डोम्या म्हणे..... चलो पुणे....

Submitted by कौतुक शिरोडकर on 13 December, 2009 - 10:16

"डोम्या, तुला कळल असेलच, ओबामाना शांततेच नोबल मिळतय." कावळ्याने डोम्याच्या माहीतीज्ञानाची चाचपणी केली.
"हो, पण त्यातली मेख तुला माहीत आहे का ? निवडसमितीच्या लिस्टमध्ये ओबामांच नाव नव्हतचं मुळी." डोम्याने हळूच एक छोटा आपटीबार टाकला.
"काय सांगतोस काय ? " एका कर्कश कावकावसहीत कावळा जागच्या जागी उडाला. (पंख न हलवता)
"ओबामांना प्रेसिडंट होऊन अजून वर्ष झालं नाही, मग एवढ्यातच त्यांच्या शांततेचा साक्षात्कार जगाला कसा काय झाला ? " डोम्याने कावळ्यालाच उलट प्रश्न टाकला.
"मग असं कस झाल ?" कावळा नेहमीसारखाच बुचकळ्यात.
"९/११ नंतर अमेरिकेत नोंद करण्याजोगी एकही आगळीक केली नाही म्हणून शांततेचा पुरस्कार ओसामाला द्यायचं ठरलं होतं. पण क्लार्कने टायपिंग मिस्टेक केली आणि 'सा'चा 'बा' केला. नोकरशाहीने आपली चुक रितसर दडवली. तुला सांगतो, जगात कुठेही जा, नोकरशाही पळसाच्या पानासारखीच." डोम्याने एक आंतरराष्ट्रीय गुपित फोडले.
"काय सांगतोस काय ? पण हे तुला कसं माहीत ?"कावळ्याने स्वरात संशय पेरून विचारलं.
"त्यादिवशी मी तिथेच होतो. दारुच्या नशेत तो क्लार्क त्याच्या नवव्या मैत्रिणीकडे सगळं बरळून गेला." डोम्या तो संशय सहज धुडकावला.
" अरेरे... दारू वाईट आणि पिऊन सिक्रेट बरळणं तर त्याहून वाईट." कावळ्याने तळीरामांच्या दुखण्यावर हात ठेवला. " बरं, मी असं ऐकलय की ओबामा महात्मा गांधीचे भक्त आहेत ? " कावळ्याने ऐकीव माहीती पक्की करण्याच्या दृष्टीने डोम्याला विचारलं.
"हिच तर गंमत आहे. गांधी जेवढा परक्यांना कळला तेवढा आपल्या लोकांना कळलाच नाही. आता मला सांग, नोटेवर गांधीजींचा फोटो का लावला ? नेहरूंचा का नाही ? " कावळ्याने आपणास फारच 'इंटेलिजंट' प्रश्न विचारला गेलाय अशा आशयाने डोम्याकडे पाहीलं.
"मला असं वाटतं... म्हणजे माझा असा विश्वास आहे... की ते राष्ट्रपिता असल्याने हा सन्मान त्यांना मिळाला असावा." कावळ्याने स्वतःवरच खुष होत उत्तर दिलं.
"तुझं मडकं अजून कच्चचं आहे मित्रा. राजकारणी राष्ट्राला विचारत नाहीत मग पित्याला कोण विचारणार ? दुसरं म्हणजे कोणत्याही व्यक्तीपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ असते. मग त्याचा पिता व्हायचा मान एखाद्या व्यक्तीला कसा देता येईल... इति बाळासाहेब ठाकरे." डोम्याने जुन्या गोष्टी उकरायला सुरुवात केली.
"डोम्या, प्रश्नाचं उत्तर बाजुलाच राहीलं." सवयीप्रमाणे कावळ्याने डोम्याला मुद्द्यावर आणायचा प्रयत्न केला.
"सांगतो. नेहरूनी देशाला गुलाब दिला. त्याचा काय उपयोग ? गुलकंदाने काय होतय ? नुसता थंडपणा. बाकी काहीच नाही. दुसरं म्हणजे कबुतर दिलं. सरकारने जेवढी कबुतरं उडवली त्यांना कसाबने गोळ्या घातल्या. सो.... कबुतरं तशीच जखमी अवस्थेत फिरताहेत. अश्वथाम्यासारखी. पण गांधीजींनी देशाला चरखा दिला." डोम्याने इतिहासातल्या महत्त्वाच्या घटना उलगडायला सुरुवात केली.
"बर मग ? " कावळ्याने डोकं खाजवलं.
