ईर्जिक

Submitted by यशवन्त नवले on 27 November, 2009 - 02:37

ईर्जिक
तर मी काय सांगत होतो की, जग बदलते आहे. मनुष्य प्राणी प्रगतीपथावर आहे. बैलजोडीची जागा ट्रोली ने घेतली. नांगराची जागा ट्रँक्टरने घेतली. बैलाचा कासरा धरणारे हाथ मोबाईल हाताळू लागले. तालमितल्या लाल मातीत घुमनरी पोरं पन्नास हजाराच्या बाईकला लाथ (किक) मारून सुसाट सुटली. आमच्या काळात हे काहीच नव्हतं. अन्न ही मानवाची प्रमुख गरज भगविण्या साठी कोस-कोस दूर चालत जावून बैलाच्या बरोबरीने काळ्या मातीत घाम गाळावा लागत होता. त्या साठी एकमेकाच्या सहकार्याची गरज होती. ईर्जिकीची कल्पना या गरजेतूनच साकारली असावी. "ईर्जिक" चा साधा आणि सोपा अर्थ "जेवणावळी". मात्र एक गोष्ट ध्यानात घ्या कि ईर्जिक चा खरा अर्थ शब्दा मधे कुणालाही व्यक्त करता येणार नाही. तो अनुभवावा लागतो. जसा मातीचा गंध. जो दरवळ्तो पण शब्दांकित करता येत नाही.
ईर्जिक ही एक व्यापक चळवळ आहे. सहकार्याची, सदभावनेची, आदर्श समाज व्यवस्थेतील माणसा-माणसातील अतूट नात्याची, माणुसकीची आणि प्रेमाची. ईर्जिकी मधे या सर्वा पलिकडले अजून बरेचकाही दडले आहे. ते जाणून घेण्या साठी एका ईर्जिकीचा किस्साच सांगतो. कदाचित त्यातून थोडाफार अर्थ उलगडेल.

एक आटपाट नगर नव्हत.... साध सुध गाव होत.
आटपाट नगरातील राजवाडा नव्हता, राजा नव्हता अन त्याच्या दोन राण्या पण नव्हत्या.ना आवडती ... ना नावड्ती !
तिथे हो्त एक चन्द्रमौळी टुमदार कौलारू घर. शेताच्या बांधाला लागून.
लोक त्याला "धर्माची वस्त्ती " म्हणत !
त्या घराचा राजा होता धर्मवीर. लोक त्याला "धर्मा" म्हणत.
त्याची एकच आवडती राणी होती. नाव तिच द्रोपदी. लोक तिला "धुर्पा" म्हणत.

या राजा-राणीच्या घराच्या तुटक्या-फुटक्या कौलातून चन्द्रोदय झालेवर चंद्राचे चांदणे घरभर विखुरतात. म्हणून हे चन्द्रमौळी घर. तुम्ही याला फाटके-तुटके म्हणू शकता. मी मात्र चन्द्रमौळीच म्हणाणार! वचने किं दारिद्र? शिवाय खर्‍या चन्द्रमौळी घरा मध्ये राहणारॆ तथा-कथित सुखवस्तु लोक, धर्मा-धुर्पा पेक्षा जास्ती सुखी नव्हते. आई अंबाबाईच्या आशिर्वादनं धर्माच्या घरात दोन पोरं बागडत होती.थोरली "रक्मा" अन धाकला "शिवा". गोठ्यात धर्मानं लहानपणा पासून वाढिवलेली खिलारी जोडी अन धुर्पाच्या माहेरा कडून आलेली आंदन-गाय झुलत व्हती.

आता तुम्ही म्हनाल कि ही "आंदन-गाय" काय़ भानगड हाये ?
तर बगा, आम्च्या टायमाला नां , सासुरवाशिण बाई सासरला जाउदे न्हायतर म्हायाराला जाउदे , ती कदीपन मोकळ्या हातान जात नव्हती. तिच्या बरोबर बुत्तीची दुर्डी आन जोंधळ्याच पोतं न्हायतर कडधान्याचं गठुड असनारच. सासुरवाशिण घरला पोचल्यावर दुर्डी खाली होई पवस्तर बुत्ती गांवभर वाटली जायाची. सासुरवाशिण म्हायाराला आल्याची बातमी गावभर पसरायची अन पोरीच्या मैतरनी भरा-भरा गोळा व्हयाच्या.

आता तुम्ही म्हनाल कि ही "बुत्ती" काय़ भानगड हाये ?
बुत्ती म्हंजी साबुती, एक लहान आकाराची सारण भरलेली गोड पोळी. ही बुत्ती गावभर वाटून, सर्वांचे तोंड गोड करून, सर्वांना सासुरवाशिण घरी आल्याच्या आनंदात सहभागी करून घेणारा पदार्थ.

धुर्पा लगीन झाल्यावर पहिल्यांदा म्हायाराला आली. मैतरनीच्या घोळक्यात चारदिस कसं गेल कळलंपन न्हाय.सासरी जायाचा दिस उजाडला अन सर्व्यांच्या डोळ्यात दाटून आल. धुर्पाचा भाउ मुराळी म्हुन जायच ठरलं. त्यान बैलगाडी जोडली. बां न जोंधळ्याच पोतं गाडीत चढीवल.बुत्तीची दुर्डी पांढर्‍या धोतराच्या तुकड्यात बांधून गाडीत ठेवली गेली. धुर्पाच्या आईने तिची खणानारळान ओटी भरून जड अंत:करणान गाडीत बसवलं. बैलाच्या पठीवर थाप पडनार तेवढ्यात धुर्पाच्या बां न आवाज दिला " ए पोरा, जरा थांब !". धुर्पाचा बां बिगीनं गोठ्यात गेला. धुर्पाची लाड्की गाय "तुळसा" चा कासरा सोडला अन गाडी माग बांधून दिला. आंदन म्हनुन . तस बगितल तर धुर्पाच्या आई-बापान लग्नातल्या रुकवतात आंदन म्हनुन मोप भांडी-कुंडी दिली व्हती. पर धुर्पाचा बां लय दूरदर्शी. त्यो रुकवतात आंदन म्हनुन गाय पन देची म्हनत व्हता. भांडी-कुंडी काय निर्जीव वस्तु. पर धुर्पाची लाड्की तुळसा पोरीबर धाड्ली तर तिला सासरी एकटं-एकटं वाटायच नांय. वाट्ल कि माझ्या म्हायाराची जिती-जागती सखी हायं सोबतीला. उद्या आई अंबाबायच्या कुर्पेन घरात चार नातवंड खेळत्यालं. त्यासनी प्वाटभर दुध-दुबत मिळलं. म्हनुन काय रुकवतात गायं? ईक्रितच झाल ! . धुर्पाच्या आईला काय हे पटाना ! ती भर मांडवात धुर्पाच्या बां वर डाफरली ...
" काय यड का खुळं म्हनावं ? रुकवतात कुनी गायं बसिवत्यात व्हयं? पुन्यांदा म्हायाराला ईल तवा द्या काय ती."
त्यो दिस आज उजाडला. धुर्पा बरुबर आज तुळसा पन नांदाया निघाली व्हती. "आंदन " म्हनून!. धुर्पा आन तुळसा सांच्याला सासरी पोचली तवा तुळसाला बगुन धर्मानी सासर्‍याच्या मनातली कालवाकालव बरुबर हेरली.त्यानी दावनीच्या ईतर जनावरा सारखी तुळसाला पर माया लावली. वैरण तोडल्यावर पैली पेंडी तुळसच्या गव्हानित पडायची. रोज वड्यावर न्हिउन खरारा करायचा, बेलफळ लाउन घासुन आंघोळ घालायचा.
शब्दाविना एकमेकाच्या मनातील भावना जाणून त्याला स्वत:च्या आचरणानी प्रतिसाद देण ही फार थोर कला आहे, तिला परिपक्वतेची खोली आहे, दोन व्यक्ती मध्ये द्रुढ नांत निर्माण करण्याची क्षमता आहे मात्र शब्दांचा उथळ्पणा बिलकुल नाही.
धुर्पाच्या बां चा "आंदन-गाय" पाठविण्या मागचा हेतू पूर्णपणे सफल झाला होता. तिच्या दुधावर दोन नातवंड पोसली होती.

तर ही अशी हाय बगा "आंदन-गाय" ची भानगड!.

बोंबलां ! घडाभर तेल नमनालाच खर्ची झाल की ! आपुन कुठ व्हतो आन कुठल्या कुठ भरकटलो तुळसाच शेपुट धरुन!

