एक प्लान ..... खुनाचा

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 November, 2009 - 06:31

"हॅलो ?"
"कोण ? शिरोडकर का ?"
"बोलतोय."
"माधव... माधव जोशी"
"मा..ध..व....?"
"मी माबोकर आहे. आपली तशी वैयक्तीक ओळख नाही"
"अच्छा... बोला."
"तुमच्या कथा वाचल्यात मी. जवळजवळ सगळ्याच. मला तुमची लेखनशैली फार आवडते."
"थँक्स." (हरभर्‍याच्या झाडावर चढत असलेली बाहुली)
"फॅन आहे मी तुमचा. कस काय जमतं तुम्हाला इतकं बारिक सारीक डिटेल्ससह लिहायला ?"
"अहो, ते गुपित आहे. कधी भेटलो की सांगेन तुम्हाला."
"मग भेटूयाच. तसं एक महत्त्वाचं काम पण आहे माझं तुमच्याकडे. परवा मी मुंबईत असेन. अंधेरी येथे. भेटता येईल का ? "
"परवा.. ? हो, हरकत नाही. भेटू."
"थँक्स. पोहचल्यावर मी तुम्हाला फोन करेन. ठिकाय. भेटू मग परवा." फोन कट झाला. मी फोन ठेवून लॅपटॉपकडे वळलो तोच पुन्हा फोन वाजला. पाहीलं तर कुलकर्ण्यांच्या विशालचा फोन.
" बोला राजे ? काय करताय ?" इति विशाल.
"काही विशेष नाही रे... एक विडंबन पोस्टवतोय.... तुझं काय चाललय ? नवीन काही..? "
"काही नाही. सध्या बिजी आहे. नवा बॉस पिडतोय. त्यात हल्लीच शिफ्टींग केलय त्यामुळे रोज काही ना काही नवं असतचं. घरी लॅपटॉप उघडायची सोय नाही."
"व्वा छान ! म्हणजे वहिनींना थोडीतरी मदत आहे म्हणायची तुझी. असो. अरे, माधव जोशी नामक एका प्राण्याने फोन केला होता आता. माबोकर आहे म्हणे. तुझ्या माहीतीत आहे का कोणी ?"
"नाही रे.... माधव.... माधव जोशी... अरे, त्या नानबाच्या कथेतला तर नव्हे ?"
"कथेतला ? नाही रे.. खरचं फोन आला होता. भेटायचय म्हणाला.. परवा अंधेरीत. महत्त्वाचं काम आहे म्हणे."
"महत्त्वाचं काम ? हम्म... बघ एखादा प्रोड्युसर असेल. तुझ्या रहस्यकथेवर पिक्चर वगैरे काढायचा असेल." (नुसत्या कल्पनेने आनंदीत झालेली बाहुली)
"तुझ्या तोंडात सुरमईचे तुकडे पडो. चल, ठेवतो आता. दुपारी बोलू." सेल ठेवून मी लॅपटॉपकडे वळलो.
"शिरा पडो तुझ्या तोंडाक...! अरे भ्रष्ट ब्राह्मणा, स्वतः तर बाटला आहेसच, आता माझा पण धर्म भ्रष्ट करतो का?" हे फोन ठेवता-ठेवता कानावर आलेले शब्द.
(तिच्यातर... हा विशल्या पण भट आहे, वाटत नाही लेकाचा!)

माधव जोशीला माझा सेल नंबर कुठून मिळाला असेल ? ' हा मध्येच डोकावून गेलेला प्रश्न. मिळाला असेल कुठूनतरी. हा खरचं एखादा माबोकर आहे आहे की ड्युआय... मस्करी तर नसेल ना ही ?.... उम्याला किंवा दक्षेला विचारावं का फोन करून.. माधव जोशी नामक प्राण्याला ओळखता का म्हणून...... जाऊ दे.... भेटायचय म्हणतोय तर भेटूया....... त्यात एवढं मेंदू कुरतडण्यासारखं काय आहे ?.... प्रश्न झटकून मी तुंबलेले मेल चेक करायला सुरुवात केली.

...................................................................................................................

ठरल्याप्रमाणे माधव जोशीने फोन केला आणि संध्याकाळी मी डोमेस्टिक एअरपोर्टजवळच्या एअरलिंक हॉटेलमध्ये पोहोचलो. रिसेप्शनलाच माझी आणि त्यांची गाठभेट झाली. माबोवर टाकलेला माझा फोटो त्यांना याबाबतीत मार्गदर्शक ठरला. नाकावर किंचित ब्राऊनिश वाटणार्‍या काड्यांचा लेटेस्ट चष्मा, उजव्या बाजुस भांग पाडलेले कुरळे वाटावेत असे बारीक केस, सरळ नाक, गौर वर्ण, जवळजवळ साडेपाच फुट उंची, सशक्त बांधा असलेला हा जीन्स टिशर्टमधला प्राणी चाळीशीचा गृहस्थ होता. चेहरा फारच हसरा. हस्तांदोलन झालं आणि आम्ही त्यांच्या रुमकडे वळलो. एक पलंग, टिपॉय, ड्रेसिंग टेबल आणि दोन खुर्च्या असलेली एक साधारण एसी रुम होती ती.

