शुभदाची वहिनी.....

Submitted by kalpana_053 on 17 February, 2008 - 00:06

आज शान्ताबाईचा तुरुंगातील शेवटचा दिवस होता. आजची रात्र काढली की उद्या आपल्याला या तुरुंगाबाहेर नाईलाजानं जावं लागणार होतं. या तुरुंगावर जणू त्यांचं प्रेम जडलं होतं. हा कसला धागा विणला गेला आपल्यात आणि तुरुंगात? अनेकवेळा त्यांनी काराग्रुहातील अशिक्षित महिलाना साक्षर करुन काराग्रुह जणू सुधारग्रुह केला होता. पण तरीही आयुष्यातला प्रत्येक क्षण शेवटी समान्तरच जाणारा...... शिल्लक राहतोय फक्त अर्थशून्य पोकळीचा बुडबुडा...... निद्राराणीच्री कितीही आराधना केली तरी तिने क्रुपा करायची नाही असं जणू ठरवूनच टाकलं होतं. पापण्यांवर वजन ठेवल्यासारखे त्यांचे डोळे जड होऊ लागले. पण झोप मात्र येइना. अन् बाहेरच्या मुक्त जगात जाणं म्हणजे त्यांना कुठलातरी अद्रुश्य फास त्यांना खोल खोल तळात खेचत जातोय की काय असं वाटू लागतं. म्रुत्यु म्हणजे तरी दुसरं काय असू शकतो? असं वारंवार त्यांच्या मनात येऊ लागलं.
अडगळीच्या जळमटासारखी कातर खिन्नता शांताबाईंच्या मनात पसरू लागली. मनाच्या कम्प्युटरवर जीवनातल्या वादळवाटांची सीडी गरगरा फिरून गतजीवनाची फाईल दर्शवू लागली. जन्मदात्याने स्वतच्या सात वर्षाच्या मुलीवर रात्री ओकलेली वासनांध नजर.... अन् बलात्काराचा प्रयत्न.... आपण वेळीच जाणली अन आपला आपल्या रागावर ताबाच राहीला नाही..... घायाळ मनाने पूर्ण ताबा ताबा घेतला. अन जवळच असलेला हातोडा..... अन त्यामुळे हातून घडलेलं पाप... खरंतर पुण्यच.... अशा माणसास यमसदनाला पाठवताना मन जरही कचरलं नाही.... पण त्या घटनेनं आयुष्याची दिशाच फिरवून टाकली. खरंतर असलं दुख वाट्याला आल्यावर कुणी आत्महत्याच करेल.... पण आपण केली नाही..... जगण्याचा मोह होता की काय कुणास ठाऊक? पदरात मुलगी होती नं? कुणाही नातेवाईकानं आपण असं का केलं? हे जाणून घेण्याचा निरर्थक प्रयत्न देखील केला नाही. मुलीची बदनामी नको व समाजाचा पित्रुसंस्थेवरील विश्वास उडायला नको म्हणून आपण कोर्टातही काही बोललो नाही. नव-याच्या व्यसनाचा राग आला एवढंच बोललो..... हो.... चांगलं काही स्वीकारायला समाज लवकर धजावत नाही पण पित्यामध्येही वासनांध नराधम वसू शकतो हे मात्र लगेच समाजाकडून शिकले जायला नको. या अपराधी क्रुत्यातून मिळालेली पंधरा वर्षाची शिक्षा.... मुलगी सात वर्षाची असल्याने तिची अनाथाश्रमात सरकारकडून पाठवणी..... कारण त्या आपल्या एका गळा घोटण्याच्या क्रुत्येबरोबरच सर्व नातेवाईकांनी नात्याचा गळा घोटला होता..... मात्र त्यांना शिक्षा काहीही नाही. सगळे उजळ माथ्याने समाजात वावरताहेत..... मग एका परदेशी जोड्प्याने आपलेच गुण अन रुपडे घेऊन आलेल्या या आपल्या