त्या दिवशी अचानक पंकजच्या आई सिटीलाईटच्या बाजारात दिसल्या. त्यानीच मला हाक मारली, म्हणाल्या, ” अरे संतोष ना तू कित्ती दिवसात आला नाहीस घरी तो.”
मी म्हणालो, “ येणारच होतो आई, एक दोन दिवसात. पंकजलाच भेटायला "
त्या म्हणाल्या, “ मग आजच ये कि, आत्ताच चल. मासे घेतलेत, जेवायलाच चल "
“ आलो असतो हो, पण आज जेवण शिजवायची माझी टर्न आहे. हि काय चिकन घेऊन निघालोय. तुमची झाली का खरेदी "मी उत्तरलो.
“ अरे हो झालीच, तेवढी कोथिंबीर घेते आणि निघते. पण तुला जरा वेळ आहे का, थोडं बोलायचं होतं" त्यानी विचारले.
“ हो आहे कि, काहि खास, पंकज कसा आहे आता ?"मी विचारले.
“ अरे हो त्याच्याचबद्दल बोलायचे होते, चल बस स्टॉपवरच बोलु, रविवार म्हणजे ८१ नंबर कमी असणार, नाहीतरी दहा पंधरा मिनिटे, वाट बघावीच लागेल " त्या म्हणाल्या.
“ माझे घर समोरच आहे, फ़क्त रस्ता क्रॉस करायचा आहे. तुम्हाला घरी नेले असते पण माझी तीन रुममेट्स अजुन उठलेही नसतील, बाहेरच्या रुममधेच असतील तिघे झोपलेले. म्हणुन लाज वाटते. “ मी ओशाळलो.
“ अरे असू दे, परत कधीतरी येईन. सध्या काय जॉब वगैरे करतोस का ?"त्यानी विचारले.
“ हो ना, जॉब आहेच शिवाय संध्याकाळच्या ट्युशन्सही घेतो, तेवढीच मदत होते घरी. आईला ते शाळेतल्या मुलांना खाऊ करुन द्यायचे काम अजुनही चालु आहे. आता थांबव सांगितले तरी ऐकत नाही ती. म्हणते तुझी कमाई तुला. धाकट्या भावाच्या शिक्षणाचा खर्च करतोस, ते खुप झाले, माझे हात पाय चालताहेत, तोवर काम करत राहीन. तुझे बाबा पण करतात मदत, बाजारहाट तेच करतात, मी फक्त शिजवते. आणि इतक्या वर्षाची सवय आहे ना, नाही त्रास होत मला "मी मन मोकळे केले.
“ छान संस्कार केलेत रे तूझ्यावर, लहान वयात जाबाबदारीची जाणीव झाली तूला. पण काय रे, अलिकडे तुझा आणि पंकजचा काहि कॉन्टॅक्ट नाही का ?"त्यानी विचारले.
“ त्याच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला आलो होतो ना आम्ही सगळे मित्र. त्या नंतर भेट नाही. मधे मी फोन केला होता, आम्च्या ग्रुपमधल्या कुट्टीच्या वडिलांची हार्ट सर्जरी झाली, त्यावेळी रक्ताची गरज होती, पंकजचा ब्लडग्रुप बी पॉझिटिव्ह असे मला वाटले होते, म्हणुन केला होता फोन. “ मी सांगितले.
“ अरे बी पॉझिटिव्हच आहे त्याचा ब्लडग्रुप. नव्हता आला को तो ब्लड डोनेट करायला ?"त्यानी विचारले.
“ आई, त्या ऑपरेशनच्या वेळी, फ़्रेश ब्लड हवे होते, म्हणुन केला होता फोन, तर तो म्हणाला होता कि त्याचा ग्रुप बी पॉझिटिव्ह नाही. पण कॉलेजच्या कार्डावर तर त्याचा तोच ग्रुप होता, याची आठवण करुन दिली तर म्हणाला, मला महिनाभरापुर्वी जॉंडिस झाला होता, म्हणुन माझे रक्त घेणार नाहीत. पैसे हवे असतील तर सांग " मी सांगितले.
“ जॉंडीस ? आणि पंकजला ? अरे काहितरीच काय ? “ त्यानी आश्चर्य व्यक्त केले.
“ आई तोच तर म्हणाला. आणि म्हणुनच त्याला बघायला येणार होतो मी. “ मी सांगितले.
