मुळपुरूष .....!

Submitted by विशाल कुलकर्णी on 24 September, 2009 - 09:32

आजकाल अनेक व्यावसायिक वृत्तीच्या शेतकर्‍यांनी पैसे कमावण्याचा एक छान मार्ग शोधुन काढला आहे. हुरड्याच्या दिवसात ते त्यांच्या शेतांवर शहरी लोकांसाठी हुरडा पार्ट्या आयोजीत करतात. दर डोई १५०-२०० रुपये आकारुन तुम्ही यात सहभागी होवु शकता. शहराच्या प्रदुषीत वातावरणाला कंटाळलेल्या लोकांना एक बदल हवाच असतो. एक दिवस नेहेमीच्या रहाटगाडग्यापासुन दुर, मस्त निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे. विहीरीत मनसोक्त डुंबायचे. हुरडा, भुइमुगाच्या शेंगा दाबुन खायच्या. चुलीवरच्या भाकरी, झणझणीत वांग्याची भाजी बरोबर तव्यावरचा हिरव्या मिरच्यांचा खरडा............. मजा असते हो सॉलीड!

ही सगळी प्रस्तावना सांगायचं कारण आम्ही परवा असेच पुण्याजवळच्या एका शेतात हुरडा पार्टीला गेलो होतो. त्यावेळी आपोआपच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जुन्या स्मृतींची भुते एकेक करुन बाहेर येवु लागली आणि ती आठवण जागी झाली.

मी काहीतरी पंधरा सोळा वर्षाचा असेन तेव्हा. सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आमचे एक छोटेसे गाव आहे, घोटी ! गाव तसा छोटाच आहे. हजार एक लोकवस्तीचा. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. सगळे जुन्या पद्धतीचे आता मोडकळीला आलेले वाडे.
गावाला बस स्टॉप असा नाहीच. वेशीवर असलेले मारुतीचे मंदीर हाच तिथला बस स्टॉप. मंदीराला लागुनच गावाची वेस आहे. वेशीपाशीच पडकी चावडी आणि सार्वजनीक पाणवठ्याची प्रचंड मोठी विहीर. या विहीरीला सगळे मिळुन एकुण सोळा रहाट आहेत पाणी काढण्यासाठी. गावात सरळसोट एक लांबलचक रस्ता या टोकापासुन त्या टोकापर्यंत पसरलेला. रस्त्याच्या दुतर्फा आमचे छोटेसे गाव वसलेले आहे.

माझे कुणीतरी खापर पणजोबा काहीशे वर्षापुर्वी गावात येवुन स्थाइक झालेले. आम्ही मुळचे कर्नाटकातील बदामीचे. मुळ आडनाव "विद्वत". पण तत्कालीन राज्यकर्त्याने जगण्यासाठी म्हणुन महाराष्ट्रात आलेल्या आमच्या पुर्वजांना त्यांच्या निष्ठेवर खुश होवुन घोटी आणि आजुबाजुच्या पाच गावाचे सारा वसुलीचे काम (कुळकर्णीपद) दिले आणि आम्ही कुळकर्णी, मग हळुहळु कुलकर्णी म्हणुन ओळखले जावु लागलो. पुढे कुलकर्णी हेच आडनाव कायम झाले. गावात आमचा एक प्रचंड असा वाडा होता. आता खुप मोडकळीला आलाय. त्यातलाच काही भाग दुरुस्त करुन, पुन्हा बांधुन काढुन आमची आताची पिढी वाड्यात राहते. एकेकाळी वाडा खुप प्रशस्त होता, ऐसपेस होता. दिंडी दरवाज्यातुन आत शिरलं की दोन्ही बाजुला दोन मोठ्या पडव्या आहेत. दहा माणसे आरामात बसु शकतील एवढ्या मोठ्या. पडव्या ओलांडुन आत शिरले की समोर प्रशस्त अंगण आहे. अंगणात मधोमध तुळशी वृंदावन. आणि अंगणाच्या चारी बाजुनी कोटासारख्या खोल्या आहेत. पुर्वी दोन्ही मजले मिळुन एकुण १२ खोल्या होत्या. सद्ध्या आठ फक्त शिल्लक आहेत. दिंडी दरवाज्याच्या अगदी समोर अंगणाच्या त्या बाजुला आमची देवघराची खोली आहे. अगदी दारात उभे राहीलेल्याला देखील आमचे शिसवी देवघर स्पष्ट दिसते, जे अजुनही आहे. अंगणाला लागुन असलेली ओसरी आणि ओसरीला लागुन देवघर. देवघराचा उंबरा जवळ जवळ एक फुट उंचीचा आहे.

तर आम्ही हुरडा खायला म्हणुन गावी गेलेलो. खुप मोठा गोतावळा जमला होता. काका गावीच असायचे शेती बघण्यासाठी. आता त्यांचा मुलगा बघतो. बाकी आमचे कुटूंब, चारी आत्या त्यांच्या मुलाबाळांसमवेत आल्या होत्या. ते चार पाच दिवस प्रचंड मजेचे होते. कधीही उठा, येता जाता कणगीतल्या भुइमुगाच्या शेंगा, कोवळी तुर, हुलगे अशा मेजवानीवर हात साफ करा. शाळेची काळजी नाही. अभ्यास नाही त्यामुळे आम्ही पोरेसोरे सॉलीड खुश होतो. त्या दिवशी असेच झाले. दिवसभर शेतावर हुंदडुन आलो होतो. घोटीत आमची ३० एकर शेती आहे. काकाने विहीरीत पोहायला शिकवलेले. पांगार्‍याचा बिंडा बांधुन धडा धडा विहिरीत उड्या मारायच्या. मग बांधावरच्या चिंचेवर चढुन तोडलेल्या चिंचासाठी भांडणे. विहिरीवर बसुन मस्तपैकी लाल मक्याच्या भाकरी, वांग्याची भाजी हाणलेली. सॉलीड दमली होती सगळी बालमंडळी. घरी परत आल्यावर कधी एकदा आडवे होतो असे झाले होते. गरम गरम पिठलं भात खाऊन ताणुन दिली.

