झुला

Submitted by कौतुक शिरोडकर on 10 October, 2009 - 06:49

"पण मेहता, तुम्ही माझा प्रोब्लेमच समजून घेत नाही." गौरव आता चिडून उभा राहीला.
"अरे पण सरमळकरभाय, तुम्ही इतका चिडते कशाला ?" चिडलेल्या कस्टमरला कसं हॅंडल करायचं हे मेहतांना चांगलच ज्ञात होतं. त्यांनी त्यांच्या आवाजाची पट्टी बर्फाच्या पाण्यात गुंडाळल्यासारखी थंड राखली होती.
"मेहता, दोन दिवसांनी तुमच्यामुळे मी होमलेस होणार आहे आणि तुम्ही मला विचारताय, चिडतो कशाला ? " गौरव दोन्ही हात टेबलावर ठेवून जवळ-जवळ किंचाळलाच त्यांच्यावर.
"अरे, पण मी तुमचा प्रोब्लेम सोल्व करते बोल्ला ना. मग टेंशन कशाला घेते ? बसा तुम्ही. ये भद्रेश, एक थंडा सांग सेठसाठी." मेहताने उठून गौरवला बसवत ऑर्डर दिली. कोपर्‍यात मान खाली घालून उभा असलेला भद्रेश चटदिशी बाहेर गेला.
"मेहता, माझा फ्लॅट तयार व्हायला अजून दोन महिने लागणार आहेत आणि तुमच्या वायद्यावर मी माझा जुना फ्लॅट विकलाय. दोन दिवसांनी ती मंडळी राहायला येणार आहेत. मला फ्लॅट खाली करावाच लागेल." गौरवने पुन्हा मघासचीच उजळणी केली. पण स्वर मात्र अजूनही तार सप्तकात होता.
"सरमळकरभाय, दोन महिन्याचा बात आहे ना. मग तुम्ही माझ्या पदमानगरच्या बिल्डींगमध्ये शिफ्ट व्हा. पायजे तर शिफ्टिंगचा खर्चा मी देते. तुमच्या जबानची किंमत कळते आपल्याला." तेवढ्यात भद्रेशने थंडा आणून टेबलावर ठेवला. बहुतेक शेजारच्या खोलीत दिसलेल्या फ्रिजमधला असावा, गौरवच्या लक्षात आलं. "घ्या, थंडा घ्या." बोलता-बोलता मेहतांनी सेलवरून कुणाला तरी फोन लावला. "हॅलो, कोण... गांधी.... हा मी बोलतोय.. कुठे हाय तुम्ही ? एक काम करा.. फटाफट इकडे ऑफिसला यायचा. हां.... आत्ता.... हां." सेल कट करून ते गौरवकडे वळले.
"बगा.. सरमळकरभाय, ते गांधी आता येल. तो सगळा व्यवस्था करेल. तुम्ही पॅकींग करायला घ्या. टेंशन नाय. दोन मैन्यात तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये जाणार. टेंशन नाय. असला प्रोब्लेम पैला कदी झाला नाय सरमळकरभाय. हे साला मंदी, सिमेंटचा शोर्टेज, डाऊन झालेला रियल इस्टेट... किती प्रोब्लेम. पण तुम्ही टेंशन घ्यायचा नाय. तुमचा काम झालाच समजा." मेहतांनी एखाद्या लहान मुलाला चोकलेट देऊन गप करावं तशी गौरव सरमळकरची समजुत काढली.

थोड्याच वेळात गांधी त्याच्याबरोबर त्याच्या घरी होता.
"सेठ, तुम्ही सामान पॅक करायला घ्या, मी टेंपो मागवतो." गांधीनी अस्खलित मराठीत सुरुवात केलीत.
"गांधी तुमचं मराठी छान आहे. तुमच्या मेहताची मात्र बोंब आहे त्या बाबतीत." गौरव गांधीना त्यांच्या मराठीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन मोकळा झाला.
"लहानाचा मोठा इथेच झालोय साहेब. शेजार सगळा मराठीच. घरात तेवढी गुजराती. तीच शिकायला थोडा त्रास झाला." गांधीने त्याच्या मराठीचं रहस्य सांगितलं. "मी आलोच टेंपो घेऊन."

दुपारपर्यंत सगळा लवाजमा घेऊन गौरव टेंपोत ड्रायव्हरशेजारी बसला. स्नेहाला मांडीवर घेऊन माधवी खिडकीपाशी बसली. गांधी इतरांसह मागे सामानासोबत बसला. सामान गरजेपुरतेच होते. जुनं अवजड फर्निचर गौरवने आधीच विकलं होतं. नव्या जागेत नवीन फर्निचरचा त्याचा पुर्ण प्लान रेडी होता. या तात्पुरत्या व्यवस्थेवर तो खुष नसला तरी दोन महिने आता नाईलाजाने तिकडे काढावयाचे होते. कालच सर्विसिंगला टाकलेली बाईक आता हाती असायला हवी होती हा विचारही मनात क्षणभर चमकून गेला. टेंपोने मुख्य रस्ता सोडला आणि तो डाव्या हाताच्या कच्च्या रस्त्याला वळला. साधारण दोन किलोमीटरच्या अंतरावर उभ्या असलेल्या त्या तीन इमारती त्याला दिसल्या. माधवीने त्याच्याकडे पाहीलं. एखाद्या अज्ञात बेटावर राहायला जातोय असचं वाटल त्याला. समोरच पदमानगरचा प्रचंड मोठा फलक झळकत होता. त्याच्यावर मात्र संपुर्ण वसाहतच दिसत होती. स्विमिंग पुल, क्लब, देऊळ, शाळा, सुपरमार्केट आणि बरच काही. पण ते सगळं फलकावर. समोर मात्र तीन इमारती एकमेकीना खेटून उभ्या होत्या. एकांताची भीती वाटाव्या तशा. टेंपो पुढे सरकत होता. माधवीशी बोलण्याच्या नादात उजव्या हाताला ड्रायव्हरच्या खिडकीतून दिसणार्‍या स्मशानाकडे गौरवचं लक्षचं गेलं नाही.

टेंपो पदमानगरच्या नव्या इमारतींजवळ पोहोचला. गांधी टेम्पोतून उतरताच माधवीला गौरवने इशारा केला. ती खाली उतरली आणि मागोमाग गौरवही उतरला. पण स्नेहा मात्र आतच बसून राहली. तिला एकंदरीत सगळ्याच प्रकाराची मौजच वाटत होती. गांधीने गेट ढकलला आणि किंचित कुरकुर करत तो सोनेरी गेट उघडला गेला. तेलपाण्याचा कोणी त्रासच घेतला नव्हता बहुतेक. मागोमाग टेंपो आत शिरला व 'ए' विंगच्या पोर्चजवळ जाऊन थांबला.गौरव व माधवी परिसर न्याहाळत होते. एकुण तीनच इमारती होत्या कंपाऊंडच्या आत. एखाद्या दुर्लक्षित माळरानासारख्या पसरलेल्या त्या सगळ्या परिसरात फक्त त्या तीनच इमारती होत्या. जवळपास माणसांची दुसरी वस्ती अशी नव्हतीच. पण त्या दोघांचे लक्ष आता त्या गोष्टीकडे नव्हतेच. ते दोघेही भारावल्यासारखे सगळं न्याहाळत होते. प्रचंड मोठा आणि सुरेख सोनेरी रंगात रंगवलेला नक्षीदार मुख्य गेट, त्या लगत वॉचमनची कॅबिन, पलिकडे भलीमोठी भुमिगत टाकी, प्रशस्त जागा, पार्कीग, मध्ये गार्डन, मोठे वर्‍हांडे, सुरेख पोर्च, उत्तम फॉलसिलिंग.... माधवी पुर्ण हरखूनच गेली.
"गौरव, गेट खुपच मोठा आहे नै." तीने सहज गेटवरून हात फिरवला. तिच्या नजरेसमोर तो जुन्या इमारतीचा चार फुट उंचीचा गंजलेला व एकाबाजूने निखळलेला गेट तरळला. पण ते दृश्य झिडकारून ती पुन्हा त्या पंधरा फुटी सोनेरी गेटकडे पाहू लागली.

दोघेही टेंपोच्या दिशेने चालू लागले. हमालांनी एव्हाना सामान उतरवायला सुरुवात केलेली. गांधी त्यांना सुचना देत होता. स्नेहा मात्र अजून टेंपोतच बसून होती. तिथून दोघांना हाका मारत होती. तिच्याकडे पाहून स्मित करत ते गांधीकडे वळले.
"कुठला माळा गांधी ? "
"तिसर्‍या माळ्यावरचा सॅम्पल फ्लॅट रेडी आहे साहेब."
"तिसरा माळा ? " दोघेही किंचाळेच.
"लिफ्ट आहे साहेब. सध्या बंद ठेवलीय. पण तुमच्यासाठी चालू करून घेईन मी. या." शेवटच्या शब्दासह तो वळला.
"स्नेहा, इकडे ये." माधवीने स्नेहाला आवाज दिला व ती गौरवसह गांधीच्या मागे निघाली. ते आता जिन्याच्या पायर्‍या चढू लागले.
"इथले सगळे फ्लॅटस विकले गेलेत ?" गौरवने गांधीला मघापासून घोळणारा प्रश्न विचारला.
"अजून याची बुकींग सुरु नाही झाली." गांधीने त्यांना एका बाजूस येण्याचा इशारा केला. ते दोघे बाजूस झाले. कोण्या कुत्र्याने त्याच्या खुणा तिथे शिल्लक ठेवल्या होत्या.
"म्हणजे इथे कोणीच राहात नाही ? " माधवीने किंचित आश्चर्याने विचारलं.
"अजून नाही. पण तुम्ही काळजी करू नका. गेटवर वॉचमन असतो आणि दोन महिन्यांचा तर प्रश्न आहे." गांधी तिसर्‍या माळ्याकडे वळला.
"पाण्याचं काय ?" माधवीने मुलभुत गरजेचा प्रश्न विचारला.
"आहे. पाण्याची सोय आहे. म्युन्सिपल कनेक्शन मिळालय. त्यामुळे त्याची काळजी नाही." त्याने दाराला चावी लावली. दार उघडून ते आत शिरले. हॉल नीटनेटका होता. झाडलोट केल्यासारखा. बहुधा सॅम्पल फ्लॅट असल्याने सफाई राखलेली होती. खिडक्यांना, दाराला पडदे होते. हॉलमध्ये झुंबर, पंखे, डायनिंग टेबल, खुर्च्या, सोफा, बाथरूममध्ये गीझर, बेडरूममध्ये बेड, कपाट वगैरे. सगळ्या सोयी नीटनेटक्या होत्या.
"सगळं आधीच मांडून ठेवलय. हे सगळं फ्लॅटसोबत फ्री आहे का ? " माधवीने गांधीना शेवटी विचारलचं.
"नाही. पण हल्लीचा ट्रेंड आहे. कंप्लिट फर्निश्ड फ्लॅट दाखवायची. यामुळे इंटेरिअर डेकोरेशन व सामानाच्या जुळवाजुळवीचा अंदाज येतो." गांधीने एखाद्या इस्टेट एजंटला साजेसे उत्तर दिले. माधवीने बेडरूमची खिडकी खोलून बाहेर पाहील. खाली सुरेख गार्डन दिसत होतं आणि गार्डनच्या झुल्यावर एक मुलगी झुलत होती. माधवीने निरखून पाहीलं. ती स्नेहा होती.
"स्नेहा..." माधवीने आवाज दिला आणि स्नेहाने वर पाहीलं.
"मम्मी..."म्हणत तिने झुला थांबवला आणि उडी मारून ती उतरली. झुला हलला आणि त्याचा तो कुरकुरणारा आवाज माधवीपर्यंत पोहोचला. अंगावर शहारे आले तिच्या चटकन ! पण तिचं लक्ष धावत येणार्‍या स्नेहाकडेच होतं. झुला अजूनही झुलत होता.

