आंतरिक शक्तीचा शोध

Submitted by नरेंद्र गोळे on 22 September, 2009 - 11:27

आंतरिक शक्तीचा शोध

७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन (Angiography) करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत (Left Anterior Descending (LAD), एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच राहत असे. दरम्यान मला अनुत्तरित प्रश्नांचा विळखाच पडलेला होता. ते प्रश्न मी कसे सोडवले? प्रतिबंधक हृदयोपचाराचा मार्ग मला कसा गवसला? वाटेत कुठकुठल्या अडचणी आल्या? आणि केवळ दोन वर्षांच्या आत मी जवळपास पूर्वपदावर कसा परतलो? ही एक आंतरिक शक्तीच्या शोधाची सुरस कथा आहे. तुम्हालाही ती बोधप्रद होऊ शकेल असा विश्वास वाटून ती लिहून काढली आहे.

समस्येची सुरूवात

शनिवारीच माझ्या पावलांवर सूज आलेली होती. विशेषत: डाव्या. रविवारी वाट पाहिली, यासाठी की काही चावल्याची वगैरे असेल तर सूज उतरेल. पण सूज उतरली नाही. सोमवारी सकाळी जरा वाढलेलीच वाटली. लक्षण काही चांगले नव्हते. तो दिवस होता ४ नोव्हेंबर २००४. मग विचार करून असे ठरवले की डॉक्टरकडे जायलाच हवे. मी आयुवेर्दिक डॉक्टरकडे जायचा निर्णय घेतला. कारण आम्ही त्यांना चांगले ओळखत होतो. ११३० वाजता त्यांचा दवाखाना उघत असे. मी त्यासुमारासच तिथे पोहोचलो.

सूज पाहिल्यावर त्यांनी रक्तदाब मोजायचा निर्णय घेतला. तो २३०/१७० भरला. त्यांनी रक्तदाब फारच जास्त असल्याचे सांगून रक्तमोक्षण करावे लागेल असे सांगितले. रक्तमोक्षण म्हणजे १०० ते २०० मिलीलिटर रक्त शीरेतून इंजेक्शनने काढून, टाकून देणे. लगेच सुई, पिचकारी वगैरे आणली व रक्तमोक्षण केले. नंतर रक्तदाब २००/१३० इथपर्यंत उतरला. औषधे दिली. कार्यालयीन तणावामुळे, अतिश्रमामुळे किंवा कसल्यातरी गूढ कारणाने रक्तदाब वाढला असल्याचा माझा समज झाला. पण उपाय तर करायलाच हवा, म्हणून मी विश्रांतीसाठी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी दरदिवसाआड रक्तदाब मोजून घ्यायला जात असे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर व औषधोपचारांनंतर रक्तदाब १४०/१०० असा राहू लागला. कधी कधी १६०/१०० असा वाढलेला ही आढळत असे.

रक्तमोक्षण, बस्ती, काढा, चंद्रकलारस, बेलाची पाने पाण्यात बुडवून ते तीर्थप्राशन, अटेन-५० ह्या ऍलोपॅथीच्या गोळ्या, सुवर्णसूतशेखर वटी, सर्पगंधा घनवटी, नस्य ह्या साऱ्यांचा वापर करूनही सुधारणा होत नव्हती. मला कल्पना होती की, आमच्या कार्यालयीन ऍलोपॅथी उपचारपद्धतीच्या निकषांनुसार हा रक्तदाब खूपच जास्त असून त्याना तो लक्षात आल्यास ते रुग्णालयात दाखल करतील. मात्र आमच्या आयुर्वेदिक वैद्यांचे म्हणणे असे होते की वाढत्या वयानुसार रक्तदाबही वाढत असतो. काही जणांचा रक्तदाब मुळातच जास्तही असू शकतो. त्यामुळे, जर काही इतर त्रास नसेल तर त्यावर आहार, विहार व व्यायामाने उपचार करत राहावे. हळूहळू कमी होईल.

थकवा वाटत नसे. छातीत दुखत नसे. माझी सारी कामे मी पूर्ववतच करत होतो. रक्तदाब मोजण्यासाठी दरदिवसाआड वैद्यांकडे जावे लागत होते. कधीकधी श्वासोच्छवासास थोडा त्रास होत असे (हे आयुर्वेदिक औषधे सुरू केल्यानंतरच सुरू झालेले होते). मात्र अलीकडे, मला लोक बोलत ते ऐकू नये असे वाटे. स्वत:चे बोलणेही नकोसे वाटत असे. चेहरा सुजल्यागत दिसे. मात्र सूज नव्हती.

रुग्णालयात दाखल

३ सप्टेंबर २००४ रोजी ऑफिसच्या नेहमीच्या तपासण्यांच्या दरम्यान रक्तदाब १६८/११० असा भरला. तो 'लक्षणहीन (असिंप्टोमॅटिक) रक्तदाब' असा निदानित करून रुग्णालयात पाठवण्यात आले. माझ्या ४७ वर्षांच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच रुग्णालयात दाखल होत होतो. यापूर्वीच्या आयुर्वेदिक उपचारांबाबत इथल्या डॉक्टरांचे असे म्हणणे पडले की (पुअर बी. पी. मॅनेजमेंट). ती औषधे चालूच ठेवलीत तरीही काहीच फरक पडणार नाही. मी म्हटले की जी औषधे चालूच ठेवूनही काहीच फरक पडणार नसेल तर ती औषधेच कसली? मी ती आयुर्वेदिक औषधे तात्काळ बंद करून, ऍलोपॅथीचीच औषधे यापुढे घेण्याचा निर्णय घेतला. दुसरे दवशी रक्तदाबनियंत्रणासाठी रोज सकाळी एक याप्रमाणे ऍम्लोडेपिनची ५ मिलिग्रॅमची गोळी घेण्यास सांगण्यात आले. शिवाय चार आठवड्यांनंतर ताणचाचणी करवून घेण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णालयातून सुटतांना 'त्वरित (ऍक्सिलरेटेड) रक्तदाब' असल्याचे नोंदविण्यात आले.

रुग्णालयात निरिक्षणासाठी दाखल असतांना लिपिड रुपरेषेसाठी रक्ततपासणी करण्यात आली. तिची निरिक्षणे उपलब्ध नाहीत. सततच्या उच्च रक्तदाबामुळे बुबुळे कायमची विकृत झाली आहेत का हे पाहण्यासाठी 'फंडुस्कोपी' करण्यात आली, म्हणजे डोळ्यात वेगळाच लाल प्रकाश टाकून डोळे निरखतात. ह्या तपासणीत बुबुळांवर काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले. सततच्या उच्च रक्तदाबामुळे फुफ्फुसांवर विपरित परिणाम झाला आहे किंवा काय हे पाहण्यासाठी छातीचे क्ष-किरण प्रकाशचित्र काढण्यात आले. इथेही काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले.

