डोम्या म्हणे........

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 November, 2009 - 03:59

"अरे डोम्या, होतास कुठे काल ? " कावळ्यांने पावाच्या तुकड्यावर आपली पकड घट्ट करत विचारलं.
"अदबीनं... अदबीनं नाव घ्यायचं. नाहीतर जातिवाचक शिवी घातली म्हणून अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टखाली आत टाकेन." डोम्याने झाडाच्या फांदीवर चोच घासली.
"जातिवाचक ? "
"डोमकावळा ही आमची जात आहे. उल्लेख अदबीनं करायचा."
"मित्रा, 'डोम'कावळ्या, काल कुठे होतास ?"
"आत्ता कस्स ! टिळक भवनात गेलो होतो."
"डोम्या लेका, उगाच टेपा लावू नकोस. त्या सगळ्या जागा आपल्या धर्मात बहिष्कृत आहेत हे विसरलास काय ? "
"कावळ्या, तुम्ही सगळे साले एकजात एकसारखेच. आयुष्यभर उकीरडेच फुंकणार. मेलेल्यांच्या पिंडावर स्वतःला पोसायला मी काही तुमच्यासारखा सर्वसामान्य कावळा नाही. मी आता पत्रकारीतेत उतरतोय."
"म्हणजे तू आता पिंडासाठी माणूस मरेपर्यंत वाट पहाणार नाहीस. चांगल आहे. टिळक भवनात का गेला होतास ते सांग ?"
"काल जाम बोअर होत होतं. काहीतरी एन्टरटेनमेंट पायजे होती बुवा."
"मग एखादा पिक्चर बघायचा ना नवा. दे दणा दण वगैरे..."
"तू काय मला त्या यत्किंचित माणसांसारखा निर्बुद्ध समजलास काय ? स्वत:च्या पैशाने स्वतःच्या मेंदूवर नसते 'दे दणा दण' आघात करायला ? आणि हे असले टिनपाट, फालतू कार्यक्रम तुमच्यासारखे अतिसामान्य कावळे बघतात. डेली सोप च्या फेसात आंघोळ करता आणि रियालिटीच्या नावाने बोंबाबोंब करता. "
"डोम्या, आमची अब्रु काढण्यापेक्षा तू मुद्द्यावर का येत नाहीस ?"
"ठिक आहे. बेसिकली मला जेव्हा बोअर होतं तेव्हा मी विधानसभेत, मंत्रालयात, वर्षावर नाहीतर टिळकभवनातही जातो. अधून मधून मातोश्री, कृष्णकुंज किवा सेनाभवन असतेच. फॉर अ चेंज. तुला माहीत आहे मागे जेव्हा त्या अबु आजमीला गोल्डनमॅनने थोबाडवला होता. तेव्हा मी तिथेच होत. वरच्या खिडकीत. कसला शो होता तो ! टेरिफिक ! "
"तू टिळकभवनाचं काहीतरी सांगत होता. "
"यस. तर काल टिळक भवनात गेलो होतो. इमर्जन्सी मिटिंग होती."
"रविवारी ? "
"मला माहीत आहे रे रविवार हा आराम करायचा वार आहे ते. पण प्रदेशाध्यक्षानीच निरोप पाठवलेला सगळ्यांना. त्यांचे सगळेच वार रविवार असतात. कधी तरी मिटींग करायला नको का ? "
"बर मग ? "
"सगळे बसलेले. प्रदेशाध्यक्ष काळजीत. चेहर्‍यावर चिंता ओसंडून वाहात होती. त्यांना तसे चिंताग्रस्त पाहून तमाम कॉग्रेसवासी काळजीग्रस्त झाले. नेमकं काय झालं ते कोणाला माहीतीच नव्हतं. प्रदेशाध्यक्षांच्या त्या चितित चेहर्‍याचं ताबडतोब रिफ्लेक्शन सगळ्या कॉग्रेसवासींच्या चेहर्‍यावर पडलं आणि बैठकीतले सगळेच चेहरे सुतकी झाले.