"बोला काय घेणार ?"
"हॉट ड्रिंक्समध्ये विचारताय ?" मी खुर्चीत शिरत विचारलं.
"माझी काहीच हरकत नाही."
"माझीही. चहा चालेल मला."
"चहा ? " जोशी बुचकळ्यात पडल्यासारखे वाटले.
"चहाच." मी ठामपणे म्हणालो.
"ठिक आहे. पण मी दुसरं काही घेतलं तर चालेल ना ? "
"घ्या ना. तुमचीच रुम आहे." जोशींनी हसून ऑर्डर दिली. आमच्या अवांतर गप्पा सुरु झाल्या.

माबोवरच्या अनेक कथाबद्दल (मी लिहीलेल्या... अधूनमधून घडणार्‍या सुरस कथांचा इथे काहीच संबंध नाही.) गप्पा सुरु झाल्या. कथांची पाळमुळं, त्यातील पात्रे, वळणे वगैरे.. वगैरे... कविंताबद्दल त्याने एक अवाक्षर उच्चारलं नाही आणि मीही. तसं माझ्याशी कवितांबद्दल कोणी काही बोलतच नाही. (विचार करायला हवा यावर.) थोड्याच वेळात वेटर हुकूमाप्रमाणे सगळं घेऊन आला. सगळं टिपॉयवर ठेवून त्याने टिपॉय खुर्ची व पलंगाच्या मध्ये सरकवला आणि हात बांधून उभा राहीला.

"वेटर, जब जरुरत होगी बुला लेंगे." या वाक्यासरशी वेटर वळला. जोश्याने दार लॉक केलं आणि तो समोर येऊन बसला.
"माधवा, तुला माझा नंबर कुठून मिळाला ?" एवढ्या वेळात आम्ही एकेरीवर आलोय हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.
"चाफ्याच्या विपूत." त्याने पटकन उत्तर दिले. का कुणास ठाऊक, पुन्हा कुणाच्याही विपूत आपला सेल नंबर लिहू नये, असं त्याक्षणी मला वाटलं.
"अरेच्चा, लक्षातच नाही आलं माझ्या. बरं, काय महत्त्वाचं काम होतं माझ्याकडे ?"
(रहस्यकथा लिहीणार्‍या लेखकाने आपला मुर्खपणा जाहीर मान्य करावा म्हणजे 'वन मोर फेदर इन हिज कॅप'.)

"सांगतो. घाई काय ? चहा घे." स्वतःसाठी पेग बनवण्याआधी त्याने चहा पुढे केला.

मी चहाचा कप त्याच्या हातातून घेतला. पेग बनवता बनवता तो थांबला. त्याने बॅग उघडली. मी त्याच्या त्या हालचाली न्याहाळत होतो. बॅगेतून एक जाडजूड ब्राऊन पाकीट बाहेर काढून त्याने ते माझ्यापुढे केलं. हातातली कपबशी खाली ठेवून मी पाकीट घेतलं.

"काय आहे हे ?" मी बर्‍यापैकी वजन असलेलं पाकीट न्याहाळत विचारलं. (एक शंकाखोर बाहुली.)
"पहा तरी." तो त्याच्या पेगकडे वळला.

काटेकोरपणे तो तोलून मापून पेग बनवत होता. मी पाकीट उघडलं व त्याच्या त्या पेग बनवण्याच्या पद्धतीकडे पहातच पाकीटात हात सारला. हाताल जे जाणवलं ते थंडगार होतं. धातुचा स्पर्श होता हे ही नक्की. मी पाकीटाकडे वळलो व वस्तू बाहेर काढली. ते एक रिवॉल्वर होतं. हात थरथरला माझा. आयुष्यात पहिल्यांदाच रिवॉल्वर धरणारा एका सर्वसामान्य लेखकाचा पांढरपेशा हात. थरथरणारचं. समोर बसलेला माधव जोशी माधव जोशीच आहे की आणखी कुणी ? दाणकन शंका मेंदूवर आदळली. हि सदिच्छा भेट नाही हे माझ्यातल्या लेखकाने... त्यानेच कशाला ? मीपण ओळखलं. एसीची हवा तापल्यागत वाटलं मला. मला त्या रिवॉल्वरचा संदर्भ कळेना. आतापर्यंत चित्रपटात, कथा-कादंबर्‍यात भेटीला आलेलं रिवॉल्वर चक्क हातात... क्षणभर आपण स्वप्नात आहोत असही वाटलं मला. पण जिभेवर चहाची चव अजूनही रेंगाळत होती.

"हे... हे काय ?" मला माझ्याच आवाजातला कंप जाणवला. (एक मनोमन हादरलेली बाहुली.)
"रिवॉल्वर." माधव जोशीचा थंड वाटलेला आवाज. एसीमुळे असावा. हातातला पेग वर करून 'चिअर्स' म्हणाला तो माधव जोशी. बहुतेक तो थंडच होता आणि मी थंडगार.