ताणचाचणीसाठी १ नोव्हेंबर २००४ हा दिवस निर्धारित करण्यात आला. त्या दिवशी चाचणीपूर्वी मोजले असता रक्तदाब १७०/११० असा भरला. तो जास्त असल्याने सॉबिर्ट्रेटची गोळी जिभेखाली ठेवावयास देऊन तासभर झोपवून ठेवले. नंतरही रक्तदाब १६०/१०० इतका राहिल्याने चाचणी होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले. पुन्हा निरीक्षणाकरता एक दिवस रुग्णालयात भरती करण्यात आले.

यावेळी अम्लोडेपिनची ५ मिलिग्रॅमची एक गोळी आणखी वाढवून देण्यात आली. तसेच लोर्वास २. ५ मिलिग्रॅमची एक गोळी सकाळी घेण्यास सांगण्यात आले. आता यु. एस. जी. के. यु. बी. म्हणजे मूत्रपिंड व मूत्राशयावर सततच्या उच्च रक्तदाबाचा काही विपरित परिणाम झाला आहे का हे पाहण्यासाठी त्यांची श्राव्यातीत लहरींनी चाचणी करण्यास तसेच पुन्हा ६ आठवड्यांनंतर ताणचाचणी करण्यास सांगण्यात आले. ही श्राव्यातीत लहरींनी चाचणी दोन दिवसांनी लगेचच करण्यात आली. इथेही काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले.

ताणचाचणी (Stress Test), हृदयधमनीआलेखन (Angiography) व हृदयधमनीरुंदीकरण (Angioplasty)शस्त्रक्रिया

आता ताणचाचणीसाठी ४ डिसेंबर २००४ हा दिवस निर्धारित करण्यात आला. त्या दिवशी ताणचाचणी झाली. ती सुरवातीपासूनच सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. ती सहा मिनिटे चालली. आणि हृदयस्पंदनदर मर्यादेबाहेर गेल्याने थांबवण्यात आली. नंतर ती हृदयधमनीतील अडथळ्यांकडे संकेत करीत असल्याचे निदान करण्यात आले. हृदयधमनीआलेखन करून घेण्याचा सल्ला दिल्या गेला.

एखाद्या व्यक्तीने श्रम केले असता हृदयस्पंदनदर (Heart Rate) वाढत जातो. केलेले श्रम जसजसे वाढत जातात अथवा ते करण्याचा दर जसजसा वाढत जातो तसतसा हृदयस्पंदनदर वाढत जातो. व्यक्तीस शक्यप्राय असणाऱ्या जास्तीतजास्त हृदयस्पंदनदरास अंतिम हृदयस्पंदनदर म्हणतात. अंदाजे अंतिम हृदयस्पंदनदर काढण्याचे एक सोपे समीकरण आहे. २२५ उणा तुमचे वय हा अंतिम हृदयस्पंदनदर (Terminal Heart Rate) असतो. अशा पद्धतीने काढलेल्या हृदयस्पंदनदराच्या ९० टक्के दरापर्यंत पोहोचेस्तोवर ताणचाचणी चालविली जाते. जास्त वेळ स्थितचालन करवून, चालन पट्ट्याचा चढ वाढवून अथवा पट्ट्याच्या फिरण्याचा वेग वाढवून. माझा, अंतिम हृदयस्पंदनदराच्या ९०टक्के हृदयस्पंदनदर (२२५ -४७)X०. ९= १६० ठोके प्रतिमिनिट असा होता. तो पोहोचताच चाचणी थांबविण्यात आली.

७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा (Blockage) ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. कलंकहीन पोलादाचा (Stainless Steel) १६ मिलीमिटर लांबीचा व २. २५ मिलिमिटर व्यासाचा, औषधवेष्टीत (Medicated) विस्फारक (Stent) ही बसविण्यात आला.

हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रियेनंतरची औषधयोजना (Prescription)

हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रियेनंतर २०-१२-२००४ रोजी मला माझी दीर्घकालीन औषधयोजना सांगण्यात आली. ती खालीलप्रमाणे होती. मला असेही समजले की ही औषधे कमी तर करता येतच नाहीत पण रोगाच्या तीव्रतेनुरूप वाढवतच जातात.

साधारणपणे ऍलोपॅथीमध्ये औषधयोजना, दिवसातून तीनदा घेण्याच्या गोळ्यांच्या स्वरुपात केल्या जाते. औषधे खालीलप्रमाणे लिहून दिली जातात.

अक्र, औषध, मात्रा (मिग्रॅ), औषधप्रकार, उपाययोजना, किंमत*, ३० दिवसांचा खर्च(रु), निर्मिती व कालबाह्यतेच्या तारखा

१, इकोस्प्रीन-१५०, रक्त-तरल-कर, ०-१-०, रु. ५. ७७/- प्रती १४ गोळ्या, १३, नि:८/०४, का:१०/०५
२, क्लोपिडोग्रेल/ग्रोवीन/प्लेग्रिल-७५, रक्त-तरल-कर, ०-१-०, रु. ५७. ६०/- प्रती १४ गोळ्या, १७३, नि:७/०४, का:६/०६
३, मोनोट्रेट-२०, धमनी विस्फारक, १/२-१/२-०, रु. ३३/- प्रती १० गोळ्या, ९९, नि:५/०४, का:४/०५
४, स्टोर्व्हास-१०, मेदविदारक, ०-०-१, रु. ८०/- प्रती १० गोळ्या, २४०, नि:७/०४, का:१२/०५
५, ऍम्लोडेपीन-५, क्तदाबशामक, १-०-१, रु. १३. ८०/- प्रती १०गोळ्या, ८३, नि:६/०४, का:५/०६
६, लोर्व्हास-२. ५, मूत्रल/रक्तदाबशामक, १-०-०, रु. ४९. ४५/- प्रती १०गोळ्या, १५०, नि:७/०४, का:६/०७

एकूण ३० दिवसांकरताचा खर्च: रू. ७५८/- फक्त

*: स्थानिक कर जादा, LTE: Local Taxes Extra
१-१-१: सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर एक एक.
ऍलोपॅथीमधील औषधे बहुधा भरल्या पोटीच घ्यायची असतात.

