बुजगावणं

Submitted by कौतुक शिरोडकर on 6 October, 2009 - 06:31

जुईली श्रीहरी ढवळीकर.

खरतरं मला नुसतं 'जुई' म्हटलेलच आवडते. तो 'ली' नकोच होता सोबत. पण आहे तो आहे. करणार काय ?
आई म्हणते, 'कित्या उगाच तोंड वाकडा करतस. इतरांची नावं बघ काय असतत. त्यामानान तुजा बरा हा...... आणि ताही काय जास्त दिवस रवाचा नाय. उद्या लगीन झाल्यार घो बदलतोलो.'
मी तर ठरवलय. लग्नानंतर नवर्‍याला सांगून तो 'ली' काढायचा आणि....... सॉरी....

खरचं सॉरी... हे माझं नेहमीच असं होतं. वाहावत जाते बोलताना.... विषय माझा नव्हताच मुळी. तशी मी आहे म्हणा या विषयात. पण खरा विषय आहे काकांचा. पद्माकर ढवळीकरांचा. माझे सख्खे काका. त्यांच्याबद्दलच सांगायचय. पण त्या आधी एक महत्त्वाचं. मला ती मराठी अलंकारीक भाषा काही जमत नाही. मराठी साहित्यात काही गतीच नव्हती असं म्ह्टलं तर चालेल. शिक्षणात जेवढं मराठी कंपलसरी होतं तेवढं वाचलं, धोकलं. पण तेवढचं. शिवाय मी माणूसघाणी. म्हणजे घरी इतकी माणसं होती की बाहेर कुणाशी जास्त मैत्री करायची गरज भासलीच नाही. सगळी मिळून आम्ही पाच भावंड. घरातच धिंगाणा होता सगळा. पुढे वयाबरोबर पांगत गेले सगळे. पण कोणी ना कोणी असायचचं सोबत. त्यामुळे नवे मित्रमैत्रिणी जोडण्याचा त्रास असा घेतलाच नाही. वाचनाशी घरात कुणाचा संबंध नव्हताच. त्याला मीही अपवाद नव्हते. गणित मात्र जमायचं. म्हणूनच मी वळले आकडेमोडीकडे आणि बनले अकाऊंटंट .................. सॉरी ......... पुन्हा वाहावत गेले...... थोडक्यात मला साहित्यिक दर्जा असलेलं सांगायला जमणार नाही. तेव्हा आता मला जमेल तसं सांगते.

माझे वडील धरून एकुण चार भावंडे. मोठे विठठलकाका, दुसरे पद्माकरकाका, तिसरे दिगंबरकाका आणि चौथे आमचे अण्णा, श्रीहरी विश्वनाथ ढवळीकर. वडिलोपार्जित फार अशी इस्टेट नसली तरी चौघांना पुरेल इतकं होतं. पण वाटणी करायची वेळ आलीच नाही. सगळं काही विठ्ठलकाकांच्या हातीच राहीलं. पद्माकरकाका मुंबईला गेले. नशीबाने चांगले रेल्वेत कामाला राहीले. दिगंबर काका इकडे-तिकडे करत सुरतला पोहोचले. त्यांचा कल नेहमी धंद्याकडेच. राहीले ते अण्णा. त्यांना शेतीत रस नव्हताच. धंद्याच्या बाबतीत तर ते पक्के महाराष्ट्रीयन. त्यांनी इथेच पोस्टात नोकरी धरली. स्टँपसारखे चिकटले ते चिकटलेच. इमाने इतबारे. अर्जुनानंतर तीन वर्षाने मी आले. तेव्हा तर मोठी गंमतच झाली. म्हणजे कसं की आमच्या संपुर्ण घराण्यात मी एकच मुलगी. विठठलकाकांना तिन्ही मुलगे. पद्माकाकांना एक आणि दिगंबरकाकांकडे दोघे. मग काय..... माझं बारसं........... सॉरी..

सॉरी... पुन्हा घसरले.

पद्माकरकाका मुंबईकर झालेले असले तरी येऊन-जाऊन होते. इतर चाकरमान्यांसारखेच. म्हणजे गौरी गणपतीला... सणावाराला हमखास यायचे. सोबत हर्षद असायचा. काकूही यायच्या. पण फार कमी. दर वर्षी यायच्याच असं नाही. गेली काही वर्षे तर नाहीच. त्यांना बर नसायचं. रितीरिवाज चुकवून कसं चालेल म्हणून काका न चुकता यायचे. शिवाय गावची ओढ. भावाभावात फार जिव्हाळा. कोकणात आढळतो कुठे कुठे. पण काकांच्या ये-जामुळे माझी-त्यांची ओळख होतीच. मी एकमेव कन्यारत्न असल्याने त्यांच्याही लाडाची. धनाची पेटी म्हणायचे मला.
अण्णा म्हणायचे काकांना, 'दादा, मनावर घेतलस तर तुझ्याकडेही येईल अशी धनाची पेटी.'
काका हसायचे..... मोठ्याने आणि म्हणायचे,' ही एकच पुरे. आणखी नकोत.' काकांची आणि माझी चांगली गट्टी जमलेली. अर्जून दादा आम्हा भावंडात तसा टग्याच होता. त्याच कुणाशी कधी नीट जमलच नाही.

दिगंबर काकांनी त्यांचा व्याप प्रचंड वाढवला होता. इतका की त्यांचा त्यांनाच झेपत नव्हता. त्यामुळे येणं-जाणं कमी. फार कमी. ते तर एकदम गुजरातीच झालेले. काकू तिथलीच होती. तिला काय कळायचचं नाही आमचं बोलणं. काका तिच्याशी गुजरातीच बोलायचे.

एके वर्षी पद्माकाका गणपतीला आलेच नाहीत. घरातल्या रडारडीत काकू गेल्याच कळलं. ती रात्र खुप वाईट गेली. असं कधी पुर्वी झालं नव्हतं घरी. घरात प्रचंड शांतता. अण्णा मुंबईला गेलेले आईसोबत. आम्ही विठठलकाकांकडे होतो. विठठलकाकांचा पाय तेव्हा प्लास्टरमध्ये होता. बैल उधळल्याचं निमित्त झालेलं. मी चांगली सोळा वर्षांची होते तेव्हा पण आम्हाला नेलं नाही सोबत. काकुंशी तसा संबंध कमीच आलेला माझा. त्यामुळे मला एवढं काही वाईट नव्हतं वाटलं या गोष्टीचं. आई मात्र आठवडाभर आल्यागेल्यांकडे आठवण काढून रडत होती.