“ संतोष, काहितरी सिरियस प्रकरण आहे. तू आजच ये. अलिकडे तब्येत खराब झालीय त्याची. नियमित बांबाबरोबर ऑफ़िसला जातो, पण बोलत नाही फारसा. मित्रमंडळीपैकी कुणाशीही बोलताना दिसत नाही. मी खुपदा विचारुन बघितले तर काही बोलत नाही. आता लग्नाचे बघायचे आहे त्याच्या.” त्या म्हणाल्या.
“ पण त्याला नक्की काविळ नव्हती झाली ना, मला असे का म्हणाला तो "मी शंका व्यक्त केली.
“ मलाही कळत नाही त्याने असे का सांगितले. काविळ नक्कीच नाही रे. रोज आम्ही एकत्र जेवतो. काविळ असती तर मला कळले नसते का त्याचे काहि प्रेमप्रकरण वगैरे आहे का ? तूला माहित असेल कदाचित "त्यानी विचारले.
“ छे आई, बहुतेक नसावे. तसे मला माहित नाही, पण पुर्वी प्रत्येक गोष्ट मला सांगायचा तो, कधी काही बोलल्याचे आठवत नाही. आणि दिवसभर आम्ही एकत्रच असायचो कि, गेले वर्षभरच काय तो संबंध नाही आमचा. “ मी म्हणालो.
“बघ बस आली. मी निघते, तु मात्र ये नक्की. रात्री जेवायलाच थांब. आणि माझी भेट झाली होती म्हणुन सांगू नकोस. सहज आलास म्हणुन सांग " असे म्हणत त्या निघाल्याही.
**********
मी पावणेतीनलाच पंकजच्या कॉलनीत शिरलो. या पॉश लोकॅलिटीत यायला जरा भितीच वाटते. यायचे तर पंकजसाठीच. मी दहा मिनिटे खालीच थांबलो, मग वर जाऊन बेल दाबली.
“पकु कोण आलय बघतोस का जरा” असा आतुन आवाज आला. दोन मिनिटानी पंकजनेच दरवाजा उघडला. नुकताच झोपेतून उठल्यासारखा दिसत होता तो. केस पिंजारलेले, डोळे लाल, डोळ्याभोवती काळे, आणि वजन पुरते कमी झालेले, असा अवतार होता त्याचा. मला बघुन तो खुपच खुष झाला, मिठीच मारायला पुढे आला पण मग त्याने फ़क्त हात हातात घेतला.
“आई संतोष आलाय. माझा मित्र. आणखी एक कप चहा ठेव्” तो ओरडला. मला बसायला सांगून तो आत गेला. आई आल्या, “ अरे संतोष. किती दिवसानी आलास ? घरी कसे आहेत सगळे. घरी गेला होतास का अलिकडे ?"
“ हो आई सगळे मजेत आहेत. आता जॉब करतो ना मी, म्हणुन येता नाही आलं. पंकज पण बिझी असतो ना हल्ली. “ मी उत्तरलो.
“ बिझी असलो तरी तुझ्यासाठी नाही रे. अगदी येणेजाणेच सोडलेस ते " आतुन पंकज ओरडला.
आई चहा घेऊन आल्या. म्हणाल्या, “ जेवतोस का रे, आज फ़िश फ़्राय केलय. तूला आवडतं ना ?"
“ आवडलं असतं आई, पण जेवण झालय माझं "मी उत्तरलो.
“ मग असं कर, रात्री जेऊनच जा. सगळं तयारच आहे. मी जरा मैत्रीणीकडे जाऊन येते. तूम्ही बसा दोघे. पकु, खायला करून ठेवलेय रे. आणि संतोषला जाऊ देऊ नकोस. मी येतेच आठपर्यंत. बाबांचा फोन आला होता. ते उद्याच येणार आहेत. “ असे म्हणत आई गेल्या.
आई गेल्यावर पंकज माझ्यासमोर येऊन बसला होता. केस वगैरे विंचरुन आला होता तरी चेहर्याची रया गेली होती. मी त्याच्याकडे बघतच बसलो. त्याने नजर खाली झुकवली, सहसा तो असे करत नसे.
“ काय रे, किती खराब झाला आहेस आजारी बिजारी होतास कि काय ?"मी विचारले.
“अरे तुला म्हणालो होतो ना कि मला टायफॉईड झाला होता म्हणुन " त्याने विचारले.
“ टायफॉईड ? तु तर जॉंडिस म्हणाला होतास "मी आश्चर्याने विचारले.
“ अरे हो तेच ते. मोठ्या आजारानंतर रक्त घेत नाहीत ना. पण कसे आहेत आपल्या कुट्टीचे बाबा कसं झालं ऑपरेशन ?"त्याने विषयच बदलला.
“ म्हणजे पंकज, खरे कारण ते नव्हते तर. तु येशील अशी खात्री होती मला. कुट्टीला तसा शब्द दिला होता मी. शेवटी माझा रुममेटच मदतीला आला. आणि कुट्टीचे बाबा आता खुपच बरे आहेत, तुझ्यावाचुन तसे अडले नाही. “ मी दुखावलो होतो.
“ तसे माझ्यावाचुन कुणाचेच अडणार नाही रे. तुझेही नाही अडत. भेटायलाही येत नाहीस आता. उद्या एकदम पंकजला खांदाच द्यायला येशील बहुतेक " सांगताना त्याचे डोळे पाणावले होते.
“ अरे काय बोलतो आहेस. एकतर तु माझ्याशी खोटे बोललास. त्याबद्दल काहि बोलत नाहीस, आणि दुसरेच फाटे फ़ोडत बसला आहेस. कसल्या मरायबिरायच्या गोष्टी करतो आहेस. आता तर तुझे लवकरच लग्न होईल. बाबा तर तुझ्या वाढदिवसालाच तसे बोलले होते. “ मी पण गाडी वळणावर आणायचा प्रयत्न करत होतो.
“ लग्न. हं. मी नाही लग्न करु शकणार. मरुनच जाईन बहुतेक लवकरच. “ असे म्हणत तो एकदम रडुच लागला.
हि सिच्युएशन कशी हाताळायची तेच मला कळत नव्हते. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्याने एकदम अंग आक्रसुन घेतले. गुडघ्यात मान घालुन रडु लागला.
थोड्या वेळाने तो शांत झाला. मग म्हणाला, “ मला माफ़ करशील ना ? मी आता लवकरच मरणार आहे. “
“ अरे काय झालय तुला, जॉंडिस आणि टायफॉईडने कुणी मरत नाही. तु गेला होतास का डॉक्टरकडे ? चल आता जाऊ या. चल तयार हो " मी त्याच्या हाताला धरुन उठवले.
“ आता उपयोग नाही. मला एडस झालाय "त्याने वर बघत सांगितले.
माझ्याच नकळत मी त्याच्यापासून दूर झालो. क्षणभर काय बोलावे तेच मला सूचत नव्हते. त्याची नजर पुर्ण मेली होती तरी तो माझ्याकडे अपेक्षेने बघत होता.
मिनिटभराने मी भानावर आलो. “ अरे धीर सोडू नकोस. आहेत उपचार यावर, तूझे आईबाबा तूझ्यासाठी हवा तेवढा खर्च करतील. पण मला सांग तु कुठे चेकप केलेस. टेस्ट वगैरे केली होतीस का. “
“ नाही टेस्ट नाही केली, पण माझ्या हातून नको ते घडलेय, आता टेस्ट करायची पण भिती वाटतेय. “ त्याने उत्तर दिले.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तो एकदम आत पळुन गेला. मला खुणेनेच म्हणाला, बाहेर कोण आलेय ते बघ, मी नाही असे सांग.
मी दार उघडले तर दारात फ़ुलपूडीवाला उभा होता. पुडी देऊन तो गेला.
मी दार बंद करुन पंकजला बाहेर बोलावले. त्याला म्हणालो, “ चल जरा बाहेर फ़िरुन येऊ, तुला मोकळेपणी बोलता येईल. आईसाठी चिठ्ठी लिहुन ठेव. “
तो म्हणाला, “ तूच लिही, तूझे अक्षर छान आहे. “
आम्ही दोघे बाहेर पडलो. जरा दूरवर जाऊन बसलो. या भागात रहदारी नव्हतीच. एका झाडाच्या सावलीत बसलो.
बराचवेळ तो काहिही बोलला नाही. मग मीच म्हणालो, “ अरे बोल ना. मला सांगितल्याशिवाय कसे कळणार
“ काय बोलु त्याचाच विचार करतोय. आपण कधी या विषयावर बोललो नाही ना " तो चाचरत म्हणाला.
“ या विषयावर म्हणजे आपण आठवीपासून एकमेकाना ओळखतोय. “ मी म्हणालो.
