आघात

Submitted by योगी on 9 November, 2009 - 07:36

अमित सुन्न होऊन सायलीच्या उशाशी बसला होता. सायली तापाने फणफणली होती. डॉक्टर नुकतेच येऊन सायलीला तपासून गेले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सायलीचं ब्लडप्रेशर अ‍ॅब्‍नॉर्मली वाढलं होतं. तिला कोणत्या तरी गोष्टीचा जबरदस्त मानसिक धक्का बसला होता आणि त्यामुळेच तिला असा अचानक ताप चढला होता. त्यांनी अमितला काही औषधं आणायला सांगितली आणि त्याचबरोबर असंही सांगितलं की सायलीला खूप विचार करायला लागेल किंवा टेन्शन येईल असं काहीही तिच्यासमोर बोलू नका. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले आणि अमित परत विचारात गढून गेला. काल जे काही घडलं ते नेमकं का आणि कशामुळे हे त्याला काही केल्या लक्षात येत नव्हतं. सायली काल अशी विचीत्र का वागली असावी? विचार करुन करुन त्याच्या डोक्याला अक्षरशः मुंग्या यायला लागल्या. शेवटी सगळे विचार गुंडाळून ठेवत तो डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणायला बाहेर पडला.

* * *

सायली दिसायला खूपच सुंदर पण तेवढीच अबोल मुलगी होती. कामाव्यतिरीक्त ती कुणाशीही उगीच जास्त वेळ बोलत नसे. ऑफिसमधेही आपण बरं आणि आपलं काम बरं हाच तिचा नियम होता. ती कुणाशीही फटकून कधीच वागली नाही. उलट खूपच मृदू स्वभाव होता तिचा. पण कुणाच्याही जास्त जवळ जाणं किंवा चारचौघात मिसळणं तिने कधीच केलं नाही. तिला मैत्रीणीही म्हणाव्या अशा नव्हत्याच. म्हणजे इतर मुलींना जशी एखादी तरी अगदी जीवाभावाची मैत्रीण असते, जिच्यासोबत त्या आपल्या मनातलं काहीही बोलू शकतात, काहीही शेअर करु शकतात, तशी सायलीची एखादीसुद्धा खास मैत्रीण नव्हती. त्यामुळे तिच्याबद्दल अनेकांना विनाकारण एक गूढ कुतूहल वाटायचं. तिचे कपडेही नेहमी साधेच पण व्यवस्थित, नीटनेटके असायचे. खूप भडक किंवा खूप रंगीबेरंगी कपड्यात तिला पाहिल्याचं कुणालाच आठवत नव्हतं. पण आपल्या कामात मात्र ती अतिशय चोख होती. अगदी "परफेक्शनीस्ट" म्हटलं तरी चालेल.

* * *
aghat-mi-yogi.jpg
सायलीची इमेल पाहून तिच्या टीममधल्या सगळ्यांनाच धक्का बसला. कायम एकटी एकटी राहणार्‍या आणि फक्त जेवढ्यास तेवढंच बोलणार्‍या सायलीने आज स्वत:हून तिच्या टीमला लंच साठी इन्वाईट केलं होतं. टीममधल्या कुणाचा वाढदिवस असो, कुणाचं लग्न ठरलं असो, किंवा इतरही काही कारण असो, सायली कधीच कुणाच्याच पार्टीला गेली नव्हती. आलेल्या मेलला फक्त Plain-n-Simple English मधे "Hearty Congratulations!!" एवढाच रिप्लाय करायची. जवळपास सगळ्यांनीच इन्वीटेशनची मेल वाचून ती नक्की कुणाकडून आली आहे हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा "From:" मधे कुणाचं नाव आहे हे चेक केलं. मेल सायलीचीच होती. सायली अजून ऑफिसमधे आलेली नव्हती. ही मेल तिने रात्री उशिरा पाठवली होती. साहजिकच तिच्या मेलविषयी सगळ्यांची चर्चा सुरू झाली. मग हळूहळू गेल्या महिन्याभरात तिच्यात होत असलेल्या बदलांकडे टीममधल्या काही मुलींचं लक्ष गेलं जे आतापर्यंत पूर्णपणे दुर्लक्षित राहिलं होतं. तिच्या स्वभावामुळे कुणीच तिच्याकडे कामाव्यतिरीक्त फारसं लक्ष देत नसे. वेगळ्या शब्दात सांगायचं तर तिला कुणीही नोटीस करत नसे. गृपने कुठे फिरायला जायचं असो, एखादा सिनेमा पहायला जायचं असो किंवा एखादं सेलिब्रेशन असो, तिचा नकार गृहीत धरलेला असल्यामुळे तिला विचारण्याची औपचारिकतासुद्धा अशीच केव्हातरी बंद झाली होती. हळूहळू एकेकीला सायलीच्या एकेक बदललेल्या गोष्टी नोटीस केल्याचं आठवायला लागलं...
"..."
"हो ना! हल्ली तिचा ड्रेसींग सेन्स खूपच सुधारल्यासारखा वाटतो ना?"
"खरंच... तिने काल घातलेला तो डार्क ब्राऊन कलरचा तो ड्रेस काय क्युट होता ना!"
"हो, फारच सुंदर होता! आणि त्या ड्रेस साठी तिला कॉम्प्लीमेंट्स दिल्यावर ती चक्क गोड हसून थॅंक्स सुद्धा म्हणाली!"
"काय सांगतोस मिल्या? तू तिच्याशी बोललास?"
"अरे हो! ती इतकी सुंदर दिसत होती की मी बोलून गेलो असाच...!!"
"ग्रेट.... मॅडमना कुणीतरी भेटलेलं दिसतंय..."
"बहुतेक... मलाही तसंच वाटतंय.... कोई मिल गया...!!"
"हो रे! माझ्या लक्षातच नाही आलं..."
"काय लक्षात नाही आलं?"
"अगं काल सायली उशिरापर्यंत थांबली होती ना, तेव्हा ती चक्क चॅटींग करत होती कुणाशी तरी... आणि चेहर्‍यावर चक्क स्माईल...!!"
"आणि हो... हल्ली तिचं फोनवर बोलणंपण वाढलंय ना..."
"चलो अच्छा हैं.... शेवटी बाईसाहेब माणसात आल्या म्हणायच्या...."
"हं..."