त्यानंतर वर्षभरातच विठठल काका गेले. साधं फुरसं चावल्याचं निमित्त. पण त्यांना तेवढं पुरलं. ते गेले. पद्माकाका आले होते. मी फार रडलेले तेव्हा.....लाडकी होते ना मी विठठलकाकांची. काकापण रडले होते बहुतेक. डोळे सुजलेले होते त्यांचे. अण्णांनी मात्र मनाला फार लावून घेतलं विठठलकाकांच जाणं. विठठल काकांचा त्यांना मोठा आधार. जवळ तेच होते ना. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी अण्णा त्यांच्याकडेच धाव घेत. विठठल काकांच्या जाण्याने ते जरा अबोलच झाले. तसे ते जास्त बोलत नसतं. चौघा भावंडात गप्पिष्ट होते ते पद्माकरकाकाच. त्यांना खुप बोलायची हौस. ते जेव्हा यायचे तेव्हा रात्री उशीरापर्यंत गप्पांचा फड जमलेला असायचा. असो. अण्णांबद्दल सांगत होते. विठठलकाका गेल्यावर अण्णा जास्तच अबोल झाले. मग एके दिवशी तापाचं निमित्त झालं आणि अण्णा गेले. काका आले होते त्याच रात्री. खाजगी गाडी करून. हर्षद होता बरोबर. रात्रभर मला कुशीत घेऊन रडले ते तेव्हा. मी पहिल्यांदाच काकाना रडताना पाहीलं. लहान मुलांसारखे रडत होते. सारखे विठठलकाकांचे आणि अण्णांचे नाव घेत होते. त्या रात्री त्यांचा नेहमीचा फड जमला नाही. मी त्यांच्या कुशीत कधी झोपले ते मला कळलच नाही. पद्माकरकाका त्यांनंतर महिन्याभरात हर्षद बरोबर परतले ते कायमचेच.

ढवळीकरांकडे करणारं वडीलधारं दुसरं कोणी नव्हतचं. दिगंबरकाका येण्याचा प्रश्नच नव्हता. गुजरात्यांच्या सहवासात राहून ते पक्के गुजरातीच झाले होते. कोकणाशी त्यांचा जणू काही संपर्कच उरला नव्हता.

रमाकाकू... विठठलकाकांची बायको..... तिला तिचं माहेरचचं जास्त होतं. आमच्या कुणाबरोबर तशी कधी रमलीच नाही ती. आईबरोबर पण तिचं जेवढ्यास तेवढं. विठठलकाकांचा थोरला मोहन हा जरा मतिमंदच होता. वयाने, उंचीने वाढला. पण बुद्धी यथातथाच. दुसरा समीर. तो शिक्षणासाठी म्हणून पुण्याला गेला तो पुण्यातच रमला. कधीकाळी यायचा. पण एखाद दोन दिवसासाठी यायचा. आई म्हणते, त्याने तिथेच कुणा मुलीशी लग्न करून संसार थाटलाय. दुसर्‍या जातीतील पोर ढवळीकरांकडे चालायची नाही, हे माहीत आहे म्हणून तर लग्नाच नाव काढत नाही. तिसरा विश्वास. त्याला पद्माकरकाकानीच रेल्वेत चिकटवलेले. तो येऊन पुन्हा स्थायिक व्हायची चिन्हेच नव्हती. तो मुंबईत बस्तान बसवायच्या मागे.

आमच्याकडे वेगळीच कहाणी. अर्जून सैन्यात गेला. देशसेवा करायला. अण्णांचा विरोध होता या गोष्टीला. पण त्याने ऐकलं नाही. मरताना तोंडात पाणी पाजायला मुलगा हवा असं अण्णा म्हणालेले त्याला. पण तरी तो गेला. अण्णा गेल्यावर आला होता. पंधरा दिवसांच्या रजेवर. पण शेवटी त्यांना तो पाणी पाजू शकलाच नाही.

गावातले वडीलधारे जमले आणि त्यांनी पद्माकाकांच मन वळवलं. तसं ते वळण्याजोगं होत म्हणा. कोकणात ढवळीकर घराण्याच्या उरल्या सुरल्या वंशजाना आधार म्हणून पद्माकाका गावी परतले. हर्षदची नोकरी कंडक्टरची. एसटीतली. कायम फिरतीवर. त्याच्या बदलीची काही विशेष अडचण नव्हती. खरतरं तो रेल्वेत चिकटला असता. पण त्याला स्वतःला रेल्वेत रस नव्हता. मराठी माणसं कमी ना त्याच्यात.

एक घर सोडलं तर मुंबईतलं होतं नव्हतं ते विकून, आवरून काका गावी परतले. विश्वास त्यांच्याच घरात राहीला.

गावाबाहेरची जमीन ढवळीकरांची. साधारण ५-६ एकराची शेती. काकांनी शेतातलं घरटं बांधुन घेतलं. चार माणसांना पुरेल असं. गावातून शेतात ये-जा करायला एक सायकल होती. काका गावापेक्षा जास्त शेतात रमू लागले. गावात थांबण्याजोगं काही कारणं नव्हतचं त्यांच्यापाशी. ना विठठलकाका, ना अण्णा. बाकी गावातले बरेच चाकरमानी झालेले. त्यांच्या गोतावळ्यातलं असं कुणी विशेष नव्हतं. गावातून सारखी ये-जा करण्यापेक्षा शेतात राहण्यातच जास्त शहाणपणा होता. मला शक्य असायचं तेव्हा मी काकांबरोबर शेतावर जायचे. तिथे राहायचे. हर्षद असला की अजूनच मजा. पण काका पुर्वीइतक्या गप्पा मारत नव्हते आता. शेतातली गडीमाणसं होतीच. पण ती कामापुरती. बहुतेक शेजारच्या गावातले. आमच्या गावात तशी शेतमजूरांची वानवा. त्यांच्याशी स्नेहबंध कधी जुळलाच नाही काकांचा. खर तर काकांसारख्या मुंबईकरांचा जगाच्या पाठीवर कुणाशीही स्नेहबंध जुळायला हरकत नव्हती. पण आताशा त्याच्या स्वभावाचा कल अण्णासारखा अबोल होऊ लागलेला. पण कधी कधी रंगात आले की मग गमतीजमती सांगत.