मुलीला दत्त्क घेऊन मात्र त्यांना दिलेला दिलासा.... आयुष्यभर पालन पोषणाची आपल्या मुलीची जबाबदारी घेणारे ते परदेशी जोडपे..... पोरीची परवड त्यांच्या दत्तक घेण्याने थांबली होती. न बघितलेल्या त्यांच्याविषयी शांताबाईंच्या मनात खूप आस्था व प्रेम होते. अन वासनेने अंध होऊन आपल्याच मुलीवर हात टाकणारा जन्मदाता.... एकाच परमेश्वराने निर्माण केलेल्या दोन व्यक्ती. त्यात आपल्या संपूर्ण जीवनाची होरपळ..... आत मुलीचा पत्ता कढून तिच्याकडे जाणे नको.... तिच्या सुखी जगात आपल्या जाण्याने विष कालवणे नको...... विचारांनी शांताबाईचे मन सैरभैर होत होतं......
अखेर तुरुंगातून शांताबाई बाहेर पडल्या ख-या.... पण कोणत्याही बाजूने जाण्यासाठी आशादायक दिशा त्यांना दिसत नव्हती. तुरुंगातील प्रेसमध्ये केलेल्या कामाचे त्यांना मिळालेले काही पैसे कनवटीला होते. ते किती दिवस पुरणार हा प्रष्न होताच. निघता निघता तुरुंगाधिका-याने सांगितलेले शब्द कानात आशेने जगण्यासाठी घीर देत होते. शांताबाईंच्या चांगल्या वागणुकीने त्या तुरुंगात आसपासच्या कैद्यामघ्ये व अधिका-यामध्ये सुध्दा प्रिय झाल्या होत्या. इतक्या चांगल्या स्वभावाच्या शांताबाई तुरुंगात आल्याच कशा? असा प्रश्व त्यांना जो जो भेटेल त्याला पडे. पाच वर्षांच्या आतील मुले तुरुंगात स्त्रियांजवळ असत. त्यांना पाहिले की त्यांना आपल्या मुलीची नेहमीच आठवण होई. कशी असेल ती? कदाचित तिचे आत लग्नही झालेले असेल. ती किंवा तिचा नवरा कधीतरी आपला स्वीकार करतील का? आता पूर्वी झालेल्या गोष्टी काही बदलता येत नाहीत. त्यामुळे ती असेल तिथे सुखात असू दे, असा मनातल्या मनात आशीर्वाद देत शांताबाई रस्त्याला लागल्या. हातामध्ये थोड्याशा सामानाची पिशवी अन् कनवटीला काही पैसे.... वयाच्या चाळीशीनंतर नव्याने आयुष्य जगावं लागणार होतं. खरंतर तुरुंगात आता सर्व गोष्टीची सवय झाली होती. जणू तुरुंग म्हणजे घरच वाटू लागलं होतं. बरीच वर्षे तिथं काढल्यानं आता तुरुंगाविषयी प्रेम वाटू लागलं होतं. तुरुंगातील आजूबाजूच्या स्त्रिया जणू बहिणीप्रमाणे वाटत. त्यांना चार चांगले शब्द सांगून, लिहायला शिकवून, देवाचे अभंग म्हणून, तुरुंगाच्या प्रेसमध्ये बाईंडिंगचे काम करून वेळ कसा चांगला जात होता. आता तुरुंगातून बाहेर पडावसंही वाटत नाही तरी त्यांच्या शिक्षेमध्ये चांगल्या वागणूकीने सूट मिळाल्याने त्यांची तीन वर्षे आधीच सुटका करण्याचे सरकारने ठरवले होते. त्यांना खरंतर सरकारचा निर्णय मान्य नव्हता. पण काय करायचे? चांगल्या वागणुकीचा तोटा होतो कधीकधी तो असा.... असे त्यांच्या मनात येऊ लागले. तुरुंगाबाहेर वाट पहाणारे कोणीही नाही. तुरुंगच जणू आपलं जग बनलं असताना आत बाहेर पडून काय