* * *

लंचपर्यंत सगळ्यांचीच उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. सायली स्वत: जरी कुणाच्याही पार्टीला हजर राहिली नव्हती तरी टीममधले झाडून सगळे तिच्या इन्वीटेशनवर लंचसाठी यायला तयार झाले होते. लंच घेताना सायलीने तिच्या पार्टीचं कारण सांगितलं. तिचं लग्न ठरलं होतं. हे खरं तर कुणालाच अनपेक्षित नव्हतं. पण हे अरेंज्ड आहे की लव मॅरेज आहे याविषयी सगळ्यांच्या मनात खूप उत्सुकता होती. कारण सायलीसारखी मुलगी कुणाच्या प्रेमात पडेल किंवा कुणी नॉर्मल मुलगा तिच्या प्रेमात पडेल हे कुणालाच शक्य वाटत नव्हतं. आणि तरीही तिच्यात अचानक घडलेल्या बदलांमुळे ही शक्यताही अगदीच नाकारता येत नव्हती. शेवटी यावरचं धुकं सायलीनेच बाजूला केलं. लग्न रीतसर सायलीच्या घरी पहायला जाऊन आणि चहापोहे वगैरे झाल्यानंतर आणि दोन्हीकडची पसंती झाल्यानंतरच ठरलं होतं. पण सायलीच्या म्हणण्याप्रमाणे तिला तिचा आयुष्याचा जोडीदार तिच्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला मिळाला होता. त्याचा स्वभाव खूप छान, मनमिळावू आणि बोलका होता. बोलता बोलता समोरच्याच्या मनावर त्याच्या व्यक्तीमत्वाची छाप पडत असे. दोन-चार भेटीतच तो भेटणार्‍याला आपलंसं करुन घेत असे. शिवाय कुणाशीही संवाद साधताना तो कधीच स्वत:ची मतं उगीच समोरच्यावर लादत नसे. समोरच्याचं म्हणणं पुर्णपणे लक्ष देऊन ऐकून मगच त्यावर आपलं मत व्यक्त करीत असे. बोलण्यात कुठेच अविचारीपणा, उथळपणा जाणवत नसे. खूपच स्पष्ट आणि प्रगल्भ विचारांचा मुलगा होता अमित. पण सायलीला अमितच्या बाबतीत सगळ्यात जास्त जे आवडलं होतं ते म्हणजे त्याची स्त्रियांशी अदबशीरपणे वागण्याची पद्धत. तिला पहिल्या भेटीतच जाणवलं होतं की अमित इतर मुलांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याच्या आधीही चारपाच मुलं तिला पहायला आले होते. त्यांच्याशी बोलताना तिच्या मनावर एक प्रकारचं दडपण असायचं. पण अमितशी बोलताना पहिल्यांदाच तिला कसलंही दडपण वाटत नव्हतं. पहिल्या काही मिनीटातच त्याने तिला इतकं रिलॅक्स फील करवलं होतं की सायलीला एकदा वाटून गेलं की आयुष्याचा जोडीदार असावा तर असा! दोन्ही घरचे होकार येऊन दोन महीने झाले होते. सायली आणि अमितने लग्न तीन-चार महिन्यांनंतर करायचं, आधी एकमेकांना व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करायचा असं ठरवलं होतं. या दोन महीन्यांच्या काळात अमित आणि सायली खूपच जवळ आले होते. आणि सायलीच्या मनात अमितबद्दल फक्त प्रेमच नव्हे तर आदरसुद्धा निर्माण झाला होता. सायलीमधे जे काही पॉझिटीव बदल झाले होते त्या सगळ्याचं हे कारण होतं तर...
नंतर बराच वेळ सायली अमितबद्दल खूप भरभरून बोलत होती....

* * *

अमित औषधं घेऊन परत आला. सायली अजूनही झोपलेलीच होती. त्याने तिला हलकेच आवाज देऊन पाहिला. पण तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. तिच्या कपाळावरची रुमालाची ओली करुन ठेवलेली घडी कोरडी होत आली होती. ती परत ओली करुन तिच्या कपाळावर ठेवून तो तिच्या जागे होण्याची वाट पहात पेपर वाचत बसला. डोळे पेपरमधली अक्षरं वाचत होते पण मेंदूपर्यंत त्यांचा अर्थ काही केल्या पोचत नव्हता. काल रात्री घडलेला प्रसंग पुन:पुन्हा डोळ्यांसमोर तरळत होता. सायलीच्या वागण्याचं गूढ अधिकच गडद होत होतं. असाच विचार करता करता त्याचं मन थोडं मागे भूतकाळात गेलं. सायलीला पहिल्यांदा भेटल्यापासूनचे सर्व प्रसंग अमितने आठवायला सुरुवात केली. सुरुवातीची अतिशय अबोल सायली त्याला आवडली होती ती तिच्या अत्यंत मृदू आणि लाघवी स्वभावामुळे. ती स्वतःहून खूपच कमी बोलली होती. पण त्यानेच स्वत: पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केल्यानंतर थोड्या वेळातच ती खुलली होती. तिच्याशी बोलण्यातून त्याला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली होती. आणि ती म्हणजे - सायलीची स्वत:च्या होणार्‍या नवर्‍याविषयीची मतं खूपच स्पष्ट होती. फक्त याच बाबतीत नव्हे तर एकंदरच तिची विचारप्रक्रिया खूपच सुस्पष्ट आणि प्रगल्भ होती. तिला पाहून गेल्यानंतर अमित आणि सायली दोन वेळा बाहेर भेटलेसुद्धा. अर्थातच पुढाकार अमितनेच घेतला होता. दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आणि आपापला होकार योग्य तर्‍हेने एकमेकांना कळवला होता. तीन महीन्यांनंतरचा मुहूर्त काढला गेला आणि नुकतंच आठवड्याभरापुर्वी त्यांचं लग्नसुद्धा झालं. लग्न खुप थाटामाटात जरी नाही तरी वाजतगाजतच झालं. टोमॅटो रेड कलरच्या भरजरी शालूमधे सायली अशी काही शोभून दिसत होती की तिच्या रुपावरुन नजर दुसरीकडे वळूच नये. तिचं ते मुग्ध, मोहक रुप आठवून अमित अजूनच हळवा झाला. गेल्या तीन महीन्यातले त्याने सायलीच्या सहवासात अनुभवलेले क्षण त्याच्या मनाच्या पडद्यावरुन एखाद्या मूकपटाप्रमाणे झरझर सरकत होते. त्या सुखद क्षणांच्या आठवणीने त्याला खुपच हलकं हलकं आणि प्रसन्न वाटायला लागलं. जणू काही ते सोनेरी क्षण तो पुन्हा एकदा जगत होता.