BD: Bice a day दिवसातून दोनदा, सकाळी नाश्त्यानंतर एक, आणि रात्री जेवणानंतर एक
OD: Once a day, म्हणजे बहुधा रात्री जेवणानंतर एक

वरील माहितीसुद्धा मला मोठ्या कष्टानेच मिळवावी लागली होती. पण त्यामुळे काही नव्या गोष्टी कळल्या होत्या. चक्क डोळेच उघडले होते. पहिले तर हे कळले होते की एकदा हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया झाल्यानंतर, पुन्हा अडथळे होण्याचा धोका टाळण्याकरीता जन्मभर औषधे घ्यावी लागतात. नंतर कळले की ती औषधे रु. ७५०/- दरमहा याहूनही महाग असतात. आणि उर्वरित आयुष्यात माणूस लक्षावधी रुपये औषधकंपन्यांना बिनबोभाट देतो. हे औषधांच्या दावणीला बांधलेले आयुष्य आणि हृदयाघाताचा कायमच असणारा धोका यांपासून सोडवणूक करून घेणे हे माझ्या जीवनाचे प्रथम कर्तव्य झाले.

यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच राहत असे. आमच्या रुग्णालयात मला असेही सांगण्यात आले की रक्तदाब जर असाच राहिला तर औषधे (ऍम्लोडेपीन) वाढवावी लागतील. इथे मला ऍलोपॅथीच्या अनुभवासही ‘पुअर बी. पी. मॅनेजमेंट’ म्हणावे की काय असे वाटू लागले.

अनुत्तरित प्रश्नांचा विळखा

दरम्यान मला अनेक प्रश्न त्रस्त करू लागले होते. मी तर संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, निरोगी, निरुपद्रवी, वरणभाताची गोडी असलेला, पापभिरू मध्यमवर्गीय होतो. मी कुणाचेच. कधीच, काहीही वाईट केलेले नव्हते. मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला? आता हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया तर झाली, मग रक्तदाब आदर्शवत १२०/८० का होत नाही? माझा रक्तदाब कशाने कमी होईल? हृदयधमनीत बसवलेला विस्फारक, गरज संपल्यावर काढून टाकता येतो का? विस्फारकाचे आयुष्य किती असते? एक आणि अनेक.

त्यानंतरचे अनेक दिवस मी अक्षरश: निकरानी उपायांचा शोध घेण्यात घालवले. यापुढील कोणतीही ताणचाचणी नकारात्मक यावी आणि उर्वरित आयुष्य औषधविरहित जगता यावे हीच दोन प्रमुख उद्दिष्टे मी ठरवली. ही खरोखरच साध्य आहेत काय, हे माहित नव्हते.

लोक भेटायला येत. नाना प्रकारचे उपाय सुचवत. त्यात वरील प्रश्नांची उत्तरे मुळीच नसत. उलट ते; फिरायला जात जा (इथे उपजीविकेपाठी बांधलेले मध्यमवर्गीय जीवन वाट्याला आलेले आहे, नाही तर सकाळ-संध्याकाळ, बायकामुलांसकट, कुत्रा हाताशी धरून, बागबगीचे फिरलो असतो), व्यायाम करा (अहो, हे सारे करायला अतिरिक्त बळ कुठून आणू? ), प्राणायाम करा (निवांत श्वासोच्छवास करत बसायला, इथे वेळ कुणाला आहे? ), दुधीचा रस प्या (दर दिवसाआड आम्ही दुधीचीच तर भाजी खातो की हो. मग तर, मला हृदयविकार व्हायलाच नको), तणाव बाळगू नका (मला काय तणाव बाळगायची हौस आहे? ), संतापू नका (लोक संताप आणतात), आराम करा (आणि माझी कामे काय तुम्ही करणार? ), अशा प्रकारचे सल्ले जरूर देत.

माझ्या याआधीच्या दिनचर्येत मला ते साधण्यास मुळीच वेळ मिळत नव्हता, म्हणून तर ही परिस्थिती आलेली होती ना? मग आता मला झालेला आजार, माझी झालेली शस्त्रक्रिया, औषधयोजनेमुळे बांधल्या गेलेला आहार ह्या साऱ्यांच्या उपस्थितीत मी त्या सल्ल्यांचा उपयोग कसा करू शकणार होतो, ते मला समजत नव्हते. भेटीला येणारे माझेच जवळचे सुहृद, नातेवाईक असत. त्यांची माझ्याबाबतची कळकळ खरी होती. हेतू प्रामाणिक असल्याचीही मला खात्री होती. ते सांगत होते त्या उपायांनी, लोक बरेही होत असल्याचे दाखलेही, ते देत असत. माझी प्रतिक्रिया मात्र वर कंसात दिल्याप्रमाणे, त्या उपायांवर अविश्वास दाखविणारी आणि नकारात्मकच असे. ते सल्ले मला परस्परविरोधी वाटत. निरर्थक वाटत. माझ्या खऱ्या प्रश्नांची उत्तरे त्या उपायांनी कधीच मिळणार नाहीत, असा माझा समज झाला होता.

मला माझ्या उद्दिष्टांकडे नेणारा उपाय दिसेना. मग माझ्या मावसभावाने प्रतिबंधक हृदयोपचारांचा उपाय सुचविला. आयुर्वेदाच्या उपचाराने भ्रमनिरास केला होता. पारंपारिक ऍलोपॅथीक औषधांचा आणि शस्त्रक्रियेचाही म्हणावा तसा उपयोग झालेला नव्हता. तेव्हा निरुपायाने आणि काहीशा अनिच्छेनेच मी प्रतिबंधक हृदयोपचारांकडे वळलो. एरव्हीही, मी अकार्यक्षम झालो तर ज्यांना सांभाळावे लागणार होते त्यांच्या म्हणण्याला मी कसे टाळू शकलो असतो?

