गैरफायदा : संपुर्ण

Submitted by विशाल कुलकर्णी on 26 October, 2009 - 01:46

समस्त माबोकर वाचकांची त्यांच्या सौजन्याचा आणि सहनशिलतेचा गैरफायदा घेतल्याबद्दल मन:पुर्वक क्षमा मागुन पुन्हा एकदा ही कथा पोस्टतोय. यापुर्वीचे दोन भाग क्रमश: आले होते. मध्येच माझ्या सिस्टीममध्ये काही प्रॊब्लेम झाल्याने दुसरा भाग उडवावा लागला. कार्यालयीन कामातील व्यस्ततेमुळे कथा पुर्ण करायला खुपच विलंब झाला. तेव्हा वाचकांची लिंक तुटु नये म्हणुन यावेळी पहिला, दुसरा व तिसरा (अंतीम) असे तिन्ही भाग एकत्र करुन पुन्हा एकदा संपुर्ण कथा टाकतोय. क्षमस्व.

सस्नेह,

विशाल
*****************************************************

"ए पारोश्या, आपण परवा कुठल्या रिसोर्टला भेटलो होतो रे?" ग्लासमधला स्कॉचचा शेवटचा घोट संपवता संपवता रणजीतरावांनी होरमसजीला विचारले. तसा म्हातारा पारशी भडकला.

"ए मर्गठ्ठे के बच्चे, परत जर आपल्याला पारोसा बोलेल ना, तर तुला माज्या बायडीचा गाना ऐकवायला बसवेल हा मी! आन साला कायपण बोलतो काय? आपण कदी भेटला होता काय आजतक या क्लबच्या भायेर?"

"नको रे बाबा, हिटलरचा काँन्संट्रेशन कँप परवडला तुझ्या शिरीनचं गाणं ऐकण्यापेक्षा! पण असं काय करतो होरमस, गेल्या आठवड्यात नाही का भेटलो आपण? गेल्या महिन्यापासुन चाललं होतं आपलं, एक संध्याकाळ या क्लबच्या बाहेर कुठेतरी एन्जॉय करायची म्हणुन! साले तुम्ही लोक तर मागे लागला होता ना? काय रे जोशा, तुला तरी आठवते का नाही?" रणजीतराव बुचकळ्यात पडले होते.

"रणजीत, एक तर तुला स्कॉच चढलीय किंवा तु म्हातारा झालायस. आपले भेटायचे ठरले होते पण ऐनवेळी सॅम आजारी पडल्यामुळे सगळा बेत तुच कॅन्सल केलास ना?" मेजर जोशी रणजीतरावांना वेड्यात जमा करायच्या मुडमध्ये होते.

"आयला खरेच आपण नाही भेटलो? मला हे पुन्हा व्हायला लागलं की काय? साली त्या बापटाची ट्रिटमेंट घेतल्यापासुन गेली कित्येक वर्षे हा त्रास नव्हता झाला यार!" रणजीतराव शुन्यात नजर लावीत म्हणाले.
तसे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या.

"कसली ट्रिटमेंट रे रणजीत?" सॅमने विचारलं.

"अरे बर्‍याचदा मी बर्‍याच गोष्टी विसरुन जातो. आणि खुपवेळा अनेकदा घोकलेली एखादी गोष्ट मी प्रत्यक्ष अनुभवलेली नसतानाही ती अनुभवली आहे असे गृहीत धरुन बसतो. खुप वर्षापुर्वी मी जेव्हा तीन बत्तीला पोलीस ठाण्याला सब इन्स्पेक्टर म्हणुन होतो तेव्हा एका नालायकाने माझ्या या समस्येचा पद्धतशीरपणे फायदा घ्यायचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने माझा पेशाने मानसोपचार तज्ञ असलेला एक मित्र राजेंद्र बापट याच्या मदतीमुळे मी त्या केसमधुन बाहेर पडु शकलो. नंतर बापटनेच मानसोपचार करुन त्या आजारातुन माझी मुक्तता केली होती. गेली कित्येक वर्षे अजिबात त्रास नव्हता, आता पुन्हा सुरु झाला की काय? साला, बापटला फोन करायला पाहीजे आजच!" रणजीतराव थोडेसे चिंतीत झाल्यासारखे वाटले.

"यार रणजीत, वो किस्सा तो सुनाओ...! ऐसा क्या हुवा था!"

सॅमने विचारले तसे रणजीतरावांच्या चेहर्‍यावर एक मिस्किल हास्य आले.

"सॉलीड किस्सा आहे तो. जोशा, मस्त अडकलो होतो मी त्या प्रकरणात.पण उससे पहले गोविंद, और एकेक पेग स्कॉच हो जाये विथ युअर स्पेशल तंदुरी! तोपर्यंत पापड, शेंगा काहीतरी दे."

रणजीतराव त्या आठवणीने बहुदा रंगात आले होते. तसे सगळेच सरसावुन बसले.

बघा, साधारण तीस एक वर्षापुर्वीची घटना आहे ही. नुकतेच पोलीस डिपार्टमेंट जॉईन केले होते मी. त्या दिवशी रात्र पाळी होती. चौकीत रिपोर्ट केला आणि पेट्रोलिंगला म्हणुन बाहेर पडणार एवढ्यात हवालदार कदम सांगत आले.............

..................................................................................................................................................

"निंबाळकर साहेब, तुमच्यासाठी फोन आहे, क्राईम ब्रांचवरुन! कुणीतरी वैद्य म्हणुन साहेब आहेत फोनवर!"

निंबाळकरांनी फोन घेतला...

"नमस्कार सब इन्स्पेक्टर रणजीत निंबाळकर, तीन बत्ती पोलीस चौकी....बोला मी आपली काय मदत करु शकतो?"

"निंबाळकर साहेब, मी इन्स्पेक्टर अजिंक्य वैद्य बोलतोय.... तुम्ही आत्ता वेताळ चौकी पोलीस स्टेशनला येवु शकाल का? एक इमर्जन्सी आहे?"

आवाजात विनंतीवजा जरब होती. त्या येवु शकाल का? मध्ये "याच" असा गर्भित भाव दडलेला होता. पोलीसखाते जॉईन केल्यापासुन निंबाळकरांना अशा सुचना आणि विनंत्यांची चांगलीच सवय झाली होती.

"येस सर, आय विल बी देअर इन हाफ अ‍ॅन अवर!"

"निंबाळकरांनी आपली पी कॅप चढवली, कंबरेचे रिव्हॉल्वर पुन्हा एकदा चेक केले आणि कॉन्स्टेबलला हाक दिली.

"जाधव, गाडी काढा आपल्याला वेताळचौकी पोलीस ठाण्याला जायचय लगेच! इन्स्पे. वैद्यांनी बोलावलय कुठल्यातरी कामासाठी. च्यायला नस्ता ताप डोक्याला." निंबाळकर करवादले.

"आयला तो वैद्यसाहेब लै खडुस माणुस हाये सायेब? जरा जपुनच राहा."

"तु कसा काय ओळखतोस रे या वैद्य साहेबांना?"

"चार वर्षे काढलीत साहेब त्यांच्या हाताखाली. लै कडक माणुस! सोता येक पैसा खाणार न्हाय की दुसर्‍याला खाऊ देणार नाही. दर सा महिन्यांनी फुटबॉल होतो बगा त्येंचा." जाधवने माहिती पुरवली तसे निंबाळकरांचा चेहरा उजळला.

"अरे मुर्खा, मग खडुस काय म्हणतोस? अशा लोकांचीच खरी गरज आहे पोलीसखात्याला. मला आवडेल त्यांना भेटायला.चल लवकर काढ गाडी!"

असा माणुस काहीतरी तसेच कारण असल्याशिवाय आपल्याला तातडीने बोलावणार नाही याची निंबाळकरांना खात्री पटली होती.

मुळात निंबाळकरांचा स्वभाव वैद्यांशी मिळता जुळता असाच होता. घरची प्रचंड श्रीमंती, शेकडो एकर शेती, नोकर-चाकर याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा सोडुन हा माणुस पोलीसखात्यात शिरला होता. गुन्हेगारीबद्दल प्रचंड त्वेष बाळगुन असलेले निंबाळकर म्हणजे चालता बोलता ज्वालामुखीच होते. पण फक्त गुन्हेगारांसाठी, इतरांशी बोलताना मात्र हा माणुस एखाद्या लहान बाळासारखा सरळ असायचा. त्यामुळे इन्स्पे. वैद्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटताच त्यांना भेटायची उत्सुकता लागली होती.
वेताळचौकी पोलीस ठाण्याच्या पायर्‍या चढताना निंबाळकरांच्या मनात इन्स्पे. वैद्यांचाच विचार होता. चौकीच्या दारातच एक पन्नाशीच्या घरातले गृहस्थ एका बाईच्या कडेवर असलेल्या लहान बाळाशी लाडीक आवाजात गप्पा मारीत होते. बाजुच्या बाकावर दोन तीन माणसे, खाली बसलेल्या काही बायकांचे गळा काढुन रडणे असले पोलीस चौकीवर नेहेमी आढळणारे दृष्य इथेही होते. निंबाळकर साहेब आत शिरले. त्यांचा युनिफॉर्म बघुन लगेच तिथल्या हवालदार, कॉन्स्टेबल्सनी त्यांना कडक सॅल्युट ठोकला.

"अरे, वैद्य साहेब कुठे आहेत? त्यांचा फोन आला होता मघाशी मला, मी सब. इन्स्पे. निंबाळकर, तीन बत्ती पोलीस चौकी!" निंबाळकरांनी एका कॉन्स्टेबलला विचारले.

"ते काय साहेब, त्या लहान बाळाशी खेळताहेत ना तेच वैद्य साहेब!"

"अच्छा कुणी नातेवाईक आहेत का त्या बाई त्यांच्या?"

"कुठलं हो साहेब, एका आरोपीची बायको आहे ती. त्याला कालच्याला पकडलाय सायबांनी चोरीच्या आरोपावरुन. सकाळी असा तुडवलाय त्याला. आन आता बगा त्येच्या पोराला कसं लहान पोर होवुन खेळवताहेत."

निंबाळकरांनी वैद्यांसमोर उभे राहुन कडक सॅल्युट मारला...

"सर, आय एम सब. इन्स्पे. निंबाळकर.....!"

"ओह, येस मि. निंबाळकर, ग्लॅड टु मीट यु ! तुमच्याबद्दल ऐकलेय मी त्या चकण्या रंग्याकडुन, छान वाटलं ऐकुन. तुमच्यासारखी माणसं हवीत पोलीसखात्याला."

’चकणा रंग्या’ हे खुप कुप्रसिद्ध नाव होतं. हा माणुस दगडी चाळीसाठी काम करायचा. खंडणी वसुलणे, लोकांना धमक्या देणे, कुणाचे हात पाय तोडणे हा रंग्याच्या हातचा मळ होता. त्याला निंबाळकरांनी गोव्यात जावुन पकडला होता. त्यावेळी निंबाळकरांना गोळी देखील लागली होती.

"रंग्या कुठं भेटला तुम्हाला?" निंबाळकरांनी उत्सुकतेने विचारले "तो तर येरवड्याला होता ना?"

"अशा माणसांना लगेचच जामीन मिळतो निंबाळकर, हीच तर पोलीस खात्याची शोकांतिका आहे. आपण प्राणांची कुरवंडी करुन, प्रसंगी स्वतःचा जिव धोक्यात घालुन गुन्हेगार पकडायचे, आणि मग वरुन कुणाचा तरी फोन आला की सोडुन द्यायचे. जावु द्या मी तुम्हाला दुसर्‍याच एका महत्त्वाच्या कामासाठी बोलावले होते. या आपण चहा घेत घेत बोलु. ३१४४ दोन स्पेशल सांग रे. " इन्स्पे. वैद्यांबरोबरच निंबाळकरही त्यांच्या केबीनमध्ये शिरले.

"बसा निंबाळकर साहेब, सावंतराव त्या गोडबोलेला घेवुन या हो इकडे!"

थोड्याच वेळात केबिनचा दरवाजा उघडला गेला आणि हवालदार सावंतराव एका माणसाला घेवुन आत आले. त्याला बघितले आणि निंबाळकर चमकलेच.

"अरे गोडबोलेदादा तुम्ही?"

"आपण या ग्रुहस्थाला ओळखता निंबाळकर?" वैद्यांचा प्रश्न.

"हो तर, अहो खुप चांगलाच ओळखतो, हे अरविंद गोडबोले. मी राहतो तिथुन जवळच एका चाळीत राहतात. खुप गोड गळा आहे त्यांचा. नामदेवांची भजने खुप उत्तम गातात. पण हे इथे कसे? तुम्ही यांना कुठल्या आरोपाखाली वगैरे अटक तर केलेले नाही ना? वैद्यसाहेब, अहो हा खुप सज्जन माणुस आहे हो!" निंबाळकर एका दमातच सगळे काही बोलुन गेले.

"माफ करा निंबाळकर, पण आम्ही गोडबोलेंना एका खुनाच्या आरोपाखाली अटक केलेय. दोन दिवसांपुर्वी आमच्या परिसरात एका गायिकेचा खुन झालाय. त्या आरोपाखाली आम्ही गोडबोलेंना अटक केलीय."

"पण वैद्यसाहेब......!"

"एक मिनीट निंबाळकर माझं पुर्ण सांगुन झालेलें नाही अजुन. गोडबोलेंनी खुनाची स्विकृती दिलीय....!"

"काय...?" निंबाळकर उडालेच, त्यांनी अविश्वासाने गोडबोलेंकडे पाहीले, त्यांच्याशी नजर मिळाली आणि गोडबोलेंनी आपली नजर झुकवली.

"गोडबोले, अहो काय केलंत हे आणि कशासाठी? अहो मागच्या आठवड्यात तर आपण भेटलो होतो नानाचौकात. तुम्ही विचारलत की पुढच्या गुरुवारी संध्याकाळी माझ्या बरोबर येणार का म्हणुन? अच्छा, म्हणजे तीच ही गायिका तर?"

"एक मिनीट निंबाळकर, ती ही गायिका.....? म्हणजे.....तुम्ही त्या गायिकेला ओळखता? इति वैद्य

"हो तर ! परवा दिवशी आम्ही तिचं गाणं ऐकायला जमलो होतो. प्लीज गैरसमज नको वैद्यसाहेब, त्या बाई चांगल्या गायिका आहेत, थोड्या वयस्कर आहेत, पण गाणं खुप सुरेख गातात."

आता गोडबोले चमत्कृत झाल्यासारखे बघायला लागले निंबाळकरांकडे.

" निंबाळकर साहेब, असं काय करताय? आपण कुठे भेटलो त्या बाईंना. तुम्ही कधी ऐकलात तिचा आवाज...?"

"एक मिनीट गोडबोले, तुम्हाला विचारलाय त्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. निंबाळकर तुम्ही कधी भेटलात त्या बाईंना?" वैद्यांनी संशयित स्वरात विचारले.

"अहो कालच्या गुरुवारी आम्ही तिचं गाणं ऐकलं आणि तिच्या गोड गळ्याबद्दल तिचं अभिनंदनही केलं. ५००० रुपये बिदागीदेखील दिली. तीन जण हजर होतो आम्ही या कार्यक्रमाला."

"काहीतरी काय बोलताय निंबाळकर साहेब, अहो त्या बाईंच्या गाण्याला तुम्ही कुठे होतात.आणि तीन जण कुठले? दोन जण होतो आम्ही फक्त. तुम्ही कुठे होतात? मी आणि अभ्यंकर... आम्ही दोघे तर होतो फक्त."

"काय बोलताय गोडबोले? असं कसं...., रमेशला विचारा ना तुम्ही! तो पण होता ना या कार्यक्रमाला.आणि अभ्यंकर कुठे होता तेव्हा?" निंबाळकर उत्तेजीत स्वरात म्हणाले.

