खाद्य संम्मोहन

Submitted by चिन्गुडी on 8 December, 2009 - 08:29

"काय तुमची बायको घरी स्वयंपाक करायला नकार देते? हॉटेलची बिलं दिवसेंदिवस वाढत चाललीयेत? तर आम्हाला भेटा अथवा लिहा.. होय होय हिप्नॉटीझमने बायकोला तुम्ही रोज स्वयंपाक करण्यास प्रवृत्त करू शकता.. एकच कानमंत्र आणि स्वैपकाचे बदलेल तंत्र ...आता तुम्ही आणि तुमची घरगुती पोळी भाजी आहात फक्त एक फोनकॉल दुर" जाहिरातीवर लक्ष गेलं आणि काल दगडुशेठला नारळाचं तोरण चढवताना केलेली प्रार्थना देवानी ऐकली असं मनातल्या मनात खुश होऊन.. बायको नावाच्या बोक्याचं (आमच्या घरातला बोका तीच हो.. मी आपला गरिब मनीमाऊ... ताटाखालची मनी नाही बरंका?) लक्ष नाही हे बघुन बुब्बुळं हळुच डोळ्याच्या या कोपर्‍यातुन ते त्या कोपर्‍यापर्यंत फिरवली... आणि चटदिशी नंबर लिहुन घेतला...