"राजकारण्यांनी तेच धरून ठेवलं. चरखा. चरखा म्हणजे स्वावलंबन. स्वतःवर अवलंबून रहा. स्वतःचं काय ते पहा. स्वतःची सोय स्वतः करा. थोडक्यात, स्वतःसाठी, घरच्यांसाठी पार्टी काढा. पक्षाने तिकीट दिलं तर ठिक, नाही तर आपल्या माणसांना घेऊन बंडखोरी करा. स्वतःचा विचार आधी करा...... आता 'चरखा' म्हणजे काय ? 'चर' आणि 'खा'. अवघड शब्दांची नीट फोड करून त्याचा नेमका अर्थ समजून घेण्याची आपली परंपरा आहे. बापूंच्या या मुलभूत शिकवणीचा एका क्षणासाठी विसर पडू नये म्हणून नोटांवर गांधीजी आले. उगाच काय आपला देश भ्रष्टाचाराच्या यादीत पहील्या तिघात आलाय. चरखा आणि चर्चा या दोनच गोष्टी आजच्या राजकारण्यांनी धरून ठेवल्यात. बाकी सगळं केव्हाच सोडलय." डोम्याने चोहीकडे नजर टाकत त्याचा मुद्दा क्लियर केला.
"डोम्या, मित्रा... हे तत्त्वज्ञान चारचौघात मांडू नकोस. हाणतील लोक. बरं, होतास कुठे चार दिवस ?" कावळ्याने संधी साधून विषयांतर केलं.
"पुण्यात." डोम्याने सहज पाय झाडले.
"व्वा ! अरे, पुणे तिथे काय उणे !" कावळ्याने त्यालाही जगाची माहीती असल्याच्या थाटात मागे ऐकलेल्या पु.पु.च्या संवादातले वाक्य फेकले.
"हे मात्र खरे. पुणे तिथे सारेच दुणे !" डोम्याने नवा वाक्यप्रचार पंखासह फैलावला.
"अरे, पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर." डोम्याकडे दुर्लक्ष करत कावळ्याने संवादातले दुसरे वाक्य फेकले.
"त्यातले काही विद्येचे संचालक मात्र सध्या सासुरवाडीच्या मुक्कामी आहेत. अजून काय काय पहावं लागणार ते त्या बालाजीला ठाऊक ?" डोम्याने पाय जोडले.
"बरं, ते जाऊ दे. पुण्याची काही नवीन खबरबात ? " कावळ्याने आपल्या आटलेल्या संवादसाठ्याला बाजुस सारलं.
"हिवाळी अधिवेशन होतं शुक्रवारी." इति डोम्या.
"पुण्यात ? " शंकाग्रस्त कावळा आश्चर्यचकीत.
"हो. मुंडेशप्पथ. शेतकर्‍याच्या आत्महत्या, प्रधानांचा अहवाल, फयानचा गोंधळ, दुष्काळग्रस्तांना मदत... असल्या भयानक जीवघेण्या विषयांवर परिसंवाद झाल्यावर सुकलेला घसा सगळ्यांनी मुंडेच्या जेवणावळीत ओला केला. किती कावळे पोटभर जेवले त्याच्या हिशोबच नाही." डोम्याने शंकासमाधान केलं.
"हो ना, हल्ली लग्नाचा सिझन आलाय ना. जेवायला बर मिळतय." कावळ्याने डोळ्यासमोर जेवणावळ आणली. आठवणीनेच त्याला भुक लागायला लागली. "अरे, तुला आमंत्रण होतं मुंडेंकडे ? "
"पत्रकारांना आमंत्रणाची गरज नसते. दोन्ही घरचा पाहूणा... तुपाशी" डोम्याने लोकशाहीच्या चौथ्या खांबाचं एक छोटसं रहस्य कावळ्याला सांगितलं.
"आणखी काही विशेष ? "
"ज्यांनी ज्यांनी हे रॉयल मराठा वेडींग पाहीलं, त्यांना खात्री पटली की महाराष्ट्राचं जे भयावह चित्र हल्ली सगळे मांडताहेत ते केवळ थोतांड आहे. कल्पित कथा आहेत. विरोधकांच सत्ताधार्‍यांशी मनोमिलन पाहीलं आणि डोळा पाणी आलं बघ." डोम्याने प्रसंगाची आठवण येताच आपला एकुलता एक डोळा पुसला.
"काही काही प्रसंग असतातच तसे. हल्ली पुण्यात म्हणे आयटीला चांगले दिवस आलेत. पण आयटीवाल्यांचे दिवस खराब झालेत." कावळ्याने डोम्याचं दु:ख हलकं करण्यासाठी पुन्हा विषयांतर केलं.
"बर मग पुण्यात विशेष काही पाहीलस की नाही ? "
"पुण्यातला मराठी टक्का संपुर्ण घसरला आहे. पुण्याची मुंबई झालीय." डोम्याने एक सुस्कारा सोडला.
"असं कशावरून म्हणतोस तू ? " कावळा पुन्हा प्रश्नचिन्हात गुरफटलेला.
