कालप्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम...

Submitted by वरदा on 14 November, 2009 - 10:49

(टीपः हा लेख 'गाथासप्तशती' या नावाने हितगुज च्या २००२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. पण तिथे खूपच टायपो होते. परत एकदा इथे टाकतेय. तुम्हा सर्वांना आवडेल असं वाटतं.)

खरंतर माझा अभ्यासाचा मूळ विषय इतिहासपूर्वकालीन महाराष्ट्र. या संदर्भातले पुरावे गोळा करताना थोड्या नंतरच्या म्हणजे ऐतिहासिक काळाच्या सुरूवातीचा 'गाथासप्तशती' हा ग्रंथ अभ्यासणे प्राप्तच होते. गाथासप्तशती (प्राकृतातलं मूळ नाव 'गाहासत्तसई') हा महाराष्ट्रातला पहिला काव्यसंग्रह. महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिलेल्या २-२ ओळींच्या काव्यांचे (या काव्यांना गाथा असं म्हणतात) संकलन करून सातवाहन राजा हाल याने हा ग्रंथ संपादित केला. त्यातला विश्लेषणाचा, अभ्यासाचा भाग सोडूनही एक साहित्यकृती म्हणून हा ग्रंथ वाचताक्षणीच मनाला भावला. जितक्या वेळा परत वाचला तितक्यांदा जास्त जास्तच मनात उतरत गेला.
थोड्या दिवसांनी काही कारणाने प्राचीन तमिळ इतिहासाच्या एका पैलूचा अभ्यास करताना तमिळ संगम साहित्य वाचलं. प्राचीन काळात राजाश्रयाने एकत्र आलेल्या तमिळ विद्वानांच्या संघाने संकलित केलेलं विविध कवींचं हे तत्कालीन साहित्य. म्हणून संघम --> संगम. यातले सर्वात जुने ग्रंथ पत्तुपाट्टु (Pattupattu) आणि एट्टुत्तोकई (Ettuttokai) (यांचे 'खरे' तमिळ उच्चार मला माहीत नाहीत) वाचले आणि मला अचानक गाथासप्तशती/ गाहासत्तसई ची आठवण आली. एकमेकांच्या संदर्भात हे काव्यसंग्रह जास्त चांगले कळले, आस्वादता आले असं वाटलं. काम संपलं तशी तमिळ संस्कृतीवरची पुस्तकं मिटून बाजूला ठेवली आणि मूळ अभ्यासाकडे वळले. मात्र मनातून गाथा आणि संगम साहित्याचे जाणवलेले लागेबांधे, त्यांचं सौंदर्य आणि भारतीय इतिहासातील त्यांचं वेगळेपण काही जाईना. त्याचा माझ्यापरीने, माझ्या दृष्टीने घेतलेला हा धांडोळा.........

हे काव्यसंग्रह तसे समकालीन. म्हणजे इ.स. च्या १ल्या - २र्‍या शतकात गाथेच्या तर ३ र्‍या शतकाच्या आसपास संगम साहित्याच्या मूळ भागाचं संकलन व संहितीकरण झालं. यातली काही काव्यं थोडी आधीची आहेत तर नंतरही काही शतके यांच्यात तुरळक भर पडत गेली.

ग्रामीण कवींनी मूलतः त्यांच्याच लोकांसाठी रचलेलं हे लोकसाहित्य आहे. तत्कालीन व उत्तरकालीन अभिजात संस्कृत वाङ्मयापेक्षा एकदम वेगळं. या ग्रंथांची भाषा ही त्या काळच्या जनसामान्यांची भाषा आहे. जानपद संस्कृतीशी जीवनमूल्यांशी निगडित अशा या साहित्यरचना अत्यंत रसरशीतपणे जीवनानुभव रसिकांसमोर मांडतात.