* * *

काल सकाळीच ते दोघे मनालीत पोचले होते. मनात खूप सारी गोड स्वप्नं घेऊन आणि आजपर्यंत फक्त कल्पनेतच पाहिलेल्या स्वत:च्या सुखी संसाराच्या जगात आपल्या जोडीदारासोबत बेधुंद होऊन प्रवेश करण्यासाठी, एकमेकांच्या अधिक जवळ येण्यासाठी आणि एकमेकांत हरवून जाण्यासाठी. मनालीत प्रवेश करताच सायली आणखीनच खुलली. तिथल्या प्रसन्न हवेने आणि धुकंभरल्या गारव्याने तिला खूपच फ्रेश वाटत होतं. प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून गेला होता.

कॉटेजवर पोचल्यावर थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी दोघंही बेडवर आडवे झाले. अमितने सायलीचे कपाळावर आलेले केस आपल्या बोटांनी हळुवारपणे बाजुला करत तिच्या कपाळाचं एक हलकंसं, दीर्घ चुंबन घेतलं आणि सायलीने स्वत:ला त्याच्या मिठीत झोकून दिलं. दोघांनाही झोप कधी लागली ते कळलंच नाही. अमितला जाग आली तेव्हा पावणेदहा झाले होते. त्याने उठायचा प्रयत्न केला पण सायलीने आपला डावा हात त्याच्या छातीवरुन त्याच्या उजव्या खांद्यावर टाकला होता. तो अलगद बाजूला करुन तो उठला. सायली अगदी गाढ झोपली होती. तिचं हे रुप अमित पहिल्यांदाच पहात होता. झोपेत तिचे केस अस्ताव्यस्त झाले होते. कपाळावरची नाजुकशी टिकली झोपेत कशी कुणास ठाऊक, तिच्या डाव्या गालावर सरकली होती. मंगळसुत्र सरकत सरकत गळयापर्यंत आलं होतं. तिच्या गळयाच्या गोर्‍यापान त्वचेवर त्या मंगळसुत्राचं ते सोनेरी पदक आणि त्याला कॉन्ट्रास्ट काळे मणी खूपच लोभस दिसत होते. गाढ झोपेत असल्यामुळे अगदी रिलॅक्स्ड असलेल्या तिच्या चेहयावर एक वेगळंच सात्त्विक तेज असल्यासारखं वाटत होतं. असंच एकटक तिच्या चेहर्‍याकडे पहात रहावं असं अमितला वाटत होतं पण तो मोह त्याने आवरता घेतला. उठता उठता पुन्हा एकदा हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि आधी आपण आवरुन घेऊ आणि मग सायलीला उठवू असा विचार करुन त्याने बॅगेतून ब्रश आणि पेस्ट काढली.

* * *

दिवसभर मनालीचं निसर्गसौंदर्य पहाण्यात दोघांनाही वेळ कसा गेला ते कळलंच नाही. एकमेकांच्या सहवासात दोघेही आता चांगलेच खुलले होते. तसे ते याआधीही एकत्र पुण्यात भटकले होते. पण तेव्हाचं भटकणं आणि आत्ताचं यामधे खूप फरक होता. तेव्हा दोघं सोबत असले तरी त्यांच्यात एक अंतर होतं. तेव्हाचं त्यांचं जवळ येणं फक्त हातात हात घेऊन बसणं, कमरेभोवती किंवा खांद्यावर हात टाकून चालणं शेजारी बसताना थोडं जास्त जवळ बसणं एवढ्यापुरतंच मर्यादीत होतं. पण तेही कुणी पहात नाही ना याची खात्री करुनच! पण आता आणि तेसुद्धा मनाली सारख्या ठिकाणी त्यांना कसलाच संकोच बाळगण्याचं काहीच कारण नव्हतं. सायली तर दिवसभर अमितचा हात घट्ट हातात घेऊनच चालत होती. त्याचा सहवास तिला खूपच सुखद आणि हवाहवासा वाटत होता. त्याच्या सहवासात तिला एक वेगळीच, कधीच न अनुभवलेली सुरक्षिततेची जाणीव अनुभवायला मिळत होती. दोघांनीही आजचा दिवस भरपूर एन्जॉय केला. खूप फोटो काढले. खूप गप्पा सुद्धा मारल्या. काही महीन्यांपुर्वीची अबोल सायली ती हीच का असा प्रश्न पडावा इतकी आज सायली बडबडी झाली होती.