मी स्वतःला संयत करू लागलो. त्या दोन मिनिटात घडलेल्या त्या घटनेचा अर्थ लावण्याचा एक अयशस्वी प्रयत्नही. मी घाबरलो होतो. खरचं घाबरलो होतो. पण दाखवणारं कसं ? भय...रहस्यकथा लिहिणारा लेखक... घाबरून कसं चालेल ? मी एक दिर्घ श्वास घेतला आणि एक डोळा त्याच्या हालचालीवर ठेवून मोबाईल हाताळावा तसं ते रिवॉल्वर हाताळू लागलो. नेमकं काय चाललय त्याचा अंदाज बांधू लागलो. हा प्राणी खरचं कोणी माबोकर आहे की दुसराच कोणीतरी..... माबोकर असेल तर नक्कीच नोव्हेंबरमध्ये एप्रिल फुलचा कार्यक्रम असावा आणि नसेल तर....... नुसत्या शंकेने शहारलो. रिवॉल्वर दोन हातांनी नीट धरून फिल्मी पद्धतीने माधव जोशीवर नेम धरला. त्याच्या चेहर्‍यावरची रेषही हलली नाही. त्याने पुन्हा 'चिअर्स' म्हटलं. माझ्या इवल्याश्या मेंदूत मात्र शंकानी पथनाट्य सुरु केलं होतं. मघाशी घोळत बसलेली माझी भीती बर्‍यापैकी गेली होती. पण प्रश्न मात्र होतेच. प्रश्नांच हे वागणं विचित्रच. पहिल्याच्या उत्तराचा पत्ताच नाही तरी दुसरा मीपण... मीपण म्हणत हजर. मी रिवॉल्वर टिपॉयवर ठेवलं.

"हे रिवॉल्वर कशाला आणलसं ?" त्याच्या डोक्यात काय आहे ते कळायला काही मार्ग नव्हताच. आता त्याच्या तोंडून वदवणे हे खरे. प्राप्त घटनेला रहस्यकथाकाराच्या चष्म्यातून पाहण्याचा नाद तुर्तास सोडलेला बरा.

"सहज. म्हटल तु पाहील असेल... नसेल... तुझ्या भेटीसाठी येताना काय घ्यावं तेच कळेना.. मग हेच आणलं. रहस्यकथा लेखकाला शोभेल अशी वस्तू. कशी वाटली कल्पना ? " त्याने पेग तोंडाला लावून एक घोट घेतला आणि दुसर्‍या हाताने समोरच्या बशीतला उकडलेले काबुली चणे तोंडात टाकले. म्हणजे हे (घोट आणि चणे) मघापासून चाललं होतं पण आता नीट लक्षात यायला लागलेलं.

"छान. उत्तम." ओठावरच्या सगळ्या शिव्या मागे सारून मी बोललो. घड्याळ्याकडे पाहीलं. तासभर झाला होता येऊन.
"उशीर होतोय का ?" माझं घड्याळात पाहणं ताडलं त्याने.
"थोडासा. तुझं काम नाही सांगितलसं अजून. " मी मुख्य विषयाकडे वळायचं ठरवलं.

"सांगतो." माधव जोशीने त्याच्या हातातला पेग संपवला. ग्लास ठेवून तो माझ्याकडे वळला. त्याने आजूबाजूला पाहीलं. पलंगावर आपली बैठक मजबूत करत, दोन्ही हात मांड्यावर ठेवत माधव जोशी पुढे वाकला. मी त्याच्या शब्दांची वाट पहात होतो.

"मला माझ्या बायकोचा खून करायचाय." माधव जोशीने बाँब फोडला.
"क्काय ? " बहुतेक मी किंचाळलो होतो. कारण त्याने पटकन तोंडावर हात ठेवत (स्वतःच्याच) 'हळू' बोलण्याचा इशारा केला. नेमकं काय बोलावं तेच कळेना. (घाबरून बुचकळ्यात पडलेली बाहुली.)
"ओरडू नकोस. बाहेर उभा असेल तो वेटर." बाहेर कोणीतरी आहे ही कल्पना फार सुखावह होती. मी त्या बंद दाराकडे पाहीलं. पण दार काही हललं नाही.

"हे बघ, माझं बोलणं ऐकून घे. " माधव जोशी त्याची बाजू मांडत होता. मी मात्र सैरभैर. "मी कंटाळलोय तिच्या वागण्याने. पाणी डोक्यावरून वाहायला लागलय. आता तिचा खून करण्याशिवाय मला दुसरा पर्यायच नाही."
"हे बघा जोशी," मी 'अरे तुरे' वरून सरळ 'अहोजाहो' वर घसरलो. याचा अर्थ सरळ आहे. मी घाबरलो होतो. 'अरेतुरे' करून त्याच्याशी अजून जवळीक साधण्याचा विचार मनात येणं शक्यच नव्हतं. तासाभरापुर्वी ओळख झालेल्या माणसाने केलेला गौप्यस्फोट 'पचनेबल' नव्हता. "तुम्ही तुमच्या बायकोला कंटाळलात आणि तिचा खून करू पहाताय. या सगळ्यात मी कुठे येतो. ?"
"तेच तर सांगतोय. हा खून कसा करायचा त्याचं प्लानिंग मला तुमच्याकडून हवयं." माधव जोशीने आदरार्थी संबोधायला सुरुवात केली. हा मिळणारा आदर... ही धोक्याची नांदी आहे, हे मला मनाने बजावलं. माझ्यातला रहस्यकथाकार जागू लागला.
"मी ? मी करायचं प्लानिंग ? तुमचा काहीतरी घो़ळ होतोय जोशी. मी कुणी शार्पशुटर वा खूनी नाही असल्या प्लानिंग करायला. एक साधा अप्रकाशित लेखक आहे."
"रहस्यकथा लेखक." माधव जोशीने चुकीची दुरुस्ती करावी त्या अविर्भावात सांगितलं.
"चुक झाली. हवं तर पुन्हा लिहीणार नाही असं वचन देतो. " मी काय बोलतोय ते मला माझचं कळेना. (संपुर्ण गोंधळलेली बाहुली.)