"कोण रमेश?" एकाच वेळी गोडबोले आणि वैद्य दोघांनीही एकच प्रश्न विचारला तसे निंबाळकर चमकले.

"निंबाळकर, तुमच्या माहितीसाठी म्हणुन सांगतो, आजुबाजुच्या लोकांच्या सांगण्यावरुन त्या दिवशी बाईंच्या गाण्याला फक्त दोन माणसे आली होती. त्याच दिवशी मैफील संपल्यावर त्या बाईंचा खुन झाला. त्या दोघांपैकी एकजण हा गोडबोले होता...दुसरा कोण ते आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हते. आज सकाळी मला एक फोन आला आणि त्या अनामिक फोनकर्त्याने मला सांगितले की तो दुसरा माणुस म्हणजे ........ तुम्ही होता! पण गंमत म्हणजे खुनाचा आरोप स्विकारणारे गोडबोले त्यादिवशी तुम्ही त्यांच्याबरोबर होता हे मात्र मान्य करायला तयार नाहीत." वैद्यांनी एका दमात सगळे सांगुन टाकले.

"थोडं मी बोलु साहेब...! गोडबोले मध्येच बोलले.

"गो अहेड!" वैद्यांनी परवानगी दिली, केस भलतीच इंटरेस्टिंग होत चालली होती. गोडबोले म्हणताहेत दोनच माणसे होती आणि आजुबाजुची माणसेही त्यांच्या म्हणण्याची पुष्टी करताहेत. त्यांच्या मते निंबाळकर त्या बैठकीला हजर नव्हते, कुणीतरी अभ्यंकर म्हणुन त्यांच्या सोबत होते. तर निंबाळकरांच्या मते ते स्वतः त्या बैठकीला होतेच पण हा अभ्यंकर मात्र नव्हता, कुणीतरी रमेश नावाचा अज्ञात इसम मात्र हजर होता, ज्याला गोडबोले ओळखत नाही. च्यायला काहीतरी विचित्रच त्रांगडं होतं.

"त्याचं असं झालं साहेब, आमचा म्हणजे मी आणि निंबाळकरसाहेब, एक कॉमन मित्र आहे. शशांक अभ्यंकर. शशांकला गाण्याची भयंकर आवड. या गायिकेचं गाणं ऐकायला जायची टुम देखील त्यानेच काढली होती. तसा मला यात फारसा रस नाही आणि खरे सांगायचे तर शशांकवर माझा फारसा विश्वासही नाही. कारण आमचा मित्र असला तरी तो माणुस तसा फारसा चांगला नाही. पण अगदीच मागे लागला तेव्हा मी एक दिवस निंबाळकरांना विचारले, म्हणलं त्यांच्यासारखा पोलीसखात्यातला माणुस बरोबर असला म्हणजे बरं. पण निंबाळकरांनी सरळ सरळ नकार दिला, ते म्हणाले मला असल्या गोष्टीत स्वारस्य नाही आणि महत्वाचे म्हणजे सद्ध्या मी एका केसमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे मला वेळही नाही. तुम्ही दुसर्‍या कुणालातरी घेवुन जा बरोबर. म्हणुन शेवटी मी एकट्यानेच अभ्यंकरबरोबर जायला तयार झालो. साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा त्या बाईचा मृत्यु माझ्या हातुन जरुर झालाय, पण मी तिचा खुन नाही केला तो निव्वळ एक अपघात होता. झाले असे की मी आणि शशांक त्या बाईंचे गाणे ऐकायला गेलो. बाईचा गळा खुपच सुरेख होता हो. त्यांनी त्या दिवशी असा काही यमन लावला की मी बेहोशच होवुन गेलो. चार्-पाच तास कुठे गेले काही कळालेच नाही. गाणे संपले आणि त्या बाईंचे मानधन द्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आले की शशांक पाकीट घरीच विसरुन आला होता. माझ्याकडेही नेमके चार्-पाचशेच होते. मग शशांकच म्हणाला...

"गोडबोले, तुम्ही दहा मिनीट थांबा इथेच, मी आत्ता पैसे घेवुन येतो"

आणि तो पैसे आणायला म्हणुन निघुन गेला. तो गेल्यावर थोडावेळ ती बाई व्यवस्थित होती, मग अचानक जवळ येवुन बसली आणि अंगचटीला यायला लागली. साहेब, मी संगीतवेडा माणुस! मला गाण्याची नशा पुरेशी आहे, त्यापुढे कुठल्या गोष्टीत मला रस नव्हता. त्यात मी बाल ब्रम्हचारी ! मी त्या बाईंना समजावुन सांगायचा खुप प्रयत्न केला पण बाई ऐकेच ना. सारखी अंगचटीला यायला लागली. म्हणुन मी घाबरुन तिला जोरात धक्का दिला, तशी ती जावुन भिंतीला धडकली आणि खाली पडली. तिच्या डोक्यातुन रक्त येत होते. पण ती जिवंत होती साहेब. मी घाबरुन तसाच तिथुन पळालो. खुप घाबरलो होतो त्यामुळे कुणालाच काही बोललो नाही. नंतर दुसर्‍या दिवशी तुमच्या पोलीसांनी मला पकडलं तेव्हा मला कळालं की बाईंचा मृत्यु झाला होता. पण साहेब एवढं मात्र नक्की की निंबाळकर आमच्याबरोबर नव्हते. बस्स, एवढीच कहाणी आहे माझी आणि तीच सत्य आहे, यात निंबाळकर कुठेही नाहीत. आता निंबाळकर साहेब तुम्ही मला एक सांगा तुम्ही हा जि रमेश, रमेश म्हणताहात तो कोण? कारण मी कुठल्याच रमेशला ओळखत नाही.

गोडबोलेंचा शेवटचा प्रश्न निंबाळकरांसाठी होता.

निंबाळकरांच्या चेहर्‍यावर भले मोठे प्रश्नचिन्ह होते.

"गोडबोलेदादा, तुम्ही का खोटे बोलताय मला कळत नाही? तुमच्याबरोबर मी आणि रमेश दोघेही त्या बैठकीला होतो आणि अभ्यंकर मात्र नव्हता. त्याला नेमके त्या दिवशी दिल्लीला जायचे काम निघाले म्हणुन तो येवु शकला नाही.आणि रमेशला तुम्ही ओळखत नाही असे कसे म्हणता? तुम्हीच तर त्याची आणि माझी ओळख करुन दिली होती. ईलेक्ट्रॉनिक गॅझेटसचे पीसीबीज बनवतो तो. मेकर्स टॉवर्समध्ये ऑफीस आहे त्याचे."

"मी तुम्हाला सांगतो, वैद्यसाहेब काय झाले ते! त्यादिवशी दादांनी मला गाण्याबद्दल विचारले आणि मी नकार दिला, कारण खरोखरच मी एका केसमध्ये व्यस्त होतो. आणि मला गाण्यातलं खरंच फारसं काही कळत नाही. जे कानाला चांगलं वाटतं ते गाणं छान एवढेच माझे या क्षेत्रातले ज्ञान. पण नंतर राहुन राहुन मला वाटायला लागलं की आपण गोडबोलेदादांना नाही म्हणायला नको होतं कारण त्यांनी एवढ्या विश्वासाने माझी सोबत मागितलेली. पण दुसरा पर्यायच नव्हता मी खुपच व्यस्त होतो. पण मनाला ती खुटखुट लागुन राहीली होती. त्यातच मला रमेश भेटला, आधीतर मी त्याला ओळखलेच नाही. पण नंतर त्यानेच परेडच्या वेळी झालेल्या ओळखीची आठवण करुन दिली तेव्हा माझ्या लक्षात आला. तो खुपच आग्रह करायला लागला. म्हणाला...

"निंबाळकरसाहेब, गोडबोलेदादांचं गाण्याचं वेड तुम्हाला माहीतच आहे. पण एकटे त्या अभ्यंकरसाहेबांबरोबर जायची त्यांची तयारी नव्हती. म्हणुन तुम्हाला विचारले त्यांनी. तुम्ही नको म्हणालात म्हणुन खुपच वाईट वाटलं त्यांना. थोडासा वेळ काढा ना साहेब, तासभर थांबुन निघुन आलात तरी चालेले, तेवढेच त्यांना बरे वाटेल."

त्यानंतर रमेश, दोन वेळा भेटला मला. प्रत्येक वेळी त्याचा आग्रह वाढलाच होता. शेवटी मी गोडबोलेदादांसाठी म्हणुन जायचे कबुल केले. संध्याकाळी सहा वाजता आम्ही तिथे गेलो.

"तुम्ही गोडबोलेंना कळवले होते की तुम्ही येताय म्हणुन?" मध्येच इन्स्पे. वैद्यसाहेबांनी शंका विचारली.

"नाही ना! रमेश म्हणाला की मी काहीही करुन गोडबोलेदादांना अभ्यंकरसाहेबांबरोबर घेवुन येतो. आत्ताच त्यांना सांगायलाच नको तुम्हीही येताय म्हणुन. तुम्हाला अचानक तिथे बघितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल. मी बरं म्हटले."

त्यानंतर चार पाच वेळा रमेशचा फोन आला, पहिल्यांदा काहीतरी वेळ बदलली म्हणुन. मग एकदा सहजच आठवण करुन द्यायला म्हणुन. मग एकदा मी तुम्हाला घ्यायला येतो हे सांगायला म्हणुन. शेवटी शशांकला ऐनवेळी दिल्लीला जायचे असल्याने त्याला यायला जमणार नाही आणि आपण तिघेच जाणार आहोत हे सांगायला म्हणुन. पण शेवटी आम्ही गेलो. आधी रमेश मला घेवुन त्या बाईंच्या घरी सोडुन आला आणि मग जावुन गोडबोलेदादांना घेवुन आला. आम्हाला वाटल्याप्रमाणेच गोडबोलेदादांना आश्चर्याचा धक्काच बसला मला तेथे पाहुन. मग ठरल्याप्रमाणे मी अर्धा-पाऊणतास तिथे बसुन निघुन आलो. त्यानंतर तिथे काही घडले असेल तर मला त्याची कल्पना नाही.

इन्स्पे. वैद्यांनी गोडबोल्यांकडे पाहीले. ते डोके धरुन बसले होते.त्यांनी एकदा मान वर करुन अविश्वासाने निंबाळकरांकडे पाहीले आणि वैद्यांकडे वळुन म्हणाले.

"साहेब, निंबाळकर मला धाकट्या भावासारखे आहेत. मी असा सडाफटिंग माणुस. सगळं आयुष्य एकट्याने गेलेला. या माणसाने जीव लावला. पण आज निंबाळकर खोटे का बोलताहेत मला कळत नाही. त्यादिवशी मी आणि शशांक दोघेच होतो. आणि नंतर काय झालं ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. मी या मृत्युला कारणीभुत झालेलो असलो तरी हा खुन मी जाणुनबुजुन केलेला नाही, तर तो एक दुर्दैवी अपघात होता. बस्स यापुढे मला काही सांगायचे नाही."

"ओक्के, आपण एक काम करु या? आपण आता थेट अभ्यंकरच्या घरी धाड मारुया. निंबाळकर तुम्ही चला माझ्याबरोबर. ३१४४ गोडबोलेंना सेलमध्ये घेवुन जा. गोडबोले आपण आम्ही परत आल्यावर बोलु.त्या रमेशबद्दलही तेव्हाच बोलु."

"साहेब मी अजुनही सांगतो मी कुठल्याही रमेशला ओळखत नाही, त्याची निंबाळकरांसोबत मी ओळख करुन दिलेली नाही." इति गोडबोले.

"ठिक आहे, आपण बोलु नंतर, निंबाळकर एक करा आपण अभ्यंकरच्या घरी भेट देवुन परत आलो की तुम्ही आमच्या स्केच आर्टिस्टला भेटा. त्याला तुमच्या या रमेशबद्दल तुम्हाला आठवते ती सर्व माहिती देवुन त्याचे एक स्केच तयार करुन घेवु.तुम्हाला या रमेशबद्दल असेल ती सर्व बारिकसारिक माहिती इथे देवुन ठेवा. तो दिसतो कसा, बोलतो कसा? चालतो कसा? शरीराची, चेहर्‍याची ठेवण, त्याच्या काही सवयी, लकबी तुम्हाला आठवत असतील तर, त्याचा पत्ता, फोन नंबर सर्व माहिती हवी. हा रमेश खुप महत्त्वाचा वाटतोय मला. गोडबोलेंनी ते स्केच ओळखले तर ठिकच नाही तर ते आपण नरिमन पॉईंटच्या परिसरात दाखवुन रमेशचा ट्रेस काढण्याचा प्रयत्न करु. इज दॅट क्लिअर?"

वैद्य म्हणाले आणि चौकीच्या बाहेर पडले निंबाळकरही त्यांच्या मागेच बाहेर पडले.

इन्स्पे. वैद्य आणि निंबाळकर शशांक अभ्यंकरच्या ब्लॉकवर पोहोचले तेव्हा संध्याकाळचे चार वाजायला आले होते.

वैद्यांनी बेलचे बटन दाबले तसा आत कुठेतरी गायत्री मंत्राचा ध्वनी उमटला. काही क्षणानंतर दार उघडले. दारात एक तरुण स्त्री उभी होती.

"कोण पाहीजे, हे घरी नाहीत!"

"हे बघा बाई मी शशांकचा मित्र आहे आणि त्याच्याकडे आमचे थोडेसे काम होते, म्हणुन आलो होतो." वैद्यांनीच उत्तर दिले.

"हे तर गेल्या शुक्रवारीच दिल्लीला गेलेत. उद्या परवाच येतील आता परत."

इन्स्पे. वैद्यांनी निंबाळकरांकडे पाहीले... निंबाळकरांनी डोळे मिचकावले. त्यातुन "बघा, मी सांगितलं होतं ना?" असा अर्थ अभिप्रेत होत होता.

"कठीण आहे निंबाळकर, तुम्ही म्हणताय त्यावर विश्वासही ठेवता येत नाहीये. कारण आजुबाजुचे लोक सांगताहेत की त्यादिवशी फक्त दोनच माणसांना त्या बाईंच्या घरात शिरताना पाहण्यात आलेलं होतं. आणि त्यांच्यापैकी कुणीही परत जाताना लोकांनी पाहीला नाही. बाईंच्या घरासमोरचा पानवाला साक्ष आहे या गोष्टीला. पण हे जर खरं असेल तर....जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गोडबोले निर्दोष असतील तर मग दुसरे थेट संशयीत तुम्हीच आहात. माफ करा निंबाळकर, पण गोडबोलेंइतकेच तुम्ही देखील संशयाच्या चक्रात अडकताय. कारण का कोण जाणे मला ठामपणे असे वाटतेय, की गोडबोलेंनी हा खुन केलेला नाही!"

"आय होप, यु विल को-ऑपरेट. एवढी केस सॉल्व्ह होइपर्यंत तुम्ही शहर सोडुन जाणार नाही आहात्. कारण आता तुम्हीही माझ्या लिस्टवर आहात. आणि हो, प्लीज लक्षात घ्या, मी इन्क्वायरी बोलुन केस सॉल्व्ह होईपर्यंत तुम्हाला सस्पेंड करण्याची मागणीही करु शकलो असतो. पण तुमचे आतापर्यंतचे रेकॉर्ड जर लक्षात घेतलं तर मला एक अंधुकशी आशा वाटतेय तुमच्या निर्दोष असण्याबद्दल. त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवुन मी तसे काहीही करणार नाहीये. प्लीज, को-ऑपरेट." वैद्यांचा आवाज कमालीचा गंभीर झाला होता.

