देशी दारुचे दुकान आणि माझा आध्यात्मिक साक्षात्कार....

Submitted by धुंद रवी on 14 December, 2009 - 09:41

कुतुहल हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. कुतुहलच्या वाटेला गेलं की होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं.....
नव्हत्याचं... मुळीच नव्हतं होतं.
ह्या कुतुहलाच्या नादात माणसाला पार बरबाद होताना पाहिलय. आजपर्यंत ह्या कुतुहलापायी मी कित्येकदा मार खाता खाता राहिलोय..... (........आणि कित्येकदा खाल्लायही !!)

लहानपणी ट्रॅफीक पोलीसाची शिट्टी वाजवल्यावर काय होतं... कसं वाटतं ? ह्याचं कुतुहल असायचं. मग एकदा हळुच त्याचं लक्ष नसताना वाजवुन पाहिली. प्यायच्या पाण्याच्या पिंपात सोडलेले मासे नळातुन बाहेर येतात का ते पाहिलं. (येतात... विशेषतः जर वडलांनी ग्लास धरला असेल तर... येतातच.) दिवसातले २८ तास अभ्यास करायला लावणा-या हेड्मास्तरांची मुलगी रविवारी काय करते हे तिला पत्रातुन विचारुन पाहिलं. (त्याचं उत्तर परिक्षेच्या पेपरवर मिळालं.) १२०-३०० तंबाखुचं पान खाउन गिळुन पाहिलं, एकच वेळेला बिडी, सिगारेट आणि सिगार ओढली तर काय होईल...(नको.. नको त्या आठवणी...) हे पाहिलं. भावांची माहिती न काढताच मुलींना त्यांची माहिती विचारुन पाहिली. सर्कशीसाठी आणुन ठेवलेल्या अस्वलाच्या पिंज-याचा दरवाजा...... असो....

.........पण ह्या प्रत्येक वेळेला मार खाता खाता राहिलो. (मार खाल्लेली कुतहलं इथे लिहणे इष्ट नाही, हे सुज्ञांना कळाले असेलच.) तेंव्हापासुन मनातलं कुतुहल दाबुन मी नाकासमोर चालत आलोय.... अगदी परवा परवा पर्यंत !

पण परवा मी पडलोच. परवा कुतुहलानी मला गाठलंच... मोह आड आलाच..... पाऊल वाकडं पडलंच.... माझ्या घरी येण्याच्या वाटेवर मला दोन अशी मोहाची दोन वळणं येतात. ज्या वळणांवर वळुन त्या वाटेवर हरवुन जावंसं वाटायचं...

एक म्हणजे....
रामदासस्वामींचा मठ ! (नाही... नाही.... हे ते रामदासस्वामी नाही... हे स्वामी म्हणजे रा. म. दासस्वामी. रामय्या मलिंगप्पा दासस्वामी. मागच्याच्या मागच्या जन्मी ते तुकाराम महाराजांच्या कोणाचेतरी कोणतरी होते म्हणे.... म्हणे म्हणजे तिथं गेल्यावर असे लोक म्हणाले. असो). ह्या मठात एकदा तरी नक्की काय होतं हे मला पाहायचंच होतं.

आणि दुसरं मोहाच वळण म्हणजे...
देशी दारुचे दुकान... दुकान म्हणजे फक्त देवाण नाही... घेवाण सुद्धा... म्हणजे देशी दारुचा गुत्ता !