"गांधी, बाहेरच्या बोर्डावर तर कंप्लिट कॉलनी दाखवली आहे. पण आहे इथे फक्त तीन इमारतीच. अस का ?" गौरवच्या या प्रश्नावर माधवी देखील गांधीकडे वळली.
"कंप्लिट टाऊनशीपचाच प्लान होता. मेहता, अगरवाल आणि बरुचा या तिन्ही बिल्डर्सने मिळून हा प्लान ठरवला. सगळ्या गोष्टी सॅंक्शन झालेल्या. ठरल्याप्रमाणे मेहता सेठने काम चालू केलं. पण अगरवाल आणि बरूचा त्यांच्या दुसर्‍या प्रोजेक्टमध्येच गुंतून राहीले. आधी चुकून आणि मग जाणूनबुजून दुर्लक्ष केलं गेलं. आज ना उद्या काम चालू होईल या अपेक्षेने सेठने काम चालू ठेवलं आणि जवळजवळ पुर्णदेखील केलं. पण अडचणी एकदा यायला लागल्या की मग त्या एकमेकीचा हात धरूनच येतात. माणसांपेक्षा त्यांनाच जास्त कळपाने राहायची सवय. त्यातच ग्रामपंचायतीने नवीन त्रांगड गळ्यात घातलं. सेठची सगळी मेहनत फुकट गेली. आता लोकही वास्तुशास्त्राचे चार धडे शिकूनच येतात. घोडं तिथेच अडलं ते अडलचं." शेवटच्या चार ओळी दोघांच्या डोक्यावरून गेल्या. पण दोघांनी त्या समजून घेण्यात उत्सुकता दाखवली नाही. कदाचित गांधीनाही विषय पुढे रेटायचा नव्हता.

सामान फ्लॅटमध्ये सोडून गांधी निघून गेले. माधवी व गौरव गरजेपुरतं सामान खोलून तयारी करू लागले. स्नेहा तिच्या बाहुलीशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसली. सगळं आवरून स्वयपाक करण्याएवढा वेळ हाती नव्हताच आणि माधवीची इच्छाही नव्हती. शेवटी रात्री जेवायला बाहेर जाण्याचे ठरले.
साडेआठ वाजले होते. पॅसेजमधले दिवे बंद होते. मोबाईलच्या उजेडात तिघे खाली उतरले. बाहेर अंधार साकळला होता. गौरवने आभाळाकडे नजर टाकली. आकाश निरभ्र असलं तरी चांदण्याचा मागमुस नव्हता. उजेडाचे नैसर्गिक पर्याय जणू संपावर गेलेले. तिघेही गेटकडे निघाले. वॉचमनची कॅबिन रिकामी होती. गौरवने चहुवर नजर फिरवली. त्या तिघांशिवाय तिथे माणसांचा वावर नव्हताच. दुरवर फक्त मोकळं मैदान होतं.

"गाडी सर्विसिंगला उगाच टाकली ना ?"माधवीने शांततेचा भंग केला. प्रत्युत्तरादाखल त्याने केवळ तिला एक हुंकार दिला. वातावरणातील गडदता तो न्याहाळत होता. नकळत स्नेहा त्याला बिलगल्याचे त्याला जाणवले. त्याने तिच्याकडे पाहीलं. ती प्रसन्न हसली. अंधाराला सरावलेल्या त्याच्या नजरेने ते टिपलं आणि त्याबरोबर तिच्या डोळ्यातील भीतीही. त्याने माधवीकडे पाहीलं. ती सभोवार पहात चालली होती. कदाचित भीतीचा स्पर्श तिच्या मनाला अजून झाला नव्हता. गौरवने तिच्या मावशीचा विषय काढला आणि दोघे गप्पा मारत पुढे सरले. चालता-चालता माधवी थबकली आणि ते गौरवला जाणवलं. क्षणभरात एक अनोळखी लहर तिच्या डोळ्यात डोकावली व त्याने ती नजर विस्फारून पहात होती तिथे पाहीलं. त्या अंधारात, ती चार लोखंडी खांबावर, उतरत्या छताचा तोल सावरून ठाकलेली आकृती नकळत भयाण वाटली त्याला. समोर स्मशानभुमी होती. ’ग्रामपंचायतीने गळ्यात घातलेलं त्रांगड’ आणि ’वास्तुशास्त्र’.... गांधीच्या शेवटच्या वाक्यांचा संदर्भ आता लागला.

"चल उशीर होतोय आपल्याला." त्याने तिला बळेच ओढले. झपझप पावले टाकत तिघे पुढे सरकले. सुदैवाने मुख्य रस्त्याला रिक्षा मिळाला आणि ते हॉटेलकडे वळले. बरचं बोलायचं ठरलं होतं. पण गप्पांना आता रंग नव्हता. आता चालली होती ती फक्त प्रश्नोत्तरे. ज्यांच्या असण्यानसण्याने काहीच फरक पडत नव्हता. तीन इमारती, त्यात राहणारं फक्त एक तीन जणांच कुटुंब, वस्तीपासून लांब आणि स्मशानाच्या जवळ. दोन्ही डोक्यात याशिवाय दुसरं काही घोळत नव्हतं. तीन तिघाडा काम बिघाडा सारखं. उरकल्यासारखं जेवण झालं. हात धुताना माधवीने फक्त त्याला एकच प्रश्न विचारला.
"मेहताने याबद्दल काही सांगितलं होतं का ? "
"नाही." त्याने मान खाली घालून शांतपणे उत्तर दिले. गांधीनेही सांगितलं नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. जेवून निघाल्यावर त्यांना पदमानगरला येणारी रिक्षा मोठ्या कष्टाने मिळाली. त्यांनी उजव्या बाजूस बाहेर पहाण्याचेही टाळले. पण रिक्षावाल्याने नेमकं स्मशान येताच त्या दिशेला पाहीलं. शरीरावर काटा उभा राहीला माधवीच्या. गौरवच्या हातातला तिचा हात किंचित थरथरला.

रिक्षा बाहेरच थांबला. गौरवने पैसे दिले. झोपलेल्या स्नेहाला त्याने खांद्यावर घेतले व तो निघाला. मागोमाग माधवी निमुट निघाली.
"साब आप इधर रहते है क्या ? " रिक्षावाल्याने रिक्षातून मान बाहेर काढून विचारलं.
"हाँ.... क्युँ ?" गौरव चमकून वळला.
"कुछ नही. चलता हुँ साब." रिक्षा स्टार्ट करून तो निघाला. रिक्षा वळवून त्याने पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहीलं. ’अरेरे.... बिच्चारे !’ असा काहीसा भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसला गौरवला. ते दोघे वळले. रात्रीचे अकरा वाजले होते. अंधार मी म्हणत होता. गौरवने मोबाईल टॉर्च ऑन केला आणि इमारतींकडे फिरवला. त्या रिकाम्या घरांच्या खिडक्या, बालकनीवरून ती प्रकाशाची तिरिप काठीविना चाचपडणार्‍या आंधळ्यासारखी माणसांच्या खुणा चाचपत गेली. गौरवने मोबाईल टोर्च समोर फिरवला व ते त्यांच्या तात्पुरत्या घरी पोहोचले. माधवीची त्याच्याशी बोलायची इच्छा होती पण त्याने ’सकाळी बोलू’ म्हणून विषय टाळला.

"जुनपर्यंत आपण शिफ्ट होऊ ना ?" सकाळी माधवीने चहाचा कप त्याच्यासमोर ठेवत विचारलं.
"हो. नक्कीच. मी भेटतो आज मेहताला." त्याने कप उचलताच तिला आश्वस्त केलं. "स्नेहा उठली का ?"
"नाही अजून." माधवीने तिचा कप उचलला.
"हे बघ मधू, आता आपला नाईलाज आहे. दोन महिन्याचा प्रश्न आहे. तेव्हा...." रात्रीचं उरलेलं व तात्पुरते सकाळवर ढकललेलं संभाषण त्याने सुरु केलं. जास्त टाळता येणं शक्य नव्हतचं.
"पण मेहता दोन महिने म्हणतोय त्यात ते होईल का ?" माधवी महत्त्वाच्या मुद्द्यावर अडकली.
"मी बोलतो त्याच्याशी. शक्य तेवढ्या लवकर. आता जे आहे ते आहे. यातच तडजोड करावी लागणार आहे. नाहीतर पुर्ण बजेट ढासळेल." त्याने चहा ओठाजवळून पुन्हा मागे सारला.
"मला कळतयं ते. पण या अशा ओसाड जागी दोन महिने...." नुसत्या कल्पनेने शहारली ती. मागोमाग रात्रीचे ते स्मशानाचे रुप डोळ्यासमोर अवतरले आणि अंगावरची लव उभी राहील्यासारखी वाटली तिला.
"स्नेहाला सध्या सुट्टी आहे. तू आईकडे राहतेस का तोवर ? " गौरवने मार्ग सुचवत चहाला फुंकर घातली.
"आणि तू ? तू इथेच राहणार या ओसाड रानात ? तुझ्या जेवणाखाण्याचं काय ? " माधवीने कप खाली ठेवून त्याला किंचित भांडणाच्या पवित्र्यातच विचारलं.
"दोन महिन्यांचा प्रश्न आहे, करू ऍडजेस्ट." त्याने सीप घेतला.
"नो वे. दोन महिने हवे तर या घरात कैदेत असल्याप्रमाणे काढेन. पण तुला सोडून मी कुठे जाणार नाही. सांगून ठेवते." माधवीने तिचा निर्णय ऐकवला. नवराबायकोच्या वादात बायकोचा शब्द शेवटचा असतो एवढी अक्कल होती गौरवला.
"ओ.के. मान्य. चहा घे. गार होतोय. आणि काय काय हवय त्याची लिस्ट बनव. सगळं घेऊन येऊया. काळजीपुर्वक बनव. काही राहीलं तर तंगडतोड करावी लागेल. येताना बाईक झाली का ते ही पाहू ? म्हंजे कमीत कमी हा रिक्षा नसण्याचा त्रास तर भोगावा लागणार नाही." त्याने कोमट झालेल्या चहाचे घुटके घेत तिला पुढच्या कार्यक्रमाची कल्पना दिली.