रविवारची सकाळ ही नेहमीसारखीच आळसात सुरु झालेली... गृहलक्ष्मीनी सकाळच्या चहाची ऑर्डर सोडली आणि माझ्यातली ती मनीमाऊ हातपाय ताणुन .. पाठीची कमान करून आळस झटकुन तयार झाली.. मिशन चहावर... मी बोललो.. आज चहासोबत पोहे करतो.. बोका अंथरुणातुनच गुरगुरला... आज सकाळची इडली आणि मेदु वड्याची ऑर्डर मी कालच त्या कोपर्‍यावरच्या अण्णाला दिलीये.. तुला माहित आहे का त्या अण्णाचे छोटे छोटे अण्णे भोपु घेऊन गल्लोगल्ली फिरत असतात.. काय चवदार आणि कुरकुरीत मेदु असतो त्याचा.. अह्हहा.. रविवारची सकाळ आणि अण्णाचा मेदु.. काय वीकएंड आहे... अण्णाचं मेदु पुराण ऐकुन मला माझ्या मेंदुत अण्णा नावचा ट्युमर इडलीच्या रूपाने माझी बुद्धी पोखरतोय असा भास व्हायला लागला... आमच्या बोक्याला समजावणं तर मी लग्नानंतरच्या पहिल्या आठवड्यातचं सोडुन दिलय.. त्याचं कारण असं ....लग्न झाल्याच्या संध्याकाळीच अनघाची (बोका उर्फ माझी बायको) कुरकुर सुरु झाली हे काय दोन दिवस झाले मी बाहेरचं काहीच खाल्लं नाहिये... आज मला त्या गजाननची पाणीपुरी काहि झालं तरी खायचीच आहे.. झालं लग्नानंतर बायकोनी पहिला हट्ट काय केला तर पाणीपुरीचा...म्हणजे त्या गजाननापर्यंत जाणं आलं... पाणीपुरी हे प्रकरण मला कधीच जमल नव्हतं.. पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली आणि पाणी सरळ मार्गानं घशातुन खाली न जाता नाकातुन कसं बाहेर आलं हे रहस्य परत न उलगडता वो रहस्य मैने मेरे मन मे दफन कर दिया कायम के लिये! आणि आज साक्षात अनघासमोर ते रहस्य उलगडण्याचा प्रश्नच नव्हता.. मी तीचा विचार बदलण्यासाठी म्हणालो.. त्यापेक्षा आपण सुजाता मस्तानी पिऊ ना.. म्हणजे मस्त गप्पा पण मारता येतील.. तीची कळी एकदम खुलली.. म्हणाली चालेल पाणीपुरी खाते मग तिकडेच जाऊ.. तरिही मी लढायचच ठरवलं आणि समजावुन सांगायच्या स्वरात बोललो.. "अग उद्या पुजा आहे, परवा रिसेप्शन आहे.. पोट बिघडलं तर पंचाईत होईल".. "अरे नंतरच नंतर बघु तु नको खाऊस हव तर"... माझी सुटका झाली हेच माझ्यासाठी खुप होतं ... आणि नेमका नको तेच झालं अनघाचं पोट बिघडलं आणि त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटलं.. आई म्हणाली तीला कळत नाही एक तुला तर अक्कल आहे ना?? गाढवा!! (आधी मी गाढव होतो आणि लग्नानंतर मनीमाऊ झालो.. केवढा तो प्रवास?) आणि अनघा.. तीचा सुर.. तुच मन घातलसं माझ्या पाणीपुरीत म्हणुन असं झालं.. तेव्हापासुन मी ठरवलं की आपण आडकाठी घालायची नाही.. थोडक्यात कशातही मन घालायचं नाही... आणि बोक्याला समजावायला जायचं नाही.. शेवटी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण (त्यात आणि तो बोका)?
त्यानंतर आमच्या नव्या संसारात स्वैपाकघर म्हणजे माझं विरंगुळ्याच ठिकाण झालं..कारण तीचा तीथे शिरकाव होणं कदापी शक्य नव्हतं शिवाय अनघाला स्वैपाकाची आवड सोडाच उलट चीड होती.. ती म्हणायची.. आपले हे सुंदर दिवस मी स्वैपाकघरात पोळ्या लाटत आणि फोडण्या करत घालवावेत अस तुला वाटतं कि एकमेकांच्या सहवासात घालवावेत असं तुला वाटतं ? .... मलाही पटलं! पण सुरवातीचे दिवस संपायलाच तयार नाहीत गेले दोन वर्ष आमच्या स्वैपाकघरात चहा व्यतिरिक्त शक्यतो काहीही बनत नाही .. आणि लग्नाआधी माझं पान आईनी बनवलेल्या रोजच्या गरम गरम पोळीभाजी भात वरणाशिवाय हलत नसे... अश्या स्थितीत तीचे विचार म्हणजे मला धक्यावर धक्के देत होते.. आणि त्या धक्काबुक्कीमधे माझी पोळी भाजी शिळी होऊन गायब होत असे.. मला आईची आठवण येऊ लागली होती... वाण्याची बिलं कमी आणि हॉटेलची बिलं जास्ती असं होऊ लागलं.. एकमेकांना वेळ देण्यापेक्षा पोटाला आणि त्याच्या इच्छेला वेळ देणं महत्वाचं वाटु लागलं.. पण मुळचा स्वभाव भांडखोर किंवा हेकेखोर नसल्याने.. (कोण म्हणतो पुरुष adjust नाही करत ??) आणि मी अनघाला समजवणं पण सोडुन दिल्याने.. शेवटी गजाननाला (पाणीपुरीवाल्या नाही) नवस बोलण्याव्यतिरीक्त काहीच मार्ग नाही उरला.. शेवटी या मंगळवारी गजाननाला नारळाच तोरण देऊन देवाला या समस्येतुन सोडवण्याबद्दल बोललो.. दुपारी ऑफीसच्या canteen आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये खाऊन पचनसंस्थेनीपण जोरदार नारेबाजी करत मोर्चे काढायला सुरुवात केली होती... रोज रात्रीच्या जहाल नारेबाजीमुळे कधी कधी अश्रुधुराच्या नळकांड्याही फुटत होत्या.. एकंदरीत बायकोसोबत माझी पण झोप उडवायला सुरुवात केली होती.. आणि अश्यातच या रविवारी ही जाहिरात म्हणजे.. मला लॉटरी लागल्याच आनंद झाला... मेदु आणण्याच्या निमित्ताने बाहेरुनच फोन लावला आणि अपॉईंटमेंटही मिळवली.. पुढच्या आठवड्यात मंगळवारी मला तो कानमंत्र मिळणार होता.. सुखी संसाराची ती गुरूकिल्ली कोणत्याही प्रकारचा वादविवाद भांडण न करता मला गवसणार होती... दिवसाची सुरुवात मेदुनी करुन दुपारी "ड्रॅगन"मधे चायनीजचा समाचार घेऊन सिनेमामधे समोसे आणि पॉपकॉर्नचा फडशा पाडुन येताना फार भुक नसल्याने दुर्गाची बिर्यानी चरुन आलो.. वीकेंड संपल्याच्या आनंदात आणि सुखी स्वप्नाच्या वाटेवर आयुष्यात येणार्‍या पोळीभाजीचा बहर.. नजिकच्या भविष्यात कुठे दिसतोय का याची स्वप्ने पहात झोपेची वाट बघत राहीलो.. जहालमतवादीचे मोर्चे, नारेबाजी अश्रुधुर मला नजिकच्या भविष्यात इंडियन ड्रॅगन बनवण्याची ग्वाही देऊ लागले.. पोटात चायनीज, समोसे, बिर्यानी ... मेजॉरीटी मायनॉरिटीच्या मुद्द्यावरुन धुसफुस करत होते..
शेवटी ती मंगलमय घडी... मंगळवारची अपॉईंटमेंटची वेळही येऊन ठेपली... कधी एकदा तो कानमंत्र घेऊन येतो आणि माझ्या बायडीच्या अंगावर येऊन फुंकतो असं झालं होतं.. माझी चुळबुळ माझी अधीरता अधोरेखीत करत होती... तरिही मी शहाण्यामाणसा सारखा शांतपणे बसुन आपली आतुरता लपवायचा एक छोट्टासा प्रयत्न करुन पाहत होतो.. अनेक अधीर लोकांच्या रांगेत बसलेला मीही एक अशी आपली ठळक ओ़ळख तयार करत होतो.. माझ्या आधीचे लोक आत जात होते.. पाचेक मिनिटात बाहेरही येत होते.. मला उगाचच त्यांच्या चेहेर्‍यावर निराशेचे भाव दिसत होते.. माझी धडधड वाढु लागली.. कानमंत्र कानमंत्र कानमंत्र ... हेच शब्द कानात घुमु लागले.. मला बसल्या बसल्या अनघाच्या हातच्या पोळीभाजी भात वरणाची दिवास्वप्न पडायला लागली... आणि माझे नाव पुकारले गेले... आत डॉक्टर कम हिप्नॉटीस्ट अतिशय शांत बसले होते.. क्षणभर मलाच पेशंट असल्यासारखं वाटायला लागलं.. धीर करून खुर्चीवर बसलो.. डॉक्टरनी सुरुवात केली.. बायको कधीपासुन स्वैपाकाविषयी निरस आहे.. शेवटचा स्वैपाक कधी केला होता पासुन ते ही एक मेंटल डिसऑर्डर कशी आहे आणि हिप्नॉटीझम यात कसा उपयोगी पडातो पर्यंत सगळं पुराण ऐकुन झालं मग ते बोलले..बिलही फाडुन झालं हजार रुपये देऊनही झाले..पण कानमंत्र काही केल्या सांगेनात... आणि फक्त बोलले पुढच्या वेळेस त्याना सोबत घेऊन या.. मला त्या डॉक्टरच्या कानात आणि कानाखाली दोन्हीकडे एक एक झणझणीत कानमंत्र द्यावासा वाटला.. मी शक्य तितक्या शांतपणे म्हणालो मला वाटलं तुम्ही मला तुमचा कानमंत्र शिकवणार आणि मी तो बायकोवर आजमावुन बघणार.. गडगडाटी हास्यानंतर डॉक्टरनी थोबाड उघडलं आणि म्हणाले.. अहो तुम्हाला काय हे दारुड्याच्या नकळत दारु सोडवायचं व्यसनमुक्ती केंद्र वाटलं की काय? चांगले शिकले सवरलेले दिसता की... हजार रुपये देऊन शिवाय आपलाच अपमान करून घेतलेला मी बहुदा दुसरा माणुस असावा... (माझ्या आधीचा माणुसही तणतणत गेलेला आठवला).. मी त्याना परिस्थीती नीट समजाऊन सांगितली, आमच्या बोक्याच्या गळ्यात घंटा बांधुन त्याला इथे आणणे अशक्य आहे हे नीट मुद्देसुद समजावुन सांगितले आणि सल्ला मागितला... आणि थोडं निगोशिएट केल्यावर चक्क त्यानी त्याचं पैश्यात माझ्यावर हिप्नोटिझमचा प्रयोग सुरु केला...!!! काही सिटींग्ज नंतर आणि पोटासाठी पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता... आमचा राजा राणीचा संसार घरच्या पोळीभाजी विनाही मस्त सुरु आहे... आता घरात छोट्या मनीमाऊच्या येण्याची चाहुल लागलेली आहे.... मोर्चे, अश्रुधुर सगळयानी आता मवाळ धोरण अवलंबले आणि माझी हॉटेलींगची चटक आता ऑल टाईम हाय आहे... एकंदरीत अनघाचे आणि माझेही हे डोहाळे आता आम्ही दोघेपण एंजॉय करतोय!!!