* * *

रात्री जेवण झाल्यावर दोघेजण बाहेरच्या टिपूर चांदण्यात मस्तपैकी फिरुन आले. रुममधे परत आल्यावर अमितने सर्वप्रथम हिटर चालू केला. आत स्वेटर आणि त्यावर फरचं जॅकेट घातल्यानंतरसुद्धा सायली थंडीने कुडकुडत होती. अमितने रुम सर्विसला फोन करुन कॉफी मागवली. कॉटेजवर पूर्णवेळ गरम पाण्याची सोय होती त्यामुळे बरं होतं. दोघांनीही गरम पाण्यात हात-तोंड धुवून घेतले. थोड्याच वेळात कॉफीसुद्धा आली. मग मस्तपैकी कॉफीचे घुटके घेत आणि दिवसभरात काढलेले फोटो पहात पुन्हा एकदा दोघे दिवसभर एन्जॉय केलेल्या क्षणांच्या आठवणींत रंगून गेले. साडेदहा वाजत आले तशी सायलीला झोप यायला लागली.
"अमित, चल ना झोपूया, खूप झोप येतेय!" सायली झोपाळलेल्या स्वरात म्हणाली.
"झोपूया? कमॉन..!! आज मी तुला अजिबात झोपू देणार नाहीये! आज मी रात्रभर तुझ्याशी खूप खूप मस्ती करणार आहे!" अमित तिला जवळ ओढत म्हणाला. हे बोलत असतानाचे त्याच्या डोळ्यातले चावट भाव सायलीच्या नजरेतून सुटले नाहीत.
"अमित प्लीज... खूप झोप येतेय रे!" सायलीने आर्जव करुन पाहिले.
"उद्या आपण हवं तर दिवसभर नुसते झोपून राहू पण आज मला तुझ्यासोबत रात्रभर जागायचंय...!!" अमित रोमॅन्टिक मूडमधे होता.
"आणि काय करणार जागून?" सायलीचा निरागस, बेसावध प्रश्न..!!
"काय करणार? हे बघ... हे करणार....." असं म्हणत अमितने सायलीला घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्या चेहर्‍यावर, कपाळावर, गालावर, खांद्यांवर, ओठांवर, जमेल तिथे आपल्या ओठांनी तिची चुंबनं घेऊ लागला.
सायलीला त्याचा हा आवेग अनपेक्षित होता. पण तरीही त्याच्या त्या आवेगाने, त्या प्रेमभरल्या स्पर्शाने ती सुखावली. त्याच्या मिठीत तिने स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं. तिची झोप एव्हाना दूर उडून गेली होती.
"सायली, आज मी खूप खूप खुश आहे. मला अगदी हवी होती तशीच बायको तुझ्या रुपाने मिळाली. I Love You!!" सुरुवातीचा आवेग ओसरल्यानंतर अमितने मिठी सैल केली.
उत्तरादाखल सायली गालातल्या गालात फक्त गोडसं हसली. ते हसणंसुद्धा इतकं लोभस, इतकं मोहक, इतकं मादक होतं की अमित अजूनच रंगात आला.
"सायली, चल ना करुया...!!" अंगावरचं ब्लॅंकेट दूर करत तो म्हणाला.
"काय करुया?" पुन्हा एकदा सायलीचा निरागस प्रश्न.
"हनीमूनला आल्यावर सगळे नवरा बायको जे करतात ते!" डोळे मिचकावत अमित म्हणाला. तशी सायलीच्या डोळ्यांत लाज आणि गालांवर लाली जमा झाली.
सायलीने फिकट गुलाबी रंगाचा सिल्कचा नाईट गाऊन घातला होता. त्या गाऊनच्या रंगामुळे ती सुंदर दिसत होती की तिच्या रंगामुळे तो गाऊन सुंदर दिसत होता असा प्रश्न पडावा इतपत तो गाऊन तिच्या गोर्‍या रंगावर शोभून दिसत होता. अमितने पुन्हा सायलीला जवळ ओढलं आणि तिच्या गाऊनवरुनच तिच्या पोटावरुन हळूवारपणे हात फिरवला. हा अनुभव त्याच्यासाठी एकदमच नवीन होता. त्याच्या सर्वांगावर त्या सुखद अनुभुतीचे रोमांच उभे राहिले. पण अशा बेधुंद अवस्थेतही का कुणास ठाऊक पण त्याला असं वाटलं की सायलीच्या डोळ्यात एक प्रकारची अनामिक भितीची लहर तरळून गेली. ती नवखेपणाची भिती नक्कीच नव्हती. काहीतरी वेगळंच होतं ते. पण अमित शरीरानेही सायलीशी पूर्णपणे एकरुप होण्यासाठी आता इतका आतुर झाला होता की त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं.
अमितचा हात सायलीच्या पोटावरुन हळूहळू वर सरकायला लागला तशी सायलीच्या श्वासांची गती जाणवण्याइतपत वाढली. पुढे काय घडणार आहे याची अमितला किंचीतसुद्धा कल्पना येणं शक्यच नव्हतं.

"सोडा... सोडा मला, प्लीज मला जाऊ द्या!" सायली जोरात किंचाळली आणि तिने अमितला अंगातलं सर्व बळ एकवटून जोरात दूर ढकलून दिलं. तिने शरीर आकसुन घेतलं होतं. डोळ्यांत आत्यंतिक भिती होती आणि अमितकडे ती एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे पहावं अशा नजरेने पहात होती.
क्षणभर अमितला कळेचना की काय चाललंय. जरा भानावर आल्यावर त्याने तिला शांत करण्यासाठी जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तशी ती अजूनच जोरात ओरडायला लागली.
"माझ्या जवळ नका येऊ.... मला प्लीज जाऊ द्या..."
ती शांत होत नाहीये असं पाहून त्याने तिला सर्व शक्तीनिशी जवळ ओढून घेतलं आणि आपल्या मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करु लागला.
"सायली, प्लीज शांत हो... काय होतंय तुला मला जरा सांगशील का?"
पुढच्याच क्षणाला सायली बेशुद्ध होऊन पडली. इतक्या थंडीतही तिच्या कपाळावर दरदरुन घाम फुटलेला दिसत होता. भीतीमुळे चेहराही पार कोमेजून गेला होता. अमितने तिला बिछान्यावर झोपवलं. तिला भयंकर ताप सुद्धा चढला होता. आता काय करावं असा विचार करत असतानाच इंटरकॉमची रिंग वाजली. सायलीच्या ओरडण्यामुळे रात्रीचा जो मॅनेजर होता त्याने काय झालं हे विचारण्यासाठी फोन केला होता. जे घडलं होतं ते जसंच्या तसं मॅनेजरला सांगणं अमितला शक्यच नव्हतं. त्याने त्याला असंच काहीतरी जुजबी उत्तर दिलं आणि एखाद्या डॉक्टरला बोलावता येईल का हे विचारुन घेतलं. बराच उशिर झालेला असल्यामुळे यावेळी कुणीही डॉक्टर मिळू शकणार नसल्याचं मॅनेजरचं उत्तर ऐकून अमित आणखीनच निराश झाला. एवढ्या रात्री घरी फोन करुन त्यांना त्रास देणंही त्याला योग्य वाटेना. शेवटी त्याने सकाळपर्यंत वाट पहाण्याचा निर्णय घेतला. रात्रभर तो सायलीच्या उशाशी बसून होता. तिच्या कपाळावर रुमालाच्या ओल्या घड्या ठेवून कमीत कमी तिचा ताप तरी उतरावा म्हणून प्रयत्न करत होता.