ते तिघे जेव्हा खाली पोहोचले तेव्हा स्नेहा माधवीचा हात सोडून झुल्याकडे धावली.
"स्नेहा.... स्नेहा.... थांब." माधवी तिच्या मागे धावली. तोपर्यंत ती झुल्यावर बसली देखील. गौरव शांतपणे चालत तेथवर आला. तोवर स्नेहाच्या शेजारी माधवीदेखील झुल्यावर बसली होती.
"चला म्हणजे तुम्हाला मन रमवायला अजून कशाची गरज लागणार नाही." त्याच्या या वाक्यावर माधवीने हसून डोळे मिचकावले. झुला रंगात आला.

मेहताच्या भेटीनंतर दोन गोष्टी नक्की झाल्या. एक म्हणजे दोन महिन्यात १०० टक्के त्यांचा फ्लॅट तयार होणार आणि दुसरं म्हणजे सध्या त्यांच्यासाठी दुसरी सोय त्याच्याकडे उपलब्ध नाही. नसणार हे पटायला जड गेलं गौरवला. पण अडला नारायण होता तो. वस्तीतली जागा विकण्याचा आटापिटा करणारा तो बिल्डर आपल्याला एखादा रिकामा फ्लॅट देईलच कशाला ? पैशाच्या तराजूत गरजा तोलणारी ती माणसं. उगाच कशाला नस्तं लोढणं गळ्यात घेतील ? मेहताने जरी लाख लपवलेलं असलं तरी बोलण्याच्या ओघात गौरवला हेही कळलं की त्यांना तिथे ठेवणं म्हणजे इतरांना दाखवलेले ते अमिष होतं. पुढे त्यांच्या तिथल्या राहण्याची जाहीरात करून मेहता पदमानगरचे फ्लॅट विकणार होता. म्हणजे पुढचे दोन महिने स्मशानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्या ओसाड जागेतल्या रिकाम्या बिल्डींगमध्ये काढण्याशिवाय पर्याय नव्हता. माधवीच्या माहेरी राहणं त्याच्या स्वभावाला धरून नव्हतं. सासर्‍याकडे राहणं म्हणजे फारच 'नीच' कर्म असला काहीसा त्याचा ग्रह. स्वबळावर स्वतःची पोजिशन बनवू पाहणार्‍या गौरवला सासर्‍याचे कोणतेच उपकार नको होते. इथे त्याचं स्वतःच असं कोणी नव्हते. जे काही होतं ते गावी. तेही वाटण्यांमध्ये गेलेलं.

गौरवने खटाटोप करून डिश टिव्ही लावून घेतला. तेवढाच माधवीला विरंगुळा. गौरव गेल्यावर अख्खा दिवस तिच्यासमोर आ वासून उभा राहत असे. टिव्ही तरी किती पाहणार ? स्नेहाने कितीही हट्ट केला तरी ती तिला खाली झुल्यावर नेत नव्हती. गौरव येईपर्यंत ती थांबत असे. गौरव आल्यावर मग ते तिला झुल्यावर नेत. आठवडा झाला त्यांना तिथे येऊन. अजूनतरी सगळं सुरळीत होतं. पण चाळीत आठ वर्षे संसार केल्यावर माणसांशिवाय राहणं तिला जड जात होतं. क्षणाक्षणाला जाणवत होता तो तिथला एकटेपणा. सदोदित बंद असलेला तो दरवाजा. एखाद्या काळकोठरीच्या दरवाज्यासारखा कायम बंद. माणसांचा काहीच आवाज नव्हता. नाही म्हणायला चुकून-माकून चिमण्या, कावळे एखाद्या वेळेस येऊन खिडकीत आवाज देऊन जायचे. तेवढाच काय तो आवाज. अधुनमधून मुख्य रस्त्यावरून जाणार्‍या एखाद्या डंपरचा किंवा ट्र्कचा कर्कश हॉर्न घरातून रेंगाळत जायचा. गौरव आला की त्याच्याबरोबर बाजाराला जाण्याच्या निमित्ताने ती डोळे भरून माणसं न्याहाळत बसायची. आपण माणसांच्या वस्तीपासून जास्त लांब नाही ही कल्पना त्या वेळेस फारच सुखावह असायची. ती लोकांची गर्दी डोळयात घेऊनच ती परतत असे. पण दुसर्‍या दिवशी पुन्हा गौरव गेल्यावर अवतीभवती असायचा तोच असह्य अबोल एकांत. फक्त दोन महिने..... फक्त.... माधवी स्वत:चीच समजूत घालत होती. त्यातला एक आठवडा तर गेला आता फक्त आठ आठवडे. प्रत्येक रात्र कॅलेंडरवर एक नवीन लाल फुली घेऊन झोपायची.

रात्री अकराच्या आत झोपण्याचा दंडक चालू होताच. ती वेळ म्हणजे खाली सभा भरवणार्‍या भटक्या कुत्र्यांची हक्काची वेळ. वातावरण त्यांच्या भुंकण्याने दणाणून जाई. पण या कोलाहलाची जुनी सवय असल्याने त्यांना त्याचा काही विशेष त्रास नव्हता. त्या दिवशीही ते तिघे अकराच्या आत झोपले. रात्री अचानक गौरवची झोप मोडली. कदाचित एखादं स्वप्न .... की आवाज... पण झोप मोडली हे मात्र खरं... त्याने उठून टॉयलेटच्या दिशेने मोर्चा वळवला. फ्लशचा आवाज त्या शांततेत त्याला धबधब्यासारखा वाटला. तो पुन्हा बेडरूमकडे वळला. माधवी आणि स्नेहा गाढ झोपल्या होत्या. तो बेडकडे वळला आणि थबकला. तो आवाज कसला ? गौरवने लक्ष देऊन आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. आवाज ओळखीचा होता. चिरपरिचित गंजलेल्या लोखंडाची कुरकुर... हा झुलाच.... पण एवढ्या रात्री.... कोण असेल.... वॉचमन... कदाचित... की आणखी कोणी ..... पाहायला हवं....असेना कोणी.... काय फरक पडतो..... तो बेडवर बसला. पण त्या शांततेला सहज चिरून घुमत होता तो आवाज. कोण असेल.. ? ..... फरक पडतोय... कारण तिथे वॉचमन त्याला एकदाच दिसला होता आणि तोही दिवसा.... अजून कोणी तर नव्हतचं .... भटक्या कुत्र्यांशिवाय.... मग कोण......?? गौरव खिडकीकडे वळला. हल्केच पडदा सारून त्याने खाली पाहीले. तो आवाज हलणार्‍या झुल्याचाच होता. पण झुला आपणहून झुलत नव्हता. गौरवची नजर तिथेच थिजली. बर्फात गोठलेल्या अवशेषासारखी. झुल्यावर एक काळसावळं पाच सहा वर्षाचं पोर मजेत झोके घेत होतं. जवळच दोन तीन कुत्री निमूट पडून होती. झोके घेता-घेता त्याने मान वर फिरवली. खिडकीचा हललेला पडदा त्याला जाणवला होता. त्याने खिडकीवर नजर रोखली आणि गौरवने पडदा सोडला. आवाज कमी होऊ लागला होता. झुला कदाचित थांबत होता. झुला आता पुर्णपणे थांबला होता. बाहेरच्या आवाजाचा अदमास घेत गौरवने दोघींकडे पाहीलं. कपाळावरचे घर्मबिंदू जाणवले त्याला. वरच्या गरगरणार्‍या फॅनची हवा त्याच्यापर्यंत पोहोचत होती. पण याक्षणी मात्र तो घामेजला होता. का ???? कसली भीती ? तो घाबरला होता. एका लहान मुलाला.... नाही..... मघ्यरात्री दिसलेल्या एका लहान मुलाला... तेही माणसांच्या वस्तीपासून दूर....स्मशानाच्या जवळ.... त्याने थरथरत्या हाताने परत पडदा सारला. झुला रिकामा होता. शांत आणि स्तब्ध. कशाशी काहीच संबंध नसल्यासारखा. शिवाय मघाशी तिथेच शांत बसलेले कुत्रेही नव्हते. त्यांचा तो आवाजही नव्हता. गौरवने वाकून पाहीलं. माणसाची चाहूल नव्हतीच तिथे. शक्त्य तितक्या लांब गौरवने नजर टाकली. नजरेच्या टप्प्यात कुठल्याही ठिकाणी कुणाच्या अस्तित्वाची खुण नव्हती. गौरवने खिडकीची काच ओढून खिडकी पुर्ण बंद केली. आता बाहेरची हवा आत येण्याचा प्रश्नच नव्हता. तो दुसर्‍या बेडरूमकडे धावला. खिडकी उघडी होती. त्याने खिडकी बंद केली आणि बाहेर नजर टाकली. इथेही स्मशानशांतता होती. थरथरत्या हाताने त्याने पडदा ओढला. तो पुन्हा मास्टर बेडरूमकडे वळला आणि तो बेडच्या टोकाला बसला. बराच वेळ. त्याची झोप केव्हाच उडाली होती. तो झोपलेल्या माधवी व स्नेहाकडे फिरून फिरुन पहात होता. त्याच्या भोवती त्याक्षणी घोंगावत असलेल्या वादळाचा त्यांच्या चेहर्‍यावर मागमुस नव्हता. कोण होता तो मुलगा ? फक्त एकच प्रश्न.... उत्तराच्या अपेक्षेत. खाली जाऊन पहावं का ? नको. त्याने स्वतःलाच समजावलं. शरीरात कंप जाणवण्याइतपत होता. अशा अवस्थेत बाहेर जाऊन काय पहाणार ? कदाचित वॉचमनचा मुलगा असेल. पण रात्री साडेबारा वाजता एकटा लहान मुलगा... रिलॅक्स गौरव... त्यने स्वतःला समजावलं. नसते तर्क नको...... पण ते आहेतच..... भिंतीवर मारलेल्या रबरी चेंडूसारखे उसळून परत येताहेत.... काय करावं ? ..... घड्याळ्याचे काटे आता नेहमीपेक्षा दुप्पट संथगतीने चालले होते. भोवतालचा अंधार चोरपावलांनी त्याच्या अस्तित्वात साकळायला लागला होता. ही भीतीची जाणिव आता स्वतःच भक्कम घर बांधू लागली होती. अजून बरीच रात्र उलटायची बाकी होती.

