विकतचा पुरस्कार..... अन् बंड्याची समाजसेवा....

Submitted by kalpana_053 on 21 February, 2008 - 20:16

बंड्या, अरे तुझे पिताश्री रो...ज देवळातील घंटेप्रमाणे ठणठण ओरडताहेत..... बंड्याला घरच्या कोणत्या ना कोणत्यातरी उद्योगावर पाठव म्हणून..... अन तू ऐकतच नाहीस..... अरे.... चार बुकं शिकलास..... आता धंदापाण्याचं बघायला नको का? नुसत्या बापाच्या इस्टेटीवर तुला कोण पोरगी देणार रे? सध्याच्या मुली खूप शहाण्या झाल्यात बंड्या.... बापाच्या इस्टेटीकडे पाहून मुलाला पोरगी द्यायचे दिवस गेले आता....." आई बंड्याला रोजच्या दुधाच्या रतिबाप्रमाणे बंड्या दिसताच ओरडण्याचा अखंड रतिब टाकीत होती.
"काय गं आई? रोज तेच तेच.... अन ते....? मी कितीवेळा सांगितलं मला सामान्य माणसारखं तेच ते काम करायचं नाही.... मला कोणत्याच धंद्यात इंटरेस्ट नाही.... मला राजकारणात इंटरेस्ट आहे... मला पुढारी व्हायचंय..... बस आपण त्याशिवाय काहीही करणार नाही...." बंड्यानेही रोजच्या आईच्या ओरडण्याच्या रतिबावार तीच ती रोजची धार टाकली.
थोड्याच वेळात बंड्या वैतागूनच बाहेर पडला. आज या विषयाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा असा त्याने विचार पक्का केला. बाहेर पडताच रिकामटेकड्या मित्रांनी त्याला घेराव घातलाच. पैसेवाला बंड्या आपल्या स्मार्ट दिसण्याने ..... गोड बोलण्याने व पैशाने मित्रांमध्ये चांगलाच प्रिय होता. आज बंड्याच्या चेह-यावरची नाराजी पाहून मित्रांनी त्याला हटकले.....
"फूल से चेहरेपर ये मायूसी क्यू?"
"अरे चेष्टा बास झाली हं .... मी सिरियस आहे...." बंड्या उदासपणे म्हणाला.
"अरे हा सिरियस आहे.... याच्यासाठी एक ऍब्युलन्स बोलवा कुणीतरी पटकन..."
बंड्याच्या एका मित्राने त्याला हसवण्याचा प्रयत्न केला. बंड्याला खूष ठेवण्याची त्याच्या मित्रांमध्ये चढाओढ लागलेली असायची....
"अरे बापाच्या पाच-सहा धंद्यापैकी कोणत्याही धंद्यावर जायला लाग म्हणून माझ्या आईनं माझ्या मागं दट्ट्या लावलाय. आपल्याला काय धंद्याची आवड नाही. आपल्याला जायचंय राजकारणात.... सध्या "राजकारण" धंद्याला खूप जोर आहे..... फक्त प्रश्न पडलाय या राजकारणात डायरेक्ट एंन्ट्री मला कशी मिळणार याचा...? बंड्या म्हणाला.
"अरे बंड्या, आतापासून समाजसेवा करायला लाग हळूहळू.... ५-७ वर्षात जाशील राजकारणात.... नाहीतर एद्खाद्या राजकारणी माणसाची मुलगी बायको म्हणून कर.... सास-याच्या अंगावर काही प्रकरण शेकलं की तो तुला घेइल राजकारणात ओढून....!!" बंड्याचा एक मित्र म्हणाला.
"छे छे....! मला तर एवढ्यात लग्न करयाचच नाही..... आपल्याकडे भरपूर पैसा आहे... काहीतरी अशी जादू व्हायला हवी..... अन एकदम यावेळचं नगरसेवक पदाचं तिकीट मला मिळायला हवं...... मग ते कुठल्या का पक्षाचं का असेना.... आपल्याला कोणत्याही पक्षाच्या ध्येय्-धोरणाशी काहीही देणं-घेणं नाही.... फक्त तिकीट मिळालं की झालं....."बंड्या म्हणाला.