करायचे? हा विचार त्यांना लहान मुलासारखा भंडावत होता. तुरुंगाधिका-याने एखाद्या प्रेसमध्ये काम करा, अथवा एखाद्याच्या घरी कायमस्वरुपी राहून सर्व घरकाम करून एखाद्या कुटुंबाला मदत करा असे अनेक सल्ले दिले होते. पण सारखा एकच विचार मनांत घर करुन बसला होता, तो पाण्याच्या संतत धारेप्रमाणे डोक्यातून जात नव्हता, तो म्हणजे तुरुंगातून शिक्षा भोगून आलेल्या स्त्रीला कोण काय काम देणार? आपल्यावर विश्वास कोण ठेवणार? पण शेवटी आहेत ते पैसे व्रुत्तपत्रामध्ये जाहिरातीसाठी खर्च करायचे ठरवून..... नियतीकडेच फासे टाकून कुणाच्या तरी घरात काम मिळवण्यासाठीचे दान मिळवण्याची घड्पड करायचे शांताबाईंनी ठरवले. जाहिरातीत त्यांच्या हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे तुरुंगात शिक्षा भोगली असल्याचा मुद्दाम उल्लेख केला होता. काम मिळायला उशीर झाला तरी चालेल परंतु या कारणाखातर उगीचच उंबरठे झिजवायल नकोत असे त्यांनी ठरवले होते. उंबरठे झिजवायला त्यांना बळ होते पण होणा-या मानसिक अपमानाने परत जगणे नकोसे वाटू लागेल या विचाराची धास्ती होती.
एका छोट्या दत्ताच्या देवळापाशी त्यांनी पुजा-याला विश्वासात घेऊन दीनवाणेपणे मुक्काम ठेवला होता. त्यानेही सात्-आठ दिवस जवळील फुलवाल्याकडे दिवसभर काम करुन रात्री देवळात पडायला परवानगी दिली होती. जगात काही चांगली माणसेही असतात याचा अनुभव गाठीशी येऊ लागला होता. देवळाजवळील दुकानदाराने आपल्या दुकानाचा पत्ता त्यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत देण्यास परवानगी दिली होती. तीन्-चार दिवस देवळाबाहेरच फुलांचे हार करण्यात..... फुलवाल्याला मदत करण्यात घालवल्यानंतर शांताबाई आता दैवाचा कौल अजमावण्यासाठी मनातल्या मनात देवाचा धावा करु लागल्या.
"शांताबाई, आज गुरुवार आहे बरं का.... दत्ताला येणा-यांची संख्या जास्त असते. जरा हार जास्त लागतील. जास्तीचे हार करुन ठेवा...." असे फुलवाल्याने सांगितले.
"बरं बरं " असे शांताबाई लगेचच म्हणाल्या. त्यांनाही विचारांच्या धगधगत्या आगीतून सुटका मिळवळ्यासाठी हाताला काहीतरी काम हवेच होते. अधून मधून दुकानात जाऊन कोणाचा आपल्या चौकशीसाठी फोन आला आहे का? एवढेच काम होतं. आज गुरुवार असल्याने दत्ताला त्यांनी मनापासून आळवणी केली, "एवढ्या मोठ्या विश्वात कोणाला तरी माझी गरज भासू दे. मी मिळेल ते काम प्रामाणिकपणे करेन." असं सारखं त्या देवाला आळवत होत्या. दोन दिवस जाहिरात आली होती. परंतु अजूनही कोणाचाही फोन नव्हता. दुपार झाली अन देवळाजवळच्या कठड्याला रेलून शांताबाई थोड्याशा रेलल्या. कामाच्या दगदगीपेक्षा मनाच्याच दगदगीनं त्यांचा डोळा लागला. एवढ्यात "शांताबाई, अहो शांताबाई.... तुम्हाला