ह्या लेखमालेतलं पहिलं पुष्प
बगळ्यांची माळफुले:
कवि वा. रा. कांत ह्यांच्या लेखणीतून उतरलेलं, खळ्यांनी संगीतबद्ध केललं आणि मराठी भावगीतात मैलाचा दगड ठरलेलं एक अप्रतिम गीत.
बगळ्यांची माळफुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?
अथांग निळशार आकाश आणि आकाशाच्या त्या निळ्याशार कॅनव्हासवर पांढर्याशुभ्र बगळ्यांची माळ विहार करते आहे. वसंतराव त्यांच्या शांत आवाजाने चित्र रेखाटायला सुरवात करतात. त्यांच्या पहिल्याच स्ट्रोकने मनातुन सहज दाद निघुन जाते. मग हळू हळू चित्र आकार घेऊ लागतं. त्या निळ्याशार बगळ्यांकडे बघत असलेला एक विरहव्याकूळ प्रीयकर आपल्या सोडून गेलेल्या सखीला आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतोय. त्याला वाटतय की अजुनही तिच्या मनात तो आहे म्हणूनच ही बगळ्यांची माळ मला दिसतेय.
मग कॅनव्हासवर उतरतो एक पावसाळ्यातला प्रसंग. सगळीकडे हिरवळ पसरली आहे. नुकताच थेंब थेंब पाऊस पडायला सुरवात झालिये. एखादि थंड वार्याची झुळुक अंगाला सुखद स्पर्श करून जातेय. ढगांमधून उन्हाची एखादि तिरिप येतय आणि त्यामुळे वातावरणाला एक वेगळीच चंदेरी झाक आलिये.या ओलेत्या रानात पावसाचे थेंब ताल देताहेत आणि डोंगरात घुमणारा कवडा मल्हार आळवतोय.
छेडिती पानात बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले उन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात
अरे, सगळी वातावरण निर्मिती तर व्यवस्थित होतीये पण ति जिची आणि आपल्या कविची भेट झाली होती ती कुठे आहे? ति ना ति बघा ति तिथे त्या नारळाच्या झाडाखाली आणि तो बघा आपला नायकही आहे तिथेच. बघा त्यांच्या कश्या प्रेमाच्या गोष्टी चालल्यात. तिच्या खोल डोळ्यात बघुन आपला नायक काय म्हणतोय बघा.
त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली
पौर्णिमाच तव नयनि भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते कुठुनि अंतरात.
आता हळूहळू संध्याकाळ होतेय सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला आहे तरिही हि दोघं तिथेच त्या नारळाखाली एकमेकांचे हात हातात घेउन बसली आहेत. दूर पश्चिमेच्या दिशेने येणारी ति बगळ्यांची रांग पाहून त्यात किती फुलं माळली आहेत हे मोजण्याचा खेळही चालु आहे. पहा आता ती सांजही रात्रीकडे झुकतेय आणि शांत काळ्याशार डोहात हा सूर्य झोपायला चालला आहे.
हातांसह सोन्याची सांज गुंफतांना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजतांना
कमलापरी मिटति दिवस उमलुनी तळ्यात
अहाहा काय सुंदर रोमॅन्टिक चित्र उभं आहे, नाही? अरे, पण ह्या तर सगळ्या आठवणीच आहेत त्या भेटिच्या. आज त्या बगळ्यांच्या माळेकडे पहात आपला नायक सखीला विचारतोय कि आपल्यातली सर्व नाती सर्व बंधनं तू तोडून निघुन गेलीस. आता फक्त तुझ्या आठवणीच माझ्या कडे उरल्या आहेत. पण खरं सांग तुझ्याही मनात ती भेट अजुनही ताजी आहे ना? तुही माझ्याविना व्याकुळ आहेस ना?
तु गेलिस तोडुनि ती माळ सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ति तडफड का कधि तुझ्या उरात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
- क्रमश:
काळजाला हात घालणारे
आय हाय देवा, काळजाला हात घालणारा विषय निवडलास की रे.
सुंदर कविता, खळ्यांची चाल, आणि ते डोंगरासरखं झालेलं गाणं पेलणारा वसंतरावांचा झिलमिल आवाज.....हा अमृतयोग आहे!
त्यातही मनकवड घन घुमतो यात.... त्यांनी 'घन घुमतो' ला दिलेलं वजन, शेवटच्या ओळीत तडफड ला स्वरास्वरात जाणवणारी "तडफड"... ह्या माझ्या अतिशय आवडत्या जागा आहेत. शिवाय मग प्रत्येक वेळी फिरकीत उठणारा पण "गायकी" न करता भावगीतच ठेवणारा आवाज- अंबरात, डोंगरात, अंतरात... उरात... उठणारी वसंतरावांची अतिशय तलम फिरकीची तान....
