लंकेची पार्वती

Submitted by डॅफोडिल्स on 6 October, 2009 - 14:12

सोने की लंका जलाय गयो रे, एक छोटोसो वानर....
रावण को पानी पिलाय गयो रे, एक छोटो सो वानर...
ढुडुम ढुम टू ढुम ढुम...

मंदिरात ढोलकी.. टाळ.. टाळ्यांच्या गजरात गाणं खूपच रंगलं होतं. ते कानात इतकं बसलं होतं.. आणि त्या सोबतच सोनेकी लंका सोनेकी लंका हे शब्दही एकसारखे मनात येत होते आणि प्रश्णही तेवढेच पडत होते.

रामायणातले लंकादहन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हनुमानाने सोन्याची लंका जाळली.
लंका सोन्याची खरंच होती का ? होती तर सोन्याची का होती आणि कुणी बनवली होती ?
सीतेला लंकेची पार्वती का म्हणतात ?
लंकेत सोन्याच्या विटा हा वाकप्रचार का रुढ झाला असेल ?

जाउदे ना ही सारी पुराणातली वांगी - वानगी. पण पुराणात ह्या सार्‍याचा उल्लेख आहे म्हणजेच त्यामागे काही ना काही गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक संदर्भासाठी काही कथा दंत कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच ही सोन्याच्या लंकेची आणी पार्वतीची कहाणी.

कैलासावर रहाणार्‍या अजर अमर शिवपार्वतीची एक कहाणी आहे. बसल्या बसल्या एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायचे. शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेउन देवी पार्वती लक्ष्मी कडे गेली. खरं तर प्रभू इच्छेविरूद्ध काहिही घडणे कठीणच. पण मन वेडं असतं तेच संकल्प विकल्प घडवून आणतं जेव्हा जिथे हवं तिथे आपल्याला घेउन जातं, त्याच प्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं.ती अतीशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली. मनात विचार करीत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल. स्वतःच्या आसनावरून उठून धावत येउन मला मिठी मारेल, जबरदस्ती ने माझा हात धरून मला आसनस्थ करेल, धूप दीप नैवेद्याने मग मला सन्मानीत करेल वगैरे.

पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्ष झालंच नाही. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन वैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली,"ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे ? चिता-भस्म, त्रिशूल-फावडी आणि फाटकं मृगजीन घेउन त्यानं कुठे बस्तान बसवलं आहे ?" पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला, ओठ थरथरले, जीभ फडफडली.. ति म्हणाली, "तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही ? खरं तर तुझ्या पतीला द्युता खेरीज कधी काही कामकाज नाहिये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल. किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भिक मागत फिरत असतो. दधिची रुषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागीतली होती. विसरलिस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत." पार्वती अश्या प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली.

पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, "हे देवी आज चेहरा एवढा उदास का ?" त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मिने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिव शंकराला सांगितले. आणि म्हणाली, "आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही, उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रीत करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेइन की सारी दुनिया बघत राहिल." ह्यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, "मान अपमान, हे सारं आपण मानण्यावर असतं. जाउदे ते कडवट बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर. त्यातच खूप सुख आहे." पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्ह्ती. हट्टाने ती रडू लागली.

मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दु:खी कष्टी आहे. तुम्ही तिचे दु:ख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुष झाली. व विश्वकर्म्याला समजावू लागली. मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे. ज्याला चार दरवाजे असतिल असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड-गरम पाण्याचे ताल तलाव असतिल, सुंदर बाग-बगिचे, स्वच्छ रस्ते असतिल. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मधे मधे हिरे-मोती जडवा. चमचमणार्‍या फरश्यांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत आंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आज पर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल. बघितला नसेल. लक्ष्मी ने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे.

विश्वकर्म्याने सगळे समजावून घेउन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेउन ते आले. एक सर्वोत्कृष्ठ वास्तूकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता, चित्रकला, मूर्तीकला, ह्या सारख्या नानाविध कला वापरून भवन, वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपूण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्या ने ह्या वेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल- दिव्य भवन उभारून दाखवले.

शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्णमहाल पाहून पार्वती अती हर्षीत झाली. म्हणाली माझं स्वप्नं साकार झालं. माझ्या कल्पनेपलिकडे सुंदर असा हा स्वर्णमहाल बनला आहे.पार्वती शंकराला म्हणाली, "हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा. ह्या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देव देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे." तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुष होतो तेवढे त्याचे अश्रू वहातात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या हो ला हो म्हणत गेले. तेहतिस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडीत पुजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी विष्णू, ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले. समुद्राच्या मधे असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरीत झाले.

तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली. आणि म्हणाली, "बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस, हा त्याच भिकार्‍याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आलिये. झरोके खिडक्या दरवाजे इतकंच काय जमिनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपर्‍याइतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहिये." शंकर म्हणाले, "पार्वती असा वृथा अभिमान करू नये". इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम आहूती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पुर्णाहूती पडल्यावर सर्व देव देवतांनी फुलांचा वर्षाव केला, नभांगण शिवपार्वतीच्या जयजयकाराने दुमदुमू लागले. देव-देवता, योगी-ब्राह्मण, साधू-भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षीणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले.

शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत." त्यावर विश्रवा म्हणाले, "भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल ? आत्ता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल ?" भगवान म्हणाले, "मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पुर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईन." ह्यावर शीष झुकवून विश्रवा म्हणाले, "हे भगवन ! तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्णसिन्धू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे. हाच माझ्या मनात भरला आहे." हे ऐकताक्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला,"एक दिवस असा येईल तुझे नामोनिषाण मिटून जाईल कालौघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होउन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल." आपल्याजवळ होतं नव्हतं ते सारं वैभव, दाग दागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली.

ह्या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू असेल.

हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. तीपण पार्वती सारखीच निश्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाउन लंकेचे दहन केले. आणि पुढे झालेल्या युध्दात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला.

वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. कर्ता करविता तोच भोळा सांब.

डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी, जय भोले जय भंडारी !
शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपूरारी, जय भोले जय भंडारी !

*वरील लिखाण एका हिन्दी काव्यावर आधारीत आहे.

गुलमोहर: 

डॅफोडिल,
लंकेची पार्वती हा वाक्प्रचार लंजिकेश्वर येथील नग्न आणि निरालंकार पार्वती (शक्तीदेवी) च्या मूर्तीवरुन पडला असावा असे श्री. रा. चिं. ढेरे यांचे मत आहे. (संदर्भ : लज्जागौरी ). सीता ही लक्ष्मीचा अवतार असावयास हवा, पार्वतीचा नव्हे.

इथे पहा :
http://www.rcdhere.com/Lajjagauri/Lajjagauri_2.html

दंतकथेबद्दल धन्यवाद ..

मस्त.. Happy ही दंतकथा माहीत नव्हती. इतक्या सुरेख कथेबद्दल धन्यवाद.
*वरील लिखाण एका हिन्दी काव्यावर आधारीत आहे. >>>>>>>>>
हे हिन्दी काव्यसुद्धा आपण लिहू शकाल का?

डॅफो, मस्त लिहिलयस Happy

राजू, ह्या लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, सीता, राधा, रुक्मिणी वगैरे त्या आल्हादिनी / आनंदिनीचीच (परमात्म्याची शक्ती) रुपे आहेत. त्यामुळे लक्ष्मी पार्वती यांच्यात तत्वतः फरक नाही. ही वेगळी रुपे म्हणजे वेगळ्या कार्यशक्ती आहेत.

डॅफो, ब्रह्मदेवाच्या तपोबलाने अत्यंत तेजस्वी झालेल्या दृष्टीतून त्याचे १० कुमार निर्माण झाले (अगस्त्य, मरिची इ. ). त्यातील एक पुलस्ती. ह्या पुलस्तींचा त्यांच्यासारखाच नीतीमान, तपस्वी पुत्र विश्रवा ऋषी. ह्याची पत्नी कैकसी ही दुर्गम राक्षसाची कन्या. त्यामुळे विश्रवांचे काही पुत्र कैकसीच्या (म्हणजेच तुलना) अंधाराच्या उपासकांच्या मार्गावर गेले तर काही परमात्म्याची भक्ती करुन प्रकाशाचे उपासक झाले. जे अंधाराच्या मार्गावर चालले त्यांचा नाश झाला व जे प्रकाशाच्या मार्गावर गेले त्यांचा उद्धार झाला. म्हणूनच बिभिषण चिरंजीव तर झालाच आणि लंकाधीश पण झाला.

रावण कुळाचा नाश झाला पण बिभिषणाचे कुळ तर तरले ना? याबद्दल कुणी माहिती देऊ शकेल का?

बादवे, मला एक कळत नाही हे ऋषी मुनी कधीकधी वाईट्ट स्त्रियांशी / राक्षस कुळातील बायकांशी कसे काय विवाह करायचे? Uhoh

मरिचीपुत्र कश्यपांनी पण अदितीमती (३३ देवांची माता) सारख्या पतिव्रता, तपस्विनीशी लग्न केले तसेच शुक्राचार्यांच्या कन्या दिती (दैत्यांची माता), दनु (दानवांची माता) यांच्याशी पण विवाह केला.

अरे वा! ही कथा ठाऊकच नव्हती. कित्येक संकेत पुराणकाळातील गोष्टींशी जुळवून घेतो आपण.. ही गोष्ट मुलांना सांगण्यासारखी आहे Happy

अश्विनी, संपत्ती आणि ऐश्वर्याच्या दृष्टीने लक्ष्मी व पार्वती मध्ये फरक करणे आवश्यक आहे. अन्यथा "लंकेची सीता" किंवा "लंकेची लक्ष्मी" म्हणायला हरकत नव्हती, पार्वतीच का? लक्ष्मी / पार्वती ही शक्तीची रुपे आहेत, तरीही एकमेकांपासून वेगळी आहेत. मी फक्त "लंकेची पार्वती" हया वाक्प्रचारावर बोलत होतो..

