फुटकळ

Submitted by टवणे सर on 28 November, 2009 - 11:30

पुढे अनेक वर्षांनी उंचावरुन जेव्हा त्याने शरीर खाली ढकलले तेव्हा त्याच्या ढुंगणाला जसा गार वारा लागला तसाच गार वारा आत्ता त्याच्या चेह‍र्याला लागत होता. कॉलेजच्या मुख्य इमारतीमागच्या हिरवळीवर त्याच्या आणि तिच्या सारखी अनेक युगुले पहुडलेली होती. त्याआधीच्या चार वर्षाच्या इंजिनीअरींगमध्ये एकाही मुलीने ढुंकुनही बघितले नसल्याने तो अश्या पहुडलेल्या युगुलांकडे तुच्छ कटाक्ष टाकून मनात चरफडत फिरत असे. सध्या मात्र इतर जगाची आपल्याला पर्वा नाही अश्या आविर्भावात तो हिरवळीवर मांडीवर डोके ठेवून पहुडला होता. समाजाच्या रुढी-रिती ह्या त्याच्या प्रक्षोभांचे इंधन होत्या. त्याशिवाय आणि मुख्य म्हणजे लोकांनी त्या पाळल्याशिवाय विचारांचे जे डबके साचूनच राहिले असते ते किती भयानक झाले असते ह्या विचाराने कधी कधी तो खडबडून जागा होत असे.
"तर डिडक्टिव्ह लॉजिक वापरले काय किंवा इंडक्टिव्ह लॉजिक वापरले काय, सर्वोच्च शक्ति असेलच असे सिद्ध होत नाही. म्हणजे ती नसेल असेही सिद्ध होणे अशक्यच आहे आणि तसे म्हणणे देखील आपल्याच म्हणण्याला छेद दिल्यासारखे आहे. पण तसे सिद्ध करता येत नाही म्हणुन सर्वोच्च शक्ति असेलच असे मानूनच जगणे म्हणजे मूर्खपणा आहे."
"असेल. चल आता. उद्या सकाळी लवकर निघुया."
सकाळी सकाळी लवकर उठुन (आणि रात्री प्यायलेल्या दारुचा पारोशा वास जीभेच्या टोकावर ठेवून) तिला घेउन तो मग शिर्डीला गेला. शिर्डीमध्ये ती आत मंदिरात गेल्यावर बाहेरच सिगरेट पीत वेळ काढू असा विचार करत असताना, चप्पल काढ, तिकडे ठेव आणि माझ्याबरोबर आत चल अश्या तीन वाक्यांच्या एकत्रित परिणामामुळे त्याला आत जावे लागले. तिच्या दोन्ही हातात पुजेचे ताट होते आणि तिने डोक्यावरुन ओढणी घेतलेली होती. तो दोन्ही हात पाठीमागे बांधून मान वर करुन इकडे तिकडे बघत रांगेतून पुढे निघाला. नवीन बांधकामात असलेली कुरुपता त्याच्या नजरेतून न सुटल्याने तो समाजाच्या रुचीवर कृद्ध झाला. परंतू समृद्धीशिवाय उच्च रुची उत्पन्न होणे हे लोकांना खायला नसताना त्यांनी केक खावा असे सांगणा‍‍र्‍या फ्रान्सच्या राणीच्या क्रूरतेच्या तुलनेतले क्रूर विचार झाले असा विचार त्याच्या मनात आला. तेव्हड्यात साईबाबांच्यासारखी दाढी वाढवून आणि कफनी घालून रांगेस उगीचच शिस्त लावायचा प्रयत्न करणार्‍या ऐतखाउ ढोंगी भटक्यास बघून त्याला पुन्हा तिटकारा आला. भारतात असे किती लोक असतील आणि अशी एकूण किती क्रयशक्ति वाया जात असेल ह्याचा हिशोब जवळपास लागायला आला असता त्याला एकदम आतल्या दालनात साईबाबांची भली थोरली मुर्ती आणि त्या मुर्तीच्या आसपास सोळं नेसून पोट सुटलेले ब्राह्मण दिसले आणि त्याचा प्रक्षोभ पराकोटीला पोहोचला. भारताच्या आजच्या परिस्थीतीला संपूर्णपणे कारणीभूत असलेली ही स्वत:च्याच पुर्वजांची अवलाद बघून तो जात्युच्छेदन, मंडल योग्य की अयोग्य, आरक्षणास समर्थन देणे न देण्यापेक्षा नक्कीच अधिक चांगले अश्या विचारांची भेंडोळी डोक्यात उलगडवत असता तिने पुजेची थाळी ब्राह्मणाच्या हातात देउन त्या ब्राह्मणाला मनोभावे नमस्कार केला. तो हात मागे बांधून त्या ब्राह्मणाच्या नजरेला नजर भिडवून उभा राहिला. पण ब्राह्मणाने