"रिलॅक्स.... कौतूक... रिलॅक्स..." माधव जोशीचे हातवारे कळत होते. तो त्याच्या पेगकडे वळला. मी खुर्चीतल्या खुर्चीत मागे सरलो.
"हे बघ, तू रहस्यकथा लिहीतोस." माधव जोशी पुन्हा एकेरीवर. पेगचा परिणाम की आणखी काही ? " त्यामुळे तुला या विषयात गती आहे. हा खून मी करणार आहे. तू नाही. इतकं अपसेट व्हायचं काहीच कारण नाही." जोशी पेग बनवता-बनवता बोलला.
'अरे हो... लक्षात कसं आलं नाही. मी थोडी हा खून करणार आहे. आपण अपसेट व्हायचं नाही. त्याची बायको काळी की गोरी तेही आपल्याला माहीत नाही.' मी मनाला बजावलं.
"तू फक्त मी हा खून करून नामानिराळा कसा राहू शकेन ते सांगायचय. बस एवढ्चं." जोश्याचा पेग तयार झाला.
'बस एवढचं.....हा माणूस आपल्याला सदेह पोहचवणार' याची आता खात्री व्हायला लागली. मी उठून उभा राहीलो.
"मला वाटतं झाली तेवढी भेट पुरे. निघतो मी." मी दाराकडे वळलो. लॅचला हात घातला.

"कौतूक.." हाकेसरशी मी मागे वळलो. रुमालात धरलेलं रिवॉल्वर त्याच्या हातात होतं. माझा लॅचवरचा हात स्तब्ध झाला. त्याने रिवॉल्वरने खुर्चीकडे इशारा केला. क्षण दोन क्षण मी विचार केला. खरं तर रिवॉल्वर पाहिल्यावर काही सुचण्याचा प्रश्नच नव्हता. पुन्हा खुर्चीत जाऊन बसलो. (घामाघुम बाहुली.)

"घाबरायचं कारण नाही. मी काही तुम्हाला गोळी घालणार नाही." मी उठण्याच्या प्रयत्नात. " गरज पडेपर्यंत." मी पुन्हा खाली. पुन्हा आदरार्थी संबोधून समोरचा तयार पेग माधव जोशीने त्याच्या गळ्यातून खाली उतरवला. प्लेटमधला पापड तोडला. त्या शांततेत तो आवाजही घुमला. पापडाचा तुकडा तोंडात टाकून तो मागे सरून पलंगावर रेलला.

"रिलॅक्स. घाबरायचं काहीच कारण नाही. " आपल्या हातातलं रिवॉल्वर माझ्या रोखाने धरून माधव जोशी मला रिलॅक्स व्हायला सांगत होता. मीही रिलॅक्स व्हायचा प्रयत्न करत होतो. कथा लिहीताना नायकाला अशा 'सिचुयेशन'मध्ये टाकून बाहेर काढणं सोपं, कारण तिथे खलनायक आपल्या लेखणीप्रमाणे वागतो. इथे मात्र सगळीच बोंब. मनातल्या मनात देवाचा धावा. (हात जोडून आरती म्हणणारी बाहुली.)

"मी कुणी पार्टटाईम किलर वगैरे नाही. हे रिवॉल्वर हल्लीच घेतलय. तसा सराव नाही. पण एवढ्या जवळून नेम चुकण्याची शक्यताही नाही." जोशी एका वाक्याला दिलासा तर दुसर्‍या वाक्याला धमकी देत होता. नवीन पद्धत. पुढच्या कथेत वापरायला हरकत नाही. (कधी काय सुचेल त्याचा नेम नाही.)

नेमका त्याच वे़ळेस सेल वाजला. मी़ जोश्याकडे पाहीलं. त्याने डोळ्यानेच फोन उचलण्याची परवानगी दिली. मी उठून जिन्सच्या खिशातला फोन काढला. कुलकर्ण्यांचे विशाल. मी फोन घेणार तोच जोश्याने पटकन उठून माझ्या हातातला फोन घेतला. त्याची चपळाई लाजवाब होती. त्याने स्क्रीनवरचं नाव वाचलं. हसला आणि फोन स्विच ऑफ केला. संपला.... एक मार्ग संपला. विशालला बोलता-बोलता काही कल्पना देता आली असती.... पण सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडायला ती काही माझी रहस्यकथा नव्हती. त्याने माझ्याकडे पाहीलं. मी शांतपणे खुर्चीत पसरलो. दुसरं काही करता येण्यासारखं नव्हतं. 'हा माणूस इथे आपला खून करणार नाही' याची मनाला खात्री नव्हती. बायकोचा खून करण्याची तयारी असलेला माणूस आपला खून का करणार नाही..... दोन खुनासाठीही फाशीच. तिही आरोप सिद्ध झाला तर.... याच्या बायकोने तरी त्याचं घोडं मारलं असेल पण माझा काय संबंध ? ....... त्यालाच विचारायला हवं...