प्रतिबंधक हृदयोपचारशाखा (Preventive Cadiology)

तपास करता असे समजले की हृदयोपचारासाठी ऍलोपॅथीत दोन शाखा आहेत. पारंपारिक शाखा ‘अधिक्षेपक हृदयोपचार’ (इंटरव्हेन्सिव्ह कार्डिओलॉजी) शाखा म्हणून ओळखल्या जाते. वर्धित रक्तदाबा (High BP) वर उपचाराची पारंपारिक पद्धत ह्या शाखेत पुढीलप्रमाणे आहे. १२०/८० पासून वाढत वाढत रक्तदाब १३०/९० च्या पुढे गेल्यावर ते रक्तदाब रक्तदाबशामक गोळ्या देऊन त्याचे व्यवस्थापन करतात. १६०/१०० पेक्षा जास्त झाल्यास रुग्णालयात दाखल करतात. मेदविदारक (कोलेस्टेरॉलनाशक) गोळ्या सुरू करतात. त्यांनीही रक्तदाब नियंत्रित न राहिल्यास कार्डिओग्राम, ताणचाचणी, आणि हृदयधमनीआलेखन इत्यादी चाचण्या करवितात. त्यात हृदयधमनीत अडथळे निपजल्यावर हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन (Bypass) शस्त्रक्रियेद्वारा ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

ह्या शाखेच्या मान्यतेनुसार हृदयविकार प्रगतीशील (Progressive) असतो. तो वयानुसार वाढतच जातो. औषधे व शस्त्रक्रियांच्या आधारे तो केवळ नियंत्रणात ठेवता येतो. नियंत्रणात न राहिल्यास जास्त औषधे व आणखीन शस्त्रक्रिया यांद्वारेच इलाज केल्या जातो. माझी उपाययोजनाही ह्याच वाटेवर वाटचाल करत होती. म्हणून मी ह्या वाटेवर माझ्याआधीच गेलेल्या चारपाच स्नेह्यांना भेटलो. त्यांच्या कहाण्या सविस्तर ऐकल्या. मला अनेक हृदयधमनी रुंदीकरणे व उल्लंघन शस्त्रक्रिया झालेले लोक भेटले. आपण आता पुन्हा कधीच पूर्णत: बरे होणार नाही असे मला वाटू लागले. आपली औषधे कधीच पूर्णपणे सुटणार नाहीत असेही वाटे.

तपास करता ‘प्रतिबंधक हृदयोपचार (प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी)’ शाखा मला माझ्या उद्दिष्टांची पूर्तता करून देऊ शकेल असे वाटू लागले. प्रतिबंधक हृदयोपचारशाखा त्यामानाने नवोदित आहे. ह्या शाखेत औषधे आणि शस्त्रक्रियांविना हृदयविकार माघारी परतवता येतो अशी मान्यता आहे. हे समजताच मला ह्या पोकळ बढाया वाटू लागल्या. मी विचारले की ‘डॉक्टर मला तुम्ही औषधे पूर्णपणे थांबलेली आहेत असा हृदयरुग्ण दाखवू शकाल काय? ज्याला हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेचा उपाय सुचविण्यात आलेला आहे अशा रुग्णास, तुम्ही त्या शस्त्रक्रिया न करता त्याला बरे करू शकता काय? तसे काही बरे झालेले रुग्ण तुम्ही दाखवू शकाल काय’. अनपेक्षितरीत्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली. प्रत्यक्षात तशी काही उदाहरणे पाहिली आणि मग मी प्रतिबंधक हृदयोपचार घेण्याचा निर्णय घेतला.

आणि लौकरात लौकर, म्हणजेच २५ डिसेंबर २००४ रोजी मी 'हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रमात (हृदयपुकार) - Cardiac Rehabilitation Program-CRP मधे' सामिल झालो. औषधांविना आणि शस्त्रक्रियेविना, केवळ 'जीवनशैली परिवर्तनाद्वारे' हृदयधमनीविकार परत फिरवता येतो आणि माझ्या उद्दिष्टांची पूर्तताही होऊ शकते अशी आशा पल्लवित झाली. २५ मार्च २००५ रोजी तो कार्यक्रम माझ्यापुरता सुफळ संपूर्ण झाला. त्यात सुचविलेली, मी स्वीकारलेली आणि माझ्या दिन:चर्येत बसविलेली जीवनशैली आता मी आयुष्यभर पाळणार होतो.

सम्यक जीवनशैली परिवर्तन (Comprehensive Lifestyle Changes)

माझ्या प्रकरणाचा अभ्यास करून, माझ्या समस्यांचा नीट विचार करून आणि माझ्या उद्दिष्टांच्या साधनेकरीता मला खालील ‘सम्यक जीवनशैली परिवर्तन’ सुचविण्यात आले.

१. आहार: दररोज जास्तीत जास्त २ चमचे साखर, जास्तीत जास्त २ चमचे तेल/तुप आणि कमीत कमी मीठ असलेला आहार घ्यायचा. सकाळी एक पेला लिंबूपाणी (अर्थातच साखरेविना), काही काळया मनुका अथवा दोन भिजवलेले बदाम, दुधसाखरेविना चहा, सकाळच्या आहारात एक वाटी (मेदविरहित दुधाचे) दही, दोन्ही जेवणांनंतर एक एक तासाने एक एक फळ (केळ, आंबा, सीताफळ, द्राक्षे इत्यादी वगळून, संत्र, मोसंब इत्यादींना प्राधान्य), रात्री झोपतांना एक पेला गाईचे दूध आणि दिवसभरात कमीत कमी आठ पेले पाणी आवश्यक.

२. विहार (Brisk Walking): सकाळी कमीत कमी ४५ मिनिटे (३-४ किलोमीटर) जलद चालणे
३. शारीरिक लवचिकतेसाठीचे व्यायाम (Flexibility Exercises): उपाशीपोटी २० मिनिटे
४. योगासने: उपाशीपोटी २० मिनिटे
५. प्राणायाम: १० मिनिटे
६. ध्यानधारणा/दृश्यकल्पन/कल्पनाचित्रण: १० मिनिटे

सतत तीन महिने कर्मठपणे वरील जीवनशैली अंमलात आणल्यावर माझ्यात आणि माझ्या हृदयधमनीविकारात अनेक परिवर्तने घडून आली. ती अशी:

१. माझे वजन ७० किलोचे ६५ किलो झाले.
२. माझी कंबर ३६ इंचांपासून ३२ इंचांपर्यंत कमी झाली.
३. माझा रक्तदाब १२०/८० राहू लगला.
४. माझ्या रक्तदाबाच्या गोळ्या दरदिवशी दोन (५मिग्रॅ ऍम्लोडेपीन)वरून एकवर आल्या.
५. मी हृदयविकारासंदर्भात भरपूर वाचन करू लागलो.

आणि मला समजून चुकले की हृदयविकार केवळ 'जीवनशैली परिवर्तनाद्वारे' परत फिरवता येतो. मला तर ह्या माहितीचा उपयोग झालाच होता. आता ही माहिती माजी, आजी आणि भावी हृदयविकारग्रस्तांपर्यंत पोहोचविणे अत्यंत जरूर असल्याचे माझ्या मनानी घेतले. म्हणून, मी डॉ. डीन आर्निश यांच्या ‘हृदयविकार माघारी परतविण्याचा कार्यक्रम’ ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचे काम वेगाने सुरू केले. १६-०३-२००६ रोजी ते काम सुफळ संपूर्ण झाले.