या कवितांचा मुख्य विषय प्रेमभावना - शॄंगार हा आहे. इतर विषयांवर रचलेली काव्येही आहेत पण त्यांची संख्या खूपच कमी आहे.
हा शॄंगार विविध रूपात, परिस्थितीत फुललेला आहे. काही काव्ये सूचक आहेत तर काही अगदी मुक्तपणे कुठलाही आडपडदा न ठेवता शॄंगाराचे चित्रण करतात. नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी यांच्यातीलच नव्हे, तर दीर-भावजय, घरात एका रात्रीसाठी थांबलेला पथिक आणि घरातील सून, गृहिणी व तिचा जार, स्वैरिणी आणि तिचा/चे प्रियकर अशा अनेक नात्यांमधले प्रेमसंबंध आपल्याला गाथेत दिसतात. मात्र संगम साहित्यात पति-पत्नी, प्रेमी युगुल यांच्यातील संबंधांवर जास्त भर आहे. या नात्यांचे प्रेमाचे पदर कविकवयित्रींनी अगदी हळुवारपणे व मोजक्या शब्दांत उलगडले आहेत. एखाद्या प्रतिभावान चित्रकाराने कुंचल्याच्या चारदोन फटकार्‍यात आख्खं दृष्य कागदावर उमटवून दाखवावं तसंच काहीसं.....

बहुतेक काव्यांमधे, विशेषतः गाथेमध्ये, स्त्री केंद्रस्थानी आहे. नंतरच्या संस्कृत साहित्यातील नायिकांपेक्षा इथली स्त्री स्वतंत्र आचार-विचारांची वाटते. विरहार्ता, अभिसारिका, कुलवधू, मीलनोत्सुक प्रेमिका, स्वैरिणी, माता, सवत, सासू, सखी, प्रेमिकांची दूती अशा वेगवेगळ्या रूपांत ती सामोरी येते.

एके ठिकाणी पतिविरहाने दु:खी होऊन तो प्रवासाला गेल्याचे दिवस भिंतीवर एकेक रेघ मारून मोजताना, पहिल्याच दिवसांत काही तासांत रेघांनी भिंत भरून टाकणारी पत्नी आहे; तर कुठे नवर्‍यासमोरच दीरावर आडवळणाने प्रेम व्यक्त करणारी भावजय.
एका बाजूला सवतींची असूया आहे तर एकीकडे गतपत्नीच्या आठवणीने दु:खित होऊन घरी परत न येता शेतातच मुक्काम ठोकणारा शेतकरी आहे.
जशी दुसर्‍या दिवशी नवरा प्रवासाला जाणार म्हणून रात्र कधी संपूच नये अशी प्रार्थना करणारी गृहिणी आहे, तशीच प्रवासातून नवरा मधेच अचानक परतल्यावर घरी असलेल्या जाराची 'माझ्या माहेरचा माणूस' म्हणून नवर्‍याशी ओळख करून देणारी व्यभिचारिणीही!
प्रियकर समजून बेभानपणे बुजगावण्याला मिठी मारणारी तरुणी आहे आणि पापीदृष्टीच्या दीराला राम-लक्ष्मण-सीतेची गोष्ट सांगणारी भावजय आहे.
सुनेकडून काम करून घेणारी खाष्ट सासूही आहे, तशीच दारिद्र्यातही नवर्‍याचा व स्वतःचा स्वभिमान जपणारी गृहिणी पण.
कुठे गोष्ट सांगताना नवरा त्यातल्या सुंदर तरुणीचं वर्णन करतोय हे ऐकून असूयेनं हुंकार देणारी बायको आहे; आणि वसंतऋतूचे आगमन झाल्यानंतर स्वतःचा नवरा म्हातारा असल्याने गावातल्या तरुणांबरोबर स्वैरिणी व्हायचे नाही तर काय मरायचे का असा सरळसरळ प्रश्न विचारणारी तरुण घरधनीणसुद्धा!

आणि या सगळ्या नात्यांच्या खेळात पावलोपावली अनावरपणे भेटत, डोकावत रहातो तो निसर्ग! अनेकांगी रूपात. मीलनस्थळ ठरलेल्या साळीच्या, कपाशीच्या, तुरीच्या, तिळाच्या शेतात. गावाशेजारी अंधारी छाया देणार्‍या विशाल वडाच्या झाडात. खळखळाट करत वहाणार्‍या डोंगरनदीत आणि पुराने दुथडी भरून वहाणार्‍या गोदावरीत, नर्मदेत. आभाळच जणू उताणं पडलंय असं भासणार्‍या स्तब्ध तलावात. आणि नव्या पावसाने सावळ्या झालेल्या दिवसांत.
प्रेमाला उपमाही निसर्गातूनच येतात. ते कधी आकाशातून कोसळणार्‍या आणि लाल मातीत एकजीव होणार्‍या पावसासारखं असतं तर कधी प्रेमिक स्वतःलाच वादळाचा मेघ म्हणवून घेतो. कविला विंध्यपर्वतावरचे ढग कधी मिठाच्या पर्वतासारखे दिसतात तर कधी धुतलेल्या कापसाप्रमाणे. गवतावरला दवाचा थेंब पाचूच्या सुईत ओवलेल्या मोत्यासारखा भासतो आणि शेतात उतरलेला पोपटांचा थवा म्हणजे आकाशाच्या गळ्यातला माणिकपाचूंचा हार वाटतो.