"बोला जोशी"
"मग कसा काय करायचा खून ? " जोशी बॅक टू सेम मुद्दा.
"जोशी, तुम्ही मला गोळी घालणार नाहीत. मग मी तुमचं ऐकण्याचा प्रश्नच कुठे येतो ? " माझ्यातला रहस्यकथा लेखक विचार करू लागलेला. या परिस्थितीवर आता तोच मात करू शकत होता. जोशी हसला. अगदी मनापासून. त्याने रिवॉल्वरची नळी स्वतःच्या दिशेने फिरवली.

"स्वतःला मारू शकतो ना मी. रिवॉल्वरवर तुमचे ठसे आहेत. तेवढं पुरेसं आहे."

माधव जोशी पुर्ण प्लान करून आला होता. मी माझ्या विचार शक्तीचे घोडे उधळायला सुरुवात केली. रिवॉल्वर मला देण्यामागचा त्याचा हेतू सरळ होता. हाताचे ठसे. रहस्यकथाकाराचा आणखी एक मुर्खपणा. गरज काय होती रिवॉल्वर हाताळायची ? फिल्मी स्टाईलने रिवॉल्वर रोखण्याची ? माधवने जर स्वतःवर गोळी झाडली तर काय होईल ? तो जखमी होईल किंवा मरेल तरी. रिवॉल्वरवरील माझ्या हाताच्या खुणा मला तुरुंगात पाठवायला पुरेश्या आहेत. माधवने आत्महत्या केली हे सांगायला साक्षीदार नाहीच. म्हणजे मुकाट्याने त्याचे ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही. थोडा वेळ जाऊ द्यावा. त्याच्या मनात नेमकं काय आहे ते तर कळायला हवं. चोविस तास तो मला इथे कोंडू शकत नाही. कोणत्याही क्षणी टिपच्या आशेने वेटर इथे येईल आणि तेवढा क्षण पुरेसा आहे. तोपर्यंत वेळ काढायला हवा.

"कसला विचार करतोयस मित्रा ? निसटण्याचा की मला झुलवण्याचा." माधव जोशीला टेलीपथी अवगत असावी अशी शंका मनाला चाटून गेली. मनकवडा माणूस. मनातल्या मनात विचार करायचीही बंदी.

"मला तुझ्या बायकोबद्दल काहीच माहीती नाही. मग तिला मारण्याचा प्लान मी कसा बनवू शकेन ? " मी सरळ विषयालाच हात घातला. तो एकच विषय त्याच्या आवडीचा आहे हे तर कळलं होतचं. मी पण माझ्या संभाषणकौशल्याचा वापर करायचं ठरवलं. (तेवढं जमतं म्हणे मला.) पुन्हा एकेरीवर आलो.

"मी सांगतो ना." मी त्याचं काम करायला तयार झालोय हे पाहून तो उत्साहाने माहीती देण्यास तयार झाला. "सकाळी सहा ते आठ ही वेळ ती तिची तयारी व डबा बनवणे यात घालवते. त्यानंतर मग ऑफिसला. साडे नऊ ते सहा पर्यंत. आमच्या घरापासून तिचं ऑफिस जवळजवळ तासाभराच्या अंतरावर. हा पल्ला ती बसने प्रवास करते. आमच्या बिल्डिंगच्या गेटपासून जवळजवळ तीस पावलांवर बसस्टॉप आहे. साधारण सव्वा आठ किंवा आठ वीसपर्यंत बस येते. ती तिच्या ऑफिसजवळ सव्वा नऊला पोहोचते. त्यानंतर तिथून ती चालत ऑफिसला जाते. बसस्टॉपपासून पाच मिनिटाच्या अंतरावर तिचं ऑफिस आहे. हा रस्ता तसा पुर्ण रहदारीचा आहे. संध्याकाळी हाच क्रम उलट. साडेसातला ती घरी पोहोचते. त्यानंतर जेवण व इतर कामे. दहा वाजता निद्राधीन." त्याने तिचा नीट पाठलाग केला आहे हे जाणवलं मला.

"सुट्टीच्या दिवशी ?"
"घरीच असते. आठवड्याभराची कामे काढते. महिन्यातून एखाद वेळेस ती ब्युटीपार्लरमध्ये जाते. ते आमच्या घरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे."
"अजून काही सांगण्यासारखं ?"
"नाही एवढचं."
"जोशी, तुझी बायको एक साधी सरळ गृहीणी दिसतेय. तरी तू.... ?"
"मॅरिज कॉन्सेलरचा सल्ला नकोय मला. खून कसा करायचा ते सांग." माधव जोशी फारच उत्तेजित वाटला.
"जोशी, समज मी तुला प्लान दिला आणि मग पोलिसात गेलो तर...." मी उगाच नस्ते फाटे फोडायला सुरुवात केली.
"काय सांगणार पोलिसांना ? मी तु दिलेल्या प्लानप्रमाणे माझ्या बायकोचा खून केला म्हणून ? " जोशी हुशार असल्याचं कळत होतं. एवढी अक्कल असूनही त्याला प्लानसाठी मीच हवा होता. नस्त्या लेखनाची दुर्बुद्धी का सुचावी ? गप दोन चार कविता लिहाव्या नाहीतर एखादं ललित खरडावं.... रहस्यकथाच कशाला ? मुर्ख लेकाचा ! (स्वतःला ओळखण्यासाठी असे कसोटीचे क्षण आयुष्यात यावे लागतात.)