"विषय गंभीर आहे. यावर सर्वानुमते निर्णय व्हायला हवा. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना तातडीने बोलावलय." शेवटी प्रदेशाध्यक्षांनी तोंड उघडले. यावर प्रत्येक काँग्रेसवासीने प्रदेशाध्यक्ष स्वर्गवासी झाल्यासारखा चेहरा केला. 'सर्वानुमते निर्णय' हा प्रकार त्या सगळ्यांना नवीन होता. आपण फक्त आदेश पाळायलाच आहोत हा त्यांचा ठाम समज. मुळ विषयाला कधी हात घातला जातो याची सगळे निमुट वाट पहात बसले.
"शिवसेनेने 'शिव वडा' लाँच केलाय." प्रदेशाध्यक्षानी कोंडी फोडली. 'डोंगर पोखरून उंदीर निघावा' तसे सगळे काँग्रेसवासी बुचकळ्यात पडले. या शिळ्या वड्याला मध्येच ऊत का बरे आला असावा ? हा प्रश्न सभासदस्यांच्या चेहर्‍यावर ओघळून नाकावर लटकला. पण पुढच्या चर्चेत आधी नाक खुपसणार कोण ? सगळे पुन्हा चिंताग्रस्त चेहर्‍याने प्रदेशाध्यक्षांकडे पाहू लागले.
"पण आपण कांदेपोहे लाँच करतोय ना ? " प्रदेशाध्यक्षांच्या गोटातील एका सदस्याने हळूच विचारणा केली.
"करतोय. निश्चितच करतोय." प्रदेशाध्यक्ष गरजले.
"मग घोड अडलय कुठे ? " इति सदस्य.
"नाव काय ठेवायचं ? " प्रदेशाध्यक्ष हताशपणे उद्गारले.
"कुणाचं ?" कार्यकर्ता घाईने विचारता झाला. प्रदेशाध्यक्षाकडे बातमी आणि आपल्याला माहीती नाही... हा त्याच्या स्वामीनिष्ठेचा अपमान झाला.
"कांद्यापोह्यांच." कार्यकर्त्याने निश्वास सोडला. पण पुन्हा श्वास घेऊन तो वळला.
"कांद्यापोह्याचं काय नाव ठेवायचं ?"
"तोच तर प्रश्न आहे." प्रदेशाध्यक्ष उत्तरले.
"का नाव ठेवायच.. असा माझा प्रश्न आहे." कार्यकर्त्याने प्रश्न फिरवून विचारला.
"का म्हणजे ? लोकांनी नावं ठेवल्यावर का आपण ठेवणार ते ?" प्रदेशाध्यक्ष जरा चिडलेच.
"लोकांच काय ? ते तर नाव असलेल्यांना पण नाव ठेवतात. " कार्यकरत्याने सार्वजनिक मुद्दा मांडला.
"शिवसेनेने शिव वडा चालू केलाय. मग आपल्या कांद्यापोह्यांना नाव नको ?" प्रदेशाध्यक्ष पुन्हा गरजले.
"पाहीजे." सगळे एका सुरात ओरडले.
"काय नाव ठेवायचं ?" पुन्हा गाडी जुन्या रस्त्याला. सगळे कॉग्रेसवासी विचारात पडले. आपापले गुडघे कराकरा खाजवू लागले. डोक्याचा वापर सध्या फक्त टोपी आणि मुंडास्यांपुरता उरला होता.
"काँग कांदे पोहे." एका नवनिर्वाचित आमदाराची सुचना.
"काँग ?"
"त्यांनी शिवसेनेतला शिव घेतला. आपण काँग्रेसमधला काँग घेऊ." आमदारांचा खुलासा. याला कुणी तिकीट दिलं ? असला भाव चेहर्‍यावर आणून प्रदेशाध्यक्ष इतरांकडे वळले.
"व्यक्तीसदृश्य आहे ते. शिवाजी महारांजांच्या नावातील शिव आहे ते. शिवाजी या तीन अक्षरातलं दिड अक्षर घेतलय."
"त्यांनी दिड घेतलय तर आपण दोन घेऊ." नेहमीच वरचढ होऊ पाहणारा आमदार.