तर मी काय सांगत होतो.... परवा माझं पाऊल वाकडं पडलंच....
त्या पहिल्या वळणावरच्या मठात घाबरत घाबरत मी आत गेलो. एकट्यानीच कुठे अनोळखी ठिकाणी जायला भिती वाटते हो.... आत गेलो आणि बघतो तर ही गर्दी... घाबरलोच. माझ्यासारखेच अनंत भक्तगण तिथे एकमेकांवर उच्छ्वास सोडत उभे होते. आत जाताच एका माणसानी मला कोप-याकडे बोट दाखवुन "आधि... शेवाळे महाराज" असं सांगितलं.
तिकडे गायीच्या तोंडाचा एक दगडी नळ होता. मला वाटलं की गरम पाण्याचं जिवंत कुंड असेल. तिथं खाली तर ग्रीन मार्बल बघुन वाटलं की इथे बहुतेक शेवाळे महराजांनी जिवंत समाधी घेतली असेल. त्या संगमरवरावर पाय ठेवतो तर काय.... ज्ञानेश्वरांच्या भिंतीसारखं आपोआप, पाऊल न उचलता त्या नळापर्यंत पोहचलो. पण तिथं आपोआप न थांबता एकदम त्या नळावरच्या गायीच्या शिंगावर आपटलोच. कपाळावर टेंगुळ आलं. मग कळालं की ग्रीन मार्बल वगैरे काही नाही तिथे शेवाळं साठलय. मला टेंगुळाचा प्रसाद देणा-या त्या हलकट माणसाला मी शोधायला लागलो. पण तो केंव्हाच त्या अनंतात विलीन झाला होता. मग मी ही पुढच्या येणा-या माणसाला कोप-याकडे बोट दाखवुन "आधि... शेवाळे महाराज" असं सांगितलं आणि प्रसाद पुढे वाटला. एका पायात ती हिरवी स्लीपर आणि दुस-या पायावर ती मेंदी घेऊन मी रांगेत उभं राहिलो.

"स्वामींना अस्वच्छेतेची खुप चीड ! " अशी बहुमुल्य माहिती मला एका भक्तानी पुरवली. भक्तांच्या पदकमलांनी तिथे हिरवे हिरवे गार गालीचे असे साठत असतील तर कुणालाही चीड येईल.
"हि जागृत वास्तु आहे आणि तुम्हाला इथे ओम सतत जाणवत राहतो." हि दुसरी माहिती मिळते न मिळते तोच एक माणुस गंध घेऊन आला. त्याच्या हातात ओमच्या आकाराचा एक आकडा होता, जो गंधात बुडवुन तो लोकांच्या कपाळावर लावत होता. ते गंध त्यानी इतक्या जोरात माझ्या कपाळावरच्या टेंगळावर लावलं की मला वाटतं ते मागुन पण दिसलं असेल. पण एक खरं झालं की तो ओम मला सतत जाणवत राहिला.

लोक मुर्ख असतात हो.... काय वाट्टेल ते करतात हो. कधी त्यांच अनुकरण करु नये. तिथं एका समाधीबाहेरची साखळी घेऊन लोक कपाळावर लावत होते, डोळ्यांना लावत होते, डोक्यावरुन फिरवत होते. मी पण एका सामाधीबाहेरची साखळी घेऊन कपाळावर लावली आणि सोडुन दिली. ती त्या समाधीवरच्या दरवाज्यावर आपटली. आणि तो दरवाजा च्क्क उघडला गेला. पाहातो तर काय... चमत्कार !!
त्या जागृत समाधीतुन एक जिवंत बाई..... साध्वीच असणार कोणतरी ! "कोन पायजे ?" हे इतक्या भसाड्या आवाजात तिनी मला विचारलं की माझी तंद्री भंग पावली. मग तिथे मठाचा रखवालदार राहतो आणि ती त्याची बायको आहे ही अजुन एक बहुमुल्य माहिती मिळाली.

मिळेल तिथले अंगारे घेऊन लोक भरुन घेत होते, उदबत्त्या हुंगत होते, भंडारा उधळत होते, कुंकु कपाळावर लावत होते. मी पण तिथल्या एका भिंतीवरचं कुंकु कपाळावर लावलं.
लोकं काय असभ्य, बेशिस्त, असंस्कृत, बेजवाबदार, अशिक्षित, बेअक्क्ल आणि आर्वाच्य असतात हो. एक तर मठात येतानाही गुटखा वगैरे खाउन येतात आणि वर कुठही थुंकतात. ते कपाळावर लावलेलं थुंकु... माफ करा... कुंकु धुवायला मी पुन्हा शेवाळे महाराजांकडे गेलो. मग दुस-याही पायावर मेंदी काढुन घेऊन मी पुन्हा रांगेत आणि मग पुन्हा तो कपाळावर ओम कोरण्याचा कार्यक्रम झाला.