"मुंबईची लोकल म्हणजे अजब गणित असते बघ. एकाच वेळेला शेकडो माणसं प्रवास करतात. आजुबाजुच्या कुणाची साधी तोंडओळ्ख नसते. पण तरी तो मुंबईकर म्हणून ओळखीचा. तेवढी ओळख पुरते. एक पेपर चार जण मिळून वाचतात. मग गप्पा सुरु. कोणत्याही विषयावर. सगळेच प्रत्येक विषयात तज्ञ. तिथे पावलापावलावर माणसं भेटतात. कडकडून भेटतात. भिडतात. कितीही घाईत असले तरी. पण इथे आता सगळे फक्त दिसतात. बोलायला वेळ आहे कुणाला ? तुझा बाप कमीत कमी ऐकायला तरी होता. लहान आमच्या सर्वात. मी सिनियर त्याला. पण आधी गेला. तसा कधी घाईत नसायचा तो. पण यावेळेस केली घाई.... असा कसा गेला.........असा......" यानंतर मग शब्द अडखळायचे... गोंधळायचे. मग फक्त शांतता. पुढचा सगळा संवाद त्यांच्या आणि माझ्या डोळ्यातून वाहून जायचा.

एक दिवस अचानक दिगंबरकाका आले. काय बिनसलं होत देव जाणे.
"हे बघ दादा, इस्टेटीत वाटा माझाही आहेच. इतके दिवस मी कधी साधा तांदळाचा दाणा मागितला नाही तुमच्याकडे. पण आता मला माझा वाटा हवाय." काकांनी सरळ मुद्द्याला हात घातला. इतक्या वर्षानंतर येऊन कुणाची साधी चौकशी न करता त्यांनी असा पवित्रा घ्यावा हे खटकलं सगळ्यांना. मलाही. पद्माकाकांशी त्यांनी तसं बोललेलं मला आवडलं नाही. आवडण्यासारखं काही नव्हतचं म्हणा त्यात.

पुन्हा पंचायत बसली. पद्माकाका काही बोललेच नाही. दिगंबरकाकाच बोलत होते. गाव ऐकत होतं. सरतेशेवटी वाटण्या झाल्या. पण दिगंबरकाकांच्या मनात वेगळचं होतं. त्यानी आपला हिस्सा विकणार असल्याचं जाहीर केलं. पद्माकाका त्याचक्षणी त्यांच्याकडे पोहोचले. कधी नव्हे ती मी सोबत होते.
"दिग्या, पैसाच पाहिजे होता तर एकदा बोलायचसं तरी. हा एवढा मनस्ताप तरी झाला नसता जीवाला."
"मला कुणाचे उपकार नकोत. मला माझा हिस्सा मिळाला तेवढा पुरे."
"उपकार नाही रे करत तुझ्यावर. कुणालातरी विकणार आहेस ना, मग मलाच विक. जे आहे ते सगळं आणलय तुझ्याकडे. बघ एवढ्याने भागत का ? कमी नाय पडायचं. जास्तच असेल बघ." पद्माकाकांनी खांद्यावरच्या झोळीतलं, आयुष्यभराचं सगळं त्यांच्यासमोर रिकामं केल. दिगंबरकाका गप्प होते. पद्माकाका जेव्हा तिथून बाहेर पडले तेव्हा युद्धात हरलेल्या वीरासारखी अवस्था होती त्यांची. त्या दिवशी ते इतके थकलेले वाटले की त्यांना साधं दोन पावलं चालवतं नव्हतं. दहा वर्षांनी म्हातारे झाले ते. शेवटी रिक्शात टाकून नेलं त्यांना शेतावर. दिगंबरकाका सुरतला परतले. जाताना जमिनीचे मुखत्यारपत्र आणि काकूंच मंगळसुत्र त्यांनी पद्माकाकांकडे पाठवलं. सोबत एक चिठ्ठी होती.

'मागच्या पावसात सगळं धुवून गेलं. जे उरलं सुरलं होतं ते पुरेसं नव्हतं. पुन्हा उभं व्हायचं म्हटल्यावर भांडवल पाहीजे. तुझ्याकडे काही असेल असं वाटलही नाही. मागितलं असतं तर तू सगळं विकून देशील याची खात्री होती. तुमच्या तोंडचा घास काढण्याइतपत स्वार्थी झालो नाही मी. म्हणूनच सरळ स्वत:चा हिस्सा मागितला. थोडा कडवटपणा आला असता तरी चालला असता, पण दोघांचं काम झालं असतं. खर तर यावेळेस अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं हे मान्य. त्यात चुकून वहिनींचं मंगळसुत्र आलय ते परत पाठवतोय. दैवानं साथ दिली तर परतफेड करीन. पुन्हा भेटूच.'

दोन-तीन वेळा तरी ती चिठठी वाचली असेल काकांनी. बराच वेळ डोळे वाहत होते. मला वाटलं, दिगूकाकांबद्दल काही बोलतील. पण नाही. त्यांनी शब्दात मांडल नाही. मलाही तेव्हा त्याची गरज वाटली नव्हती. मग किती वेळ काका मंगळसुत्र घेऊन बसले होते. मग स्वतःशीच बोलल्यासारखे बोलू लागले.
"किती खस्ता काढल्या तिने आमच्यासाठी. माझ्या फाटक्या संसाराला सांभाळायला. मला वाटत होतं की सगळं नीट चाललयं. पण ते तिच्यामुळे नीट दिसत होतं. तिने अंगावर काढलेली आजारपण कधी दिसलीच नाहीत. ती खंगतेय हे देखील रोजच्या धावपळीत नजरेस पडलं नाही. माझा संसार उभा केला तिने. नेमका, नीटनेटका. स्वतः मात्र अथरुणाला खिळली. कधी नव्हते ते चांगले दिवस आले. पण ते बघायला तिने डोळे नीट उघडलेच नाहीत. त्यातच गेली. ती जाण्याआधी हौसेने केलं होतं हे तिच्यासाठी........ एकदा बोलली,' मी जाईन तेव्हा हे मंगळसुत्र काढून ठेवा तुमच्याकडे. त्या निमित्ताने राहीन तुमच्यासोबत. माझा जीव झुलेल या डोरल्यात तुम्हाला आणि हर्षदला बघून.' ........... तेवढं तिच ऐकलं मी. ठेवली तिला माझ्यासोबत. दिग्याबरोबर चुकून गेली असती तर अजून एकटा पडलो असतो मी...... दिग्याला पत्र पाठवून त्याचे आभार मानायला हवेत....त्याच चांगल होऊ दे...."

एकदा एका निवांत संध्याकाळी हर्षद बोलला,' बाबा आईचं खुप करायचे. कामावरून आले की तिला सगळ्या गंमती सांगायचे. कामावरच्या, प्रवासातल्या, चाळीतल्या..... नाना तर्‍हेच्या... नाना लोकांच्या.... ती सगळं ऐकायची. डोळे मिटून. अधून मधून हुंकार द्यायची. घरात त्यांचा तो एकमेव हक्काचा श्रोता होता. त्यांना तिचं करताना पाहून जीव तुटायचा तिचा. गेली तेव्हा सुखाने गेली. बाबांना तिच्या त्रासातून मुक्त केल्याचा आनंद होता तेव्हा तिच्या चेहर्‍यावर. ती गेली आणि बाबांचा श्रोता गेला. आमचं बोलणं व्हायचं पण बाप लेक म्हणूनच. मित्र म्हणून नाही. त्यांचा माणसांशी होणारा संवाद हरवला तो तेव्हाच.'

