असेही योगायोग - वस्तू संपुष्ट योग

Submitted by दाद on 31 January, 2008 - 00:02

वस्तू संपुष्ट योग

'संपली' ह्या एकाच शब्दावर ह्यांच्या आयुष्यातली कोणतीही गाडी शेवटच्या स्टेशनात जाऊन थांबल्यासारखी तटते. ह्यांच्यासाठी कोणतीही वस्तू विशेषत: ह्यांना हवी असलेली, मुळात संपलेल्याच अवस्थेत असते.

रेशनवरची साखर, सेलमध्ये लागलेला शर्ट, नाटक-सिनेमाची किंवा रेल्वेची तिकिटं, टॉयलेट पेपर, उपवासाच्या दिवशी सगळ्या दुकानांतला साबुदाणा आणि बाजारातली रताळी, सार्वजनिक सत्यनारायणाचा प्रसाद, ह्या फारच क्षुल्लक गोष्टी आहेत.

सुरेख गाण्याच्या मैफिलीची तिकिटं मिळूनसुद्धा हे चुकीच्या वेळी म्हणजेच ती संपल्यावरच पोचतात. 'साखर? संपली!' अस, पोत्याला पडलेल्या छोट्या भोकशाला खुपसून साखरेच्या धारेखाली चहाचा कप धरणारा वाण्याचा पोऱ्या ह्यांना सांगतो. दुपारी ऑफिसात हे जेवणाच्या वेळी 'संपलेला' डबा उघडतात कारण ह्यांची बायको चुकून संपूर्ण भरलेला डबा घरी ठेऊन पूर्ण रिकामा डबा डबेवाल्याला देते. सत्यनारायणाच्या पुजेला हे कथा संपल्यावर पोचतात. ससा कासवाच्या गोष्टीत ह्यांना सशाचाही हेवा वाटतो कारण हे संपूर्णं रेस संपल्यावर उठतात.

हे लग्नाच्या पंगतीत जेवायला बसल्यावर जिलबीच काय पण मठ्ठाही संपतो. इलेक्ट्रिक शेव्हरने ह्यांची अर्धी दाढी झाल्यावर वीजेचा पुरवठा, साबण लावल्यावर, शॉवरमधून पाण्याची धार, देवळातल्या अंगाऱ्याच्या पिंपातला अंगारा, कालपर्यंत धरणापर्यंत जाणारा गाडी रस्ता अर्ध्यावरच, संपात भाग घ्यायच्या आधी संप, लॉटरीची तिकिटं, इतकच काय पण ह्यांनी पायावर डोकं ठेवण्याच्या दोन क्षणच आधी कोणत्या त्या बुवांची अध्यात्मिक पॉवर..... हे सगळं सगळं संपतं.

मिठाच्या सत्त्याग्रहात ह्यांनी भाग घेतला असता, तर ह्यांनी उचलण्याआधी मीठही संपलं असतं... इतका हा योग पॉवरफुल आहे.

गाडीच्या चाकात हवा भरायला पेट्रोल पंपावर गेलेल्या एका पीडित ह्यांनी, हवा भरण्याच्या मशीनवरचा 'आउट ऑफ ऑर्डर'चा बोर्ड वाचून 'संपलीये का?' असा प्रश्न केल्याचं ऐकिवात आहे.

जगातल्या समस्त वस्तू जशा ह्यांच्यासाठी संपलेल्या... तसेच हे ही कायम मुकलेल्या अवस्थेत. फक्तं दोन गोष्टींना हे नक्की मुकत नाहीत- त्यांचा स्वत:चा जन्म आणि लग्नं झाले असल्यास स्वत:च्या लग्नाची मंगलाष्टकं. बाकी चाळीतल्या कुणा म्हातारीलाही हे बघायला जातात ते ही ती....

गुलमोहर: 

आमच्या नशिबात मात्र तुझ लिखाण वाचायचे भरपूर योग असूदेत म्हणजे झाल!! Happy येऊदेत अजून Happy

हा पण योग धमाल आहे एकदम.......... "चाळीतली म्हातारी" ....... एकदम सही....

मी नेहेमी बघितलेला बोर्ड... "बासुंदी संपली"! Happy

>>हे लग्नाच्या पंगतीत जेवायला बसल्यावर जिलबीच काय पण मठ्ठाही संप.
या योगालापण पूर्ण अनुमोदन.
''म्हातारी!" Lol

असे सम्पुष्ट योग "पुण्यातल्या" लग्नात अनुभवले आहेत..:)

ससा कासवाच्या गोष्टीत ह्यांना सशाचाही हेवा वाटतो कारण हे संपूर्णं रेस संपल्यावर उठतात.
Happy दाद अजूनही हसु आवरत नाहीये.

दाद, तुझ्ण लेखन नेहेमीप्रमाणेच छान ! पण आपली दाद योग च्या प्रतिसादाला Wink

<<< ह्यांनी पायावर डोकं ठेवण्याच्या दोन क्षणच आधी कोणत्या त्या बुवांची अध्यात्मिक पॉवर..... >>
अफाट पंच. नतमस्तक.