीवापाड जपायची असं ठरवून ती लगबगीनं तांदुळ काढण्यासाठी उखळावरची परात घेऊन पुन्हा धान्याच्या खोलीकडे वळली.

क्रमशः

गुलमोहर: 

कथेचा श्रीगणेशा सुरेख. बारीकसारीक हालचालीचे टिपण अप्रतिम. पुढचा भाग येऊ द्या लवकर.

सुरुवात मस्त्...शैली खुप आवडली. सगळे चित्र डोळ्यासमोर आले. लवकर पुढचा भाग टाका.

शैलजा, (चमनची माफी मागून) शनिवारी बारा एवेएठि ला चमन पुढच्या भागाचं वाचन करणार आहे. त्याची परवानगी घेऊनच मी सोमवारी तो इथे टाकेन. काळजी करु नका, परवानगी लेखी म्हणजे टिश्यु पेपरवर वगैरेच घेईन. Wink

Pages