हृदयस्पंदनदर वाढला होता

१४ जुलै २००५ रोजी पाठपुरावा तपासणी (फॉलोअप चेकअप) साठी आमच्या रुग्णालयात बोलाविले होते. टोकन घेऊन बसल्यानंतर दोन तासांनी माझा नंबर लागला. मला भीती वाटत होती की ह्या वाट बघत थांबण्यामुळे रक्तदाब वाढतो की काय. पण रक्तदाब सामान्य म्हणजे १२०/८० च भरला. मात्र हृदयस्पंदनदर ११० ठोके प्रतिमिनिट भरल्याचे डॉक्टर म्हणाल्या. ह्या निरीक्षणानंतर त्यांनी सकाळची ५ मिलीग्रॅम ऍम्लोडेपिनची गोळी बंद करून त्याऐवजी २५ मिलीग्रॅम ऍटेनोलोलची गोळी सुरू करण्यास सांगितले.

डाव्या खांद्याच्या पाठीमागच्या बाजूला बधीरता येऊ लागली

नंतर काही दिवसांनी, खांद्यांच्या पाठीकडल्या भागात मुंग्या आल्यासारखा बधीरपणा जाणवत असे. डॉक्टरांनी तो अस्थिजन्य (ऑर्थोपेडिक) स्वरूपाचा असावा, असे सांगून त्यावर बी. जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या. ह्या गोळ्यांमुळे तसली बधीरता हळूहळू कमी होत गेली. साधारणत: तीन चार महिन्यांनंतर त्या गोळ्याही बंद केल्या. मात्र, नंतर पुन्हा तसली बधीरता कधीही जाणवली नाही.

रक्तदाब कमी होऊ लागला

२८ सप्टेंबर २००५ रोजी सकाळी ९०० वाजता नियमित तपासणी निर्धारित होती. त्यावेळी डॉक्टरांना रक्तदाब ९४/७० व नाडी ७० ठोके प्रतिमिनिट चालतांना सापडली. त्यापूर्वीही दोनदा तपासणी करीत असतांना रक्तदाब कमी सापडला होता. २२-०८-२००५ रोजी सकाळी ११०० वाजता तो १००/७० तर २६-०८-२००५ रोजी सकाळी ९०० वाजता तो ११०/७० असा मोजल्या गेला होता. त्यावर त्यांनी कधी चक्कर येते का? डोळ्यांपुढे अंधेरी येते का? अशी विचारणा केली. गेल्या काही दिवसांपासून मला खरोखरीच झोपून उठल्यावर डोळ्यांपुढे क्षणभरच का होईना अंधेरी येत असे, तोल गेल्यासारखे वाटत असे. पण क्षणभरच. ते मी त्यांना सांगितले. ते म्हणाले की ही चांगली लक्षणे आहेत. मला आता रक्तदाब कमी ठेवण्यासाठी जास्तीची औषधे घेण्याची गरज राहिलेली नाही. आणि त्यांनी ऍम्लोडेपिनची ५ मिलीग्रॅमची गोळी बंद करून त्याऐवजी ऍम्लोडेपिनची २. ५ मिलीग्रॅमची गोळी सुरू केली. आतापर्यंत मी १० मिग्रँ स्टोर्वासची मेदविदारक गोळी रोज नियमित घेत असे. ती कमी करता येईल का? किंवा बंद करता येईल का असे मी डॉक्टरांना विचारले. हे शक्य आहे का ते पाहण्यासाठी रक्ताची लिपीड-रूपरेषा (Lipid Profile) करवून घ्यावी असा त्यांनी सल्ला दिला.

ट्रायग्लिसेराईडस वाढली

ही रक्ततपासणी ०८-११-२००५ रोजी करण्यात आली. एकूण कोलेस्टेरॉल १६५, उच्च्च सघन कोलेस्टेरॉल ३५, कमी सघन कोलेस्टेरॉल ९२ आणि ट्रायग्लिसेराईडस १९२ असा निकाल लागला. एकूण कोलेस्टेरॉल १३० पेक्षा कमी नसल्याने मेदविदारक गोळी कमी न करता तशीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ट्रायग्लिसेराईडस १९२ म्हणजे खूपच जास्त होती. मग शोध घेतल्यावर मला असे कळले की गोड खूप खाल्याने ती वाढतात. आणि रक्ततपासणीच्या आधी नुकतीच दिवाळी झालेली होती. म्हणून पथ्यावर अपथ्यकर परिणाम झालेलाच होता. त्यामुळे एरव्ही कमी राहत असलेली ट्रायग्लिसेराईडस नेमकी रक्ततपासणीच्या वेळीच वाढलेली असावित असा मी निष्कर्ष काढला.

पुन्हा रक्तदाब कमी होऊ लागला

माझा रक्तदाब तर नियंत्रणात राहत होता, १२०/८० पेक्षाही कमीच राहत होता. २८-०९-२००५ रोजी जेव्हा ९०/७० असा रक्तदाब मोजण्यात आला तेव्हा ५ मिग्र ऍम्लोडेपीन ची सुरू असलेली गोळी अर्धीच सुरू ठेवण्यास सांगण्यात आले होतेच. नंतरही सातत्याने रक्तदाब कमीच राहत असल्याने १३-१२-२००५ रोजी २. ५ मिग्र लोर्वास ची जी गोळी मी रक्तदाबशमनार्थ घेत होतो ती अर्धी बंद करण्यात आली. आणि मग ०९-०१-२००६ रोजी ती पूर्णपणे बंद करण्यात आली. मेदविदारक गोळी कमी करण्याचे दृष्टीने, १०-०२-२००६ रोजी पुन्हा रक्ततपासणी करण्यात आली तेव्हा एकूण कोलेस्टेरॉल १४० व ट्रायग्लिसेराईडस ९३ असा निकाल लागला. मग १० मिग्र स्टोर्वासची गोळी अर्धी बंद करण्यात आली.

इतर जीवनशैलीगत परिवर्तनांसाठी (म्हणजे चालणे, व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, योगसाधना इत्यादी) मी केवळ तास दीड तासच काय तो वेगळ्याने देत असे. पण माझ्या दिनचर्येत मी आमुलाग्र बदल घडवला होता. कार्यालयीन वेळात मी दूरवर चालण्याची कामे स्वत:वर ओढवून घेऊ लागलो. जातायेता चारचार मजले उद-वाहकाऐवजी जिन्याचाच वापर करू लागलो. सतत संगणकावर बसावे लागे तेव्हा, दर तासातासाने मी उठून उभा राहत असे. आळोखे पिळोखे देत असे. जमल्यास सहकारी मित्रांच्या खोल्यांपर्यंत जावून त्यांच्याशी चार शब्द बोलूनही येत असे. याशिवाय आहारावरील नियंत्रण यथासांग सांभाळण्यात मला माझ्या पत्नीची अत्यंत मोलाची मदत झाली.