हर्षद आणि मी नसले की काका एकदम एकटे पडायचे. जीव घाबराघुबरा व्हायचा त्यांचा. मोहनला शेतावर राहायला पाठव, असं बोलले काका रमाकाकुला. 'पोराक गडी म्हणान पाठवचय नाय मी' असं फणकार्‍याने बोललेली रमाकाकू. काकांच्या जीवावर आपण दोन घास खातोय हे सोयिस्कररित्या विसरून. गावातला बाबल्या जायचा त्यांच्याकडे. रिकामटेकडाच होता तो. माणसाला माणसाचा आधार म्हणतात तसा असायचा बाबल्याचा तात्पुरता आधार. माणसांच्या गर्दीला सरावलेल्या पद्माकाकांना गावातला एकांत छळत असेल असं वाटायचं मला. एकदा दोनदा तर त्यांना स्वतःशीच बोलताना पाहीलं मी.

मला डिग्री मिळाली आणि अण्णांच्या पुर्वपुण्याईमुळे बॅकेत कामालाही लागले. आई हर्षदच्या लग्नासाठी पद्माकाकांच्या मागे लागली होती.

अर्जुनाला तर लग्नाची इच्छाच नव्हती. म्हणायचा,' माझ्या जीवाचा काय भरोसा ? आज आहे उद्या नसेन. उगाच तुमच्या उरावर एक विधवा आणून कशाला बसवू ?'.....
तसा त्याच्या बोलण्याला ताळतंत्रच नसायचा. तो बोलायचा, आई चिडायची, त्रागा करायची. शेवटी तिने त्याचा नाद सोडला आणि ती हर्षदकडे वळली. तो तिच्या शब्दाबाहेर नव्हता. तिने लग्नाचा विषय काढताच त्याने होकार दिला आणि पद्माकाकांना सांगून आईने सगळी जबाबदारी स्वत:वर घेतली व ती मुली बघायला लागली. हर्षदला पसंत पडेल तेव्हा पडेल, पण हिलाच मुलगी पसंत पडेना.

तो एक शनिवार होता. मी संध्याकाळी शेतावर गेले. काका अंगणात सगळा पसारा मांडून बसले होते.
"काका, करताय तरी काय ? "
"बुजगावणं बनवतोय."
"का ? एवढ्या वर्षात कधी सुचलं नाही ते आता मध्येच का ?" मी त्यांच्या समोरच बैठक मारली.
" अग, त्या खोपकराची गुरं येतात. मी नसलो की जातात चरून. जनावरं ती. खोप्याला बोलून तरी काय उपयोग ? पण तोच बोलला. शेतात बुजगावणं लावा. यायची नाय जनावरं शेतात. म्हटलं, करून बघुया."
थोड्याच वेळात त्यांनी चांगल पुरुषभर उंचीचं बुजगावणं बनवलं. त्याला हर्षदचा जुना शर्ट आणि पँट चढवली.
"कसा दिसतोय ? "
"झकास आहे बघा. कोणी पाठमोरा बघेल तर म्हणेल हर्षदच उभा आहे."
"हो ना... चांगलय. तेवढीच मला सोबत." काकांनी त्याला उचललं आणि ते घरामागे गेले. दहा पावलांवर त्याला उभा केला. मागच्या खिडकीतून सहज दिसेल असा.
"बघ. वाटतो ना हर्षद उभा आहे म्हणून...." ते बराच वेळ त्याच्याकडे बघून बरचं काही बोलत होते.

त्याच रात्री निरोप आला. लोंढ्याला एसटी कोसळल्याचा. अपघात भयानक होता. कोणीच वाचलं नाही. हाती आला तो नुसता एसटीचा सांगाडा आणि राख. काका धावले लोंढ्याला. एकटेच. दुसर्‍या दिवशी परतले. ते परतले हेच नशीब होत आमचं. तरुण मुलगा. त्याच्या लग्नाची स्वप्ने आताच कुठे रंगत होती...... एकमेव शेवटचा आधार.... तोच गेलेला आणि दुर्देव हे की त्याचं शेवटचं दर्शनही नशीबात नव्हतं. आयुष्यातलं सर्वस्व गमावलेला माणूस. प्ररतेल तरी कशाला ? थोडी राख हातात घेऊन काका परतले. बुजगावण्याच्या मुळाशीच ओतली त्यांनी ती. महिनाभर मी आणि आई शेतावर येऊन-जाऊन होतो. काकांच्या चेहर्‍यावरचं तेज लोप पावलेलं. कसली इच्छा म्हणून उरली नव्हती. आई बळेच त्यांना चार घास खायला घालत होती. काका स्थिरावताहेत असं वाटायला लागलं. पण आता त्यांचा एक नवा छंद सुरु झाला. ते मागच्या खिडकीत असायचे बर्‍याचदा. तासनतास बाहेर न्याहाळत बसायचे. स्वतःशीच हसायचे. काहीबाही बोलायचे.

मी शक्यतो दररोज फेरी मारत होते. मध्ये काही दिवस आई आजारी होती. प्रेशरचा त्रास. म्हणून जाता आलं नाही. एकदा काका येऊन गेले. पण यावेळेस त्यांच्यात जरा बदल जाणवला मला. नेमक्या शब्दात सांगता यायचा नाही. पण हरवलेलं गवसल्यावर होतो तसला काहीसा आनंद होता त्यांच्या चेहर्‍यावर. चेहरा.... हां.... चेहरा.... त्याच्यावर टवटवी जाणवली थोडीशी. फक्त बोलणं सलग वाटल नाही मला. तुटक तुटक म्हणता यायचं नाही, पण मध्येच एखादं वेगळं वाक्य असायचं. संदर्भ कळत नव्हता.
"बाय, बेगीन बरा हो. वाईच कामाचो पसारो कमी कर. जिवाक त्रास करून घेऊ नको. पोरांचा लगीन व्होऊचात अजून. हर्षदचा काहीएक जावूक नाय. तुझ्या झिलांचा आणि छेडवाचा बरा होऊनी. चल येतय मी आता. वाट बघत असतलो तो. एकट्याक कंटाळो येता त्याका. येतय मी."
यातली शेवटची दोन वाक्ये मला कळलीच नाही. 'येतय मी' च्या आधीची. कोण वाट बघत असेल ?

