कोकण रेल्वे

Submitted by दिनेश. on 15 January, 2008 - 01:44

कोकण रेल्वेने प्रवास करताना, एसी डबा, तसा आवश्यक आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे बोगद्यांची रुंदी कमी असल्याने, आणि गाडीला डिझेल इंजिन असल्याने, धुर बोगद्यात कोंडतो आणि अर्थातच डब्यातही थोडा वेळ भरुन राहतो. ( या बोगद्याना वरच्या दिशेने उघडणारी धुरांडे आहेत पण तरिही हा प्रॉबलेम येतोच. ) दुसरे म्हणजे याच कारणाने, गाडीचा आवाज बोगद्यात फारच घुमतो, त्याचाही त्रास होवु शकतो.

एसी स्लीपरमधले दोन्ही दरवाजे बंद केल्यावर लहान मुलाना पकडापकडी खेळायला मोकळे मैदानच मिळते. काही गुणी बाळं, दोन्ही तिन्ही बर्थवर चढायचा खेळ खेळत राहतात.

आमच्या ह्याना, बाहेरचं खाणं अजिबात चालत नाही, टाईप बायका, घरुन सगळे साग्रसंगीत करुन आणतात. जुना पेपर पसरुन, आधी पतिराजाना जेवु घालतात. मग इमानदारीत डबे धुवुनही टाकतात. गाडीत चादर उशी ब्लॅंकेट मिळत असले तरी, त्यानी घरुनही एखादी चादर आणलेली असतेच. जेवणानंतर चघळायला लवंग सुपारी देखील असते.

या उलट गुजराथी पंजाबी कुटुंब असेल तर प्रत्येक विक्रेत्याकडुन काहितरी विकत घेतात. त्यांच्याकडेही खाजगी सप्लाय असतोच म्हणा. या मंडळींचे पत्ते खेळणेही चालु असते. समोरासमोर बसुन, एखादी चादर पसरुन, मस्त डाव रंगवतात. सोबतीला मोठमोठ्याने गप्पा असतातच. समोर बसणार्‍या कुणालाही ते अगदी सहज जेवण ऑफ़र करतात. त्यांचा आणखी एक खास गुण म्हणजे, त्यांच्या गप्पात सगळे कुटुंबच सहभागी होते. त्यात ग्रुप्स नसतात, छोट्या मुलांची लुडबुड अगदी सहज खपवुन घेतली जाते आणि त्याच्याकडे पुरेसे लक्षही दिले जाते. वेगवेहळ्या वयोगटातली दोनतीन कुटुंबं एकत्र प्रवास करताना दिसतात. त्यांच्या बोलण्या वागण्यात एक मोकळेपणा असतो.

या उलट मराठी कुटुब. एकतर दोनतीन कुटुंबं एकत्र प्रवास करताना क्वचितच दिसतात. असल्यास मुख्य कुटुंबाच्या बाहेरची एखादीच व्यक्ति असते, आता समजा तो पुरुष असेल तर बाबाशी आणि बाई असेल तर आईशी वेगळी बोलत बसणार, ते सुद्धा इतराना ऐकु जाणार नाही एवढ्या अह्ळु आवाजात. या मधे जो एकटा असेल तो डोक्यावर पांघरुण घेऊन झोपुन जाणार. जर घरुन जेवण आणले असेल तर इतरांकडे पाठ करुनच जेवणार. अश्या एखाद्या कुटुंबात मी तरी अवघडुन जातो, पण जर मला बाजुचे बर्थ मिळाले, म्हणजे ७, ८, १५, १६ वगैरे, तर मात्र एकास एक या प्रमाणे सांभाषण होवु शकते. एखाद्या नजरेत, प्राणी गप्पिष्ट आहे का ते सहज कळते, आणि अशी सोबत लाभली, तर माझी चंगळ असते.

या गाडीतही हनिमुन कपल्स दिसतातच, आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अत्यावश्यक होवुन बसते.

कोकणकन्याच्या आगेमागे जाणारी मस्यगंधा मातर मला तितकिशी आवडत नाही. डब्यात शिरताक्षणीच फरक जाणवतो.
गुजराथमधुन काहि गाड्या, गोवा मार्गे केरळला जातात, या गाड्या दादरला येत नाहीत तर वसई, भिवंडी, ठाणे, पनवेल अश्या मार्गाने जातात. या गाडीनेही मी प्रवास केला, पण परत वातावरण वेगळे वाटले. या गाड्यात बहुतेक प्रवासी आणि सेवकही, मल्याळी भाषिकच असतात. शिवाय खाणेपिणेही त्यांच्या पद्धतीचेच. ईडली डोसा मला आवडत नाही असे नाही, पण या गाडीत जे मिळते, त्याला खरेच चव नसते. या गाड्याही रात्रीच्याच जातात.

गोव्याला भेट द्यायला माझ्या मते पावसाळा आदर्श ऋतु आहे. अनेक पर्यटकाना ते पटत नाही, म्हणुन या दिवसात तिथे गर्दी नसते. ( मासेमारी बंद असते, हे एक कारण असावे. ) बीचवरच्या शॅक्स बंद असतात. एरवी धुडगुस घालणारे परदेशी पर्यटक गायब झालेले असतात. मानकुराद आंबे स्वस्त झालेले असतात.

पण तरिही पावसाळाच उत्तम, कारण गोव्यात अक्षरश धो धो पाऊस पडतो. पणजीतले काहि सखल भाग सोडले, तर बाकि कुठे पाणी तुंबत नाही. आधीच हिरवागार असणारा परिसर जास्तच हिरवा दिसु लागतो. कोपर्‍याकोपर्‍यातले धबधबे सुरु होतात. ( दूधसागरला मात्र जाता येत नाही. ) आणि हॉटेल्स आणि बसेसचे दर उतरतात.

आणि या दिवसात माँडवी एक्स्प्रेसने केलेला प्रवास, म्हणजे पर्वणीच असते. एरवी या गाडीचा प्रवास, तिच्या वेगामूळे आणि वेळामूळे, कंटाळवाणा ठरतो. हि गाडी तशी लोकप्रियदेखील नाही, त्यामूळे गाडीला गर्दीही नसते. ( हि गाडी सकाळी मडगावहुन सुटते )

मडगाव जुने स्थानक असल्याने, त्याच्या आजुबाजुला वस्ती आहे, पण ते सोडुन वेर्णा स्थानक आले, कि परिसर मोकळा होवु लागतो. आजुबाजुला गच्च हिरवा निसर्ग, काहि पावसाळी फुले, पांढरयाशुभ्र नद्या, अशी न संपणारी दृष्यमालिका सुरु होते.

हातात वाफाळत्या कॉफ़ीचा किंवा सुपचा कप असावा, आणि बाहेर असा चित्रपट सुरु असावा, यापेक्षा सुख ते काय हो ? ( हवी तर कांदाभजी पण मिळतात. )

रस्त्याने प्रवास केला तरी असा निसर्ग दिसू शकतो, पण त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने, खास करुन डोंगरदर्‍यातून रेल्वे जात असल्याने, त्यापेक्षा वेगळी दृष्य दिसतात. काही काही जागा तर केवळ रेल्वेतूनच दिसू शकतात. मला असलेले धबधब्यांचे आकर्षण लक्षात घेता, अगदी काहि पावलांवर असणार्‍या या धबधब्यांकडे, धावणारे माझे मन, मला किती आवरावे लागत असेल, याची कल्पना करा.

दरड कोसळली नसेल तर पावसामुळे या मार्गावर तसा फारसा परिणाम होत नाही. ( या उभ्या दरडींवर कॉंकीट घालुन, त्याना जाळी वगैरे बसवण्याचे काम चालु आहे, पण शेवटी निसर्गापुढे माणुस हतबलच ठरतो ना !)

एखादी टेकडी, बाजुने वाहणारा ओहोळ, एखादे कौलारु घर, भातशेतीत दिसणार्‍या इर्ल्या, घराच्या आसर्‍याला बसलेली माणसे, या मोजक्या घटकांची अनेकवेळा डोळ्यासमोर पुनुरावृत्ती होत असली तरी, त्यात अजिबात तोचतोचपणा जाणवत नाही. सर्व बंधने तोडुन या घरांच्या उबेला जाऊन बसावे, असे बंडखोर विचार, मनात येत राहतात.

खरे तर निसर्ग असा चहुबाजुने बरसत असतो, त्यावेळी बंद खिडकिच्या आत बसण्यासारखा करंटेपणा नाही, पण !!!

गुलमोहर: 

लिहिल आहे ह्याला फोटोंची जोड द्या की अजुन आकर्षक वाटेल Happy

मस्त! मी ही पावसाळ्यात निदान रत्नागिरी पासून मुंबई कडे असे निसर्गसौंदर्य बघितले आहे. आणि त्यामुळेच असे वाटले की साध्या पण नीट बसायला आणि इकडे तिकडे फिरता येणार्‍या डब्यातून जायला जास्त मजा येइल.

दिनेश, मधे कर्जत पनवेल मार्गाबद्द्ल वाचले होते, त्याचे काय झाले माहीत आहे का?

छानच लिहिलेय... फोटो टाकले तर झकास होईल!

फारेंड. कर्जत पनवेल, लोहमार्ग टाकलेला दिसतोय. अजुन वाहतुक सुरु नाही. कदाचित चाचण्या होत असतील.
हा मार्ग एकेरी असल्याने, दोन्ही बाजुला मस्त निसर्ग दिसत असतो.
भाग्य, टाकतो फोटो लवकरच. परत पुढच्या आठवड्यात जातोय. त्यावेळी आणखी काढीन.