तर मी काय सांगत होतो की, त्या चन्द्रमौळी घरातल्या राजा-राणीचा संसार लेकरा-बाळा सकिट आन गोठ्यातल्या गाय-म्हशी सकिट मजेत चालला व्हता. बाप-जाद्याची ईस बिगा जमीन हुती. धुर्पा तिचा उल्लेख "काळीमाय" म्हनून करायची. वैशाखाचा वनवा थंड झाला व्हता. जेष्टी पुनव पन उलटून गेली व्हती. म्हातार्‍याच्या आजारपनानं धर्माला पुरा घेरला व्हता. अजुन बिगाभर जमीन पर नांगरून झाली नव्हती. हां हां म्हंता आकाडातल पैल नक्षत्र फुटंल. धर्माला काय कराव काय सुचना झालं. आजच्याला जरी नांगर धरला तरीबी एका नांगरावर हापत्याभरात ईस बिग जमीन कशी काय नांगरून व्हनार? धर्मा शेताच्या बांधावर डोक्याला हाथ लाउन बसला व्हता. पांदीवरन गुरवाच्या म्हाद्य़ाला जाताना बगुन धर्माच्या डोक्यातला तिडा सुट्ला. त्याला एक दिसात आख्खी ईसबिगा जमीन नांगरायची चावी सापडली. धर्मान बसल्या जागवरनं साद घाताली......
" ए ~~ म्हादा ! हाकड ये जरा ! "
म्हादा येउन बांधावर धर्माच्या शेजारी टेकत बोलताझाला...
" कांय धर्मा ! काळजीत दिसतुयास जनुं ! आं ! काय झालं ?"
" त्यच काय हाय म्हादा, म्हातार्‍याच्या दुखण्यापायी आवंदा जमीनीची नांगरट आज पतुर झाली नाय बग ! आता पावसाच्या आगुदर सगळी मशागत उरकायची तर मला ईर्जिकी
शिवाय दुसरा कुटलाच रस्ता दिसत नांय !"
" आरं मग घाल कि ईर्जिक मर्दा ! च्या मायला, एका दिसात आख्ख शिवार उखडुन टाकुया ! दिउ का समध्यासनी उध्याच आवातनं ! बोल !"
घटकाभर डोकं खाजऊन धर्मानं निर्णय घेतला.....
"व्हयं ! त्याच्या बिगर दुसरा कायबि ईलाज नाय ! दे उद्याचं आवातनं सर्व्यासनी !"
"ठरल तर मग ! आत्ताच जाउन सांगतो सर्व्यासनी ! तुमी लागा तयारीला "
म्हादा उठून रस्ता धरणार तेवढ्यात धुर्पानं दरवाज्यातनं हाळी दिली...
" ओ~~ भावजी ! कुट निगालासा लगी ? मी च्या टाकलाय ! बसा जरा यळ !"
धर्माला चहा टाकण्याची आर्डर देण्याची गरज भासली नव्हती. "अतिथी देओ भव " हे धुर्पाच्या रक्तातच होतं. चहा पीत-पीत तिघांनी ईर्जीकीच्या तायरीची बईजवार चर्चा केली.१५-२० आवातनी म्हंजी लहान-मोठी धरून घरटी ४ मानस धर्ली तरी पाउन्शे लोकाची यवस्ता करावी लागंल. शिवाय दोन ईसा जनावराचा दाना-पानी बगावा लागंल. लेकरास्नी दुध लागंल. मीठ-मिर्ची, तेल-तिखाट, दळण ईत्यादी सर्व्या गोष्टी वर चर्चा झाली. ईर्जीकीच्या तयारीची मिटींग दोन मिनिटात संपली आन जो तो आपापल्या कामाला लागला.वस्तीवरून आत्ताच गावात जाव लागनार व्हतं. च्या चा शेवटचा घोट घेउन धर्मा-म्हादा उठलं. धर्मान कनगीतन धा पायली जोंधळ काढुन म्हादाच्या मदतीनं तेची दोन बाचकी बनिवली. दोघांनी एक-एक बाचकं खांद्यावर मारून गावचा रस्ता धरला. किश्या पाटलाच्या चक्कीवर बाचकी उतरून, चक्कीवरच्या पोराला आर्डर सोडली,
"नीट बारीक दळुन वस्तीवर पोचिव रं ! ईर्जीक हायं उद्याला. ".
पोरान मान डोलावली.
म्हादा मधल्या आळीत शिरला अन रस्त्यावरनच सगळ्यास्नी आवातनी ध्यायला सुरवात केली..
"ओ~ शिर्पा.... आरं ईर्जिक हायं उद्या धर्माकड ! लवकर यं सकाळी वस्ती वर! काय ?"
धर्मानं जोश्याच्या पाकाडीतनं वर जाउन मांग वाडयाचा रस्ता धरला. धर्माची चाहूल लागताच वाड्यावरची कुत्री कोकलायला लागली. बिर्‍या मांगाच्या पालासमोर आल्यावर धर्मान आवाज दिला...
"हाईत का बिरुबा घरांत ? "
डोक्यावरच पागुटं सारख करत बिरुबा पालाच्या भाईर आला.
" कोन त्ये ? धर्मादादा व्हयं ! या या बसाकि ! लंय दिसानी येन केलं ! "
बिरुबाच्या बायकुनं पालातली घोंगडी आणुन पालाफुड टाकली.
" नग ! बसाया टाईम न्हाय ! उध्याची ईर्जीक ठिवलिया ! हाल्गी तापउन ठेव बगं ! ईसरू नको "
" न्हाय बां ! ईसरीन कसा ! यतोकि हाल्गी घिउन सकाळी-सकाळी ! बिनघोर र्‍हावा तुमी " .
ईर्जिकीनं "टेकॉफ" घेतला होता. म्हादा आवातनी करून घरी गेला होता. चक्कीवरच्या पोरानं दोन पायल्या जोंधळ्याच पीठ पाडलं होतं. १५-२० घरातल्या बायका पोरांना ईर्जिकीची खबर पोहोचली होती. धुर्पा घरातल्या आवरा-आवरीत गुंतली होती. धर्मा मात्र घरी जाउन बिनघोर झोपला होता. आपल शेत आता पिकणार याची खात्री पटल्याने तो निर्धास्त झाला होता.

शेवटी तो ईर्जिकीचा दिस उगवला. पैल कोंबडं आरावलं तवाच धुर्पा उठली व्हती. आंगुळ-पांगुळ ऊरकून अंगणात सडा घातला. चुल पेटवली अन च्या चं आदंन ठेवल. धर्मानं कुस बदलली तसा धुर्पानं आवाज दिला...
"आवं ~~ उटा कि आता ! का दिस उगवायचि वाट बगताया "
धर्मा उठला. चूळ भरून दोघंनी च्या घेतला.पोरस्नि उठिवलं. वैरण तोडून गुराम्होर गव्हानीत टाकली.
झुंजू-मुंजू झाल तसं एक-एक गडी बैलगाडीत नांगर, जूं , कासरा ईत्यादी आवजार घेउन जमाय लागला. वरच्या आळीचा बाप्या, खाल्या आळीचा धोडुदादा, माळावरला पोपट्या, पाटलाचा रम्या, सुताराचा किसन्या, सोनाराचा ईसन्या, माळ वाडितला भैरू, लव्हाराचा बाळ्या, गुरवाचा दत्या, हौसाक्काचा राम्या, शेलाराचा बाब्या......समदी जंनं आली. दिवस उजडे पातुर पंधरा-ईस गडी जय्यत तयारीनिशी गोळाझाली. धुर्पाची समद्यासनी च्या-पनी देता-देता धांदल उडाली व्हती. तरी बरं ! किसन्याची बायकु हिरा अन पोपट्याची शेवंता सकाळच्या पारी मदतीला आल्या व्हत्या.

च्या झाला.
तंबाकुची चंची समध्यांच्या हातातनं फिरून परत जागच्याजागी आली.
तळहातावरच्या पत्तीला चुना रगडून मस्त मळणी झाली.
तंबाकुचा बार भरून मान तिरकी करून पिचकारी मारीत सर्वीजन उठ्ली.
धोतराचे सोगे खोचले गेले. बैलांच्या मानंवर जूं कसली गेली. नांगरची पाती बांधून, दोन नांगरच्या मधी कासराभर अंतर ठेउन सर्वांनी आपापली पात धरली. कुनालाबी कायबी सांगा-सवरायची गरज पडली नाय. खरं पायल तर धर्मा या शिवाराचा मालक. पर आज त्यो कुनाच्या हिशोबातच नव्हता. जस काय समध्यास्नी अस वाटत व्हतं की हे शिवार आपल हाय, आन ते सांच्यापतुर नांगरून व्हयालाच पायजे.

समदि तयारी झाली.
दत्या गुरवानं बैलांच्या कपाळावर गुलाल टाकून नांगराच्या फाळावर नारळ वाढीवला.
धर्मा-धुर्पा नं काळ्या माईला हळद-कुकू वाहून जमीनीवर डोस्कं टेकिवल तसं बिर्‍या मांगाची थाप हाल्गीवर पड्ली.
हाल्गी कडाडली.
बैलं कान टवकारून फुस्कारायला लागली.
सर्वांनी एकच कल्लोळ केला.....
" भैरुबाच्या नांवानं ~~ चांग भलं ! "
नांगराचा फाळ हाथभर जमिनीत घुसला अन काळीभोर ढेकळं बका - बका उदसून टाकाया लागला.