"काय रे ? झोपला नाहीस का नीट रात्री ? " चादर घडी करत माधवी त्याच्या जवळ आली.
"झोपलेलो. का ?..... काय.... काय झाल ?" गौरवने अडखळला.
"चेहरा असा काय झालाय ? ओढल्यागत. आरशात बघ. डोळे कसे लाल झालेत. जाग्रण केल्यासारखे." माधवीने स्नेहाला मधोमध निजवत तिच्या दोन्ही बाजूस उशा लावल्या.
"हो का ? असेल. रात्री मध्येच झोप मोडली होती. मग बराच वेळ नुसताच पडून होतो. नंतर केव्हा झोप लागली ते कळलचं नाही बघ." त्याने हसण्याचा क्षीण प्रयत्न केला. केसांचा बुचडा बांधून किचनकडे वळणार्‍या माधवीने ते पाहीलच नाही.

गौरव निघाला.
"कुणासाठीदेखील दार उघडू नकोस." त्याच्या या अनपेक्षित वाक्यावर मात्र तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"गौरव, काय झाल ? असा काय बोलतोयस ?"
"अग ते फेरीवाले, सेल्समन, दान मागणारी शाळकरी मुले... कोणीही येतं उगाचच. म्हणून म्हटल." जाताना आठवणीने दोन्ही दरवाजे नीट बंद करायचे तो तिला पुन्हा सांगून गेला. दुसर्‍या बेडरूमच्या खिडकीतून मेन गेट नीट दिसत होतं. माधवीने त्याला त्या खिडकीतून बाय केलं. तो दृष्टीआड होताच ती मास्टर बेडरूमच्या दिशेने निघाली. एक नजर बंद दारांकडे टाकून ती स्नेहाकडे वळली. या इथे कशाला कोण येईल ? तेही फक्त टिचभर फॅमिलाला काहीबाही विकायला ? इथे कोणी राहत असेल याची कल्पना तरी असेल का त्यांना ? अजून आपण स्वतःच कोणाला पत्ता दिलेला नाही......... विचारांच्या मागे फिरता फिरता ती थांबली. असा का बोलला गौरव ? उगाच पण नस्त्या काळजा करतो कधी कधी... !

संध्याकाळी तो गांधीच्या समोर होता. मेहता बहुतेक पालिताणाला गेले होते. देवदर्शनाला.
"वॉचमन कधीच जाग्यावर नसतो तुमचा. लिफ्ट अजून चालू नाही. जिन्यांवर दिवे लागले नाहीत. कुत्र्यांनी नुसता हैदोस घातलाय." गौरवने तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली.
"वॉचमन आहे साहेब. तो नसता तर मग पाणी कोणी सोडलं असतं तुम्हाला ? गार्डनमध्ये अजूनही हिरवळ कशी असती ? सध्या सुट्टीचा माहोल आहे. माणसं कमी आहेत. थोडं एडजस्ट करावं लागतय. तसं तिकडे कोणी फिरकत नाही बघा. तुम्हाला तो फेरीवाले, सेल्समन वगैरेचा त्रास होणार नाही. लिफ्टवाला चार दिवसात येतो म्हणायला. नवीन माणूस ठेवलाय त्यांनी. दिवे लावलेले आहेत म्हणा. वायरींग कंप्लिट नसेल. करतो. उद्यापर्यंत होईल. कुत्र्यांचं म्हणाल तर त्याच्यावर सध्यातरी काहीच इलाज नाही बघा. हा त्रास तर सगळीकडेच आहे." गांधी मेहतांच्या तालमीत पुर्ण तयार झालेले. त्यांनी सगळ्या तक्रारींवर तोड तयार ठेवलेली. गौरव तिथून बाहेर पडला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तसाच ठेवून. तो मुलगा कोण ? विचारावं की विचारू नये या विचारात तो असताना गांधी दुसर्‍या घरकुल शोधणार्‍या दांपत्याबरोबर बिजी झाले. वॉचमनलाच विचारायला हवं.. कदाचित त्याचाच मुलगा असेल.... गांधीला विचारण्यात काहीच अर्थ नाही.

बाईक स्टँडला लावून तो सुपरमार्केटमध्ये शिरला. लिस्टमधल्या सामानांची उजळणी व खरेदी नीट करून तो बाहेर आला तेव्हा त्याच्या बाईकसमोर एक रिक्षा आडवा होता. सामान डिकीत कोंबून त्याने बाईक स्टार्ट केली आणि हॉर्न दिला, पण रिक्षा जागचा इंचभर हलला नाही. निवडक शिव्यांची हल्की बरसात करून त्याने पुन्हा हॉर्न दिला. शेवटी तो बाईक बंद करून सगळ्या शब्दांची जुळवाजुळव करत रिक्षासमोर आला. रिक्षावाल्याला पहाताच सगळे शब्द मागच्या मागे पळाले.
"तूम ? " एवढ्चं निघालं त्याच्या तोंडून.
"अरे साब, बैठो. पदमानगर जानेका हैना ?" तोच त्या रात्री मेहेरबान झालेला रिक्षावाला.
"नाही. बाईक आहे माझी. तुमच्या मागेच अडकली आहे. " गौरवने त्याला त्याचा प्रोब्लेम सौम्य शब्दात सांगितला.
"अरे, सॉरी साब." त्याने उतरून रिक्षा ढकलून पुढे घेतला आणि तो गौरवकडे वळला. " घ्या साहेब, एवढा रस्ता पुरे तुम्हाला."
"तू त्या रात्री मला काहीतरी सांगणार होतास का? न बोलताच गेलास. काय होतं ते ? " गौरवचे आता रस्त्याकडे लक्ष नव्हते. त्याला परतणार्‍या त्या रिक्षावाल्याच्या चेहर्‍यावरचे त्या रात्रीचे भाव आठवले.
"काही नाही साहेब. काही खास नाही." रिक्षावाल्याने गळ्यातल्या रुमालाबरोबर विषय झटकला.
"म्हणजे काहीतरी आहे." गौरव त्याच्यासमोर येऊन उभा राहीला. रिक्षावाल्याने त्याच्याकडे पाहीलं. गौरवचा चेहरा त्याला बरेच काही सांगून गेला आणि तो बोलायला लागला. त्याच्या प्रत्येक शब्दाबरोबर गौरवच्या चेहर्‍याचा रंग उडायला लागला. रिक्षावाला निघून गेला आणि गौरव मात्र बराच वेळ तिथेच स्तब्ध-निशब्द होता. त्याच्यापुरते भोवतालचे जग थांबले होते. त्याक्षणी तो एक असहाय, हतबल, चक्रव्युहात फसलेला एक सर्वसामान्य होता. त्यानंतर घरापर्यंतचा त्याचा तो नेहमी पंधरा मिनिटात संपणारा प्रवास फारच खडतर होता. तो त्याच्या आयुष्यातला सर्वात दिर्घे आणि त्रासदायक प्रवास. त्याच्या नावाने शिव्याची लाखोली मोजणारे अनेक वाहनचालक व पादचारी यांचे काही भान नसलेला तो घरी पोहोचला हेच त्याच्यासाठी फार होतं.