सुंदर लिहिलयस... आता पुढच्या लेखांची उत्सुकता लागून राहिली आहे.
(दुसरी ओळ 'भेट आपुली स्मरते ... अशी आहे का?)
बरोबर..:)
भेट आपुलीच आहे..

अरूण दातेंचं गाणं लिहिता लिहिता आलं डोक्यात..
आणि हो प्रतिसादासाठी धन्यवाद..
सुरेख
देवा, लिहित रहा रे. मस्त लिहितो आहेस.
--
अरूण
यादी
देवा, 'बगळ्यांची माळ' अप्रतिम. तुमच्या यादीत 'दाटून कंठ येतो' असेल ना?
'बगळ्यांची माळ' राहूल देशपांडे पण छान गातो. पण दाद म्हणते तशी त्याचं गाणं भावगीत न वाटता 'गायकीतलं' वाटतं...
क्या बात है
खरतर त्यातील ळ्यांची ला जिवघेना आवाज लागलाय त्यांचा अन त्यानंतर येनारा कंट्रोल्ड माळ क्या बात है.
दाद अनुमोदन. तडफड ही माझीही आवडती जागा आहे.
खळ्यांनी अप्रतीम संगीत दिलेय.
घन घुमतो!
घन घुमतो एकताना खरंच डोंगरामधून पारव्याचं घुमणं भरून राह्यल्या सारखा ढग घुमत असल्याचं चित्र डोळ्यासमोर येतं. मला नेहेमी अंगावर काटा येतो ती ओळ एकताना. राहुल देशपांडेने म्हटलेलं पण मी ऐकलंय. मला ते पण आवडलं होतं. त्याने दोन तर्हेने म्हटलेलं मृगनयना जास्त भावलं होतं.
अजून येऊ द्यात लवकर !
वा!
सुरेल लिहीलंस. आणि लिखाणाची गायकी न करता भावगीतच ठेवलंस, आमच्यासारख्या अडाण्यांसाठी, ते एक अजून छान.
मी स्वत: कधी लावली नाहीत पण भावामुळं वसंतरावांची गाणी लहानपणापासून सतत कानावर पडायची त्यामुळे मनात रुतून बसलाय आवाज कट्यार काळजात घुसावी तसा.
घन घुमतो तर प्रश्नच नाही. त्या ओळींचं वजनच तसं आहे पण 'ळ्यांची माळ''पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतं का कुणास ठाऊक.
सुरेख...
देवा,मस्त लिहिलयस रे... अजुन येऊ देत..:)
मस्त
देव, या विषयाने काळजालाच हात घातलायस सर्वांच्या!
दाद, मला जे वाटतं या गाण्याबद्दल तेच कसं बरोबर लिहिलस? शेवटचं कडवंच जीवघेणं आहे.
BTW राहुल देशपांडे त्यांची गाणी खरचं छान म्हणतो. मी हे गाणं त्याच्या आणि शंकर महादेवनच्या आवाजातही ऐकलं आहे.
आभार
धन्यवाद मंडळी..:)
ह्या गाण्यात अश्या अनेक आवडत्या जागा आहेत.
सुरवातीलाच बगळ्यांची मधली हरकत..
आणि प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ.. खास आवडते
वसंतोत्सव
अरे वा! पुण्यात वसंतोत्सव आणि मायबोलीवरही वसंतोत्सव. कालच वसंतोत्सवात शंकर महादेवननी सुरेल म्हणलं 'बगळ्यांची माळ फुले'. तबल्यावर उस्ताद झाकीर हुसेन आणि साथीला शिवमणि, श्रीनीवासन वाह! मजा आली.
देवा मस्त विषय आणि अगदी जिव्हाळ्याचा. वसंतरावांनी खरोखर काही गाणी अजरामर करुन अशा काही उंचीवर नेऊन ठेवली आहेत की पुढच्या अजून काही पिढ्या ही गाणी विसरु शकणार नाहीये.
माळ
लहानपणी हे गाणे ऐकले त्यावेळी असा अर्थ जाणवलाच नव्हता. यातला बगळा शब्द क्वचितच इतर गाण्यात आला असेल. बगळा तसा बदनामच होता. ( कावळा म्हणे मी काळा, पांढराशुभ्र तो बगळा, हे आमचे आवडते गाणे होते ) त्यावेळी वसंतरावांच्या गायकीचा दबदबा होता, म्हणुन त्यानी भावगीतं गावीत याचेही अप्रुप होते.