"थॅंक यु सर, काळजी करु नका, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. फक्त एक विनंती आहे. ऑफ द रेकॉर्ड मीही थोडासा तपास केला तर चालेल?" निंबाळकरांनी विनंतीच्या स्वरात विचारले.

"नो....! अजिबात नाही. माफ करा निंबाळकर, पण जर खरोखर तुमचा यात काही हात असेल तर तुम्ही पुरावे नष्ट करु शकता. तेव्हा घटनास्थळ किंवा संबंधितांच्या आसपासही फिरकण्याची मी तुम्हाला परवानगी देणार नाही. आणि माझं तुमच्यावर पुर्ण ल़क्ष असेल. तुम्ही काही दिवस रजा घेवुन घरीच का बसत नाही? ती सोय मी करेन." इन्स्पे. वैद्य. ठामपणे नकार देते झाले.

"ठिक आहे सर! अ‍ॅज यु विश!" निंबाळकरांनी ओढलेल्या स्वरात स्विकृती दिली आणि वैद्यांची रजा घेतली.
त्यावेळी वैद्यांनी निंबाळकरांच्या डोळ्यांतली ती आगळी-वेगळी चमक पाहिली असती तर ......!
...................................................................................................................................................

इन्स्पे. वैद्यांनी चष्मा काढुन हातात घेतला आणि रुमालाने त्याच्या काड्या साफ करायला लागले. त्यांचा हा विधी जवळजवळ दहा मिनीटे चालु होता. निंबाळकर त्यांच्याकडे पाहातच उभे होते. रुमालाने चष्म्याच्या काचा साफ करणे माहीत होते पण काड्या....? त्याही इतका वेळ? निंबाळकर चमत्कारिकरित्या वैद्यांकडे पाहात होते. तेवढ्यात वैद्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि मग आपल्या कृतीकडे. तसे ते मोठ्याने हसले पुढे होवुन त्यांनी निंबाळकरांच्या खांद्यावर एक हलकीच टपली मारली....

"अरे असे वेड्यासारखे माझ्याकडे बघु नका निंबाळकर. ती सवय आहे माझी, मी विचारात पडलो की काचांच्या ऐवजी काड्या पुसायला लागतो. लक्ष देवु नका तुम्ही." निंबाळकरांच्या चेहर्‍यावरचा तणाव थोडा कमी झाला आणि डोळ्यात हास्य आले.

"पण निंबाळकर, गुंता अजुन आहे तसाच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अभ्यंकर तुमच्याबरोबर नव्हता पण कुणी रमेश तिथे होता. अँड दॅट इज राईट ! अभ्यंकर खुनाच्या पाच्-सहा दिवस आधीच दिल्लीला गेलेला आहे आणि अजुनही दिल्लीतच आहे. पण गोडबोले म्हणताहेत की खुन त्यांनी केलाय आणि त्याआधी थोडावेळ अभ्यंकर त्यांच्या बरोबर होता. सरप्रायजिंग !काहीतरी घोळ आहे."

"सर गोडबोलेदादांनी खुन केलाय असे कबुल नाही केलेले. या मृत्युला ते कारणीभुत आहेत हे मान्य केलेय त्यांनी. पण हा खुन त्यांनी जाणुनबुजुन केलेला नाहीये. तो निव्वळ एक अपघात होता." निंबाळकरांच्या शब्दांत गोडबोलेंच्या विषयी प्रचंड सहानुभुती होती.

"निंबाळकर तुम्हाला कळत कसं नाहीये.खुनाची शक्यता दोघांकडेच बोट दाखवतेय एक तर गोडबोले आणि दुसरे तुम्ही. जर तुम्ही त्या दिवशी तिथे हजर होता...तर मग त्या गायिकेचा खुन तुम्ही.....? आय एम कन्फ्युज्ड मि. निंबाळकर. कारण मला का कोण जाणे पण खात्री वाटतेय की हा खुन गोडबोलेंनी केलेला नाही. ते कुणालातरी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करताहेत, वाचवण्याचा यत्न करताहेत. पण कुणाला? अभ्यंकरला तर ते वाचवणार नाहीत कारण त्यांचं त्याच्याविषयीचं मत तेवढंसं चांगलं नाही. तुम्हाला मात्र ते धाकट्या भावासारखे मानतात्.मग ते तुम्हाला तर........? पण तसं असेल तर बोट थेट तुमच्याकडे वळतय?

"हेलो वैद्यसाहेब, गुड मॉर्निंग!" केबीनमध्ये एका नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला.पांढराशुभ्र शर्ट, कार्बन कलरची कॉटन ट्राउझर आणि चेहर्‍यावर एक प्रसन्न हास्य.

"अरे वा, अलभ्य लाभ, या डॉ. बापट, आज आमच्याकडे कशी काय फेरी?" वैद्य जागेवरुन उठुन अगदी प्रसन्नपणे पुढे झाले तसे निंबाळकरांनी वळुन त्या व्यक्तीकडे पाहीले. त्या दोघांची नजरानजर झाली आणि डॉ. बापटांचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने फुलुन आले.

"अरे रणजीत, तु इथे काय करतो आहेस? तीन बत्तीवरुन हाकलला की काय तुला?" आणि पुढे होत त्यांनी जोरात निंबाळकरांच्या पाठीत एक जोराची थाप मारली. तसे वैद्यसाहेब चमकले...

"तुम्ही ओळखता निंबाळकरांना?"

उठुन उभे राहीलेल्या निंबाळकरांच्या खांद्यावर हात टाकत बापट म्हणाले....

"ओळखतो? अहो गेल्या दहा वर्षाची मैत्री आहे आमची. काय रे रंज्या....बरोबर ना!"
निंबाळकरांनी हसुन मान डोलावली ..

"वैद्यसाहेब, आमची मैत्री कॉलेजपासुनची आहे. कॉलेजच्या लायब्ररीतली म्हणा हवेतर. पुढे बापट्याने सायकॉलॉजी निवडलं आणि मी राज्यशास्त्र घेवुन बी.ए. ला प्रवेष घेतला. पण आमची मैत्री मात्र वाढतच गेली. पुढे मी इकडे पोलीसात शिरलो आणि बापट्या आज शहरातला नामांकित मानसोपचारतज्ञ म्हणुन ओळखला जातोय."

"वैद्यसाहेब, अहो इथे या भागात माझा एक पेशंट असतो त्याच्याकडे आलो होतो. म्हणलो या भागात आलोच आहे तर तुम्हाला पण भेटुन जावं. एनी वेज रणज्या, परवा सारखी आणखी एक पार्टी पाहीजे हा आपल्याला. साला अशा पार्ट्या तुझ्यासारख्या जहागिरदारानेच द्याव्यात. मजा आला यार! तोपर्यंत वैद्यसाहेब तुम्ही एक चहा तरी पाजा या गरीब दोस्ताला" डॉ. बापटांनी तिथेच एका खुर्चीवर बैठक मारली..."एनी वे रणजीत, तु इथे कसा काय? की आजकाल वैद्यसाहेबांच्या हाताखाली आहेस. नशीबवान आहेस लेका. या माणसाबरोबर काम करणं म्हणजे नशिबाचीच गोष्ट आहे."
तसे वैद्य एकदम संकोचुन गेले.." अरे वा, चहा तर पाजुच की! पण कुठल्या पार्टीबद्दल बोलताय तुम्ही? कधी झाली ही पार्टी? जरा आम्हालाही बोलवत चला तुमच्या पार्ट्यांना."

"सॉरी वैद्यसाहेब, पण तुमच्यासारख्या माणसाला आमच्या पार्टीत बोलावण्यात काय पॉईंट नाही बघा. आमच्या पार्ट्या सोवळ्यातल्या असतात. म्हणजे खायला मटण, चिकन, मासे आणि प्यायला व्हिस्की किंवा रम! पाणी बिणी आम्ही पित नाही. अशा पार्टीला तुम्ही येणार काय? असो, अहो कालच्या गुरुवारी माझ्या पत्नीचा वाढदिवस होता. हा रणज्या तिला बहिण मानतो म्हणुन पार्टी त्याने दिली होती. दुपारी पाच वाजल्यापासुन रात्री ११.३० पर्यंत ताजला धमाल केली बघा आम्ही." बापट बहुदा अजुनही त्याच धुंदीत असल्यासारखे बोलले.

"गुरुवारी, कालच्या गुरुवारी? आर यु शुअर? निंबाळकर तुमच्याबरोबर होते मध्यरात्रीपर्यंत?" वैद्य खाडकन उठुन उभे राहीले.

त्यांच्या वाक्याचा संदर्भ लक्षात आला आणि निंबाळकर ही उठुन उभे राहीले...

"बापट्या, काहीतरीच काय्...गुरुवारी तर मी... हे कसं शक्य आहे?'

तसे बापटांनी चमकुन त्यांच्याकडे बघीतले. "काय बोलतोस रणज्या, आपण तिघेही बरोबरच तर होतो ना ! अरे सुमनला विचार ना? आणि सुमनच कशाला? ताजचा स्टाफ देइल ना याची साक्ष! अहो एक पुर्ण स्वतंत्र सुटच रिझर्व केला होता रणज्याने या पार्टीसाठी. पण झालेय काय? आणि तुम्ही दोघेही असे काय बघताय माझ्याकडे? मला कोणी जरा निट सांगेल काय?"

बापट चांगलेच बुचकळ्यात पडले होते. वैद्यांनी त्यांना सर्व कथा-कहाणी समजावुन सांगितली.

"पण आता तुम्ही म्हणताय ते जर खरे असेल, अर्थात ते आम्ही ताजच्या स्टाफकडुन सिद्ध करुन घेवुच पण जर ते सत्य असेल तर मग निंबाळकर तुमच्याबरोबर होते. पण मग ते खोटे का सांगताहेत की ते त्यादिवशी खुनाच्या ठिकाणी गेले होते म्हणुन."

"ओह दॅट्स द स्टोरी ! रंज्या, मला वाटतं तुझाच जुनाच प्रॉब्लेम पुन्हा डोकं वर काढतोय. आणि त्याबद्दल माहिती असलेल्या कुणीतरी त्याचा पद्धतशीरपणे गैरफायदा घेतलाय तुला या खुन खटल्यात अडकवण्यासाठी." बापटांनी शांतपणे रणजीतकडे पाहीले आणि मान डोलावली.

"मला सांग रणजीत, या काही दिवसात कुणी एखादी व्यक्ती तुला सारखी सारखी भेटुन या तुमच्या प्रस्तावीत बैठकीबद्दल आठवण करुन देत होती का? म्हणजे फोन करुन , किंवा काहीही कारण काढुन पण पुन्हा पुन्हा आपल्याला त्या दिवशी त्या गायिकेचे गाणे ऐकायला जायचे आहे. याची आठवण करुन देत होते का?"

"रमेश! रमेशच तो, त्या दोन दिवसात तोच किमान सात आठ वेळा तरी फोनवर बोलला असेल माझ्याशी. दोन वेळा प्रत्यक्ष भेटलासुद्धा मला. बापट्या, रमेशच्या म्हणण्याप्रमाणे गोडबोलेदादांनीच माझी त्याच्याशी ओळख करुन दिली होती. पण गोडबोलेदादा तर म्हणताहेत की ते रमेशला ओळखतच नाहीत. खरे सांगायचे तर आता मलाही खात्रीने आठवत नाहीये की यापुर्वी आम्ही नक्की कुठे आणि केव्हा भेटलो होतो ते. " निंबाळकरांच्या चेहर्‍यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह होते.

"येस, गोची इज देअर ओन्ली! वैद्यसाहेब, या रमेशला भेटायला हवे एकदा. बहुदा त्याला रणजीतच्या आजाराबद्दल कुठुनतरी कळाले असावे आणि त्याचा गैरफायदा घेवुन तो पद्धतशीरपणे यात अडकवायला पाहतोय रणजीतला. बाय द वे रणजीतची समस्या अशी आहे की बर्‍याचदा तो घडुन गेलेल्या बर्‍याच गोष्टी विसरुन जातो आणि खुपवेळा अनेकदा घोकलेली एखादी गोष्ट मी प्रत्यक्ष अनुभवलेली नसतानाही ती अनुभवली आहे असे गृहीत धरुन बसतो, प्रत्यक्ष घडलेली नसतानाही ती घडलेली आहे असे धरुन बसतो. हा अपसेट माईंडचाच एक प्रकार आहे. खुप कमी लोकांना हा आजार होतो. अर्थात त्याला आजार नाही म्हणता येणार. ही माणसं मनाने फार मोकळी आणि सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे आजुबाजुच्या घटनांमध्ये नकळत स्वतःही गुंतुन जातात. परवाच पाच सहा महिन्यापुर्वीच मी रणजीत वर उपचार केले होते. पण बहुदा पुन्हा ही व्याधी वर आलेली दिसते. या रमेशला भेटुच आपण. रणज्या, तुझ्याकडे पत्ता असेल ना त्याचा?

"नाही रे पत्ता नाही, फोन नंबर आहे. पण गेले काही दिवस नॉट रिचेबलच येतोय? हा रमेशही कुठे गायब झालाय कोण जाणे? " निंबाळकर उद्गारले.

"निंबाळकर, तुम्ही दिलेल्या वर्णनावरुन आमच्या आर्टिस्टने बनवलेला रमेशचा फोटो गोडबोलेंनी तर ओळखला नाहीच पण त्या फोटोच्या कॉपीज घेवुन माझ्या माणसांनी नरिमन पॉइंट आणि आसपासचा सगळा भाग पिंजुन काढला. मेकर टॉवरच्या सगळ्या बिल्डिंगमधले ऑफीसेस चेक केले. त्यात इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटॅड एकुण अकरा कंपन्या आहेत. पण यापैकी एकाही कंपनीत तुमचा हा रमेश काम करत नाही. तिथे खुप चौकशी केली. पण तुम्ही केलेल्या वर्णनाच्या माणसाला पाहीलेला किंवा ओळखणारा एकही माणुस आम्हाला सापडला नाही. हा रमेश एक कोडे बनत चाललाय निंबाळकर? कापुरासारखा विरघळुन गेलाय की काय कुणास ठाऊक?"

तिघेही विचारात पडले होते. मग हा रमेश आहे कोण आणि कुठे गेला? आणि त्याचे निंबाळकरांशी काय वैर असावे? तो निंबाळकरांना यात गोवण्याचा प्रयत्न का करतोय? विचाराच्या नादात डॉ. बापटांचे टेबलावरच्या फाईलमधुन बाहेर आलेल्या एका फोटोकडे लक्ष गेले.

"अरे शशांकचा फोटो? तुम्ही जो अभ्यंकर म्हणताय तो शशांक अभ्यंकर का?"

"हो रे तोच, त्या उपचारांच्यावेळी तुझ्या क्लिनीकमध्येच ओळख झाली होती माझी त्याच्याशी." निंबाळकर सांगु लागले आणि तेवढ्यात एक गोष्ट लक्षात येवुन चमकले...

"बापट्या, अरे माझ्या आजाराबद्दल शशांकला माहिती आहे. त्यावेळी बोलता बोलता मी सांगितले होते त्याला."

तसे वैद्यसाहेब ताडदिशी उभे राहीले.

"निंबाळकर, कदाचित तो रमेश या अभ्यंकरचाच माणुस असु शकेल. मला तर वाटायला लागलेय की मला आलेला तो अनामिक फोनदेखील या रमेशचाच असावा. कोण जाणे , कदाचित शशांक अभ्यंकरनेच तो रमेशकडुन करवला असु शकेल. या शशांक अभ्यंकरला उचलायलाच हवे. त्याआधी ताजच्या स्टाफकडुन कन्फर्मेशन हवेय मला !"

पुढचे निर्णय त्यांनी पटापट घेतले.