त्याच्या नजरेला नजर देण्याचे कष्टही न घेता रांगेतल्या मागच्या युगुलाकडे बघितले. तो तिच्याबरोबर बाहेर आला. आज एकदाही न भांडता शिर्डी कार्यक्रम सफल केल्याबद्दल त्याने एक सिगरेट ओढली. पुरुष सिगरेट ओढत असेल तर आपल्याला गैर वाटत नाही पण स्त्रीयांनी सिगरेट ओढली तर मात्र लोकं वळुन वळुन बघतात. अगदी तो स्वत:देखील त्याच्या नकळत तेच करतो. पण अश्या छोट्या छोट्या गोष्टींची त्रयस्थपणे चिरफाड करुन स्वत:च्या जाणीवेच्या कक्षा सर्व समाजानेच वाढवल्या पाहिजेत असा विचार त्याने बोलून दाखवला.
"सिगरेट ओढणेच मुळी वाईट. कुठेतरी चांगल्या ठिकाणी जेवुया परतताना."
वाटेत त्याला काही तरुण मुसलमान मुले मुसलमानी टोपी घालून आणि घोट्याच्यावर संपणार्‍या तुमानी घालून घोळक्याने चालताना दिसली. मुसलमान घोळका पाहून त्याला ही लोकं कायम घोळक्यातून हिंडतात व प्रथम निष्ठा धर्मावरच ठेवतात ह्या सत्याची प्रकर्षाने जाणीव झाली. देवावर श्रद्धा नाही असे म्हटले तर एकेश्वरवादी धर्मानुसार तुम्ही धर्मबाह्य होता पण हिंदू धर्मात तुम्हाला देवावर श्रद्धा असणे हे सक्तीचे नाही कारण हा धर्म नसून ही एक संस्कृती आहे व ह्या देशात राहणारे सर्व ते हिंदूच अशी संपूर्ण विचारमालिका एका झटक्यात त्याच्या मेंदूच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सळसळत गेली. पण मग हिंदूच का, फक्त ’ह’च का नाही किंवा मग हिंदूंनाच मुसलमान म्हटले तर काय बिघडले अशी विचारमाला विरुद्ध दिशेने सळसळत गेली. हॉटेल येइपर्यंत हेच चालू होते.
हॉटेलात तिने बिस्लेरीची बाटली विकत घेतली. त्याने तिथल्याच प्लास्टिकच्या जगमध्ये ठेवलेले पाणी ग्लासात ओतून प्यायले. तिने पनीर मख्खनवाला आणि एक बटर नान मागितला. सर्वांनाच पनीर आवडत असल्याने त्याला आवडत नसल्याने त्याने पालकाची कुठली कुठली भाजी आहे असे विचारल्यावर वेटरने पालक पनीर असे सांगितल्यावर त्याने मेथीची भाजी सांगितली. आणि साधी रोटी.
एकदा तिने त्याला विचारले की तुला घरात सगळ्यात जास्त कोण आवडतं?
’आमचा कुत्रा’
कॉलेज संपता संपता नोकर्‍या बिकर्‍या लागल्यावर तिला हॉस्टेलवर सोडायला एकदा रात्रीचे गेले असता ती त्याला म्हणाली ’किस मी’. तर ह्याच्या डोक्यात पहिला विचार आला की मराठीमध्ये उत्कट आणि मादक भावना व्यक्त करायला शब्दच नाहीत. माझे चुंबन घे. छ्या! माझा मुका घे. छ्याछ्या!! दांभिक संस्कृती आणि सामाजिक दांभिकतेचा भाषेवर होणारा परिणाम ह्यावर ऑरवेलच्या ’लॅंग्वेज ऍंड पॉलिटिक्स’ ह्यासारखा उच्च निबंध हो‍उ शकतो हे त्याच्या डोक्यात चमकले. तेव्हड्यात त्याला तिने काय विचारले ते लक्षात आले आणि घाई -घाईने त्याने तिच्या गालावर आपले ओठ टेकवले. ती हळुच हसत वर गेली.
थोड्या वेळाने खुशीत परतताना त्याला आपण नेमके काय करायला पाहिजे होते हे लक्षात येउन स्वत:चाच राग आला. नंतर अनेक वर्षांनी त्याला एका मैत्रिणीने किस्‌ आणि पेक्‌ मधला फरक सांगितला होता. पण त्याआधी एकदा तो ’कॉफी घेणार?’ असे उशीरा रात्री एका मैत्रिणीला घरी सोडायला गेला असता तिने विचारल्यावर तिच्या घरी जाउन फक्त कॉफी पिउन आला होता. त्या रात्रीत त्याला कॉफीबरोबर खाल्लेला क्रीमरोल सारखा दिसणारा पण आत क्रीम नसलेला खारीचा रोलच जास्त लक्षात राहिला.