पुढचा शनिवार गाठून मी शेतावर गेले. काका दिसले नाहीत. मी हाका मारल्या. घरात शिरले. दार सताड उघडं होतं. म्हणजे ते घरीच होते. मी आत शिरले. तोच माझ्या हाकेला घराच्या मागून होकार आला.
"आलो आलो." मी मागच्या खिडकीजवळ गेले. काका दिसले. मला त्यांनी तिथूनच हात दाखवला आणि मागे वळले.
"आलोच" असं काहीसं पुटपुटल्यासारखं वाटल मला. काका आत आले.
"आहेस कुठे ? पत्ता नाही तुझा किती दिवस ? चल बस. चहा टाकतो तुझ्यासाठी. चहा घेशील ना ? " काका स्वंयपाकघराकडे वळले आणि मागोमाग मी. स्टोव्हवर आधण चढवून त्यांनी दोन कप पाणी ओतलं. काहीतरी आठवल्यासारखे बाहेरच्या दिशेला बघत बोलले.
"चहा घेणार का रे ?...... नको. .... नको तर नको." त्यांनी चहा पावडर आणि साखर टाकली. मी गोंधळले. कुणाला विचारलं काकांनी ? कोण 'नको' बोललं ? पण कोण काही बोललचं नव्हतं. मी तरी काहीच ऐकलं नव्हतं.
"काका" मी हळूच काकांना हाक मारली. "कोणी आहे का अजून ? "
"आहे तर. उगाच बोलतोय मी."
"कोण ?" मी विचारलं.
"ये दाखवतो." माझा हात धरून ते मला मागच्या खिडकीकडे गेले आणि त्यांनी बाहेर बोट दाखवलं. समोर बुजगावणं होतं. खिडकीकडे पहात. पुर्वी त्याची नजर दुसरीकडे असायची पण आता याक्षणी मात्र ते खिडकीकडे पहात होतं. हसर्‍या चेहर्‍याने. त्याच्या अंगावर हर्षदचा नवा कोरा कपड्यांचा जोड होता. मागच्या भाऊबीजेला मीच घेतलेला. मी जरा दचकलेच.
"काका........... ?" मला नेमकं काय बोलावं तेच सुचेना.
"चल. चहा उकळला असेल. घेऊ या घोट घोट. चल. " मी वळले.
"आलो रे" त्यांनी खिडकीतून बाहेर आरोळी ठोकली. मला काही कळेचना. काका बोलायला लागले होते याचं आश्चर्य करू की ते बुजगावण्याशी बोलतात याचं नवल करू.... म्हणजे माझं मलाच नक्की कळेना. बरं, विचारणंही प्रशस्त वाटेना मला. खोपकराची जनावरं येतात का अजून ? त्याचा काही उपयोग होतोय की नाही ? .... हे विचारावसं वाटलेलं. पण नाही विचारलं. प्रश्न ओठांवरच विरून गेले. त्यांचं त्याच्याशी जुळलेलं ते नातं माझ्या त्या तासाभराच्या उपस्थितीत मला इतकं जाणवत होतं की खरचं आम्हा दोघांशिवाय तिथे तिसरा कुणी तरी आहे याच्यावर माझाच विश्वास बसला. काका बोलत होते. भरभरून बोलत होते. चावी दिलेल्या खेळण्यासारखे. चावी कोणी दिली ते मात्र कळलचं नाही मला तेव्हा. मी चहा घेऊन निघाले. वळणावर थांबले आणि वळून पाहीलं तेव्हा काका चहाचा कप हातात घेऊन त्याच्यासमोर उभे होते. हातवारे करत. बोलतही असावेत. कारण ते पाठमोरे होते. माझी नजर नकळत बुजगावण्याकडे खिळली. क्षणभर मला वाटलं ते मला पाहतयं. तोच काका वळले. माझ्याच दिशेने. त्यांनी हात दाखवला. जणू त्यांना त्या बुजगावण्यानेच सांगितलं असावं तसे. काटाच उभा राहीला त्या कल्पनेने अंगावर. मी वळले.

आठवड्याभरानंतरची गोष्ट. काका घरामागे त्याच्याबरोबर होते आणि मी स्वयपाकघरात. काकांनी मला मध्येच हाक मारून बोलावून घेतलं.
"बघ.. काय म्हणतोय ?"
"काय ? "
"कंटाळा आलाय म्हणतो एकटं उभं राहण्याचा. सोबत हवीय. कोणी असलं की मग बोलायला बरं. आता याला सोबत कुठून आणू ? खोपकराच्या मळ्यातून ?" काका हसायला लागले. मीही सामिल झाले त्याच्या हसण्यात. बुजगावण्याचा चेहरा गोरा-मोरा वाटला तेव्हा. मी त्यांच्या त्या संभाषणात सहभागी झाले याचं मलाही आश्चर्य वाटलं होतं तेव्हा. पण झाले खरे. माझ्यापुरतं हेच महत्त्वाचं की काका बोलू लागलेले. काहीतरी गवसलेलं त्यांना. कदाचित बोलण्यासाठी एक हक्काचं कोणीतरी. त्याच्या विश्वात ते जिवंत होतं. त्यांच्या सोबत. चोविस तास. त्यांना समजून घेणारं.

चार दिवसांनी आई केसांना तेल लावत होती, तेव्हा काकांचा विषय निघाला.
"जुवे, शेतार गेल्ल ?"
"व्हय. शनिवाराक गेल्लय...... अगे हळू....वडू नको. गुंतो झालो हा. डोक्या दुखता." मी केस धरत म्हणाले.
"बरे आसत ना भाऊजी ?"
"हुं" मी हुंकारात भागवलं.
"बाबलो म्हणत होतो..."आईने वाक्य अर्ध्यावरच सोडलं आणि हातातलं तेल डोक्यावर थापलं.
"काय ? काय म्हणत होतो बाबलो ? " मी तेलाचा गारवा फिल करत विचारलं.
"भाऊजी,............. बोलतत असा ऐकला ?" आईने तळव्याने टाळू थापत सांगितलं. मी तिच्याकडे वळले. अचानक वळल्याने तेलाचे ओघळ चेहर्‍यावर आले.
"बोलतत म्हंजे...?" मी तेलाकडे लक्ष न देता विचारलं. आईने आजूबाजूला पाहीलं. घरात दोघींव्यतिरिक्त कुणीच नव्हतं. पण महत्त्वाचं आणि दुसर्‍या कुणाविषयी काही सांगायचं असल्यास ती नेहमीच खातरजमा करते.
"कोणीएक नाय. तू सांग." मी तिला स्वतःकडे वळवलं.
"भाऊजी, बुजगावण्यावांगडा बोलतत." फक्त मलाच ऐकू येईल असल्या आवाजात ती फुसफुसली.
"बाबल्या बोललो ना तुका... त्याका काय कळता ? तो स्वतःच भरकटलेलो हा. तिया लक्ष देऊ नको त्याच्याकडे."
"खरा की काय ? "
"अगे केस नको गं वडू." मी विषयांतर केलं खरं पण काकाची बाब षटकर्णी झाली आहे हे कळलं.

