दीर्घरांगंत्यतिष्ठ योग
फोड - दीर्घ-रांग-अंत्य-तिष्ठ योग
अर्थ- लांऽऽऽऽबलचक क्यू च्या कायम मागे असण्याचा योग
हा योग कुंडलीत घेऊन आलेली माणसं कायम कोणत्या ना कोणत्या तरी क्यू मध्ये उभी राहिलेली दिसतात.
रांगेत ह्यांच्या समोरच्यालाच नेहमी विपरित बुद्धी होते. बँकेत ह्यांच्या समोरची, नुस्तं पेन्शन अकाऊटचा बॅलन्स विचारण्याच्या तयारीने आलेली, आत्तापर्यंत तुरू तुरू चालणारी म्हातारी, खिडकीशी आल्यावर ते विसरते. तिथे जाऊन तिची सगळी खाती, कालव्यांनी नद्या जोडल्यासारखी जोडून, ती ह्या बँकेने गिळून समुच्च कोरडी ठणठणीत कशी करावीत ह्याची साधक-बाधक चर्चा सुरू करते.
फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये हे कुठल्याही क्यूत उभे राहिले तरी ह्यांच्या समोरचा एकटा माणून आठ ट्रे भरून ऑर्डर देतो. किंवा ह्यांच्या समोरची बाई फक्तं सॉफ़्ट सर्व्ह कोन घ्यायला किंवा डाएट कोक घ्यायला उभी असते. व्वा! पुढे एकुलती एक बाई, तिची छोटी ऑर्डर, अशाने पूर्णपणे हुरळून जाण्याआधीच ह्या योगाचा हिसका बसतो.... या बाईने पर्समधलं अख्खं विश्व धुंडाळून सादर केलेलं कार्डं हे क्रेडिट न निघता लायब्ररी कार्ड निघतं किंवा क्रेडिट कार्ड निघलं तरी आठवड्यापुर्वीच मेलेल्या कार्डाचं कलेवर निघतं किंवा तिने पैसे काढले तरी पाचशेची नोट.
ह्यांनी तिला तो कोक किंवा कोन काहीही घेण्यासाठी भीक देण्याचीही सुतरामही शक्यता नाही कारण ह्यांची बायको ह्यांच्याकडे आणि समोरच्या एकुलत्या एका बाईकडे काक दृष्टीने कोनातून बघतेय ह्याची ह्यांना खात्रीच असते.
बरं तो गोंधळ नको म्हणून ड्राईव्ह थ्रू मधून निघाले तर पुढच्याच गाडीतल्याला पैसे कार्डाने द्यायची दुर्बुद्धी होते आणि कार्डं बरोबरच असतं पण सही करायला घेतलेली रिसिट त्याच्या फाटक्या हातातून निसटून पतंगासारखी उडत निघते, मांज्याशिवायचा पतंग- एकदम कटी-पतंग. आणि ह्या नंतर जेव्हा ह्यांची ऑर्डर द्यायची वेळ येते तेव्हा त्या खांबातून, 'युवर ऑर्डर प्लीज' ही आकाशवाणी ऐकू न येता एकदम 'हलाला फुटा हटा फर्रर्रर्र हिडिस-फिडिस.....' असलं भलत्याच भाषेत काहीतरी ऐकू येऊ लागतं... त्यामुळे त्या खांबातल्या नरसिंहाचा घसा खाकरून होईपर्यंत हे तिथ्थे तस्से उभे.
बर्याचदा तर अशी माणसं क्यू मध्ये उभी रहात नसून ती उभी रहातात तेव्हा फक्त पुढेच विनाशकालीन बुद्धीच्या वैतागवाण्या माणसांचा क्यू निर्माण होतो की काय असा प्रश्न पडतो.
ही माणसे कायम पहिली असतात, पण शेवटून. टेलिफोन कंपनी, वीज कंपनी, गॅस कंपनी अशा सगळ्या यच्चयावत कंपन्यांच्या फोन कस्टमर सर्विसच्या मंजूळांनी, तुम्ही क्यूत पुढे सरकल्याचं विविध 'क्यूऽऽऽट' पद्धतींनी सांगितलेलं ह्यांना, त्यातल्या हेलकाव्यांसकट मागून पाठ असतं. आणि अर्थातच अशावेळी लावलेले सगळे म्युजिक ट्रॅक्स ह्यांना शिट्टीवर वाजवता येतात.
इतकच काय पण बाजूची कार लेन जरा जोरात जातेय म्हणून हे लेन बदलतात तेव्हा आता ह्यांच्या समोर आलेल्या समस्तं कार्सना आणि त्यांच्या चालकांना भर रस्त्यात एकदम वैराग्याचं फेफरं येतं....
काय ठेवलंय आयुष्यात?, जाऊन जाऊन कुठे जाणार आहोत आपण?, शेवटी ही दुनिया गोल आहे... असे खोल नि:श्वास टाकत ती लेन आधीच्या लेनपेक्षाही हळू जाऊ लागते.