तिघींना चांगले जोडीदार मिळाले. (त्याने नेहेमी नवरा हा शब्द वापरायचे टाळले. जोडीदार हे अधिक योग्य.) पहिली जाताना म्हणाली तुला कोणीतरी अजून चांगली मिळेल. त्यावर तो म्हणाला की पण तू काय वाईट आहेस. तर ती म्हणाली म्हणुनच! त्याला काही झेपले नाही.
दुसरी म्हणाली ’you are not mature'! म्हणजे काय ते त्याला अनेक वर्षे कळलेच नाही. mature म्हणजे प्रगल्भ की प्रौढ की अजून कुठली छटा हा गोंधळ मात्र अनेक वर्षे टिकला. नंतर मात्र ती एकदा अचानक भेटली.
’तू अजून एकटाच?’
’mature व्हायलाच बरीच वर्षे गेली आणि झालो तोवर एकटेपणाचीच सवय जडली’ ख्याख्याख्या!!
ती पण ख्याख्या, पण जोरात नाही, बारीकसंच. तिसरीने मात्र हे ऐकले असते तर उखडून म्हणाली असती तू असली फुटकळ वाक्य फेकण्याएव्हड्या खालच्या पातळीवर उतरशील असं वाटलं नव्हतं. त्यापेक्षा भेटला नसतास कधीच तर बरं झालं असतं. आणि तिसरी कधी भेटली पण नाही परत.

आरती प्रभूची एक कविता त्याला आवडायची.
प्रारंभीच सूर मारुन
ज्याने तळ गाठला
तोच फक्त जळत्या घरात
डाव मांडून बसला
एकदा दारु चढल्यावर तो मित्राला म्हणाला की जळत्या घरात मी पण डाव मांडून बसलोय, पण मी सूर कधीच मारला नाही. बसलो होतो आणि आग लागली. मी फक्त ती विझवायचा प्रयत्न करत नाहिये इतकच.

दारु.