"मी त्यांना गुप्तपणे माहीती देऊ शकतो." आता मी बोलतोय की माझ्यातला रहस्यकथाकार याचा मलाच उलगडा होईना.
"दे. पण आधी प्लान तर सांग." माधव जोशीला फक्त अर्जुनासारखा पोपटाचा डोळा दिसत होता.

"प्लान.....? मला यासाठी वेळ लागेल. बसल्या बसल्या सुचत नाहीत या गोष्टी." खरं तर कथा लिहायला बसलो असतो तर आतापर्यंत माधव जोशीच्या बायकोचा खून होऊन पोलिस तपास सुरुही झाला असता, पण उगा डोकं लढवायचच कशाला ? उद्या याने याच्या बायकोचा माझ्या डायरेक्शनप्रमाणे खून केला तर निस्तरणार कसं ? फुलप्रुफ प्लान दिल्याशिवाय हा उठायचा नाही. एखाददुसरी फट ठेवली तर हा बुजवेलही. पोलिसांना गुप्तपणे सांगून काय साधू शकेन ? ते जास्तीत जास्त त्याला संशयाच्या जाळ्यात ओढतील. संशयाचा फायदा घेऊन आजवर काय कमी खूनी निसटलेत. उद्या हा निसटला तर पुढचा नंबर माझा.....

"सुचेल. या रिवॉल्वरमध्ये जादू आहे. याने भल्याभल्याना बोलतं केलय." जोश्याने रिवॉल्वर नाचवलं.
"जोशी, तुझ्या बायकोचे जे सध्याचे रुटीन आहे त्यात ती एकटी सापडणं कठीण आहे. मला वाटत नाही तू तिचा खून करू शकशील."
"म्हणून तर तुझ्या भजनी लागलोय.... पण आहे ते आहे. त्यात काय बदल करणार ? खून तर व्हायलाच हवा. खून करणं कठीण नाही. खून करून नामानिराळा राहणं मुद्द्याचं. यावर काही उपाय ?"
"जोशी, उपाय सांगायला मी कोणी बंगालीबाबा नाही."
"थट्टा नकोय. हा विषय गंभीर आहे माझ्यासाठी." बोलता-बोलता जोश्याच्या चेहर्‍याचे हावभाव किंचित बदलले. कसला तरी प्रोब्लेम होत असावा त्याला.

"रिवॉल्वर समोर असताना थट्टा कोण करेल ?"
"गुड. मग बोल पटापट. माझ्याकडे वेळ कमी आहे."
"चारचौघात तुझे तुझ्या बायकोशी संबंध कसे आहेत ?"
"उत्तम. माझ्याइतका बायकोवर प्रेम करणारा दुसरा नवरा नसेल इतपत लोकांची सर्टिफिकेटस मिळालीत."
"म्हणजे कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना नवर्‍याचा संशय आलाच तर प्रेमाचा ढोल आहेच बडवायला. चांगल आहे. जोशी, खून तू स्वतः करणार आहेस की एखादा भाडोत्री गुंड ?"
"मी स्वतःच... तिसरा माणूस मध्ये नकोय. त्यामुळे अडचणी वाढतील."
"तिसरा माणूस तर ऑलरेडी आलाय यात जोशी."
"तुझ्याबद्दल मी सगळा विचार करून ठेवलाय. मला तुझ्याकडून काहीच धोका नाही." जोशी इतका खात्रीपुर्वक कसा बोलू शकतो ? मी इतका निरुपद्रवी दिसतो का ?

"जोशी, तुझ्या बायकोचा खून अशक्य आहे."
"अशक्य काहीच नसतं असं नेपोलियन म्हणायचा."
"मग त्यालाच विचार ना ? मला का छळतोयस ?" ती नक्कीच विनोद करायची वेळ नव्हती. पण तरी केला. जित्याची खोड, गोळी लागल्याशिवाय जाणार कशी ?
"हे बघ कौतूका, वेळ वाया जातोय. तुलाही घरी जायला उशीर होत असेल. तेव्हा मला ताबडतोब प्लान दे आणि तुझ्या मार्गाने निघून जा." जोशीने आता बसण्याची पद्धत बदलली. काहीतरी प्रोब्लेम होत होता हे नक्की. मी त्याच्या हालचाली वाचत होतो आणि काही गोष्टी लक्षातही येत होत्या. पण खात्री नव्हती.

"जोशी, हे तुलाही माहीत आहे की यातून काहीच निष्पन्न होणार नाही. माझी तुला काडीचीही मदत होणार नाही."

"होणार म्हणजे होणार." जोश्याचा आवाज वाढला. "तू जर मला लवकरात लवकर प्लान दिला नाहीस तर मग मी तुझाच खून करेन आणि मग माझाही. मला आत्ताच्या आत्ता प्लान हवाय." जोश्याच्या चेहर्‍यावरून तो तसं काही करेल हे स्पष्ट दिसत होतं. काय करावं ? एक यक्षप्रश्न.