या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून माझा रक्तदाब कायम १२०/८० पेक्षाही कमीच राहू लागला. त्यामुळे २६-०६-२००६ रोजी २५ मिग्र ऍटेनोलोल गोळीही कमी करून अर्धीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मेदविदारक गोळी कमी करण्याचे दृष्टीने, १०-०२-२००६ रोजी पुन्हा रक्ततपासणी करण्यात आली तेव्हा एकूण कोलेस्टेरॉल १४० व ट्रायग्लिसेराईडस ९३ असा निकाल लागला. मग १० मिग्र स्टोर्वासची गोळी अर्धी बंद करण्यात आली.

पुन्हा रक्त व मूत्र तपासणी केली

२२-०६-२००६ रोजी माझी रक्त व मूत्र तपासणी पुन्हा करण्यात आली. रक्तशर्करा उपाशीपोटी ८० तर जेवल्यावर दोन तासांनी ८९ भरली. त्यामुळे मधुमेह नाही आणि रक्तशर्करा उत्तम स्थितीत आहे हे स्पष्ट झाले. रक्तातील कोलेस्टेरॉल १५३ व ट्रायग्लिसेराईडस १०३ आढळले. हे त्यांच्यावर व्यवस्थित नियंत्रण असल्याचे निदर्शक होते. मूत्रतपासणीवरून मूत्रपिंडांवर कसलाच विपरित परिणाम झाल्याचे दिसले नाही. रक्तदाबही पूर्णपणे नियंत्रणात होता. कमीच होता. म्हणून ह्या तपासणीनंतर रक्तदाबाच्या गोळीची मात्रा घटविण्यात आली. नंतर २२-०९-२००६ रोजी रक्त पातळ करणाऱ्या अस्पिरीनचे प्रमाणही घटवून अर्धे (७५ मिग्र) करण्यात आले. हल्ली माझा रक्तदाब खालीलप्रमाणे मोजण्यात आलेला आहे.

दिनांक, रक्तदाव (मिमी पारा)
१९-०७-२००६, ११०/८०
२८-०७-२००६, ११२/७६

०७-१२-२००४ रोजी हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर
दोन वर्षांमध्ये औषधयोजनेत साधता आलेली घट

अक्र, औषधयोजना, मात्रा (मिग्रॅ), औषधप्रकार, मूळ उपाय, सध्याची उपाययोजना, शेवटल्या बदलाच्या तारखा, अभिप्राय

१, इकोस्प्रीन-१५०, रक्त-तरल-कर, ०-१-०, ०-१/२-०, २२-०९-२००६, ५० टक्के सुधारणा झाली
२, क्लोपिडोग्रेल/ग्रोवीन/प्लेग्रिल-७५, रक्त-तरल-कर, ०-१-०, ०-०-०, ०७-१२-२००५, १०० टक्के सुधारणा झाली
३, मोनोट्रेट-२०, धमनी विस्फारक, १/२-१/२-०, ०-०-०, १६-०८-२००५, १०० टक्के सुधारणा झाली
४, स्टोर्व्हास-१०, मेदविदारक, ०-०-१, ०-०-०, २६-०६-२००६, १०० टक्के सुधारणा झाली
५, ऍम्लोडेपीन-५, रक्तदाबशामक, १-०-१, १/२-०-०, २६-०६-२००६, खूपच सुधारणा झाली
६, लोर्व्हास-२. ५, मूत्रल/रक्तदाबशामक, १-०-०, ०-०-०, ०९-०१-२००६, १०० टक्के सुधारणा झाली

शरीर व्याधीग्रस्त कसे झाले? ते पूर्वपदावर आणण्याचा उपाय काय? आपल्या शरीरात ईश्वराने किती अद-भूत स्वसुधारशक्ती भरलेली आहे? आणि तिचा साक्षात्कार आपल्याला कसा करून घेता येईल? ह्याच गोष्टींचा, ह्या दोन वर्षांच्या काळात मी निरंतर ध्यास घेतला होता. शरीरात खूपच स्वसुधारशक्ती असल्याचे मला कळून आले. ती शक्ती जागृत करण्यात मी बव्हंशी यशस्वी झालो. ही शोधकथा वाचून तसल्याच दुविधेत पडलेल्यांना निश्चितच लाभ होऊ शकेल, या हेतूनेच ती शब्दबद्ध केलेली आहे.

आज, मी हृदयविकाराच्या औषधयोजनेतून पूर्णपणे बाहेर पडलेलो आहे. रक्तदाब १२०/८० राहत आहे. माझी औषधविरहित जीवन जगण्याची अभिलाषा फलद्रुप झालेली आहे. म्हणून हे सारख्याच परिस्थितीत सापडलेल्यांकरता नोंदवून ठेवत आहे.

यापूर्वीही माझे अनुभव
http://www.manogat.com/node/8239
या दुव्यावर मी लिहून ठेवलेले आहेत. ते काहीसे सर्वसाधारण स्वरूपाचे होते. हे बरेचसे व्यक्तीगत स्वरूपाचे आहेत.

माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
पत्ता आहे
नरेंद्र गोळे
http://nvgole.blogspot.com/

गुलमोहर: 

हृदयरोग्यांना तुमचा अनुभव खूप उत्तेजन देणारा ठरेल.
या preventive cardiology चा प्रसार कितपत आहे ? ही सर्वमान्य शाखा आहे की अजून सरकारी पातळीवर मान्यता मिळाली नाहीये ?

माहिती फारच चांगली आहे.
एकच अडचण. एव्हढे सगळे शिस्तपूर्वक करणे होत नाही. आळस!
आणि इतरहि काही गोष्टी, ज्यांचा इथे संबंध नाही.

गोळेकाका, चांगले लिहिलेत.
>>शरीरात खूपच स्वसुधारशक्ती असल्याचे मला कळून आले
हे खरे आहे, आपणच त्याला साथ देत नाही.
अजून एक म्हणजे ट्रायग्लिसराईड्स फक्त शुगरनेच नाही तर सगळ्या जादाच्या कॅलरीजमुळे वाढतात. ते लगेच आटोक्यातही आणता येतात. अगदी टेस्ट्च्या आदल्या दिवशी काय खाल्ले यावर पण ठरते.

पण ते मराठी शब्द वाचून माझा रक्तदाब वाढला की हो! Happy

माहीती चांगली आहे धन्यवाद , येवढ्या शुध्द मराठीची सवय नाही हो , त्यामुळे काही शब्द डोक्यावरुन गेले.