तिथं इतकी गर्दी होती की त्या रांगेत घामाघुम झालो. लोक एकमेकांना अगदी चिकटुन चिटकुन उभी होती. घाम आला म्हणुन रुमाल काढायला खिशात हात घातला तर हातात चुन्याची डबीच आली. कुणाच्या खिशात हात घातला होता कुणास ठाऊक ! मग पुन्हा तिथं ठेवायला गेलो तर तिथं आधिच एक डबी होती. मला काय समजायचं ते समजलं. मी गपचुप ती डबी खाली टाकली. ती तिस-याच भक्ताच्या पायावर पडली. त्याला वाटली त्याचीच.
(इथे सगळे भक्तांकडे जोरदार त्रिसुत्री होती. हातात फुलांचा हार, कपाळावर घामाची धार आणि तोंडात तंबाखुचा बार... ) तर त्याला वाटलं की त्याचीच डबी म्हणुन तो मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. त्या मागच्याला वाटलं की तो पहिला नमस्कारालाच वाकलाय. देवाचंच काहितरी म्हणुन तो ही त्याच्या मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. लोकं माकड असतात. कशाला कुणाचं अनुकरण करायच.. ! पण नाही.... मग त्या माणसाच्या मागचा वाकला, मग त्याच्या मागचा.... असं करत करत शेवटचा माणुस एकदम बाहेरच ढकलला गेला. मग तिथं छोटीशी झटापट झाली. त्या गोंधळाचा फायदा घेउन मी हळुच स्वामींच्या खोलीत शिरलो.

आत गेल्यावर रा. म. दासस्वामींचं दर्शन झालं. फॅन्सीड्रेस स्पर्धेत अफजलखानसारखं दिसणा-या कुणी जर तुकाराम महाराजांचा ड्रेस घातला तर कसं दिसेल तसे ते दिसत होते. डोळे मिटुन ते रामदासस्वामी (स्वतःच्याच) मनाचे श्लोक म्हणत होते. मध्ये त्यांनी डोळे उघडले आणि तुकाराममहाराजांचा अभंग वाचला....

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला

हा अभंग त्यांनी तिथं का म्हंटला ते काही कळालं नाही. त्यांना नमस्कार करुन बाहेर पडावं असा विचार करुन मी नतमस्तक होणारच होतो. पण त्याआधिच स्वामींच्या एका शिष्यानी माझं मुंडकं पकडुन त्यांच्या पायाशीच इतक्या जोरात आपटलं की तो कपाळावर कोरलेला ओमसुद्धा खाली पडला. आणि ओम पुन्हा त्या वास्तुतच राहिला.

नुसता ओम पडला असता तर काही वाटल नसतं, पण त्या ओम बरोबराच माझ्य खिशातुन शंभराची एक नोट पडली हो...! ती महाराजांनी उचलुन लगेच खिशात घातली आणि एकदम जोरात ओरडले, " विचार वत्सा, विचार एक प्रश्न "
" ती माझी पडलेली नोट परत मिळेल का ?" असं मला विचारायचं होतं पण त्या शिष्याचा हात अजुनही माझ्या मानेवरच होता. खाजगी प्रश्न त्या गर्दीत विचारणं शक्यच नव्हतं म्हणुन काहितरी विचारायच म्हणुन मी विचारलं की आनंदाचे डोही आनंद तरंग ह्या अभंगाचा अर्थ कळेल का ? तर स्वामी म्हणाले की, " आत्मनंदात आत्मवंचना झालेल्या आत्म्याला आत्मचिंतीत आत्ममननाची जोड दिली तर आत्मपरिक्षणानंतर जन्मणा-या आत्मविवेचनातच आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार आत्म्याला होतो. "
मी त्या शंभर रुपायाच अखेरचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो ते पुन्हा कधी कुतुहलाच्या वाटेला जायचं नाही हे ठरवनुच.... !