* * *

दुपारचे साडेबारा वाजले होते. पेपर वाचता वाचता अमितला खुर्चीमधेच डुलकी लागली होती. सायलीच्या कण्हण्याने तो भानावर आला. ती हळूहळू शुद्धीवर येत होती. अमित घाईघाईने उठून तिच्या जवळ गेला.
"कसं वाटतंय आता..?" हलकेच तिच्या केसांवरुन प्रेमाने हात फिरवत त्याने तिला विचारलं.
"हं..." सायलीने नुसतंच हलकंसं हसून मान डोलावली. "पाणी...." तिचा घसा कोरडा पडला होता.
अमितने तत्परतेने उठून तिला ग्लासमधे पाणी आणून दिलं. तिला हाताला धरुन उठून बसायला मदत केली. तिने घोटभरच पाणी पिऊन ग्लास बाजूला ठेवला.
"अमित, काय झालं होतं रे रात्री? माझं डोकं कशामुळे दुखतंय?"
"सायली? ... तुला काहीच आठवत नाही?" अमितला आश्चर्य वाटलं.
सायलीने आठवण्याचा प्रयत्न केला तशी तिच्या डोक्यातून वेदनेची एक जोरदार कळ आली आणि तिने दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरलं.
"नाही रे, मला काहीच आठवत नाहीये!" तिच्या डोळ्यांतून एक थेंब अलगद गालावर ओघळला.
"सायली.... सायली.... राहू दे नाही आठवत आहे तर... आपण नंतर बोलू या विषयावर... तुला बरं वाटलं की..." अमितने तिच्या गालावरचा थेंब अलगद टीपत तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
"अमित... I am really sorry!!" सायली थोडीशी पुढे झुकली आणि दोन्ही हात पुढे करुन अमितला मिठीत घेत म्हणाली.
"It's okay dear. तुला सांगितलं ना, या विषयावर आपण नंतर बोलू म्हणून." अमित तिच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवत म्हणाला.

* * *

दोन दिवसांनी सायलीचा ताप उतरल्यावर तिला आणखीन त्रास व्हायला नको म्हणून दोघांनीही पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. सायली पुन्हा पुर्वीसारखीच अबोल झाली होती. झाल्या प्रकाराबद्दल सायलीशी बोलायला गेलं की ती पुन्हा अशी घाबरुन जायची आणि थरथरायची की अमितने तिला त्याविषयी विचारणंच सोडून दिलं. काय करावं अमितला काहीच कळत नव्हतं. आणि अशा अवस्थेत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यातही काहीच अर्थ नव्हता. मनालीत जे घडलं होतं ते अशा नाजूक क्षणी घडलं होतं की ते सविस्तरपणे घरच्यांना सांगणंही अमितला शक्य नव्हतं. पण तरीही कुणाशी तरी याविषयी बोललंच पाहिजे असं त्याला वाटू लागलं. शेवटी खूप विचार करुन त्याने आपल्या एका अगदी जवळच्या मित्राला - सागरला - याबाबत सांगितलंच. त्याने अमितला एखाद्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याविषयी सुचवलं. त्याचा हा सल्ला ऐकून अमितला आधी त्याचा रागच आला. पण खोलवर विचार केल्यावर त्याला जाणवलं की हे करुन पहायला काहीच हरकत नाही. सायलीला शारीरिक आजार काहीच नव्हता. जे काही होतं ते नक्कीच मानसिक होतं. एक दिवस सागर स्वत:च अमितला त्याच्या ओळखीचे एक मानसोपचार तज्ञ, डॉक्टर अभय देशपांडेंकडे घेऊन गेला. अमितने त्यांना सगळी हकीकत सविस्तरपणे सांगितली. देशपांडेंनी त्याला अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारले.
"मला सायलीच्या आई-बाबांनाही भेटावं लागेल..." थोडा विचार करुन देशपांडे म्हणाले.
"सायलीचे वडील आता हयात नाहीत. पण आईशी तुम्हाला बोलता येऊ शकेल." अमितने माहिती पुरवली.
"ठिक आहे. त्यांना कधी घेऊन येऊ शकता तुम्ही इकडे?" देशपांडेंनी विचारलं.
"मी बोलतो त्यांच्याशी आणि तुम्हाला कळवतो."
"ठिक आहे. भेटू पुन्हा."