नरेंन्द्र्जी,

खूपच छान माहिती आहे. हायटेक मराठी वाचून गंमत वाटली. मी सुद्धा गेले काही महीने नियमीतपणे सूर्यनम्स्कार, कपालभाती, लोम्-अनुलोम, भ्रामरी प्राणायाम आणी अलिकडेच घेतलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या क्लासमधील प्राणायाम (मुख्यत्वे सुदर्शन क्रिया) करते. परवाच माझ्या डॉक्टरने डायबिटीसच्या औधषाचा डोस अर्ध्यावर केला. A1C ६.३ वर आली (७.२ वरून). लिपिड प्रोफाइल तर मस्तच झाली आहे. मात्र खाण्यावर (काय आणि मुख्य म्हणजे किती) हे पण मी काटेकोरपणे बघते.

विनंती-अनुवादित पुस्तकात एवढ उच्च मराठी वापरू नका. वाचणारे कंटाळून चांगल्या माहितीला मुकतील.

फारच सुंदररित्या तुम्ही माहीती दिली आहे. या सर्व गोष्टींची इतकी नियमितपणे नोंदी ठेवणे हे सुद्धा आळसाचे काम! पण तुम्ही खरोखर कर्मठपणे हे सर्व पाळले त्यामुळे शक्य झाले असावे. तुमचा हा लेख आणि अभय बंगांचे पुस्तक या दोन गोष्टी अगदी संग्रहीत ठेवण्यासारख्या आहेत. अभय बंगांनी देखील डिन ऑर्निशचेच पुस्तक वाचून उपाय केले होते..
आत्ता पासूनच ही जीवनशैली अंगी बाळगली तर फार फायदा होऊ शकेल!
खूप धन्यवाद!

माहितीपूर्ण लेख. तुम्ही अत्यंत सातत्याने हे सगळे केले याबद्दल तुमचे कौतुक वाटते.
हा लेख मायबोलीवरच्या आरोग्यविषयक ग्रूप मध्ये पण लिहा म्हणजे लोकांना हवा तेव्हा चटकन रेफरन्स सापडेल. किंवा मधुमेह आधारगट, कर्करोग आधारगट इ.प्रमाणे याचापण एक आधारगट मायबोलीवर तयार करता येईल.

नरेंद्रजी,
अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. इतक्या कठोरपणे जीवनशैलीत बदल करून तुम्ही हृदयरोगावर मात केलीत ह्याबद्दल आपले अभिनंदन!!
ही सगळी माहिती संकलित करून आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आपले आभार.

मिलिन्दा, झक्कीगुरूजी, लालू, श्री, कल्पू, स्वाती, बी.एस.के., रुनी आणि पी.व्ही. तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.

आपल्याशी थेट संबंधित नसलेल्या, तेही एवढ्या विस्तृत लिखाणावर, वाचून प्रतिसाद देण्यासाठी किमान काही प्रगल्भता असावी लागते. आपण सगळ्यांनीच तिचा प्रत्यय दिला आहेत. हे पाहून आनंद झाला.

दरम्यान मला अनेक प्रश्न त्रस्त करू लागले होते. मी तर संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, निरोगी, निरुपद्रवी, वरणभाताची गोडी असलेला, पापभिरू मध्यमवर्गीय होतो. मी कुणाचेच. कधीच, काहीही वाईट केलेले नव्हते. मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला? आता हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया तर झाली, मग रक्तदाब आदर्शवत १२०/८० का होत नाही? माझा रक्तदाब कशाने कमी होईल? हृदयधमनीत बसवलेला विस्फारक, गरज संपल्यावर काढून टाकता येतो का? विस्फारकाचे आयुष्य किती असते? एक आणि अनेक.>>>>>>>>>>>>>>>>>>

डॉ. अभय बन्गानाही असेच ( की हेच?) प्रश्न पडल्याचे त्यांच्या पुस्तकात आहे.. Happy

अतिशय सुंदर माहिती. मनोगतावरही आधी वाचलेली, पण इथे जास्त खोलात जाऊन मिळाली.
"सम्यक जीवनशैली परिवर्तन" खरेतर तरुणपणापासुन सुरू करायला हवेच.
मीही बरेचसे पाळते, काही काही गोष्टी होत नाहीत, त्याही करण्यासाठी तुमचा लेख वाचुन बळ आले,

मिलिंदा,
या preventive cardiology चा प्रसार कितपत आहे ? ही सर्वमान्य शाखा आहे की अजून सरकारी पातळीवर मान्यता मिळाली नाहीये ?>>
भारतात तरी सर्वदूर या प्रतिबंधात्मक हृदयोपचार शाखेचा प्रसार झाला आहे. मात्र हृदयरुग्ण अधिक्षेपक (इंटरव्हेन्सिव्ह) हृदयोपचार शाखेतील शुश्रुषालयांतूनच प्रथम नेला जातो. त्यामुळे पर्याय उपलब्ध आहे हे सहजी समजू शकतच नाही. ढोबळपणे असे म्हणता येईल की हृदयाघाताचे प्रकरन नसेल तर केवल रक्तदाबाखातर, केलेल्या तपासणीत अवरोध निघाला म्हणून हृदयधमनी रुंदीकरण सुचवत असतील आणि रुग्णाचे वय पन्नसच्या आतच असेल तर निस्संशय दुसरे अभिमत मिळवावे. प्रतिबंधात्मक हृदयोपचाराच्या पर्यायाचा शोध घ्यावा. अशा रुग्णांना बहुधा शस्त्रक्रियेची गरज नसतेच.

भारतात, डॉ.प्रतीक्षा नामजोशी (हल्ली रिगडेब) यांनी IPC-Institute of Preventive Cardiology ची अंधेरीत स्थापना केली आहे. कल्याणला एक "स्पंदन" म्हणून उपचारकेंद्र आहे. पुण्यातील डॉ. हिरेमठ अनेक वर्षांपासून प्रतिबंधात्मक उपचार करत आहेत. पंजाबातही असे (प्रिव्हेंटिव्ह ‍अ‍ॅलोपॅथिक) कधीपासूनच होत आहेत.