शुक्रवार पहिला:
’हॉटेलात खूप महाग पडतं रे. घरीच आणुया.’
’....’
’मी साडेसात पर्यंत येतो. सुरेश माझ्याबरोबरच आहे तर आम्ही बाटल्या घेउन येतो. तू आणि दिप्या चखणा आणि जेवण ऑर्डर करुन ठेवा’
’...’
तो बाटल्या घेउन घरी पोचला. चखणा आलेला होता. त्याला केळ्याचे उभट कापलेले, थोडेसे तिखट लावलेले, लाल दिसणारे वेफर्स आवडत. ते त्याने आणायला सांगितले होते. पण दिप्याने केळ्याचे पिवळे, गोल काप असलेले वेफर्स आणले होते. म्हणुन मग त्याने चिवड्याची पिशवी उचलून स्वत:च्या मागे स्वत:साठी ठेवली. गप्पा सुरु झाल्या. तो अधून-मधून एखाद्या विषयावर बडबडत होता. पण पुस्तके, गंभीर राजकारण, आंतरराष्ट्रीय हितसंबंध ह्याबाबर तिथे कुणाला फारशी उत्सुकता नव्हती. कुणीतरी वॉकमनमध्ये आशिकीची कॅसेट सारली आणि कॉंप्युटरला जोडलेल्या स्पीकरांची पीन काढून ती वॉकमनमध्ये घातली. नदीम-श्रवणच्या छनछनटात कुमार शानूचा ’जाSSSSनम जाSSनेजा’ बाहेर पडले. अनुराधा पौडवाल त्यु करत गाउ लागली आणि तो उगाचच हसला. नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, अनु मलिक हे हिट असताना तो ए आर रेहमानच्या तमिळ कॅसेट आणून गाणी ऐकत असे. पुढे ए आर हिंदीत हिट झाल्या तर त्याला साठ आणि सत्तरच्या दशकातले इंग्रजी रॉक संगीत भावले. ती एकदा त्याला म्हणाली होती की तू वेगळेपणा दाखवायला मुद्दामून असं करतोस. त्याच्या मते मात्र त्याला जे आवडतं ते तो करत असे. नेमकं खरं काय हे कधीच कळलं नाही.

शुक्रवात दुसरा:
’मी घेउनच येतो घरी. तू बाकी घेउन ये.’
’..’
’ठिकय. सगळ्यांना नेहेमीचीच ना?’
पुन्हा आशिकीची कॅसेट. तीच दारु. तीच चर्चा. त्याच आठवणी.

शुक्रवार तिसरा:
तो दारु घेउन गेला. बाकीचे बाकीचं घेउन आले. सगळ्यांनी दारु प्यायली. त्याच्या त्याच आठवणी.

शुक्रवार अनेकाव्वा:
पुढे सगळे पांगले. दारु पिउन एकदा तो आरशात बघून स्वत:शीच बडबडला. बडबडायला कोणी लागतेच बरोबर असे नाही ह्याची त्याला गंमत वाटली. म्हणुन तो हसला. तर आरशातला तो पण हसला. पहिल्यांदाच स्वत:चा हसतानाचा चेहरा बघून त्याला अजून हसू आले.

शुक्रवार नंतरचा, नेहेमीचा:
तो घरी. कुलुप काढले. डाळ तांदूळ धुवून ठेवले. कांदा चिरला आणि झाकून ठेवला.
फ्रीजमधून थंड बीअरचा कॅन बाहेर काढला. चालू असलेले पुस्तक संपत आल्याने ते टेबलवरुन आणि दुसरे कपाटातून काढले. खुर्ची आणि छोटे स्टूल घेउन बाल्कनीत गेला. छोटे स्टूल पायाखाली घेउन खुर्चीत बसला. बीअर उघडली आणि दोन घोट घेतले. खिडकीच्या कट्ट्यावर बीअरची बाटली ठेवली. पुस्तक उघडले. आळीपाळीन बीअरचे घोट घेत पुस्तक संपवले. पुढचे सुरु केले. मध्ये मध्ये बीअर संपली तर ती आणली. थोड्या वेळाने डोळे जड झाल्यावर पुस्तक पोटावर ठेवले व डोक्यामागे एक हात घेउन शांतपणे बीअर पीत बसला. आठवणी नाहीत. कारण तो आता mature होता.
थोड्या वेळाने उठला. कूकरात धुतलेले डाळ-तांदूळ वेगवेगळ्या भांड्यात घातले. कूकरचे झाकण बंद केले आणि गॅसवर ठेवून गॅस चालू केला. लसूण-आले पेस्ट फ्रीजमधून बाहेर काढली. मसाल्याचा गोल डबा वर काढला. छोट्या कढल्यात फोडणी केली. तोवर डाळ शिजली. फोडणीचे वरण केले. भाताबरोबर खाल्ले. एकदा त्याला एक जण भेटली होती. तिला एकदा घरी जेवायला बोलावले असता तिने फोडणीच्या वरणाला आमटी म्हटल्यावर त्याला ती कधी एकदा जाते असे झाले. फोडणीच्या वरणाला आमटी म्हणणे, कॅसेटी लावून सामुहीक हसणे, कोसला न भावणे, दूर कुणी नसलेल्या ठिकाणी कंटाळा येणे, मनगटापर्यंत हात बुडवून पुरीत पाणी भरलेल्या पुर्‍या रस्त्यावर उभं राहून खाणे ह्याचा राग न येउन देणे त्याला कधीच शक्य झाले नाही. उलट त्याने अनेक वर्षे सिगरेट सोडून देखील सिगरेट पिणारा प्रत्येक जण त्याला आपलासा वाटे. सगळंच उगाचच.