असा अनुभव आपल्याला आल्यास, आपल्या लेनमध्ये ह्या योगाचा शापित घुसल्याची खात्री असावी व लेन बदलावी. आपण बदलेली लेनही तशाच धापा टाकू लागल्यास तो शापित दुसरा तिसरा कुणी नसून आपण स्वत: असल्याची खात्री बाळगा.
ही माणसे ज्या लिफ्टच्या क्यू मध्ये उभी रहातात, तिच्यात एक अख्खी बाई, तिच्या काखेतलं पर्स सदृश गाठोडं, हातातला आरसा आणि उघड्या लिपस्टिकसकट ओठ रंगवत रंगवत आत जाऊ शकेल इतकी जागा असताना सुद्धा लिफ्टचा दरवाजा ह्यांच्या नाकावर टिच्चून बंद होतो. मग कधी नव्हे ते आता पहिल्या नंबरावर उभ्या असलेल्या ह्यांच्यासमोर लिफ्ट उघडते तेव्हा आतून ती रिपेअर करणारी माणसं त्यांची अवजारं आणि 'आऊट ऑफ ऑर्डर' चा बोर्ड घेऊनच बाहेर पडतात. तो परत एकदा ह्यांच्या टिचलेल्या नाकावर ठेचून लावत आपलं काम सुरू करतात.
हा योग गुरूस्थानी असताना, हे उभे राहिलेली रांग त्यांना हव्या त्याच खिडकीशी, दरवाजाशी किंवा खिडकी अथवा दाराच्या भोकाशी नेऊन सोडणार नाही ह्याचीच खात्री जास्तं असते.
उदा. मरतुकडा पाजवा उंदीर एकटाच शिरेल किंवा बाहेर येईल इतक्या (अ)रूंद भोकाशी आल्यावर, आतला आवाज (भोकाच्या आतला) त्यांना शक्य तितक्या तुसड्या टोनमध्ये, हे तीन तास उभे राहिलेली रांग तिकिटाची नसून पासाची आहे हे सांगतो.
जेव्हा हे, 'एघे-एफू' (एक घेतली तर एक फुकट) साडी सेलमध्ये एक घेऊन रांगेत दोन तास उभे राहून शेवटी काऊंटरपाशी त्या तेज:पुंज होऊन (दुकानातल्या लायटिंगचा महिमा) चकाकणार्या (घामट किंवा टकल्या किंवा दोन्ही) दिव्याकृतीजवळ हे पोचतात तेव्हा, तो सढळ हाताने फुकट लुगडी पुरवणारा 'वस्त्रांगण प्रो. श्रीधर आणि कं.' मधला श्रीधर नसून, त्यांनी विकत किंवा फुकट घेतलेल्या लुगड्यातला ब्लाऊजपीस टरकावून वस्त्रहरण करणारा 'आणि कं.' मधला दु:(कान)शासन आहे ह्याचा साक्षात्कार होतो.
नाटकाच्या मधल्या वेळात बटाटेवड्यांच्या रांगेत उभे राहिलेले हे न चुकता प्रसाधनगृहाच्या दाराशी पोचतात. सिनेमाच्या मधल्या वेळात प्रसाधनगृहासाठी उभे रहातात आणि पुढच्या शोच्या तिकिटाच्या खिडकीशी पोचतात.
चांगली हातात पूजेची थाळी-बिळी बघून बाईच्या पाठी सिद्धीविनायकाला जाण्यासाठी उभे राहिलेले हे, तिथे दर्शनाला येऊन आता दर्शन देण्यासाठी उभ्या बच्चन पंचायतनाच्या (अमितचंद्र, जयामाई, अभिषेकभैया, ऐश्वर्या दैय्या आणि त्यांचा सामाईक बॉडीगार्ड) मंडपापाशी सुखरूप पणे पोचतात.
ह्यांचा काही म्हणजे काहीच भरवसा नाही. प्रबळ योग गुरूस्थानी असलेला असाच एक पीडित चुकून मुंग्यांच्या रांगेत उभा राहिल्याचे ऐकण्यात आहे.
ह्या योगाने भ्रष्ट माणसे लगेचच ओळखू येतात.
समोरच्या तीन फुटी शेंबड्या पोरापासून पहिल्या ओळीत बसून बघितलेल्या मूव्हीपर्यंत, कोणत्याही गोष्टीकडे भुवया उंचावून, मान उंचावून, टाचा ऊंचावून बघण्याची ह्यांन्ना सवय असते. सवयीने, कोणत्याही वेळी हे अगदी एकटेसुद्धा रांगेतच उभे असल्यासारखे दिसतात- अगदी स्वत:च्या घरात, जेवणाच्या टेबलापाशी, फाटकापाशी, बाथरूमपाशी, आणि बेडरूमच्या दाराशीही... सवयीने भुवया, मान आणि टाचा उंचावून पहात....
आई शप्पथ ! काय मस्त लिहिता
आई शप्पथ ! काय मस्त लिहिता तुम्ही !

Pages