रस्ता

Submitted by ललिता-प्रीति on 27 November, 2009 - 00:19

'स्त्री' मासिकाच्या जून-२०११च्या अंकात ही कथा प्रकाशित झाली.

---------------------------

॥ १ ॥

मांडीवर गपगार झोपलेल्या वैजूला दमयंतीनं हळूच खाली ठेवलं आणि ती पळत बाहेर आली. कल्पना तिची वाट बघत अंगणात उभीच होती. पायरीवर ठेवलेली शंकरकाकांची किटली दमयंतीनं उचलली, आत बघून आईला "कल्पी आलीऽऽ, मी जातेऽऽ..." असं सांगितलं आणि दोघी चालायला लागल्या.
वैजू आज रोजच्यापेक्षा जरा उशीरानंच झोपली. त्यामुळे कधी एकदा तिला गाढ झोप लागतीए आणि कधी आपण बाहेर पडतोय असं दमयंतीला झालं होतं.
"ये दमेऽ, कल्पेऽ, आज तीन शेर दूध आणा... तानीआजीकडं मुंबैचे पावणे आलेत, तिला ज्यादा दूध हवंय...", शंकरकाकांच्या दुकानासमोरून जाताना काकांनी दुकानातूनच दोघींना ओरडून सांगितलं. ते ऐकल्यावर दोघींचे डोळे चमकले. जास्तीचं दूध म्हणजे आज काकांकडून एकएक गोळीपण मिळणार हे त्यांना माहीत होतं.

अवघ्या पाचपन्नास घरांची काटेवस्ती. थोड्याच वेळात ती पार करून दमी आणि कल्पी शेताडीच्या रस्त्याला लागल्या. शेताचे तीनचार तुकडे पार केले की सोपानवाडी आणि तिथून अजून थोडं पुढे गेलं की मोठा वाहता रस्ता. राष्ट्रीय महामार्ग! दिवस-रात्र, चोवीस तास, बारा महीने, तेरा काळ वाहनांच्या आवाजाने रोरावणारा; पायी चालणार्‍यांकडे तुच्छ कटाक्ष टाकणारा!
त्या रस्त्यावरची इकडून तिकडे सतत पळणारी वाहनं निरखत कडेला उभं रहायचं हे दमी आणि कल्पीचं अगदी आवडतं काम होतं.
पण तो रस्ता नंतर, आधी सोपानवाडीतली शाळा...
आज निघायला उशीर झाल्यामुळे शाळेतल्या मुलांची गाणी ऐकायला मिळतील की नाही याची दमीला चिंता लागून राहिली होती. म्हणून ती कल्पीला भराभर चालण्याचा आग्रह करत होती.

स्वारखी लायकी, नको बढाईकी, कुणीच कुणासंगं भांडायचं नाऽऽय,
गावकीत आमच्या ठरलंच हाऽऽय...

लांबून गाण्याचा आवाज कानावर पडला तसं कल्पीचा नाद सोडून देऊन उरलेलं अंतर दमीनं पळत पार केलं आणि कोपर्‍यातल्या वर्गाची खिडकी गाठली. तो वर्ग आणि त्याची ती खिडकी शाळेच्या इमारतीच्या एका कडेला होती. बाहेरून खिडकीत उभं असलेलं सहजी कुणाला दिसायचं नाही. खिडकीतून हळूच आत डोकावत आतल्या बाईंचं लक्ष जाणार नाही अशा बेतानं वर्गातल्या मुलांबरोबर दमीनं हळू आवाजात गाणं पुढे म्हणायला सुरूवात केली. ऐकून ऐकून तिचं ते कधीच पाठ झालेलं होतं.

जमीन जुमला गोठ्यातली गाय, कर्जापाण्यापायी विकायची नाऽऽय
मौजेतसुध्दा ताडी अन्‌ माडी, आल्यागेल्यासंग पियाची नाऽऽय
गावकीत आमच्या ठरलंच हाऽऽय...

इतक्यात शाळा सुटल्याची घंटा वाजली. दमी हिरमुसली. गेले तीनचार दिवस बाईंनी अजून एक नवीन गाणंही शिकवायला सुरूवात केली होती. पण आज उशीर झाल्यामुळे ते तिला ऐकायला मिळालंच नाही.
‘हेऽऽ’ करत शाळेतली मुलं बाहेर पडली तशी दमीनं कल्पीला हाळी दिली. दमी गाणी ऐकत असताना तिकडं कल्पी मैदानातल्या मुलांचे खेळ बघत उभी रहायची. दमी वर्गातल्या मुलांबरोबर गुणगुणायची तर कल्पी मुलांच्या बरोबरीनं ‘हाऽत वर, हाऽत बाजूला’ करत मैदानाच्या एका कडेला उभी असायची.
शाळा सुटली. मुलं पांगली. दमी आणि कल्पी मोठ्या रस्त्याच्या दिशेनं चालायला लागल्या. चालता चालता दमीचं गुणगुणणं चालूच होतं...