आडवे तिडवे चालत पाय दुखले की बरे वाटते. उंच डोंगर चढताना छातीत दम भरला की बरे वाटते. डोक्यावर टोपी घालून उन्हात चालताना मानेवर घाम येउन त्यावर गार वारा बसला की वाजणारी थंडी बरी वाटते. डोंगरात दिवसेंदिवस कोणी भेटला नाही की बरे वाटते. शहराच्या गर्दीपासून, ऑफिसच्या रोजच्या त्याच त्याच लोकांपासून लांब गेले की बरे वाटते. कधीतरी असे लांबच जावे. एकाच रेषेत. पृथ्वी एव्हडी मोठी आहे की गोल फेरी होईपर्यंत काय टिकत नाही.
शेवटच्या काही क्षणात ज्या गोष्टी राहिल्या त्या आठवतील की ज्या गोष्टी केल्या त्या? डोंगरात फिरलो ते आठवेल की आठ हजार मीटर पेक्षा उंचीचे एकही शिखर कधीच सर केले नाही ते आठवेल? अनेक वर्षे ज्या घरात राहिलो ते आठवेल की कधीच न बघितलेले कल्पनेतच जगलेल्या जहाजावरच्या केबिनमधले दिवस आठवतील? त्या ’एक दोन तीन’ गेल्याचे आठवेल की एक दोन तीन आठवतील? गंगोत्रीहून बघितलेले सगळ्यात स्वच्छ आणि निळे आकाश आठवेल का? योझ्झेरिअन नागडा परेडला आला तसे उघडे नागडे आपल्याला स्वत:समोरदेखील होता आले नाही ह्याची बोच राहील की शवही बेटे मस्त जळते म्हणण्याची मस्ती असल्याचा आनंद होईल?

ढुंगणाला गार वारा लागत गेला.

गुलमोहर: 

लेखनशैली आवडली. कथा मात्र थोडी विस्कळीत वाटते: बर्‍याच गोष्टी, बर्‍याच जागी एकत्र केल्याने.

शिवाय आरती प्रभूंच्या कवितेनंतर दारू चे परिच्छेद तितके सहज "ऊतरले" नाहीत Happy

पु.ले.शु.

हे सगळ्यांना विस्कळीत का वाटतेय? मला तर फ्लो चांगला वाटला. त्यातून टण्याने लिहिलेले समजले म्हणजे नशीबच!

मजा आली वाचायला. दारूच्या आधीचे दारू घेतल्यानंतरएव्हढे दमदार वाटत नाही. आधीचे टण्या चे वाटलेले नि नंतरचे एक-दोन भारत सासणे, राजन खान mix केल्यासारखे वाटले.

शेवट आवडला म्हणजे शेवट आहे म्हणून नाही Happy तर शेवट केला तोही सुरूवातीला धरून केला म्हणून Happy

माझा प्रोब्लेम मात्र नंदिनीसारखाच आहे.... कदाचित पुन्हा वाचावं लागेल.