ईकडं बाया मानसं आपापल्या घरची धुनी-भांडी, केर-पोतारा उरकून लेकरा-बाळांना घिउन धुर्पाच्या वस्तीवर जमाया लागली. जिला जे दिसल ते काम कराया लागल्या. न सांगता न सवारता. समध्याजनी जनुकाय सवताच्याच घरात वावरत होत्या. हौसाक्काची एन्ट्री झाली अन वातावरण बदलून गेलं. हौसाक्का ही सर्व्याजनी मधे जेष्ट. तिचं जेष्टत्व सर्वमान्य. तिनं वस्तीवर पाय ठेवला अन सर्व सुत्र स्वताच्या हातात घेतली.
"ए धुर्पा, दुध तापवायला ठेवलस का ?"
" ए तुळसा, यका चुलीवर काय व्हनार हाय ! आजुन दोन चुली पेटवा ! आत्ता दुपार्च्या जेवायचा टाईम व्हईल ! बापै मानसास्नी भाकरी साठी ताटकळत ठिउ नांय कदी ".
" तुमी दोगी-तिगी कांय करताय गं हिरिवर ? एकीन पानी शेंदा आन दोगीजनी रांजनात आनुन वता."
" ए शेवंता , त्या पोराला पाजं आगुदर! कवापस्न रडतया"
" काय फुलाबाय, बसल्या का तुमी मिसरी लावत ? तुमचं मुरली-वादन उरका बिगिन आन चटनी घ्या वाटायला "
" ए पोरी , ते दुरडीतलं कांदं टाक चुलीत भाजायला"

हौसाक्काच्या भात्यातनं सटासट आर्डरी सुटाया लागल्या आन सगळ्या जणी त्या खुशीनं पेलायला लागल्या. तिची सासुगिरी सर्वजणींना हवी - हवीशी वाटायची. गावच्या कुठ्ल्याही बाईवर कसलंही संकट येउदे, हौसाक्का त्या संकटा समोर ढाली सारखी उभी राहायची. मग दोघीमधे एकतर नवीन नातं निर्माण व्हायच किंवा असलेल नातं अधिकच द्रुढ व्हायच.
आई मधल्या सासूचं आणी सासूमधल्या आईच नातं!. भारतीय आदर्श कुटुंब व्यवस्थेचा पाया भक्कम करणार नातं!.
" बकुळा दिसत न्हाय कुट ती ? परंत वांत्या व्हया लागल्या का काय म्हनावं ?"
हौसाक्काच्या या फेकीन चांगलीच खसखस पिकली.
खर पाहिल तर या सगळ्या जणी आपापल्या घरी जी नैमत्तीक कामं करतात तीच सगळी काम ईथं येउन करीत होत्या. पण ईथ एकत्रित काम करण्याचा आनंद वेगळा होता. हुरुप होता. नवीन घडामोडींची आणी घरोघरीच्या बातम्यांची देवाण - घेवाण चालू होती. एकमेकीच्या कानात कुजबुज चालु होती. चेष्टा-मस्करीला उत आला होता. दर दोन मिनिटाला खसखस पिकत होती. सर्वजणी बाजारात पैसे देउन सुद्धा विकत न मिळ्णार्‍या गोष्टींचा पुरेपूर उपभोग घेत भराभर कामं उरकत होत्या. पोरांची फौज धमाल करीत होती. भांडा-भांडी, रडा-रडी आणी शक्य होतील त्या सर्व उचापती चालू होत्या. जाता-येता कुणीतरी त्यांच्यावर डाफरून, मुलांचे कडून कसल्याही प्रतिक्रियेची अपेक्षा न धरता आपापल्या कामाला निघून जात होते. त्यामुळं सगळी फौज कानात वारं शिरलेल्या वासरा सारखी बेभान होउन आजच्या दिवसाचा पुरेपूर उपभोग घेत होती.

तीन दगडं मांडून तयार केलेल्या चार चुली धगधगायला लागल्या. फोडणीचा झटका नाकात शिरून ठसका-ठसकी झाली. दोन-तीन काटवटीत भाकरीचं पीठ मळायला सुरवात झाली. सर्व काही कंट्रोल मधे आहे याची खात्री करून घेत हौसाक्का पडवीत टेकली, तेवढ्यात धर्मा अंगणात आला..
" हौसाक्का, मी गांवात जाउन येतो जरा. सांच्या ईर्जीकिची यवस्था करुन येतो."
" आगदि बिनघोर जा ! हिकडच संम्ध बगते मी "
नाही तरी आता धर्मा-धुर्पा चा कुठ्लाच रोल शिवारात किंवा घरात राहिला नव्हता. सर्वांनी आपापली जबाबदारी पेलली होती.

धर्मा वस्तीवरनं निघाला तो थेट मन्या सावकाराच्या वाडयावर जाउन धडकला. मोठ्या रुबाबात सावकाराच्या पडवीत चोपाळ्या शेजारच्या खांबाला टेकून बसला. झोपाळा थांबला. दोघांनी एकही शब्द न उच्यारता एकमेकांना न्याहाळल अन सावकार गपचुप उठून माजघरात निघून गेला. धर्माच्या ईर्जीकीची बातमी सावकराच्या कानावर कालच आली होती. त्यामुळ धर्माच्या येण्याच प्रयोजन काय आहे हे कुणी सांगण्याची गरज नव्हती. शंभराच्या पांच नोटा हातात घेउन सावकार परत पडवीत प्रगट झाला. त्यातल्या चार नोटा धर्माच्या हातावर ठेवल्या. जागेवरुन तसुभरही न हालता धर्मानं सावकाराच्या डोळ्यात नजर भिडवली. शब्दाविना नेत्रांची भाषा झाली अन सावकारानं पाचवी नोट धर्माच्या हातात कोंबत वडिलकीच्या हक्कानं दम भरला...
" यवडयात समद भागवायचं ! उगाच पैका हातात आला म्हुन उडवीत बसायच नांय ! निट लक्षात ठेव !"
सावकाराचे शब्द कानात शिरे पर्यंत धर्माने वड्याचा उंबरा ओलांडला होता. रुबाब असा काय कि जणू तोच सावकाराला कर्ज देऊन गेला आहे.

असा हा कर्ज देण्याचा आणि कर्ज घेण्याचा " सो काँल्ड " व्यवहार दोनच मिनिटात व कमित कमी शब्दात पूर्ण झाला होता. कागद नाही, शाई नाही, लिखावट नाही, स्टँम्प पेपर नाही, सही नाही, अंगठा नाही कि साक्षीदार सुध्दा नाही. असा हा आगळा वेगळा व्यवहार फक्त या काळ्या आईच्या कुशीत वाढलेल्या निष्पाप जिवां मध्येच होऊ शकतो. माणिकचंद उर्फ मन्या सावकार हा या गांवचा पिढीजात सावकार. वाड-वडिलांची सावकारी मन्या ने पुढे रेटली होती. पण अशी ही सावकारी म्हणजे आक्रीतच म्हणायच. सावकारकीच्या व्यवसायाला बट्टा म्हणा हव तर !. मन्या सावकार म्हणजे या गावची सार्वजनिक बँक आणी शेती मालाची बाजारपेठ सुध्दां. गावात कुणाच्याही घरी, कसलही अडचण अथवा कार्य असूदे. अगदि बाळंत पणा पासून ते मयती पर्यंत, फायनान्सर म्हणून मन्या सावकार ठामपणे पाठीशी उभा असायचा. पिकांच्या कापणी नंतर खळ्यातली रास घरात यायची. कणगी सारऊन, काठोकाठ भरून शेणाने बंद केल्या जायच्या. अशा प्रकारे पुर्ण वर्षाची बेगमी झालेवर शिल्लक राहिलेल सर्व धान्य पोत्यात भरून गाडी सावकाराच्या वाड्यावर पोहोचायची. सावकाराच्या पडवीत धान्याच्या पोत्यांची थप्पी लागत राहायची. एकदिवस सावकारच्या दारात ट्रक उभा राहायचा. जमाझालेला सर्व शेतीमाल ट्रक मधे भरून सावकार "म्हमई" ला जायचा. चार दिसांनी उगवायचा ते नोटाच पुडकं घेउन. मग एकेकाला वाड्यावर बोलाउन घेऊन आख्या वर्षाचा सविस्तर हिशेब सांगायचा अयशस्वी प्रयत्न करायचा...