एक टिम त्यांनी लगोलग ताजला रवाना केली आणि ....

"हवालदार, त्या बाईंचे पोस्टमार्टेम रिपोर्ट, तसेच त्यावेळचे फिंगरप्रिंट रिपोर्ट आले का?

"आत्ताच आलेत साहेब. तिथे मिळालेल्या फिंगरप्रिंटसमध्ये गोडबोलेंच्या, मयत बाईंच्या आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आहेत. "

"अज्ञात व्यक्ती? आणि निंबाळकरसाहेबांचे फिंगरप्रिंट्स?" वैद्यांनी निंबाळकरांकडे पाहत विचारले.

"नाही साहेब, निंबाळकर साहेबांच्या बोटाचे ठसे नाहीत सापडले." हवालदार उत्तरला.

"सब. इन्स्पे. वाकनीस तुम्ही ताबडतोब दिल्लीला जा. अभ्यंकरला भेटा, त्याला परत मुंबईत घेवुन यायची जबाबदारी तुमची. आणखी एक गुरुवारी संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत तो कुठे होता, कुणाबरोबर होता याचे सर्व डिटेल्स हवेत मला. आणि हो मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणच्या विमानतळावर चौकशी करा. त्याचे फिंगरप्रिंटस.......? ते महत्त्वाचे आहेत! त्यादिवशी खुनाच्या ठिकाणी प्रेताजवळ सापडलेल्या सर्व वस्तु, घटनास्थळाचे फोटो मला पुन्हा एकदा पाहायचे आहेत. ते परत एकदा माझ्याकडे आणा."

वैद्य प्रचंड उत्तेजीत झाले होते.

"साहेब, महत्त्वाची बातमी तर पुढेच आहे.... सब्.इन्स्पे. वाकनीस थोडेसे पुढे टेबलावर वाकत म्हणाले.....

"सर, पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार, त्या बाईचा मृत्यु डोक्यातुन झालेल्या रक्तस्त्रावामुळेच झालाय. पण डोकं चुकुन आदळलेलं नाहीये भिंतीवर. कुणीतरी ते मुद्दाम भिंतीवर आपटुन फोडलय. "

इन्स्पे. वैद्यांचा चेहरा विचारक्रांत झाला.

"येस वाकनीस, पण का कुणास ठाऊक, मला खात्री आहे..., कुठेतरी पाणी मुरतेय, हा खुन गोडबोलेंनी केलेला नाहीये. वाकनीस तुम्ही सुटा लगेच. प्लेनने गाठा दिल्ली आणि अभ्यंकरची पुर्ण माहिती हवी आहे मला! कम ऑन शुट नाऊ !"

"निंबाळकर, काही तर्क आहेत माझ्या मनात... ते जर खरे ठरले तर दोन तीन दिवसात खरा खुनी गजाआड असेल. तो रमेश सापडायला हवा सालाSSSSS !. सगळे प्रश्न पटकन सुटतील. मी त्याचे वर्णन ब्युरोला दिलेय. ते लवकरच शोधुन काढतील त्याला. मग मी आहे आणि खुनी आहे. निंबाळकर, मी उद्या पुन्हा एकदा खुनाच्या ठिकाणची तपासणी करणार आहे, येणार का तुम्ही? " इन्स्पे. वैद्य चांगलेच उत्तेजीत झाले होते.

तसे निंबाळकर आनंदीत झाले, ज्याअर्थी इन्स्पे. वैद्य त्यांना आपल्या बरोबर येण्याची ऑफर दिली त्याअर्थी त्यांनी निंबाळकर निर्दोष आहेत हे मान्य केले होते.निंबाळकरांनी सुटकेचा श्वास सोडला आणि बापटांकडे बघुन नेहेमीप्रमाणेच आनंदाने डोळे मिचकावले.

"चला वैद्य साहेब, माझा निश्चितच उपयोग होइल तुम्हाला."

"ठिक आहे निंबाळकर, उद्या दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान या तुम्ही. सकाळी मला काही कामे आटपुन घ्यायची आहेत. गोडबोलेंशी पुन्हा एकदा बोलायचे आहे. आय थिंक, आता तरी ते माझ्याशी खरे बोलतील. वाकनीसकडुन ही रिपोर्ट मिळेलच उद्या दुपारपर्यंत. त्याआधी त्या शशांक अभ्यंकरबद्दल आणखी काही माहिती मिळते का ते ही पाहायचे आहे. तुम्ही एक काम करा निंबाळकर तो रमेश, त्याचा काही सुगावा लागतो का ते पाहा. आपली सगळी रेकॉर्डस चेक करा. कदाचित तो त्यात सापडु शकेल.

"असो डॉ. बापट, धन्यवाद. तुमच्या या खुलाशामुळे आता आम्हाला एका स्पेसिफिक मार्गाने जाता येइल. थँक्स अ लॉट!"

"अरे काय हे वैद्यसाहेब, अहो माझं कर्तव्यच केलं मी. आणि त्यामुळे माझाच फायदा झाला ना. माझा जिवलग मित्र संशयाच्या जाळ्यातुन बाहेर आला. आणि माझ्या उपकाराच्या जाळ्यात सापडला. आता पार्टी ! काय रणज्या कधी जायचं ताजला !"

बापटांनी निंबाळकरांकडे बघत डोळे मिचकावले तसे वैद्य आणि निंबाळकर दोघेही हसायला लागले.
..................................................................................................................................................

दोन दिवसानंतर.................

स्थळः वैताळचौकी पोलीस स्टेशन, वैद्यसाहेबांची केबीन.

वेळ : दुपारी १२ ते १ च्या दरम्यान

उपस्थित लोक: इन्स्पे. अजिंक्य वैद्य, सब. इन्स्पे. रणजीत निंबाळकर, सब्.इन्स्पे. वाकनीस, गोडबोले आणि शशांक अभ्यंकर !

"वेल फ्रेंड्स , गुड आफ्टरनुन ! सो वुइ आर कमिंग टु द कन्क्लुजन टुडे !काँग्रॅट्स !"

ही केस खरेतर अतिषय साधी पण तरीही चमत्कारिक होती. खुन झालाय. पकडला गेलेला व्यक्ती खुनाची जबाबदारी घेतोय, कबुली देतोय. कदाचित त्यामुळेच सुरुवातीला मी थोडासा निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा म्हणा हवे तर पण झाला माझ्याकडुन. त्याबद्दल मनापासुन क्षमस्व. पण मी त्या अनामिक फोनकर्त्याचे मनापासुन आभार मानतो ज्यांने निंबाळकरांना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. खरेतर तो कोण आहे आणि त्याने असे का केले हे अजुनही गुढच आहे. कारण निंबाळकरांच्या विरोधात जाईल असा कुठलाच प्रथमदर्शनी पुरावा आम्हाला सापडला नाही. मग या प्रकरणात निंबाळकरांना गुंतवायचे कारण काय? मला वाटते गोडबोले या गोष्टीवर थोडाफार प्रकाश टाकु शकतील."

इन्स्पे. वैद्यांनी प्रास्ताविक केले आणि सुत्रे तात्पुरती गोडबोलेंच्या हातात दिली.

गोडबोलेंनी बोलायला सुरुवात केली.

"सर, आतापर्यंत मी तुम्हाला अर्धवट किंबहुना चुकीची माहिती दिली अर्थात त्याला बळकट असे कारण होते. ठरलेल्या दिवशी आमचे म्हणजे मी आणि शशांक आम्हा दोघांचे त्या गायिकेकडे जाण्याचे ठरले होते. मी एकटा पुढे जाणार होतो. शशांक त्याच्या ऑफीसवरुन थेट येणार होता. पण बहुदा तो आधीच दिल्लीला निघुन गेला. पण याची मला कल्पनाच नव्हती. इनफॅक्ट गुरुवारी सकाळी मला शशांकचा फोनही आला होता संध्याकाळच्या भेटीचे स्मरण करुन देण्यासाठी."

"सर मी कुठलाही फोन केला नव्हता! मी माझ्या महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीतल्या ज्या हॉटेलात मी उतरलो होतो तिथे चौकशी करा म्हणजे तुमची खात्री पटेल की ज्या दिवशी त्या बाईचा खुन झाला त्या दिवशी मी दिल्लीत होतो, माझ्या हॉटेलातील माझ्या रुममध्ये असहाय होवुन पडुन राहीलो होतो. कारण माझी तब्येत बिघडली होती."

शशांक मध्येच बोलला तसे वैद्य उचकले.

"तुला बोलायची पुरती संधी दिली जाईल अभ्यंकर, सद्ध्या गोडबोलेंना बोलु दे. गोडबोले तुमचे चालु द्या.....!"

"तर त्या दिवशी मी तिथे पोचलो. त्या बाई आणि दोन साजिंदे तिथे होते. पण शशांक अजुन आलेला नव्हता. तो येणार नव्हताच कारण तो तर दिल्लीत होता. पण ही गोष्ट मला माहीत नसल्याने मी त्याची वाट बघत थांबलो. जवळ जवळ साडे सात पर्यंत मी त्याची वाट बघीतली. त्याला मोबाईलवर गाठायचा प्रयत्नही केला. पण त्याचा मोबाईल सारखा नॉट रिचेबल येत होता. शेवटी कंटाळुन मी बाईंची माफी मागीतली. त्या माझ्या एकट्यासाठीही गायला तयार होत्या. पण मी नकार दिला. मी सांगितले की शशांकला घेवुन मी पुन्हा येइन त्यावेळेस तुमचे गाणे ऐकु आणि मी तिथुन बाहेर पडलो. अर्ध्या रस्त्यावर आल्यावर माझ्या लक्षात आले की मी माझी छत्री बाईंच्या घरीच विसरुन आलो होतो. म्हणुन छत्री घेण्यासाठी म्हणुन मी परत फिरलो. बाईंचे घर त्या बिल्डिंगमध्ये तिसर्‍या माळ्यावर आहे. मी लिफ्टनेच वर गेलो.त्यामाळ्यावए एकुण सहा ब्लॉकस आहेत. लिफ्ट थोडी एका बाजुला आहे. लिफ्टपासुन बाईंचे घर पाचव्या नंबरवर आहे.लिफ्टमधुन बाईंच्या घराचा दरवाजा अर्धवट दिसतो. कॉरीडॉरच्या दुसर्‍या टोकाला म्हणजे लिफ्टच्या अगदी विरुद्ध बाजुस जिना आहे. मी लिफ्टमधुन बाहेर पडलो आणि पडताना माझे समोर लक्ष गेले. एक व्यक्ती बाईंच्या घरातुन घाई-घाईने बाहेर पडली आणि जवळ जवळ पळतच जिन्याकडे गेली. अंधार होता पण मी त्या व्यक्तीला ओळखले. ते निंबाळकर होते...........!"

गोडबोले एक क्षणभर थांबले. त्यांनी व्याकुळ नजरेने वैद्यांकडे बघितले. तीचा अर्थ ओळखुन वैद्यांनी टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला. गोडबोलेंनी एका दमात ग्लासमधले सगळे पाणी संपवले आणि कृतज्ञतेने वैद्यांकडे पाहत आपले बोलणे पुढे कंटीन्यु केले....

"खरे तर तो माझा सगळ्यात मोठा गैरसमज होता. आता मला जाणवतेय की ती व्यक्ती निंबाळकर नसुन, त्याच्याइतक्याच उंचीची, शरीरयष्टीची कोणी दुसरीच व्यक्ती होती."

गोडबोलेदादांनी बोलता बोलता एकदा निंबाळकरांकडे नजर टाकली आणि लगेच कोपर्‍यात बसलेल्या शशांक कडे. त्याच्या डोळ्यातील भाव वाचण्याचा प्रयत्न करणार्‍या इन्स्पे. वैद्यांना त्यामागचा भाव लगेच लक्षात आला. शशांकची शरीरयष्टी साधारण निंबाळकरांसारखीच होती. उंची जवळपासच एकच...........!

"असो!" गोडबोलेंनी पुन्हा पुढे बोलायला सुरुवात केली.

"तर ते निंबाळकर असणे शक्य नाही कारण ताजच्या स्टाफच्या आणि डॉ. बापटांच्या साक्षीनुसार निंबाळकर त्यावेळी ताजला होते. पण बहुतेक कपडे आणि समान शरिरयष्टीमुळे माझ्या डोळ्यांना धोका झाला असावा. मी चमकलो. आधी नकार दिलेले निंबाळकर या वेळी इथे काय करत होते. मी गडबडीत बाईंच्या घरात शिरलो. तिथले दृष्य धक्कादायकच होते.बाई दारामागेच पडलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यातुन बराच रक्तस्त्राव झालेला दिसत होता. मी जवळ जावुन पाहीले बाई मृत झाल्या होत्या. इथे काहीतरी नक्केच घडले होते ज्यामुळे निंबाळकरांच्या हातुन बाईंचा खुन झाला असावा. आजुबाजुला झटापटीच्या खुणा होत्या. बाईंच्या हातात निंबाळकरांनी किंवा त्या विवक्षित व्यक्तीने मघाशी अंगावर घातलेल्या शर्टाचा कॉलरचा एक तुकडा अडकलेला होता. काय झाले होते ते कळायला मार्ग नव्हता पण एक गोष्ट नक्की होती की त्या व्यक्तीची बाईंशी झटापट झाली असावी आणि त्यातच बाईंचा मृत्यु झाला असावा. मला काही सुचेचना. निंबाळकरांसारखा सज्जन माणुस एका व्यक्तीच्या खुनास प्रवृत्त होतो तेव्हा नक्कीच काहीतरी सबळ कारण असणार होते. क्षणभर मला काहीच सुचेना.

साहेब, निंबाळकरांचे खुप उपकार आहेत माझ्यावर. माझी मानसकन्या भैरवी, माझ्या एकाकी आयुष्याचा एकमेव सहारा, माझी दत्तक मुलगी आज जिवंत आहे ती तिच्या आजारपणात निंबाळकर साहेबांनी केलेल्या मदतीमुळेच. निंबाळकर विनाकारण कुणाचा खुन करणार नाहीत याची खात्री आहे मला. आणि जरी केला असता तरी त्यांचे उपकार फेडण्याची ही नामी संधी होती. आज ना उद्या पोलीस निंबाळकरांपर्यंत पोचलेच असते. कृपया हे समजुन घ्या की मी त्या खुनी व्यक्तीला निंबाळकरच समजुन चाललो होतो. शेवटी मी मनाशी निर्णय घेतला. शक्यते सर्व प्रयत्न करुन मी निंबाळकरांना वाचवणार होतो. मी मनाशी निर्णय घेतला आणि बाईंच्या हातातला शर्टाचा तुकडा काढुन घेतला. शक्य तेथील सर्व फिंगरप्रिंटस नष्ट केले आणि त्या ठिकाणी स्वतःच्या खुणा सोडल्या. तिथुन बाहेर पडताना मुद्दाम समोरचा पानवाला व इतर काही जणांना भेटलो. बाईंच्या गाण्याबद्दल बोललो. अगदी पोलीसांनादेखील मीच फोन करुन खुनाची माहिती दिली. तेव्हा माझ्या व्यतिरिक्त आणखीही कुणी निंबाळकरांना पाहीले असण्याची शक्यता होती. पण त्यावेळी बराच अंधार पडला होता. म्हणुन मी अंधाराचा फायदा घ्यायचे ठरवले. मी ठरवले की पोलीसांना जबाब देताना मी शशांकचे नाव घेइन. शशांक दिल्लीत होता हे मला माहीत नव्हते. पण खुनाचा आरोप मी स्विकारला होता आणि खुनाच्या वेळी शशांक तिथे नव्हता हे ही मी आधीच कबुल केलेले होते. मला वाटले की पोलीसांचे लक्ष भरकटवण्यासाठी एवढे पुरेसे होते. फार काय झाले असते, तर शशांक नाही म्हणत राहीला असता, मी माझ्या जबाबावर कायम राहीलो असतो. पोलीस भरकटले असते. तेच मला हवे होते. आणि मुळात मला वाटले होते एकदा पोलीसांना खुनी मिळाला की ते शोध घेणे सोडुन देतील. माझा हेतु बर्‍यापैकी सिद्धही झाला होता. पण नेमका कुणीतरी अज्ञात व्यक्तीने वैद्यसाहेबांना फोन केला आणि निंबाळकर यात परत गुंतले गेले. पण सुदैवाने आता काही वेगळंच बाहेर आलंय. आय एम हॅप्पी. आता कायद्याची दिशाभुल केल्याच्या आरोपाखाली जी काय शिक्षा होइल ती भोगायला मी तयार आहे."

