ने मजसी ने परत मातृभूमीला

Submitted by प्र-साद on 22 December, 2009 - 03:21

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद किना-यावर लिहिलेल्या ' ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला.. ' या काव्याला १० डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण झाली.

शंभर वर्षानंतर आजही या ओळी अंगावर रोमांच उभे करतात आणि आत खोल कुठेतरी प्रेरणेचे स्फुल्लिंग जागृत करतात. ब्रायटनच्या किना-यावर चिंतन करत असताना, तात्यारावांच्या मनात आत मातृभूमीची ओढ लागली होती. त्या भावनावेगातच त्यांना हे उत्कट काव्य स्फुरले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र निरंजन पाल होते.

२७ मे १९३८ रोजी ' मराठा ' या वृत्तपत्रात हे काव्य प्रसिद्ध झाले. भा. द. खेर यांनी लिहिलेल्या सावरकरचरित्रात तात्यारावांनी १० डिसेंबर १९०९ रोजी हे काव्य लिहिल्याचा उल्लेख केला आहे.

या शतकपूर्तीनिमित्त सावरकरांच्या ओजस्वी शब्दातील या संपूर्ण काव्याचे हे शब्दस्मरण...

---------------------सागरा , प्राण तळमळला----------------------------
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा , प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा , प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला...

गुलमोहर: 

परदेशी गेल्यावर समुद्रकिनारी उभे राहून पहाताना त्या समुद्रापलिकडे दूर आपला देश आहे हे पाहून ज्याच्या ओठावर हे गीत येते तो मराठी माणूस अशी व्याख्या करायला हरकत नाही.

तो बाल गुलाबही आता रे
फुलबाग मला हाय पारखा झाला

हे काव्य स्फुरायच्या आधी त्यांना त्यांचा मुलगा वारल्याचे पत्र मिळाले होते. त्या विमनस्क अवस्थेत त्यांनी हे अजरामर गीत लिहीले.