"जोशी, तुझी बायको तुला एकटी सापडेल अशी जोवर शक्यता निर्माण होत नाही तोपर्यंत तरी कठीण आहे. कारण तू घरी तिचा खून करू शकत नाहीस. एखाद्या चोराच्या नावावर बिल फाडून. हे प्रकार सीआयडी सिरियलमध्ये गेली बारा वर्षे दाखवत आहेत. बसस्टॉपवर तिला चालत्या गाडीच्या खाली ढकलता येण्याचा प्रश्नच नाही. तिच्या येण्याजाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत, म्हणजेच तिला रोज ठराविक स्थळी ठराविक लोक पहात असतील. तिच्याबरोबर एखाद्या हॉटेलात जाऊन तू विष द्यायचा प्रयत्न केलास तरी फसशील. तिला कुठे बाहेर नेलेस तर तिथेही तुला तिचा काटा काढता यायच नाही. थोडक्यात अशक्य आहे." मी त्याला ताबडतोब काही शक्यता सांगितल्या.

"बस. आता हा खेळ पुष्कळ झाला." जोशीने रिवॉल्वर माझ्या दिशेने रोखलं. "तुझा जर उपयोग होणार नसेल तर मग आपण हे संभाषण थांबवलेलं बर." जोश्याचं बोट आता चापावर होतं. मी डोळे बंद केले.

"ठिक आहे. समज, उद्या तुला तुझ्याच बायकोचा खून करायचा असेल तर तो तु कसा करशील ?" जोश्याच्या या वाक्यासरशी मी डोळे उघडले.

"क्काय ? जोशी, तू तुझ्या बायकोचा खून कर नाहीतर आणखी काही. माझ्या खाजगी गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही." मी चिडलोच त्या जोश्यावर. (प्रचंड चिडलेली बाहुली.)

"समज म्हटलय मी. उगाच ओरडू नकोस. बोल, कसा करशील ? " जोश्याचा चेहरा बोलताना किंचित वेडावाकडा होत असल्यासारखा वाटला मला.

"जोशी, मला असलं काही समजायच ही नाही. तुला गोळी घालायचीच असेल तर मला घाल नाहीतर स्वतःला घाल. पण आता तुझ्या या फालतू प्रश्नांना मी उत्तर देणार नाही."

खर तर एवढं चिडायचं काही कारण नव्हतचं. पण मागे एकदा माझी एक रहस्यकथा बायकोने वाचली. तेव्हा तिने 'नवीन काय' म्हणून विचारलं आणि मी तिला नवीन कथा ऐकवली. यावर तिची प्रतिक्रिया 'अनबिलिव्हेबल' होती.
"तू इतक्या सहज खुनाचे प्लान बनवतोस. उद्या माझाही प्लान बनवलास तरी कुणाला काहीच कळणार नाही." या तिच्या वाक्यनतर घरात रामायणाचे महाभारत घडले होते. ते आठवलं आणि तोंडून ताडकन शेवटचा पर्याय निघाला. तेव्हाचा आवरलेला सगळा राग. मी आता माधवच्या त्या चेहर्‍यावर उमटणार्‍या खुणांचा अंदाज बांधायला सुरुवात केली. त्याला शेवटचा पर्याय देऊन मी रिलॅक्स झालोय हे दाखवण्यासाठी समोरचे काबुली चणे चघळायला सुरुवात केली.

"हे बघ.... मी..... शीट..... " फक्त एक दोन सेकंदासाठी जोश्याची नजर वळली. हिच संधी...... माझी नजर त्याच्यावरच होती. रिवॉल्वरचा हात खाली आला आणि मी माझा उजवा हात त्वेषाने फिरवला. इतक्या वर्षात कमावलेली हाडं ऐनवेळी उपयोगी पडली. माधव जोशी रिवॉल्वरसकट भेलकांडला. मी उठून त्याच्या रिवॉल्वरवाल्या हातावर झडप घातली. माझा हात पुन्हा वर गेला आणि माधव जोशी माझ्याकडे वळला.

"कौतूका... मी चाफा...." माझा हात वरच राहीला. (एक पोपट झालेली बाहुली.)
"चाफ्फा.... "मी उठलो. रिवॉल्वरचा हात धरूनच..... पुन्हा रिस्क नको.....
"हे घे." माधव जोशीने रिवॉल्वर माझ्या हातात कोंबलं आणि तो टोयलेटकडे वळला. त्याच्या मघापासून बदलेल्या हालचालींच कारण तेच होतं. रिवॉल्वर टिपॉयवर ठेवून मी त्याच्या बाटलीतल्या द्रव्याची चव चाखली. कोल्ड्रिक होत ते. 'चाफा' बाहेर आला.