गोडबोलेंच्या आवाजात एकप्रकारचा प्रसन्न भाव होता.

"काय केलंत हे गोडबोलेदादा? अहो माझ्याशी बोलायचत तरी एकदा? तुम्ही मला चांगले ओळखता. मी कधीतरी कायदा हातात घेइन का? आता या गोष्टीमुळे मात्र तुम्ही कायद्याचे गुन्हेगार ठरताय. पर्पजली एखाद्या व्यक्तीचा गुन्हा लपवण्यास मदत करणे हा प्रत्यक्ष गुन्हा करण्याइतकाच मोठा गुन्हा आहे." निंबाळकरांचे डोळे भरुन आले होते.

"माझ्या सदसदविवेक बुद्धीला, माझ्या कृतज्ञ मनाला पटलं ते मी केलं. अर्थात नकळता हे चुकीच्या माणसासाठी केलं गेलं. पण मला तुमच्यासाठी जर उद्या पुन्हा हे करावं लागलं तर मी एक क्षणभरही कचरणार नाही.पण खरेच सांगतो ज्या कुणी वैद्यसाहेबांना फोन करुन निंबाळकरांना यात गुंतवलं तो अज्ञात माणुस तुमच्याप्रमाणेच माझ्यासाठीही कोडे बनुन राहीला आहे." गोडबोले ठाम स्वरात उदगारले.

"ह्म्म्म्म्म", वैद्यांनी एक संथ निश्वास सोडला. म्हणजे एकुण हे कोडे तसेच आहे तर, रमेश....? ठिक आहे त्याकडे नंतर पाहु......! तोपर्यंत आपण वाकनीसची माहिती ऐकु."

सब. इन्स्पे. वाकनीसने एक लांब श्वास घेतला.

"सर, त्या दिवशी डॉ. बापटांच्या बोलण्यावरुन ही गोष्ट स्पष्ट झाली की निंबाळकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणेही घटनास्थळी हजर नव्हते. कुणीतरी विनाकारण त्यांना गोवण्याचा प्रयत्न करत होतं. पण कोण?

पुढे बापटांच्या आणि निंबाळकरांच्या बोलण्यातुन एक गोष्ट पुढे आली. की निंबाळकरांना एक विचित्र आजार होता किंवा सवय होती की बर्‍याचदा ते घडुन गेलेल्या बर्‍याच गोष्टी विसरुन जात आणि खुपवेळा अनेकदा घोकलेली एखादी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवलेली नसतानाही ती अनुभवली आहे असे गृहीत धरुन बसतात, प्रत्यक्ष घडलेली नसतानाही ती घडलेली आहे असे धरुन बसतात. आणि ही गोष्ट दुर्दैवाने शशांक अभ्यंकरला माहिती होती. मग वैद्यसाहेबांच्या मनात एक शंका आली की शशांकने आपल्याला असलेल्या या माहितीचा गैरफायदा घेण्याचा तर प्रयत्न केला नसेल. पण तो तर त्यावेळी दिल्लीत होता. तेव्हा त्याच्याबद्दलची पुर्ण माहिती मिळवण्यासाठी म्हणुन वैद्यसाहेबांनी मला दिल्लीला पाठवले.
दिल्लीला ज्या हॉटेलमध्ये शशांक उतरला होता, त्या होटेलमध्ये मी चौकशी केली असता एक गोष्ट लक्षात आली की ज्या दिवशी संध्याकाळी मुंबईत तो खुन झाला त्यादिवशी सकाळी ११ वाजल्यापासुन शशांक अभ्यंकर खोलीतुन बाहेरही पडला नव्हता. की त्याने दिवसभरात जेवण, नाष्टा काहीच मागवले नव्हते. मी त्याच्या दिनक्रमाची माहिती काढली. तो सकाळी ८ वाजता नाष्टा घेत असे. ११.३० ते १२ च्या दरम्यान बाहेर पडण्याआधी पुन्हा एकदा जेवण करत असे आणि मगच बाहेर पडत असे. चारच्या दरम्यान परत आल्यावर पुन्हा एकदा नाष्टा आणि मग रात्री पुन्हा जेवण असा त्याचा नित्य क्रम होता. साहजिकच मनात शंका आली की रोज एवढे हेवी खाणे घेणारा जवळपास चोवीस तास जेवण खाण्यावाचुन कसा राहीला असेल. कारण शशांकने गुरुवारी, म्हणजे ज्या दिवशी इथे बाईचा खुन झाला त्या दिवशी सकाली आठ वाजता घेतलेल्या नाष्टानंतर थेट दुसर्‍या दिवशीच नाष्टा केला होता. यावर त्याचे स्पष्टीकरण असे होते की तब्येत ठिक नसल्याने तो झोपुनच होता. पण इतका वेळ. मध्ये त्याला कशाचीही गरज लागु नये? ही गोष्ट थोडी संशयास्पदच होती. तेव्हा जरा अजुन खोलात जावुन चौकशी केल्यावर एकेक गोष्टी बाहेर येवु लागल्या. त्या प्रभागातले एस्.एच्.ओ. रणवीरसिंग गिल यांनी हाऊस किपिंगच्या एका वेटर ला थोडे दमात घेतल्यावर त्याने कबुल केले की त्याने दोन हजार रुपयाच्या मोबदल्यात शशांकला गुरुवारी सकाळी १० वा. ताच्या सुमारास किचनमधील मार्गाने गुपचुप बाहेर काढले होते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी परत गुपचुप आतही घेतले होते." वाकनिसांनी क्षणभर थांबुन श्वास घेतला.

"खोटे बोलतोय तो वेटर! मी कुणालाही पैसे दिले नव्हते!" शशांक मध्येच ओरडला.

"शशांक, त्या वेटरने तुझ्याकडुन घेतलेले दोन हजार रुपये परत केलेत. ज्यावर त्याच्याबरोबर तुझ्या हाताचेही ठसे आहेत." तेव्हा आता गप्प बैस आणि वाकनिसांना त्यांचे म्हणणे पुर्ण करु दे!" वैद्य गरजले तसा शशांक मलुल होवुन गप्प बसला. त्याच्या डोळ्यातुन पाणी यायला सुरुवात झाली होती.

"आता प्रश्न हा होता की त्या काळात मग शशांक कुठे होता? त्यानंतर आम्ही शशांकचा फोटो दाखवुन आजुबाजुला चौकशी केली. तिथल्या एका टॅक्सी ड्रायव्हरकडुन असे कळले की त्याने शशांकला गुरुवारी सकाळी ११३० च्या दरम्यान दिल्ली डोमेस्टिक विमानतळावर सोडले होते. साहजिकच आम्ही विमानतळावर पोचलो. या सर्व कारवाईदरम्यान रणवीर सिंगजी सतत माझ्या बरोबर होते. ते वैद्य साहेबांचे चांगले मित्र असल्याने त्यांनी खुपच मदत केली मला. विमानतळावर सर्व चौकशी केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की गुरुवारी दुपारी २,२० मिनीटांनी मुंबईला जाणार्‍या किंगफिशरच्या फ्लाईटने शशांक अभ्यंकर नावाचा एक प्रवासी मुंबईला गेला होता आणि त्याच रात्री १०५५ च्या इंडिगोच्या फ्लाईटने तो परतही आला होता. तिथे चेक इन काऊंटरवर असलेल्या लेडी ऑफीसरने तसेच सिक्युरिटी चेकवर असलेल्या सुरक्षा अधिकार्‍यांनीदेखील शशांकचा फोटो ओळखला. नावाने नसला तरी चेहरा त्यांच्या लक्षात राहीला होता."

"खोटं आहे हे सगळं, कोणीतरी मला अडकवायचा प्रयत्न करतय. साहेब, मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मी त्यावेळी दिल्लीत होतो आणि आजारी होतो. तुम्ही हवेतर......." शशांक परत ओरडला.

"मग तुच सांग ना त्या वेळात तु कुठे होतास ते? वैद्य त्याच्यावर जोरात ओरडलेच. तु एकटाच काय तो खरे बोलतोयस बाकी सर्व खोटारडे." वाकनिस तु पुढे बोल.

"सर, किंगफिशरच्या तसेच इंडिगोच्या स्टाफने देखील शशांकला फोटोवरुन ओळखले. त्यानंतर इथे मुंबई 'विमानतळावरील टॅक्सी ड्रायव्हर्सनी देखील शशांकचा फोटो ओळखला. त्याच्या सांगण्यावरुन त्याने शशांकला साडे चार वाजता पिक अप केलं आणि साडे पाचच्या दरम्यान ग्रांटरोडच्या परिसरात सोडलं. म्हणजे बाईंच्या घरापासुन साधारण १-२ किमीच्या अंतरावर! "

"वैद्यसाहेबांच्या सुचनेवरुन आम्ही शशांकच्या घराची तपासणी केली असता तिथे मागच्या आवारातील बंद असलेल्या टॊयलेटच्या फ्लशच्या टाकीत आम्हाला हे मिळालं. "

वाकनिसांनी एक मोठा कागदी लिफाफा बाहेर काढला. त्या लिफाफ्यातुन त्यांनी एक रक्ताळलेला शर्ट बाहेर काढला. तो शर्ट बघताच शशांक आणि गोडबोले दोघेही चमकले.

शशांक ताडकन उठुन उभा राहीला...

"हा शर्ट.. हा शर्ट्......रक्त... हे काय आहे? हे असं असुच नाही शकत? कोणीतरी मला अडकवण्याचा कट करतय साहेब? माझ्यावर विश्वास ठेवा मी हा खुन केलेला नाही. मी दिल्लीत होतो, ट्रस्ट मी! आय एम नॉट गिल्टी? मी संसारी माणुस आहे साहेब. मलाही बायकोमुले आहेत. ठिक आहे, मी थोडा फ्लर्ट टाईप माणुस आहे पण मी तरुण बायकांच्या मागे लागतो, मी कशाला त्या वयस्कर बाईचा खुन करायला जाईन? विश्वास ठेवा मी निर्दोष आहे."

आता वैद्यसाहेबांनी पुन्हा सुत्रे स्वतःच्या हातात घेतली.

"शशांक हा तुझाच शर्ट आहे ना? नाही, तु नाकारु शकत नाहीस? हा तुझाच शर्ट आहे हे तुझा रेग्युलर टेलर कोर्टात सांगेलच. या शर्टावर लागलेले रक्त त्या गायिकेचे आहे हे फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये सिद्ध झालेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गायिका दाखवते तेवढी म्हातारी किंवा वयस्कर नव्हती हे पोस्टमार्टेमच्या दरम्यान सिद्ध झाले आहे. आता ती वयस्कर बाईच्या बुरख्यात का राहात होती हे ही एक कोडेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या बाईंच्या घरातील एका कपाटातील छुप्या कप्प्यात तुझे काही वेगवेगळ्या स्त्रीयांबरोबरचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो सापडलेत, अगदी काही फ़ोटो त्या बाईबरोबरचे देखील आहेत. बाईंच्या घरात दहा हजाराच्या नोटा सापडल्या आहेत. दिल्लीला जाण्यापुर्वीच तु दोनवेळा बँकेतुन पैसे काढले आहेस. एकदा पंधरा हजार आणि एकदा दहा हजार. अर्थात ते दहा हजार तुझेच आहेत हे सिद्ध होत नाही पण त्याने काही फ़रक पडत नाही. कारण इतर पुरावे जोरजोरात ओरडुन तुझ्याकडे बोट दाखवताहेत. बाईच्या घरात, तिच्या शरीरावर तुझे फिंगरप्रिंट्स सापडले आहेत. या सगळ्यावरुन एक अत्यंत बळकट असा तर्क उभा राहतो की बाई तुझ्या त्या आक्षेपार्ह फोटोंच्या बळावर तुला ब्लॅकमेल करत होती. त्यातुन सुटका करुन घेण्यासाठी तु तिचा खुन केलास."

आता वैद्यसाहेब गोडबोलेंकडे वळले.

"गोडबोले, त्या दिवशी जेव्हा तुम्ही परत आलात. तेव्हा तुम्ही एका माणसाला त्या गायिकेच्या घरातुन घाई घाईने बाहेर पडताना पाहीलेत्...काही आठवलं?

"हो साहेब, त्या माणसाच्या अंगावर हाच शर्ट होता. पण असाच शर्ट निंबाळकरांकडेपण आहे. म्हणुनच मला त्या दिवशी निंबाळकरांची शंका आली होती. पण आता जाणवतय की तो माणुस म्हणजे निंबाळकर नव्हे तर शशांक होता. शशांकची उंची पण अगदी निंबाळकरांएवढीच आहे. पण एक गोष्ट लक्षात येत नाहीये की शशांकने या खुन प्रकरणात निंबाळकरांना गुंतवण्याचा प्रयत्न का केला?" गोडबोले सुटकेच्या स्वरात बोलले.

"मी कुणाचाही खुन केलेला नाही. मी कुणालाही अडकवायचाही कट केलेला नाही. माझे त्या बाईशी कुठलेही संबंध नव्हते. ते फोटो म्हणजे निव्वळ ट्रिक फोटोग्राफी आहे. मी दिल्लीत होतो. तुम्ही सगळे कट करुन मला अडकवताय."

शशांकने परत कांगावा केला तसे वैद्यसाहेबांनी संतापले आणि संतापांने त्यांनी त्याला सणसणीत थोबाडीत ठेवुन दिली.

"बास्स शशांक ! खुप झाली तुझी नाटके! बाई तुला ब्लॅकमेल करत होती त्यामुळे तु वैतागला होतास. दिवसेंदिवस तिच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. शेवटी तु तिला संपवायचा निर्णय घेतलास. पण या वेळेस तु एका घावात दोन पक्षी मारायचे ठरवलेस. काही दिवसांपुर्वी निंबाळकरांनी तुला ५०,०००/- रुपये दिले होते. ते तुला तुझ्या वडीलांच्या उपचारासाठी हवे आहेत असा तु बहाणा केला होतास, निंबाळकर बरोबर आहे ना हे?

निंबाळकरांच्या चेहर्‍यावर आश्चर्य आले,"सर तुम्हाला हे कसे काय .... यु आर रिअली अ जिनिअस कॉप? त्याने खोटे सांगुन माझ्याकडुन पैसे घेतले याचा मला प्रचंड संताप आला होता. एरवी मी त्या पैशाबद्दल विसरुनही गेलो असतो, पण त्याने मला फसवल्याने मी दुखावला गेलो आणि त्याला पैसे परत देण्यासाठी तगादा लावला."

शशांक डोळे विस्फारुन हे सगळे ऐकत होता. त्यांच्या डोळ्यातली आशा आता विझत चालली होती.