मग माझ्या ऐकण्यात त्यांच्या तरुणपणीच्या आवाजातले एक रागदारी गायन आले. फारच मुलायम आवाज आहे त्यावेळचा. काश ही भावगीतं त्या आवाजात असती......
अरे वा!
खुप छान आहे हे पहिलेच पुष्प... ही बगळ्याची माळ ची कल्पना सुंदर आहे... येऊ द्या एकेक पुष्प तब्येतीत... !
छान
छान लिहीलय. अजुनी अंबरात मधे जी व्याकुळता जाणवते ती सगळ गाण व्यापुन रहाते. तडफड तर खरच जीवघेण.
असच एक गाण कुमार गंधर्वच अजुनी रुसुनी आहे... प्रत्येक वेळेस रडवत. प्रेयसीच्या कलेवराजवळ बसुन तिची समजुत काढणारा प्रियकर, ती गेलीये हेच मानायला तयार नाही. समजावुनी पटेना... रुसवा असा कसा हा... डोळे भरुन कधी येतात कळत नाही.
अवान्तर
अवान्तर माहिती: "अजुनि रुसुनी आहे" ही कविता कवी अनिल यानी त्यान्ची बायको कुसुमावती देशपा.न्डे गेल्या तेव्हा लिहीलेली आहे.
एक दुरुस्ती
वाह!! लेखमाला मस्तच होणर ह्याबाबत शंकाच उरली नाही. उत्तम जमुन आले आहे हे रसग्रहण. फक्त एक गोष्ट नमुद कराविशी वाटते.
गाण्याचे बोल "रिमझिमते अमृत ते कुठुनि अंतरात" असे नसुन "रिमझिमते अमृत ते विकल अंतरात" असे आहेत. चु.भु.दे.घे.
किती घेउ मी?
देवा, सुंदर रे बाबा.... आणि त्यावर सर्वांचा एवढा गाढा अभ्यास? अरे किती आनंद घेउ मी....कॉलेजला अस्ताना मराठी गाण्यांवर मी कँपेन केली होती इल्स्ट्रेशन साठी..त्यात पहिले हे गाणे होते...दुसरे होते समइच्या शुभ्र कळ्या.(हे गाणे कुणी लिहिले?) आणि अशीच अजुन काही....माय्बोलीवर आल्याचा अत्युच्य आनंद दिलास रे देवा.
धन्यवाद सर्वांना
आपण दिलेल्या प्रोत्साहनाने अतिशय आनंद वाटला..:)
आता मी त्या बीबीवर जाऊन माझ्या भावना व्यक्त करतो..:)
पण खरंच मनापासून धन्यवाद
सुंदर
देवा, एकदम सही.. हे माझे एक अत्यंत आवडीचे गाणे आहे.. परत परत कितीही वेळा ऐकले तरी मन तॄप्त होत नाही.. वसंतरावांच्या गायकीबद्दल काय बोलायचे....
शंकर महादेवन नेही हे गाणे सुरेख म्हणले आहे.. त्यात 'ळ्यांची माळ' मधली जागा फक्त थोडीशी वेगळी आहे..
दिवसात एकदा तरी हे गाणे ऐकलेच जाते...
हे वाचताना मला सोनाली कुलकर्णीनी आशाताईंच्या एका कॅसेट मधील गाण्यांच्या आधी केलेल्या निवेदनाची आठवण झाली.. आणि उगाचच ती हे कसे मांडेल तेच डोक्यात फिरत राहीले आहे...
गाणं
गाणं आजपर्यंत चालीमुळे लक्षात आणि गळ्यात गुणगुणंत होतं आज ते हृदयात पोहोचलं !!
छान
छान लिहिलंय. अजून लिहा.
"छेडिती पानात बीन थेंब
"छेडिती पानात बीन थेंब पावसाचे" --> दाद सर प्लीज सांगाल का यातल 'बीन' या शब्दाचा अर्थ काय आहे?
आणखी एक
"त्या नारळाखाली एकमेकांचे हात हातात घेउन बसली आहेत." ---> नारळाच्या झाडाखाली का बसलेत?
डोक्यांत नारळं पडण्याची भिती नाही का ओ वाटली??
लहानपणी माझ्या आजोळी दोन नारळाची झाडे होती
मला कोणीच त्या झाडांखाली थांबू देत नव्हतं
म्हणायचे डोक्यात पडतील जाऊ नको तिकडे & उभारू नको तिकडे
------------ हा लेख लिहीलात अतिशय धन्यवाद सर
मला फार म्हणजे फार आवडतं हे गाणं