नशीब हे शिकलो - भाग ४६

Submitted by विनायक.रानडे on 8 December, 2009 - 23:36

ओमान मधील त्या पहिल्या कंपनीतील काही अनुभवातून एखादी कंपनी फायदा किती प्रकारातून किती पटीने मिळवण्याचे प्रयत्न करते हे मी शिकलो. मी नकाशे छपाईचे साधन दुरुस्तीचे काम ६ वर्ष करीत होतो. ह्या छपाई साधनात एका मोठ्या काचेच्या नळीत ३ ते ५ फ्लोरुसेंट प्रकाश नळ्या होत्या. ती प्रत्येक नळी १४० वॉटची होती. त्या प्रकाश नळ्या दोन कारणाकरिता बदलणे आवश्यक होते. नकाश्याचा कागद आत अडकला की काचेची मोठी नळी व त्यामुळे आतील सगळ्या प्रकाश नळ्यांसकट फुटायच्या. हेच प्रमाण जास्त होते. नाहीतर प्रकाश नळीची प्रकाश क्षमता कमी झाल्याने बदलणे आवश्यक होते. त्या ६ वर्षात मी एकट्याने २०० च्या आसपास प्रकाश नळ्या व २० मोठ्या काचेच्या नळ्या बदलल्या होत्या.

ओमानची ती कंपनी ब्रिटन मधील एका नावाजलेल्या कंपनीचीच एक शाखा होती. प्रत्येक सुटे भाग, साधने व उपकरणे ब्रिटन मधल्या मुख्य कंपनीच्या निर्यात विभागाकडून आयात करीत होती. त्या नकाशे छपाई साधनातील त्या प्रकाश नळ्या ह्याच मार्गाने आयात झाल्या होत्या. ग्राहकाला प्रत्येक प्रकाश नळीची किंमत ६० रियाल होती. काही कारणाने ५ - ६ महिने त्या प्रकाश नळ्या आयात झाल्या नाहीत, १५ नळ्या बदलणे आवश्यक होते. ग्राहक मला सारखे विचारत होते म्हणून मी मस्कत मधील फिलिप्स व्रिक्रेत्याकडे गेलो त्याच्या कडून कळले की तिच प्रकाश नळी तो ६ रियालला देऊ शकेल पण २५ नळ्या घ्याव्या लागतील. मला समजेना मस्कतला ६ रियाल किमतीची प्रकाश नळी मिळते मग आमची कंपनी ६० रियालला का विकते ? त्यात एका ग्राहकाने ब्रिटनहून येताना ६ नळ्या आणल्या त्याला प्रत्येक नळी एका साध्या दुकानात फक्त २ रियालला मिळाली.

मी शोध सुरू केला. आमच्या कंपनीचा ब्रिटनमधील निर्यात विभाग ति एक प्रकाश नळी फक्त दीड रियालला विकत घेऊन मस्कतला पाठवणार्‍या बिलात ११ रियाल किंमत दाखवीत होता. मस्कतला त्याच नळीची किंमत हाताळणी खर्चा सकट ३३ रियाल हिशेब वही दाखवीत होती. दुरुस्ती विभाग ग्राहकाला ६० रियाल किमतीने विकत होता. दुरुस्ती सेवा खर्च वेगळा होता. वाचकहो ह्या परदेशी कंपन्या कसा पैसा लुटतात ह्याचा मी बघितलेला हा एक नमुना.

नमुना क्रमांक दोन. मस्कतला एकदा खूप जोरदार पाऊस झाला होता. विमान तळावर कस्टम विभागात पाणी शिरल्याने बरेच नुकसान झाले होते. मी ज्या कंपनीत कामाला होतो त्यांचे बरेच सामान त्या विमान तळावर पाण्याखाली होते. त्यातलेच दोन नवीन सुक्ष्मचित्र वाचक (मायक्रोफिल्म रिडर) होते. विमा असल्याने त्या दोन वाचकांच्या (रिडर) पैशाची पूर्ण परतफेड मिळाली होती. विमा कंपनी ह्याच कंपनीचा एक विभाग होता. महत्त्वाचे हे की ति पाण्यात बुडलेली दोन वाचक उपकरणे मला दुरुस्त करायला दिली व नीट स्वच्छ करून नवीन म्हणून
पूर्ण किमतीला विकली. एकाच उपकरणावर दोनदा पैसा मिळवला त्यातला एक टक्का देखील मला मिळाला नाही.

नमुना क्रमांक तीन. ह्याच कंपनीत मी एक १६ मी.मी. चित्रफितीचा सुक्ष्मचित्र प्रतिमा ग्राहक दुरुस्त केला होता. हा प्रग्रा एका बॅंकेच्या अडगळीत पडलेला होता व आतल्या बर्‍याच वस्तू नाहीश्या झाल्या होत्या. तो प्रग्रा मी १५ दिवसात आवश्यक सुटे भाग बदलून पुन्हा कार्यरत केला होता. त्याचे ७०० रियाल फक्त मजुरीचे व २२०० रियाल सुट्या भागांचे सेवा विभागाला मिळाले होते. मी ते काम केल्याचे विसरलो होतो. परंतु सेवा विभागाच्या ब्रिटिश प्रमुखाने त्याचा उल्लेख महिना अखेरच्या बैठकीत करून किती जास्तीचा फायदा झाल्याचे कौतुक केले. मी त्याला त्याचा किती रियाल फायदा मला मिळेल असे विचारले असता त्याने मला सरळ अपमानित केले, " यू बास्टर्ड इंडियन, असे विचारण्याचे धाडस तू का केलेस ? " मी चूप बसणे शक्यच नव्हते. मी - " मला माझ्या आईबाबांचे नाव माहिती आहे व त्याचा मला अभिमान आहे. मी तुझ्या सारखा अनाथ ब्रिटिश नाही ज्याला स्वत:चा बाप कोण माहीत नाही म्हणूनच बापाचे नाव लावत नाहीस."

प्रकरण चिघळले मी माझी बाजू कंपनीतल्या सगळ्या वरिष्ठांना समजावून सांगितली. मी आमच्या हिशेबनीस मित्राकडून सेवा विभागाच्या हिशेब कसा केला जातो त्याची माहिती मिळवली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या प्रग्राचे बरेच सुटे भाग आमच्याच विभागाच्या गट प्रमुखाने चुकीची कारणे दाखवून नाहीसे केले होते. मी येण्यापूर्वी तो गटप्रमुख दुरुस्तीचे काम करीत असे. ज्या बॅंकेला तो मी दुरुस्त केलेला प्रग्रा दिला होता तिथल्या ओमानी वरिष्ठाला मी जाऊन भेटलो. आमच्या कंपनीने बॅंकेची कशी फसवणूक केली हे समजावून सांगितले. त्याने लगेच निर्णय घेऊन आमच्या कंपनीबरोबर केलेले सगळे खरेदी व दुरुस्तीचे करार रद्द केले.

ति ब्रिटिश कंपनी वस्तू व सेवा ह्याचा कसा हिशेब करीत होती ते बघूया पुढील भागात - क्रमश: -
( मागील भाग इथे वाचा http://www.maayboli.com/node/all/by_subject/9/228?page=15&order=title&s(ort=asc)

गुलमोहर: