पांढरा फ्रॉक

Submitted by prachee on 13 February, 2008 - 04:48

चालता चालता शकु थबकली. तिची नजर 'त्या'वरुन हटेचना. किती सुंदर होता तो फ्रॉक..... पांढरा शुभ्र, त्यावर मोठीमोठी पिवळीधम्मक फुलं आणि मधे मधे रंगी बेरंगी फुलपाखरंही होती. ती भान विसरुन बघतच राहिली. हातातल्या सामानचं ओझंही जाणवेनासं झालं तिला.
"काय ग? काय बघते आहेस अशी?"
नीनाताईंच्या हाकेनी ती भानावर आली.
"अं.... काही नाही."
"चल तर मग. उशीर होतोय. आशु यायची वेळ झाली."
निघता निघता शकुनी त्याखालची किंमत वाचली. २...५....०...

२....५....०....म्हणजे किती असावेत बरं?

२...५...०...२...५...० घोकत घोकतच ती नीनाताईंच्या बरोबर घरी पोहचली.

"२...५...० म्हण्जे किती हो आशुभैय्या?" टिव्हीसमोर बसलेल्या आशुला तिनं विचारलं. हो, आशुभैय्या च तर शिकवत होता तिला लिहाय-वाचायला....चांगले १ ते १०० आकडे ओळखायला शिकली होती ती.
"२५०? म्हणजे दोनशे पन्नास."
"दोनशे पन्नास? नाही म्हणजे किती १०० झाले?
"हाहाहाहा..... किती १००? अगं दोन १०० आणि एक ५०.. कळलं?"

दोन १०० आणि एक ५०... बाप रे... कुठनं आणणार मी?

विचारांच्या तंद्रीतच शकुनी सगळी कामं उरकली. आणि ती घरी निघाली.

नाही म्हणायला मागिल महिन्यात आशुभैय्याच्या वाढदिवसाला नीनाताईंनी दिलेले १०० रुपये आहेत. पण उरलेले कुठुन आणायचे? पगारही सगळा बा च घेउन जातो नीनाताईंकडुन. काय करु? नवलाईच्या यात्रेलासुध्दा अजुन खुप दिवस आहेत. नाहीतर दरवर्षी नीनाताईं पैसे देतात यात्रेच्या वेळी. मागावे काय त्यांच्याकडे? पण मग बा ला कळलं तर सोडणार नाही तो.

रस्त्यात परत त्या दुकानाजवळ ती थबकली. आता काचेजवळ जाऊन तो फ्रॉक बघु लागली.

वा! किती छान आहे .... जर हा फ्रॉक मला मिळाला तर्...?रोज रोज तेच तेच जुनेपाने कपडे घालायचा कंटाळा आलाय... मला खुप पैसे मिळाले की मी खुपखुप नवे कपडे घेईन आणि तोर्‍यात फिरेन बाजारात.

"ए पोरे, काय करतेस इकडे.. चल चल घरी पळ बघु." दुकानदाराने तिला हटकले. शकुने मोठे मोठे डोळे करुन पाहिले त्याच्याकडे.

मला काय चोर समजलास काय? अरे, लवकरच घेउन यीन पैसे आणि हा फ्रॉक विकत घीन. बघच तु...

आख्खी रात्र शकुच्या स्वप्नात तो फ्रॉकच होता. तिने तो घातला होता आणि सगळे तिच्याकडे कौतुकाने बघत होते. सगळा बाजार फिरली ती. आणि त्या दुकानदाराने तिला हटकले नाही , उलट तिला अजुन फ्रॉक देऊ केले. मज्जाच मज्जा!!!!!

दुसरे दिवशीपासुन परत तेच रुटीन सुरु झाले. सकाळी लवकर घरची सगळी कामं उरकुन मग ती नीनाताईकडे जायची. रोज जातायेता त्या फ्रॉककडे तिचे लक्ष जायचे. अजुन तो तिथेच लावलेला होता. दिवसेंदिवस तो तिला अजुनच आवडु लागला होता. पण पैसे काही हातात येत नव्हते. परवाच नीनाताईंकडे आलेल्या पाहुण्यांनी तिला जाताना ५० रुपये दिले होते. पण अजुन एक १०० हवे होते. कुठुन येणार ते? पैसे जमा होईपर्यंत कदचित दुसरेच कोणीतरी विकत घेऊन जाईल फ्रॉक.

