जुगार

Submitted by aaftaab on 4 February, 2008 - 01:42

बस स्टॉप. गर्दी..
गजबजलेल्या रस्त्याच्या बाजूला वेगवेगळ्या वस्तू विकणारे गाडे..
आजूबाजूचा कचरा, चिखल आणि अधिकृत, अनधिकृत मुतार्‍यांचा दुर्गन्ध.. बेवारशी प्रेताला अळ्या बुजबुजाव्यात तशी जिकडे पहावं तिकडे माणसंच माणसं!
तिथेच पलिकडे एक कोंडाळं.. आत काय चालू आहे याची उत्सुकता चाळवणारं.. सहज म्हणून तिकडे जाऊन उभारलो. खेळ चालू होता. एक मनुष्य मोठ्या शिताफीने तीन पत्ते फिरवत होता. त्यातले दोन पत्ते कोरे होते. फक्त एकावरच बदामची राणी होती..
"बदामकी रानी करेगी पैसा डबल.. डब्बल.. डब्बल्ल..."
भराभर पैसे लागत होते.. दुप्पट होत होते. कुणी पन्नास लावत होतं.. कुणी वीस.. खेळ तसा खूपच सोपा होता.. तीनही पत्ते पालथे ठेवलेले असताना बदामची राणी कोणती हे ओळखायचं आणि पैसे दुप्पट. पत्ते पालथे ठेवतानाच कळत होतं की राणी कुठली असेल. आजूबाजूचे लोक वेगवेगळी बडबड करून गोन्धळात भर घालत होते.. माझ्या बाजूचा एकजण म्हणत होता.. "अरे किती सोप्पय यार .. चल माझे शंभर घे.." आणि त्याने राणीचा पत्ता दाखवला.. त्याचे दोनशे मिळाले त्याला!..
"बदामकी रानी करेगी पैसा डबल.. डब्बल.. डब्बल्ल..."
.. पत्ता परत ठेवताना त्याने तो एका कोपर्‍यात मुडपला आणि पुन्हा ठेवला.. पुढच्या दोन तीन राऊंडमध्ये लांबूंनच मला राणीचा पत्ता कुठला हे त्याने बरोबर दाखवले.. मलाही पैसे लाव, दुप्पट होतील वगैरे म्हणू लागला.. मी साफ नकार दिला.. पण कुतुहलापोटी तसाच उभा राहिलो.. मनात वाटलं, काय हरकत आहे?.. एवढं सोपं तर आहे. पैसे दुप्पट होतील.. नोकरीसाठी वणवण फिरतोच आहे, आजच्या दिवस बसच्या ऐवजी रिक्षाने जाईन. पण पुन्हा वाटलं, छे-छे! हा सगळा हातचलाखीचा खेळ आहे, पैसे गेले तर काय करायचं?
ह्या संभ्रमातच असताना माझ्या बाजूच्या माणसाने मला राणीचा पत्ता कुठला हे सुचवतच त्या पत्ते फिरवणार्‍या माणसाकडे माझी बोली लावली.. "एक हजार, ये साहब की तरफसे..!!"
त्याने मला विचारले, "रानी बताओ, दो हजार मिलेगा..!"
माझ्या बाजूचा माझा हितचिंतक मला सांगतच होता राणी कुठली आहे ते, मी नुस्तं त्याला माझी सहमती दाखवली.., त्याने उघडून पाहिली आणि खरंच ती बदामची राणी होती! माझ्या छातीत धडधड वाढली होती, आणि आनंदही होत होता.. दोन हजार रुपये!! एका मिनिटात एक हजार रुपयांची कमाई?!! पत्ते फिरवणार्‍याने माझ्याकडे पाचशेच्या चार नोटा केल्या.. मी त्या घेणार इतक्यात तो म्हणाला.. "पहले बताओ, तेरे पास हजार है की नही..? तूने बोली हजारकी लगाई थी.." दोनच दिवसांपूर्वी मनी ऑर्डर आली होती घरून, पैसे होते माझ्या खिशात. मी थोडा मागे सरकलो आणि पाकीटातून काढून त्याला पाचशेच्या दोन नोटा दाखवल्या आणि दुसरा हात पुढे केला..
"अरे भई, जरा देखने तो दे की असली है कि नही?" तो म्हणाला.. मी घाबरतच त्याच्या हातात दोन नोटा ठेवल्या.. तो म्हणाला.. "सिर्फ रानी दिखाओ और दो हजार लेके जाओ.." तीनही पत्ते पालथे ठेवलेले होते.. मी पुन्हा एकदा का दाखवू? आधीच दाखवली होती ना, असा थोडा वाद त्याच्याबरोबर घातला.. माझ्या आणि दोन हजारच्या मध्ये फक्त एक बदामची राणी होती, आणि मला तो मुडपलेला कोपरा दिसला.. माझ्या हितचिंतक शेजार्‍याचे आभार मानत मी त्या पत्त्याला स्पर्ष केला, आणि त्याने तो उलथा केला...
ती बदामची राणी नव्हती!!! तो एक पूर्ण कोरा पत्ता होता..!! माझ्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या.. माझा शेजारी मला म्हणाला, "अरे तो नव्हता यार, तो दुसरा होता, तू गडबड केली ना, आता तुझे एक हजार गेले..!" त्याने दात विचकले आणि त्या जुगार्‍याला डोळा मारला...!!
"गेले? असे कसे गेले? मी तर बोलीच लावली नव्हती, माझ्या तर्फे ह्या शेजारच्या माणसाने लावली होती ! माझे हजार परत द्या.. परत द्या..."
माझ्या बोलण्याकडे आता त्याचे लक्षच नव्हते.. तो नेहमीप्रमाणे त्याचे पत्ते फिरवत होता..
"बदामकी रानी करेगी पैसा डबल.. डब्बल.. डब्बल्ल..."