संगम साहित्यात तर निसर्गाचे तत्कालीन तमिळकम (आजचा तमिळनाडू व केरळचा काही भाग) मधील भौगोलिक परिस्थितीनुसार, विविधतेनुसार ५ भाग पाडले आहेत. त्यांना तिणई असं म्हणतात. सुपीक शेतजमीन, चराऊ कुरणांचा गवताळ प्रदेश, जंगलं, समुद्रकिनारा आणि वैराण वाळवंटी शुष्क प्रदेश अशा या ५ तिणईंचे चक्क प्रेमातील वेगवेगळ्या भावावस्थेंशी नातं जोडलें आहे. आणि या काव्यसंकेतांच्या चौकटीतच काव्यरचना केलेली आहे

जसा तमिळ साहित्यात समुद्रकिनारा, जंगलं, शेतं, डोंगर यांच्याजवळ वसलेल्या गावांचा, वस्त्यांचा उल्लेख होतो, तसा गाथेत पुन्हापुन्हा भेटत रहातो तो गोदावरीचा काठ. नर्मदा आणि तापी नद्या. विंध्यपर्वत. घनदाट रानं. आणि या सगळ्या प्रदेशांत पसरलेली गावं.
तिथल्या गिरिग्रामाचं/ डोंगरगावाचं वर्णन करतान कवि तिथल्या वार्‍याने डोलणार्‍या बांबूंच्या बनांचं, गर्द पालवीच्या कुंपणांचं, दाट कदंबांच्या झाडांचं आणि पावसाने स्वच्छ धुतलेल्या दरडींचं चित्र रेखाटतो. तर कुठे अगदी सांदीकोपर्‍यात पडलेल्या 'कुग्रामाचं' वर्णन करताना ऐन हिवाळ्याच्या संध्याकाळी गावाबाहेरच्या पडक्या देवळापाशी शेकोटी पेटवून बसलेल्या एकाकी प्रवाशाचं. हिवाळ्यात अशी काकडून गेलेली गावं उन्हाळ्याच्या तापात दुपारी घरांची दारं मिटून घेतात आणि गावातल्या वडाखालच्या एकमेव न आटलेल्या आडातलं पाणी आळीपाळीने उपसतात. तर धुंवाधार पावसाने गावातले सगळे रस्ते चिखलाचे होतात आणि घरांच्या गळक्या छ्परांमधून पाऊस पाणी ओतायला लागतो.

जरी भौगोलिक दृष्ट्या व काही प्रमाणात सांस्कृतिकदृष्ट्या तमिळ व महाराष्ट्री साहित्यात फरक असला तरी कुठेतरी एका समान जानपद अनुबंधाशी त्याची नाळ जोडली गेली आहे हे वाचताना सारखं जाणवत रहातं.

ही सगळीच गावं शहरीकरणाच्या आधीच्या जमातींशी, आद्यजनांशी नातं सांगणारी आहेत. कुटंब आणि कुल यांच्या चौकटीत फिरणारं यांचं सामाजिक वास्तव आहे. रोजच्या जगण्याचाच उत्सव करणारी ही माणसं सामाजिक भेदाभेदांना फारसं स्थान देताना दिसत नाहीत. चातुर्वण्य-ब्राह्मणधर्माचा तर तिथे शिरकावच झालेला दिसत नाही. नाही म्हणायला क्वचित उपरेपणाने ब्राह्मणांचे उल्लेख येतात. तमिळकममधली गावं त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसारच शेती, शिकार, मासेमारी अशी उपजीविका करणारी, तर गाथेतल्या गावांमधे शेतकरी, भिल्ल, आभीर, व्याध असे वेगवेगळे लोक गुण्यागोविंदाने रहाताना दिसतात. दोन्हीकडे गावचा पाटील हाच गावाचा रक्षणकर्ता आहे. पीकपाणी खूप छान झालं, भरपूर शिकार मिळाली, दूधदुभतं भरपूर मिळालं की या लोकांची तृप्ती होते. लांबलांबच्या प्रवासाला गेलेले पुरुषही पावसाळ्यात गावाच्या ओढीनं परत येतात.