"निसर्गाच्या हाकेला 'ओ' देण्याशिवाय काही गत्यंतरच नसते. हे दोन थंड पेग भारी पडले आणि सगळा प्लानच बोंबलला." आपला दुखरा जबडा सावरत तो समोर बसला. "चित्रपटात ते कसे तासनतास पाळत ठेवतात. इथेतर कंट्रोल करायचे वांदे."
"पण ह्या नसत्या कल्पना डोक्यात आणायच्याच कशाला ? " त्याच वेळेस दारावर टकटक झाली. मी दाराकडे वळलो.
"ही त्याची कल्पना." चाफ्याने थंडगार ग्लास जबड्याला लावला. मी दार उघडले. दारात कुलकर्ण्यांचा विशाल होता.
"विशल्या तू ?"
"काय रे काय झाल ? " आत वाकून त्याने पहिलं वाक्य फेकलं.
"तुझ्या प्लानचा बोर्‍या वाजला आणि माझ्या जबड्याचाही." मी मध्ये असल्याने चाफ्याने वाकून वाक्यावर वाक्य फेकलं.
"तू मिस कॉल दिलास तेव्हाच कळलं. म्हणून आलो." इति विशल्या.
"विशल्या, ह्या नस्त्या उचापती कशाला केल्यास ? " मी विशल्याला टपली हाणत विचारलं.
"हा येणार होता मुंबईला. तुला भेटायचं म्हणाला. नेमकं तेव्हाच तू मला वहिनींची मुक्ताफळं ऐकवली होतीस.... इतके खून पाडतोस लोकांचे. एक दिवस माझाही पाडशील. कोणाला काही कळणारही नाही.... म्हटल बघू तरी जमत का तुला ते ?"
"नाही जमलं. दुसर्‍याच्या बायकोचाही नाही." पुन्हा चाफा.
"विशल्या, बायकाच्या थट्टा इतक्या मनावर घ्यायच्या नसतात."
"खरं आहे हे, पण मला हे जबडा हलल्यावर कळलं" चाफा अजूनही जबड्यावर ग्लास धरून होता.
"सॉरी रे, पण राजे, खरच तशी वेळ आली तर.... कथेच्या गरजेसाठी विचारतोय... यावर लिहीन म्हणतोय....एक मध्यमवर्गीय माणूस.... एक रहस्यकथा लेखक आणि एक खून" (एक आयत्या बिळावर नागोबा असलेली बाहुली समोरच्या खुर्चीत येऊन बसली.)

(ही कथा संपुर्णपणे काल्पनिक असून यातील पात्रांचा कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी काही संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा. सदर कथा काहीच्या काही सदरात टाकायची होती पण तशी सोय नसल्याने इथे पोस्टवली आहे.)

गुलमोहर: 

जबरदस्त ओघ

अमोल
-----------------------
मला इथे भेटा

नाद खुळा...

अशीच सुपारी आली तर घेणार काय ?>>>>
बहुतेक पब्लिक आवांतण आहे हे. अशी नुसतीच जाहिरात कशी काय करता आली असती ?

फारच मस्त रे कौतुक Happy बरय कि काहिच्या काही कथा ह्या सदरात टाकायची सोय नाहीये ते.... अशी मज्जा नसती आली मग Happy

सही! एकदम engaging कथा..
पुन्हा एकदा माधव जोशी..
nyway, side business चांगला आहे Wink
BTW, चाफा आता नुसता चाफा राहिला नाहीये - तो दगडी चाफा झालायं.

कौतुक... अरे काय जबरदस्तं लिहितोस रे... किती म्हणजे किती तिरकं चालत असणार तुझं डोकं!
तुला खरच साष्टांग नमस्कार....

कौतुक, मी कथा अर्धवट सोडून मध्येच चाफ्फा ह्यांच्या विपूत जाणार होते त्यांना सांगायला की तो सेल फोन नं. डिलिट करा म्हणून. बरं झालं तसं नाही केलं Wink
सॉल्लिड जमलीय हं कथा Happy

कौ,
जबरी जमलेय कथा... पहिल्यांदा जाम घाबरले वाचून... मग हसून पुरेवाट झाली...
इतका फश्या आहेस का तू? Proud

कौतुक ,
जबरी !!!! शेवटपर्यंत उत्सुकता ताणलीत.
फक्त मला असं वाट्त की शेवट ""कौतूका... मी चाफा...." माझा हात वरच राहीला. " हा केला असतात तर जास्त परिणामकारक वाटला असता. पुढच्या परिच्छेदाने थोडा रसभंग झाल्या सारखा वाटतो. चु.भू.दे.घे. (मला स्वतःला लिहीता येत नाही तरी हे सांगण्याचे धाडस करतेय. )

"सॉरी रे, पण राजे, खरच तशी वेळ आली तर.... कथेच्या गरजेसाठी विचारतोय... यावर लिहीन म्हणतोय....एक मध्यमवर्गीय माणूस.... एक रहस्यकथा लेखक आणि एक खून" (एक आयत्या बिळावर नागोबा असलेली बाहुली समोरच्या खुर्चीत येऊन बसली.)>>>>>>>> विशाल हा कौतुक बघ तुला काय म्हणतोय. (काडी करणारी बाहुली) Proud

हि हा हा हा ! माधव नाम है मेरा, माधव जोशी!

फॅन आहे मी तुमचा. कस काय जमतं तुम्हाला इतकं बारिक सारीक डिटेल्ससह लिहायला ? Happy

सही कथा, आता वाचली..पण त्यातल्या त्या माबो वरच्या आय डी मुळे उत्सुकता वाढली वाचतानाची आणि मग एकदम्. हे हे..छान पण!!! ..:)

मस्त आहे. विशाल आल्यानंतर मग तुम्ही पिण्याकरता काय मागवले हे नाही विचारणार मी! जोक्स अपार्ट पण कौतुक हा प्लॉट थोडा बदलून खरंच एक भन्नाट स्टोरी तयार होईल. म्हणजे बेसीक इंस्टिंक्ट चा प्लॉट आहे ना तशी (अनावश्यक सीन्स आवश्यकरित्या वगळून). म्हणजे आधी खून कसा होणार याची कथा लिहायची आणि नंतर त्याप्रमाणे खून होणार.पण खरा खुनी कोण हे मात्र सस्पेंस.
बघ लिहून.

Pages