"अरे वेडा का खुळा तू? नगरसेवक म्हणून उभा राहताना तुझ्या समाजसेवेची भली मोठी यादी किमान वॉर्डातल्या मतदारांना द्यावी लागेल. त्याचं तू काय करणार? तिथं डिग्री नसली तरी चालते..... पण समाजसेवेच्या भरपूर डिग्री लागतात...." बंड्याचा एक मित्र म्हणाला.
"अरे सध्या पैशानं काहीपण विकत घेता येतं.... चग हे मॅनेज करता येणार नाही क? अजून निवडणूकीला एक वर्ष आहे. तोपर्यंत गोष्टी जमवून घेऊ की आपण सर्व.... तुम्ही कशाला आहात माझे मित्र?" बंड्या उत्तरला.
"अरे बंड्या, तुला एक आयडिया सांगू का? गावात एक मोठी नावाजलेली संस्था आहे.... सध्या त्यांचं झालंय "नाव मोठं, लक्षण खोटं" अशी अवस्था.....! त्यांना सातत्याने पैशाची गरज असते. त्यामुळे त्यांना तू ५०,००० रु. ची देणगी दिलीस की ते तुला त्यांच्या संस्थेतर्फे "समाजसेवा" पुरस्कार बहाल करतील..... पण फक्त संस्था नावाजलेली असल्याने त्यांना किमान दिखाऊ का होईना..... तुझ्या समाजसेवेचे दहा फोटो व त्याची माहिती द्यावी लागेल. ते कसे शक्य आहे?" बंड्याच्या एका मित्राने उत्साहाने बंड्याला माहिती पुरवली.
"बंड्या, सध्या आई सोडून बाजारात काहीही विकत मिळ्तं. शाळेत्-कालेजात ऍडमिशन, नोकरी, प्रमोशन, प्रसिद्धी, अगदी वेळ पडली तर अवयवसुद्धा..... काहीही विकत मिळ्तं...." बंड्याचा दुसरा मित्र बोलला.
"अरे पैशाचा प्रश्न नाही.... आपण लवकरात लवकर १०-१५ समाजसेवा करून टाकू की....! आहे काय अन नाही काय...? आपल्या वॉर्डात कोणकोणत्या समाजसेवांची प्रकर्षाने गरज आहे ते शोधून काढा रे मित्रांनो....!" बंड्या मित्रांना म्हणाला.
सर्वांना समाजसेवेच्या शोधात बंड्याने धाडले. प्रत्येकाला थोडेफार पैसेही खर्चासाठी त्याने दिले. पण आता माधार घ्यायची नाही असे त्याने पक्के ठरवले. लवकरात लवकर राजकारणात प्रवेश करायचाच.... बंड्याने निश्चय केला. "एखाद्या मोठ्या पुढ्या-याच्या उपस्थितीत बंड्याचा पक्षप्रवेश" असे चित्र बंड्याच्या नजरेसमोर दिसू लागले. स्वप्नामध्ये त्याला नगरसेवक,..... नगराध्यक्ष.... आमदार.... खासदार... अशा चढत्या कमानी दिसू लागल्या. प्रथम पैशासाठी वडिलांशी बोलायला हवे असा विचार त्याच्या मनांत आला. त्याप्रमाणे वडिलांना त्याने आपाली योजना समजावून सांगितली. त्याचे राजकारणी वेड ऐकून वडिलांना खूप हसू आले.
ते म्हणाले, "अरे बंड्या, राजकारण हे आपलं काम नाही. आपल्या सात पिढ्यांनी कधी राजकारणाचा "र" पाहिला.... ऐकला नाही आणि अशासाठी समाजसेवेचा पुरस्कार विकत मिळवायचा.... वेडा का रे तू? असा समाजसेवेचा पुरस्कार कधी विकत घेता येत असतो का रे? त्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं.....!"
