गंध अन ध्वनी .....

Submitted by स्मिता द on 6 November, 2009 - 04:13

गंध अन ध्वनी

तसं पाहील तर गंध, रंग अन ध्वनी हे अगदी प्राथमिक अन अविभाज्य घटक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्य़ातले.. काही ठराविक गंध, आवाज आपल्याला त्या त्या प्रसंगाची आठवण करून देत असतात नाही. काही असे डोक्यात घट्ट रजिस्टर झालेले असतात ना की हमखास तो गंध किंवा तो आवाज ऐकला की ते आठवतेच

मला कोकिळेचं कुहु ऐकलं की थेट नेते माझ्या आजोळी. तिथे मागच्या परसात खूप आंब्याची झाडे होती.. तिथे आमचा मुलांचा अड्डा कायम अन कोकिळेच कुजन. ते इतकं घट्ट बसलंय माझ्या स्मृती मध्ये की मी आज ही कुहु कुहु ऐकली की त्या परसात जाऊन पोहोचते आपसूक.

कुठे हल्ली दुर्मिळ झालेय म्हणा पण सायकलला लावलेली घुंगराची घंटी ऐकली ना की माझ्या घरात जाऊन पोहोचते लहा्खुरी.. पहाटॆच्या झोपेत असलेली..... तेव्हा रोज न चुकता एक मटकीवाला किती तरी वर्षे यायचा.. असाच घुंगराची घंटी वाजवत....

पावसाची झड पडताना बघितली की ते शाळा सुरु झाल्यावरचे नवीन वर्षातले दिवस आठवतात .नवीन वर्गाचे, नवीन दप्तरांचे, नवीन पुस्तकांचे.. त्या पावसाच्या नादाला ह्या पुस्तकांचा एक संमिश्र गंध लागलेला.... नुकतीच उघडलेली शाळा..

आजही तिन्ही सांजा झाल्या की मला तो सूर्यास्त बघताना आठवते मी आईची पाहिलेली वाट.. आईची घरी येण्य़ाची वेळ अन मी आतुरतेने बघत असलेली वाट.. सूर्यास्त बघितला की मला हे हमखास आठवतेच.....

गंधाचंही तसंच बुचाच्या झाडांचा गंध मला लहानपणात घेऊन जातो तोच प्रकार निलगिरीच्या गंधाचा.. मोगरीचा गंध आठवण करून देतो श्रावणाची अन जास्वंद बघितली की आठवतात लहानपणीचे गणपतीचे दिवस. निशिगंधाच गंध थेट घेऊन जातॊ लग्नानंतरच्या दिवसात. सासरी निशिगंधाची शेती.. नव्याने सासरी गेले तेव्हा घरात रोज संध्याकाळी अन सकाळी ती तोडलेली फुले घेऊन गडी यायचे अन दिवस भर त्या फुलांचा गंध घरभर दरवळत असायचा.. तो आजही आला की मला त्या सासरच्या घरात घेऊन जातॊ अन नवलाईच्या दिवसात.....

अशा कितीतरी आठवणी निगडित असतात गंधाशी, चवीशी.. कधी पावसाचा ओला गंध नेतॊ बालपणात तर कधी अगदी नवीन नवीन प्रेमात पडलेल्या दिवसात. कधी व्याकुळ तर कधी हळुवार आठवणी. कितीतरी गंध आणि आवाज घट्ट बसलेले असतात मेंदूच्या कप्प्यात ते तसेच आठवतात.. त्या गंध ध्वनींनी तशीच जपलेल्या असतात आठवणींच्या गाथा!!!

गुलमोहर: 

बासुरी
मस्त लिहिलेस्..........नेहेमीच लिहितेस.
मला भोपळ्याच्या घारग्यांचा वास आला की आमच्या जुन्या घरातले नवरात्रीचे दिवस आठवतात. व जोडीने अजून काही वास ........पारिजातक+सोनचाफा वास व त्यात प्रामुख्याने येणारा तुळशीचा काहीसा उग्र पण हवासा वाटणारा गंध. तुळशीला लक्ष वहायचा नेम असायचा ना.......!

खूप लहानपणी आईच्या बोटाला धरून घराजवळच्या शंकराच्या मंदिरात जात असे. त्या गाभार्‍यात भाविकांनी लावलेल्या उदबत्त्यांचा गंध कायम दरवळायचा. तो गंध स्मृतीत राहिला, पण अलिकडच्या काळात कधी अनुभवायला मिळाला नाही. चार-पाच वर्षांपूर्वी माझी मित्राबरोबर नेमकी याच विषयावर चर्चा सुरू होती. मित्र म्हणाला, ' अरे तू पुण्यात बनणारी पानडी नावाची उदबत्ती लाऊन बघ. तुला तो गाभार्‍यातील मंद सुवास जाणवेल. आणि खरोखर मला घरात पानडी लावताच देवालयाची आणि त्याच सुवासाची अनुभूती आली.
वळवाचा पाऊस पडल्यावर नाकात भरभरून घ्यावासा वाटणारा मृदगंध, उन्हाळ्यात बाजारात हिंडताना पिकलेले हापूस, फणसाचे गरे आणि अननसाचा वास, सोनचाफ्याप्रमाणेच मोगरा, जाई-जुईच्या गजर्‍यांचा वास, आंबेमोहोर तांदळाचा भात शिजल्यावर घरभर पसरणारी आणि केव्हा एकदा ताटावर बसतोय, अशी बेचैनी जागी करणारी दरवळ, लोण्याचे तूप कढवताना येणारा मस्त वास...
बासुरी हा लेख सगळ्यांच्याच आठवणी जाग्या करणारा आहे, पण आणखी विस्तारता आला नसता का? Happy