“ ते खरं आहे पण आपण कधी मुली, सेक्स अश्या विषयांवर बोललो नाही. तुला या भावना नाहीतच का?" त्याने मला एकदम बुचकळ्यातच टाकले.
मला सावरायला जरा वेळच लागला. मग मी म्हणालो, “ अरे सारखेच तर वय आहे आपले. या भावना नैसर्गिकच असणार. मी तरी त्याला कसा अपवाद असणार ? पण तेवढी उसंत मला मिळाली नाही. प्रकाशच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. अजुनही तीनचार वर्षे मी लग्नाबिग्नाचा विचार नाही करु शकत. पण तु का असे विचारलेस ?"
“ तू नेहमीच हा विषय टाळायचास. मला काहि जोक्स वगैरे तुला सांगायचे असत पण तुला आवडणार नाहीत, अशी भिती वाटायची.” तो म्हणाला.
“ मग ?" मला केवळ त्याला बोलते करायचे होते.
“ तुला चेतन माहीती आहे. तो बघ माझ्या बर्थडे पार्टीला आला होता. नाचला होता. “ त्याने विचारले.
“ हो आठवतोय, त्याचे काय ?"मी विचारले.
“ त्याचे बाबा आमचे टॅक्स कन्सल्टंट आहेत. एकदम बिंधास्त आहे तो. त्या दिवशी माझ्या बाबानी माझ्या लग्नाचा विषय काढला होता. “ तो म्हणाला.
“ हो आम्हाला जरा नवलच वाटले होते त्याचे. म्हणजे तू अजुन योग्य वयाचा झाला नाहीस असेच सगळे म्हणत होते. मी म्हणालो त्याच्या बाबांचा एस्टाब्लिश्ड बिझीनेस आहे. तोच तर त्याला बघायचा आहे, मग काय हरकत आहे ?“ मी उत्तरलो.
“ हो तसाच विचार केला होता, बाबानी. पण तूला वेगळेच सांगायचे होते. त्या दिवशी रात्री मला चेतन, वरळी सीफ़ेस वर घेऊन गेला, गाडीत बसूनच त्याने माझी फ़िरकी घेतली. आता तूला लायसन्स मिळाले, फ़्लर्ट कर, डेटिंग कर असे म्हणायला लागला. “ तो म्हणाला.
“ मग," पुढे मी विचारले.
“ मला त्याचे बोलणे आवडू लागले. मग मीच त्याला एकदा म्हणालो, कि तु नुसता बोलबच्चन आहेस. काहि एक्स्पीरियन्स आहे का तर तो एकदम मोठ्याने हसायलाच लागला. म्हणाला, तूला हवाय का एक्स्पीरियन्स. चल घेऊन जातो तुला. आणि तो खरेच मला घेऊन गेला. “ तो सांगत होता.
“कुठे" मी विचारले.
“ नक्की आठवत नाही. बहुतेक कुलाब्यातली जागा होती. बाहेरुन काही वेगळे दिसत नव्हते. आत मात्र अगदी सिनेमात असते तशी सजावट होती. बरीच क्राऊड होती. खुप चिकन्या मुली होत्या. त्यातल्या एकीची मला चेतनने ओळख करुन दिली. म्हणाला इसको सबकुछ सिखना है, सिखाओगी क्या ? तर ती मादक हसली, काय बोलली ते आठवत नाही. माझ्या गालाचा तिने किस घेतला आणि माझ्या खिश्यात तिने एक व्हीजीटिंग कार्ड टाकले. “ तो सांगत होता.
“ बरं पुढे ?"मी विचारले.
“ माझे सगळे शरिर तापू लागले, घामही फ़ुटला. मला तिथे क्षणभर उभे राहवेना, मी तसाच मागे वळुन धावत सुटलो. दिसली ती टॅक्सी पकडली आणि घरी आलो.” त्याला सांगतानाच धाप लागली.
“ अरे एवढेच ना ? त्यानेच का एवढा घाबरून गेला आहेस ?" मला जरा नवलच वाटले.
“ नाही एवढेच नाही. त्या नंतर दोन दिवस मला रात्रीची झोपच लागली नाही. सारखा तिचाच विचार करत असे मी. तिचे कार्ड माझ्याकडे होते, एकदा रात्री तिला चोरुन फोन केला. दुसर्या दिवशी दुपारी घरी कोणी नसणार हे मला माहित होते, मी तिला दुपारी घरी ये म्हणुन सांगितले.