बाईक पार्क करून त्याने डिकीतले सामान काढलं आणि तो विंगकडे वळला. समोरच्या इमारतीतून तिघेजण येत होते. त्यातला एक वॉचमन होता. वॉचमनला पहाताच त्याला फार आधार वाटला. त्याला थांबलेला पहाताच वॉचमन थांबला. तो त्याच्या दिशेने सरकला.
"लिफ्टवाला है साब. थोडा सामान और लगेगा. दो दिनमें....." वॉचमनने त्या इतर दोन माणसांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी त्याला ती गोष्ट इतकी महत्त्वाची नव्हती.
"वॉचमन इथर कोई बच्चा रहता है क्या ?" त्याच्या आवाजात अधीरता होती. कालच्या रात्रीपासून त्याने मनात कोंडलेला प्रश्न आता मोकळा केला. जणूकाही तोच त्या प्रश्नाने बांधला गेला होता. प्रश्न विचारताच त्याला सुटका झाल्यासारखं वाटलं. उत्तराच्या अपेक्षेत त्याने वॉचमनकडे पाहील. पण त्या चेहर्‍यावर पुर्ण गोंधळ होता.
"बच्चा.... ?" वॉचमनने खात्री करून घेण्यासाठी मुख्य मुद्दा पुन्हा उच्चारला.
"बच्चा...." गौरवने शब्दावर जोर दिला. " बच्चा...तुम्हारा फॅमिली इधर रहता है ना ?" गौरवच्या प्रश्नातून त्याला हवा असलेला होकारात्मक उत्तराचा कल जाणवला वॉचमनला.
"नही साब, वो तो गांवमे है. हम तो अकेला है. बच्चा तो कोई है नही इधर.... कोई दुसरा रहताही नही तो बच्चा कहासे आयेगा...? .... सुबहसे तो मै इधर हुं... अरे हां... अरे साब, छुट्टीयॉ है ना... बच्चालोग आया होगा गार्डनमे खेलनेको.... वो....." लिफ्टच्या मॅकेनिकने मध्येच त्याला 'जातो' असा इशारा करताच, त्याच्याकडे पाहूने त्याने होकारार्थी मान वळवली. " शिवगंगा'मे चलो... हम अबही आते है वहाँपर..." पुन्हा तो गौरवकडे वळला.
"वॉचमन, रातको साडेबारा बजे यहॉं गार्डनमे एक बच्चा उस झुलेपर खेल रहा था..... रातको साडे बारा बजे...." गौरवने त्या ठराविक वेळेला अधोरेखित केले.
" रातको....? क्या बात कर रहे हो.... ऐसे कैसे होगा ? यहाँ तो आप लोगोंके सिवा कोई है ही नही.... बच्चा कहासे आयेगा...."त्याने छातीवर हात ठेवून शपथ घ्यावी या अविर्भावात सांगितलं, " बच्चा देखा आपने.... रातको...साडे बारा बजे....." त्याचे शेवटचे शब्द सगळे स्वतःसाठीच होते. बोलता-बोलता तो जणू गौरवची उपस्थितीच विसरला.
"कबसे हो यहॉंपर ? " गौरवने पुढचा अनपेक्षित प्रश्न विचारला त्याला.
"सुबह....."
"कितने महिनोसे.... बिल्डींग बन रही थी तबसे के उससे भी पहले.....? " गौरवने त्याला एक सरळ प्रश्न केला.
"बन रही थी तबसे..... यही कोई आठ मैनेसे..." किंचित डोकं खाजवत त्याने उत्तर दिले.
"तुमसे पहिले वॉचमन कोई और था ?"
"जी साब"
"वो कहॉ है अब ?"
"अब क्या पता साब. हम तो वहॉ... फुलपाडाका एरियामे थे... वहाँसे यहाँ लाके डाल दिया..... एक तो यहाँ कोई रहता नही... आमदनी भी कुछ नही..."
"तुमसे पहले यहाँ काम करनेवाले वॉचमन उस सामनेकी इमारतसे निचे गिरा था, ये बताया नही किसीने तुम्हे ?" गौरवने त्याची रामकथा थांबवली. पण त्याने दिलेली माहीती मात्र त्याच्यावर एखाद्या वज्राघातासारखी कोसळली.
"का बात करते हो साब ? हमे कोई बताया नही.. हम ..."वॉचमन आता त्याच्या गोंधळात. त्याचवेळेस स्कुटीचा आवाज आला आणि दोघे त्या दिशेला वळले. समोरून गांधी आत येत होते.
"काय झालं साहेब ? काही प्रोब्लेम ?" गांधी त्यांच्या सराईत मदतगाराच्या भुमिकेत.
" गांधी, याच्या आधी असलेला वॉचमन इथून का गेला ? " गौरवने सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचेच ठरवलेले. त्याला आता त्याच्या मनावर अनोळखी प्रश्नाचे ओझे नकोच होते.
"बदली झाली साहेब." गांधीने पटकन उत्तर दिले. "कायम नसतो कुणीच एका जागी."
"गांधी धडधडीत खोटं बोलताय तुम्ही. इथला तुमचा वॉचमन एक नंबरचा बेवडा होता. बायको मुलाला कायम मारझोड करायचा. त्याच्या बायकोने इथेच.... गच्चीतून खाली उडी मारली.... मुलासकट. त्यांना अडवायच्या नादात तो वॉचमनदेखील खाली पडला. एका क्षणी तीन बळी. त्यात हे स्मशान.... नस्ता शेजारधर्म पाळायला. म्हणून तुमच्या या प्रोजेक्टमधला एक फ्लॅट विकला गेला नाही आणि कदाचित विकला जाणार नाही. मी कोंडीत सापडलो आणि तुमच्या सेठने मलाच इथे गळाला लावलेल्या अमिषासारखा वापरला. माणूसकी वगैरे काही आहे की नाही ? तुमच्याकडे फ्लॅट बुक केला ही घोडचुकच म्हणायची." गौरवच्या कपाळाची शीर संतापाने उडत होती. त्याचा आवाज नकळत वाढला आणि माधवी-स्नेहाने खिडकीत येऊन खाली पाहीले.
"सरमळकरसाहेब, तुमच्याही कानावर अफवा आल्यात तर... अहो, या मंदीच्या दिवसात आधीच रियल इस्टॅट ढेपोळलीय. त्यात आपलं प्रोडक्ट विकायला दुसर्‍याच्या प्रोडक्टचा अपप्रचार ही साधीसरळ मार्केटींग ट्रिक सगळेच वापरतात. असं काहीही घडलेलं नाही. हवं तर तुम्ही पोलिसस्टेशनला चेक करा." गांधी मेहतांसारखाच शांत होता. आपली बाजू मांडताना त्याने चक्क त्याला पुरावाच उभा केला. पण गौरवचा मुळ मुद्दा अजून बाकी होताच.
"गांधी, ह्या अफवा नाहीत. हे झालय कारण मी स्वतः त्या तिथून ...."गौरवची नजर वर गेली. माधवीला पहाताच त्याच्या आवाजाची पट्टी तळाला गेली. कानात पुटपुटावे तसे तो बोलू लागला. गांधीने त्याच्यात झालेल्या बदलाचं कारण पाहील.
"मी स्वतः त्या झुल्यावर काल रात्री साडेबारा वाजता एक पाच-सहा वर्षाचे मुल पाहीलय."
"भास असेल साहेब. कुत्र असेल. पहिली गोष्ट म्हणजे इथे बळी वगैरे गेलेले नाहीत. तसं असतं तर मला दिसले असते कारण या साईटवर मी रात्री घालवल्या आहेत. दुसरी गोष्ट भुताखेतांवर माझा विश्वास नाही." गांधी एकदम ठाम होते.
"माझाही नव्हता. पण काल रात्री बसलाय. इथे आमच्याशिवाय कोणी राहात नाही. जवळपास दोन किलोमीटरच्या टप्प्यात मनुष्यवस्ती नाही. मग ते मुल आलच कसं आणि तेही रात्री ?" गौरवला त्याने जे पाहीलं त्याबद्दल खात्री होती. तो भास नाही याबद्दल त्याला पुर्ण विश्वास होता. पण गांधीने शेवटपर्यंत या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. उद्या पोलिसस्टेशनला जाऊन चौकशी करायचीच हे नक्की ठरवलं त्याने.

तो घरी पोहोचला आणि माधवीने प्रश्नांची सरबत्ती लावली. त्याने रात्रीचा प्रसंग व ते तीन बळी सोडून तिला बाकी सगळं सांगितलं. पण त्याच्या सांगण्यावरून व वागण्यावरून तो काहीतरी लपवतोय हे मात्र जाणवलं माधवीला. पण त्याची इच्छा नसल्याने तिने विषय वाढवला नाही. थोड्या वेळाने दोघी त्याच्यासमोर तयार होऊन आल्या. त्याने प्रश्नार्थक मुद्रेने दोघींना पाहील.
"पप्पा, चला ना खाली जाऊया खेळायला." स्नेहाने आपल्या दोन्ही हातांचा विळखा त्याच्या गळ्याभोवती घातला.
"खाली ? "
"हो. झुल्यावर.. ."
"नको...नको. " विजेचा धक्का बसावा तसा गौरव उठला. धडपडलेल्या स्नेहाला पटकन सावरलं माधवीने.
"का ? काय झाल ? " माधवीला त्याच्या त्या रिअ‍ॅलक्शनचा अर्थच कळला नाही.
"काही नाही. पण आज नको. थकलोय मी." त्याने कारण दिलं.
"मम्मी, चल ना, आपण दोघं जाऊ." स्नेहाने हट्ट करायला सुरुवात केली.
"बरं बाई आपण ..... "
"नको." गौरवने अडवलं तिला. "आज नकोच. त्यापेक्षा स्नेहा तू कार्टून नेटवर्क बघ." त्याने रिमोट तिच्या हातात दिला. रडणार्‍या स्नेहाने रिमोट ढकलला. तसं त्याने तिला जवळ घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. माधवी त्याच्या त्या विचित्र वागण्याकडे पहात राहीली. ती संध्याकाळ स्नेहाला समजवण्यात गेली.

रात्री नेहमीप्रमाणेच ते झोपले. गौरव मात्र झोपेचे सोंग घेऊन पडला होता. त्याला आज त्या अफवांवर शिक्कामोर्तब करायचं होतं. सेकंदासेकंदाला त्याची उत्सुकता वाढत होती, रात्र तिच्या गतीने पुढे सरत होती. साडेबाराचे काटे उलटून गेले. तसे त्याने पडदा सारून पाहीले. झुला शांत होता. बाहेरच्या आसमंतासारखा. भटकी कुत्री ही केकाटून गपगार पडलेली. समोरच्या रिकाम्या इमारतीशिवाय दुसरं काही नव्हतच तिथे. त्याच्या खिडकीतून दिसणारं आभाळ निरभ्र होतं. अधुकसा का असेना पण कुणाचीही हालचाल जाणवेल एवढा प्रकाश होताच. तो तिथे कितीवेळ होता हे त्याच्याही लक्षात आले नाही. पण झोप आता त्याचे डोळे मिटू लागली. जेव्हा डोळे उघडे ठेवणे असह्य झाले तेव्हा तो मुकाट अंथरूणावर आडवा झाला. रात्र पुन्हा तिच्या गतीने चालू लागली.