"अस्स हाय व्हय. मग आपणबी जवा कांदे पोहे काढू. " त्यांनी सगळ्यांकडे पाहीलं. ते पुढे बोलतील म्हणून सगळे थांबलेले.
"पुढे काय ? " एकाने शेवटी विचारलच.
"कशाच्या फुडं ? "
"जवा कांदे पोहे काढू... तवा काय ? "
"जवा तवातला जवा नाय. जवाहरलाल मधला 'जवा'. "
"नको. कांदे पोहे असे जवातवा खपायचे नाय." शहरी कॉग्रेसवाल्याला ही गावरान कल्पना पटली नाही.
"मग 'राज' कांदे पोहे म्हणायचं का ? " एक हळूच उद्गारला.
"मनसेवाल्यांना कोणी बोलावलं बैठकीला ? " कोणतरी ओरडला.
"मनसेवाला नाय. आपलाच हाय." एकाच्या शेजारचा आवाज.
"मग राज ठाकरेचं नाव कशाला घेतोय तो ?" पुन्हा मघाचा ओरडला.
"मी ते राजीव गांधीमधला राज घेतला होता." एकाचे स्पष्टीकरण.
"नको. एकही समाजवादी पोहे खाणार नाही. आधीच आपलं मनसेशी संधान असल्याची बोंब आहे."
"मग राजी कांदे पोहे... ?" दुसर्‍याने फक्त वेलांटी वाढवत कल्पना मांडली.
"कांदे पोहे कसे राजी होतील ? खाणारे राजी व्हायला नकोत. " त्याच्या त्या वाढीव कल्पनेवर कोणी राजी झालेच नाही.
"इंदी कांदे पोहे चालतील का ?" एक द्रविडीयन काँग्रेसी.
"इंदी इतकं कॅची वाटत नाही. थोडं तंबी सारखं वाटतय. " इति उत्तरभारतीय.
"मग सोन कांदे पोहे.... किंवा सोनि कांदे पोहे...." राष्ट्रवादीतून नुकतेच आलेले कॉग्रेसी दोन पर्यायांसकट. (प्रश्न निष्ठेचा असतो कधी कधी)
"नको नको.... मॅडमच्या नावाची मोडतोड नको. नस्ते वांदे होतील." शिवसेनेतून आलेले काँग्रेसवासी.
"राहु कांदे पोहे कसे ताजे वाटतात. एकदम नव्या दमाचा माल." एक तरूण आमदार.
"त्यापेक्षा प्रिया कांदे पोहे जास्त चांगल. यात लेडी मटेरियल आहे. कांदे पोहे नाहीतरी बायकाच बनवतात. मग एका स्त्रीचं नाव का नको ? " महिला शाखा कडाडली.
"मी काय म्हणतो ?" एक उत्साही आमदार.
"म्हणा." इतर. थोडा वेळ विचार करून तो बोलतो, "काय म्हणणार ? सगळी नाव संपली. आपल्याकडे नावाचा स्टॉकच कमी. या नावांपलिकडे आपली विचारशक्ती चालत नाय."
"मंडळी, विषय गंभीर आहे. आपण सगळ्या पर्यायी नावांचा विचार केला आहे. पण नेहमीप्रमाणे एकमत होत नाही. काय करावं ? " प्रदेशाध्यक्ष पुन्हा चर्चेत.
"चिठ्ठ्या टाकायच्या का ?"
"नको. गुप्त मतदान घेऊया. "
"नको. नंतर मग नावाचं क्रेडीट सगळेच घेतील."
"मी एक उपाय सुचवू का साहेब ? " सभेला खाद्यपदार्थांसह चहा घेऊन आलेला पोरगा बोलला.
"तू ? चल बोल. लोकशाही आहे आमच्या पक्षात. इथे सगळ्यांना समान संधी असते."
"तुम्ही प्रस्ताव तयार करा आणि मॅडमकडे पाठवा. नाव ठेवायची विनंती त्यांनाच करा, नाहीतर कुठल्या गादीवर कोण बसणार हे त्याच ठरवतात ना ?"
" अरे व्वा ! सुटला तिडा !!!" समस्त काँग्रेसजनांना प्रचंड आनंद झाला आणि सगळेजण त्या आनंदात समोर आलेल्या शिववड्यावर तुटून पडले.