ती आली.” तो सांगत होता.
“ पंकज मला वाटतय माझ्या लक्षात आलेय. आपण डॉक्टराना भेटु या का ?"मी सूचवून बघितले.
“ हो मला पटतय पण मला लाज वाटते. “ त्याला अजुन संकोच वाटत होता.
“ चल मी आहे बरोबर, मी इथे येताना एक क्लिनिक बघितले होते. एम डी डॉक्टर आहे, चल जाऊ या. पैसे आहेत ना तुझ्याकडे ? "मी त्याला उठवलेच.
“ चल. “ तो कसाबसा तयार झाला.
डॉक्टरकडे फ़ारशी गर्दी दिसत नव्हती. कन्सल्टिंग रुममधे पण पंकज एकटा जायला तयार नव्हता. आधारासाठी त्याने माझा हात धरून ठेवला होता. मलाच संकोचल्यासारखे होत होते, पण त्याच्यासाठी मी धीराचा देखावा करत होतो.
डॉक्टरानी क्लिनिकल तपासणी केली. तसे ते म्हणाले कि काळजीचे कारण नाही, पण एलायझा टेस्ट केली तर बरी. त्यानी काहि टॉनिक्स लिहुन दिली आणि एका लॅबचा पत्ता दिला. आम्ही बाहेर पडलो, अजुन पाचही वाजले नव्हते.
“ मी नाही ती टेस्ट करणार " पंकजने परत हातपाय गाळले. खरे तर मला पण त्या लॅबमधे जायला संकोच वाटत होता. शिवाय ती लॅब, पंकजच्या घराजवळच होती, तिथे कुणी बघितले असते तर. त्यालापण तिच भिती असावी.
मग एकदम माझ्या लक्षात आले. “ अरे आपण जवळच्या ब्लड बॅंकेत जाऊ शकतो. मी येताना एक बॅनर बघितला होता. हल्ली प्रत्येक डोनरचे स्क्रीनींग करतात. हवे तर खोटे नाव सांगू. “ मी म्हणालो.
तो त्याला तयार झाला. नाव न सांगता त्याला टेस्ट करता येणे शक्य होते.
* * * * *
मी दुसर्या दिवशी, संध्याकाळी त्याच्या घरी फोन केला. आईनेच फोन घेतला. मी काहि विचारायच्या आधीच त्या म्हणाल्या, “ अरे संतोष काय जादु केलीस रे ? आमचा पकु, दुपारपासून छान बोलायला लागला. उद्या एक मुलगी बघायला जाणार आहोत. त्याला पण तयार झालाय तो. तुझे उपकार आहेत रे आमच्यावर. “
“ काहीतरीच काय आई, मित्र कशाला असतात मग. “ मी उत्तरलो.
समाप्त.
भिती
नेहमीप्रमाणे छानच लिहिली आहे कथा. काहीजण उगाचच फार घाबरतात. बाकी मित्राची भुमिका ऊत्तम पार पाडलीत.
मस्त आहे ....
मस्त आहे .... साधी आणि आटोपशीर....
:(
दिनेशदा, ही कथा 'तुमची' वाटली नाही. एकदम फिकी फिकी वाटली. कथेतून एक काऊन्सेलिंग टाईप अनुभव मिळेल असं वाटलं होतं पण निराशा झाली.
समुपदेशन
मंजु.
कथेतला मित्र त्याच्याच वयाचा आहे. त्यामुळे त्याच्या तोंडी समुपदेशन शोभले नसते. तो केवळ मार्ग सुचवू शकतो. म्हणुन मी स्वतःला आवरते घेतले.
तरीही....
संतोष जरी पंकजच्या वयाचा असला तरी तो सुजाण आणि सदसदविवेक बुद्धी जागृत असणारा आहे तो समुपदेशन का नाही करू शकत? पंकजच्याच वयाचा चेतन त्याला 'या' मार्गाची ओळख करून देतो. पंकजला न्यूनगंड आला आहे. आणि एक मित्र म्हणून संतोष त्याच्या मनात डोकावून बघायचा प्रयत्न करतो आहे. एवढंच ह्या कथेवरून स्पष्ट होतंय.
पण
संतोषला पण हे कसे फेस करायचे ते कळत नाही. त्याला त्या त्या वेळी जे सुचलं ते तो सूचवतोय. खरे समुपदेशन त्या डॉक्टरनेच केले असावे. पण ती भाषा मला इथे वापरता आली नसती.
