प्रिझनर्स डिलेमा

Submitted by मराठी शब्द on 23 November, 2009 - 03:11

मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू.

"प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू.

गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात. नंतर पोलिस त्यांना वेगवेगळे भेटून त्यांच्यासमोर एकच आणि तोच प्रस्ताव ठेवतात. प्रस्ताव असा असतो-

  • कैदी अ गप्प बसला + कैदी ब गप्प बसला = दोघांना ६ महिन्याची साधी कैद
  • कैदी अ गप्प बसला + कैदी ब ने, अ बद्दल पुरावे दिले = कैदी ब ची सुटका, अ ला १० वर्षे कारावास
  • कैदी ब गप्प बसला + कैदी अ ने, ब बद्दल पुरावे दिले = कैदी अ ची सुटका, ब ला १० वर्षे कारावास
  • कैदी अ ने, ब बद्दल पुरावे दिले + कैदी ब ने, अ बद्दल पुरावे दिले = दोघांना ५ वर्षांचा कारावास

वर दाखवल्याप्रमाणे पोलिस त्या दोघांनाही तो प्रस्ताव समजावुन सांगतात. दोघांनाही त्यातील फायदे व तोटे स्पष्ट दिसतात. दोघेही गप्प बसले तर दोघांचाही त्यात फायदा असतो. पण एक जण गप्प बसला आणि दुसऱ्याने त्याच्याबद्दल पुरावे दिले तर साहजिकच गप्प बसणाऱ्याची मुक संमती आहे असे मानून त्याला गुन्ह्याची सजा मिळणार हे दोघांनाही समजते.

आणि हाच त्यांचा पेच असतो.

पहिल्या मार्गाचा अवलंब केल्यास (दोघांनीही गप्प बसणे), दुसऱ्याची काहीच शाश्वती नसल्यामुळे सरळसरळ आत्महत्या केल्यासारखेच होईल ह्या भीतीने गप्प आपण बसण्याचा मार्ग स्वीकारणे दोघांनाही योग्य वाटत नाही. त्यांना ही जाणीव असते की, त्यामुळे दोघेही कमीत-कमी शिक्षेच्या प्रस्तावाला मुकणार असतात.

दुसरा मार्ग स्वीकरल्यास, (दोघेही एकमेकांबद्दल काही-बाही पुरावे देतील), दोघांनाही १० वर्षांऐवजी ५ वर्षे कैद होईल. आणि हाच मार्ग ते निवडतात. दुसऱ्याला आपल्या गप्प बसण्यामुळे पूर्ण फायदा होईल व तो सुटेल आणि आपण मात्र १० वर्षे कैदेत खितपत पडून राहू हे शहाणपणाचे त्यांना वाटत नाही. दोघेही गप्प बसतील असा विश्वास त्यांना एकमेकाबद्दल वाटणे शक्य नाही, मग अशा परिस्थितीत ते दोघेही तोंड उघडतात व चक्क दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारतात.

"दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारणे" हाच तो कळीचा मुद्दा, ज्याला कैदयांचा पेच असे म्हणले जाते. मनोभ्यासक ह्या मनोवृत्तीचा बारकाईने अभ्यास करतात व त्याचा संबंध आपल्या रोजच्या आयुष्यात कसा लागू पडतात ते पाहतात.

सांघिक काम- टिमवर्क- हे जितके सोपे वाटते तितकेच अवघड असलेले एक कौशल्य. एकाच छपराखाली एकाच संघटनेत, कंपनीत, कार्यालयात काम करणाऱ्या संघांमधे अशी रस्सीखेच होणे हे नैसर्गिक आहे; पण ते हिताचे नाही. मानवाच्या ह्या अशा मनोवृत्तीची जाण असणे हे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा हा लेखाचा एक स्वतंत्र विषय आहे. नेत्यांना ह्याची ओळख एका खेळाव्दारे करुन दिली जाते- "विन ऍज मच ऍज यु कॅन".

पण ह्या मनोवृत्तीचे अस्तित्व कसे व्यापक आहे ह्याची काही उदाहरणे पाहू-

१. दोन शेजारील राष्ट्रे आपल्याकडील शस्त्रसंख्या, वैविध्य, आधुनिकता ह्यांचा विचार करत असतांना, दोघेही एकत्र येऊन शस्त्रांवर होणारा खर्च कमी करु शकतात. पण तसे होत नाही. दोघेही राष्ट्रे आपल्या इतर आवश्यक गुंतवणूकीवर टाच आणून शस्त्रांवर जास्तीत जास्त गुंतवणूक करतात.
२. खेळामधे स्टेरॉइडचा वापर एकाने न करणे व दुसऱ्याने करणे....
३. वातावरणाला घातक अशा वायूंचा उत्सर्ग रोखण्यासाठी काही कठोर बंधंनं स्वतः वर लादून घेणे. पण दुसऱ्या राष्ट्रांनी जर तसे केले नाही तर पहिला त्यात नुकसान करुन घेईल व दुसऱ्या देशातील लोक मजा करतील....