एका जानपद संस्कृतीचं असं उत्फुल्ल वास्तव या कवितांमधून प्रकर्षाने सामोरं येत रहातं. येत नाही ते त्यांच्या आजूबाजूचं वेगानं बदलणारं जग.

हा सगळाच समाज त्यांच्या नकळत एका फार फार मोठ्या ऐतिहासिक स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा आहे. मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर, इ.स.पूर्व १ल्या शतकानंतर सबंध भारतभर छोटी छोटी स्थानिक राज्ये आणि राजघराणी उदयाला येऊ लागली आहेत. महाराष्ट्रातले सातवाहन आणि तमिळकम मधले चोळ, चेर, पांड्य त्यातलेच. वाढत्या अंतर्गत व परदेशी व्यापारामुळे शहरीकरणाचे वारे दक्षिण आणि पश्चिम भारतात वाहू लागलेत. राजसत्तेची एक निश्चित यंत्रणा तयार होत आहे. सर्व गावं, खेडी आता एका सुनिश्चित शासकीय व आर्थिक व्यवस्थेची घटक बनली आहेत. आणि या सगळ्याबरोबरच हळूहळू पण अगदी पक्केपणाने ब्राह्मणधर्माने - चातुर्वर्ण्यव्यवस्थेने आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली आहे. या प्रक्रियेची दिशा वरून खाली, म्हणजे राजसत्तेकडून सामान्य जनतेकडे अशी आहे. शेतीलाही आता आस्ते आस्ते उपजीविकेच्या इतर साधनांपेक्षा - म्हणजे शिकार, पशुपालन, इ. - जास्त मह्त्त्व मिळू लागलंय. एक नव्या प्रकारची सामाजिक रचना मूळ धरू लागली आहे. मनुस्मृतीच्या लिखाणाचाही हाच काळ आहे. ब्राह्मणधर्म-चातुर्वर्ण्याधारित समाजपद्धती आणि स्थानिक जानपद संस्कृतीतली देवाणघेवाण सुरू झालीये.
इतिहास असं सांगतो की काही शतकं चाललेल्या या प्रक्रियेत शेवटी चातुर्वर्ण्याधारित समाजरचनेचं पारडं जड झालं. या अभिसरणाच्या सुरुवातीला तरी जानपद संस्कृतीला बरोबरचे स्थान असावं असं वाटतं. सातवाहनांची राजभाषा प्राकृत होती आणि तमिळ भाषेवर संस्कृत भाषेचे कुठलेच संस्कार झाले नव्हते. दोन्ही ठिकाणी या काव्यांना राजाश्रय आणि विद्वानांचं पाठबळ होतं. गाथेचं संपादन तर खुद्द सातवाहन राजा हाल यानेच कविंना प्रत्येक गाथेमागे एकेक सुवर्णमुद्रा देऊन केलं होतं. मात्र या जानपद परंपरेचा हा उतरणीच्या प्रवासापूर्वीचा शेवटचा मानबिंदू होता.

इ.स.च्या २-३र्‍या शतकापासून महाराष्ट्रात आणि ५व्या शतकानंतर तमिळकम मधे ब्राह्मणांना जमिनी व दानं द्यायचा प्रघात सुरू झाला. तोपर्यंत शहरीकरण, नवी राजकीय आणि शासकीय यंत्रणा घट्ट रुजली होती. या दानांमुळे प्रचलित ग्रामीण समाजरचनेचा पट तळापासून ढवळून निघाला. नव्याने जमिनी लागवडीखाली येऊ लागल्या. शेतीच्या वाढत्या प्रसाराबरोबर पर्यावरणाची विविधता कमी होऊ लागली. भारतीय संस्कृतीच्या मुख्य धारेत मिसळून जाताना या ग्रामीण जीवनात ब्राह्मणांच्या वसाहतीबरोबरच जातिवर्णाश्रमधर्माची पायाभरणी झाली आणि जानपद संस्कृतीवर या नव्या सामाजिक घडीनं वर्चस्व मिळवलं. कायमसाठी.