" हे बग भैरू, तुझी जवारी भरली धा किंट्ल, त्याचे एवढे पैसे झाले...
बाजरीचे एवढे, हळदीला काय या वर्षी चांगला भाव भेटला नाय, त्याचे एवढे ...
सर्व मिळून एवढे झाले..एवढे
ट्रक वाल्याला एवढे दिले, त्यात तुझा हिस्सा एवढा....
पोरीच्या लगनाला तू एवढे घेतले होतेस...
दिवाळ सणाला तुझ्या बायकुनं एवढे नेले...
बँकेच्या भावा परमान माझ्या याजाच्म एवढ झालं ....
आणी हे आता एवढे शिल्लक रहिले ... हे घे "

सावकराचा हिशेब कसा चोख असायचा. त्यासाठी कसाल्याही कागद पत्राची गरज नसायची. सावकार हिशेब सांगत रहायचा अन समोरचा माणूस सावकाराची बडबड या कानाने घेऊन त्या कानाने सोडत राहायचा. सावकाराचे शेवटचे दोन शब्द " हे घे " कानात शिरले कि पट्कन हाथ पुढे व्हायचे. सावकाराने हातात ठेवलेल्या नोटा कोपरीच्या खिशात कोंबत तो माणूस चालता व्हायचा अन दुसरा टपकायचा. हे रूटीन आठवडाभर चालू राहायच.

तर असा हा मणिकचंद सावकार फक्त " गांवची बँक आणी शेत मालाची बाजार पेठ " या पुरताच मर्यादित नव्हता, तर अजून एक जबाबदारी त्याने स्वत:च अंगावर ओढून घेतली होती. वडिलकीच्या नात्याने गांवकर्‍यांच्या भविष्याची चिंता करण्याची जबाबदारी. कसं ते या किस्या वरूनच कळेल ...

त्याच काय झालं, मागल्या वर्सी चैतीची पुनव झाल्यावर कुदळवाडीचं पावनं भैरूच्या थोरल्या लेकीला बगायला आलं. पोरगी देखणी. चार-चौघीत उठून दिसायची. नाकी-डोळी सरस. चांगल्या संस्कारात वाढलेली. नांवं ठेवाया काय पर जागा नव्हती. कुदळवाडीकरांनी लगुलग पसंती सांगुन टाकली. कुदळवाडीकराच घरान बी मात्तबर. दोन्ही बाजूनी होकार भरला. झालं . लग्नाची बैठक बसली. दोन्ही गांवची वयस्कर मानसं पानाला चुना लावत अन सुपारी कातरत समोरासमोर बसून एकमेकाला तोलत होती. भैरू अगुदरच फाटक्या खिशाचा. त्यात समोरची पार्टी मात्तबर. कुदळवाडीत तेंचा मोठ्ठा बारदानां. ही सोयरिक आपल्याला काय झेपणार नाय म्हनून भैरून आगुदरच कच खाल्ली व्हती. पर पोरगी खात्या-पित्या घरात पडनार म्हनून गांवकर्‍यांनी अन भैरूच्या बाकुनं त्याला भरीस घातलं. बैठकीत एकेक ईषय यायला लागला तस भैरूच्या छातीत धडधडाया लागलं. भैरू तोंड उघडाया लागला कि किस्ना मास्तर त्याला डोळ्यांनी दटाउन " गप गुमान र्‍हा " म्हनून सांगत होता. एकेक मुद्दा फुड सरकत होता.......

लग्नाचा मांडव पोरीच्या दारात पडनार ............... ....................ठरलं !
उमदा घोडा, ताशा-पिपानीचा ताफा ..........................................ठरलं !
नवरा-नवरीची कापडं, शालु , हळदीच लुगड्म ........ ..............ठरलं !
आई कडल डोरलं, आजी कडून नथ, सासू कडून गंठण ...........ठरलं !
मामाच कन्यादान, आत्याच पैजण.........................................ठरलं !
वरमायांचा मान, आजचीर , रुकवतावरची साडी .....................ठरलं !
वरबापाचा पोशाख, मामाला फेटा .........................................ठरलं !
मावळणीची घागर, तिचा मानपान ......................................ठरलं !
करवलीचा मान , कानपिळ्याचा पोशाख .............................ठरलं !
बारा बलुतं दारांचा मान .................................................ठरलं !
हे...............................ठरलं ! ते...................................ठरलं !

सर्वांचा मानपान, परंपरागत रीती-रिवाज सांभाळत आणी चार कलाक घोळ घालत चाललेली ती बैठक एकदाची भैरवीच्या सुरावर येउन ठेपली. शेवटी किस्ना मास्तरानी मधुमध भला मोठा दगड ठेउन तेच्यावर सुपारी ठिवली. हुबं र्‍हाउन खडया आवाजांत सगळ्या ठरावांची पुन्यांदा उजळणी केली अन समस्त उपस्थितांना शेवटचा सवाल केला......

" तर काय मंडळी , फोडायची का सुपारी ?"

लोकं कबुली देण्यासाठी तोंड उघडणार तेवढयात कशीकाय ती माशी शिंकली आन उजव्या कोपर्‍यातल्या बायामानसांच्या कंपूतनं पैल्यांदाच खणखणीत आवाज उठला..............

" आमच्या घरच्या लक्षीमीला कायं लंकेची पारवती म्हून पाठिवतसा का काय म्हनावं ! आमच्या खानदानात धां सुना नांत्यात या घडीला ! पर कंच्याच कार्यात आस नाय घडल कधी ! निदान पाच-सा तोळ्याचा यकादा डाग नकोव्हय घालाया ? जनाची नाय निदान मनाची तरी.... ?"

झालं ! वरमायनं अगदि शेवटच्या क्षणी ठिणगी टाकून पोरीच्या आई-बापाच्या वर्मावर घाव घातला होता. बायामानसांच्या कंपूत त्या ठिणगीचा वणवा पेटायला वेळ लागला नाही. नवर्‍या कडल्या बायांच्या अंगात झाशीची राणी तर नवरी कडल्या बायांच्या अंगात कडकलक्ष्मी संचारली होती. उणी-दुणी काढून झाली, घालून-पाडून बोलणी झाली आता फकस्त एकमेकीच्या झिंज्या उपटायच्या बाकी होत. चांगला कलाकभर तमाशा झालेवर शेवटी हौसाक्काच्या मध्यस्तीन रणांगण शांत झाल अन वरमाय "तीन तोळ्यावर " तयार झाली. पण भैरू काय व्हय भरायला तयार व्हयना आन सुपारी काय फुटनां. शेवटाला कुदळवाडीचं पाटिल फेटा सावरत बोलायला उभं र्‍हायल तसी सगळी जण एकदम चिडीचुप झाली.....

"हे बगा मंडळी, यवडा खंल घालुन पर तोडगा निघत नाय मजी ह्या सोयरीकीचा काय योग दिसत नाय ! तवा आमी म्हनतो कि आता उठावं. तिनिसांजच्या आत आमास्नीबी वाडीवर पोचाया पायजे. तवा आता आमास्नी निरोप ध्या. "

वरपक्षाची ही निर्वाणीची भाषा ऐकून ईतका येळ एका कोपर्‍यात गप-गुमान बसलेला मन्या सावकार खाड्कन ऊभा राहून खड्या आवाजात फुट्ला ........

" पाटी~~ल ! ही बैठक सुपारी फुटल्या बिगर उठनार नाय!. गांवच्या ईभ्रतीचा सवाल हाय ! चला, घातल तीन तोळ पोरीच्या अंगावर ! हा गावच्या सावकाराचा सबूत हायं. आता फोडा सुपारी. तुमास्नी सोयरिकीची पुरणपोळी खाउ घातल्या बिगर हे गाव सोडू देनार नायं . "

कुदळवाडीच्या पाटलांनी परिस्थितीचं गांभिर्य लगोलग ओळखून सावकारा फुड हात जोडले....

" हे बगा सावकार, उगीच गैरसमज करून घेउ नकासा ! आमास्नी कुनाच्या ईभ्रतीला हात घालायचा नाय का कुणावर राग पन न्हाय ! पोरीच्या बापाला हां भरायला लावा, ही आत्ता सुपारी फुटंल!"

मन्या सावकार तावातावान उठला अन भैरूला बकुटीला धरून मागच्या दाराला घेउन गेला. मागुमाग किस्ना मास्तर पण गेला.

"भैरू ! माज ऐक लेकां . पोरीच ठरत आलेल लगीन मोडू नगं ! खात्या-पित्या घरी पोरगी सुखात राहील बग ! आता माग हटू नगं "
" पर सावकार, हे समध नाय झेपायच माझ्याचानी ! जमिनीचा तुकडा ईकावा लागंल न्हायतर डोक्यावर कर्जाचा डोंगर उचलावा लागंल ! मग बायकापोरांच्या पोटांत काय काट
घालू ? दोन-चार वर्षात धाकली पर ईल लग्नाला ! कस काय जमनार सार?"

भैरू डोळ्यात पाणी आणून पोटतिडकीन बोलत होता.