* * *

"डॉक्टर, या मिसेस कुलकर्णी. सायलीच्या आई." अमितने ओळख करुन दिली.
"नमस्कार."
"नमस्कार. मला सायलीबद्दल तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. मि. अमित मी यांच्याशी खाजगीत बोलू शकतो?"
"Of course Doctor! मी बाहेर थांबतो" अमित खुर्चीतून उठत सायलीच्या आईकडे एक नजर पाहून बाहेर निघून गेला.
"मिसेस कुलकर्णी, मनालीत त्या रात्री जे काही घडलं ते तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे?"
"अं.. सायलीला अचानकच चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली आणि तिला खूप ताप भरला असं अमितनेच सांगितलं होतं..... डॉक्टर... काही... सीरीयस प्रॉब्लेम आहे का?" सायलीच्या आईचा आवाज हळवा झाला होता.
"नाही नाही मिसेस कुलकर्णी. सीरीयस असं काहीच नाहीये. मी फक्त तुमच्याकडची माहिती आणि माझ्याकडची माहिती याची जुळवाजुळव करत होतो."
देशपांडेंनी इथे एक दीर्घ पॉज घेतला.
"मिसेस कुलकर्णी, तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे पण तपशीलात एक गोष्ट कमी आहे. सायलीला अचानक चक्कर नव्हती आली."
"म्हणजे?"
"माफ करा, पण इथे मला थोडंसं स्पष्टच बोलावं लागेल...... अमितने शरीरसंबंधांच्या इच्छेने सायलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरची प्रतिक्रिया म्हणून पुढे जे काही घडलं ते घडलं..."
"????"
"मला सांगा मिसेस कुलकर्णी, सायलीच्या पुर्वायुष्यात एखादी भयंकर अशी घटना घडली होती का?"
"भयंकर म्हणजे?"
"भयंकर म्हणजे, ज्यामुळे सायलीच्या मनात पुरुषी स्पर्श, जवळीक वगैरेविषयी भिती निर्माण होईल अशी..."
या प्रश्नावर सायलीच्या आईच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. देशपांडेंनी काहीही प्रतिक्रिया देण्याऐवजी मिसेस कुलकर्णींचा भावनावेग ओसरुन त्यांनी काहीतरी बोलावं याची वाट पहाणं पसंत केलं. काही मिनीटं अशीच गेल्यावर मिसेस कुलकर्णी पुन्हा बोलू लागल्या.
"डॉक्टर.... सायली पाचवीत असताना...." सायलीच्या आईला आता आपले अश्रु आवरत नव्हते.
"घ्या... पाणी घ्या..." पाण्याचा ग्लास त्यांच्या समोर ठेवत देशपांडे म्हणाले.
"थॅन्क्यू...!!" सायलीच्या आईने पाण्याचा ग्लास हातात घेतला.
"मिसेस कुलकर्णी, तुमच्या मनाची काय अवस्था होते आहे ते मी समजू शकतो. पण जे घडून गेलंय ते घडून गेलंय. आणि ते सुद्धा कित्येक वर्षांपुर्वी. त्यामुळे स्वत:ला सावरा. आणि एक लक्षात घ्या... सायलीचा जो भूतकाळ आहे त्याचा परिणाम तिच्या वर्तमानावर होतो आहे. आणि वर्तमानात काही सुधारणा नाही झाली तर भविष्यात देखील बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे जे काही घडलं ते मला नीट सविस्तरपणे सांगा. आणि माझ्यावर विश्वास ठेवा सगळं अगदी व्यवस्थित होईल."
देशपांडेंच्या शब्दांनी सायलीच्या आईला जरा धीर आला.
"सायली त्यावेळी पाचवीत होती. आम्ही बिबवेवाडीमधे एका नवीनच झालेल्या सोसायटीमधे रहात होतो. यांना नोकरीच्या निमीत्ताने सतत बाहेरगावी जावं लागायचं. सोसायटी नवीनच असल्यामुळे फार थोडे जण रहायला आले होते. आमच्या मजल्यावरच्या चार फ्लॅट्सपैकी आमच्याशिवाय फक्त एकाच फ्लॅटमधे माणसं होती. बाकीचे दोन्ही फ्लॅट बंदच होते. तिथं एक जोडपं रहात होतं. दिवसा दोघंही नोकरीला जायचे त्यामुळे त्यांचाही फ्लॅट बंद असायचा. एक दिवस दुपारच्या वेळी मी स्वारगेटला माझ्या एका मैत्रीणीकडे गेले होते. आणि नेमकी त्याच दिवशी काहीतरी कारणाने सायलीची शाळा लवकर सुटली. घरी आल्यावर दाराला कुलूप पाहून ती पुन्हा खाली पार्कींगमधे येऊन बसली. त्यावेळी एक इस्त्रीवाला दुपारच्या वेळी कपडे नेण्यासाठी येत असे. त्याने सायलीला खाली बसलेलं पाहून तिची चौकशी केली. तो बरेचदा आमच्या घरुनसुद्धा कपडे घेउन गेलेला असल्यामुळे सायलीसाठी अनोळखी नव्हता. त्याने सायलीला आईसक्रीम खाऊ घालण्याच्या बहाण्याने सोबत नेलं आणि........" सायलीच्या आईला हुंदका आवरेना.
"शांत व्हा मिसेस कुलकर्णी...."
देशपांडेंनी पुन्हा एक दीर्घ पॉज घेतला.
"मनालीत अमित आणि सायलीमधे जे काही घडलं त्याच्यामागे हेच कारण आहे. सायलीवर लहानपणी जो अत्याचार झाला त्याला जरी बराच काळ लोटला असला तरी त्या घटनेचा सायलीच्या मनावर जबरदस्त आघात झालाय. त्या बालवयात तिला मानवी शरीरसंबंधांबद्दल काहीही कळणं शक्यच नव्हतं. अशा अजाणत्या वयात तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या भयंकर भितीदायक स्मृती तिच्या मनात अजूनही खोलवर रुतून बसलेल्या आहेत. आणि म्हणूनच मनालीत अमितने तिच्याशी शारिरीक जवळीक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या भयंकर स्मृती पुन्हा उफाळून वर आल्या."
"पण मग डॉक्टर यावर उपाय काय? तिची ही भिती दूर कशी करणार?"
"उपाय सांगतो. आधी मला हे सांगा की तुम्ही सायलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल अमितला किंवा त्याच्या घरच्यांना कल्पना दिली आहे का?"
"कुठल्या तोंडानी सांगणार डॉक्टर? हे सांगितल्यानंतर कोण माझ्या सायलीशी लग्नाला तयार झालं असतं तुम्हीच सांगा. शिवाय त्या घटनेनंतर सायली इतकी अबोल आणि एकलकोंडी झाली की तिला त्यानंतर कधीच मित्र-मैत्रीणी वगैरे नव्हते. कायम एकटीच असायची ती. त्यामुळे तिने स्वत:च स्वत:चं लग्न ठरवण्याचासुद्धा प्रश्नच येत नव्हता."
"चुकताय तुम्ही मिसेस कुलकर्णी. अहो, हल्लीची मुलं खूप विचारी आहेत. लहानपणी घडलेल्या एका अप्रिय घटनेमुळे आणि त्यातसुद्धा सायलीचा स्वत:चा काहीच दोष नसताना, फक्त या एकाच कारणासाठी तिला अमितसारख्या मुलाने नाकारलं असतं असं मला नाही वाटत. तुम्ही कमीत कमी अमितला तरी विश्वासात घ्यायला हवं होतं........ असो...... त्या घटनेनंतर तुम्ही तिला मानसोपचार तज्ञांकडे घेऊन गेला होतात?"
"नाही...." सायलीच्या आईची मान नकळत खाली गेली.
"हं..... काही हरकत नाही... अजूनही वेळ गेलेली नाहीये....." देशपांडे काहीतरी विचार करत म्हणाले.
"???..." सायलीच्या आईने प्रश्नार्थक चेहयाने देशपांडेंकडे पाहिलं.
"मिसेस देशपांडे, आपण सायलीची ट्रीटमेंट लगेच सुरु करु. पण त्याआधी अमितला विश्वासात घेऊन सगळं नीट समजावून सांगावं लागेल."
"पण डॉक्टर...."
"काही काळजी करु नका, अमित खूप चांगला मुलगा आहे. त्याला हे सगळं सांगितल्यानंतरही तो अविचारीपणे काही निर्णय घेईल असं मला नाही वाटत." देशपांडेंनी सायलीच्या आईच्या "पण..." वरुन त्यांच्या मनातली काळजी ओळखली होती.