चोरी चहाडी वंगाळ पाप, शिकवू कुणाला नको मायबाप
भलं असावं भलं दिसावं, तमाशा जगाला दावायचा नाय
गावकीत आमच्या ठरलंच हाऽऽय...

ते ऐकता ऐकता कल्पीनं त्याच तालावर ‘हात समोर, हात खाली’ करायला सुरूवात केली. ते पाहून दमीला मजा वाटली.

विठू-रखुमाईच्या भक्तीशिवाय, गाऊन डोलून त्या भजनात काय?
सरशी कराया तालासुराची, टाळक्यात टाळ घालायचा नाऽऽय
गावकीत आमच्या ठरलंच हाऽऽय...

गाण्याबरोबर खिदळताना कच्चा रस्ता संपलेला दोघींनाही कळला नाही. लांबवरून आगगाडीची शिट्टी ऐकू आली तशा दोघी भानावर आल्या.
मोठ्या रस्त्याच्या कडेला झाडाच्या पाराजवळ काटेवस्तीतलीच सुधाकाकी चहा-भजीची हातगाडी चालवायची. दमीनं शंकरकाकाची किटली काकीजवळ दिली आणि कल्पीपाठोपाठ ती ही पारावर चढली. लांब उगवतीच्या दिशेला स्टेशनातली गाडी सुटत होती. काही वेळ त्या दोघी गाडीच्या दिशेला बघत उभ्या राहील्या आणि गाडी वळून दिसेनाशी झाल्यावर खाली उतरून पुन्हा काकीच्या हातगाडीजवळ आल्या.
दमीनं शंकरकाकांचा निरोप काकीला सांगितला. काकीशी बोलत असतानाच भजीचा खमंग वास तिच्या नाकात शिरला. काकीनं भज्यांचा ताजा घाणा तळायला घातला होता. दुसर्‍या शेगडीवर चहाचं आधण नव्यानं उकळायला ठेवलं होतं. दुधाचा ट्रक यायची वेळ झाली होती. तो येईपर्यंत आता दमी आणि कल्पीचा रोजचा आवडीचा खेळ सुरू झाला.
आज प्रश्न विचारायची कल्पीची पाळी होती.
"डावी का उजवी?" तिनं दमीला विचारलं.
"उजवी!" दमीनं उत्तर आधीपासूनच ठरवून ठेवलं होतं.
त्यावर लगेच कल्पीचा पुढचा प्रश्न - "टरक, गाडी का फटफटी?"
दमी म्हणाली, "फटफटी".
कल्पी पळत जाऊन पुन्हा पारावर उभी राहिली. जी प्रश्न विचारणार तीच पारावर उभी राहणार असा त्यांचा आपसांतला नियम ठरलेला होता. कल्पीनं ‘एक-दोन-साडे माडे तीन!’ म्हटल्याबरोबर दमीनं उजवीकडं जाणार्‍या तर कल्पीनं डावीकडं जाणार्‍या फटफट्या मोजायला सुरूवात केली. शंकरकाकांनी त्यांना वीसपर्यंत आकडे मोजायला शिकवले होते. जी कुणी आधी वीसाला पोचेल ती जिंकली.
आज मात्र चारपाच चारपाच फटफट्या मोजून झाल्यावर दोघींनी एकाचवेळी एकमेकींकडे बघितलं. आज गाड्या जरा कमी वाटत होत्या. रोजच्या वेगानं येत नव्हत्या. अजून दुधाच्या ट्रकाचाही पत्ता नव्हता. सुधाकाकीही चहा, भजी तयार ठेवून ट्रक यायच्या दिशेलाच बघत होती.

जरा वेळानं दमी "वीऽस" म्हणून ओरडली आणि पुन्हा हातगाडीजवळ पळत आली. इतक्यात दुधाचा ट्रकही आला. तशी दमी-कल्पीची कळी खुलली. कारण दुधाचा ट्रक आलाच नाही तर शंकरकाकांचं जास्तीचं दूध नाही आणि मग काचेच्या बाटलीतली लाल-पिवळी गोळीही नाही हे त्यांना ठाऊक होतं.
ड्रायवर आणि त्याच्या मदतनीसाबरोबर इतर तीनचार प्रवासी ट्रकातून उतरले. आसपासच्या वस्त्यांमधून दमी कल्पीप्रमाणेच अजूनही काहीजण दूध नेण्यासाठी आले होते. मदतनीसानं दुधाचं वाटप केलं. शंकरकाकांच्याही किटलीत तीन शेर दूध काढून दिलं. सर्वांचा हिशेब जवळच्या वहीत लिहून ठेवला आणि एक प्लेट भजी घेऊन तो पारावर इतरांजवळ जाऊन बसला. ज्यादा गिऱ्हाईकं मिळाल्यामुळं काकीही जरा खूष होती. चहा देता देता तिनं ड्रायवरला उशीर होण्याचं कारण विचारलं. त्यानं काकीला जे काय सांगितलं त्यातनं दमी-कल्पीला इतकंच कळलं की मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी रस्त्यावर खोदकाम सुरू झालं होतं. त्यामुळे निम्मा रस्ता बंद होता आणि उरलेल्या जागेत गाड्यांना अडकून पडायला होत होतं. टिराफिक ज्याम का काय म्हणाला होता तो.