फोन आहे....." असं सांगत दुकानदार आला. एखाद्या देवदुताप्रमाणे त्यांना तो दुकानदार त्यांना तो भासला. जीवनाच्या अंधा-या दलदलीतून त्यांना आता स्वतचं भान येऊ लागलं. हा फोन म्हनजे आपला शेवट .... की शेवटाची सुरुवात? असं त्यांच्या मनांत आलं. "निराशामय अंघकाराचा आयुष्यात साचलेला चिखल परमेश्वरा दूर कर. सायंकाळी नक्की पेढ्याचा नैवेद्य दाखावीन" असं म्हणून त्यांनी परमेश्वराला लगेचच मनातल्या मनात नमस्कार करून आपल्यावर कृपा करण्यास विनवले. लगबगीने त्या फोन घ्यायला गेल्या.
फोन घेताच फोनवर एक अनोळखी बाई, "शांताबाई, मी शुभदा देसाई.... तुमचीच जाहिरात होती नं.... मी तुम्हाला भेटायला तुम्ही दिलेल्या पत्त्यापाशी लगेचच येतेय..." असं म्हणून त्यांनी फोन खाली ठेवला..... आणि शांताबाईंचे नशीब त्यांना भेटायला अर्ध्या तासाच्या अंतराने आले.
शुभदाताई साधारण पंचविशी / तिशीच्या त्यांना वाटल्या. त्या भेटताच त्यांना म्हणाल्या, "मला एका विनापाश बाईची गरज आहे. मी नोकरीला जाते. मला माझ्या घरातच राहून मुलांवर व घरावर लक्ष देण्यासाठी..... आधारासाठी वयस्कर माणूस हवं आहे. मोलकरीण आपलं काम करेलच. पण घरात एक आधार हवा आहे. तुमचा गुन्हा काय होता? तुम्हाला शिक्षा का झाली? वगैरे गोष्टी जाणण्यात मला काहीच स्वारस्य नाही. परिस्थितीने माणूस गुन्हेगार बनतो.... म्हणून तो कायमच गुन्हेगार असतो असं नाही...... या सत्यावर माझा विश्वास आहे. मी आणि माझा नवरा दोघेही लहानपणापासून अनथाश्रमात वाढलेलो..... त्यामुळे नातेवाईंकाचं सौख्य आमच्या नशिबी नाही. म्हणून एक नवं नातं निर्माण करून, एखाद्याला आपला आधार देऊन, त्याचाही आधार घेऊन आमच्या मुलांना, संपूर्ण घराला सांभाळणारं कोणीतरी असावं या आशेनं मी इथं आले आहे." भरभरून बोलून शुभदाताई आपल्या घराविषयी, मुलांविषयी, नव-याविषयी, आपल्या नोकरीविषयी सांगत होत्या. खाऊन पिऊन घरातच राहून त्या महिन्याला दोन हजार रुपये त्यांच्या नावाने बकेत टाकायला तयार होत्या. शिवाय कपडेलत्ते, औषधपाणीही करायला तयार होत्या. शुभदाताईच्या रुपाने जणू परमेश्वरच त्यांना भेटायला आला की काय असे शांताबाईंना वाटले. दत्तदिगंबराचे दुसरे रुपच शुभदाच्या रुपात त्यांना दिसू लागले. भारावलेल्या मनाने त्या काहीच बोलत नाहीत बघून जवळचा दुकानदार, "अहो शांताबाई, विचार कसला करताय? अशी चांगली संधी आयुष्यात परत परत येत नसते..... लगेचच हो म्हणा...." असे सांगू लागला. अन शाताबाईंच्या तोंडून "मी केव्हापासून कामाला येऊ? माझ्यावर विश्वास ठेवा, मी पडेल ते काम प्रामाणिकपणे करेन....." असे शुभदाने विचारले नसतानाही जीव तोडून त्या सांगू लागल्या.