ही घटना काही अभूतपूर्व नव्हे. प्रत्येक समाजात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हे होतच असतं. काही प्रमाणात हे सगळं अटळही असतं. नव्याने उदयाला येणार्‍या परिस्थितीत जुने सांस्कृतिक, सामाजिक साचे टिकून रहातातच असं नाही. जिथल्या समाजात प्रथम चातुर्वर्ण्य निर्माण झाला तो गंगायमुनेच्या खोर्‍याचा प्रदेश सोडून भारतात बहुतेक सर्वच ठिकाणी अशी सामाजिक उलथापालथ झालेली असणार. मात्र अशा मूलगामी बदलांमधे जानपद संस्कृतींचे अनुबंध नामशेष झाले/ किंवा न ओळखता येण्याएवढे बदलले. त्यांची नोंद नव्या सांस्कृतिक अनुबंधांनी जाणतेपणाने घेतली असं काही आढळत नाही. एकमेव अपवाद म्हणजे या साहित्यकृती. संस्कृत, प्राकृत, तमिळ साहित्याचं स्वरूपही नंतर बदलतच गेलं. उत्तरोत्तर त्यातले धार्मिकतेचे रंग गडद होत गेले. आणि मनोरंजनात्मक साहित्य हे राजेराजवाडे-नगरवासी-श्रेष्ठी यांच्याभोवतीच फिरत राहिलं.

म्हणूनच भारतीय इतिहासात गाथासप्तशती, पत्तुपाट्टु आणि एट्टुत्तोकई यांना स्वतःचं असं एक खास स्थान आहे. काळाच्या ओघात वाहून गेलेल्या त्या युवतींच्या गावांची एकुलती एक आठवण म्हणून................
------------------------- X ---------------------------------

काही गाथा:
अमिअं पाउअकव्वं पढिउं सोउं अ जे ण आणन्ति |
कामस्स तत्ततन्तिं कुणन्ति ते कहँ ण लज्जन्ति? ||

(अमृतासारखे प्राकृत काव्य वाचणे किंवा ऐकणे ज्यांना माहीत नाही ते कामशास्त्रातील तत्त्वांची चर्चा मात्र करत असतात. त्यांना लाज कशी वाटत नाही?)

पाअपडिअस्स पइणो पुट्ठिं पुत्ते समारुहत्तम्मि |
दढ्मण्णुदुण्णिआए वि हासो घरिणीए णेक्कन्तो ||

(रागावलेल्या गृहस्वामिनीच्या पाया पडणार्‍या नवर्‍याच्या पाठीवर मुलगा/ पुत्र बसला. ते पाहून रागात असली तरी ती खुदकन हसली)

रन्धणकम्मणिउणिए! मा जूरसू, रत्तपाडलसुअन्धम |
मुहमारुअं पिअन्तो धूमाइ सिही, ण पलज्जइ ||

(हे सुगरणी, चूल पेटत नाही म्हणून तू रागावू नकोस. तुझ्या श्वासाला लाल पाटल फुलांचा सुगंध आहे. त्याचा स्वाद घेण्यासाठी अग्नी धूराच्या रूपाने तुझ्या मुखाभोवती घोटाळत आहे व मुद्दामच प्रज्ज्वलित होत नाही.)

उअरि दरदिट्ठथण्णुअणिलुक्कपारावआणँ विरुएहिं |
णित्थणइ जाअवेअणँ सूलाहिण्णं व देअउलम ||

(पडझड झालेल्या, कळस कोसळलेल्या देवळावर पारवे घुमत आहेत. जणू शूलाने भेद केल्यामुळे पारव्यांच्या रूपाने देऊळच स्फुंदत आहे)
इथे मला बालकवींच्या कवितेची फार तीव्रतेने आठवण आली म्हणून ही गाथा दिलीय...
'भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांत गीत गातो.....'

जं जं सो णिज्झाअइ अंगोआसं महं अणिमिसच्छो |
पच्छाएमि अ तं तं इच्छामि अ तेण दीसन्तम ||

(माझ्या ज्या ज्या अवयवांवर त्याची दृष्टी स्थिर होते तो तो झाकून घेण्याचा मी प्रयत्न करते. तरीही तो त्याला दिसावा अशीच माझी इच्छा असते)

वाएरिएण भरिअं अच्छिं कणउरउप्पलरएण |
फुक्कन्तो अविइह्णं चुम्बन्तो को सि देवाणम ||

(कानावरील कमळातील पराग वार्‍यामुळे तिच्या डोळ्यात गेले. ते काढण्यासाठी डोळ्यात फुंकर घालण्याच्या निमित्ताने तू तिचे पुनः पुनः चुंबन घेत आहेस. तू धन्य आहेस!)