पण अनुभवाच्या वळणावर सडकुन आपटुन शहाणा झाला तर तो माणुस कसला ! ते देशी दारुचं दुकान मला बोलावत राहिलं आणि एक दिवस मी दुस-या वळणावर वळालोच. आणि ज्या अभंगाचा अर्थ मला त्या मठात कळला नव्हता तो मला त्या गुत्त्यात कळाला.

त्याचं असं झालं.......................................................

.............मला नेहमी रस्त्यावरुन जाताना तो दारुचा गुत्ता दिसायचा. जाता जाता काही क्षणांसाठी त्या गुत्त्याच्या दरवाज्यावरचा पडदा हलायचा आणि आत दिसायचे सगळे तृप्त चेहरे... समाधानाने ओथंबलेले... सुखाने डोळे काठोकाठ भरलेले.... पराकोटीच्या आनंदात रममाण.... शांत, प्रसन्न, उत्साही जीव... ध्यानमग्न.... आत्मतल्लीन..... पुण्यात्मेच !!
का नाही वाटणार हेवा...? का नाही होणार मोह....? का नाही वळणार पाऊल तिकडं... ? वळालंच एकदा....

गाडी थोडी लांबच लावली आणि चालत चालत त्या ध्यानमंदीराकडे निघालो. कुणी ओळखु नये म्हणुन तोंडावर रुमाल बांधला. छातीत जाम धडधड होत होती पण कुतुहलही तितकच होतं. कच खाऊन मागे वळणार तितक्यात पुन्हा पडदा हलला आणि पुन्हा त्या चेह-यांच दर्शन... मग दारात जाऊन उभं राहिलो.

तुम्हाला खोटं वाटेल पण, दारात दोन बायका दोन बाजुला स्वागताला उभ्या होत्या. ते भरतनाट्यम का कथ्थकला नेसतात तश्या जरीच्या साड्या नेसुन... दोघींच्या लांबसडक वेण्या, अगदी कंबरेपर्यंत.... त्यावर वेगवेगळ्या फुलांच्या वेण्या, चमक्या, वेगवेगळ्या रंगांचे मणी आणि गजरे.... डोळ्यात नीळं काजळ आणि गालावर (आपल्याकडे शाळेत स्नेहसंमेलनात लावतात तसं) गुलाबी रुज का काय ते.... हातात ('त्या लमाणी आहेत काय' असा संशय यावा इतक्या) बांगड्या... पायात जाडजुड पैंजण (त्याला घुंगरु आहेत की घंटा हे मी बराच वेळ पाहत राहिलो पण कळालं नाही).... एकीच्या हातात आरतीची थाळी आणि दुसरी 'प्रभात चित्र'वाल्या बाईसारखी एक पाय मागे दुमडुन फुलं टाकयासाठी तयार....

पडद्यावर पण काय छान छान चित्र असतात ना....!

मग त्या स्वागतानं गहिवरुन गेलेलो मी आत गेलो. आणि आतलं वर्णन काय सांगु महाराजा... ? तिथं जनसागरच लोटला होता. प्रंचंड गर्दी पण गोंधळ अजिबात नाही. सगळ शिस्तबद्ध.... ४ माणसं रांगेत होती... ७ रांगत होती.... ६ वेगवेगळ्या दिशेला तोंड करुन, पायांचे एकमेकांशी विविध कोन करुन बसली होती (हि बसलेली माणसं कुणाशी तरे बोलत होती पण बहुतेकांच्या समोर दुस-याचे पाय, पाठ किंवा भिंत होती. केवढी मानसीक ताकद पहा... कुणी असो नसो फरक पडुन द्यायचा नाही. नाहीतर आपण...)
....आणि सुमारे ११ माणसं अस्ताव्यस्त पडलेली होती...(सुमारे असं म्हणण्याचं कारण की नीट मोजता नाही आली. कोण कुणाच्या वर आहे, कुणाचं अंग कुठलं आहे आणि डोकं कुठंलं आहे काही कळत नव्हतं. मग हात आणि पाय मोजुन पाहिले तर हात २३ भरले आणि पाय २१... म्हणुन सरासरी ११. अर्थात खुप खालची खालची माणसं नाही मोजली. कारण ती मोजताना वेळ जात होता आणि तोपर्यंत रांगत असलेली माणसं पडत असल्यामुळे घोळ व्हायला लागला.)
हसु नकात.... भल्याभल्यांना जमणार नाहीत अशी योगासनं करणारे हे योगी....., (हो मग... योगीच ते... नाहीतर जमिनीवर बसुन, एक पाय स्वतःच्याच गळ्यात, दुसरा पाय समोरच्या बाकड्यावर, त्या पायावर एक योगी-बंधु, मांडीवर एक योगी-बंधु, एका हाताने भिंतीचा आधार घेतलेला आणि दुसरा हात सापडत नाहीये...अशा अवस्थेत मान खाली खाली नेऊन तोंडानी जमिनीवरचा ग्लास उचलायचा... ह्यासाठी कमीतकमी १३८ योगासनं माहित हवीत.)