मात्र मेडिक्लेमकरता (या उपचारांत हॉस्पिटलायझेशनच होत नसल्याने) या उपचारपद्धतीचा विचारच मान्य होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

लालू,
पण ते मराठी शब्द वाचून माझा रक्तदाब वाढला की हो! >>

रक्तदाब वाढण्याचे काहीच कारण नाही. उलट आपल्या मातृभाषेतही सर्व समस्या आणि त्यांचे समाधान उत्तमरीत्या करता येते हे जाणून आनंद व्हायला हवा! आपण हे शब्द रोज वापरू लागलो तर सहज अंगवळणीही पडतील. मात्र त्यांना पाहताच रक्तदाब वाढवून घेऊ नका हो. अशाने आमचा सगळा हुरूपच नाहीसा होईल.

गोळेसाहेब, लेख चांगला आहे, मलाही अभय बंगांच्या पुस्तकाची आठवण आली. पण ते वैद्यकीय प्रचलित इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द वापरलेत यात हेतू चांगला असला तरी ते शब्द वापरात नाहीत ना त्यामुळे कशाला काय म्हटलएय ते लक्षात येत नाही . तिथे वैद्यकीय शब्दांना कंसात इन्ग्रजी शब्दही लिहिलेत तर कळतील.

मात्र हृदयरुग्ण अधिक्षेपक (इंटरव्हेन्सिव्ह) हृदयोपचार शाखेतील शुश्रुषालयांतूनच प्रथम नेला जातो. त्यामुळे पर्याय उपलब्ध आहे हे सहजी समजू शकतच नाही. <<<
हे अगदी खरे आहे!

गोळेसाहेब, या लेखाबद्दल तुमचे आभार.

खरंच खुप छान आणि उपयोगी माहिती दिल्याबद्दल गोळेकाका खुप खुप धन्यवाद. Happy तुम्हाला दिर्घायुष्यासाठी खुप शुभेच्छा !

नरेन्द्रजी पहिले म्हण्जे दीर्घ आरोग्यपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा. >>> सावधान मामींनी खुप मोठा पॉज घेतला आहे , काही तरी जबरदस्त येणारं ......... Happy

माझी औषधविरहित जीवन जगण्याची अभिलाषा फलद्रुप झालेली आहे.>>
छान. हि खरच मोठ्ठी अचिव्हमेंट आहे. त्याबद्दल सलाम. इतरांनाही ह्या लेखामुळे स्फूर्ती मिळेल.

खूप छान लेख. तुमची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद. मी मायबोली सोडून इतर कुठल्याच मराठी साईटवर कधी जात नाही त्यामुळे इथे हा लेख टाकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

श्री१२३ अरे नाही इथे जैपुर मधे बसून काही डोक्यात येत नाहीये. >>> अहो मामी जयपुर सारख्या गुलाबी शहरात मनोसक्त फिरा , हे माबो च काय टेन्शन घेताय , आणि तेही इतकं सकाळी .

खूप प्रेरणा मिळाली तुमचा लेख वाचून. खरोखर ह्रदयरोग हा 'साक्षात्कारीच' असतो आणि तो साक्षात्कार वेळेवर झाला तर त्यावर मात करणे शक्य आहे ह्या विचारानेच अर्धे बळ येते. डॉ. प्रतिक्षा नामजोशी आणि डॉ. हिरेमठ ह्या दोघांची नावे मी ऐकलेली आहेत. काही लोक असे पाहिले की त्यांना खाण्याशिवाय जगण्यात स्वारस्य वाटत नसते. ते वर्षानुवर्षे औषधे घेत राहतात. त्यांना अधिक्षेपक उपचारपद्धती सोयीची वाटते. काहींना जितकं आयुष्य मिळेल ते निरोगी जगायला जास्त आवडते. त्यांच्यासाठी ही प्रतिबंधक योग्य. फार कठोर संयम आहे या पद्धतीत. तो पाळणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न !

<<<<<<<<<<मात्र मेडिक्लेमकरता (या उपचारांत हॉस्पिटलायझेशनच होत नसल्याने) या उपचारपद्धतीचा विचारच मान्य होत नाही. ही वस्तुस<<<<<<<<<<>>>>>>>>>>>

मेडिक्लेम मध्ये हॉस्पिटल मध्ये अ‍ॅड्मिट होऊन डॉक्टर्कडून उपचार होणे आवश्यक असते..... जीवन पद्धतीतील बदल हे हॉस्पिटलमधील उपचार या सदरात येत नाहीत..... नाही तर मग तर निसर्गोप्चार कॅम्प, रामदेव बाबाची शिबिरे, श्री श्री श्री.... बाबान्ची ३-७ दिवसान्ची कोर्सेस हेही मेडिक्लेम मध्ये लोक मागू लागतील... म्हणून ते इन्शुरन्स मध्ये दिले जात नाहीत....

,,,,,,,,,,,,मात्र हृदयरुग्ण अधिक्षेपक (इंटरव्हेन्सिव्ह) हृदयोपचार शाखेतील शुश्रुषालयांतूनच प्रथम नेला जातो. त्यामुळे पर्याय उपलब्ध आहे हे सहजी समजू शकतच नाही. >>>>>>>>>>>>>>>

कारण तेन्व्हा इमर्जन्सी असते म्हणून.... प्रतिबन्धात्मक उपचार हा रुग्णामधील मुख्य धोका आय सी यू/सर्जरी यानी टाळल्यानन्तर मग उपयोगी पडतो.... शिवाय प्रतिबन्धात्मक उपचार हे उपचारादर्म्यान प्रत्येक डॉ. सान्गत असतोच....

या काळातले आणखी काही अनुभव इथे लिहा... हे सगळे बदल एका रात्रीत तर नक्कीच झालेले नसणार....

सर्वेपि सुखिनः सन्तु...

जागोमोहनप्यारे, स्मिता गद्रे, ashbaby, मैत्रेयी, अश्विनीमामी, धनू-स्मिता, गजानन देसाई, विलाप,श्री-१२३, सुनिधी, आर्च, अश्विनी, अश्विनी गोरे आणि सर्व वाचकांना, मायबोलीकरांना, मनःपूर्वक धन्यवाद!

त्यांना आणि त्यांच्या आप्तस्वकियांना हृदयविकाराचा त्रास होऊ नये, असल्यास निरस्त व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मी वापरलेले मराठी शब्द अवघड आहेत. त्यामुळे मजकूर नीट कळत नाही. अशी सर्वसाधारण तक्रार दिसते. ज्यांना हा लेख संदर्भसाधन म्हणून वापरायचा आहे, त्यांचेकरता यात वापरलेले सर्व पर्यायी मराठी शब्द अल्फाबेटीकली तसेच अकारविल्हे रचून http://shabdaparyay.blogspot.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत. ते छापून घेऊन सोबत ठेवल्यास इंग्रजी शब्दांतून व्हावे त्याहूनही या लेखातील माहितीचे सुरेख आकलन होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो.

Pages