संपत्ती आणि ऐश्वर्याच्या दृष्टीने लक्ष्मी व पार्वती मध्ये फरक करणे आवश्यक आहे.>>>> तोच तो कार्यशक्तीतला फरक Happy

सर्वांना धन्यवाद !

अश्विनी छान माहिती दिलीस. Happy
मलाही विश्रवा कोण हे माहित नव्ह्ते.

हे हिन्दी काव्यसुद्धा आपण लिहू शकाल का?>>>
मेधा२००२.. मी एक शिवविवाहावर आधारीत मोठ्ठ्या पुस्तकात ह्या कथेबद्दल वाचले होते. बाकीचे संदर्भ इतरत्र शोधाशोध करताना सापड्ले.

राजु_ >> तुम्ही दिलेल्या लज्जागौरीच्या लिंकवर पण बरीच माहीती आहे. Happy

अरे वा! मला गोष्ट माहीत होती. उगाच लक्ष्मीने पार्वतीला शाप दिला होता असे आठवत होते तर हे वेगळेच आहे.

छान लिहिलय. लक्ष्मी आणि पार्वती ही स्त्रीशक्तीची दोन विविध रूपे आहेत. अगदी आजच्या भाषेत सांगायचे झाले तर सकाळी नऊ ते पाच नोकरी करून पैसा कमावणारी, कार्पोरेट वूमन आणि घरी जाऊन काम करणारी (नवर्‍याचे पाय दाबणारी???) मुंबई पुण्यातली ती लक्ष्मी आणि गरीब शेतकर्‍याच्या घरात राब राब राबणारी, तुटपुंज्या पगारात पण चाळीच्या दीड खोलीत घर चालवणारी ती पार्वती. (असे माझे मत. उगाच पुराणमतवाद्याचा फतवा नको यायला.)

पण काही संदर्भात ही कथा जुळत नाही......... लंकेची निर्मिती देवानी केली... तिथे कुबेर हा अधिकारी होता... कुबेर रावणाचा सावत्र भाऊ.... पुलस्ती ऋषी हे यजुर्वेदी होते.......... पण रावणाला ब्राह्मणी जीवन मिळ्मिळीत वाटत असल्याने त्याने 'क्षत्रिय' व्हायचे ठरवले.. आणि नंतर शस्त्र विद्या शिकून त्याने कुबेराकडून लंका मिळवली, ( तेंव्हा वर्ण बदलता येत होते !!! Happy )

सुंदर लेख. लंकेचा आणि पार्वतीचा संबंध आत्ता लक्षात आला. ह्या दंतकथा ग्रेटच...
डॅफोडिल्स, खूप लिही गं. खरच छान लिहितेयस.. (का तू लिहितेयस नेमाने पण मी मिसलय Sad ?)

पुन्हा एकदा धन्यवाद ! Happy

जामोप्या तुम्ही लिहिलेले डिटेल्ड वाचायला आवडेल. नविन माहिती. Happy

डॅफो, नवीन माहीतीबद्दल धन्यवाद. पण वर म्हटल्याप्रमाणे सीता ही लक्ष्मीचे रुप तेंव्हा तिला लंकेची पार्वती का म्हणतात ह्याचा उलगडा नाही झाला.

अश्वीनी, आदीती व दीती ह्या सख्ख्या बहीणी होत्या ना? शुक्राचार्यांची कन्या देवयानी होती.

त्या निर्गुण निराकार ब्रह्माने (ब्रह्मदेव नव्हे) हे सगुण विश्व साकारताना त्याची निर्मीती, पालन व लय करण्याकरता अनुक्रमे ब्रह्मदेव, विष्णू व शंकर यांची निर्मीती केली व त्याना त्यांच्या कार्यात आवश्यक असणार्‍या शक्ती प्रदान केल्या, त्याच त्यांच्या पत्नी. त्या खर्‍या अर्थाने अर्धांगीनी होत्या कारण त्याच्याशिवाय या तिनही आद्यदेवांचे कार्य अशक्य होते. पण त्या देवांशिवाय या शक्तीचे अस्तित्व नव्हते कारण कर्ते ते देव होते. म्हणूनच शक्ती व पुरुष ही आद्य सगुण रुपे मानली जातात दोघांनाही सारखेच महत्व!

ब्रह्मदेव हा निर्माता. निर्माणाला लागणारी बुध्दी, प्रतिभा म्हणजे सरस्वती - ब्रह्मदेवाची पत्नी (काही ठीकाणी हिला ब्रह्मदेवाची पुत्री पण मानले आहे.)

विष्णू हा पालनकर्ता. पालनाकरता लागणारे सुख, समृध्दी (all resources) म्हणजे लक्ष्मी - विष्णूपत्नी!

शिव हा लयकर्ता. त्या लयाला लागणारी प्रचंड ताकद म्हणजे शक्ती / पार्वती / काली - शिवप्रिया!