एक मित्र म्हणुन त्याला समजुन घेणे महत्वाचे. मित्र म्हणुन तो त्याला जाणकार व्यक्तिकडे घेऊन जातोय. एक मित्र म्हणुन तो त्याची गुपितं जपतोय. त्याचा तिरस्कार करत नाही. होईल तितकि साथ देतोय. असा समजदार मित्र भेटला तरी पुरेसे असते.
नाही का ? बघुया बाकिचे काय म्हणताहेत.
मित्र
दिनेशदा , कथा खूप आवडली... एक मित्र म्हणून मी सुद्धा बरेच वेळा फक्त आधार द्यायची भूमिका करतो. प्रत्येक वेळी, प्रत्येक कारणासाठी समुपदेशन जमतेच असं नाही.
छान साधी
छान साधी सोपी आहे रे पण शेवट एकदम cut short वाटला शिवाय अनेक प्रश्ण अनुत्तरीत राहतात.. तू जरी doctor च्या भूमिकेतून लिहू शकत नसलास तरी काहीतरी conclusive शेवट कथेसाठी आवश्यक वाटतो.
योग
नमस्कार योग,
कुठला प्रश्न अनुत्तरीत राहिला ते जरा सविस्तर लिहिणार का.
माझ्या मनात काय होते ते लिहितो.
संतोष भेटायला आल्यावर, पंकजला मिठी मारावेशी वाटते पण तो ते टाळतो, त्याला अर्थातच खुप अपराधी वाटतेय, पण डॉक्टरच्या क्लिनिकल तपासणीच्यावेळी, म्हणजे ज्यावेळी, अत्यंत नाजुक आणि खाजगी प्रश्न विचारले गेले असतील त्यावेळी मात्र त्याने संतोषचा हात धरुन ठेवलाय. म्हणजे त्याचा संकोच संपला आहे. ( ह्या तपासणीबद्दल वा त्यावेळी विचारल्या गेलेल्या प्रश्नाबद्दल मला लिहिता आले असते पण ते इथे गैर ठरले असते. )
त्याच्या शरिरावर झालेला परिणाम केवळ मनातल्या मनात कुढल्यामुळे झालाय. प्रत्यक्ष स्क्रीनींगमधे तो धोकादायक ठरला नाही, त्यामुळे त्याच्या मनातली लग्नाबद्दलची भिती गेली आणि तो मुलगी बघायला तयार झाला. केवळ एका मित्राच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले, म्हणुन हे शीर्षक.
अगदी त्याच वयाचा असूनदेखील, संतोष त्याचा 'तो' अनुभव ऐकु शकत नाही. त्यालाही संकोच वाटतोच. पण तरिही त्याच्या कुवतीनुसार तो उपाय सूचवतो. नुसते सूचवत नाही तर त्याला ते उपाय करायला भाग पाडतो. शिवाय त्याचा पाठपुरावादेखील करतो. वरती अपुर्वने लिहिल्याप्रमाणे, आपल्या कुवतीबाहेरचे सल्ले तो देत नाही पण जाणकार व्यक्तीपर्यंत जायचा मार्ग दाखवतो.
पण
पण मग पंकजला एडस झाला होता की नव्हता शेवटी?
कथा आवडली पण शेवटी कापल्यासारखी वाटली. काहीतरी राहून गेलं असावं अशी.
- अनु
आवडली कथा
मला वाटते ऐड्स नसतो. तो फक्त घाबरत असतो.
एच आय व्ही आणि एड्स
गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदात्यांची नियमित छाननी केली जाते. त्यामूळे या मार्गाने एड्सचा प्रसार सहसा होत नाही.
इथे पंकज केवळ याच कारणासाठी म्हणजे अशी चाचणी करण्यासाठी म्हणुन रक्तदान करायला गेला असावा.
प्रथमदर्शनी जर दाता अशक्त वाटला, पंडूरोगी म्हणजेच एनिमिक वाटला तरीही रक्त घेत नाहीत. या सगळ्यातून तो पार पडला.
त्याचे सर्व गैरसमज दूर झाले.