" तसं कायपंर व्हनार नाय ! मी काय सांगतो ते नीट ऎकून घे ! तुझ्या हातात पैका टिकत नाय हे मी पैल्या पासन वळकुन व्हतो. तुझ्या हातात नोटा पडल्या कि पार्‍या वाणी निस्टुन जात्यात. म्हनुन तुझ्य़ा धाकल्या पोरीच्या जलमा पासून आज पर्यंत तुझ्या उत्पन्नातला तिसरा हिस्सा मी परस्पर किस्ना मास्तराकडम जमा केलाय. मास्तरानी तालुक्याच्या पोस्टातनं तुझ्या नावावर सर्टिफिकिटं घेउन ठेवल्यात. तवा आता पैशाची कायपर फिकिर नाय. ईचार वाटलस तर मास्तरला ! "

भैरू भांबावल्या सारखा किस्ना मास्तराकडं बगाया लागला.....

"खरं हाय सावकार म्हंत्यात ते ! आजच्या घडीला तुझा पैका चांगला दान-दुप्पट झालाय. आर मर्दा, तीन तोळ काय घेउन बसलास, कुदळवाडीकरांनी पाच तोळ मागितल तरी तू देऊ शकतोस१. चल ! ताट माननं हो भर आन दे बार उडउन !"

दोघांच्या बोलण्यान भैरूचा ऊर भरून आला. पागुटयाच्या टोकानं डोळं टिपुन भैरू पडवीत दाखल झाला ते धा हत्तीच बळ घेउनच. सगळीकड चिडिचुप झालं. भैरू काय निर्णय घेनार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मिशीवरन हात फिरवीत भैरूनं ताट मानेन सगळीकड नजर फिरवली. शेवटी विहिणबाई बसलेल्या कंपूवर नजर स्थीर करून गर्जना केली ...............

"घातल तीन तोळ पोरीच्या अंगावर ! आनि वर जावयाला अंगठी पन घालतो ! फोडा सुपरी"

किस्ना मस्तरानी क्षणाचाही विलंब न करता, बैठकीला अजून पाय फुटण्या आगुदर हातातल्या दगडाचा सुपारीवर घाव घातलुन पार भुगा करून टाकला. गुरवाचा दत्या शिंगाला तोंड लाउन तयारच होता. शिंगाची थुई-थुई गावच्या वेशी पर्यंत जाउन घुमली अन समद गांव समजून चुकलं ! भैरूच्या पोरीची सुपारी फुटली ! सोयरिक जुळली!

एका मिनिटात सार वातावरण बदलून गेल. पानसुपारीची ताटं फिरायला लागली. हळदी-कुकवाचं करंड मिरवाया लागल.. काही वेळेपुर्वीच्या रणांगणाचा मागमूस सुध्दा राहिला नव्हता. वरमाय तोंडाला फेस येविस्तोवर व्हनार्‍या सुनेचं कवतुक कराया लागली. भैरूची बायकु जावायाच आप्रुक गायाला लागली. सयपाक घरात पुरणा-वरणाच्या सैपाकाची तयारी सुरु झाली. पडवीत पाचव्यांदा च्या चा कप जिरवीत तंबाकुच्या चंच्या उघडून शेतीवाडीच्या गप्पा रंगात आल्या. हळू हळू एकएक गावकरी कुदळवाडीकरांना रामराम करून काढता पाय घ्यायला लागला. शेवटी मन्या सावकार निरोप घेउन निघाला तस भैरूनं सावकाराला मिठी मारली .........

" सावकार ! आज तुमी देवासारकं धाऊन आलासा म्हुन मी वाचलो बगा ! न्हायतर गावात छी-तू झाली आसती !"

" आसं नगं म्हनूस मर्दा ! तुझी पोरं आन माझी पोरं काय यगळी हायती व्हय ! आनी म्या तरी आशी काय मर्दानकी गाजावलिया ? तुझा खिसा फाटका म्हनून तुझ्याच घामाचा पैका, तुझ्याच खिशातनं काढून मास्तराच्या भक्कम खिशात ठिवला."

तर मंडळी, असा हा आमचा मन्या सावकार. कागाद पत्रावर विश्वास नसलेला. फक्त माणसातील माणुसकी तारण म्हणून स्वीकारणारा. गांवचा अभिमानी. लोकांच्या भविष्याची चिंता करणारा. वसुली साठी कुणाच्याही दारात न फिरकणारा मात्र अडीअडचणीला हमकास टपकणारा. सावकारकीचा कुठलाही गुणधर्म नसलेला तरी सुध्दा यशस्वीपणे सावकारी करणारा. थोडक्यात काय तर सावकारकीच्या व्यवसायाला काळीमा फासलेला असा हा मन्या सावकार. त्याच्या या सरळ पणाचा गैरफायदा घेण्याचे धाडस कुणी केल नव्हतं.

तरी सुध्दा गांव तिथ हगीणदारी ही आलीच. बेन्या लव्हार हा त्याच घाणीतला किडा . बायकुच्या आजारपणाला म्हनून सावकारा कडनं सा महिन्याच्या बोलीवर कर्ज घेउन गेला आन दारू पीत बसला. बिचारी बायकु मरून गेली तरी याचा रोजचा खांबा चालूचं. धा महिनं उलटून गेल तरीबी सावकाराच्या वाड्यावर फिरकला नायं. बरं वसुलि तरी कशी करावी? उभ पीक शिरगांवच्या मारवाड्याला ईकून मोकळा झाला. वाट बगून बगून शेवटी सावकारानं तेच्या दारावर जाउन तगादा लावला. सुरवातीला टोलवा टोलवी करणारा बन्या शेवटी शेवटी सावकारावर डाफराया लागला. कायद्याची भाषा कराया लागला. काय पुरावा हाये तुझ्याकड मी पैस घेतल्याचा, आस उलटून ईचारायला लागला. सावकारान वळकुन घेतलं कि आपल पैस डुबलं. हळहळला बिचारा. रातभर झोपला नाय. सकाळी उठला तो डोक्यात सनक घेउनच. तडक कुंभार वाड्यावर जाउन एक मडकं घेतलं. तिरक्या न्हाव्याला त्याच्या धोपटी सकट फरपटत बन्याच्या घरासमोर घेउन गेला. दारात बसकन मारीत तिरक्याला हुकुम सोडला .......

"कर माज मुंडन ! मिशा सकट भादरून टाक मला "

सावकाराचं लालबुंद डोळं बगुन तिरक्याचं काय पन ईचारायचं धाडस झाल नांय. त्यानी गुमान भादरायला सुरवात केली. बातमी वणव्या सारखी गांवभर पसरली. अर्धा गाव जमा झाला अन बन्याच्या घरा भोवती कोंडाळं करून हुबा र्‍हायला. पर कुनाची हिंमत झाली नाय सावकाराशी बोलायची .पयल्यांदाच आस आक्रीत घडत होतं. बन्या मात्र दारात बसून दात ईचकत फिदीफिदी हासत सावकाराकड बगत व्हता. भादरून झाल्यावर सावकारान मडक्यात पाणी भरून खांद्यावर घेतल. बन्याच्या घराला उलट्या तीन फेर्‍या मारून मडकं सोडून दिलं. मडकं फुटल्याचा आवाज झाला अन सावकारान बन्याच्या नावान जोरजोरात बोंब ठोकली. कुणाशीही एकही शब्द न बोलता परत फिरला. जाता जाता बन्याला बजाऊन गेला ....

" बन्या ~~ भडवीच्या माझ पैसं डुबवलंस....... दारूत घातलंस ...... स्वताच्या बायकुला खाल्लंस .........तुझ्या नावानं मडक फोडल मी आज ! कुतर्‍याच्या मौतीनं मरशील बग !"

सावकार तडक घरी गेला. वड्याचा दरवाजा बंद करून आडसर टाकला तो दुसर्‍या दिवसा पर्यंत उघडला नाही.
सावकारानं दिलेला शाप खरा ठरला. सावकार शांत झाला. त्याने स्वत: पुरता "बन्या" अध्याय कायामचा बंद केला. पण गावानं बंद केला नाही. दुसर्‍याच दिवसा पासून गावच्या पोराठोरा पासून ते म्हातार्‍या कोतार्‍या पर्यंत सर्वांनी उत्फूर्त पणे, सामुहिक रित्या, बन्या विरुध्द "असहकाराचे" अघोषित युध्द पुकारले. गांधी बाबांनी सर्व सामान्यांना दिलेले यशस्वी हत्यार........ "अहिंसा आणी असहकार".
बन्याचा दानापानी बंद झाला. त्याला कुणी दारात उभं करेना. विहिरीवर कुणी पाणी भरू देईना. वाणी सामान देईना. चांभार चप्पल शिऊन देईना. शिंपी कपडे शिउन देईना. शेतीच्या कामाला मजूर मिळेना. बन्या अगदी एकटा पडला. जिथ जाईल तिथ हाडतुस व्हायला लागली. सावकाराच्या वाड्यावर जाउन नाकदुर्‍या काढल्या, गावकर्‍याचा हातापाया पडला. पण काहीसुध्दा उपयोग झाला नाही. सर्वजण आपाल्या भूमिकेवर ठाम होते. ज्या वटवृक्षाच्या छायेत सारा गाव नांदतो आहे त्या वटवृक्षाला लागलेले बांडगूळ कायमचं छाटून टाकणे आवश्यक होते. शेवटी बन्या वैतागला अन एक दिवस गांव सोडून ??????? ला पाय लाऊन पळून गेला. गांधी बाबाच हत्यारंच तस होत. आहो, एवढया मोठ्या ईंग्रजाला पळता भुई थोडी झाली तर मग हा बन्या किस झाड की पत्ती !