त्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु बंड्या काही केल्या ऐकेना..... त्याने वडिलांना सध्या काय काय विकत मिळू शकते हे समजावून सांगितले. बंड्या रडण्याचे नाटकही करु लागला..... घर सोडण्याची धमकी देऊ लागला. शेवटी आपल्या एकुलत्या एक पोराच्या हट्टापायी बंड्याचे वडिल पुत्रहट्टाला तयार झाले. त्याला नगरसेवक पदाला उभारण्यासाठी व निवडणुकीच्या खर्चासाठी त्यांनी दहा लाख रुपये देण्याची तयारी दाखावली. परंतु निवडून आला नाही तर मुकाट्याने घरच्या धंद्याला लागायचे ही अट घातली. बंड्याने आनंदाने होकार दिला अन बंड्या स्वतच्या "राजकारण" प्रवेशाच्या उद्योगाला लागला.
प्रथम बंड्याच्या डोळ्यासमोर भाजीविक्रेत्याप्रमाणे समाजसेवेचा पुरस्कार विकणारे संस्थेतील क्रर्मचारी डोक्यावर घमेले घेऊन..... त्यात मानपत्र व मेमोंटो घेऊन "पुरस्कार पहिजे का..... हो पुरस्कार?" असे चित्र दिसू लागले. अन निवडणुकीचा फौर्म भरतो असे त्याला होऊन गेले. प्रथम तो समाजसेवेचा पुरस्कार देणा-या संस्थेत तो जाऊन भेटला. तो पोरस्कार त्याला निवडणूकीत बराच कामाला येणार होता. आधी कळल्याप्रमाणेच किमान दहा समाजसेवी कार्ये व त्यांचे फोटो.... माहिती व ५०,००० रुपये दिले तर ती संस्था "समाजसेवी पोरस्कार" द्यायला तयार होती. पण समारंभाचा खर्च बंड्याने करायचा ही देखील अट होती. बंड्याला सर्व काही मंजूर होते. रातोरात प्रसिध्द होण्यासाठी तो कशालाही तयार होता.
मित्रांच्या मदतीने त्याने प्रथम कार्पोरेशनच्या शाळेतील मुलांना गणवेष वाटप करून टाकले. "शाळेतील गरीब मुलांना गणवेष देताना बंड्या" असे भरपूर फोटोही काढून घेटले. त्याच्या जवळच्याच भागात एक दंधासाठी त्यांना योग्य असे प्रशिक्षण देणारी संस्था होती. अंधांना स्वतच्या पायावर उभे करणे हा त्या संस्थेचा उद्देश होता. तो एका मित्राला म्हणाला, "अरे, बाजारात सध्या फेमस असलेली १००-१५० पोस्तके आणा रे..... आपण ती दंधसंस्थेत सेऊन टाकू....."
बंड्याचे मित्र एकदम जोरजोरात हसू लागले. एक म्हणाला, "अरे बंड्या, राजकारण प्रवेशासाठी तू किती आंधळा झालाय्स रे.....! अरे अंधांना दिसत नाही अन तू त्यांना वाचायला पुस्तके देणार? काय बंड्या.....?"
बंड्या वरमला.....
"सौरी सौरी....! अरे माझ्या लक्षातच आलं नाही...... आपण प्रत्येकाला ऍकायला छोटे छोटे रेडिओ व पांघरायला चादरी देऊ...."
ठरल्याप्रमाणे बंड्याच्या हस्ते रेडिओ व चादरी देऊन बंड्याची समाजसेवा देखील फोटोत व केमे-यात बंदिस्त करण्यात आली. परंतु त्यावेळी अंधांनी त्याच्या हात हातात घेऊन बंड्याला दिलेले धन्यवाद बंड्याच्या डोळ्यात नक़अत अश्रू आणून गेले.
त्यानंतर बंड्याने एका ब्लड्बेकेला बरोबर घेऊन वौर्डामध्ये रक्तदानाचा प्रोग्राम घेटला. बंड्याचे मित्र बंड्या आणि आजूबाजूचे असे मिळून ५० बाटल्या रक्त जमा झाले. यावेळीही बंड्याने रक्तदान करताना फोटो काढण्यात आले. सुंदर हस्ताक्षर असलेल्या बंड्याचा मित्र त्याच्या समाजसेवेची वर्णने लिहून ठेवत होता. अधून मधून वर्तमानपत्रामधून त्यास प्रसिद्घीही देत होता. गरीब मुलांची फीही बंड्याने भरून टाकली. ८-१० कामगारांना कामाला लावून वौर्डामधील परिसर स्वच्छ कारून घेतला. वृक्षारोपणाचा कार्यक्रमही करून टाकला. काही गरीब वृद्ध