गुलमोहर: 

आहाहा !!! सु॑दर विनोदी लेखन.. आहो खरोखर आसा कोणी आहे का मला खरच गरज आहे !! बाकी लेखन उत्तम .. एकदम ह हा पू वा.. काही मस्त जमलेले स्लोगन "एकच कानमंत्र आणि स्वैपकाचे बदलेल तंत्र" आणि "मोर्चे, अश्रुधुर" एक न॑बर ..

Rofl
<<< पोटात चायनीज, समोसे, बिर्यानी ... मेजॉरीटी मायनॉरिटीच्या मुद्द्यावरुन धुसफुस करत होते.. >>>
काय एकेक पंचेस आहेत .

सही Rofl

पोळी भाजी खाविशी वाटते तर तुम्ही करायचीत, सोप्पं नाही का?
किंवा स्वैपाकाला माणूस ठेवायचायत!
तसंही 'दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला!' - हे त्रिकालाबाधित सत्य आहे! Wink

मजा आली..
<<मला त्या डॉक्टरच्या कानात आणि कानाखाली दोन्हीकडे एक एक झणझणीत कानमंत्र द्यावासा वाटला.. मी शक्य तितक्या शांतपणे >> खुप हसायला आले. ( मला ते हसण्याचे चिन्ह् देता येत नाही आहे )