बोंबलां ! धर्माची ईर्जीक र्‍हायली बाजुला अन आपंन कुटल्या कुट भरकटत गेलो ? भैरूच्या पोरीची सुपारी फोडून बन्याच तेराव पन घालून आलो ! ह्या सगळ्या घोळात धर्माची ईर्जीक पडली कि बाजूला !

तर धर्मा ईर्जीकी साठी सावकाराकडून पाच नोटा घेउन भाईर पडला खरा, पर सावकाराच्या मनाला यका गोष्टीची चुट्पुट लागून र्‍हायली. आता ईर्जीक म्हनल्यावर रातच्याला वस्तीवर बकरं पडनार. सगळ मैतर मिळून मटनाचा रस्सा कोपरापोतर धार जाईस्तोर वरपनार. मग तेच्या जोडीला म्हनून धर्मान फुगा घेउन जाउनाय मजी मिळवली.

आता तुमी म्हनाल फुगा मजी काय?. त्याच आस हाय कि फुगा, खंबा, चपटी ही समदी एका द्रवरूप पदार्थाची माप आहेत. गावच्या जत्रला ह्या मापांचा लंय सुळसुळाट आसतो. एरवी कधीतरी कुनाकड खंडुबाचा जागर आसंल न्हायतर गावात तमाशाचा फड उतरला तरच ही मापं कानावर पडत्यात. म्हंजी आस कि, एकटा-दुकटा आसल तर चपटीत भागतं, जोडीला एक-दोन मैतर आसलं तर खांबा लागतो अन टोळक आसल तर फुग्या शिवाय भागत नाय.
पर धर्मानं हौसाक्काच्या भितीनं फुगा-बिगा काय घेतला नाय. सावकाराच्या वाड्यावरन निगाला तो सरळ धनगर वाड्यावर गेला.केरबा धनगर जाळीत मेंढरं कोंडून लोकर भादरत होता. धर्माला आलेला बगुन केरबान लहान-मोठी चार बकरी कळपातन बाजूला केली. धर्मानं बकर्‍यांच्या मागल्या खुब्यात हात घालून उचलून वजनाचा अंदाज घेतला. त्यातलं एक बकरू निवडून केरबाला ईचारलं.........
" ह्याच काय घेनार बोल "
केरबान उजव्या हाताची पाच अन डाव्या हाताची दोन बोट दाखवीत व्यवहाराच्या घासा-घासीचा श्रीगणेशा केला.
" काय बोलतो मर्दा, ह्याच सातशे ? तुझी बकरी काय सोनं हागायला लागली का काय म्हनावं. नीट ह्यवारानी बोल कि जरा "
तासभर घासाघीस करून धर्मान चार नोटा केरबाच्या हातात ठेवल्या आणि निवडलेल बकर पाट्कुळी मारून रस्ता धरला. हौसाक्कान सांगीतलेल्या चार गोष्टी वाण्याच्या दुकानातून घेतल्या. मशिदीला वळसा घालून टेकाडावरनं उतरत आब्बास भाईला आवाज दिला ....

" ओ ~~ आब्बास भाई, हायसाकां घरात ?""

दारावरचा जुन्या ओढणीचा पडदा बाजूला करीत आब्बास भाईने बाहेर डोकावल ...

" कौन ? धर्मा क्या ?हमको रातकोच मालुमपड्या ईर्जिक है करके ! दुपेरको आताय काटनेको ! "
" थोडा लवकरंच आव ! शिजनेको टाईम लगता है " ... धर्मान जवळ होत तेवढ हिंदी फांडत वस्तीचा रस्ता धरला.

धर्मा वस्तीवर पोहोचे पर्यंत दिस डोक्यावर आला होता. निम्म शिवार नांगरून झाल होतं. लोकांनी दुपारच्या जेवणाची सुट्टी केली होती. बैल झाडाखाली वैरण चघळीत, अंगावर धन्याची थाप पडायची वाट बघत होती. गडी मानसं भाकरी खाऊन बांधावर सावलीला तंबाखू मळीत बसली होती. धर्मान खांद्या वरच बकर खाली उतरऊन झाडाला बांधल. हातातल सामान हौसाक्काला देउन वसरीला टेकला. पोरांनी बकर्‍या भोवती कोंडाळ करून नावीन उचापती सुरू केल्या. धुर्पानं पायरीवर आनून ठेवलेला पण्याचा तांब्या नरड्यात रिता करीन धर्मा उठला. हिरीवर जाउन पानी शेंदल अन सर्व्या बैलास्नी बादली-बादली पानी दावलं. एकएक गडी उठून आपापल्या शेजंनं कामाला लागला. तेवढ्यात शेलाराच्या सुगंधानं धर्माला वसरीच्या उंबर्‍यावरन आवाज दिला .........

" ओ~~ भावजी ! जिउन घ्या कि आगुदर ! धुर्पाक्का ताटकाळ्यात कवाधरनं ! सकाळपासन पोटात काय बि नाय बगा !"
" आत्तां ! च्यामारी, मी काय तिला उपाशी र्‍हायला सांगितल हुत व्हयं ! जेवायचं व्हत सगळ्या संगट ! "
" तस नव्ह भावजी ! तुमी जेवल्या बिगर घास उतरल व्हय धुर्पाक्काच्या गळ्या खाली ! आता भरवा पैला घास तुमीच !"

सुगंधाच्या बोलण्याने सगळ्याजणी तोंडाला पदर लाउन फिदि-फिदि हसायला लागल्या. धुर्पा बिचरी पार लाजून चुर्र झाली. तिन पडवीत घोंगडी टाकली. ताट वाढलं. पाण्याचा तांब्या ठिवला अन आजून काय चेष्टा-मस्करी व्हायच्या आत घरात निघून गेली. धर्मा गुमान जेवायला बसला. हात धुवस्तोवर आब्बास भाई आपली हत्यार पाजळत हजर झाला. त्यानं पोरांच्या कोंडाळ्यातन बकर्‍याची सुट्का केली अन लांब खिवराच्या झाडाखाली घेउन गेला. पोत्यातन सुरी काढली. बकर्‍याला आडव पाडून जबरदस्तीन तोंडात पाणी ओतून खटका उडवला. झाडाच्या फांदीला उलटं लटकऊन भराभर कातडी सोलून काढली. पोटात सुरी खुपसून साफ-सफाई झाली. बाभळीचा ओंडका उभा करून त्यावर खटाखट सत्तूर चा आवाज व्हायला लागला. धर्मानं आणून ठेवलेल्या भल्या मोठ्या भगुल्यात मटनाचं तुकडं पडायला लागलं. आब्बासभाईन तासाभरात आपल काम चोख बाजावलं. मुंडी आणी कातडी पोत्यात कोंबून आब्बासभाई चालता झाला.
होय ! मुंडी-कातडी हीच आब्बासभाईची मजुरी. गांवची पध्द्तच होती तशी. बरेचसे व्यवहार हे चलना शिवाय व्हायचे.

दिवस मावळतीला झुकला होता. चार चुली परत पेटल्या होत्या. तव्यावर भाकरी पडत होत्या. भल्या मोठया तप्याल्यात मटान रटरटत होतं. फोडणीचा खमंग वास नाकात घुसून पोरांच्या पोटात कावळं कोकलायला लागल होत. बाया मानसांची लगबग वाढली होती. तिकड नांगरटीनं शिवाराच शेवटचं टोक गाठलं होतं. बैलं घायकुतीला आली होती. आता थोड्याच टायमात सुट्टी व्हनार हे त्या मुक्या जनावरांनी वळीकल होत. जसा जसा नांगरटीचा शेवट जवळ येत होता तसा बिर्‍या चेव आल्या सारखा हालगी बडवीत बैलांना प्रोत्साहित करीत होता. शेवटी हाथभर दिवस असतानाच हालगी थांबली. आख्खं शिवार दिवस मावळायच्या आत उदसून टाकलं होत. सर्वांच्या चेहेर्‍यावर आनंद पसरला होता.