चहा भजी घेऊन ट्रकवाले निघून गेले. सुधाकाकीनं दुधाची किटली दमीकडं दिली. त्यावर ती ताबडतोब फिस्कारली, "माज्याकडं कशापायी? तिच्याकडं दे की, आज तिची पाळी हाय किटली पकडायची." कल्पीनं निमूटपणे किटली घेतली.
काकीनं दिलेलं एकएक भजं तोंडात टाकून दोघी परतीच्या वाटेला लागल्या. दमीनं पुन्हा गाणं सुरू केलं - स्वारखी लायकी, नको बढाईकी...
त्यावर कल्पीनं तिच्या आवाजाच्या वर आपला आवाज लावला - टिराफिक ज्याऽऽम करायचं नाऽऽय, गावकीत आमच्या ठरलंच हाऽऽय...
दोघी पुन्हा जोरजोरात खिदळायला लागल्या.
सोपानवाडीच्या शाळेपाशी दोघी रेंगाळल्या. आता शाळेत, बाहेरच्या छोट्या मैदानात सामसूम होती. शाळेचा शिपाईही आसपास कुठे दिसत नव्हता. शाळेची घंटा मात्र अजूनही व्हरांड्यात लटकत होती. ते पाहताच दमी धावली आणि तिनं टण्‌टण्‌ करत दोनचारदा घंटा जोरजोरात वाजवली. एकीनं किटली धरायची तर दुसरीनं घंटा वाजवायची हा त्यांच्यातला अजून एक अलिखित नियम होता. शिवाय घंटेचा एकदा आवाज ऐकला की कुठूनतरी शिपाई धावत यायचा आणि त्यांना तिथून हुसकून लावायचा. त्यामुळे दुसरीला तशीही घंटा वाजवायला मिळायचीच नाही. त्यावरच दोघींनी हा तोडगा शोधून काढला होता.

दोघी पुन्हा वस्तीत शिरल्या. शंकरकाकांच्या दुकानात जाऊन किटली दिली. दमीच्या आईनं तेल आणायला सांगितलं होतं तर कल्पीला साखर न्यायची होती. ते सामान घेतलं. सोबत दोघींनी काकांकडून न विसरता एकएक गोळीही मागून घेतली. गोळी चघळत चघळत दोघींनी आपापल्या घराचा रस्ता पकडला.

-----------------

सकाळी कल्पीला जाग आली तर अंगणातून कुणाचातरी अनोळखी आवाज तिला ऐकू आला. तिनं खिडकीतनं बाहेर बघितलं. शाळेचा शर्ट चड्डीत खोचत अण्णा कुणाशीतरी बोलत होता. कल्पी लगोलग उठून बाहेर आली. एक शर्टप्यांटवाला पावणा अण्णाला कायतरी विचारत होता. मागं त्याची गाडी उभी होती. मोठ्या रस्त्यावर दमीसोबत कल्पीनं तश्या अनेक गाड्या पाहील्या होत्या. गुळगुळीत रस्त्यावरून कशा सुळ्‌सुळ्‌ पळायच्या. काहींच्या खिडकीच्या काचा उघड्या असायच्या. कधी आत खच्चून माणसं भरलेली असायची, कधी एकटादुकटाच माणूस दिसायचा. कधीकधी तर बाईपण गाडी चालवताना दिसायची. काही गाड्यांच्या खिडक्या मात्र एकदम बंद असायच्या. काळ्या काचेच्या आत कोण कोण बसलंय ते काहीही दिसायचं नाही.
या गाडीच्या काचा उघड्या होत्या आणि मागच्या खिडकीतून एक पावणी बाहेर डोकवत होती. काय छान होती - गोरी धप्प्‌, डोक्याला लाल रुमाल गुंडाळलेला, डोळ्यावर काळा चष्मा!
एक पावणी आपल्या वस्तीत काय करतीय ते कल्पीला कळेना.
"हितनं फुडं जावा, उजव्या अंगाला वाट वळती. तिथनं रस्त्याला लागता येतं", उजवा हात लांब दाखवत अण्णा पावण्याला सांगत होता.
रस्त्यालाच लागायचंय तर आधी पावणं आपल्या वस्तीत आलंच कशाला ते त्याच्याही लक्षात येत नव्हतं. धुरळा उडवत गाडी निघून गेली.
"अण्णा, काय रं इचारत होते ते?" कल्पीनं आपल्या मोठ्या भावाला ताबडतोब प्रश्न केला.
"तुला कशाला पायजेत नसत्या चौकश्या? जा, पळ आत.." तिच्या डोक्यात एक टपली मारत अण्णा म्हणाला आणि खाटेवरचं दप्तर उचलून उरलेला शर्ट चड्डीत खोचत खोचत बाहेर पडला.
कल्पी त्याच्याकडं मारक्या म्हशीसारखं बघत उभी राहिली. इतक्यात आईची आतून हाक आली.
आईनं दिलेला चहा पिऊन कल्पी दमीच्या घराकडं निघाली. गाडीवाल्या पावण्याची गम्मत तिला दमीला सांगायची होती. दमी घरात नव्हतीच. वैजूला घेऊन सोपानवाडीच्या मारवाड्याकडं झाडलोट करायला गेली होती. कल्पीनं मग तिकडं धूम ठोकली.