तर हे सगळे हटयोगी, दिसत असले जरी जमिनीवर, तरी होते सगळे तरंगत. इतक्यात एका महात्म्याने मला टेबल समजुन, (मी आहे थोडा बुटका, त्यात त्याची काय चुक) माझ्या डोक्यावर ठेवलेला ग्लास माझ्यावर अमृताचा वर्षाव करुन गेला आणि मी चिंब भिजलो. आनंदाच्या लाटांवर लाटा उसळत होत्या आणि त्या आनंद-डोहात सगळे चिंब भिजले होते. सगळय़ांच्याच अंगात आनंद इतकाच ओसंडत होता की तुझं अंग, माझं अंग असा फरकच राहिला नव्हता. ह्या वातावरणात मी गहिवरुन गेलो आणि नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले...

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे

कुठे ते दासस्वामी, जे डझनभर शब्द घेऊन सुद्धा मला काहिच समजावु शकले नाहीत. आणि कुठे ही मंडळी, ज्यांनी न बोलताच मला पहिला श्लोक समजावुनही दिला.

माझ्याही नकळत मी रांगेत उभा राहिलो आणि कधी एकदा माझा नंबर येईल ह्याची वाट पाहायला लागलो. मी असं ऐकलं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर सुंदर गोष्टी घडतातच पण ब-याचदा खुप उशिरा. इथे नाही झालं असं... लगेच आला नंबर माझा...
काय आपण उगाच रडतो की महागाई... महागाई... ! इथे १ ग्लास ८ रुपायाला... ५ ग्लासवर २ ग्लास फ्री आणि ७ ग्लास घेतले तर तो ग्लास पण फ़्री... ! मंथली मेंबर्सना चकणा फ़्री... ! लाईफ मेंबर्सना पिक-अप आणि ड्रॉप फ्री... ! नुसता सेल लागला होता तिथं.

मी एक ग्लास घेतला आणि ओठापर्यंत आणला. जवळपास एखादा उंदीर मरुन पडला असणार नाहीतर एवढ्या सुंदर द्रवाचा वास असा येणंच शक्य नाही. मी तो ग्लास कसाबसा ओठाला लावला आणि नेमकं तेंव्हाच २-३ जणांच्या खाली गाडला गेलेला कोणतरी एक फिनीक्स पुन्हा भरारी घ्यायला उठला. मग त्याचा एक जोरदार धक्का मला आणि एका घोटात सगळं कुतुहल पोटात.

....उगाच त्या २६ व्या मजल्यावरुन खाली पडायला नको म्हणुन मी रांगत रांगत एका भिंतीच्या कडेला जाऊन बसलो. आणि मग भास व्हायला लागले किंवा.... किंवा भासही असतील.... नाहीतरी निघायचे भासच ! पण काही का असेना माझ्या कानातली ती भीकबाळी मला टोचायला लागली... डोक्यावरच्या त्या पगडीवरचे मोती कपाळावर आपटायला लागले... हातातलं गुलाबाचं फुल सापडेनाच... मस्तानी मात्र नाचता नाचता मध्येच तिरका डोळा का तिरकी मान असं काहीतरी करुन हसत होती.... मध्येच त्या पाणगेंड्याशी माझी कुस्ती झाली नसती तर मगरीला लोळावलाच असता मी... पण मला एक अजुन कळालं नाहीये की माझा रणगाडा कुणी चोरला....
हळुहळु जरा चढायला लागली आणि मग एकेक दुःख बाहेर पडायला लागली. आणि मी माझ्या बाबतीत आजपर्यंत जे काहिचियाबाही झाल होतं आणि मला आवड नसतानाही त्या अग्निपथावर मी कसा पुढे चालत राहिलो हे त्या भिंतीला सांगितलं. मग भिंत झाली म्हणुन काय झालं... भिंतीलाही कान असतात.
खुप हलकं वाटलं... मोकळं वाटलं... अगदी पिसासारखं... आणि मग मी पुढं पुढं जायला लागलो... अगदी आवडीनं... कसलाही आकस नाही, दुःख नाही... तक्रार नाही....
आता मला तुकाराममहराजांचा श्लोक उमजला.

काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने

जोपर्यंत आपल्या मनातुन आयुष्यात घडलेलं ते काहिचियाबाही आपण कुणाला सांगत नाही तोपर्यंत पुढे आवडीनं नाही चालता येत.
....आणि आपण मुर्ख लोक त्या दारु पिउन बडबडणा-या माणसांना हसतो, जे खर तर समाधानानी चालत असतात... आवडीनं चालत असतात.
आपण... (म्हणजे तुम्ही... स्वतःला शहाणे म्हणवणारे,) नसाल एकटचं बडबडत पण आयुष्याची पाऊलवाट रडत रडत, रखडत रखडत चालता हे लक्षात ठेवा....)

आयुष्याला सामोर जायची लोकांची ती जिद्द पाहिली आणि चेह-यावरचा तो रुमाल नावाचा मुखवटा गळुन पडला. आणि मी आपोआप आवडीने पुढे चालायला लागलो. सुरवातीला दोन पावलं टाकायला पण त्रास झाला मग दोन ग्लास टाकल्यावर हवं तिथं तरंगतच जायला लागलो. आणि मग सुख-दुःख, समाधान-तक्रार, वेडा-शहाणा, जमिन-आकाश, जन्म-मृत्यु असा काही फरकच राहिला नाही.
श्रीकृष्ण गीतेत म्हणतात तेच खरं....
तुम्ही काय आणलय जे हरवेल ? जे घेतलत इथुनच घेतलंत.... जे दिलंत इथेच दिलंत.... (ह्याचा अर्थ दारु इथेच पिऊन ती पुन्हा ओकुन इथेच देणे असा घेऊ नये. ह्यातला गर्भित अर्थ ग्लासमध्ये घ्यावा.) खरं सांगायचं तर जीव जेंव्हा गर्भात असतो तेंव्हाच सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला काय हवय ते त्या गर्भाला बरोबर कळतं आणि ते शोधत तो इच्छित स्थळी पोहचतोही. शेवटी माता एक निमित्त आहे. एक माया आहे. डोहाळे हा एक भास आहे. खरा जिव्हाळा असतो त्या समाधीत... त्या मोक्षात.... आत्म्याच्या प्रतिबिंबात....

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे

.............आणि शेवटाच्या कड्व्याचं म्हणाल तर त्यात मुद्रणदोष आहे. त्या कडव्यातलं पहिल वाक्य ' तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा' असे नसुन, तो श्लोक 'तुका म्हणे घसा ओतलासे ठर्रा' असा आहे. ठर्रा म्हणजे मदिरा. तर तुकाराम महाराज म्हणतात,