प्रोजेक्ट "ईर्जीक " यशस्वी झाला होता.
नो प्रोजेक्ट मँनेजर , नो प्रोजेक्ट टीम .....
नो कन्सलटन्सी , नो फिजिबिलिटी स्टडी ...
नो लीगल अडव्हायसर , नो ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट ...
नो वर्कर्स , नो वेजेस ...........
नो मिटींग्ज , नो बिझनेस लंच ....
नो गाडी , नो घोडा .........
नो इन्फ़्रास्ट्रकचर , नो नेटवर्क ....
नो फायनान्सीअल रिसोर्स , नो करन्सी एक्स्चेंज ....
नो शेड्युलिंग , नो डी.आर. पी. ......

ओन्ली काँमन टारगेट अँड विल टू अचीव्ह ईट .... व्हाट वंडर ..........
" प्रोजेक्ट वाँज अ ग्रेट सक्सेस "

बैलांच्या माना जुआतून सुट्ल्या. सगळे बापें आवरा आवर करून हिरीवर हातपाय धुया गेल. धर्मान पेंडीच्या पोत्याचं तोंड खोलून घमेलं-घमेलं पेंड सरव्या बैलाफुड सरकवली. तेवढ्यात धुर्पा भाकरीची चवड हातावर घेऊन आली. स्वताच्या हातानी एक-एक भाकरी बैलास्नी भरवीत प्रेमानी त्यांच्या अंगावरन हात फिरिवला. ईर्जिकीच्या पैल्या पंगतीचा मान बैलास्नी मिळाला होता. ती बैलं कुणाच्या मालकीची आहेत हा प्रश्न गौण होता. मुक्या जनावरांना सुध्दा माणसा बरोबरीन वागणूक मिळाली होती. त्या साठी धर्मा-धुर्पाला "ह्युमन रिसोर्स, डेव्हलप्मेंट अँड मोटिव्हेशन " सारख्या "ट्रेनिंग प्रोग्राम " ला जायची गरज भासली नव्हती. जी माणसं मुक्या जनावरांच्या "काँन्ट्रीब्युशन" च एवढ्या उत्त्म प्रकारे "अँप्रिसिएशन" करू शकतात, त्यांना "ह्युमन मोटिव्हेशन" च कांय ट्रेनिंग देणार ?

बापय मानस बांधावर बसून सकाळ पासनं वावरात घडलेल्या लहान-सहान घटनांची उजळणी करीत, एक-मेकांची टिंगल-टवाळी करण्यात रमली होती. आज आपण एक "प्रोजेक्ट " यशस्वी पणे पूर्ण करून धर्माला चिंता मुक्त केलं आहे, याची कुणालाही जाणीव नव्हती. त्यांच्या साठी हा फक्त गाव-गाड्याच्या अन गावकीच्या रिती-रिवाजांचा एक भाग होता. दिवस मावळला होता. कडुसं पडल होत. धर्मानं वाण्याकडून उसनवारीवर आणलेली गँसबत्ती पेटउन वसरीवर आड्याला टांगली. धुर्पानं घोंगड्याच्या घड्या पसरून पंगतीची तयारी केली. पितळ्या, वटकावनं , तांबे मांडले गेले. बाया मानसांची लगबग शिगेला पोहोचली होती. चुली धगधगत होत्या. भाकरीच्या चवडी उंचावत होत्या. मटणाचा रस्सा रटरटत होता. हौसाक्काची नजर चौफेर भिरभिरत होती. सगळी तयारी झाली तसा धर्मान बांधाचा दिशेनं आवाज दिला .........
" चलाउठारं ~ माझ्या मर्दानू ~~, बसा पंगतीला "
पंगत बसली. गरमगरम मटनाचं कोरड्यास अन घरच्या जोंधळ्याची पांढरी-फेक भाकरी. पुन्यांदा एकदा " भैरुबाच्या नांवानं ~~ चांग भलं ! " करून सर्वेजण तुटून पडले. तस बगितल तर, मटाण-भाकरीच जेवान सगळीजन कधी-मधी जेवत्यातच की !. पर आजच्या जेवनाची चव काय यगळीच व्हती. हौसाक्काची मँनेजमेंट तशी कधीच फेल जात नाय. पार कोपरा पर्यंत वगळ येईस्तवर रस्सा भुरकत होते. सोबत तोंडी लावायला चवदार गप्पा अन एक-मेकांची चेष्टा-मस्करी. खाणारांच्या तोडीला-तोड वाढणार्‍या होत्या. पैल्याभाकरीचा शेवटचा घास तोंडात घालेपर्यंत दुसरी भाकरी ताटात पडत होती. लगुलग गरम-गरम रस्याची वाटकं पितळीत पालत होत होतं. हौसाक्का सगळ्या पंगतीवर नजर ठिऊन होती. पंगत चांगलीच रंगली होती. तीन-तिगाड जाती एक-मेकाच्या मांडीला मांडी लाऊन जेवत होती. आपल्या मांडीला चिकटलेली मांडी कुठल्या धर्माची आहे, कुठल्या जातीची आहे याचं कुणालाच सोईर-सुतक नव्हतं. आणि ही प्रवॄत्ती "डेव्हलप " करण्या साठी कुणी "सर्व धर्म समभाव " या विषयावराचं रटाळ व्याख्यान पन "अटेंड" केल नव्हतं. या पंगतीच अजून एक वैशिष्ठ म्हणजे, सोनाराचा ईसन्या अन गुरवाचा दत्या हे दोघे " जानवं धारी " शुध्द शाकाहारी सुध्दा ह्याच पंगतीला बसून, त्यांच्या साठी आवरजून केलेल्या वेगळ्या गोडाच्या जेवणाचा आस्वाद घेत होते. शेजारचा दाताखाली हड्डी फोडतोय म्हणून त्यांचा धर्म भ्रष्ट झाला नव्हता. धुर्पा पंगतीत फिरून आग्रह करीत होती ....

" ओ ~म्हादाभावजी ! यवड्यात झालव्हय ! घ्या कि एक भाकरी ! एकदम गरम हाये बगा !" ------ धुर्पा.
" नका आग्रिव करू वैनी ! प्वाट भरल आता " -------म्हादा.
" आरं घे कि मर्दा ! तुझ्या कारभारणीनच केलिया ती भाकरी ! " -----------सुताराच्या किसन्यान फिरकी घेतली.
" आत्तागं बया ! किसन्या, मुडद्या, तुलारं कसं रं ठाव ? भाकरीवर काय करनारनिचं नांव कोरलय व्हय ?" ----- हौसाक्का.
" आता एकदम गरम हाये म्हंजी त्याच्या बायकुनंच केली असनार कि ! " --------- किसन्या.

किसन्याच्या फिरकीनं चांगलाच हाशा पिकला. पंगतीत पन अन सयपाक घरात पन. यवडा हाशा पिकायला पन तसंच कारण व्हतं. म्हादाच्या बायकुनं "गरम डोक्याची " म्हनून आख्या गावात नाव कमावल होत. किसन्याचा "डायलाँग" ऐकून पुरती शरमून गेली बिचारी. तसा नाकावर राग पन आला, पर यवडया सार्‍या बापयं मानसा समोर तोंड उघडायच धाडस केल न्हाय पोरीनं. शिवाय वर हौसाक्काचा धांक. गप र्‍हायली बिचारी. या अचानक झालेल्या हल्यान कावरा बावरा झालेला म्हादा, मदतीच्या अपेक्षेनी हौसाक्काकडे बघू लागला. त्या संधीचा फायदा उठवीत धुर्पानं म्हादाच्या ताटात भाकरी वाढून मटनाची वाटी पालथी केली. म्हादा गुमान खाली मान घालून नवी भाकरी कुस्करायला लागला. मस्करीला वेगळं वळण लागणार नाही याची काळजी घेत हौसाक्कान फर्मान सोडलं ....

"बास झाली मस्करी ! गुमान जिऊन घ्या पोटभर ! पोरी ताटकळल्यात कवाच्या "

जेवणं उरकली. पंगत उठली. सिताफळीच्या झाडाखली हात धुउन, ढेकरांच्या लांबलचक डरकाळ्या फोडत मंडळी अंगणात टाकलेल्या सुतडयावर विसावली. मधे पानाचा डबा अन तंबाकूची चंची. पानाला चुना फासला गेला. सुपारीचं कात्रण अन तंबाकुची मळणी सुरु झाली. सुचेल त्या विषयांवर लांबलचक गप्पा सुरु झाल्या. शेतीवडी झाली. पावसाचे अंदाज वर्तवले गेले. राज कारण झाल. गांवकारण झाल. धर्माच्या अंगणातलं, चंद्राच्या चांदण्यातल खुल व्यासपीठ चांगलच रंगल होतं.

तोपर्यंत ईकडे बायकांनी जेवणं उरकून आवरा-आवर केली. सगळी झाका-पाक झाल्यावर एक-एक बाई धुर्पाचा निरोप घ्यायला लागली. पोराला कडेला मारून, पडवीच्या पायर्‍या उतरत आपल्या धन्याला हाक देत होती.....