पउरजुवाणो गामो महुमासो जोअणं पई ठेरो |
जुण्णसुरा साहीणा असई मा होउ किं मरउ? ||

(गावात पुष्कळ तरुण आहेत, तिचा नवरा म्हातारा आहे, वसंत ऋतू आलाय, तिच्याकडे जुनं मद्य आहे. अशा अवस्थेत तिने स्वैरिणी होऊ नये तर काय मरावे?)

तस्स अ सोहाग्गुणं अमहिलसरिसं च साहस मज्झ |
जाणइ गोलाऊरो वासारत्तोद्धरत्तो अ ||

(महिलांचे ठायी सहसा आढळणार नाही असे माझे साहस आणि त्याचे सद्भाग्य ही दोन्ही गोदावरीच्या पुराला आणि पावसाळ्यातल्या मध्यरात्रीला माहीत आहेत.)

संगम साहित्यातल्या काही कविता :

१. With drops splattering
as they fall from the loud-voiced clouds,
the rains have started on the lovely meadows.
We will play in the new water
that brings desire.
You whose hair is long and dark, come quickly.

२. The way your lover went
is beautiful
On large hills with lovely colours,
peacocks have forms
colored blue sapphire

३. The way your lover went
is beautiful
In the cool rain and hail,
jasmine blooms white.

४. The sky covered with clouds and lightning roars
resplendent with the monsoon.
Green jasmine creepers blossom with the season
and herders with many cattle
weave them into garlands of flowers and leaves.
Tell me, unfeeling bard,
does the land where he has gone
have such lovely evenings?

५. Descending from a great hill,
a waterfall resounds in rock caves
on flowering slopes
near the small village of the mountain man,
father of a girl with rounded arms.
Her beauty gentle as water
has ruined my firelike strength.

६. Like thickened darkness,
cool moist shadows
lie on sand as white as gathered moonlight.
With its black-branched punnai trees
the flowering grove is empty.
Still he does not come,
but the boat draws near
of my brothers who search for the fish.

७. The sun goes down and the sky reddens, pain grows sharp,
light dwindles. Then is evening
when jasmine flowers open, the deluded say.
But evening is the great brightening dawn
when crested cocks crow all through the tall city
and eveing is the whole day
for those without their lovers.

संदर्भ, further Readings, etc.:

१. हालसातवाहनाची गाथासप्तशती. (संपा.) स. आ. जोगळेकर

२. 'The Poems of Love and War' A. K Ramanujan (OUP)

3. 'The Interior landscape' A. K. Ramanujan

4. 'Poets of the Tamil Anthologies' George L. Hart III (Princeton Univ Press)

गाथेचा राष्ट्रिय संस्कृत संस्थानाने केलेला संस्कृत अनुवाद आणि संस्कृतमधे त्यावर केलेली चिकित्सा व भाष्य याची लिंक टाकतेय. ज्यांना संस्कृत वाचायला आवडेल त्यांच्यासाठी. इथे मूळ प्राकृत गाथाही दिल्या आहेत.
http://www.sanskrit.nic.in/DigitalBook/S/SanskritGatha.pdf

गुलमोहर: 

सुंदर लिहिलं आहेस गं वरदा..... छान झालाय धांडोळा! मला आपल्या पाइयप्पहा वर्गांची आणि त्यातील सुरेख, मोजक्या प्रभावी शब्दांत रेखाटलेल्या प्राकृत कथांची आठवण करून दिलीस! Happy

धन्यवाद, अकू, दिनेशदा आणि मामी.
दिनेशदा, काव्यं टाकायला हवी होती हे खरंय पण आत्ता माझ्याजवळ मूळ पुस्तकं हाताशी नाहीत. जरा वेळ झाला की टाकते. Happy

वरदा, अगं मला गाथेतील मूळ प्राकृत काव्यपंक्ती मिळाल्या नाहीत, पण विकीवर दोन-तीन गाथांची भाषांतरे मिळाली. Happy ही बघ :

१. Mother
with the blink of an eye
his love vanished
A trinket gets
dangled
into your world
you reach out and it's gone

—Hala, tr. Schelling

२. Lone buck
in the clearing
nearby doe
eyes him with such
longing
that there
in the trees the hunter
seeing his own girl
lets the bow drop

—Anonymous, tr. Schelling

३. I have heard so much about you from others
And now at last I see you with my own eyes.
Please, my dear, say something
So that my ears, too, may drink nectar.