तो जिथे डाव मांडून बसला होता तिथून उठणं त्याला या जन्मात तरी जमलं नसतंच. हा एवढा एकच शेवट क्रमप्राप्त होता.

>> शेवटच्या काही क्षणात ज्या गोष्टी राहिल्या त्या आठवतील की ज्या गोष्टी केल्या त्या?
हा सगळाच परिच्छेद आवडला.

(बाकी एक दोन तीन आणि आमटी वाचल्याच म्हणायच्या एका अर्थी! :P)

मला कोसला चा खुपच प्रभाव जाणवला. Happy सशल सारख, वाचल्यावर चांगल वाटल पण नक्की काय समजल ते समजल नाही. Happy

परवा वाचलं हे... आणि प्रतिक्रिया न देता गेले.
कोसला वाचलं होतं तेव्हा मला ते खरच आवडलं नव्हतं... एव्हढ्याचसाठी की ते इतकं अंगावर येतं... "आहे हे असं आहे", ह्यातून तुम्हाला उमगणारं, झेपणारं असं जे... ते तुमचं!
असा "साधेपणा" असलेलं जे लिखाण... ते फार तापदायक असतं. कारण झेपणारं म्हणून जे आपण घेतो ते पेलायला सोप्पं नसतं.
टण्या तुझं हे त्या माळेतलं आहे... तापदायक आहे. अजून काय म्हणू?

अरे बर्‍याच लोकांनी वाचलय की.. असो.. काही काही वेळा एक सलग काही तरी उतरते त्यातले हे आहे.. पोट बिघडल्यावर अपरात्री जाग येउन एकदम साफ होउन जावे त्याप्रमाणे एका रात्री डोस्क्यातून उतरलेले आहे हे.. साधारण अर्ध्या-पाउण तासात लिहिले आणि न बदलता पोस्टले.. गेली अनेक शतके-पिढ्या अनेक लोक असं काहितरी कल्पित असतीलच.. पुर्वी बरेचसे अशिक्षीत होते आणि कागदही फार स्वस्त नव्हता.. आता नेट फुकट त्यामुळे इथे ते आले इतकेच..

देवाने माझ्या विपुत लिहिल्याप्रमाणे सुरुवात फोनी झालीये.. हंड्रेड यिअर्स ऑफ सॉलिट्युडची भ्रष्ट नक्कल झालीये (सुरुवातीबद्दल बोलतोय मी) असं वाटतय..

कोएट्झीचे स्लो मॅन नावाचे पुस्तक माझ्या डोक्यात घर करुन आहे वाचल्यापासून (माझ्या डोक्यात असली पुस्तकं घर करुन का राहतात कोण जाणे).. एका वयस्कर फोटोग्राफरला सायकल चालवताना अपघात होतो आणि त्याचा पाय अँप्युटेट करतात.. त्यामुळे आलेले परावलंबत्व आणि आयुष्यभर असलेले एकटेपण हा कादंबरीचा गाभा.. पण तो एकटा का राहिला असावा ह्याचे कुतुहल मला जास्त राहिले.. कदाचित वर लिहिलेले हे त्याच विचारप्रक्रियेचा एक भाग असावा.. नुकतेच एका साइटवर कोएट्झीचे 'वेटींग फॉर द डेड' हे नवीन पुस्तक आलेले वाचले.. ते पण वाचायला हवे.. समाज, व्यक्तिनिष्ठ-एकलकोंड्या माणसाचे समाजाबरोबरचे परस्परावलंबित्व वगैरे विषयांवर हा माणुस जबरदस्त लिहितो.. ह्याच विचारधारेचे 'लाइफ अँड टाइम्स ऑफ मायकल के' हे पुस्तक एव्हरेस्ट म्हणावे लागेल (हे पुस्तक मला असे भावले.. वरती लिहिलेल्या स्फुटातली तिसरी स्थूल मानाने जिच्यावर बेतलीये तिला हे फारच वेगळे समजले होते Happy ) सध्याच्या लेखकातला दोस्तोएव्हस्की आहे कोएट्झी म्हणजे..