त्यानंतर पंधरा दिवस फिरकूच शकले नाही. मनात असलं तरी. एका शुक्रवारी घरी परतले तेव्हा काकांना बरं नसल्याचे आईने सांगितले. मी लगोलग निघाले. काका घरीच होते. मागच्या खिडकीजवळ्च्या बाजेवर. मान खिडकीकडे आणि नजर बाहेर. बुजगावण्यावर बसलेल्या कावळ्याला हातवारे करत शीण आवाजात हाकलत. बुजगावणं मात्र शांत. कावळयाला हाकलायला कसलीच हालचाल केली नाही त्याने.
"काका..." मी हाक दिली. त्यांनी मान वळवली. चेहरा निस्तेज वाटत होता. फार अशक्त दिसले ते मला. मला पाहताच त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर खोकल्याची उबळ आतून झेपावली. त्यांचा तोल जाईल असं वाटल्याने मी पुढे सरसावून त्यांना सावरलं. ते काटकूळे हात हातात आले.... एखाद्या तापलेल्या सळीसारखे. अंगात चांगलाच ताप होता.
"उठू नका. झोपा पाहू." मी त्यांना परत झोपवलं. "काही हवयं ?" त्यांनी मान माठाच्या दिशेने वळवली. मी माठाकडे वळले. पाणी घेऊन त्यांच्या दिशेने वळले तेव्हा ते खिडकीबाहेर पाहून क्षीणसे हसले. मी बाहेर नजर टाकली. बुजगावण्याचा चेहरा उतरलेला वाटला मला. कावळा उडाला होता.

त्या रात्री मी तिथेच थांबले.

चार दिवसांची रजा टाकली आणि काकांजवळ थांबले. त्यांच्या तब्येतीत फरक पडला. थोडी हुशारी वाटू लागली. दुपारी औषधांसाठी बाहेर पडले. संध्याकाळी परतले तेव्हा काका जाग्यावर नव्हते. मी खिडकीबाहेर नजर टाकली. ते बुजगावण्याशी बोलत होते. मी त्या दिशेने निघाले.
"तुला काय वाटतं ? काल नेमकं काय झालं असावं ? इतके दिवस क्रम चुकला नव्हता तुझा.. आणि माझाही. मग कालच असं का व्हावं ? काल आपलं बोलणं झालच नाही. का ?"
मी त्यांच्या जवळ पोहोचले होते.
"कुणी ? जुईने. अरे, नेहमीप्रमाणे तिने मला औषधं दिली आणि मग..... मग मी झोपलो. त्यातच झोपेची गोळी होती ?" काका त्याला विचारत होते की सांगत होते, तेच मला नीट कळलं नाही.
"काका ..." मी हलकेच हाक दिली. चटकन वळले ते. जणू मी त्यांची चोरी पकडली होती.
"काय बोलताय त्याच्याशी एवढं ? " मी उभारलेल्या बुजगावण्याकडे पहिल्यांदाच इतक्या नीट पाहीलं. माझ्यासमोर आडवा पडून तयार होत होता तेव्हा पाहीलेला त्याला. सर्वसाधारण बुजगावण्यासारखचं होतं ते. फक्त त्याच्या अंगावर हर्षदचा एसटीचा युनिफॉर्म होता आज. मी परत येईपर्यंत काकांनी बदलला होता. बोलता-बोलता अधूनमधून बुजगावण्याकडे पहात होते. मला उगाच तो चेहरा ओळखीचा वाटायला लागला. कपड्यांमुळे असेल.
"चौकशी करत होता माझ्या तब्येतीची. काल गप्पा मारल्या नाही ना आम्ही. झोपलो मी. रात्री गप्पा मारल्याशिवाय झोप येत नाही त्याला...... ऐकलसं....म्हणतोय, मी स्वत:ची काळजीच घेत नाही........ कशाला घ्यायची ? कुणासाठी... ? " त्यांच्या नजरेतलं शुन्य जाणवलं मला. "वेडा कुठचा... कंटाळलाय गेल्या आठवड्याभरात. याला खुप बोलायला लागत बघ. पण बोलणार कुणाशी. इथे आहे कोण ? मला म्हणतो, मी नसलो की याला एकटं एकटं वाटतं. स्वतःशी बोलून बोलून तरी किती बोलणार नाही का माणूस ? कोणीतरी हवचं ना बोलायला. याला म्हणे कायमची सोबत हवीय. वेडाच आहे. मला काय दुसरा कामधंदा नाही."
"काका, आत चला. वारा सुटलाय." मला कसली भीती वाटली ते कळलं नाही. पण भीती जाणवली हे मात्र खरं.
"चल. याला काय ? नाय उन्हाची भीती नाय वार्‍याचा त्रास. चल... चल..... "
मी काकांच्या मागोमाग निघाले. मागे वळून पाहीलं. मला बुजगावण्याचा तो ओळखीचा चेहरा परत पडल्यासारखा वाटला.

काका आता व्यवस्थित होते. पुर्वीसारखे हिंडू फिरू लागलेले. तसा बराच वेळ त्याच्यासोबत दिसायचे मला. गप्पा मारत. अधून मधून मीही त्यांच्यासोबत असायचे. त्याच्याशी गप्पा मारायला. पण त्यांच्या प्रश्नांना त्याने दिलेली उत्तरे फक्त त्यांनाच कळत होती. तो काय बोलला ते काका सांगत मला. मला त्याचा चेहरा फार हसरा वाटला होता तेव्हा.

थोडं विचित्र वाटतेय ना ? मीही काकासोबत बुजगावण्याशी बोलणं ? ..... मला त्यांच्या त्या भ्रमिष्टपणातलं सुख हिरावून घ्यायचं नव्हतं... इतरांच्या दृष्टीकोनातून तो भ्रमिष्टपणाच... . माझ्यासाठी हेच फार होतं की ते पुर्वीसारखे उत्साही झाले होते. बोलू लागले होते. हर्षद गेल्यावर ते सावरतील की नाही अशी भीती होती. पण ते सावरले. त्या बुजगावण्यामुळे. म्हणून मी त्याला त्यांच्याइतकाच जिवंत मानत होते. सांगायला हरकत नाही, माझी ही गणना बाबल्याने वेड्यात करून हे आईच्या कानावर घातलं होतं. पण ते एवढं महत्त्वाचं नव्हतं.