"त्याचाच बदला घेण्याचे शशांकने ठरवले. बाईला तर संपवायचे पण त्यात निंबाळकरांना अडकवायचे. त्यासाठी पुरावा म्हणुन त्याने एक अतिशय योग्य माणुस निवडला होता. ज्याच्या खरेपणाबद्दल कोणीही संशय घेवु नये. गोडबोलेदादा हे या विभागात अतिशय सज्जन म्हणुन फेमस आहेत. पण त्याचा हा निर्णयच त्याच्याच पायावर कुर्‍हाड मारणारा ठरणारा.

अतिशय व्यवस्थित प्लान रचला होता शशांकने. आधी गोडबोलेंना बाईचे गाणे ऐकण्यासाठी तय्यार करणे. मग निंबाळकरांच्या मानसिक आजाराचा फायदा घेवुन त्यांना पद्धतशीरपणे यात गुंतवले. तिथे प्रत्यक्ष न जाताही निंबाळकर समजत राहीले की ते घटनास्थळी हजर होते. कारण रमेशच्या माध्यमातुन वारंवार त्यांना फ़ोन करुन, त्यांच्याशी बोलुन तु ही गोष्ट त्यांच्या मनावर ठसवली होतीस आणि स्वतः मात्र दिल्लीला निघुन गेला. आजाराचे निमीत्त करुन खुनाच्या घटनेच्या वेळी दिल्लीमधील हॉटेलमध्ये आपल्या वास्तव्याची पक्की अ‍ॅलिबी निर्माण करुन ठेवली. प्रत्यक्षात मात्र गुपचुप विमानाने येवुन ठरलेल्या वेळी गायिकेचा खुन केला. पण दुर्दैवाने त्याला फोटो मिळालेच नसावेत. कुणाचीतरी चाहुल लागल्याने तो घाईघाईत तिथुन पळुन गेला. त्यावेळी नेमके आपली राहीलेली छत्री परत घ्यायला आलेल्या गोडबोलेंना त्यांला पाठमोरे बघितले पण शर्टमुळे ते त्याला निंबाळकरच समजले. तिथुन थेट घरी जावुन त्याने कपडे बदलले. आपले रक्ताळलेले कपडे छतावरील रिकाम्या पाण्याच्या टाकीत लपवले. ही सगळ्यात मोठी चुक होती. तु ते नष्ट करायला हवे होतेस. पण वेळेअभावी तु ते करु शकला नाहीस आणि आमच्यासाठी आयता पुरावा ठेवलास.

तुझ्या दुर्दैवाने तुला गोडबोलेंच्या मनातले निंबाळकरांवरचे प्रेम माहीत नव्हते. तु गोडबोलेंची निवड केली होतीस ती निंबाळकरांविरुद्ध पुरावा म्हणुन. त्यासाठीच तर तु आधीच तिथे पोचला होतास.जेव्हा गोडबोले तुझी वाट बघत त्या बाईच्या घरात थांबले होते तेव्हा तु तिथेच्ज कुठेतरी लपुन बसला असावास. कदाचीत गोडबोलेंची छत्री देखील तुच मुद्दाम लपवली असावीस जेणे करुन ते परत यावेत. गोडबोले बाहेर पडले आणि तु बाईचा खुन केलास. बाईच्या बेडरुमच्या खिडकीतुन बिल्डिंगच्या गेटमध्ये प्रवेष करणारा माणुस सहज दिसतो. गोडबोलेंना परतताना पाहीलेस आणि तु तयारीत थांबलास. त्या मजल्यावर लिफ्ट थांबल्याचा आवाज येताच तु गडबडीत असल्याचा बहाणा करत घरातुन बाहेर पडलास. त्यावेळी तुला खात्री होती की तुझ्या अंगावरील शर्टमुळे गोडबोले तुला नक्की निंबाळकर समजणार. झालेही तसेच. पण गोडबोलेंनी एकदम अनपेक्षीत स्टंड घेतला. त्यांनी सगळा आरोपच स्वतःवर घेतला. त्यामुळे तुझी सगळी योजनाच ढासळण्याच्या मार्गावर आली. म्हणुन बहुदा तुच पुन्हा पोलीसांना फोन करुन परत निंबाळकरांना गुंतवलेस. अर्थात हे सगळे तर्क आहेत. पण त्याला मजबुत करणारे पुरावेही आता आमच्या हातात आहेत. त्यामुळे तुझ्यावरच्या आरोपाला बळाकटीच येतेय. किमान जन्मठेप तरी नक्की!
अर्थात रमेश हे अजुनही एक गुढच राहीलेय. तो माणुस कापुरासारखा विरघळुन गेलाय. काही हरकत नाही. तु आता आमच्याच हातात आहेस... पोपटासारखा बोलशील."

वैद्यसाहेबांनी टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलुन तोंडाला लावला.

"निंबाळकर अभिनंदन ! एका भयानक कटातुन सुटका झाल्याबद्दल. गोडबोले तुमच्या निंबाळकरांबरोबर असलेल्या या विलक्षण भावबंधाचं खरेच कौतुक वाटते मला. पण असा टोकाचा निर्णय घेण्यापुर्वी थोडा साधक बाधक विचार करत जा यापुढे. आणि तुमची व निंबाळकरांची मैत्री अशीच कायम राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !

...................................................................................................................................................

"हुश्श! आणि अशा तर्‍हेने त्या भयानक खुन प्रकरणातुन माझी सुटका झाली. तीच जुनी सवय बहुदा पुन्हा वर येतेय. बापट्याला भेटायला हवं पुन्हा एकदा. चला आता निघतो. बराच अंधार झालाय बाहेर."
रणजीतराव निंबाळकरांनी ग्लासमधला व्हिस्कीचा शेवटचा घोट संपवला. आणि मित्रांचा निरोप घेवुन ते क्लबच्या बाहेर पडले.

"रणजीत...." मागुन कर्नल जोशींची हाक आली तसे निंबाळकर थांबले.

"काय रे जोशा?"

"एक शंका आहेच रे मनात अजुन्....................शशांकने शेवटपर्यंत तो खुन त्याने केला असल्याचे कबुल केल्याचे तुझ्या सांगण्यावरुन तरी जाणवत नाही. का....? मग खरोखर तिचा खुन शशांकनेच केला होता की आणखी........?

रणजीतराव निंबाळकर आ वासुन कर्नल जोशींकडे पाहातच राहीले. कर्नल जोशी मात्र त्यांच्या भरघोस मिशांमधुन मिस्किलपणे हासत त्यांच्याकडे पाहात उभे होते.........!

"जोशा, तुला काय म्हणायचय काय नक्की?" निंबाळकरांनी एकदम सावध पवित्रा घेतला.

"हे हे हे रणज्या असा लगेच बिथरु नकोस. हे बघ जे काही झाले तो भुतकाळ आहे. आणि मला पक्के माहिती आहे की जे काही झाले ते एका अतिशय चांगल्या आणि विधायक, रादर देशकार्यासाठीच झाले आहे. यातली बहुतेक सुत्रे मला माहीत आहेत, पण काही गोष्टी मलाही अज्ञात आहेत. आम्ही एका संधीची वाट पाहात होतो आणि आमच्या सुदैवाने, अगदी अनपेक्षितरित्या या केसच्या निमीत्ताने आम्हाला ती संधी मिळाली आणि जे आम्हाला हवे होते ते साध्य करण्यासाठी आम्ही या संधीचा पुरेपुर वापर करुन घेतला. आम्हाला जे हवे होते ते थोड्याशा वेगळ्या, चुकीच्या मार्गाने आम्ही मिळवले. पण पर्यायच नव्हता, जेव्हा देशहिताचा विचार येतो तेव्हा योग्य्-अयोग्य, चुक्-बरोबर, कायदेशीर्-बेकायदेशीर या सर्व संकल्पना थोड्या बाजुलाच ठेवाव्या लागतात. सद्ध्या मी तुला एवढेच सांगु शकतो की या केसमधुन जे काही आम्ही मिळवलं त्यामुळे त्यावेळी आपला देश एका फार मोठ्या संकटातुन वाचवु शकलो आणि जर माझी काही चुक होत नसेल तर आमच्या या यशामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे."

नेहमी अतिशय मिस्कील असणारे कर्नल जोशी यावेळी मात्र खरोखर खुप गंभीरपणे बोलत होते.

"आम्ही? ... हे आम्ही म्हणजे.....?" निंबाळकरांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटले. तसे कर्नल जोशी अजुनच गंभीर झाले.

"आम्ही....! आम्ही म्हणजे मिलीटरी इंटेलिजन्स ! येस, आय वॉज अ रिस्पॉन्सिबल ऑफिसर ऑफ मिलीटरी इंटेलिजन्स दॅट टाईम आणि तुझा हा शशांक अभ्यंकर आमच्या हिटलिस्टवर होता." कर्नल जोशींनी अखेर गौप्यस्फोट केला.

"हे बघ रणजीत, आता आपण दोघेही निवृत्त झालेलो आहोत. इव्हन देन, आय एम नॉट सपोजड टु ओपन दिज थिंग्ज इन फ्रंट ऑफ ए सिविलिअन. पण जे काही झालं त्या वरुन मी ही काही निष्कर्ष काढले होते. त्यावरुन यु आर मोअर दॅन ए रिअल सोल्जर! मी या निष्कर्षापाशी येवुन पोचलो होतो की हे सगळं करताना केवळ देशासाठी म्हणुन तु ही प्रचंड रिस्क घेतली होतीस. स्वतःचं करिअर, आयुष्य पणाला लावलं होतस. सुदैवाने तु यशस्वी ठरलास, अयशस्वी झाला असतास तर संपला असतास, आयुष्यातुन उठला असतास. हे सगळं माहीत असुनही तु एका खर्‍या खुर्‍या सैनिकासारखा वागलास, एकट्याने लढलास. हे सगळं त्या वेळीच लक्षात आलं असतं तर मी अजुनही खुप मदत करु शकलो असतो तुला. पण मुळात तु हे सगळं एवढ्या हुशारीने घडवुन आणलं होतंस की हे तु करवतोयस हे आम्हाला कळालंच नाही मुळी. आम्ही फक्त आमच्या फायद्यासाठी म्हणुन काही गोष्टी करवुन घेतल्या, घडवुन आणल्या. कारण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शशांकचा चार्ज हवा होता. तो आम्ही मिळवला. तसे आम्ही त्याला डायरेक्ट अटकही करु शकलो असतो, पण त्यामुळे ते सावध झाले असते. आणि पुढची योजना त्यांनी बदलली असती किंवा कदाचीत सावध झाल्याने ते आमच्या हातातुन निसटलेही असते. पण अर्थातच तुझ्या या धडपडीमुळे.... सॉरी कल्पक योजनेमुळे आमचे श्रम हलके झाले अन्यथा कुठल्या ना कुठल्या मार्गाने आम्ही त्याला उचलणारच होतो. तुला तर माहिती असेलच...., भारतीय लष्कर मनात आणले तर देशहितासाठी कुठल्याही पातळीवर उतरु शकते."

कर्नल जोशी अतिशय मोकळेपणे बोलत होते.

"ते" म्हणजे? निंबाळकर अजुनही आपला सावधपणा सोडायला तयार नव्हते.

"ते म्हणजे आय.ए.एस...... पाकिस्तानी गुप्तहेर संघटना! त्यांनी एक फार मोठा कट आखला होता. जर त्यांचा कट सिद्धीस गेला असता तर आपल्या देशात हल्लकल्लोळ उडाला असता. एका फार मोठ्या अणुशास्त्रज्ञाला आपण मुकलो असतो. पण सगळ्या गोष्टी हव्या तशा घडत गेल्या. सुदैवाने तुझी नकळत का होईना पण खुप मदत झाली या केसमध्ये. शशांकला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यानंतर त्याला येरवड्याला हलवले जात असताना आम्ही उचलले. अर्थात ती योजना मात्र माझी होती आणि यशस्वी झाली होती. ते म्हणजे पाकडे आणि कदाचीत तु ही असेच समजला असाल त्यावेळी की शशांक येरवड्याला जाताना पोलीस व्हॅनला झालेल्या त्या अपघातात मारला गेला, राईट?"

कर्नल जोशी आता पुन्हा त्यांच्या मिश्किल स्वभावावर उतरले होते.

"अर्थात तो त्यावेळीच त्या अपघातात मरण पावला. त्याचा जळालेला मृतदेहही मिळाला होता गाडीबरोबर." निंबाळकर चक्रावले होते.

"नाही रणजीत, शशांक मेला.... पण त्या घटनेनंतर जवळजवळ अडीच महिन्यांनी. तो देशद्रोही हरा....... तसाही मरणारच होता. पण आम्हाला हवी ती माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः माझ्या हातांनी त्याला गोळ्या घातल्या. "

कर्नल एकदम गंभीर झाले.

" पण रणजीत, तुझा या प्रकरणांशी कसा काय संबंध आला? आणि हे सगळे कसे काय घडवुन आणलेस तु? त्या गायिकेचा खुन कशासाठी आणि कुणी केला होता? आणि तुझा तो रमेश कुठे गायब झाला ?"
कर्नल सत्य जाणुन घेण्यासाठी आतुर झाले होते.

निंबाळकरांनी एक दिर्घ श्वास घेतला.

" ठिक आहे, जोशा. आय थिंक आय कॅन ट्रस्ट यु? आशा बाळगतो की जे काही मी बोलेन ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील.ओके?"

"रणज्या तुझा विश्वास नसेल तर जावु दे. या भुतकाळात गाडल्या गेलेल्या भुतापायी आपल्या इतक्या वर्षाच्या दाट मैत्रीवर परिणाम होणार असेल तर ते भुत भुतकाळातच गाडलेले राहू दे." कर्नल मनापासुन म्हणाले.

" नाही जोशा, मला हे सगळं कुणाकडेतरी बोलायचच होतं. खरेतर म्हणुनच मी कथेच्या निमित्ताने सगळं सांगुन टाकलं. असो...

"इट मिन्स, तेव्हाही कुणीतरी होतं ज्याला शशांकच्या कारवायांची कल्पना होती. खरेतर मी त्यावेळी माझ्या अधिकार्‍यांची मदत घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण कसलेच पुरावे हाताशी नसल्याने माझ्या सांगण्यावर त्यांनी विश्वासच ठेवला नाही. मग शेवटी मी हि रिस्क घ्यायचे ठरवले. एक साधा सब इन्स्पेक्टर होतो रे मी, त्यात नुकताच..... स्वतःच्या मेरीटवर जॉइन झालेला. त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये फारशी पोहोच नव्हती. पण रणजीत निंबाळकर हा एका माजी संस्थानाचा जहागिरदार होता. त्या नात्याने माझे सोर्सेस प्रचंडच होते. पण तरीही रिस्क होतीच. एक चुकीचे पाऊल आणि सगळा प्लानच उध्वस्त झाला असता. पण सुदैवाने माझ्यावर प्रेम करणारी माझी माणसं पाठीशी उभी राहीली आणि त्यांच्या मदतीच्या जोरावर आम्ही ही योजना तडीस नेली. गोडबोले, बापट यांच्यासारखी जिवाभावाची माणसे बरोबर होती. गोडबोलेदादांनी तर केवळ माझ्या सांगण्यावरुन केवढी मोठी रिस्क घेतली होती."
निंबाळकरांचे डोळे नकळत पाणावले.

तसे कर्नलसाहेबांनी त्यांच्या खांद्यावर हलकेच थोपटले.

"जावुदे त्या आठवणीनी तुला त्रास होणार असेल तर लेट अस जस्ट फर्गेट इट ! जे झालं ते भुतकाळात जमा झालेलं आहे. फक्त एक उत्कंठा होती की खरोखर माझ्या अंदाजाप्रमाणे या सर्वाचा कर्ताधर्ता तुच आहेस का? आणि असल्यास त्यामागची तुझी कारणे काय होती? म्हणुन मी थोडं खोदण्याचा प्रयत्न केला."