—Unknown, tr. Peter Khoroche and Herman Tieken

http://en.wikipedia.org/wiki/Gatha_Saptashati

आणि ही गाहा सत्तसईची अजून एक लिंक : http://www.sub.uni-goettingen.de/ebene_1/fiindolo/gretil/2_prakrt/halsat...

गाथासप्तशती हा महाराष्ट्रातला पहिला काव्यसंग्रह >>>
मला थोडेसे कंफ्युजन आहे...
मराठी चे आद्यकवी मुकुंदराजच आहेत ना??
ईथे तुम्ही लिहीले आहे की हा काव्य संग्रह महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहे..

माझे ज्ञा ईतिहासाच्या बाबतीत कच्चे आहे.. त्यामुळे ह्या गोष्टीवर काही प्रकाश टाकावा..

बाकी लेख ऊत्तम आहे . Happy

छान माहिती... राजघराणी वै माहिती होती पण त्या काळच्या जनसामान्यांची अशी ओळख कोणीच करुन दिली नव्हती...

जबरदस्त! असं सकस, विचारप्रवर्तक विश्लेषण वाचायला मिळाले की मस्त वाटते. धन्यवाद.
साहित्य आणि समाजाचा परस्पर संवाद उत्तमप्रकारे रेखाटला आहे.

या ओळी वाचून किती सहजपणे ती दृष्यं डोळ्यापुढे उभी राहतात नाही ? आणि दोन ओळीत सर्व काही आले. पुढचे मागचे संदर्भ आपोआप जूळत जातात.

वरदा, धन्यवाद! इतकं सुंदर आणि रसरशीत ताजं वाटणारं लेखन, दिलं आहेस... या गाथा कोणत्याही काळात आधुनिकतम ठरतील, यात काय संशय! मस्त! मस्त! मस्त! केवळ या गाथांसाठी प्राकृतचा अभ्यास करावा वाटतोय. सुरुवात कुठून करावी सांगशील का?

ज्योति, गोव्यात कुठे सोय आहे माहित नाही..
मी प्राकृत पुण्यातच शिकले (त्यालाही अनेक वर्षे झाली म्हणा..). इथे पुणे विद्यापीठाचे कोर्सेस आहेत. सन्मति तीर्थ म्हणून एक जैन संस्था आहे, ते चालवतात विद्यापीठाचा अभ्यासक्रम. आणि दिल्लीत दर उन्हाळ्यात एक इंटेन्सिव कोर्स असतो प्राकृतचा असं ऐकिवात आहे.. नाहीतर जर संस्कृत थोडंफार येत असेल तर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची अर्धमागधीची पाठ्यपुस्तकं घरी आणून स्वतःच अभ्यास करणं असाही एक पर्याय असू शकतो

अकु, मस्त आहेत ना गाथा? मलाही आपल्या प्रत्येक शनिवारी प्राकृतच्या तासासाठी केलेली 'साहसी' यात्रा आठवली आणि त्याचे फळ म्हणून पदरात पडणारे रसाळ साहित्यवेचेही! Happy

रसपूर्ण, रेखीव, कधी आडवळणाने, संकेताने तर कधी सरळसरळ संदेश देणार्‍या या गाथांचा रसाळपणा, त्या काळाच्या संदर्भातील त्यांचे महत्त्व आणि त्यांतून व्यक्त होणारी समाजसंस्कृती यांविषयी अजून लिहिले जायला हवे वरदा. (जे लिहिलं गेलं आहे ते पुस्तकरूपात आहे. पण निवडक गाथा व त्यांवर आधारित छोट्या छोट्या लेखांच्या माध्यमातून असे साहित्य प्रकाशित होत गेले तर सर्वांनाच त्याचा आस्वाद घेता येईल.) तू लिहिशील का अजून? निवडक अशा प्रत्येक गाथेतील बारकावे, त्यातील संदर्भ, सौंदर्य, संकेत इत्यादी?