"पत्रकार आहे मी. पुराव्याशिवाय बोलत नाही. डायरेक्ट शरद पवारांची साक्ष देऊ शकतो. परवाच त्यांच्या वाढदिवसाचा केक चघळलाय मी." डोम्या खैरनारासारखा साक्षीपुराव्यावर घसरला.
"डोम्या नावानिशी बोलतोयस. पण कधीतरी समजेल अशा भाषेत बोल." कावळ्याने खुलासा मागितला.
"पुण्याचं महापौरपद मोहनसिंगाना देण्यात कोणतं 'राजपाल'न झालं तो गुंता सुटायच्या आतच पिंपरी चिंचवड सिंधी समाजाला 'बहल' झाली. मुंबईचा कॉस्मोपॉलेटीन चेहरा आता पुण्याला मिळाला. सगळी जाणत्या राजाची कृपा." डोम्याने ब्रेकींग न्युजच्या थाटात माहीती दिली.
"डोम्या, पुण्यात राहणार्‍या दुसर्‍या लोकांचा अधिकार नाही का त्या पदावर ?" कावळ्याने राजाची बाजू मांडली.
"कसं आहे कावळ्या, इथे महाराष्ट्रात अमराठ्यांचे जेवढे लाड होतात तेवढे दुसरीकडे कुठेच होत नाहीत. आपल्याच घरात पाहुण्यांसारखं राहायची वेळ आणलीय मराठ्यांनी मराठ्यांवर. अल्पसंख्याक झालेत. म्हणून तर आरक्षण मागताहेत. मराठ्यांची गरज फक्त निवडणूकीपुरती. खुर्चीत मात्र सिंग, यादव, रॉय. मुंबईला एखादा मराठी कमिश्नर मिळत नाही. तिथेही पंजाबी, मद्रासी लॉबी. हक्क आणि अधिकाराच्या गोष्टी असतील तर नियम सगळीकडे सारखेच असायला हवेत. नसतील तर 'हक छिनना पडता है'. सृष्टीच्या प्रत्येक नियमाला 'एखादा' अपवाद असतो. पण राजकारण्यांकडे पक्के नियम नाही, नियमावली नाही. आहेत ते नुसते वाद, विवाद आणि अपवाद." डोम्या कळकळीने बोलला. पुण्यामुंबईची मिसळ कावळ्याला पचलीच नाही.
"जाऊ दे रे. हे चालायचचं. ह्या इथले हे प्रश्न सुटायचे नाहीत कधी." कावळ्याने डोम्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.
"सुटलेच समज." डोम्या अचानक विश्वासाने बोलला.
"ते कसे काय ?" कावळा पुन्हा प्रश्नचिन्हांच्या जाळ्यात.
"अरे, महाराष्ट्राची आगामी ग्राहक पेठ दिसतेय मला स्पष्ट." इति भविष्यवेत्ता डोम्या.
"डोम्या, ग्राहक पेठेत प्रश्न सुटतात ?" कावळ्याने अज्ञान प्रकट केलं.
"सुटतात. ग्राहक पेठ बघ कशी खच्चून भरलेली आहे. लोकांचे प्रचंड लोंढे. पहिलाच स्टॉल आपल्या बबनराव पाचपुतेंचा. आदिवासींनी घेरलय त्यांना. बघ ते कसे आवाज देताहेत... 'लोकहो.. मायेचा मोह सोडा आणि मोहाच्या फुलांचा मोह धरा. याचे औषधी गुणधर्म समजून घ्या. सगळ्या रोगावर रामबाण.' तो पुढचा मोठा स्टॉल आपल्या चव्हाणसाहेबांचा. मोठा आहे जरा. व्हरायटी आहे त्यांच्याकडे. ज्वारी, बाजरी, मका....सगळ्याच धान्यांपासून दारु.... सहकारी कारखान्यातली. किलोभर ज्वारी-बाजरीतलं फायबर एका क्वार्टरमध्ये सरळ पिचलेल्या देहात. त्या पुढे आपले पवारसाहेब. अठरापगड जातीच्या फळांची वाईनरी खोलून बसलेत. त्यांचा स्टॉल सर्वात मोठा. व्हरायटींना तोटा नाही. त्यांनी तर सगळे फायदे बॅनरवर लिहिलेत.... रोजगार वाढेल... आदिवासींच जीवनमान उंचावेल..... शेतकर्‍यांना नेमकं कशाच पीक घ्यायचं ते कळेल..... शेतमालाला भाव मिळेल.... वगैरे वगैरे. चोहीकडे फक्त दारूच दारू. त्यामुळे पिण्याचा प्रश्न सुटेल. दुषित पाण्याएवजी हे केव्हाही चांगलं. घ्या, आडवे व्हा. यामुळे भुकेचा प्रश्न सुटेल. राणे म्हणतात तसे मग सगळेच शेतकरी दारूत बुडतील, लोक तारेत तरंगतील... मग कसलं फयान, कोण प्रधान, कुठला कसाब आणि कसला विदर्भ ? शासन सुखी... महसूल....महसूल. जनता दारूत मश्गूल....मश्गूल...."