मंड्ळींच्या डोळ्याला असलेल्या मोतीबिंदूची औपरेशन्सही करून टाकली. आता मात्र बंड्याला खरोखरच आजूबाजूचे लोक दुवा देवू लागले. त्याचे समाजकार्य पाहून बंड्याची आई देखील आजूबाजूच्या मैत्रिणीत भाव खावू लागली. वडिलांची पण छाती फुगुन आली. बंड्याचा "बंडोपंत"झाला. कुणाचे काही सरकारदरबारी काम असेल तर बंड्या स्वखर्चाने ते करु लागला. कुणाच्या घरी 'मयत' झाली तरी बंड्या पुढाकार घेऊन स्वखर्चाने जबाबदारी पार पाडू लागला. यावेळचे वौर्डामधील सार्वजनिक उत्सव देखील बंड्याने उत्साहात पैशाचा वापर करुन केले.दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र यामध्ये सढळ पैशाचा वापर करून बंड्याने धामधूम उडवून दिली. अनेक स्पर्धा घेतल्या. स्पर्धकांना पारितोषिके दिली. अगदी सहभागाची पारितोषिकेही दिली..... पैशाला काही कमी नव्हतेच. आता तर बंड्याचे वडिलही बंड्याच्या राजकारण प्रवेशाला आतूर झाले होते. बंड्याच्या शोधकार्यातून होणा-या समाजकार्याला व त्याच्या फोटोंना काही कमी नव्हती. अखेर सहा महिन्यात बंड्या वौर्डामध्ये चांगलाच प्रसिध्द पावला. बंड्या आता भाषाणबाजीही छा करू लागला होता. हिंदीही छान बोलू लागला होता. प्रत्येक भाषणात ..... "महात्मा गांधी व माऊस ही जात व मानवता धर्म" हे आवर्जून सांगू लागला. या दरम्यान बंड्याचा वाढदिवसही ब-याच उपक्रमांनी साजरा झाला. त्याला शुभेच्छा देणारी मित्रमंडळींची पण बंड्यानेच खर्च केलेली मोठमोठी होल्डींग्ज जागोजागी दिसू लागली. टीव्हीवरही बंड्याने शुभेच्छांचा पाऊस पाडून घेतला. आता बंड्याने छानपैकी स्वतच्या समाजसेवेची माहिती व फोटो यांची फाईल तयार करून "त्या" संस्थेकडे पाठवली. आणि हो.... त्याबरोबर ५०,०००रु. देणगीचा चेकही.....! सत्कार समारंभाची तयारी.... जबाबदारी मात्र बंड्याच्या मित्रांनी घेतली. यामध्ये आपण असणार नाही.... दिसणार नाही याची काळजी मात्र बंड्याने जाणीवपूर्वक घेतली. छान सत्कार समारंभ पार पडला. बंडोपंतांचे खूप कौतुक झाले. ब-याच पत्रकारांना संस्थेने व बंड्याच्या मित्रांनी बोलावले होते. वौर्डामधील नागरिक व त्याने मदत केलेले हितचिंतकही तेथे जमा झाले होते. चहापाणी.... जेवणाची व्यवस्थाही बंड्याकडून उत्तम ठेवली गेली होती. याद्वारे नागरिकांच्या पोटातील तळीरामही बंड्याने शांत केला होता. बंड्याला संस्थेकडून "समाजसेवा केल्याबद्दल मानपत्र व स्र्‍मृतिचिन्ह " देण्यात आले. सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडला. मानपत्र व स्र्‍मृतिचिन्ह घेताना मात्र बंड्याचे डोळे पाणावले. "आपण खरंच हा पुरस्कार घेण्यास लायक आहोत का?" हा प्रश्न्न बंड्याला गोचिडाप्रमाणे चिटकून त्रास देत राहिला. दुस-या दिवशी गावातील बहुतेक सर्व वृत्तपत्रांमधून बंड्याच्या समाजसेवा पुरस्काराची बातमी फोटोसहित छापून आली. त्याने केलेल्या समाजसेवेचे वर्णनही त्यात होते. ज्या गोष्टीसाठी केला अट्टाहास.... ते स्वप्न आता जवळ दिसत असतानाच बंड्याला मात्र अपराधी भावनेने ग्रासले. अगदी जवळचे मित्र सोडले तर या गोष्टीची कुणाला कल्पना नव्हती. ते मित्र त्याने या नैराश्येतून बाहेर यावे यासाठी खूप प्रयत्न करत होते. पण बंड्याचे मन मात्र ठिकाणावर नव्हते. शेवटी बंड्याला बरे वाटावे म्हणून त्याच्या दोन मित्रांनी "मुन्नाभाई एमबीबीएस्..."