मला वाटलं होतं, सगळं आता स्थिरस्थावर होईल. आई आता माझ्यासाठी मुलगे बघत होती. हर्षदच्या लग्नात मिरवण्याची तिची संधी हुकली होती ना ! पण मला एक गोष्ट माहीत होती. मी गेल्यावर आई आणि काका एकटे पडतील याची. काकांना तरी सोबत होती. पण आईचं काय ? मी शक्यतो विषय टाळत होती. पद्माकाकांच्या विश्वात माझ्या लग्नाचा विषय नव्हता. आईने गावात जवळजवळ सगळ्या घरात मी लग्नाची झाल्याचा निरोप पोहोचवला होता. एकदा दोनदा सुट्टीवर आलेला अर्जूनने देखील विचारणा केली. आईला कोण बघणार, या माझ्या वाक्यावर मात्र तो गप्प झाला. तो स्वतः तिथल्या आयुष्यात रमला होता. त्याची गावात परतायची इच्छा नव्हती.
"तू कित्याक माझ्या लग्नाची काळजी करतस ? माजा लगीन झाल्यार तुका कोण बघतलो ?" एका रात्री जेवता-जेवता विषय काढलाच मी.
"खरा हां तुजा. उद्या मी गेल्यार तुका कोण बघतलो ? " ती जेवता-जेवता थांबली. मी गप्प बसले. विषय तिथेच थांबला.

आणि एक दिवस आई गेली. प्रेशरचा त्रास. बसल्या जागी. मी घरी नव्हते. मागच्या अंगणात भांडी घासत बसली. केव्हा प्राण निघून गेले ते देव जाणे. मला कळताच मी घरी परतले तेव्हा दारात अर्धा गाव होता. पद्माकाकाही. आणि चुलीवर कोळसा झालेला तांदूळ. आई करत असलेला तो शेवटचा स्वयंपाक.

आई गेली आणि दाराला टाळं लावून मी गाव सोडलं. शेतातल्या घरात गेले. शेतातून गावात आणि गावातून शेतात ही माझी भ्रमंती थांबली. आता इथे आम्हा तिघांशिवाय कोणी नव्हतचं. कधी कधी काकांसोबत मीही त्याला माझ्या आवडीचे कपडे घालत असे.

माझी तालुक्याला बदली झाली. सरकारी नियम आडवे आले. मी वरिष्ठांना समजावून सांगितलं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे अर्ज, काकांची मेडीकल हिस्ट्री... सगळं जोडलं. पण जाणं भाग होतं. निदान काही दिवस तरी. नाहीतर नोकरी गेली असती. ते परवडणारं नव्हतं. काकांना समजावून मी त्यांचा निरोप घेतला. रमाकाकुंना काकांची काळजी घ्यायला सांगितली. त्या घेणार नाहीत याची खात्री होती. तरीही. का कुणास ठाऊक... पण निघताना मी आशेचा दृष्टीक्षेप बुजगावण्यावरही टाकलेला. तो तरी त्यांची काळजी घेईल म्हणून. पण तो मात्र निश्चल होता. फक्त त्याचा तो नवा सदरा तेवढा वार्‍यावर लहरत होता. मी नव्या जागी रूजू झाले.

पंधरा दिवस गेले. गावात परतण्याची संधी मिळालीच नाही. पुढच्या पंधरा दिवसात पुन्हा गावातल्या बदलीचा हुकूम हाती येईल या आशेवर होते मी. काकांची काळजी वाटत होती. तशी इथे मीही एकटीच असायचे. सगळ्यांची आठवण यायची. लहानपणीची. शाळेतल्या पाच साडेपाच तासातल्या मैत्रिणींची, अण्णांच्या शाबासकीची, आईच्या हातच्या पिठल्याची, काकांच्या हातच्या चहाची, अर्जुनच्या दादागिरीची, मोहनच्या बावळटपणाची, समीरच्या आप्पलपोटेपणाची, विश्वासच्या स्वप्नांची, हर्षदने सांगितलेल्या गावागावाच्या गंमतींची आणि शेतातल्या बुजगावण्याची. माझं जग खुप लहान आहे हे इथे जाणवलं मला. आपल्या वर्तुळातल्या माणसांशिवाय दुसरं कोणी कधी नव्हतचं भोवती. मी इतकी वर्षे माझ्याच कोषात होती हे प्रकर्षाने जाणवायचं मला. इथे भोवती माणसं होती. चिक्कार होती. बँकेत राबता असायचा लोकांचा. पण तिथलं आयुष्य मला नाटकाच्या नेहमीच रंगणार्‍या प्रयोगासारखं वाटायचं. तीच ती माणसं, त्याच त्या भुमिका, तेच ते नेहमीचे छापिल संवाद. सगळं तेच. रोजच. इथे माझं ते जुन विश्व हरवलं होतं. मला एकटं एकटं वाटायचं. कधी कधी स्वतःलाच विचारायचे...... प्रश्न....वेगवेगळे...... आपल्याच बाबतीत हे असं का व्हावं ? काकांच्या बाबतीत झालं तसच होत काहीसं. सर्वात आधी काकू गेल्या आणि मग मागोमाग विठठलकाका, अण्णा, हर्षद, आई.... काकू एखाद्या चुकीच्या नक्षत्रात तर गेल्या नव्हत्या ना ? असं म्हणतात की असं काही झालं तर घराण्यातील अजून पाच माणसं एकामागोमाग त्याच मार्गाने जातात.खरचं झालं असेल असं काही ? घडलं असेल कुणाच्या बाबतीत की दंतकथा आहेत या सगळ्या. जर खरं असेल तर मग पाचवा कोण ?..... काका की मी.... ? दिगुकाका.... पण ते आमच्यात होतेच कुठे.....मग....की आणखी कोणी ?...... काका बुजगावण्याशी बोलतात. तोही बोलतो म्हणे त्यांच्याशी. कसं शक्य आहे ? मी जवळ असायचे. तेव्हा ही तो बोलायचा. मी ऐकलं नाही कधी. पण काकांच बोलणं सुसंगत असायचं. बोलताना कधी अडखळले नाहीत. एकदा असेच बोलता-बोलता बोलले.
"कंटाळा आलाय या एकटेपणाचा........." काका इतकं बोलले आणि थांबले. मग त्याच्याकडे पाहून हसले. मग मला म्हणाले," ऐकलं काय म्हणतोय..?"
"काय म्हणतोय ? " मी विचारलं.
"लग्न करून द्या म्हणतोय. म्हणजे त्याच्या बायकोची सोबत होईल मला." काका एवढं बोलून हसायला लागले आणि तेव्हा यावर मीही हसले होते. एकदा हेच हर्षद बोलला होता...... हर्षद...... हे देवा....म्हणजे तो हर्षद आहे तर..... अस कसं होईल ? भ्रम आहे हा...... काकांना तसं वाटत असेल.... त्याच्याच मुळाशी हर्षदची राख टाकली होती म्हणून. पण ती राख हर्षदचीच होती हे कशावरून ?.... सगळ्यांचीच राख झाली होती त्यात...... कदाचित भलत्या कुणाची राख त्यांनी हर्षदची राख म्हणून आणली असेल..... स्वतःच्या मनाच समाधान. हर्षद हा शेवटचा दुवा. त्याच्या आणि काकूतला. खुप जीव त्यांचा त्याच्यावर. त्या राखेतून तो पुन्हा उभा होईल असं तर नसेल ना त्यांना वाटलं....म्हणून तर ते हर्षदशी बोलावं तसं बोलतात त्याच्याशी..... त्या बुजगावण्याशी. हे सगळे काकांच्या मनाचे खेळ असतील. त्याला हर्षदचे कपडे चढवल्याने झालं असेल असं. बुजगावणं कसं बोलेल ? यावेळेस गेले की मी विचारीन काकांना. नक्की विचारीन. तो हर्षद आहे का ?.............प्रश्न...............एकट्या माणसाला छळत राहतात हे अनुत्तरीत प्रश्न. काहींची उत्तरे सापडतात... पण त्यातून पुन्हा नवीन प्रश्न जन्माला येतात..... पुन्हा त्यांचा छळवाद सुरु...... माणसाने एकटं राहूच नये..... सोबत असावं कुणीतरी...म्हणजे प्रश्न छळत नाही......एकटा पाहून हल्ला करणारे प्रश्न दुसर्‍या माणसाला पाहीलं की बिचकतात..... लपतात..... त्यांना दुर ठेवायचं असेल तर संवाद हवाच.... कुणाशीतरी...... काकांना विचारायला हवं.... तो हर्षद आहे का ?