"नाही रे जोशा, त्रास कसला उलट ते जे काही केलं होतं ते आठवलं की स्वतःचाच अभिमान वाटतो. बापट, गोडबोलेदादांसारखे स्नेही मिळाले याचा अभिमान वाटतो, आनंद वाटतो.

या सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या एका खबर्‍याच्या फोनपासुन ....

"सायेब, दत्तु बोलतुया. सायेब कायतरी लै डेंजरस व्हनार हाय येत्या धा-बारा दिसात!"
"दत्त्या, साल्या स्पष्ट बोल जरा." इति निंबाळकर...

"सायेब सद्ध्या येवडंच सांगतु की बाबुलनाथ येरियात एक जुना बंगला हाये. त्येच्यात येक बाय र्‍हातीया. गानारी हाय बगा. काल रातच्याला ट्युब पोचवुन परत येत हुतो, तवा तिच्या बंगल्यातुन दोन मानसं भायीर पडताना बिगितली. त्यातला येक मानुस मागं तुमी दाकिवलेल्या फोटुमधला हुता बगा."

"दत्त्या, आज संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेट. काळजी करु नको, तुला तुझा मोबदला मिळेल?"

निंबाळकरांनी घाई घाईत फोन ठेवला.

दत्त्या कुठल्या फोटोंबद्दल बोलतोय हे त्यांच्या लक्षात आलं होतं. दत्त्या हा मुळातला चोरट्या दारुचे ट्युबा इकडुन तिकडे पोचवणारा एक मामुली टपोरी. एकदा निंबाळकरांनी त्याला रंगेहाथ पकडला होता. पण त्याच्याशी बोलताना त्यांच्या लक्षात आलं की पोरगं इमानदार आहे. केवळ नाईलाजाने हा धंदा करतय. तेव्हा त्यांनी त्याला आपला इनफॉर्मर बनवला. आजपर्यंत दत्तुने दिलेल्या खबरींमुळे अनेकदा निंबाळकर गुन्हा व्हायच्या आधीच त्यावर अंकुश लावु शकले होते. काही दिवसांपुर्वी त्यांनी दत्तुला काही आय्.एस्.आय. एजंटांचे फोटो दाखवले होते. त्यातल्याच एकाला बहुदा दत्तुने बाईच्या घरातुन बाहेर पडताना पाहीले होते. काहीतरी नवीन कट शिजत होता नक्कीच. त्या संध्याकाळी निंबाळकर नेहमीच्या जागी पोचले. पण वेळेच्या बाबतीत अतिशय वक्तशीर असलेला दत्तु मात्र वेळ होवुन गेली तरी तिकडे फिरकलाच नव्हता. म्हणुन निंबाळकरांनी दत्तुच्या घराकडे आपला दुसरा माणुस रवाना केला. तासाभरातच बातमी हाती आली की ग्रांट रोड स्टेशनवर दत्तु लोकलट्रेन खाली येवुन मेला होता. एक साधा सरळ अपघात. पण निंबाळकरांच्या लक्षात आले की वेळ हातातुन निसटलीय. ते लोक सावध झालेत. त्यानंतर काही दिवस निंबाळकर शांतच होते. पण मधल्या काळात त्यांनी त्या बाईची माहिती काढली. "सावित्रीबाई पटवर्धन" या नावाने राहाणारी ती बाई एक शास्त्रीय गायिका होती. पण तिच्या घरी बर्‍याच संशयास्पद लोकांचे येणे जाणे होते.

"जोशा, त्यानंतर मी या विषयावर आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोललो पण मला अक्षरशः उडवुन लावण्यात आले. आय वॉज सरप्राईज्ड! पण नंतर मला कळाले की आमच्या साहेबासकट, बरेच तथाकथित प्रतिष्ठीत लोक त्या बाईचे रेग्युलर श्रोते कम ग्राहक होते. शेवटी मी एकदा धाडस करुन गुपचुप रात्रीच्या वेळेला तिच्या घरात शिरलो.......!

....................... आणि तिथेच मला पहीला धक्का बसला .......सुदैवाने म्हण योगायोगाने म्हण, पण मी अगदी योग्य वेळी तिच्या घरात घुसलो होतो.

"हॅलो, जी हा हुजूर ! तरन्नुम बोल रही हूं ! सब कुछ तय हो चुका है! प्लान तय्यार है, अब बस अल्लाताला की मेहरबानी हो जाये! आप शादीका सारा सामान मुझे भेज दो! दुल्हा दुल्हन तय्यार है! आला कमान को हार पहनायेंगे और शादी की खुशीया मनायेंगे! इस साल मुंबई की दिवाली गमगीन हो जायेगी!"

स्वतःला सावित्रीबाई म्हणवणारी ती गायिका प्रत्यक्षात तरन्नुम म्हणुन कोणी होती. मुळात ती दिसते तेवढी वयस्करही नव्हती. ती सगळी मेकअपची कमाल होती. मी नंतर तसाच गपचुप बसुन ऐकत राहीलो त्यातुन एक एक रहस्ये उलगडत गेली. ती गायिका 'सावित्रीबाई उर्फ तरन्नुमजहाँ खातुन आय्. एस्. आय्.ची एजंट होती. आणि येत्या काही दिवसात ते लोक मुंबईत काहीतरी विध्वंस घडवुन आणण्याच्या विचारात होते. क्षणभर वाटलं की तिथेच गळा आवळावा सालीचा, पण मग त्यामुळे इतर लोक सावध झाले असते. आणि मुळ विध्वंस टाळता आला असता की नाही कोण जाणे? मग मी गपचुप तिच्या घराची तपासणी केली त्यात मला काही फोटो मिळाले. तरन्नुमचे, शशांक अभ्यंकरबरोबर जो की माझा एक चांगला मित्र होता, अतिशय विचित्र अवस्थेतील असे ते फोटो होते. त्याबरोबरच शशांकचे इतरही काही स्त्रीयांबरोबरचे तसले फोटो होते. पण दुर्दैवाने मला तिच्याविरुद्ध कसलाच हेरगिरीचा आरोप सिद्ध करणारा पुरावा मिळाला नाही. अर्थात ती ज्यावरुन तिच्या सुत्रधारांशी संपर्क साधत होती तो ट्रान्समिटर एक उत्तम पुरावा होता. त्यामुळे मी मनाशी ठरवले की काहीही करुन या घराचे सर्च वॉरंट मिळवायचे आणि धाड टाकायची. पण त्याआधी शशांकला सावध करायला हवे होते. मी लगेच शशांकला फोन केला आणि त्याला समजावले की ही बाई देशविघातक कृत्यात सहभागी आहे तेव्हा तिच्यापासुनच दुरच राहा आणि तीच माझी सगळ्यात मोठी चुक झाली कारण माझ्या मते शशांक फक्त तिच्या शरीरामुळे तिच्या नादाला लागला होता, ती त्याची सवयच होती. पण नंतर लक्षात आले माझ्या.....
प्रत्यक्षात मात्र शशांक त्या कटाचा एक मुख्य भाग होता. तरन्नुमचे मादक शरीर आणि प्रचंड अशा सहज प्राप्त होणार्‍या पैशाच्या लोभापायी तो या कटात सामील झाला होता.

त्याच दिवशी अवघ्या दोन तासानंतर मला माझ्या ऑफीसात एक फोन आला. त्या लोकांचे हात कुठपर्यंत पोचले होते त्याचा पुरावाच होता तो, फक्त मी तो कुठेही सादर करु शकत नव्हतो. मला अगदी आनंदाने फोनवर कळवण्यात आले की आता बिनधास्त धाड मारा काहीही सापडणार नाही. मी चरफडण्याशिवाय दुसरे काहीच करु शकत नव्हतो. मी त्यानंतर लगेच शशांकला भेटलो आणि जाब विचारला. तर त्याने मलाच धमकावण्याचा प्रयत्न केला.

जोशा, त्यानंतर दोन दिवसात तीन वेळा मला मारण्याचा प्रयत्न झाला. पण आमचं डिपार्टमेंट याची दखल घ्यायला तयार नव्हतं. म्हणुन शेवटी मी त्या तरन्नुमच्या मागे हात धुवून लागायचा निर्णय घेतला. कारण प्रत्यक्ष ते विघातक कृत्य करणारे आणि करवुन आणणारे यांच्यातला ती एकमेव दुवा होती. दोन्ही पार्टीज एकमेकांना ओळखत नव्हत्या. थोडीफार माहिती असण्याची शक्यता फक्त शशांकलाच होती. तो मोकळा सुटला तर केस बिघडु शकत होती. म्हणुन मग मी त्यालाही या प्रकरणात अडकवायचे ठरवले. पण कसे? काहीतरी ठोस योजना आखायला हवी होती. पण ती संधी लवकरच आपणहुनच चालून आली.
मी माझा एक माणुस तरन्नुमच्या मागे सोडला होता. ती काय करते? कुठे जाते? कुणाकुणाला भेटते याची इत्तंभुत माहिती मला हवी होती. तीही लवकरात लवकर!

या योजनेसाठी मी गोडबोलेदादांची मदत घेतली. जोशा खरेतर त्या बाईकडे गाणं ऐकायला गोडबोलेदादा, मी, शशांक किंवा रमेश कोणीच गेलो नव्हतो.

खरे तर रमेश नावाचा माणुस अस्तित्वातच नाही. ती माझ्या मेंदुची उपज होती. झालं असं की त्या दिवशी संध्याकाळी माझ्या एका खबर्‍याचा मला फोन आला. तेव्हा आम्ही ताजमध्ये होतो. सुमाच्या वाढदिवसाची पार्टी चालु होती.

"साहेब, तुमचा तो अभ्यंकर बाईच्या घरात आहे सद्ध्या. काय तरी लोचा हाये बगा!"

मी चमकलो, माझी योजना त्यांच्यापर्यंत पोचली की काय?

माझ्या सुत्रांनुसार शशांक तर दिल्लीत होता. माझी माणसे त्याचा दिल्लीतला ठावठिकाणा शोधून त्याच्या २४ तास त्याच्या मागावर होती. माझ्या सुत्रांकरवी कन्फर्म करुन घेतलं की शशांक त्या दिवशी खरोखर मुंबईत आला आहे की नाही. माझ्या दिल्लीतील माणसाने मला खबर दिली की शशांक आज सकाळीच इथल्या एका वेटरला लाच देवुन गुपचुप विमानाने मुंबईला आलाय.....!

मी चमकलो, ही दोघे काय-काय विनाश घडवुन आणणार होती कोण जाणे? दुल्हा कोण, दुल्हन कोण काहीच कळले नव्हते. पण एक गोष्ट निश्चीत होती की त्यांचा कट उधळला जाणं अत्यावष्यक होतं कारण जे काही ते करणार होते ते आपल्या देशाच्या दृष्टीनं धोकादायकच होतं. माझ्या डोक्यात एक कल्पना आली शशांकच्या याप्रकारे गपचुप मुंबईला येण्याने मला एक सुवर्णसंधी मिळाली होती. मी पटापट निर्णय घेतले. दिल्लीतल्या माझ्या माणसाला फोन करुन काही सुचना दिल्या. शशांकने त्या वेटरला दिलेले दोन हजारच्या नोटा जपुन ठेवण्यासाठी त्या वेटरला आणखी काही पैसे पुरवण्याची व्यवस्था मी केली. त्या नोटा पुढे शशांकच्या विरोधात खुप मोठी भुमीका बजावणार होत्या. माझ्या माणसांना सांगुन मी शशांकचे टॅक्सीवाले शोधुन त्यांनाही अंकित करुन घेण्याची जबाबदारी सोपवली आणि स्वतः लगेचच सावित्रीबाई किंवा तरन्नुमजहांच्या घराकडे निघालो.

पण दुर्दैवाने मी तिच्या घरी पोचायच्या आधीच शशांक तिथुन निघुन गेला होता. माझी माणसं त्याच्या पाळतीवर होतीच. मी मनाशी एक ठाम निर्णय घेतला आणि तरन्नुमच्या घरात शिरलो. मला पाहीलं आणि तरन्नुम घाबरली. मी आता कुठलीही दयामाया दाखवणार नव्हतो. मी सरळ गन काढुन तिच्या कपाळाला लावली. पण साली कट्टर होती. हे अतिरेकी कुठल्या मातीचे बनलेले असतात देव जाणे? पक्के ब्रेन वॉश केलेले असते त्यांचे. साली काही बोलायला, सांगायला तयार नव्हती. मी थोडावेळ गोंधळलो..... पण आतापर्यंतच्या पुराव्यांवरुन एक गोष्ट पक्की झाली होती की या कटाबद्दलची पुर्ण माहिती असणारे तीनच जण होते. एक तिचे पाकिस्तानमधील तथाकथित आका, दुसरी ती स्वतः म्हणजे तरन्नुम उर्फ सावित्रीबाई आणि तिसरा शशांक....! किंबहुना जे लोक प्रत्यक्ष हे काम करणार होते. ते फक्त तिच्याच संपर्कात होते. त्यांच्यापर्यंत जी मिठाई, शादीका सामान (?) तरन्नुम पोचवणार होती ती अजुनतरी त्यांच्यापर्यंत पोचली नव्हती आणि आता पोचणारही नव्हती. तिच्या पाकिस्तानमधील लोकांना पुढची योजना आखुन ती अस्तित्वात आणेपर्यंत बराच वेळ जाणार होता. तोपर्यंत मलाही मुळापर्यंत पोचायला वेळ मिळणार होता. आणि ती माहिती मला देवु शकत होता तो म्हणजे शशांक.........!

म्हणजे शशांकलाही कशाततरी अडकवणे आले, मग तरन्नुमच्या खुनात का नाही? मी मनाशी निर्णय घेतला.

तो एकदा तुरुंगात गेला की माझे सोर्सेस वापरुन त्याला तिथुन उचलणे मला अवघड नव्हते. आणि त्याच्या दुर्दैवाने शशांक खात्रीशीरपणे त्या रात्री कुणाच्याही नकळत गपचुप मुंबईला येवुन तरन्नुमला भेटुन गेला होता. बस्स माझ्या डोक्यात योजना तयार झाली. ही सुवर्णसंधी होती, मी माझ्या सुत्रांकडुन ही गोष्ट कन्फर्म करुन घेतली आणि पुढचा प्लान आखला.

पुढच्या गोष्टी भराभर घडवुन आणल्या. गोडबोलेदादांना विश्वासात घेतले, त्यांना माझ्या हेतुची खात्री करुन दिली आणि देशहिताचा प्रश्न असल्याने आणि कदाचित माझ्यावरच्या प्रेमापोटी ते ही रिस्क घेण्यास लगेच तयार झाले. धन्य ते गोडबोलेदादा! मग आम्ही त्या बाईच्या घराच्या परिसरात त्या रात्री गोडबोलेदादा तिथे आले असल्याची अफवा जाणीवपुर्वक पसरवली. साहजिकच इन्स्पे. वैद्य गोडबोले दादा- पर्यंत पोहोचले. खरेतर गोडबोलेदादांना यात गुंतवायची तशी गरज नव्हती. पण थेट शशांकला गुंतवणे तितके सोपे नव्हते. त्या आधी तशी पार्श्वभुमी निर्माण करणे आवष्यक होते. म्हणुन आमच्या योजनेप्रमाणे आधी गोडबोलेदादांनी खुनाचा आरोप आपल्या अंगावर घेतला. जो कधीही सिद्ध होऊ शकणार नव्हता.

निंबाळकरांनी थोडीशी उसंत घेतली आणि स्वतःशीच खुदकन हसले.