॥ २ ॥

बाहेर अंगणात कल्पी दमीची वाट बघत उभी होती. झोपेतून नुकत्याच उठलेल्या वैजूला दमीनं अर्धा कप चहा पाजला, कडेवर घेतलं, आईला "कल्पी आलीऽऽ, मी जातेऽऽ" असं सांगितलं आणि दोघी चालायला लागल्या.
आधी त्यांनी सोपानवाडीच्या मारवाड्याचं घर गाठलं. त्याच्या घरातली झाडलोट, साफसफाईची कामं कल्पीच्या मदतीनं दमीनं पटापट उरकली. वैजू बाहेर व्हरांड्यात मारवाडणीनं दिलेलं बिस्कीट चघळत बसली.
काम उरकलं तसं मारवाडणीला सांगून वैजूला घेऊन दोघी निघाल्या. शाळेच्या दिशेला न जाता विरुध्द दिशेची वाट पकडून आख्ख्या सोपानवाडीला वळसा घालून त्यांना पुन्हा कच्च्या रस्त्याला लागायचं होतं...
आज खास करून कल्पी घाईत होती. कारण गेले काही दिवस सुरू असलेल्या त्यांच्या एका नवीन खेळात ती आता जिंकणारच होती. मारुतीच्या देवळापाशी डावीकडं वळलं की काटेवस्तीपर्यंतचा सगळा रस्ता पुढ्यात दिसायचा. रस्त्याला लागल्यालागल्या कल्पीची नजर भिरभिरू लागली. रस्त्याच्या कडेला पडलेल्या बाटल्या शोधू लागली...

मोठ्या रस्त्यावर सुधाकाकीच्या हातगाडीसमोरही खोदकाम सुरू झालं तशा सगळ्या लहानमोठ्या गाड्या सोपानवाडी-काटेवस्तीमार्गे वळसा घालून जायला लागल्या. वस्तीतली रहदारी वाढली. विडीकाडी घ्यायला नाहीतर पुढचा रस्ता विचारायला बर्‍याच गाड्या शंकरकाकांच्या दुकानापाशी थांबायला लागल्या. त्यामुळे काकांच्या दुकानात आजकाल पानमसाल्याच्या, गुटख्याच्या पाकीटांच्या लांबच लांब माळा लोंबताना दिसायच्या. दुधाचा ट्रकही आता वस्तीतूनच जायचा. वस्तीतल्या वस्तीत दूध मिळायला लागल्यामुळे तानीआजीसारखी माणसं खूष होती.
रोजचं दूध आणायचं काम बंद झाल्यामुळेच दमी-कल्पीनं हा बाटल्या जमवायचा नवा खेळ सुरू केला होता. गाड्यांमधून ये-जा करणारे लोक त्यांच्याकडच्या पाण्याच्या, सरबताच्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बाहेर टाकून द्यायचे. त्या गोळा करून आपापल्या घरात जमवायचा दोघींना नाद लागला होता. कित्येकदा दिसलेली बाटली कुणी उचलायची यावरून त्यांची भांडणंही व्हायची.
दमीच्याआधी, कदाचित आजच, कल्पीकडच्या बाटल्यांचा साठा वीसावर पोचणार होता. तिला आता अजून दोनच बाटल्यांची गरज होती. त्या मिळाल्या की या नव्या खेळात ती जिंकणार होती. दमीही काही तिच्या फार मागे नव्हती. तिच्याकडंही अठरा बाटल्या जमल्या होत्या. पण त्यातल्या दोन आईनं वैजूला द्यायला लावल्या होत्या. वैजू त्या दोन बाटल्या एकमेकींवर आपटत बसायची. तिला मजा यायची. तेवढ्याच आईच्या दोन भाकर्‍या पटापट शेकून व्हायच्या.
या बाटल्यांच्या नादात गेले सहा-आठ महीने सोपानवाडीच्या शाळेचाही दमी, कल्पीला विसर पडला होता. आता दमीला ना गावकीच्या गाण्याची आठवण होती ना कल्पीला कवायतींची. शाळेच्या शिपायाला मात्र शाळा सुटल्यावर चुकल्याचुकल्यासारखं व्हायचं. व्हरांड्यात टांगलेली घंटा काढून घेताना तो रोज एकदातरी रस्त्याकडे नजर टाकायचा. आजतरी त्या दोन पोरी लांबून येताना दिसतील असं त्याला वाटायचं...