..मला तोंडाला कोरड पडली, हात पाय थरथर कापायला लागले.. त्या कोंडाळ्याच्या बाजूला एक पोट सुटलेला, जाड मिशीचा, काळा गॉगल घातलेला उंच माणूस सिगरेटचे झुरके घेत उभा होता.. तो या जुगार कंपनीचा म्होरक्या होता.. मी त्याला माझी कहाणी सांगितली. मी चांगल्या घरातला आहे हे सांगितलं, तो गुरकावून मला म्हणाला.. "मग आम्ही काय चांगल्या घरातले नै काय बे? चल फुट इथुन, गेला तुझा पैसा.."

... पुढचं जास्त काही आठवत नाही साहेब.. माझ्या डोळ्यातून घळघळा पाणी, सगळी गर्दी माझ्याकडे दात विचकून हसतिये, बाजूच्या कोपर्‍यातला मोठा दगड, त्या जुगार्‍याचा, शेजारच्याचा आणि त्या पोट सुटलेल्या माणसाचा असे तीन चेंदामेंदा झालेले रक्तबंबाळ चेहरे .... एव्हढंच आठवतंय साहेब.....!!!

----- समाप्त -----

गुलमोहर: 

पैशाची, नोकरीची गरज भल्या भल्या माणसांची सदसदविवेक बुद्धी गहाण पाडते....अगदी खरंय.

चांगली जमलीये. आमच्या एका नातेवाईकाचे असे बघता बघता गेलेले पैसे. बाहेरगावाहून आलेले जिवाची मुंबई करायला. फार वाईट. पण एकदा बुध्दी गहाण टाकली की संपलच सगळं. Sad

चांगलं रेखाटलंस्...पण मग भ्रमंती करणार्‍या त्या तरुणाला नोकरी मिळाली का रे............वाट पहाणार्‍या वडीलांची आशा पुर्ण झाली का?

तान्याने या विषयावर टाकलेली गोष्ट आठवली.
आफताब लिहिण्याची शैली खूप छान आहे. कथा प्रांतातपण निपुण आहात तर.
गझल पण येउ द्या ना..

छोटीशीच पण खुपच छान लिहीली आहे .. वाईट वाटलं .. एक क्षणात मनाचा तोळ ढळतो आणि होत्याचं नव्हतं होतं .. Sad

पोहचली अगदी..
अशीच मायबोलि एक्दिवाळी अंकात पण वाचली होती...

पटली कथा.
विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसय हे. एकच क्षण लागतो तोल ढळायला आणि मग होत्याच नव्हतं होवुन जात.