असामी, दारुचे प्रसंग मी मुद्दामून सपक (फ्लॅट) लिहिले आहेत.. कॉलेजात, नोकरी लागल्यावर सुरुवातीला वगैरे दारु पार्ट्या ह्या आनंदाचे प्रसंग असतात.. तुम्ही त्या आठवणींची नंतरसुद्धा मजा घेता.. मला ह्यातून जे प्रसंग दाखवायचे होते ते ह्यातले नव्हेत.. दारु पिणे हे एक शुक्रवारचे काम, रिवाज होणे, किंवा आणखी एक संध्याकाळ घालवण्याचे साधन होणे आणि ज्यांच्याबरोबर बसले आहात त्यांच्याबरोबर काहिही समान विषय नसणे हे मला दाखवायचे होते.. मला कदाचित ते जमले नाही..

>> टण्या, तुझ्या प्रत्येक कथेतला कथानायक तुच आहेस असे (का) वाटते. >> ही मला मिळालेली सगळ्यात चांगली पावती आहे Happy मी चांगलं लिहीत नाही फार पण प्रामाणिक (म्हणजे फोनी नाही असे) लिहायचा प्रयत्न करतो.. कदाचित ते थोडं फार साध्य पण होतं असं दिसतय..

असो.. स्फुटापेक्षा प्रतिक्रियाच मोठी झाली. पण सध्या आठवड्यातून एखाद्याच वेळी माबोवर यायला जमत असल्याने एव्हडे लिहून हौस भागवली Happy

टण्या, त्यादिवशी वेळ नव्हता त्यामुळे जे पटलं नाही तेच तुझ्या विपुत टाकलं..
बाकी लिखाण आवडलं ह्याबाबत प्रश्नच नाही..:)
स्वाती म्हणाली त्याप्रमाणे शेवटचा परिच्छेद विशेष आवडला..:)
नंदिनी.. मला नाही वाटलं इथे गिचडी झाली.. जर ह्या लिखाणाला कथा म्हणून घेतलं तर वाटेल कदाचित पण व्यक्तीचित्रणात्मक स्फुट म्हणून वाचलं तर नाही वाटणार गिचडी..

>पण व्यक्तीचित्रणात्मक स्फुट म्हणून वाचलं तर नाही वाटणार गिचडी..
करेक्ट! टण्या ने वर नेमकी लेखन प्रक्रीया अन त्यामगची प्रेरणा (दारू नव्हे) Happy स्पष्ट केल्यावर हे लिखाण कथेपेक्षा "स्फुट" म्हणूनच अधिक भावते. "स्फुटकळ" म्हणा हव तर Happy

प्रामाणिक नक्की. भरत सासणे आणि राजन खान यांचा प्रभाव याबद्दल असाम्याशी सहमत.
कथा म्हणायचे तर क्राफ्ट मधे किंचित डागडुजी (त्याने प्रामाणिकपणा मरत नाही!) गरजेची. मग अजूनच उत्तम होईल.
पायापासून डोक्यापर्यंत आदर्शांची पुटं चढवलेल्या बकवास कथेपेक्षा हे निश्चितच वाचनीय आणि चांगले!

टण्या, तुझे स्पष्टीकरण देणे अजिबात आवडले नाही. ('स्पष्टीकरण आवडले नाही', असे मी म्हटलो नाही, तो भाग अलाहिदा. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही लोक तसेही म्हणतील, मी तसे म्हणत नाही. कारण तो सर्वस्वी तुझ्याच प्रश्नोत्तरांचा विषय आहे). काहीतरी 'इतर' संदर्भ देऊन तु तुझ्या कथेचे विषय अन संदर्भ पुर्णपणे बदलून टाकलेस. (किंवा त्यांना काही अर्थच ठेवला नाहीयेस.)

हे तु तुझ्या रंगीबेरंगीवर टाकले नसल्यामूळे सगळे बरोबरच म्हणायला पाहिजे. असो.

Pages