मध्यरात्री कधीतरी जाग आली ती लघुशंकेची भावना झाल्यामुळे. गावात त्या वेळी शौचालये वगैरे नव्हतीच. कॉल आला की टरमाळे उचलायचे आणि गावाबाहेरच्या हागणदारीवर पळायचे. मग तासाभराची निश्चिंती. पण रात्रीचे काय. तर वाड्याच्या एका बाजुलाच एक उकीरडा होता. मोठी माणसं लघुशंकेसारखे विधी रात्रीच्या वेळी तिथेच उरकायचे. बायका आणि लहान मुलांसाठी मात्र वाड्यातच एका बाजुला, एक मोरीचा आडोसा बांधण्यात आला होता. मी उठुन बाहेर आलो, मोरीवर जावुन शंका समाधान केले आणि परत फिरलो. येताना सहज देवघराकडे लक्ष गेले. देवघरातली समई मंदपणे तेवत होती. कुणीतरी एक आजोबा देवासमोर उभे होते. पांढरे धोतर नेसलेले, तसेच एक धोतर अंगावर पांघरलेले. मी थोडा उत्सुकतेने पुढे गेलो.

"कोण आहात तुम्ही? या इतक्या रात्री देवघरात काय करताय तुम्ही? झोप नाही का येत तुम्हाला?" मी त्यांना विचारले.

त्यावेळी वाड्यावर बर्‍याच गडी लोकांचा राबता असायचा. त्यामुळे मी समजलो की त्यांच्यापैकीच कुणीतरी एक असेल. त्यांनी हळुच मान वळवली. आता आठवतय की त्यावेळी त्यांचा चेहरा मला आमच्या आण्णांसारखाच वाटला होता. ते प्रसन्नपणे हासले आणि त्यांनी माझ्याकडे बघुन दोन्ही हात वर केले, जणु काही आशिर्वादच देत असावेत तसे. आणि ते देवघरात आत शिरले.

माझ्यावर झोपेचा अंमल होता. मी खांदे उडवले आणि गपचुप येवुन झोपी गेलो. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आण्णांना रात्रींच्या त्या आजोंबाबद्दल विचारले.

"दिसायला कसे होते रे ते आजोबा? " आण्णांनी खोदुन खोदुन विचारायला सुरुवात केली.

"आण्णा, अहो ते आजोबा अगदी तुमच्यासारखेच दिसत होते!" मी बोललो. आण्णांच्या चेहर्‍यावरील भाव भराभर बदलत गेले.

तसे आजीने घरातली जुनी नवनाथाची पोथी काढली आणि त्यात ठेवलेला एक जुनाट , रंग उडालेला कृष्ण धवल रंगातले चित्र मला दाखवले.

"हेच होते का रे विशु ते आजोबा?"

मी चित्रावर झडप घातली. तोच माणुस चित्रात उभा होता. फक्त या चित्रात ते पुर्ण कपड्यात होते, सदरा, धोतर त्यावर कोट वगैरे. रात्रीच्यासारखे फक्त एका धोतरावर नव्हते.

"हो हो हेच होते ते आजोबा!" मी उत्सुकतेने बोललो. कोण आहेत ते.......?

आजीने मला जवळ घेतले. माझी अलाबला घेतली, कानशिलावरुन ओवाळुन कडाकडा बोटे मोडली..

"नशिबवान आहेस लेकरा. ते रामभाऊ विद्वत होते. आपल्या घराण्याचे मुळपुरुष. जवळजवळ ८०० वर्षापुर्वी कर्नाटकातील बदामीवरुन जगायला म्हणुन इथे आलेले. आपल्या घरातल्या नशिबवान लोकांनाच दिसतात. तुझ्या बापाला पण दिसले होते त्याच्या लहानपणी, काय रे विजु?"

त्यानंतर मी आठवडाभर तापाने फणफणलो होतो.

समाप्त.

विशाल कुलकर्णी
(पुर्णपणे काल्पनिक)

गुलमोहर: 

माझ्या मते खापर पनजोबा म्हणजे पनजोबांचे वडील असे असेल तर तुझ्यापर्यन्त वंशावळ वाढायला ८०० वर्ष लागणार नाहित.

बाकी कथा छान होती.

गोष्ट काल्पनिक नसती तर.......................................!

अविनाशभौ.....
खापर पणजोबा हा शब्द फक्त खुप काळ उलटून गेलाय याचे द्योतक म्हणून वापरलाय. आता खापर खापर खापर खापर खापर खापर...... याला काही अर्थ आहे का? Wink
असो धन्यवाद Happy

८०० वर्षांपुर्वीच्या माणसाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो?

हाती काढलेले चित्र असले तर पोथीत रहाण्या एवढे लहन व ब्लॅक अँड व्हाईट नसावे.

Pages