आणि डोम्या उडाला. कावळा मात्र 'परमीटवर आठवड्याला फक्त दोन बाटल्या दारू मिळणार' या बातमीपत्रावर बसून झिंगत येणार्‍या भविष्याचं सोनेरी स्वप्न पाहू लागला.

गुलमोहर: 

दोन्ही घरचा पाहूणा... तुपाशी" डोम्याने लोकशाहीच्या चौथ्या खांबाचं एक छोटसं रहस्य कावळ्याला सांगितलं.

Proud

अजून येऊ देत.. ( नेहरूनी कबुतरे उडवली... तुम्ही कावळे उडवा.... Happy )

"राजकारण्यांनी तेच धरून ठेवलं. चरखा. चरखा म्हणजे स्वावलंबन. स्वतःवर अवलंबून रहा. स्वतःचं काय ते पहा. स्वतःची सोय स्वतः करा. थोडक्यात, स्वतःसाठी, घरच्यांसाठी पार्टी काढा. पक्षाने तिकीट दिलं तर ठिक, नाही तर आपल्या माणसांना घेऊन बंडखोरी करा. स्वतःचा विचार आधी करा...... आता 'चरखा' म्हणजे काय ? 'चर' आणि 'खा'.>>>>> Lol

क्लार्कने टायपिंग मिस्टेक केली आणि 'सा'चा 'बा' केला >>>> Lol १०० आहे.

Happy सही