पुर्वी या एच आय व्ही टेस्ट्स खुपच खर्चिक होत्या. आता त्या सरकारतर्फे मोफत केल्या जातात. पण तरीही मुद्दाम जाउन कुणी टेस्ट करत नाही. ( कारण शंका असली तरी लाज वाटते ) त्यावेळी हाही एक पर्याय आहेच. ( वाचकानासुद्धा अशी शंका आली, कारण याबाबतीत खुपच गैरसमज आहेत ) डॉक्टरानी खोलात जाऊन चौकशी केलीच असणार म्हणुन त्यानी टेस्ट करायच्या आधीच आपले मत दिले. पुर्ण खात्री असल्याशिवाय प्रशिक्षित डॉक्टर असे करणार नाही.
आपल्याला चावलेला साप विषारीच असावा अश्या धक्क्यानेच अनेकजण दगावतात तसाच हा प्रकार आहे. खुपदा एखादा वेगळाच न्यूनगंड ( इथे चोरट्या 'अनुभवाचा' ) या सगळ्याच्या मूळाशी असतो. त्यामूळे मनाने तो खचला आहे. यातून त्याला बाहेर काढणे महत्वाचे होते, ते काम मित्राने ( तज्ञ व्यक्तींच्या मार्फत ) केले.
हे ठीक आहे..
>>त्याच्या शरिरावर झालेला परिणाम केवळ मनातल्या मनात कुढल्यामुळे झालाय. प्रत्यक्ष स्क्रीनींगमधे तो धोकादायक ठरला नाही,
हे ठीक आहे... कथेत तसा उल्लेख आहे.. मि अन्दाज केला होता पण its not very obvious...असो.
मनाला
मनाला झालेला रोग दूर होणेच महत्वाचे असते..... डौक्टरांच्या देखील नुसत्या बोलण्यानेच निम्मे दुखणे पळते..... अंर्तमन मोकळे होणे ही सध्या काळाची गरज बनलीय.... छान कथा....
छान आहे गोष्ट.
अतिशय छान गोष्ट आणि छान मांडलीय.
अशाच आशयाची एक गोष्ट २००७ दिवाळी दक्षता मध्ये वाचलेली. त्यातला माणूस केवळ आपल्याला एडस झालाय (फक्त संशय, खरा झाला नसतोच), आपण मरणार, मग आपल्यामागे, बायकोमुले नामुष्कीला कशी तोंड देणार म्हणून त्यांना मारून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करतो.
माणसाच्या मनाचे कधीकधी खुप आश्चर्य वाटते. ख-या संकटापेक्षा संकटाच्या कल्पनेने ते जास्त खचते आणि मग नको ते करते.
साधना.
छान
कथा छान आहे.
हअगदी
हअगदी योग्य आणि मोजक्या शब्दात फार sensetive topic हाताळलाय. समवयस्क मित्र हि भूमिका योग्य पार पाडलीय. फारच छान.
दिनेशदा,
दिनेशदा, अगदी कठिण विषय आहे. कुणा समवयस्क मित्राने नुस्तं "अरे, मी आहे बरोबर. चल.." असलच काही म्हणायची आवश्यकता असते अशा वेळी. तेच ह्या कथेत दिसतय.
दिनेशदा, जिथे कथा "बोलायला" हवी इथे, बोललीये आणि जिथे आळिमिळी हवी तिथे गप्प आहे.
माझ्यामते कथेत समतोल चांगला आलाय. जिथे तो डॉक्टअरांकडे यायला तयार झाला,आणि तो उपाय नाही तर निदान ब्लड टेस्ट करून घ्यायला तयार झाला इथेच त्याच्या बरं होण्याची सुरूवात झाली. माझ्यमते कथा इथे नक्की संपते. च्यापुढे मग भारूड होईल.... नाही?
दिनेशदा, अगदी कठिण विषय आहे.
दिनेशदा, अगदी कठिण विषय आहे. कुणा समवयस्क मित्राने नुस्तं "अरे, मी आहे बरोबर. चल.." असलच काही म्हणायची आवश्यकता असते अशा वेळी. तेच ह्या कथेत दिसतय.
दिनेशदा, जिथे कथा "बोलायला" हवी इथे, बोललीये आणि जिथे आळिमिळी हवी तिथे गप्प आहे.
माझ्यामते कथेत समतोल चांगला आलाय. जिथे तो डॉक्टअरांकडे यायला तयार झाला,आणि तो उपाय नाही तर निदान ब्लड टेस्ट करून घ्यायला तयार झाला इथेच त्याच्या बरं होण्याची सुरूवात झाली. माझ्यमते कथा इथे नक्की संपते.
>>>१