* * *

देशपांडेंनी अमितला सायलीच्या आईच्या उपस्थितीतच सायलीच्या बालवयात घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. सायलीच्या आईची हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवण्यामागची अगतिकता सुद्धा व्यवस्थित समजावून सांगितली. अमितनेही मोठ्या मनाने ही गोष्ट नजरेआड करण्याचं ठरवलं. आपली फसवणूक झाली आहे असा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. त्यानंतर देशपांडेंनी सायलीवर योग्य ते उपचार सुरू केले. काही गोळ्या लिहून दिल्या आणि काही फ़ेस-टू-फ़ेस सेशन्सही झाले. यथावकाश सायलीच्या मनातल्या कटू आठवणींची तीव्रता कमी होत गेली आणि सोबतच शरीरसंबंधांबद्दलची भितीही. या संपूर्ण काळात अमित ज्या धीराने वागला तो खरोखरच कौतुकास्पद होता. त्याने सायलीच्या पुर्वायुष्यातल्या घटनेबद्दल घरी किंवा कुणालाच काही न सांगता ती गोष्ट फक्त स्वत:पुरतीच ठेवली. सायली पूर्ण बरी होईपर्यंत त्याने तिची खूप काळजी घेतली. आणि अजूनही घेतो आहे. आज ते दोघेही खुप सुखी आहेत. त्यांना दिड वर्षाची एक सायलीसारखीच गोड कन्याही आहे.

(समाप्त)

* * *

* लेखकाचे मनोगत *

नमस्कार! शाळेत लिहीलेल्या निबंधांनंतर पहिल्यांदाच लिहीलेली ही कथा. खरंतर कथा म्हणून या विषयावर मी लिहीन असं मलाच कधी वाटलं नव्हतं. या विषयावर चर्चा व्हावी असं मला खूप वाटत होतं पण नेमकं काय आणि कसं लिहावं ते सुचलंच नाही. त्यामुळे कथेच्या माध्यमातूनच हे मांडावं असा विचार मनात आला.

हल्ली वर्तमानपत्रातून सतत येत असणार्‍या बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषण यासारख्या बातम्या वाचून मनात खूप कालवाकालव होते. अगदी चारपाच वर्षांचं वय असणाया कोवळ्या मुलींवर होणार्‍या बलात्कारांचं प्रमाण हल्ली खूपच वाढलंय. खरंतर अशा निरागस वयातल्या या मुलींना पाहून त्यांच्याशी खूप खूप खेळावं, त्यांना कडेवर उचलून घेऊन त्यांचा पापा घ्यावा असं वाटायला हवं. पण त्याउलट स्वत:च्या शरीराची निर्लज्ज भूक भागवण्यासाठी या कोवळ्या मुलींच्या शरीराचे लचके तोडण्याचे पाशवी विचार एखाद्याच्या डोक्यात कसे येऊ शकतात हेच कळत नाही. कुठल्या मातीची बनलेली असतात ही माणसं? यांना माणसं तरी का म्हणावं? अशांना फाशीची शिक्षा दिली तरी ती कमीच आहे.

ज्या मुलींना या प्रसंगाला सामोरं जावं लागत असेल त्यांच्या मनावर किती खोलवर आघात होत असेल याची नुसती वर्तमानपत्रातली बातमी वाचून कल्पना येणं खूपच अवघड आहे. आणि मग त्या प्रसंगामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना भोगाव्या लागणार्‍या दुष्परिणामांबद्दल विचार करणं तर खूपच दूरची गोष्ट आहे. कित्येकांची आयुष्य अशा प्रसंगांनंतर उद्ध्वस्त झालेली आहेत आणि होताहेत. प्रत्येक अत्याचारीत मुलीला अमितसारखा समजूतदार जोडीदार मिळतोच असं नाही. प्रत्येकीचंच उद्ध्वस्त झालेलं भावविश्व पुन्हा सावरतंच असं नाही.