आणि हो, आपल्या प्राकृतच्या तासाच्या ''साहसयात्रा'' खरंच संस्मरणीय आहेत!! Happy त्यांवर एक ललित लिहूनच टाकावे काय? :विचारात पडलेली बाहुली: Proud

विचारात कसली पडतेस? लिहूनच टाक एखादं ललित... Proud
मला असे छोटे लेख लिहायला आवडतील. पण सध्या खरंचच वेळ नाही. तू लिही ना. मी आहेच पुस्त्या जोडायला! रच्याकने, मध्यंतरी पुणे आकाशवाणीवर प्राकृतसरिता म्हणून एक कार्यक्रम व्हायचा/ होतो. त्यातही आपल्या जोशीबाई साहित्याचा अत्यंत रसाळ परिचय करून देत/ देतात. अजून सुरू असेल तर जरूर ऐक...

वरदा सहीच. ओळखी बद्दल धन्यवाद.

गाथासप्तशती हा महाराष्ट्रातला पहिला काव्यसंग्रह >> ह्याबद्दल मात्र मलाही शंका आहे. हाँ पण पहिला नवीन कविता काव्यसंग्रह मात्र हा जरुर आहे.

संगम साहित्याचे भारतीय इतिहासातील योगदान अविस्मरणीय आहे. संगम साहित्याचे अनेक संदर्भ वेळोवेळी पंडितांनी दिले आहेत.

ज्यांनी हे घडवायला त्या काळात मदत केली ते पांड्य राजे स्वतःला पांडवांचे वंशज म्हणवून घेत.त्यामुळेच त्यांनी जनपदाला पांड्य हे नाव दिले होते.

युरोपियन women of bath canterbury tales माहित होते पण ते तेराव्या शतकातले. प्राकॄत साहित्याबद्दल फार माहित नाही. नवीन माहितीबद्दल थॅन्क्स.

वरदा उत्तम लेख. त्यानिमित्ताने तुझी ही नवी ओळख झाली. आता मूळ गाथा वाचणार. तामिळनाडूत फिरताना निसर्गाची रूपे अगदी आवड्तात आता त्यांना छानसा संदर्भ आला. लेखाचे शीर्षकही अगदी काव्यात्मक आहे.

गाथासप्तशतीचा राष्ट्रिय संस्कृत संस्थानाने केलेला संस्कृत अनुवाद आणि संस्कृतमधे त्यावर केलेली चिकित्सा व भाष्य याची लिंक टाकतेय. ज्यांना संस्कृत वाचायला आवडेल त्यांच्यासाठी. इथे मूळ प्राकृत गाथाही दिल्या आहेत.
http://www.sanskrit.nic.in/DigitalBook/S/SanskritGatha.pdf

वरदा, धन्यवाद, पण माझ्यासारख्या अ-संस्कृत लोकांसाठी मराठीत नाही का काही? Happy

मीही अ-संस्कृतच आहे, स्वाती Happy

मराठीत स. आ. जोगळेकरांनी प्रथम या ग्रंथाचा अनुवाद केला. लेखाच्या शेवटी संदर्भसूचीत त्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्याची प्रस्तावना, मराठी अर्थ वगैरे खूप छान आहे, पण प्रत्येक गाथेतून - अगदी निखळ निसर्गवर्णनाच्या सुद्धा - त्यांनी अगदी गरज नसतानाही ओढून ताणून शृंगाराचे सूचन केले आहे ते नेहेमीच पटतं असं नाही. हे पुस्तक प्रसाद प्रकाशनने प्रसिद्ध केले होते. ते आता मिळत नाही. पण पद्मगंधा प्रकाशन ते पुनर्प्रकाशित करणार आहे लवकरच अशी खात्रीलायक बातमी आहे. जोगळेकरांच्या कन्येच्या इच्छेला/ विनंतीला मान देऊन. त्या आता खूप वृद्ध आहेत आणि या पुस्तकाची परत एक आवृत्ती निघावी अशी त्यांची फार इच्छा आहे...

दुसरा भावानुवाद आहे राजा मंगळवेढेकरांचा. त्याचं नाव शेफालिका. प्रत्येक गाथेचा त्यांनी थोडासा स्वैर काव्यानुवाद केला आहे. मला स्वतःला हे अनुवाद खूप आवडले नाहीत/ ऑथेंटिक वाटले नाहीत. हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलं होतं बहुतेक. नक्की आठवत नाहीये. हे पुस्तकही मिळतं की नाही शंकाच आहे.

Pages