दुसर्‍या दिवशीची सकाळ फारच प्रसन्न होती. रात्री कोणतीच अप्रिय घटना घडली नव्हती या आनंदाचे पडसाद त्याच्या चेहर्‍यावर होते. पण ते दुपारपर्यंतच टिकले. ऑफिसमध्ये फर्नांडीसने त्याच्या आनंदावर घडाभर विरजण ओतलं.
"सरमळकर, यु बिलिव्ह घोस्टस ?" अचानक तोंडावर आपटलेल्या या प्रश्नाला नेमकं काय उत्तर द्याव हेच त्याला कळेना. त्याचा तो भांबावलेला चेहरा पाहताच फर्नांडीसने होकार गृहीत धरला.
"यु नो, आय नेव्हर बिलिव्ह इट टिल लास्ट मंथ." पुडी सोडून फर्नांडीस समोरच्या खुर्चीत बसला. या वाक्यानंतर उत्सुकता निर्माण होणं साहजिकच होतं आणि याची फर्नांडीसलाही कल्पना होती. कारण त्याच्या सगळ्या कथांची सुरुवात अशीच व्हायची.
"फर्नांडीस, मला जर माझ्या मातृभाषेत सांगता नेमकं काय झालं ते ?" गौरवने त्याची गाडी ट्रेकवर आणण्याचा प्रयत्न केला. इंग्रजीत सुसाट सुटणारी त्याची गाडी मग इतकी फास्ट धावायची की समोरच्याला तो नेमक्या कोणत्या भाषेत बोलतोय हे कळतच नसे. फर्नांडीसने त्याच्या कथेला सुरुवात करण्याआधीच एमडीचा चमचा परेश तिथे आला आणि त्याने गौरवला एमडीने बोलवल्याचा निरोप दिला. गौरवने त्याला 'आलोच' अशी खुण केली. एकदा एमडीच्या कॅबिनमध्ये गेलेला गौरव तास- दोन तास बाहेर यायचा नाही याची कल्पना असल्याने फर्नांडीसने त्याला मग नुसती हेडलाईन ऐकवली.
" अरे ऐक रे, माझी गोव्यातली बंगली एवढी वर्षे मी रेंटवर दिली होती. लास्ट इअर माझा टेनंटने सुसाईड केला आणि त्याची बायको, मुल घर सोडुन गेली. पण तो नाय गेला." लॉगआउट करणारा गौरव थांबला.
"तो कोण ?"
"टेनंट."
" तो मेला म्हणालात ना मघाशी ?" गौरवने बटन ऑफ केलं.
"यस मेला. डेड. त्याला बरीपण केला. बट हि इज स्टील इन दॅट हाऊस. तो मेला तरी माझ्या बंगलीचा पात्रांव.... आयमीन शेठ बनून बसलाय." फर्नांडीसने कथेचे रहस्य उघड केलं.
"आय कान्ट बिलिव्ह दिस." गौरवने वाक्य फेकलं खरं पण त्याच्या डोळ्यासमोर चटकन 'झुला' हलू लागला.
"फर्नांडीस, आपण नंतर बोलू यावर." इतकं बोलून गौरव निघाला. पण नंतर फर्नांडीस भेटलाच नाही. तो बाहेर निघून गेला होता.

संध्याकाळी गौरव पोलिसस्टेशनला पोहोचला. दारातच एका हवालदाराने त्याला आडवा घेतला.
"बोला, काय हाय?"
"चौकशी करायची होती." गौरवने सरळ मुद्द्यालाच हात घालायचं ठरवलं.
"ती रेल्वेस्टेशनला करायची. पोलिसस्टेशनला नाय. चला. निघा." हवालदाराने आपल्या हातावर दुसरा हात मारला आणि तंबाखूचा वास त्याच्या नाकात शिरताच तो शिंकला. तोच मागून दुसरा हवालदार पुढे आला.
"झाल का नाय ? " पहिल्या हवालदाराने हात पुढे केला, तशी त्याने चिमुट मारून तंबाखू उचलली. पुन्हा एकदा स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने मळत तो गौरवकडे वळला.
"काय झालं ?"
"पदमा नगरमध्ये मागच्या वर्षी एका कुटंबाने आत्महत्या केली होती. त्याबद्दल विचारायचं होतं ?" गौरवने एका दमात मु़ख्य विषय मांडला.
"तुमचे नातेवाईक व्होते का?" हवालदाराने मळलेल्या चिमटीतील अनावश्यक भाग टाकून बाकी तोंडात सरकवली.
"नाही. पण खरेच कुणी आत्महत्या केली होती का?" गौरवने प्रश्न रेटला.
"तुम्ही रिपोर्टर हाय का ?"दुसर्‍या हवालदाराने एव्हाना आपल्या तोंडात उरलेलं मटेरियल सरकवलं होतं.
अर्ध्या-पाऊण तासाच्या त्या मुलाखतीत गौरवला शेवटी एवढचं कळलं की आत्महत्या झाली होती ह्याची दोघांना माहीती आहे, पण खात्री नाही. लोक म्हणतात म्हणून. नोंदी पाहण्याच्या भानगडीत दोघे पडलेच नाही.

त्यानंतर तीन चार रात्री प्रसन्न ठरल्या. त्याला रात्री झुल्यावर कोणी दिसलचं नाही. मनात असलं तरी त्याने खाली जाऊन पाहण्याचे साहस टाळले. कदाचित तो भास असेल.... झोपेतून अचानक उठल्याने झालेला... मनाची समजूत घालणं सोपं नसतं. पण गेले चार दिवस पुन्हा तो अनुभव आलाच नाही. पण खाली झुल्याकडे जायचं मात्र तो अजूनही टाळत होता. स्नेहासाठी म्हणून तो खास मार्केटमधील गार्डनपर्यंत जात होता. त्याच्यातला हा बदल माधवीच्या लक्षात आला. कदाचित एखादा ऑफिशियल प्रश्न असेल, त्यामुळे तो फार डिस्टर्ब झाला असेल आणि आता प्रश्न सोल्व झाला असेल असा तर्क करून ती मोकळी झाली. आज ना उद्या गौरव कारण सांगेल याची तिला खात्री होती. म्हणून तिनेही तो भाग क्रोरला नाही. गौरव त्या भास आभासाच्या घोळातून बर्‍याच प्रमाणात सावरला होता. फर्नांडीसही त्याच्या कथेनंतर गायब झाला होता. अचानक गोव्याला गेल्याचं त्याला कळलं. त्यामुळे तो विषय तात्पुरता टळला होता. शिवाय गेले तीन चार दिवस वॉचमन देखील त्याला संध्याकाळचा गेटवर आढळत होता. या निमित्ताने का होईना आपल्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे ही जाणिव सुखद होती. लिफ्ट मात्र अजून तशीच खुंटीला बांधलेल्या मुक्या ढोरागत गपगार होती.

दिल्लीतलं एक महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट फायनल झाल आणि एमडीने शब्द दिल्याप्रमाणे गौरवची कामासाठी निवड केली. प्रमोशनचे चान्सेस होते याचीच ती झलक. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. माधवीसाठी ही बातमी तितकी आनंददायक नव्हती. येऊन-जाऊन एकूण तीन दिवस खर्च होणार होते. तीन दिवस एकटीने राहायचे हा विचार तिला कंपित करुन गेला. गौरवलाही जाणवलं ते.
"मला वाटते तू तीन दिवस माहेरी राहणं योग्य." गौरवने पुन्हा जुनाच तोडगा दिला.
"जमणार नाही. आई आणि बाबा गावी चाललेत. घराची दुरुस्ती काढलीय." माधवीने उपमा त्याच्यासमोर सरकवत सोफ्यात बस्तान ठेवलं.
"दादा वहिनी आहेत ना की तेही चाललेत ? " गौरवने पहिल्या घासाला जठरात ढकलत विचारलं.
"ते दोघेही कामावर जाणार. तिथेही मी एकटीच. शिवाय त्या दोघांचं करावं लागेल ते वेगळं. त्यापेक्षा इथे काय वाईट ? " माधवीने तिचा साधा हिशोब सांगितला. गौरवने विषय वाढवण्याएवजी उपमा संपवण्यात धन्यता मानली.

गौरव गेला आणि माधवी पुन्हा आपल्या एकटेपणाला कुरवाळत बसली. पण संध्याकाळी स्नेहाच्या हट्टामुळे ती खाली उतरली. स्नेहा बराच वेळ झुल्यावर खेळत होती. झुल्याचा कुरकुरता आवाज त्रासदायक होता. वॉचमन दिसला की त्याला तेलपाणी करायला सांगायचं हे तिने मनोमन ठरवलं. पण वॉचमन दिसलाच नाही. खेळणार्‍या स्नेहाचा चेहरा मात्र उतरतोय हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने पुढे होऊन तिला जवळ घेतलं. स्नेहाच्या अंगात तापाची कणकण होती. पण घरात क्रोसिन नव्हती. तापाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. मागच्या वर्षीची संपुर्ण सुट्टी स्नेहाने आजारपणात घालवलेली. स्नेहाला घेऊन ती तशीच बाहेर पडली.

डॉ. रेवंडकरांकडून औषध घेऊन ती माघारी वळली. रिक्शावाल्याने मेन रोडपर्यंत सोडलं. तो काही आत यायला तयार होईना. त्याचा नाद सोडून स्नेहाला उचलून ती उतरली. ती कच्च्या रस्त्याला वळली. तेव्हा मेन रस्त्यावरून एक मध्यम काळा सावळा माणूस चालत त्या दिशेला येत होता. माधवी मनोमन थोडी चरकली. कारण आता बर्‍यापैकी अंधारलं होतं. रस्ता सुमसाम होता. किंचित थांबून तिने अंदाज घेतला. तो माणूस पाठोपाठ दहा पावलांवर होता. माधवीच्या पावलांचा वेग वाढला. स्नेहाला उचललेलं असल्याने तिला जास्त भराभर चालता येईना. पण त्या दोघांमधील अंतर जास्तीत जास्त वाढत होते. ती स्मशानाजवळ पोहोचली. आत ज्वाळा भडकलेल्या होत्या. नुकतचं कोणीतरी कुणालातरी निरोप दिला होता. वाढत चाललेल्या अंधाराच्या पार्श्वभुमीवर त्या ज्वाळा फार अभद वाटल्या तिला. तिने नजर फिरवली. त्या ज्वाळाची धग स्पर्शून गेली तिला. मनोमन. मागून येणार्‍या पावलांचा आवाज अजून जाणवत होता. आता माधवी जवळ जवळ धावतच होती. तिला आता फक्त तिच्याच पावलांचा आवाज जाणवत होता. ती गेटजवळ पोह्चली. तिने मागे वळून पाहीलं. मागे कोणीच नव्हतं. एवढा वेळ वर अडकलेला श्वास आता खाली उतरला होता. ती थांबली. श्वास घेतला व ती गेटमधून आत शिरली. वॉचमनची कॅबिन रिकामीच होती.

स्नेहा अजून झोपलेलीच होती. माधवीला बरं वाटलं. पण तापात उतार-चढाव होता. स्नेहाचा ताप आता ओसरू लागलेला. माधवी फारच रिलॅक्स फील करत होती. मध्ये गौरवचा फोन येऊन गेला. पण तिने स्नेहाबद्दल त्याला काहीच सांगितलं. त्याला टेंशन द्यायची तिची इच्छा नव्हती. तिने घड्याळ्यात पाहीलं. आठ वाजले होते.