-योगेश

****
रेखाटनः पल्लवी देशपांडे

गुलमोहर: 

योगीराज, क्रमशः कथेवर मी प्रतिसाद देत नाही. पण आज दिलाय.
कृपया विशाल कुलकर्णींच्या सवयी लावून घेऊ नका.
कथेबद्दल कथा पुर्ण झाल्यावरच.... तोपर्यंत क्रमशः

कथेची सुरूवात छान झाली पण शेवट तुटक झालाय. चांगला विषय आहे,, पण लिखाणात अजून थोडी सफाई आणायचा प्रात्न व्हायला हवाय..
सायलीचे या आजारातून बाहेर येणे जास्त खुलवायला हवे होते. बाकी तो ऑफिसमध्यल्या संवादाचा पसारा नसता तरी चाललं असतं.!!!

चान कथा माझ्या मित्रासोबतही लहानपनी असेच झाले आत्याचार झाला होता त्याच्यावर मामीच्या भावानेच केला होता काय करनार? लोक असा विचार करत नायीत की त्या मानसावर काय बितली असेल? अता त्या मित्राचे लग्न झाले आहे पन तो अजुन रिश्ता बनवु शकला नाही त्याच्या बायकोशी आत्मविश्वासाच्या आभावाने. नशिब बायको खुप समजुन घेते. तिला काय घडलं ते माहीत नाही पन माजा खुपच जवळचा मित्र असल्याने मला सांगतो सगळं
माला सचिन दाते

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

खरंतर, "लेखकाचे मनोगत" मधे मी आधीच लिहीलंय की हा विषय थेट चर्चेसाठी कसा मांडावा हे न सुचल्यामुळे मी कथेच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलाय. आणि यावरचे प्रतिसाद मला फक्त एका कथेवरचे प्रतिसाद म्हणून अपेक्षित नव्हते, तर या विषयावर काहीतरी गंभीर चर्चा व्हावी असं वाटत होतं. कोणत्याही वयात होणार्‍या बलात्कारांचं प्रमाण खरोखरच काळजी करण्याइतपत वाढलंय. कालच्या सकाळमधे तर ६५ वर्षाच्या एका महिलेवर बलात्कार झाल्याची बातमी वाचली..... हल्ली पेपर हातात घ्यायचीच भिती वाटते.

पुण्यात काही दिवसांपुर्वीच नयना पुजारीच्या बाबतीत जे झालं त्याने हेही लक्षात यायला हवं की या प्रकारांत बळी पडणार्‍या मुली, स्त्रिया अगदी तुमच्या आमच्या आजुबाजूला रहाणार्‍या असू शकतात, नात्यातल्या असू शकतात.... किंवा घरातल्याही असू शकतात...

कथालेखन हा काही माझा प्रांत नाही. त्यामुळे कथेविषयीचे प्रतिसादही मला अपेक्षित नाहीत. पण या कथेच्या अनुषंगाने खालील मुद्द्यांवर चर्चा व्हावी असं मला वाटत होतं:

  • असे प्रकार पूर्णपणे थांबवणं तर आपल्या हातात नाही. पण तुम्ही स्वतः एक स्त्री असाल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे?
  • तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं?
  • गेल्या काही आठवड्यांत वाचनात आलेल्या बातम्यांमधे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे अगदी १२-१४ वर्षे वयाच्या मुलांचाही सहभाग असल्याचं दिसून आलं. एवढ्या लहान वयात या मुलांच्या मनात अशा भावना कशामुळे निर्माण झाल्या असतील? याबाबतीत आपण काही करु शकतो का?

याव्यतिरीक्त अजूनही काही मुद्दे चर्चेयोग्य वाटत असतील तर तेही इथे मांडावेत ही नम्र विनंती.

-योगेश

खरंतर, "लेखकाचे मनोगत" मधे मी आधीच लिहीलंय की हा विषय थेट चर्चेसाठी कसा मांडावा हे न सुचल्यामुळे मी कथेच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलाय. आणि यावरचे प्रतिसाद मला फक्त एका कथेवरचे प्रतिसाद म्हणून अपेक्षित नव्हते, तर या विषयावर काहीतरी गंभीर चर्चा व्हावी असं वाटत होतं.>>> योगेश, यावर जर चर्चा होणे अपेक्षित असेल तर कृपया नविन बीबी उघडा. गुलमोहोर हा विभाग साहित्यासाठीच आहे.

तसेही तुन्मच्या कथेतून समस्या प्रभावीपणे सामोरी येत नाहिये.. अर्ध्याहून जास्त कथा ही सायली आणी अमितच्या प्रेम प्रकरणामधेच आहे..

नंदिनीताई,
तुम्ही म्हणालात ते पटलं मला. माझी जागाच चुकली त्यामुळे मला हवे तसे प्रतिसाद येणं जरा अवघडच होतं. तुम्ही सुचवल्याप्रमाणे मी या विषयावरच्या चर्चेसाठी "बलात्कारांचं वाढतं प्रमाण आणि आपण" हा नवीन बीबी सुरु केला आहे.

-योगेश

योगीराज, कथेचा हेतू मनोरंजन नसल्याने त्याबद्दल जास्त काही बोलत नाही. पुन्हा कधी कथा लिहीलीत तर तुमची लेखनशैली, कथेची मांडणी याबद्दल बोलूच.
अपेक्षित असलेल्या गोष्टीसाठी बीबीवर भेटूच.

कथेचा विषय आणि तुमचा हेतु चांगला आहे, पण ऑफीसमधील सविस्तर चर्चा आणि अमित आणि सायली ह्यांच्या प्रणयाचे वर्णन अधिक झाले आहे. वर्णन वाईट नाही पण त्यामानाने तिच्यावरील अत्याचार्-त्यावर अमित नं दाखवलेला समंजसपणा,उपचार ह्याबद्दल अधिक वाचायला आवडेल. कथा सामाजिक न वाटता प्रेमकथा/प्रणयकथा अधिक वाटतेय. पण तुमचा प्रयत्न, शुद्धलेखन, विचार स्तुत्य Happy ... पुलेशु

पल्लीताई, प्रतिसादासाठी आभार! शुद्धलेखनासाठी मला मिळालेली पहीलीच कॉमेंट असेल तुमची.... Happy त्यासाठी विशेष आभार Lol

-योगी