" आवं ..! उटा कि आता ! किती रात झालिया बगा कि ! "

हळू हळू सगळ घर खाली झालं. शेवटी हौसाक्काला तिच्या घरापर्यंत पोहोचऊन धर्मा वस्तीवर परत आला. घराच्या पायरीवर एकटाच बसून चांदण्याच्या प्रकाशात नांगरट झालेल्या आपल्या शिवराकड एकटक पाहात राहिला. काल पर्यंत अशक्य वाटणरी गोष्ट आज सहजा सहजी शक्य झाली होती. वीस बिगा जामीन एका दिवसात नांगरून झाली होती. आता पाऊस गरजनार होता. उदसून वर आलेली ढेकळ न्हाऊन निघणार होती. काळ्याशार मऊ मतीत बीजं रुजणार होतं. नाजूक कोंब फुटणार होते. हिरवगार पीक वार्‍यावर डोलणार होतं. काल पर्यंत धर्माच्या डोक्यावर असलेल ओझं उतरलं होतं.

धर्माला बराच वेळ अस बसलेल पाहून धुर्पा त्याच्या जवळ आली. मायेन त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हनाली ....

"आव~~धनी ! कितीयळ बसनार आस काळ्या आईकडं बगत ? मिटली आपली काळजी एकदाची. चला, झोपा आता निवांत ! "

धर्मा उठला. धुर्पान अंथरलेल्या घोंगड्यावर आडवा होऊन, आपल्या चद्रमौळी घरातलं चांदण पांघरून निवांत झोपला.

ईर्जीक संपली होती. नेहमी प्रमाणे यशस्वी झाली होती. पण अध्याप "ईर्जीक " चा खरा अर्थ उमगला नव्हता.
एवढच माहीत होत, कि काल राती पासून आत्ता पर्य़ंत जे जे घडल त्याला ईर्जीक म्हणतात.
आता तुम्हीच सांगा मंडळी, ईर्जीक चा खरा अर्थ!
ईर्जीक चा अर्थ केवळ "जेवणा वळी " पुरता मर्यादित आहे ?
ईर्जीक चा अर्थ शब्दात व्यक्त करता येईल ?
ईर्जीकीत सामील झालेल्या पात्रांची मनं, भावना, संस्कार, संस्क्रुती.... ईत्यादी, ईत्यादी शब्दांकित करता येईल?

अशी ही ईर्जिक काळाच्या ओघात लोप पावते आहे. कारण माणूस प्रगती पथावर आहे. तरी सुध्दा आत्ताच खरी ईर्जिकीची गरज आहे.
धर्माने घातलेली ईर्जिक त्याच्या वीस बिगा जमीन आणी १५-२० सहकार्‍या पुरती मर्यादित होती.
माझा देश काश्मिर पासून ते कन्या कुमरी पर्यंत कित्येक बिगा पसरलेली आहे.
राजकीय ईर्जिक घालून फोफावलेला भ्रष्टाचार आणि सफेद गुंडाराज उखडून काढण्या साठी करोडो सहकार्‍यांची गरज आहे.
सामाजिक ईर्जिक घालून बाबू लोकांचे लाच घेऊन बरबटलेले हात उखडण्या साठी ईर्जिक जिवंत राहाण गरजेच आहे.
सांस्क्रुतिक ईर्जिक घालून भारतीय संस्क्रुतीच्या वटवॄक्षाला लागलेल बांडगूळ छाटण गरजेच आहे.
सन्मान-जागृतीची ईर्जिक घालून मध्यम वर्गीय नामाक मुक्या प्राण्याला "मोटिव्हेट "करण्याची गरज आहे.
धर्मातील "धर्म" अन हौसाक्कतील "हौस " जागृत रहाण गरजेच आहे.

खरच माणूस प्रगती पथावर आहे ?
---- यशवन्त नवले.
२६-११-२००९
.

गुलमोहर: 

यशवंतराव, सुरेख इर्जिक. बाकी जे सांगायचय ते माबोकरांनी आधीच सांगितलय. मी उगाच अजून फोडणी देत नाही. या निमित्ताने गावात फेरफटका झाला.

मस्त आहे. आमच्या गावात अशी इर्जिक दत्तजयंतीला असते. सगळ्या बाया एका घरी जमून पोळ्या लाटतात. आणि इथे वर उल्लेख आलेल्या आमटीसारखाच एक प्रकार असतो. एरवीच्या पुरणा-वरणाच्या जेवणापेक्षाही हा स्वयंपाक फार चविष्ठ असतो असे बाबा म्हणतात.

कोरड्यास म्हणजे मला वाटते कोरडे पिठले/इतर कोरडी भाजी- करडई वगैरे. तिथे कालवण हा शब्द हवा होता.

बाकी मधे मधे शहरी किंवा सो कॉल्ड शुद्ध मराठी भाषेत निवेदनाची पद्धत मला तरी आवडली.

तृप्ती...... नमस्कार!
प्रतिसदा बद्द्ल धन्यवाद.
आमटी-कालवण्-कोरड्यास हे सर्व एकचं. महारास्ट्राच्या विविध भागात ही वेगवेगळी नावे वापरतात.

bapreeeeeee

kai lihile aahes rao, nusti majja ali baghaa, ase watale ki sandhya kal houch naye, ani sandhyakal jhalya war tar kharach ase watale ki ratra hou naye.

kharach manapasun SALAMMMM.

Happy

नमस्कार परेश !
प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद!
आरे, प्रत्येका साठी रात्र ही होणारच ! नाही तर नवा दिवस कसा उजाडनार ? आणी कधी रात्र झालीच नही तर माणसाच जगण बेचव नाही कां होणार ?
just jocking ! take it lightly !

कोरड्यास हे निव्वळ सर्वनाम नसून पंचमीचा प्रत्यय असलेला शब्द आहे. भाकरी, चपाती (ब्रेड, नान्,पराठा कुलचा, रोटी ई :फिदी:) या कोरड्याबरोबर खाण्यास केलेला पदार्थ असा त्याचा उगम आहे.
'कोरड्यास जोडीला ओले काय?' असा तो छुपा प्रश्न आहे. मग ती पातळ भाजी असेल , चटनी ,मिर्ची खर्डा, दूध, दही वगैरे असेल. मात्र कालवण म्हणजे मिश्रण. मुख्य पदार्थ, मसाला आणि पाणी यांचं. हा शब्द कोकणातही वापरतात असे दिसते. पण हाही शिष्ट भाषेतला शब्द आहे. ग्राम्य मध्ये कोरड्यास हाच. माझ्या लहानपणी आम्ही हाच वापरीत असू. खरे तर 'कोरड्यास' हाही शुद्ध शब्द म्हणावा लागेल. आम्ही तर चक्क घरात 'काय कोड्यास केलय?' असा शब्द विचारत असू. आणि 'कोड्याशाला' काय करावं या चिन्तेत बाया बापड्या अथवा बापड्या बाया असत.:)

जबरदस्त कथा!! सगळं चित्र अगदी डोळ्यांसमोर घडतंय असं वाटत होतं वाचताना. तुमच्या लेखनशैलीच्या फॅन लिस्ट मधे माझंही नाव नोंदवा प्लीज Happy

शब्दाविना एकमेकाच्या मनातील भावना जाणून त्याला स्वत:च्या आचरणानी प्रतिसाद देण ही फार थोर कला आहे, तिला परिपक्वतेची खोली आहे, दोन व्यक्ती मध्ये द्रुढ नांत निर्माण करण्याची क्षमता आहे मात्र शब्दांचा उथळ्पणा बिलकुल नाही.

वा वा राव मस्तच... हे वाक्य आलं आणि मोहच आवरला नाही बघा प्रतिक्रिया द्यायचा...

थांबा पुढची गोष्ट वाचते आणि लगोलग प्रतिक्रिया पण देते... कथेची...

 Overseas education information and career consultancy. Choose right colleges, courses and jobs abroad with the help of expert consultants.

ईंग्रजी मधे टायपतो याबद्दल माफी असावी यशवंत साहेब....mee hee kathaa Brussels madhe basoon vachat aahe.....pan itka kashatahi guntalo nasen evadha ya matichya rangaat ani sugandhaat misalalo......lihinyachi shaili ati uttam....asa lihina far kamee kade vachalaya milate....maabaaokars ekdam lucky aahet.....tumhala maza shatashaha pranaam ani please ya pudhe asach khoop liha....ashi apalyakade ani devaakade prarthana karato.....sagala sodoon palat india la yaava asa vatatay.....thnx for such a wonderful creation....mala changala lihitaa yet nahi ani kautuk tar ajibaatach karata yet nahi(marathi ahe mhanoon nave!! :)) ....pan kadachit mazya feelings pochalya asavyat asa vatatay....

Pages