स्नेहाला उठवून तिने लापशी खायला घातली. तिची इतर कामे आटोपेपर्यंत स्नेहा कार्टून नेटवर्क बघत बसली. साडे दहा पर्यंत दोघी झोपायच्या तयारीला लागल्या. तेव्हा स्नेहाचे टेंपरेचर पुन्हा शंभरच्या दिशेने वाटचाल करू लागलेले. क्रोसिनचा एक डोस देऊन माधवीने तिला पुन्हा झोपवायला सुरुवात केली.

गौरवची कमतरता जाणवली तिला. स्नेहाला बरं नसल की सारखं घेऊन बसायला लागायचं. अशा वेळी गौरव असला की गोष्टी सोप्या व्हायच्या. पण आता ते शक्य नव्हतं. त्यातच नस्त्या शंका कुशंकानी फेर धरायला सुरुवात केली. एकट्या माणसाला चिंता नेहमी कोंडीत पकडतात आणि मग 'मन चिंती ते वैरी न चिंती' हा जुनाच खेळ सुरु होतो. तिला तिच्या एकटेपणाची आता तीव्र जाणिव होऊ लागली. स्नेहाचा ताप उतरायला हवा ह्याचा घोष तिने सुरु केला. जर जास्त काही झाल तर ती काय करेल ? नुस्त्या कल्पनेने दचकली ती. ...... इथे कुणी जवळपासही नाही. एक अनाठायी भीती मुळ धरू लागली. स्नेहाचे टेंपरेचर अजूनही जैसे थेच होते. माधवीने तिचे संपुर्ण अंग गार पाण्याने पुसून काढले आणि तिचं डोकं मांडीवर घेऊन बसली. बसल्या-बसल्या तिचा कधी डोळा लागला ते तिला कळलचं नाही. रात्री अचानक स्नेहाच्या बडबडण्याने तिला जाग आली. आपण बसल्या-बसल्या झोपलो हे लक्षात येताच ओशाळली ती. तिने स्नेहाकडे पाहील. टेंपरेचर ओसरलं होतं. तिला हायसं वाटलं. स्नेहाला कवेत घेऊन ती पहूडली. क्षणभरासाठी डोळ्यासमोर त्या ज्वाळा नाचून गेल्या. तिने चटकन डोळे उघडले. एवढा वेळ स्नेहाच्या टेंशनमध्ये असल्याने दुसरं काही तिच्या मनात डोकावल नव्हतचं. पण आता कुठे जरा रिलिफ वाटतो-न्-वाटतो तोच मघासचं दृष्य पुन्हा डोळ्यासमोर साकारायला लागलं. तिने मिटणारे डोळे तात्पुरते उघडेच ठेवले. समोर भिंतीवर नाईटलँपने सावल्याचा चित्रविचित्र संसार मांडला होता. नकळ्त तिचं मन त्या सावल्यांना आकार देऊ लागलं. अभद्र आकार. बटबटीत डोळे, सुळे असलेला जबडा, फैलावलेले हात, वेढब शरीर. तिने नजर दुसरीकडे वळवली. सावल्या तिथेही होत्याच. तिने डोळे गच्च मिटून घेतले. तोच हसण्याचा आवाज त्या शांततेवर मात करून गेला. दचकलीच ती. आवाज...... हसण्याचाच...... लहान मुलाच्या हसण्याचा आवाज..... इथे कुठे आणि तोही इतक्या रात्री... तिने रिकाम्या खोलीत नजर फिरवली. उशाला अलार्म लावलेल्या मोबाईलमध्ये पाहीलं. साडे बारा वाजलेले. पुन्हा तोच आवाज पण आता त्याच्या सोबत होती गंजलेल्या लोखंडाची कुरकुर.... हा आवाज झुल्याचाच. नक्की तोच. .... पण साडेबारा वाजता.... कोण असेल ? कुशीतल्या स्नेहाला नीट झोपवून ती धीर एकवटून उठली. आडोशाला उभं राहून तिने पडदा सारला. नजर विस्फारली. समोरच्या दृश्यावर विश्वास बसेना तिचा. झुल्यावर पाच-सहा वर्षांचं एक काळसावळं पोर मजेत झोके घेत होतं आणि त्याच्या मागे उभी पांढर्‍या साडीतली बाई त्याला झोके देत होती. अंधाराच्या पार्श्वभुमीवर त्या सावल्या नीट ओळखता आल्या तरी अंदाज बांधता येण्याजोगता प्रकाश नक्कीच होता. माधवीला आपल्या सर्वांगात कापरं भरत असल्याची जाणिव झाली. घाम फुटला. तिला दिसणारं ते दृश्य तिच्या मस्तकात वेगळेस संकेत देऊ लागले. आपण पाहतोय ते खरं नाही.... हे स्वप्न आहे.... आपण आता स्नेहाच्या शेजारी झोपलेलो आहोत..... अतिताणाने आपणाला असे विचित्र स्वप्न पडलेले आहे.... माधवी...माधवी... जागी हो.... जागी हो...ती स्वतःलाच सांगू लागली. तोच स्नेहा काहीतरी बडबडली आणि तिने पाहीलं. स्नेहाने कुशी बदलली. स्वप्न नाही हे..... माधवीची नजर पुन्हा बाहेर वळली..... ती बाई आता तिच्या खिडकीकडेच पहात होती. झोपाळा थांबायला लागला. आवाज सौम्य होऊ लागला. तिने जवळ येऊन मुलाला उचललं. मुलाची मान वर वळली. माधवीच्या हातातला पडदा सुटला. श्वास कोडला होता. बोलावसं वाटत होतं पण बोलणार कुणाशी ..... ती तर एकटीच होती.... एकटी. पडद्यापलिकडे पुन्हा पाहण्याचे धाडस नव्हते आता तिच्यात. शरीरातील त्राण नाहीसं झालेलं. कोणत्याही क्षणी आपण कोसळू याची खात्री होती तिला. खिडकीचा आधार घेत, लटपटत्या पावलांनी ती बेडकडे सरली. ते दोन पावलांच अंतर ... पण सगळा जोर एकवटावा लागला तिला त्यासाठी. ती शरीर सैल सोडून बेडवर बसली. डोक्यात बरच काही घोंगावत होतं. पण सुसंगत असं काहीच सुचत नव्हतं. वातावरणात कमालीचा गारवा पसरत असल्याची जाणिव होऊ लागली तिला. इथून पळून जायला हवं.... स्नेहाला घेऊन आताच्या आत्ता इथून पळून जायला हवं. ...... कुठेही....जिथे माणसं असतील.... खुप खुप माणसं......गौरव असेल.... आईबाबा असतील.... दादा वहिनी असेल...... गौरवचं ऐकायला हवं होतं दादावहिनींकडे जायला हवं होत... पण आता तो विचार करून काय उपयोग ?... आत्ता काय... बाहेरचे आवाज ओसरले होते...... तिने स्वतःला संयत केलं. उठावं, खिडकीपाशी जावं आणि पहावं.... पण हिम्मत होत नव्हती. ती शांत बसून धैर्य एकवटू लागली. ती उठली. खिडकीपाशी पोहोचली. थरथरत्या हाताने तिने पडदा सारून पाहीलं. तिथे अंधाराशिवाय काहीच नव्हतं. आपण मघाशी पाहीलं होतं हे नक्की... मग आता कुठे आहेत ते...... कुठे... ??? .... विंगमध्ये तर शिरले नसतील.... पायर्‍या चढत असतील..... दारापर्यंत येतील..... बेल वाजवतील..... दार ठोठावतील....की सरळ आतच येतील.... ती वळली. तिने झपाट्याने बेडरूमचं दार लॉक केलं. तोच बाहेर दरवाजा वाजला. ती दचकली. दाराला चिकटून उभी राहीली. कानोसा घेतला. दार पुन्हा वाजलं. पण हा मेन डोरचा आवाज नव्हता. नक्कीच नव्हता... मग ? बाथरूम..... ते दार तर स्वतःच बंद केलं होतं..... टॉयलेटचं..... तेही....कदाचित नसावं... त्याचाच आवाज असेल... पण असा अचानक... दिवसा कधी येत नाही.... दार पुन्हा वाजलं.... वार्‍याने..... दुसर्‍या बेडरूमची खिडकी उघडीच आहे.... धस्स झालं काळजात ते आठवताच.... माधवीने दाराला कान लावला...... पावलांचा आवाज येतोय की नुसतीच वार्‍याची सळसळ..... जे आहे ते नक्कीच अमानवी आहे याची खात्री होती तिच्या मनाला. स्मशानाच्या जवळ अजून दुसरं काय अपेक्षित असू शकतं ? माधवीने स्नेहाला कुशीत घेतलं आणि अंग चोरून ती बेडच्या एका कोपर्‍यात बसली. विचारांची भयानक तीव्रता वाढत होती. प्रत्येक जाणारा क्षण सुटकेचा व येणारा क्षण नव्या अनोळखी संकटाचा होता. एकेक सेकंद आता तासाभरासारखा होता. चोहीकडून भयानक कल्पनांनी तिच्या दिशेने झेप घेतली आणि ते तिचा मेंदू पोखरू लागले. या विचारांनी वेड लागेल...... कोणत्याही क्षणी आपल्या मेंदूची शंभर शकले होतील.... नाही.... आता हे सहन होत नाही..... तिने डोळे गच्च मिटून घेतले. एकदम गच्च.... आता काहीही झालं तरी ती डोळे उघडणार नव्हती.... काहीही झालं तरी....

अलार्मचा आवाज पुन्हा पुन्हा घुटमळू लागला आणि तिने डोळे उघडले. ती अजूनही बेडच्या त्या कोपर्‍यात होती. अर्धी रात्र त्याच अवघडलेल्या स्वरूपात. स्नेहाचा ताप पुर्णपणे उतरलेला होता. स्नेहाला बाजूला झोपवून ती खिडकीकडे वळली. पडदा सारून तिने पाहीलं तसं सुर्याचं कोवळं उन तिच्या परवानगीशिवाय घरात शिरलं. समोर झुला शांत होता.