एकदा मोहात पडला की पडला. हाव वाढतच जाते.
शेवटची कलाटणी जमली आहे.
मला एक प्रसंग आठवला. अगदी असाच. माझ्याबाबतीत घडलेला. (शेवटचा परिच्छेद सोडुन :))
गावी जत्रा होती. मी ११ वीला असेन बहुतेक.
मग माझ्याकडे २० रु होतेच शिवाय मामीने मला २० रु दिले होते आणि सांगितल की तुम्ही (मी व माझा ४-५ वर्षचा मामेभाउ) जत्रेत जावुन फिरुन या. काहितरी खायला घ्या.
मग असच फिरता फिरता तीन पत्ते फिरवणारा माणुस, त्यातली राणी ओळखणे, त्यावर जिंकणारे लोक हे सगळ असच होतं. कमीत कमी ५ रु लावायचे होते.
मी जरा निरिक्षण करुन मग त्यात भाग घेतला. जिंकत गेलो. आणि नंतर हरत गेलो. शेवटि १० रु राहिले मग भानावर आलो.
नंतर घरी गेल्यावर मला प्रचंड कानकोंड वाटत होतं. त्यावेळपासुन कानाला खडा. गम्मत म्हणुनदेखिल कधी २ रु देखिल अशा ठिकाणी घालवत नाही.
आता लक्षात येत की जिंकणारे आणि तो जुगारी हे एकच असतात. आपल्यासमोर फक्त नाटक असत त्यांचं.

सर्वान्नाच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद..
हा माझादेखील (शेवटचा परिच्छेद सोडून) अनुभव आहे. मी त्याला पोलीसाकडे जायची धमकी दिली आणि फोन करु लागलो, तेव्हा त्याने माझे पैसे परत दिले होते..

शेवटच्या परीच्छेदातच तर खरा भावनांच्या उद्रेकाचा परीणाम जाणवतो ! एका साध्या सरळ माणसाच्या बद्दल शेवट कदाचीत हाच असु शकेल ! मला पटकन 'डोंबिवली फास्ट' आठवला !

आफताब, या आधीही इथे प्रतिसाद दिला होता, तो हरवला ????!!!

लहानपणासून असे जुगार मुंबईत बघत आलोय. त्या गर्दीतल्या एखाद्याची कथा अशीही असू शकते असे वाटले नव्हते.

बर्‍याच दिवसानंतर लिखाण केलेस मित्रा....
छान लिहीलेस...
विषेशत बारकावे छान मांडलेत...
सही!
Happy

त्या सावज ठरलेल्या माणसाच्या ठिकाणी स्वतःला ठेऊन बघितल्यावर जाणवते कि हे मनाचा तोल ढळणे नव्हते कारण मनाचा तोल ढळण्यासाठी चांगले काय वाईट काय, काय करावे काय करू नये याचा विचार करूनही मनाला मोह पडतो व हातून एखादी गोष्ट घडते. या कथेत त्याला एवढा विचार करायला अवसरच ठेवला गेला नाही. तो बेसावध असतानाच त्याची शिकार (अक्षरशः) केली गेली. म्हणून एकतर असंगाशी संग जराही करू नये अथवा पाण्यात राहून कोरडे रहाता येण्याजोगा सावधपणा अंगी बाणलेला असला पाहिजे.

शेवटच्या परिच्छेदात त्याच्या स्वतःवरच्या (गोष्ट घडून गेल्यावर उशिरा भान आल्याने) रागाचा outburst असावा असे मला वाटते कारण लुटण्याची वृत्ती एखाद्याच्या डोक्यात धोंडा घालून मरणारी नाही, ती अशीच लुटल्या जाणार्‍यासमोर खदाखदा हसत रहाते.

असो, एकदा ठेच लागून शहाणपणा येणे हेही नसे थोडके.

कथा आवडली,
सर्व सामान्य मानास काशी फसतात याच बोलक उदाहरण आहे हे.
परन्तु, ही व्यक्ती सर्व सामन्य नही, त्याने तिघाना मारलय.
हे नक्की काय दर्शवत?

मस्त,
कसला गाजवाजा नाही , गोंधळ नाही, सस्पेन्स नाही, तरीही कथा थोड्क्यात आटोपुन शेवटही छान
पु.ले. शु

आम्ही वा. चे. शु