पण ती संधी मिळालीच नाही. मी पोहोचले तोपर्यंत काका माझ्यासाठी थांबलेच नाही. त्या वाईट रात्री मी शेतावरच्या घरातच राहीले.
सकाळी काकांच्या अस्थी आणल्या. दिवस कधी करायचे ते ठरले. सगळे आपापल्या घरी निघाले आणि मी मागच्या खिडकीकडे.

मळ्यात आता दोन बुजगावणी उभी होती. दुसर्‍याच्या अंगावर काकांचे कपडे होते. गळ्यात मंगळसुत्र अडकवलेले.

मी आता इथेच राहते. दोघांसोबत. आता गप्पांचा फड रात्री उशीरापर्यंत रंगतो.

समाप्त.

गुलमोहर: 

थोडी शब्दबंबाळ झालीये आणि पंच इफेक्ट नाही आला. काय होणार ते अगदी लगेच कळलं होतं...

तुमच्या नेहमीच्या कथांपेक्षा थोडी खालच्या दर्जाची वाटली... आणि हो, पु.ले.शु. म्हणायचं राहिलं Happy

कथाबिज चांगलं आहे, पण फार लांबवलिस. थोडक्यात आटोपता आली असती.. Sad
काकांचं वाईट वाटलं एकदम... Sad
भ्रमिष्ट लोकांचं खूप अवघड होतं Sad माझे आजोबा त्यांच्या शेवटच्या काळात तसे झाले होते, रात्री ओरडत उठायचे, आणि नारळाच्या झाडावरून पडलो, मेलो म्हणायचे. आम्ही खूप घाबरून जायचो ते ही घामानं थबथबलेले असायचे... Sad

मिलिंदा, 'शब्दबंबाळ' चा अर्थ कळला नाही. पंच इफेक्ट यात नाहीच. साध्या सरळ माणसांची कथा आहे. माझी कथा म्हणजे एखादी रहस्य वा गुढकथाच असणार असा ठोकताळा धरून वाचली तर मित्रा तुलना होणारच. मानवी मनाचा एक कंगोरा यात हाताळण्याचा प्रयत्न आहे. तो जमला नाही असं तुमच्या प्रतिसादावरून वाटतेय. हरकत नाही. पुन्हा प्रयत्न करू. तुम्ही आहातच सगळे साथ द्यायला. त्यामुळे चिंता नाही.
दक्षिणे, थोडक्यात आटपली असती तर कथेला अर्थच राहीला नसता. नीट मांडणी झालीय असं मला वाटतय आणि म्हणून तुला काकांबद्दल वाईट वाटलं. प्रत्येक भ्रमिष्ट वाटणार्‍या माणसाच्या तशा वागण्यामागे एक अनोळखी पार्श्वभुमी असते. तुझे आजोबा तसे का वागायचे त्यालाही काही कारण असणारच. मनाच्या डोहात प्रचंड उलथापालथी असतात. हिमनगाच्या दिसणार्‍या टोकावरून त्याची खोली कळत नाही.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.

कौतुक, मला तरी आवडली ही गोष्ट.
सुरुवातीला जरा खुळवायला झालं, कोण कुणाचं आणि कधी गेलं वगैरे.
पण नंतर लिंक लागली.

mast ho kautuk bhaw...tumchya saglya katha wachlya...aaplyale ta aawadlya bhaw...manacha pasaara mast mandala...

खुप छान..... एखाद्याच्या आयुष्यात किती दु:ख आणि असा विरह असतो ना? काकांच वाईट वाटलं. खुपच छान कथा.

शब्दबंबाळ म्हणजे जरा जास्त मोठी झाली. आटोपशीर करता आली असती (कदाचित नसती पण) असं माझं मत.

पंच इफेक्ट फक्त रहस्य कथेलाच असतो असं नाही, एखाद्या अतिशय साध्या सोप्या लेखात शेवटची एक पंच लाईन असूच शकते. इथे पण पंच लाईन आहेच. काका बुजगावण्याशी बोलतात अणि म्हणून ते भ्रमिष्ट आहेत हे माहिती असणारी , हे त्यांच्या मनाचे खेळ असतील म्हणणारी मुलगी जेव्हा स्वतः शेवटी तेच करते, तेव्हा त्याला पंच इफेक्ट का म्हणता येणार नाही ?

अर्थात, यात तुमच्या नेहमीच्या गोष्टी वाचण्याची सवय झाल्याने झालेल्या तुलनेचा भाग असणारच आहे. पण मला जे वाटले ते स्पष्ट लिहीले.

चांगली कथा......
काकांच्या बाबतीत.......अगोदरच अंदाज आला.......
पण नायिकेच्या बाबतीत वाचुन " पंच " बसला....

मस्तच ...अभिनंदन