तिने दादा वहिनीकडे जायचं नक्की केलं. पण गौरवला ती रात्रीच्या प्रकाराबद्दल काहीच सांगणार नव्हती. तिने स्नेहाची तयारी केली तशी स्नेहा बाहेर पडली. टाकी, नळ, विजेचे दिवे... सगळं काही दोनदोनदा नीट तपासून तिने टाळं लावलं. स्नेहाला आवाज दिला आणि जिन्याकडे वळली. खाली पोहोचल्यावर तिने स्नेहाला पुन्हा आवाज दिला. समोरून स्नेहाचा आवाज आला आणि तिने त्या दिशेला पाहीलं. स्नेहा झुल्यावर होती. माधवी धावली. तिरमिरीतच तिने झुला थांबवून स्नेहाला उतरवलं आणि ती गेटच्या दिशेला वळली. आपण स्नेहाला जवळ-जवळ फरफटतच नेतोय हे तिच्या लक्षात आलं तेही स्नेहा ओरडल्यावर. ती थांबली. तिने भेदरलेल्या, रडणार्‍या स्नेहाला पाहीलं आणि मायेने उचलून घेतलं. तिचं लक्ष झुल्याकडे गेलं. तो अजूनही त्याच्याच लयीत हेलकावे खात होता.

तिसर्‍या दिवशी गौरव आला तो थेट दादांच्या घरी. ते घरी परतले तोवर संध्याकाळ सरली होती. माधवीने अजून विषयाला हात घातला नव्हता. तिचे काही बिनसलं आहे हे गौरवच्या लक्षात आलं होतं एव्हाना. पण प्रवासात त्याने विषय काढला नाही. घरी पोहोचल्यावर त्याने स्नेहाला कार्टून नेटवर्क लावून दिलं आणि तो तिच्याकडे वळला.
"काय झाल ? " या दोन शब्दांनी जणू त्याने कळच दाबली. आतापर्यंत सगळं रोखून असलेला बांध कोसळला. त्याला घट्ट मिठी मारून तिने रडायलाच सुरुवात केली.
"मधू, अग असं वेड्यासारखं काय करतेस ? पहिल्यांदाच का गेलो होती मी बाहेर ?" तो असचं बरचं काही बोलत होता. ती मात्र फक्त रडत होती. शेवटी त्याने ही गुपचुप तिला थोपटायला सुरुवात केली.
"स्नेहाला ताप आला होता त्या दिवशी. औषध आणायला गेले मी....."अचानक माधवीने डोळे पुसून बोलायला सुरुवात केली. गौरव ऐकत होता. ती कोणत्या भयानक परिस्थितीतून गेली असेल याचा त्याला अंदाज आला. रिक्षावाल्याने सांगितलं ते खरं होतं तर. मुलगा आणि आई.... उद्या तो त्यांचा बेवडा बाप... तोही दिसेल..... ती बोलून होईपर्यंत तो शांत होता. तो काहीच बोलला नाही. माहीत असूनही आपण तिथेच राहीलो हे जर तिला कळलं तर मग काय....? न बोलण्यातच शहाणपणा होता. ती बोलायची थांबली. बरसून गेलेल्या आभाळासारखी निरभ्र आणि तो मात्र चिंब त्या कोसळलेल्या प्रपातात.
"गौरव, मला वाटत नाही मी आता इथे एकटी राहू शकेन." माधवी त्याच्या समोर बसत बोलली.
"ठिक आहे. मी उद्या गांधीना भेटतो. इथेच कुठे दुसरी सोय होते का ते पाहू. नाहीतर मग मी तुला दादा वहिनींकडे सोडतो." त्याने तिला पटेल असा निर्णय घेतला.
"आणि तू ? "
"मी गायतोंडेकडे थांबेन."
"मग ठिक आहे. मला वाटलं तू इकडे.... " तिला वाक्य पुर्ण करायची इच्छाच होईना. काही वेळाने ती किचनमध्ये होती आणि तो स्नेहाबरोबर कार्टून नेटवर्क पहात बसला. जेवण तयार असल्याच निरोप घेऊन ती हॉलमध्ये पोहोचली आणि लाईट गेले. क्षणभराने डोळे घरातल्या अंधाराला सरावले.
"मी मेणबत्ती शोधते." ती वळली.
"तू बस इथे स्नेहाजवळ. मी बघतो" तो उठला आणि बेडरूमकडे वळला. ती स्नेहाजवळ बसली. तोच बाहेर दाराजवळ काही वाजलं. आवाज अस्पष्ट असला तरी आवाज होता हे नक्की. स्नेहाला थपथपवून ती दाराकडे वळली. तिने आतलं दार उघडलं आणि सेफ्टी डोरच्या फुटभर गजाच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली. अंधार दाटून भरलेला. तिने त्यात पहाण्याचा प्रयत्न केला. एक आकृती होती. साधारण साडेतीन चार फुटांची. पण काय त्याचा अंदाज येईना. भयाची एक लहर नसनसात धावली आणि नेमके तेव्हाच दोन हिरवट डोळे झपकन तिच्याकडे वळले. एक अस्पष्ट किंचाळी तिच्या तोंडून बाहेर पडली आणि तिने पटकन दरवाजा लोटला. दाराचा आवाज त्या शांततेत घुमला आणि तोपर्यंत गौरव तिथे पोहोचला. घाबरून स्नेहा रडायला लागली होती. माधवी अजूनही दाराजवळच थरथरत होती. गौरवने तिचे खांदे धरून तिला जवळ घेतलं. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तिने दाराकडे खुण केली. त्याने लॅचकीला हात घातला आणि तिने त्याला अडवलं. तिचा तो गारेगार स्पर्श जाणवताच तो थांबला. त्याने तिला सोफ्यावर बसवलं. स्नेहाला जवळ घेतलं. त्या अंधारात आता ते तिघे मुक होते. स्फुंदून स्फुंदून दमलेली स्नेहा, थरथरत असलेली माधवी आणि तिला काय दिसलं असेल या प्रश्नाच्या मध्यावर अडकलेला तो.

ठरल्याप्रमाणे सकाळी ते बाहेर पडले. गांधीना त्याने फोनवरून निरोप दिला. बाईक त्याने आपल्या एका मित्राच्या घरी पार्क करून ठेवली. आता महिन्याभरासाठी ते बेघर होते.

ती इमारत तशीच शांत उभी होती. घडलेल्या प्रकाराशी काहीच सोयरसुतक नसल्यासारखी. उभ्या उभ्या तिला पलिकडच्या स्मशानात धडधडणारी चिता स्पष्ट दिसत होती. अंधार गडद होत होता. दुरवर रात्री बारा वाजता जाणारी ट्रेन धडधडली.

तिसर्‍या माळ्यावरील त्या मास्टर बेडरूमच्या खिडकीसमोरील इमारतीच्या मागच्या बाजूच्या तळमजल्याच्या फ्लॅटचा दरवाजा आता उघडा होता.
आतल्या काळ्या माणसाने विडी शिलगावली आणि तो डोक्यावरून अंगभर पांढर्‍या साडीचा पदर लपेटलेल्या हडकुळ्या बाईकडे वळला.
" रामशरण आया था, बोला अबी कोई लफडा नही. वो लोग चला गया."
" उस रातको मेमसाबने देखा तो मै डर गई थी."
"डर तो मैभी गया था जब अन्होने मुझे देखा था. मै तो शमशानके दरवाजेके पीछे छुपा था. बडी मुश्कीलसे तो जगा मिला है रहनेका. रामशरण नही होता तो इस परदेसमें क्या करते ? राम जाने." त्याने बिडीचे दोन झुरके घेतले.
"मुन्ना जागा क्या ? "
" अभी नै. कल दवाखाने जाना है. क्या लगता, छुटकारा मिलेगा इस बिमारीसे ? "
"क्या पता ? दिन भर सोना, रातो को जागना, खेलना....डागदरसाहबबी परेशान है इस अजब बिमारीसे. कहते है उमरके साथ ठिक होगा. उस दिन तो पकडे ही गये ते. साबने देखा बोले मुन्ना को झुले पे खेलते हुवे. रामशरण बचा लिया तभी. बहुत सुनना पडा. वो बी क्या करे ? नोकर आदमी है. देखो ये झुले पे ना जाय वही अच्छा "
"क्या करे ? बच्चा है. कितना रोके. "
"ये बात भी सही. कितना रोके ?" त्याने संपत आलेल्या विडीचे झुरके घेतले.

त्याचवेळेस त्याच तिसर्‍या मजल्यावर नेहमीप्रमाणे तो काळा कुत्रा आला. त्याने बंद दारांचा अंदाज घेतला आणि मग जिन्याच्या कठड्यावर दोन्ही पाय ठेवून खाली वाकून पहाण्याचा पुर्ण प्रयास केला. पण यावेळेस तो मागच्यावेळेसारखा भेलकांडला नाही. क्षणभरासाठी त्याने नजर त्या तिसर्‍या मजल्यावरच्या बंद खोलीच्या दाराकडे फिरवली देखील. अंधारात त्याचे डोळे चकाकले. मागच्या वेळेस अचानक दरवाजा उघडला गेलेला आणि आपटलादेखील. पण यावेळेस मात्र तिथे कुणीच नव्हतं त्याच्या कसरती पहायला.

बाहेर गार्डनमध्ये ते काळ सावळं पोर झुल्यावर मजेत झोके घेत होतं. गायतोंडेच्या बालकनीत झोपलेल्या गौरवच्या घड्याळ्यात तेव्हा मध्यरात्रीचे साडेबारा वाजले होते.

समाप्त.

गुलमोहर: 

भुतांना घाबरणे हाच दोष. जर गुरख्याला काही पैसे मिळत नसेल तर असे धंदे तो करणारच.

vaibhavayare123... | 12 October, 2009 - 02:39
ज ब र द स्त!!
शेवट तर अफलातुन (अनपेक्षीत)
फक्त गौरवच्या कुटुंबाचे वाईट वाटले
त्यांचा काय दोष?

सॉल्लीड कथा आहे.

शेवटपर्यंत कथानक असं रंगतं कि अक्षरशः खिळवून ठेवतं. शेवट असा असेल असा अंदाज सुद्धा येत नाही. कदाचित लेखकाच्या प्रतिभेने ही कथा लिहून घेतली असावी पण त्याच्या विवेकाने त्याच्यावर मात केल्याने शेवट वास्तवात आणून सोडणारा झाला असावा..

भुताचा माळ या कथेची आठवण झाली.

Pages