हिरमुसली शकु नीनाताईंकडे पोहचली.
आज घरातलं वातावरण जरा वेगळेच होते. सगळे गप्प्गप्प होते.

"अगं नीना असे कसे हरवले? तुला नीट ठेव म्हणुन सांगितले होते ना मी? ऑफिसचे होते ते पैसे. काय सांगु मी बॉसला? पैसे बायकोने हरवले?"
"अहो, पण मी काय मुद्दाम केलयं का? नेहमी जिथे ठेवते तिथेच ठेवले होते. आता कुठे गेले आणि कसे गेले...काय सांगु?
"आई, शांत हो. नीट आठवुन बघ. कुठे ठेवले होतेस तु?"
"अरे, कपाटातच ठेवते नेहमी. पहिल्यांदा का आणले होते यांनी पैसे घरी? "

इतक्यात नीनाताईंचे लक्ष शकुकडे गेले.

"शकु, आलीस? बरं झालं. आधी तांदुळ निवडुन दे मला. आतल्या मोठ्या डब्यातले काढुन घे."

शकु कामाला लागली. काहीतरी पैश्यांविषयी बोलणे चालल्याचे तिच्या लक्षात आले. पन हल्लि पैसे म्हटलं की तिला तो फ्रॉकच आठवत असे. ती परत आपल्या विचारांत गढुन गेली.

आतल्या कोठीच्या खोलीत जाऊन तिने तांदळाचा डबा उघडला. एक माप भरुन तांदुळ काढले आणि मोठ्या भांड्यात ओतले.
३-४ मापं तांदुळ काढले आणि एकदम ५व्या मापाला आवाज आला...'ठ्प्प..."
दचकुन शकुनं खाली पाहिलं तर्......तर.... भांड्यात एक मोठी नोटांची थप्पी....
शकुचे डोळे लकाकले....

पैसे...? इतके सारे पैसे..? इथे कसे आले? नीनाताईंना सांगु की नको?
नकोच... त्यांना तर वाटतंय की पैसे हरवले..... काय कळणार आहे मी हे असेच उचलले तर? मला तो फ्रॉक घेता येईल्...तो एकच का.....खुप सारे नवे कपडे घेता येतील.....
पण.....पण..... हे बरोबर नाही. हे पैसे माझे नाहीत. जर मी हे परत केले नाहीत तर चुकीचे ठरेल. बा नेहमी सांगतो...कष्टाने मिळवलेला पैसा हाच खरा असतो. असा पैसा नको आपल्याला...नको नको....

"ताई.... हे बघा..हे बघा मला काय सापडलं.."
"पैसे...? कुठे ...कुठे सापडले तुला.. अहो.... बघा पैसे सापडले."
"ते.... तांदळाच्या डब्यात्.. मी तांदुळ काढत होते तर त्यातुन पडले..."
"अगोबाई... असं झालं होय..."
"अगं पण तांदळाच्या डब्यात कसे गेले पैसे?"
"अहो, तुम्ही काल पैसे दिलेत तेव्हा तांदुळ काढायला गेले होते मी...पण फोन वाजायला लागला म्हणुन तशीच घाईघाईने परत आले...तेव्हा गडबडीत पडले असतील पैसे डब्यात."
"अशीकशी वेंधळी तु??? बरं ...पैसे तरी मिळाले..."
"हो बाई, मोठं बालंट येतायेता राहिलं...देवच पावला."
"अग्...शकुच देवासारखी धावुन आली.... शकु, अगदी मनापासुन धन्यवाद हो तुझे.."
"हो हो... शकु खरंच धन्यवाद..."
"आणि हो, हे घे तुला बक्षीस...."