लांबूनच कल्पीला एक मोठी निळा-पिवळा कागद लावलेली सरबताची बाटली दिसली. दमीच्या आधी धावत जाऊन तिनं ती उचलली. दमीकडच्यासारखीच एक बाटली आपल्यालाही मिळाली याचा आनंद तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. दमीनं स्वतःजवळची तसली मोठी बाटली मात्र आईला किंवा वैजूला दिसू दिली नव्हती. घराच्या मागच्या दारी एका कोपर्‍यात मोठ्या दगडाच्या मागे गुपचूप लपवून ठेवली होती.
दमीच्या कडेवर वैजू तर कल्पीच्या हातात ती मोठी सरबताची बाटली... दोघी अशा रमतगमत येत होत्या. इतक्यात समोरून येणारी एक चमकती पांढरी गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. तानीआजीसारख्याच एका आजीबाईंनी गाडीच्या खिडकीतून हात करून दोघींना जवळ बोलावलं आणि स्वतःजवळचे पाव-बिस्किट त्यांना देऊन टाकले. गाडी निघून गेली. लगेच दोघींनी आपापसांत ते समसमान वाटून घेतले. काय छान लागले खायला! तसला पाव सुधाकाकी कधीकधी भजीबरोबर विकायची.
त्यानंतर असं अनेकदा झालं. चारसहा दिवसांतून एकदा कुणीतरी त्यांना असं काहीबाही खायला देणारं भेटायचंच.

-----------------

मोठ्या रस्त्यावरचं खोदकाम पूर्ण झालं होतं. आता खोदलेल्या खड्ड्यांमधे पुलासाठी मोठमोठे खांब उभारायला सुरूवात झाली होती. आधी लोखंडी सांगाडे उभारले जायचे, मग त्यात कॉन्क्रीट ओतलं जायचं, तोपर्यंत पुढच्या खांबांचे सांगाडे उभे रहायचे...
कॉन्क्रीटचं मिश्रण तयार करणारी अवजड यंत्रं, खोदकामाचा माल हटवणार्‍या मोठ्या गाड्या, काम करणारे मजूर, त्यातूनच वाट काढणारी वाहनं या सगळ्यांमुळे सुधाकाकीच्या हातगाडीसमोर सगळा गोंगाट, गलका झालेला होता.
पण सुधाकाकी मात्र या पुलाच्या कामामुळे खूष होती. बांधकामावरचे बहुतेक सगळे मजूर तिच्याच हातगाडीवर चहा प्यायचे. वडे, भजी खायचे. त्यामुळे आजकाल तिला फुरसत कशी ती नसायचीच. बटाटेवडे आणि भजीसोबत तिनं आता मिसळ-पावही विकायला सुरूवात केली होती. त्या कामात दमयंतीची विधवा आई तिला मदत करायची. वस्तीतून ये-जा करणारा भाज्यांचा एक टेंपो सुधाकाकीनं हेरून ठेवला होता. त्या टेंपोवाल्याकडून काकी स्वस्तात भाजी विकत घ्यायची. मिसळीसाठी लागणारे पाव मात्र सोपानवाडीतून आणावे लागायचे.