शुभदाने, "मी सायंकाळी तुम्हाला न्यायला येते, घरी गेल्यावर तुम्हाला काम समजावून सांगेन.... तुम्ही तयार रहा..." असे सांगितले. अन् एखादे सुंदर, गोड स्वप्न पडावे अन त्यातून जागे व्हावे असे वाटूच नये असे शांताबाईंना झाले. "हो, हो..... मी सायंकाळी तयार रहाते, तुमची वाट पहाते...." एव्हढेच शब्द त्या कसेबसे बोलल्या. अन शुभदाच्या जाण्याकडे अन आपल्या येणा-या नशिबाकडे डोळे विस्फारून पाहू लागल्या. थोड्याशाच सामानाची आवराआवर त्या लगबगीने करू लागल्या. या दत्तासमोरच आपले नशीब उघडले म्हणून त्या दत्ताचे हार त्यांचे हात वेगाने करू लागले. आपली मुलगी असती तर तीही याच वयाची असली असती.... असाही विचार त्यांच्या मनात येऊन गेला. सायंकाळ झाली.... अन् शांताबाईंच्या जीवनाची सकाळ झाली. शुभदा त्यांना नेण्यासाठी नवरा अन मुलांसहित आली. त्यांचे सामान आपल्या हातात घेतले. दुकानदाराचा, पुजा-याचा, फुलवाल्याचा निरोप साश्रू नयनांनी शांताबाईंनी घेतला. परत देवळात येण्याचे आश्वासन दिले. पाच्-सहा दिवसात या सर्वांनी किती जीव लावला असे त्यांना वाटू लागले. त्यांना सर्वांना सोडून जातानाही अश्रू नयनात दाटून आले. अन उरामध्ये नवीन घरात जाण्याची धडपड..
गाडीत मागच्या सीटवर शुभदाच्या शेजारी शांताबाई जरा अवघडूनच बसल्या होत्या. शुभदा मात्र खूप खुष होती. तिची प्रतीक्षा आता संपली होती. तिला हवं असणारं माणूस तिला मिळालं होतं. ती शांताबाईंना म्हणाली, "तुमचा भूतकाळ आता तुम्ही पूर्ण विसरून जाण्याचा प्रयत्न करा. मी शेजारी पाजारी माझ्या अक्सिडेंट होऊन देवाघरी गेलेल्या भावाच्याअ बायकोला.... माझ्या मूलबाळ नसलेल्या वहिनीला..... घेऊन आलेय असे सांगणार आहे. तुम्हीही तसेच सांगा.... आम्ही तुम्हाला विश्वासाने आमच्या घरात राहू देणार आहोत. पण आजूबाजूच्या लोकांशी .... समाजातील लोकांशी आपला काही ना काही संपर्क येतोच. त्यामध्ये तुम्हाला काहीही त्रास होऊ नये म्हणून हे सगळं खोटं बोलण्याचा खटाटोप..... तुमच्याकडे सर्वांनी विश्वासाने पहावे..... संशयी नजरांच्या जाळ्यात अडकून तुम्हाला त्रास होऊ नये हीच इच्छा....."
शुभदाच्या या रूपाकडे शांताबाई डोळे भरभरून पहात होत्या. आधार, स्वीकार, अन सहकार्याची जणू जगद्ज्जनी देवीच असावी अशी ती त्यांना भासू लागली.
वहिनी..... शुभदाची वहिनी..... या नव्याने जीवन देणा-या नात्याचा आयुष्यभर सांभाळ करायचा असं त्यांच मन सारखं त्यांना बजावत होतं. परमेश्वर अन् चांगली माणसं या जगात नक्की आहेतच.... आणि ती अशी शुभदा सारख्यांच्या रुपानं समाजात वावरतात याचा त्यांना साक्षात्कार झाला. दारासमोर रांगोळी घातलेल्या सुमंगल घरात "शुभदाची वहिनी" म्हणून प्रवेश करताना त्यांचं मन भरुन आलं......
सौ. कल्पना रमेश धर्माधिकारी.......