साहेबांनी दिलेले १०० रुपये हातात घेताना शकुला खुप बरे वाटले. आता ती फ्रॉक घेऊ शकत होती. तोही तिच्या स्वतःच्या पैश्यांनी...

संध्याकाळपर्यंत तिचे मन थार्‍यावर नव्हते... कधी एकदा आपली कामं संपताहेत आणि आपण बाजारात जातोय असं झालं होतं तिला.... त्या खडुस दुकानदाराच्या तोंडावर आपण पैसे फेकतोय... आणि तो फ्रॉक घेऊन रुबाबात बाहेर पडतोय.... असे चित्र रंगवत रंगवत ती कामं करत होती.
पटापट कामं उरकुन ती निघाली.

आज जवळजवळ धावतच ती घरी निघाली. त्या दुकानाजवळ पोहचली....आणि....तो...तो फ्रॉक तिथे नव्हताच्......नाही...तो फ्रॉक तिथे नव्हताच्....

शकुला काही सुचेनाच....

आज सकाळी तर होता इथे...कुठे गेला?कोणी विकत तर घेतला नसेल....?

शकुच्या डोळ्यात भरभर पाणी साचुन आले.....गळ्यात काहीतरी अडकले....तिला रडुच फुटणार्...तेवढ्यात्...तेवढ्यात तिला तो दिसला.....

दुकानातुन एक छोटी मुलगी बाहेर पडत होती आणि तिच्या हातातल्या पिशवीतुन तो फ्रॉक डोकावत होता. शकु त्या मुलीच्या मागे मागे चालु लागली..

ती छोटी खुप खुश होती. बरोबर चालणार्‍या आईशी आनंदात काहीतरी बोलत होती.

शकुला काही सुचेना...

तो फ्रॉक.... तो मलाच मिळायला हवा. किती दिवस माझ्या मनात आहे तो.... आणि आता.... ही छोटी.... हिला दुसरा फ्रॉक नाही का मिळणार...? हाच का हवा आहे हिला?? नाही नाही..... मी नाही असा जाऊ देणार त्याला माझ्या हातातुन...

आणि तिरमिरीतच शकुने छोटीला धक्का दिला आणि ती फ्रॉकची पिशवी तिच्या हातातुन हिसकावुन घेतली.आणि क्षणभरही न थांबता तिने पळायला सुरुवात केली.

'कर्र्........कर्र्.......आई......."
गाडीच्या ब्रेक्स लावल्याचा आवाज आणि एक किंकाळी ऐकु आली....
शकुने घाबरुन मागे वळुन पाहिले तर..... छोटी... रक्ताच्या थारोळ्यात पडली होती....... शकुने मारलेल्या धक्क्याने छोटी रस्त्यावर पडली होती आणि मागुन येणार्‍या गाडीखाली.....................................

शकु पळत सुटली.........सरळ घरात येऊनच थांबली... अजुनही तिचे पाय लटपटत होते....ह्रदय जोरजोरात धडधडत होते......
बा अजुन घरी आला नव्हता..... शकुने हातातली पिशवी उघडली......'तो' फ्रॉक बाहेर काढला......पण...
पण आता त्यावर तिला पिवळीधम्मक फुले दिसत नव्हती, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसत नव्हती..... त्याजागी होते फक्त रक्ताचे डाग्.....पांढर्‍याशुभ्र फ्रॉक वर लालभडक....रक्ताचे डाग.

समाप्त.

गुलमोहर: 

आवडली गोष्ट .. पण वाईटही वाटलं वाचून .. एका लहान मुलीच्या हातून असं काहीतरी घडलं हे वाचून .. Sad

छान लिहिली आहे गोष्ट..
पण शेवट इतका ’रक्तरंजित’ हवा होता का? Sad

कथा विचार करायला लावणारी आहे...

खूप वाईट वाटलं ही कथा वाचून. ह्यापेक्षा त्या फ्रॉकसाठी शकूवर चोरीचं बालंट आलं असतं तरी चाललं असतं. पण शेवट असा नको व्हायला हवा होता.