एवढं बोलून डोम्या उडाला आणि कावळा तिथेच बसून पुन्हा पंज्यातला शिळा पाव कुरतडू लागला.

गुलमोहर: 

जवा कांदे .. "काँग कांदे.. इंदी कांदे .. सोनि कांदे इ इ कांदे पोहे.. अत्ता कळल.. कांदे इतके का महागले.. Happy सहीच रे डोम्या.. Happy हसुन पुरेवाट..

मग सोन कांदे पोहे.... किंवा सोनि कांदे पोहे...." राष्ट्रवादीतून नुकतेच आलेले कॉग्रेसी दोन पर्यायांसकट. (प्रश्न निष्ठेचा असतो कधी कधी)
"नको नको.... मॅडमच्या नावाची मोडतोड नको. नस्ते वांदे होतील." शिवसेनेतून आलेले काँग्रेसवासी.
"राहु कांदे पोहे कसे ताजे वाटतात. एकदम नव्या दमाचा माल." एक तरूण आमदार.
"त्यापेक्षा प्रिया कांदे पोहे जास्त चांगल. यात लेडी मटेरियल आहे. >>> भन्नाट रे एकदम !! Lol

झणझणित कांदेपोहे खाल्ल्याशिवाय असला विषय सुचला नसणार.

कौतुकराव, कौतुक कराव तेवढ थोडंच आहे तुमचं..... पहिल्या वाक्यापासुन शेवट्पर्यन्त नुसता नाद खुळा.....

तुम्ही पेपर मध्ये कॉलम लिहता कि नाही ते माहित नाही, पण भल्या भल्या लेखकांच्या पेक्षा छान लिहलं आहे.

मस्त.... हां आणि आता दर आठवड्याला असं एक चालु करा. (नम्र विनंती)

दक्षिणे, शेवट रंगवण्यासाठी रंग उरलाच नाही बघ.
संधमित्रा मी पत्रकार नाही.
निवांत, वर्तमानपत्रात कॉलम लिहीत नाही. आता इथेच लिहीन म्हणतो. शक्य तेव्हा.
रुनी, 'एक फुल दोन हाफ' अप्रतिम असतं. बर्‍याचदा वाचलय मी. लिहीणारे कोण ते ठाऊक नाही, पण त्यांच ज्ञान अफलातून आहे.
दाद, भेटायचं म्हणाल तर मला तिथे याव लागेल किंवा तुम्हाला इथे. ते शक्य होईल तेव्हा होईल. तुर्तास मीच इथे बसल्या बसल्या तुम्हास पैरी पौना करतो. तुमच्या इतकं भन्नाट लिहीता येईल तो सुदिन माझ्यासाठी.

उत्कृष्ट..... प्रस्थापितांच्या तोडीचे..

रुनी, 'एक फुल दोन हाफ' अप्रतिम असतं. बर्‍याचदा वाचलय मी. लिहीणारे कोण ते ठाऊक नाही, पण त्यांच ज्ञान अफलातून आहे.>>>

ते अरुण टिकेकर आहेत. लोकसत्ताचे माजी संपादक. ह्या सदराचे एक पुस्तक सुद्धा आलयं..

सही!!!!!! Lol येऊदे आजुन..डोम्याला भेटायचं आहे परत Happy