ची तिकीटे आणून बंड्याला घेऊन ते सिनेमाला गेले. बंड्याल सिनेमामध्येही अपराधी भावना सतावत होती. मुन्नाभाई प्रमाणे आपल्याही समाजसेवेचा पाया 'खोटेपणा'वर अवलंबून आहे ही भावना त्याला त्रास देत राहिली. वडिलांच्या पैशाच्या जोरावर समाजाच्या डोळ्यात धूळ चारुन विकत मिळवलेला हा 'समाजसेवा पुरस्कार' त्याला आता नकोसा वाटू लागला. तो पुरस्कार परत करावा व समाजाची जाहीर माफी मागावी असा विचार बंड्याच्या मनांत येऊ लागला.
सिनेमाहून घरी परत येताना रस्त्यात एका ठिकाणी त्याने खूप गर्दी पाहिली. त्याने गाडी थांबवली. गर्दीमध्ये शिरुन पाहीले...... एक तरूण माणूस बाईकची धडक लागून, डोक्यास मार लागून रक्तबंबाळ झाला होता. नेहमीप्रमाणेच बाईकवरील माणूस मात्र पळून गेला होता. त्या तरुणास मात्र कोणीही हौस्पिटलमध्ये नेण्यास तयार नव्हते. "पोलीसांच्या जंजाळ्यात कोणी अडका?" असा बहुतेक सर्व विचार करत होते.... पूर्वीचा बंड्या असता तर नक्कीच तेथून गुपचूप निघून गेला असता.... परंतु विकतच्या समाजसेवा करून खरा पाझर फुटलेल्या बंड्याचं मन विषण्ण झालं..... त्यानं तातडीनं त्या माणसास मदत मिळाली तर त्याचे प्राण वाचतील हा विचार करून त्या माणसाला मित्रांच्या सहाय्याने गाडीत घातले..... हौस्पिटलला पोचवले.... त्याच्या खिशातील मोबाईल.... पत्त्यावरून त्याच्या घरी कळवले.... वेळेत हौस्पिटल मध्ये दाखल केल्याने त्या माणसाचे प्राण वाचले..... त्या माणसास शुध्द येइपर्यंत बंड्या हौस्पिटल मधून हलला नाही..... पैशाची तर मदत त्याने केलीच.... परंतु माणुसकीची सतत जाण ठेवली.....
तो माणूस शुध्दीव्र आल्यावर त्याच्या व त्याच्या घरच्यांच्या डोळ्यांत बंड्याप्रती दिसलेल्या कृतज्ञतेच्या अश्रूंनी बंड्याच्या मनावर "हीच खरीखरी समाजसेवा" ही अक्षरे सुवर्णाक्षरात नोंदवली गेली.....!! ते दिसलेले कृतज्ञतेचे अश्रू त्याला जगातील खूप मोठ्या पुरस्काराप्रती भासले..... आता मात्र राजकारणात प्रवेश न करताही "समाजसेवा" मात्र करूच हा विचार बंड्याच्या मनांत घर करून राहिला.....
राजकारण प्रवेशाची बंड्याच्या मनांतील लाट वास्तवांच्या निखा-यांनी विझून गेली. समाजसेवेची आस फक्त मनांमनांत भरून रहिली.....
सौ. कल्पना रमेश धर्माधिकारी......

गुलमोहर: 

कथा आवडली विशेषता , कथेचा मध्य आणि शेवट जास्त आवडला

---------- गणॅशा

असेच समाजसेवक तयार होवोत. राजकारण विसरुन केलेली सेवा समाजसेवा. शेवट छान आहे कथेचा.

फार सुन्दर कथा लिहिताय. पुढ्च्या कथेचि आतुरतेने वाट पहतिये.

बंड्यात झालेला बदल जाणवतो. मांडनी पण आवडली.

गोष्ट, कल्पना, आवडली. छान.