किलबिल,

शेवट नाही आवडला. खूप वाईट वाटलं वाचून. त्यापेक्षा ते काकाच तिला तो फ्रॉक बक्षीस म्हणून घेऊन देतात असा काहीतरी शेवट केला असतास तर..... अर्थात हे आपलं माझं मत झालं.

पण फ्लो आवडला.

शेवट फारच वाईट झाला का?
पण दरवेळी शेवटी सगळं चांगलंच घडतं असं नाही. शकुला तो फ्रॉक हवा असतो, पण म्हणुन ती चोरी करत नाही. पण तरीही शेवटी तिच्या हातुन नकळत पाप घडतंच..... आणि याची बोचणी तिला लागुन राहते.

किलबिल, माफी कसली मागायची त्यात. तू लेखिका आहेस कथेची. कथा झालीयेही मस्त..... नकळतच, पण एवढ्याश्या शकूच्या हातून एवढं मोठं पाप घडलं त्याची फक्त रुखरुख लागली आम्हाला.

प्रत्येक गोष्ट आपल्याच नशिबात असे नाही. परंतू शकूलाही काय माहित पुढे असे घडेल.

नाही पटला शेवट.. एखाद्याच्या मृत्युची जिम्मेदारी एका लहान मुलीवर हे खुपच जास्त झाले. त्याची फक्त बोचणी नाही तर मनावर भयंकर परिणाम होऊ शकतो. आमच्याकडच्या मांजरीच्या पायला जखम झाली होती, तिकडे चूकन जरी हात गेला तरी ती पटकन पंजा मारायला बघायची. गम्मत म्हणून मी माझ्या भावाला तिच्या पायाला हात लावायला सांगितला, त्याला मांजर आवडत नाही, पण तो घाबरत नाही हे दाखवण्यासाठी लगेच तिच्या पायाला हात लावायला तयार झाला, तिने पंजा मारला आणि त्याच्या बोटातून रक्त येऊ लागलं. मी इतका घाबरलो, मला वाटलं होतं की तो लगेच हात काढून घेइल, पण तो बेसावध होता. जास्त काही लागलं नाही, पण मलाच फार वाईट वाटलं. इथे तर खून झालाय.

किलबिल, चांगली जमलीये गोष्टं. घटनांमधलं "नाट्य" जाणवतं, शिवाय किती आटोपशीर! इतकं संयमानं लिहिनं सोप्पं नाही. शेवटाचं म्हणशील तर... मला स्वतःला फार निगेटीव्ह शेवट करायला आवडत नाही.... पण ह्याचा अर्थं जगात सगळीकडे आलबेल आहे असा होत नाही Happy
एखाद्या गोष्टीचा हव्यास (शकूच्या वयाला हा शब्द ही किती "जड" आहे), माणसाला कुठे नेऊ शकतो...
ही गोष्टं तुझ्या कल्पनेतली असेल पण वास्तवात याहुनही भयंकर प्रकार घडताना दिसतात. तुझ्या गोष्टीचा शेवट करायची तुझी हातोटी... सुंदर.

प्रतिक्रियांसाठी सर्वांचे मनःपुर्वक आभार.

कथा त्याचा फ्लो खुप भावला ..
शेवट आवडला नाहि .. असे होउ शकते पण यातुन जो बोध मिळतो तो दुसर्‍या मार्गाने पण दाखवता आला असता असे वाटते..
सॉरी ..

पण मनापासुन कथा आवडली चित्र डोळ्या समोर उभे रहाते सगळे

---------- गणेशा

मी पाचवीला असताना मला एक कंपास पेटी पाहीजे होती , मी आई च्या पाकीटातुन २० रु. घेऊन बेदम मार खाल्लेल आठवल !
कदाचित त्या वयात एखादी गोश्ट हवी म्ह्टल तर मार्ग सापडत नसावा ...

अती मोहाचे फळ वाईट. कथेवरुन बोध ध्यावा.