गुलमोहर: 

पुढच्या पोस्ट ची वाट बघतेय...

आणि शांताबाईंचे नशीब त्यांना भेटायला अर्ध्या तासाच्या अंतराने आले.>>>>
सुंदर आहे कथा...

>> मनाच्या कम्प्युटरवर जीवनातल्या वादळवाटांची सीडी गरगरा फिरून गतजीवनाची फाईल दर्शवू लागली. >> मस्तच.

छान लिहिली आहे कथा. शुभदाची वहिनी होऊन शांताबाईना चांगलाच आधार मिळाला.

लोपमुद्रा.... "सुंदर आहे कथा..." प्रतिसादा बद्दल धन्यवाद.... कल्पना....

"मनाच्या कम्प्युटरवर जीवनातल्या वादळवाटांची सीडी गरगरा फिरून गतजीवनाची फाईल दर्शवू लागली. >> मस्तच.

छान लिहिली आहे कथा. शुभदाची वहिनी होऊन शांताबाईना चांगलाच आधार मिळाला.".....
या छान प्रतिसादा बद्दल धन्यवाद.... कल्पना....

कल्पना, कथाबीज फारच आवडल. चांगली जमली आहे कथा.

खूप छान आहे कथा.

कथेच्या पुर्वार्धातील नायिकेची मनस्थिती वाचुन मला The Shawshank Redemption मधल्या जन्मठेप झालेल्या म्हातार्‍या ग्रंथपालाची आठवण झाली. Happy

आतिशय सुरेख कथा आहे मनाला भिडणारी विचार करायला लावणारी.

कल्पना
सुंदर जमलीये कथा. (कथा संपलीये असं गृहित धरून हा अभिप्राय आहे) कथेचं 'कथाबीज' असं लहानखुरंच आहे पण खूप परिणामकारक फुलवलय...

*****तरीही आयुष्यातला प्रत्येक क्षण शेवटी समान्तरच जाणारा...... शिल्लक राहतोय फक्त अर्थशून्य पोकळीचा बुडबुडा...... *****
*****अडगळीच्या जळमटासारखी कातर खिन्नता शांताबाईंच्या मनात पसरू लागली.*****
ही आणि ह्यासारख्या जागा आवडल्या. तुम्ही छान लिहिताय, अजून वाचायला आवडेल, असं.

कथा खुपंच छान जमली आहे. मायबोलीवर लिहित रहा...

कथा आवडल्या बद्दल सर्वांना धन्यवाद......
कल्पना.......

कल्पना खूप आवडली. उगाचच वाटत होते की ती त्यांची मूलगीच आहे की काय. पण शेवट छान आहे. योगयोग जमवला नाही हे आवडले.

कथा आवडली. मलाही असे वाटलं की योगायोगाने ती मुलगी नायिकेचीच असा काहीतरी शेवट असेल. तसे न करता वेगळा शेवट केलात हे आवडलं. नयिकेच्या मनःस्थितीचे वर्णन परफेक्ट.

-प्रिन्सेस...

बी.... प्रिन्सेस धन्यवाद....... योगायोगाने ती मुलगी नायिकेचीच असा शेवट मुद्दाम केला नाही कारण, "परिस्थितीने गुन्हेगार झालेल्यांना ...... किंवा गुन्ह्याचे प्रायश्चित्त केल्यावर.... झाल्यावर..... पश्चात्ताप झाल्यावर....... त्या व्यक्तीस माफ करून टाकावे..... हा विचार मला पटतो...... मुलगी आईला नक्कीच माफ करेल...... "समाजाने माफ करुन अशा व्यक्तींना आपले करायला हवे......." हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय......... परत एकदा धन्यवाद...... कल्पना......

परत परत वाचावी अशी वाक्यरचना.

श्रध्दा, धन्यवाद..... हिच कथा अंतराळ्.कॉम वर पण आलीय.... कल्पना.....