"मी स्वतः सगळा पुरावा उभा केला होता शशांकच्या विरोधात. निंबाळकरांचा म्हणाजे माझा शर्ट ओळखणारा माणुसही माझाच होता. ठरल्याप्रमाणे शशांक सापडल्यानंतर गोडबोलेदादांनी आपला आधीचा स्टँड बदलुन नवीन भुमिका घेतली. या गोष्टी खुप सावधपणे आणि पेशन्स ठेवुन कराव्या लागल्या कारण दुर्दैवाने केस इन्स्पे. वैद्यांसारख्या हुशार आणि प्रामाणिक माणसाच्या हातात होती. एक छोटीशी चुकही वैद्यांना सावध करुन गेली असती. अगदी व्यवस्थीतपणे आम्ही शशांकच्या गळ्याभोवतीचा फास आवळत आणला होता. आता कुठलीही छोटीशी चुकदेखील परवडणार नव्हती!

"पण जोशा तुझी या केसमध्ये कशी काय आणि कुठे एंट्री झाली?"

"तुला सांगितले ना आम्ही शशांकशी संबंधीत प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवुन होतो. शशांकची चौकशी करत वाकनीस दिल्लीला पोचले आणि आम्ही या केसच्या जवळ आलो. थोडासा मिलीटरी खाक्या वापरुन मी तुझ्या नावापर्यंत पोचलो आणि मग तुझ्यावर लक्ष ठेवायला सुरुवात झाली.त्यावेळी माझा तुझ्यावरच संशय होता कारण यामागची पार्श्वभुमी जी तु आज सांगितलीस ती त्या क्षणी तरी माहीत नव्हती. पण थोडा शोध घेतल्यावर लक्षात आले की आपण दोघेही एकाच केसवर काम करत होतो. फक्त तु वैयक्तिकरित्या तर मी सरकारी आज्ञेने. पण तुझे रेकॉर्ड चाळल्यानंतर लक्षात आले की रणजीत निंबाळकर हा एक अतिषय प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी आहे. मग मात्र मी मला मिळालेली ती माहीती माझ्याजवळच ठेवुन तुझ्यावर लक्ष ठेवण्याचे ठरवले. जेव्हा सब. इन्स्पे. वाकनीस शशांकच्या चौकशीसाठी दिल्लीला आले तेव्हा कुठे मला या योजनेच्या थोडासा अंदाज आला. कोणीतरी शशांकला अडकवण्याचा प्रयत्न करते आहे हे लक्षात आले. थोडासा तपास घेतल्यावर मी तुझ्या नावापाशी येवुन पोचलो . पण तु हे का करतो आहेस, त्यामागे कारण काय आहे हे आम्हाला माहीत नव्हते, पण त्याच वेळी शशांक कुठल्याना प्रकरणात अडकुन तुरुंगात जाणे आमच्या फायद्याचे होते म्हणुन आम्ही तुला नकळत, अप्रत्यक्षरित्या सहकार्य करण्याचे ठरवले. ’मिलीटरी इंटेलिजन्स’ ही कुठल्या सोम्यागोम्याची गुप्तहेर संघटना नाहीये रणजीत. आमचेही असंख्य सोर्सेस आहेत. त्याद्वारेच आम्ही या सगळ्याचा संबंध सावित्रीबाई उर्फ तरन्नुमच्या मृत्युशी लावला. आणि तरन्नुमचा इतिहास उकरुन काढला तेव्हा आम्हाला धक्कच बसला. पण त्यामुळेच तुझी विश्वासार्हता अजुन वाढली आणि आम्ही तुझी मदत करण्याचे ठरवले, तुला शंकाही येवु न देता. असो तु पुढे कंटीन्यु कर...."

"हो तर कुठे होतो मी...? हा, शशांकसाठी सापळा तयार झाला. इकडे गोडबोलेदादांनी न केलेला गुन्हा कबुल केला. ठरल्याप्रमाणे मीच इन्स्पे. वैद्यांना एक अनामिक फोन करुन स्वतःलाच त्यात अडकवुन घेतले. कारण एवढेच की वैद्यांनी गोडबोलेंना खुनी मानुन केस क्लोज करु नये. मग रमेशचे अस्तित्वातच नसलेले पात्र वापरुन त्यांची थोडीशी दिशाभुल केली, ज्यामुळे शशांकवरच्या आरोपाला बळकटी येत गेली. वैद्यांच्या मनात शेवटपर्यंत संशय होता की रमेशला मुद्दाम शशांकनेच माझ्या मागे सोडले होते म्हणुन. आणि वैद्यासारखा माणुस रमेशला असा सोडणार नव्हता. त्यांनी त्याला शोधण्याचे सर्व मार्ग अवलंबले. मी माझ्यापरीने त्यांना सर्व मदत केली. पण रमेश सापडणार नव्हताच. मग पुन्हा वैद्यांची दिशाभुल करण्यासाठी मला बापटला यात गुंतवावे लागले. माझ्या एका जुन्या आजाराचे कारण पुढे करुन, किंवा फारतर असे म्हणु त्या आजाराचा गैरफायदा घेवुन डॉ. बापट आणि मी दोघांनी मिळुन इन्स्पे. वैद्यांच्या मनात शशांकबद्दल संशय निर्माण केला. असे अनेक गुंते निर्माण करत पुन्हा ते गुंते अशा पद्धतीने सोडवत गेलो की जेणेकरुन शेवटी शशांक यात गळ्यापर्यंत फसावा आणि तो फसला. फसला काय रुतला गळ्यापर्यंत. पण माझी मुळ योजना तुम्हा लोकांच्यामुळे अर्धवटच राहीली. तुम्ही शशांकच्या मृत्युचा खोटा देखावा उभा करुन त्याला ताब्यात घेतलेत आणि माझा मार्ग खुंटला. तरीही त्यानंतर मी बरेच दिवसात त्या लोकांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण बहुदा तुमच्या प्रयत्नांमुळे असेल कदाचित पण त्यांनी आपली कारस्थाने त्या वेळेपुरती तरी स्थगीत केली होती, त्यामुळे पुरेशी खात्री पटल्यावर मात्र मी तपास थांबवला.

"रणज्या, त्यावेळी आम्ही शशांकला ताब्यात घेतले. आय.एस.आय. आणि इतर जगाच्या दृष्टीने शशांक मरण पावला होता. पण आमचे काम संपले नव्हते. बर्‍याच टॉर्चरनंतर त्याने जे सांगितले ते धक्कादायकच होते. त्या वर्षी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ श्री. आर. कमलावरन मुंबईत एका कार्यक्रमात हजर राहणार होते. त्यात एक आत्मघाती जोडपे पाठवुन त्यांच्या खुनाचा एक कट रचण्यात आला होता. तरन्नुम मेल्यानंतर ते काम शशांकने करायचे होते. त्यासाठी त्याला प्रचंड मोठी रक्कम मिळाली होती. पण तुझ्या अफलातुन योजनेने त्यांच्या सगळ्या कारस्थानाचेच बारा वाजवले. शशांकने दिलेल्या माहितीवरुन आम्ही ते आत्मघाती जोडपेही आपल्या ताब्यात घेतले. सगळे कारस्थान हाणुन पाडण्यात आम्हाला यश आले ते केवळ तुझ्या अफलातुन आणि निर्दोष योजनेमुळे. शेवटी उच्चस्तरावरुन या सगळ्या प्रकरणापासुन तुला लांबच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दॅट्स द स्टोरी."

"असो, रणज्या... तु सगळे सांगितलेस पण मुळ मुद्दा बाजुलाच राहीला. ज्या खुनाच्या आरोपाखाली शशांकला अटक झाली, ज्यामुळे पुढचे सगळे कारस्थान आम्हाला हाणुन पाडता आले तो सावित्रीबाई पटवर्धन उर्फ तरन्नुमचा खुन कोणी केला होता?"

निंबाळकरांकडे रोखुन बघत कर्नल जोशींनी आपली शेवटची शंका विचारली.

रणजीत निंबाळकरांनी मान खाली घातली....

"त्या एकाच कृत्याबद्दल मला फार खेद वाटतोय रे जोशा. कशीही असली तरी ती एक स्त्री होती आणि मी माझे सर्व आदर्श, संस्कार बाजुला ठेवुन तिचे डोके आपटुन्-आपटुन अतिषय कृरपणे तिला ठार मारले. तशी ती एकाच टकरीत बेशुद्ध झाली होती. पण तिचे जिवंत राहणे धोकादायक होते. ती कुठलीही माहिती द्यायला तयार नव्हती. तिला बोलते करण्याचे मी खुप प्रयत्न केले. साम, दाम, द्म्ड, भेद सगळे उपाय वापरुन बघीतले. पण कशानेही ती बधत नाही म्हटल्यावर तिला संपवणे हा एकच मार्ग माझ्यासमोर उरला होता. म्हणुन मी नाईलाजाने तिला संपवले. आय एम सॉरी, यार!"

"शेवटचा प्रश्न रणजीत, ताजच्या स्टाफबद्दल काय? तुच जर तरन्नुमला मारलेस तर त्यावेळी तु ताज मध्ये असल्याची खात्री ताजचा स्टाफ कसा काय देइल? तु सगळा स्टाफ तर मॅनेज करु शकत नाहीस? मग....?"

"ते फारसे अवघड नव्हते रे. पैशाची काही कमी नाही त्यामुळे मी त्या दिवशी पुर्ण सुईटच पुर्ण दिवसासाठी बुक करुन ठेवला होता. सुमाच्या पार्टीचे कारण होतेच. ठरल्याप्रमाणे मी आणि बापट्या प्रचंड पीत होतो.म्हणजे तसे दाखवीत होतो. मध्येच मला जास्त झाल्याने मी थोडावेळ सुईटच्याच एका बेडरुममध्ये जावुन झोपलो. खरेतर या पार्टीचे आयोजनच मुळी एक अ‍ॅलीबी निर्माण करायची या हेतुने केले होते आम्ही. त्यादिवशी खरेतर माझा तरन्नुमला गाठायचा प्लान फिक्सच होता, त्यात योगायोगाने नेमका त्याच दिवशी शशांक गुपचुप मुंबईत आल्याचे कळल्यामुळे तर मी रिस्क घेण्याचे नक्की केले. माझ्या सुईटसाठी असाईनड तीन वेटर्सपैकी एक जण माझ्या जागी निंबाळकर म्हणुन झोपला आणि मी त्याचे कपडे घालुन गपचुप बाहेर पडलो. शशांक दिल्लीवरुन येवुन संपुर्ण दिवस मॅनेज करु शकतो तर मला इथल्याइथे दोन तास मॅनेज करणे काय अवघड होते. माझे काम करुन दिड तासात मी परत ताजला येवुन बापट्याला जॉईन झालो. अर्थात हे फक्त तो वेटर आणि बापट्यालाच माहीताय. अगदी सुमालासुद्धा कल्पना नाही या प्रकाराची. वेटर कुठे बोलणार नव्हता कारण मी त्याला इतका पैसा दिला होता की त्या पैशात तो स्वतःचे एक छोटेसे हॉटेल टाकु शकेल. फक्त एक गोष्ट गुढच राहीली की शशांक कशासाठी मुंबईत आला होता?

"आम्ही त्याला ताब्यात घेतल्यावर केलेल्या तपासात ती माहिती बाहेर आली. तरन्नुमचा खुन झाल्या त्याच्या आदल्या रात्री शादीका सामान म्हणजे स्फोटके त्यांच्या ताब्यात मिळणार होती. शशांक मुंबईत आला, भाऊच्या धक्क्यावर एका कोळ्याकडुन त्याने ते सामान ताब्यात घेतले आणि ते सामान तरन्नुमकडे सोपवायला तो तिच्या घरी आला होता. पण बहुदा तुझ्या कारवायांची कल्पना असल्याने त्याने ते सामान दुसरीकडे शिफ्ट केले आणि रातोरात दिल्लीला रवाना झाला. दुर्दैवाने त्याने एक चुक केली होती ती म्हणजे विमानप्रवास त्याने स्वतःच्याच खर्‍या नावाने केला होता. हीच चुक त्याला भोवली. नंतर आम्ही ती स्फोटके ताब्यात घेवुन नष्ट केली. सो अखेर प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा गैरफायदा घेत आपला स्वार्थ साधायचा प्रयत्न केला. पण तु मात्र केवळ देशहितासाठी आपले करिअर, आयुष्य, खाजगी संपत्ती पणाला लावलीस आणि पुर्णपणे यशस्वीही तुच ठरलास, रणज्या ! हॅटस ऑफ टु यु माय डिअर फ्रेंड! पण तु देखील आपल्या तथाकथीत आजाराचा गैरफायदाच घेतलास म्हणा! "

गडगडाटी हसतच कर्नल जोशी एकदम अटेंशनमध्ये आले, आपले दोन्ही पाय जवळ आणीत उजव्या हाताने त्यांनी निंबाळकरांना एक कडक सॅल्युट ठोकला. तसे निंबाळकरांनी त्यांना कडकडुन मिठीच मारली. कर्नल जोशींनी हलकेच निंबाळकरांच्या खांद्यावर थोपटले. त्यांच्या गळ्यात हात टाकला आणि दोघे मित्र शांतपणे क्लबच्या बाहेर पडले.

समाप्त.

विशाल कुलकर्णी.

गुलमोहर: 

छान..

ट्विस्ट पे ट्विस्ट Happy
तु अब्बास मस्तानला जावुन भेट.
पुढच्या फिल्लमची स्टोरी तुला देतील लिवायला.
भारी ट्विस्ट आवडला.

लै भारी. Happy
थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे....... आय.ए.एस...... पाकिस्तानी गुप्तहेर संघटना! त्याचे आय. एस. आय. कर!
आय. ए. एस. मंत्री लोकांचे एजंट वगैरे असतात.... Happy

मला शेवटचा भाग पहिल्या दोन भागांइतका नाही आवडला.. उगिचच ताणलाय असं काहीसं.. हे आपलं माझं प्रांजळ मत!
तुमच्या लेखनाकडुन यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत म्हणुन लिहितेय..

मलाही शेवटचा भाग पहिल्या दोन भागांइतका नाही आवडला. कथा आवडली पण फार जास्त वेळ आकाश पाळण्यात बसल्या सारख वाटल म्हणजे मधे थोडा उसंत नाही एक फेरी संपली की दुसरी चालु अस वाटल. थोड रोलर कोस्टर कमी फेर्‍यांच असत तर अजुन मजा आली असती.

कवे मुळात कुणाला उसंत घ्यायला वेळ मिळु नये हाच तर हेतु आहे.>>> अस आहे होय मग ठिक आहे. पण मला गरगरायला झाल ना त्यामुळे Wink

कवे हे असं गरगरायला होवु नये कुणाला म्हणुन तर मी क्रमश: लिहीत असतो. तुम्हाला सलग कथा हवीय ना तर भोगा आपल्या इच्छांची फ़ळे Wink

विशाल, छानच मांडलयसं. खरचं कथानक डोळ्यासमोर तरळतं. तिसर्‍या भागात काही जागेत गॅप वाटला तरी तिथे डायरेक्टर टच नक्कीच आहे. असो. मात्र तूझं लिखाण जबरदस्त आहे. पुढील लिखाणास शुभेच्छा !!!

सस्नेह
देवनिनाद

विश मला पण हुश्श वाटल , पण मस्त फुलवलीयस, ठरवल होत पुर्ण टाकल्या शिवाय प्रतिसाद द्यायचा नाही Happy
कवी ला मोदक Proud

हममम...
थोडी काळाची गफलत झालीये बहुतेक...

>>>बघा, साधारण तीस एक वर्षापुर्वीची घटना आहे ही. नुकतेच
>>>>>सर, किंगफिशरच्या तसेच इंडिगोच्या स्टाफने देखील शशांकला फोटोवरुन ओळखले

नाही, मल्ल्या वैगेरेंना काही objection नसाव...... Light 1

Pages