-----------------

कुणीतरी दिलेले शेव-कुरमुरे खाता खाता दमी आणि कल्पी दोघी एकदा संध्याकाळच्या घरी परत येत होत्या. इतक्यात कल्पीला समोरून तिचा अण्णा येताना दिसला. या दोघींना पाहून त्यानं हातातली कसलीशी छोटी पुडी पटकन खिशात लपवली. पण कल्पीच्या नजरेतून ते सुटलं नाही. तिनं घरी गेल्या गेल्या आईकडं अण्णाची चुगली केली. तासा-दीडतासानं अण्णा घरी आला. तोपर्यंत कल्पीचा बापही परतलेला होता. अण्णा घरात शिरल्याशिरल्या बापानं त्याचा कान धरला. खिशात लपवलेल्या पुडीबद्दल विचारलं. मागल्या दाराआडून डोकावणार्‍या कल्पीला पाहून सगळा प्रकार अण्णाच्या लक्षात आला. त्यानं मुकाट्यानं खिशातली पुडी काढून बापाच्या हातात दिली. कागदात गुंडाळलेलं ते एक गुटख्याचं पाकीट होतं.
"इतक्या मोट्या कागदात येकच पुडी?" बाप खेकसला.
"........."
अण्णा काही बोलत नाही म्हटल्यावर बापानं त्याच्या पाठीत एक रट्टा हाणला.
"अजून पन व्हत्या, मी संपीवल्या." उलट्या हातानं पाठ चोळत चोळत अण्णानं तात्काळ उत्तर दिलं.
त्यासरशी त्याच्या पाठीत अजून दोनचार रट्टे बसले. आधीपेक्षा जोरात, सणसणीत. मग मात्र कळवळत, रडत अण्णानं सगळं सांगून टाकलं...
सकाळी तो शाळेत निघालेला असताना शाळेच्या जरासं अलिकडे एका गाडीवाल्यानं त्याला थांबवलं. गाडीवाला पंक्चरचं दुकान शोधत होता. सोपानवाडीतलं एक टायरचं दुकान अण्णाला माहीत होतं. दुकानवाल्याचा लहान भाऊ त्याच्याच वर्गात होता. गाडीवाल्यानं अण्णालाच गाडीत बसवून घेतलं आणि ते दुकान दाखवायला सांगितलं. अण्णा अगदी खूष होऊन गाडीत बसला आणि गाडीवाल्याला त्या दुकानापर्यंत घेऊन गेला. शाळेची वेळ नाहीतरी टळून गेलेलीच होती. तो तिथेच दुकानापाशी टायरचं काम बघत उभा राहीला. काम झाल्यावर निघताना गाडीवाल्यानं खूष होऊन अण्णाला पाच रुपये दिले. त्याच पैशांतून त्यानं सोपानवाडीतल्या एका दुकानातून गुटख्याच्या पुड्या विकत घेतल्या होत्या...

-----------------

मोठ्या रस्त्यावर अजस्त्र खांबांची ओळ तयार झाली होती. वरच्या रस्त्याचं बांधकाम आता सुरू झालं होतं. ते काम तर रात्री पण चालू असायचं. रात्रीच्या शांततेत तिथल्या यंत्रांचा आवाज पार काटेवस्तीपर्यंत ऐकू यायचा.
कामावर देखरेख करणार्‍या मुकादमानं सुधाकाकीला तिची हातगाडी आता दुसरीकडे हलवायला सांगितली होती. हातगाडीच्या जागी सिमेंटच्या पोत्यांचा ढीग येऊन पडला होता. कामाच्या ठिकाणी जास्तीचे मजूर येऊन दाखल झाले होते. रस्त्यावरचा राडारोडा, गलका, वाहनांचा गोंधळ अजूनच वाढला होता.
दमी-कल्पीला गाड्यांचं नाविन्य वाटेनासं झालं होतं. दोघींकडे आता पाण्याच्या आणि सरबताच्याही खूप बाटल्या साठल्या होत्या. वीसाच्या पुढे अजून वीस, त्याच्यापुढे अजून वीस. दोघींच्याही आया त्या बाटल्यांच्या पसार्‍याला अगदी वैतागून गेल्या होत्या.
तर्‍हेतर्‍हेच्या गाड्या, फटफट्या, टेंपो, ट्रकचे आवाज वस्तीवाल्यांना आता नित्यनेमाचेच झाले होते. आधीच वस्तीतल्या घरांमधे धूळ फार. त्यात या गाड्यांच्या रहदारीमुळे अजूनच भर पडली होती. रात्री-बेरात्री जाणार्‍या गाड्यांमुळे लोकांची झोपमोड व्हायची. वस्तीतून रहदारी सुरू झाल्यावर सुरूवातीला आनंदून गेलेले लोक आता कावले होते. पुलाचं काम कधी पूर्ण होणार याची वाट पहायला लागले होते.
अशातच तानीआजीच्या घरात एक दिवस अघटित घडलं...