तर, असा आहे प्रिझनर्स डिलेमा!

गुलमोहर: 

ह्म्म.. इन्टरेस्टिंग.
धन्यवाद.

खरे आहे. तुम्हाला नुकतेच कळले, पण पुष्कळांना, अगदी माझ्या आधीच्या पिढीला पण हे माहित होते.
कारण मी त्यांच्याकडूनच ऐकले होते.

पण जेथे संकुचित् स्वार्थ, अदूरदर्शीपणाचा अभाव जास्त असतो, तिथे या माहितीचा उपयोग होत नाही. जर अ ला खात्री असेल की लाच देऊन वा निष्णात वकील देऊन स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून सोडवून घेऊ शकेन किंवा त्याला खात्री असेल की तो निरपराधीच आहे, तर तो शेवटचा पर्याय स्वीकारेल.

जागतिक शांतता गेली खड्ड्यात्. जर माझे सरकार शस्त्रात्रे बनवत असेल तर त्यांना माल पुरवण्याचे कंत्राट घेऊन मी श्रीमंत होईन! इतकेच काय जमले तर इतरांनाहि पुरवीन!

पकडलो न जाता जर स्टेरॉईड्स घेऊन विक्रम केले तर मला जाहिराती करून खूप पैसे मिळतील.

मुळात पैसे मिळवणे हे एकमेव ध्येय आहे, त्यापुढे इतर काही महत्वाचे नाही.

वाईट गोष्टी करणार्‍या लोकांना पुष्कळदा नक्की माहित असते की ते करताहेत ते अनेकदा जागतिक पर्यावरण, शांति याला बाधक, इतकेच काय पण बेकायदेशीरसुद्धा आहे. पण त्यांच्यावर दडपण असते ते स्वार्थ, अदूरदर्शी पणा यांचे. तुम्हाला काय वाटते अमेरिकेत ज्यांनी हा आर्थिक गोंधळ घातला त्यांना कळत नव्हते ते काय करताहेत? त्यांना पक्के माहित होते. त्यांना हेहि माहित होते, की आपण आपला स्वार्थ साधू शकतो नि कायदा आपले काही करू शकत नाही. इतरांचे काही का होईना! तसेच केले त्यांनी. ज्यांच्याजवळ सध्या पैसे आहेत, त्यांचे फार वाकडे झाले नाही. कागदावरचे पैसे गेले, हातातले तर कुठे जात नाहीत!

तर सर्व वाईट गोष्टींचे मूळ ननुष्याच्या काम क्रोधादि दुर्गुणात आहे. ते जर संयमित ठेवता आले तरच खरी प्रगति होईल. त्यासाठी काय बरे करता येईल??

हंSSS, बर्‍याच धर्मात त्यासाठी काही काही सांगून ठेवले आहे. पण धर्मात सांगितले म्हणून करायचे? छे, बुद्धिप्रामाण्यवादाचा अपमान. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे मला जे बरोबर वाटते ते बरोबर, इतरांना वाटते ते चूक. त्यामुळे धर्माला आधी बुडवा. मग त्यांनी केला तसाच मनुष्यस्वभावाचा अभ्यास शास्त्रशुद्ध रीतीने करायचा. नि त्यातून कदाचित् त्यांनी सांगितलेलेच करायचे. पण मधल्यामधे रिसर्च ग्रँट मिळते ना, मग? याला म्हणतात बुद्धिप्रामाण्यवाद.

वाचल्यावर मला ती देवा कडुन १०० फटक्याचा(म्हणजे मित्राला २०० फटके मिळतील) वर मागणार्‍या माणसाच्या गोष्टीची आठवण झाली.
चांगल आणि वेगळ लिहिलय काहीतरी. ही व्रुत्ती आजुबाजुला बघत असतोच आपण नेहमी ,पण त्याला प्रिझनर्स डिलेमा म्हणतात हे माहित नव्हत.
झक्की तुम्ही जे म्हणताय क्रोधादी विकारांमुळ हे होत नसुन "जेलसी" मुळ होत अस मला वाटत. किंबहुना तुमच्या संपुर्ण पोस्ट मध्ये वरती काय लिहिलय त्या पेक्षा तुम्ही काही तरी वेगळच लिहिलय अस वाटल. Happy

छान माहिती दिली आहे. आवडली.

झक्की, अहो इथे कशाला लिहीताय ते.. अंधश्रध्देच्या बीबीवर लिहा.

>>सांघिक काम- टिमवर्क- हे जितके सोपे वाटते तितकेच अवघड असलेले एक कौशल्य
>>अगदी खरे. मस्त जमलाय लेख.
उदाहरणेही विचारात पाडणारी.