तुका म्हणे घसा ओतलासे ठर्रा
अनुभव सरिसा मुखा आला

म्हणजे.... नुसत्या तोंडाला येणा-या वासावरुन दारुचा अनुभव नाही घेता येत, त्यासाठी दारु घश्यातच ओतावी लागते. एकदा का तुम्ही ठर्रा घशात ओतला की अनुभव तुमच्या मुखा आलाच म्हणुन समजा. काय मोठी गोष्ट सांगुन गेलेत पहा बुवा, की अनुभव घेतल्याशिवाय मजा नाही. मला सांगा, घरात बसुन मुसळधार पडणा-या पावसाचा आनंद खिडकीत बसुन मिळेल काय ? त्यासाठी बाहेर जाउन भिजायलाच हवं हो.... नुसतं गाण्याचे नोट्स वाचुन काय हरवुन जाता येईल काय ? त्यासाठी सुरांची नशाच अनुभवायला पाहिजे.
आणि साहेब... ठर्रा म्हणजे तर स्वर्गच की ! पाऊस पडुन जातो, सुर विरुन जातो... पण ठर्रा उरुन राहतो.
जे सगळ्यांना दिसतं ते दाखवतोच, पण जे कोणाला दिसणार नाही ते ही दाखवतो. त्या पडद्यावरच्या बायकांना मी स्वतः आरती ओवाळताना आणि माझ्यावर फुलं टाकताना मी पाहायलय. इथल्या काही योगी युगपुरषांनी तर त्यांचा नाचही पाहायलाय. एकदा याच तुम्ही अनुभव घ्यायला.

मी हल्ली ब-याचदा घेतो...
त्यामुळे हल्ली मला आनंदाचे झटके येतात... तरंगावंसं वाटतं.... स्वत:बद्दल प्रेम, करुणा आणि वात्सल्य दाटुन येतं.... कोणाचा राग येत नाही, हेवा नाही, मत्सर नाही... खरं सांगायचं तर अजुबाजुच्या जगाची जाणिवही नाही... फक्त समाधान आणि तुप्ती.... !

मला सांगा आध्यात्मात अजुन काय मिळतं.... आत्मसाक्षात्कार ह्याहुन काय वेगळा असतो हो...?

हल्ली मी असाच तल्लीन असतो. सगळी कुतुहलं आता शमवलीत पण हल्ली हल्ली ध्यानमंदीरात कुठल्या तरी बाईच्या तमाशाची जोरदार चर्चा असते. तमाशा वगैरेचा आपल्याला नाद नाय करायचा पण कुतुहल म्हणुन गेलोच तिथे तर सांगेनच तुम्हाला लवकर...

तोपर्यंत....

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे

धुंद रवी.

गुलमोहर: 

एक नंबर लिखाण.. खुप खुप हसले...आणि दुस-या पायावर ती मेंदी घेऊन मी रांगेत उभं राहिलो.
>>>> खुप सही!!! आता दारूच्या गुत्त्याचा किस्सा पण पटकन येऊद्या... भक्तगण दुस-या पायावर ती मेंदी घेऊन ऊभे आहेत.. Rofl

रवी,

"पहिल्या दुकानात" न जाता थेट "दुसर्‍या दुकानात" गेला असता तर दुसर्‍या/तिसर्‍या पेल्यात ब्रम्हानंदी टाळी लागली असती की Happy असो.

तुम्ही दरवेळेस काहीतरी नवीन, वेगळे लिहिता त्यामुळे माझ्या आवर्जुन वाचावे अशा लेखकात तुमचाही समावेश झाला आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे. ( मला "क्रमशः" या शब्दाचा अतिशय तिटकारा आहे :))

(इथे सगळे भक्तांकडे जोरदार त्रिसुत्री होती. हातात फुलांचा हार, कपाळावर घामाची धार आणि तोंडात तंबाखुचा बार... ) Rofl

नेहमी प्रमाणे एकदम मस्त.

Rofl

देशी दारुचे दुकान आणि माझा आध्यात्मिक साक्षात्कार....>>
धुंद रवी >> बर बर. तुझ्या नावाची व्यत्पती कळाली. Lol

>>एकच वेळेला बिडी, सिगारेट आणि सिगार ओढली तर काय होईल...(नको.. नको त्या आठवणी...) >> Lol एकदम टॉम अँड जेरी कार्टूनची आठवण आली.

मस्त लिहिलय, जय हो.

मायबोलीवर नवीन हीरो अवतीर्ण झालाय. तिकडे तो शिरोडकर अन इकडे हा. पोटातली हाडे आता काही हसून हसून जागेवर रहात नाहीत.
लै बम्पर गड्या.
पन क्रमशः आणि ' देखते रहिये , कही जाईयेगा मत 'म्हणणारे लई मानसिक छळ करत्यात बर्का....

Pages