तानीआजीच्या कुटुंबाला वस्तीत मान होता. अडल्यानडल्याला, अडीअडचणीला तानीआजी सर्वांना मदत करायची. वस्तीतलं ते एकच घर त्यातल्यात्यात जरा चार पैसे गाठीशी ठेवून होतं. दोन वर्षांमागं तानीआजीचा नवरा मेला होता. तिचा मुलगा, विश्वनाथ, मुंबैला एका कारखान्यात नोकरी करायचा. आपल्या मुलाचं आजीला कोण कौतुक होतं.
एक दिवस वस्तीतून वेगात जाणार्‍या एका जीपनं तानीआजीच्या कोंबड्या आणि बकर्‍यांना उडवलं. ड्रायवरचा गाडीवरचा ताबा सुटला आणि जीप तानीआजीच्या घराला लागून असलेल्या झाडावर आदळली. रविवारची सुट्टी म्हणून विश्वनाथ मुंबैहून घरी आलेला होता. इतका जोरात आवाज कसला झाला ते पहायला तो बाहेर आला. घरासमोर कोंबड्या-बकर्‍यांच्या रक्तामांसाचा नुसता चिखल झाला होता. ते पाहून विश्वनाथ एकदम चवताळला. त्यानं ड्रायवरला जीपच्या बाहेर खेचलं आणि रागाच्या भरात तो त्याला बुकलत सुटला. आसपासच्या घरांतून लोक गोळा झाले. कलकलाट सुरू झाला. कुणी ओरडायला लागलं. कुणी शिव्या द्यायला लागलं. एक दोघांनी दगडं भिरकावून जीपच्या काचा, दिवे फोडले. दरम्यान कुणीतरी सोपानवाडीहून पोलीस हवालदाराला घेऊन आलं. जीपचा ड्रायवर तोपर्यंत मार खाऊन अर्धमेला झाला होता. त्याला, विश्वनाथला आणि गाडीची मोडतोड करणार्‍या इतर दोघाचौघांना हवालदार चौकीवर घेऊन गेला.
जीपच्या ड्रायवरला सोपानवाडीच्या सरकारी दवाखान्यात भरती करावं लागलं. नुकसानभरपाईची किरकोळ रक्कम जीपच्या मालकानं पाठवून दिली आणि ड्रायवरला तो घेऊन गेला. बाकीच्यांना पोलिसांनी दोन दिवस चौकीत डांबून ठेवलं.
वस्तीवर अवकळा पसरली...

-----------------

मोठ्या रस्त्यावरचा पूल बांधून पूर्ण झाला होता. पुलावरचा आणि खालचा असे दोन्ही रस्ते गुळगुळीत करायचं काम आता सुरू झालं होतं. आता थोड्याच दिवसांत त्या रस्त्यांवरून गाड्या पुन्हा एकदा दुप्पट वेगानं सुळ्‌सुळ्‌ पळणार होत्या.
खोदकामाची, कॉन्क्रिटची यंत्रं जाऊन त्याजागी डांबराची पिंपं, खडीचे ढीग येऊन पडले होते. उकळत्या डांबराच्या वासानं परिसर भरून गेला होता.
दगड-विटा-लोखंड यांचा राडारोडा उचलून नेण्यापूर्वी सुधाकाकीनं त्यातलेच लोखंडी सळ्याचे चारपाच तुकडे जमा करून ठेवले होते. तिथल्या कामगारांना थोडी चिरीमिरी देऊन आपल्या हातगाडीला एक छानसं छप्पर बनवून घेतलं होतं. आता पावसाळ्यातही काकी चहा-भजीचा धंदा चालू ठेवू शकणार होती.

रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम पंधरा-वीस दिवसांत संपलं. नव्या पुलावरचा रस्ता रहदारीसाठी खुला झाला. नेहमी ये-जा करणारी गाड्यांवाली मंडळी खूष झाली. मोठ्या दिमाखात पुलावरून गाड्या पळवू लागली.

मारहाण प्रकरणानंतर विश्वनाथची नोकरी सुटली त्याला आता बरेच दिवस उलटून गेले होते. सुरूवातीला त्यानं दुसरी नोकरी मिळवायचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्याच्यावर बसलेला पोलीसकोठडीचा शिक्का त्याच्या नोकरीच्या आड येत होता. आता तर त्यानं हातपायच गाळले होते. दिवसदिवस काहीही न करता, कुणाशीही न बोलता तो घरात नुसता बसून असायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे तानीआजीच्या चेहर्‍यावरचीही रया निघून गेली होती.

॥ ३ ॥

आता वैजू दुपारची झोपायची नाही. त्यामुळे दिवसभर दमीला तिला सांभाळावं लागायचं.
आज दमी आणि कल्पी प्रथमच वैजूला मोठ्या रस्त्यावर घेऊन जाणार होत्या. स्टेशनातली आगगाडी दाखवणार होत्या. त्यांनाही नवा पूल पहायचाच होता.
पूर्वीसारख्या दुपारनंतर दोघी निघाल्या. शाळेपाशी मुलांची गाणी ऐकू आली. पण दमीला आता त्यातलं एकही गाणं माहीत नव्हतं. ती पूर्वीसारखीच कोपर्‍यातल्या वर्गाच्या खिडकीत जाऊन उभी राहिली. पण वैजू तिला तिथे उभं राहून गाणं ऐकू देईना. वैजूची किरकीर वर्गातल्या बाईना ऐकू जाईल या भीतीनं दमी तिथे जास्त वेळ थांबली नाही. दमी थांबली नाही त्यामुळे कल्पीलाही तिथून निघावं लागलं...