"जेलसी"

या मराठी शब्दाला मत्सर असा दुसरा प्रतिशब्द पूर्वी वापरला जात असे. काम, क्रोध, मद, मत्सर इ. यादीत त्याचे नाव आहे. हे सर्व दुर्गुण एकत्र असतात आपल्या मनात. त्यांचा रिझल्टंट (तो बहुधा व्हेक्टर सम करून मिळतो) काय असेल त्याप्रमाणे वर्तन होते.

जाऊ दे. सांतिनो म्हणतो ते खरे आहे. तशी चर्चा इथे नको. आता आपण
<<"दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारणे" हाच तो कळीचा मुद्दा, ज्याला कैदयांचा पेच असे म्हणले जाते. मनोभ्यासक ह्या मनोवृत्तीचा बारकाईने अभ्यास करतात व त्याचा संबंध आपल्या रोजच्या आयुष्यात कसा लागू पडतात ते पाहतात. >>

यावर विचार करू. आशा आहे की पॅलेस्टाईनचा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न इ. गोष्टी अश्या तर्हेचे मॉडेलिंग करून सुटतील. पण मग तसे का करत नाहीत बरे? चार नाहीतर दहा पर्याय असतील, पण संगणक आहेतच, चिंता कसची?

मला वाटते, अमेरिका रशिया यांच्या मधे मागे असेच काहीतरी विचार करून अणूशस्त्रसंख्या कमी करण्यात आली नि अण्वस्त्रकरार करण्यात आला. पण चीन, भारत, पाकीस्तान, इराण त्याला मान्यता देत नाहीत. का बरे?

जागतिक प्रदूषण कमी व्हावे म्हणून अमेरिकेत बरेच निर्बंध आहेत, जरी त्यांनी क्योटो करार मंजूर केला नाही तरी. मग चीन व भारत यांना ते का लागू पडत नाही?

थोडक्यात जिथे अश्या उच्च बुद्धिमत्तेची गरज आहे तिथे इतर अनेक राजकारणाशी, अर्थकारणाशी निगडित पर्याय असतात, जे खरे पर्याय नसून अजिबात बदल सहन होणार नाही असे असतात, थोडक्यात काँस्टंट.
कदाचित् हे प्रश्न सोडवण्यापेक्षा ते चघळत बसण्यात पुष्कळ लोकांचा फायदा होत असेल. नि जिथे हे लागू पडते तिथे कदाचित् भावनेचा प्रश्न उद्भवतो, जो संगणकात घालता येत नाही.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
झक्की, कोणतेही सोल्युशन रामबाण उपाय नसते; तसेच एकदा यशस्वी झाले तर पुन्हा होईल ह्याचीही शाश्वती नसते, हे तुम्ही जाणत असालच.

लेख आवडला. नवी माहिती मिळाली.

झक्की हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व वाटते. पण ह्याची खालील विधाने पटली नाहीत- किंबहूना त्यांचा पतिसादच अस्थायी वाटला.

>>पण जेथे संकुचित् स्वार्थ, अदूरदर्शीपणाचा अभाव जास्त असतो, तिथे या माहितीचा उपयोग होत नाही.
>>बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे मला जे बरोबर वाटते ते बरोबर, इतरांना वाटते ते चूक. त्यामुळे धर्माला आधी बुडवा. मग त्यांनी केला तसाच मनुष्यस्वभावाचा अभ्यास शास्त्रशुद्ध रीतीने करायचा. नि त्यातून कदाचित् त्यांनी सांगितलेलेच करायचे. पण मधल्यामधे रिसर्च ग्रँट मिळते ना, मग? याला म्हणतात बुद्धिप्रामाण्यवाद

ते अनेक प्रशन विचारतात पण त्यांना त्यांची मते तावातावाने का मांडायची आहेत ते कळले नाही.

<<खरे आहे. तुम्हाला नुकतेच कळले, >>
हे जरा टोकाचे झाले. माफ करा.

<<झक्की हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व वाटते.>> धन्यवाद. तुम्ही फार थोड्या लोकांपैकी एक आहात. असले काही लिहीलेत, तर इथे तुमची बरीच टिंगल होईल. माझी पण, पण मी लक्षच देत नाही.

मला असे म्हणायचे आहे की ज्ञान खूप आहे. ते वापरण्यात अडचणी येतात, त्या बहुधा मनुष्यस्वभावातील दोषांशी निगडित असतात. तर जोपर्यंत त्यावर उपाय निघत नाही, तोपर्यंत इतर उपाय पुरेसे यशस्वी होण्याची शक्यता कमीच.
<<मते तावातावाने का मांडायची >>
मला राग फार भर्रकन येतो, नि माझे मन वहावत जाते. तेंव्हा मला कळले की मी एव्हढा हुषार, पण केवळ या रागापायी माझे काही जमत नाही. नंतर कळले की बर्‍याच लोकांमधे असे दुर्गुण आहेत, ते नाहीसे केलेत, किंवा संयमात ठेवले तर जग जास्त सुखी होईल.