लांबून आगगाडीची शिट्टी ऐकू आली तशा दोघी घाईघाईनं झाडाच्या पाराजवळ गेल्या. समोर मोठाच्या मोठा पूल पाहून दोघींचे डोळे विस्फारले होते.
रस्त्याच्या राडारोड्यामुळे झाडाचा पार सगळा घाण झाला होता. कुठेकुठे उखडला गेला होता. चढून धड उभंही राहता येत नव्हतं. तरीही वैजूला आगगाडी दाखवण्यासाठी म्हणून दोघी कशाबशा वर चढल्या. पण नव्या पुलामुळे पलिकडचं स्टेशन, स्टेशनात उभी असलेली आगगाडी काहीच दिसत नव्हतं. दोघी चेहरे पाडून सुधाकाकीच्या हातगाडीजवळ आल्या. तिथे गर्दी होती. काकीला या दोघींशी बोलायला बिलकुल फुरसत नव्हती.
दोघी थोडावेळ नुसत्याच तिथे रेंगाळल्या. वैजू चुळबूळ करायला लागल्यावर त्यांना तिथून निघणं भाग होतं.

वैजूला घेऊन दमी-कल्पी वस्तीत परतल्या. आता वस्तीतल्या रस्त्यावर वाहनांची बिलकुल वर्दळ नव्हती.
शंकरकाका दुकानातल्या देवाच्या तसबिरीपुढं उदबत्ती लावत होते.
दुपारपासूनच भकास चेहर्‍यानं अंगणात बसलेला विश्वनाथ अजूनही तिथून हललेला नव्हता. तानीआजी उरल्यासुरल्या कोंबड्यांना खुराड्यात बंद करत होती.
दिवस बुडत आला होता.

पायी चालणार्‍यांकडे पूर्वीसारखाच तुच्छ कटाक्ष टाकत राष्ट्रीय महामार्ग आता दुप्पट आवाजात रोरावत होता...!!

(समाप्त)
-----------------

(कथेतील गावकीचं गाणं हे खेड्यात शाळकरी मुलांना शिकवलं जाणारं एक पारंपारीक गाणं आहे.)

गुलमोहर: 

लले,
खास लिहिलंयस. माझ्या आकेरीच्या मैत्रिणीसाठी खास प्रिंटआउट काढून पाठवणारे तुझी परवानगी असेल तर.
खूप काही रिलेट झालं. खास करून सगळी कॅरेक्टर्स.
व्यकंटेश माडगुळकरांच्या 'तू वेडा कुंभार' पासून, वडखळनाक्याच्या इथल्या वडखळवाडीतल्या माझ्या कातकरी मैत्रिणींपासून ते मुंबई-गोवा हायवेवर जोडलेले असंख्य मित्रमैत्रिणी आठवले. खासच गं!

खूप वेगळं लिहिलयस, ललिता.
सुरेख... हे सगळं डोळ्यांसमोर उलगडत जातं... एका हिरव्यागार माळाला उजाड होताना पाहिल्यासारखं...
सुंदर.

प्रवास करताना कित्येकदा आपल्याला अशी रस्त्याची कामं चालू असताना दिसतात...... आपण तिकडे एखादा कटाक्ष टाकू फार तर फार...... पण रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्तीत या नित्यनेमाच्या(आपल्यासाठी, आता कदाचित त्या लोकांसाठी सुद्धा) गोष्टीमुळे त्यांच्या रोजच्या आयुष्यात एवढा फरक पडत असेल किंवा तेवढ्या दिवसांसाठी त्यांचं आयुष्य त्याच एका गोष्टीभोवती फिरत असेल हे अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने कथेत मांडलं आहेस, लले! फारच छान....... आत्तापर्यंतच्या तुझ्या लेखनशैलीपेक्षा खूपच वेगळ्या धाटणीची शैली वाचून आश्चर्यमिश्रीत आनंद झाला...... Happy

खुप सुरेख..अगदी त्या रस्त्यावर घेउन गेलात. भाषेचा बाज ही सांभळलाय अन लेखनशैली ही मस्त!!! आवडली कथा

छान आहे गोष्ट.जसजशी गोष्ट सरकायला लागली तसं वाटलं की ह्या मोकाट फिरणार्‍या दोन मुलींना त्या बांधकामात काही इजा तर होणार नाही? पण नाही, नशिब तसं काही झालं नाही.

>>आवडली गोष्ट, सगळ्या व्यक्तीरेखा आणि प्रसंग सही उभे केले>>असेच म्हणते.

Pages