खुपच छान ,कोकण रेल्वेसुखद अनुभव एक दिवस निसगासोबत .
वरील लिहलेली प्रत्येक ओळ वाचुन असे वाटले की माझेच वाक्य आहे. बरेचदा लिहावेसे वाट्ले पण लिह्ताच आले नाही निसगाबद्दल

"खरे तर निसर्ग असा चहुबाजुने बरसत असतो, त्यावेळी बंद खिडकिच्या आत बसण्यासारखा करंटेपणा नाही, पण !!"

दिनेशजी, एकदम मस्तच! लगेच तिकिट काढून कोकण रेल्वेत बसून गोव्यात माणकूर खायला जाव वाटायला लागलयं!

ते धबधबे, ती हिरवाइ, ती कुंद हवा मनात रेंगाळायला लागली वाचता वाचता.

गोव्यात, कोकणात, घाटमाथ्याला, खरचं जुलै नाहीतर ऑगस्टमधेच जायचं.

फोटो टाका. मजा येइल वाचायला.

दिनेश , अक्षर अन अक्षर पटले. पावसाळ्यात गोवा म्हणजे भुलोकीचा स्वर्गच!!! लोक इतर ॠतुत का जातात कोण जाणे ?

सहज, सुंदर लिखाण!!!

पण कोकण रेल्वेने प्रवास करताना विशेषतः मांडवी एक्सप्रेसने एसी डब्यांपेक्षा, स्लीपर क्लास डब्यांमधून निसर्गाचा अनुभव छान घेता येतो हेमावैम. मी दोन्ही क्लासमधून प्रवास केला असल्यामुळे झालेले.

दिनेशदा, मस्त वर्णन. तुम्ही दिलेल वरच सगळ वर्णन नेहमी अनुभवते. धुरामूळे आम्हीसुद्धा नेहमी एसीने प्रवास करतो. मुंबईला येण्यासाठी बहुतेक वेळा प्रवास मांडवीनेच होतो. अगोदर खूप छान जेवण मिळायच त्यामूळे आम्ही घरून डबा घेऊन नव्हतो जात. पण हल्ली अजिबात चांगल नसत त्यामूळे घरचा डब्बा मस्ट. व्हेज बिर्याणी , गुलाब जामून, व्हेज कटलेट आणि शिरा उपमा हे आमचे आवडते पदार्थ होते. हल्ली वडा पाव, मूग/ कांदा भजी एवढच घेतो.

मलासुद्धा पावसाळ्यातच गोव्याला जायला जास्त आवडत .

.

अरे मला पावसातच गोवा बघायचाय रे, पण घरचे हसतात.:अरेरे:

मस्त ! आवडले वर्णन. दिनेशजी फोटु असेल धबाधब्याचे तर टाका की. तेवढीच दुधाची तहान ताकावर.

न.मा., सेकंड एसीमध्ये झोपून निसर्ग बघायला खरच खूप मजा येते पण त्यासाठी तुम्हाला लोअर बर्थ सिटस मिळायला हव्यात. माझ्या आईवडीलांना अस बघायला खूप आवडत. ह्या डब्यात गर्दीही कमी असते आणि आरामात बाहेरचा निसर्ग बघता येतो.

मीसुद्धा स्लीपर आणि वेळ पडली तर जनरल डब्याने सुद्धा प्रवास करते. तेथील अनुभव वेगळे आहेत आणि मजासुद्धा येते.

आरतीताई, सेकंड एसी मधूनच मी खुपवेळा प्रवास केला आहे आणि तो आरामदायकसुध्दा असतो. परंतु एका काचेमुळे का असेना मला नेहमी असेच वाटते की, स्लीपर क्लासमधून निसर्गाचा आस्वाद जास्त मिळतो.

स्लीपर क्लासमधून निसर्गाचा आस्वाद जास्त मिळतो. <<<< हो, खूपजण दरवाज्यात बसून निर्सगाचा आस्वाद घेत असतात अजून माझी हिंम्मत नाही झाली आहे तिथे बसून बघायची. Happy

मस्त लेख !. प्रवाशांचे वर्णनही अगदी चपखल ! गुजराथी प्रवाशांचं वर्णन अगदीच पटलं. तोंड कायम चालू. खाण्यासाठी तरी किंवा बोलण्यासाठी तरी.
ऑगस्टमध्ये एकदा जनशताब्दीने मुंबई- गोवा प्रवास केला होता.आजुबाजूचा निसर्ग न्याहाळणे ही अगदी अविस्मरणीय आठवण आहे या प्रवासातील.

आता मलाच हा प्रवास करून बरीच वर्षे झाली. खुपदा रस्त्यावरून दिसणार नाहीत असे धबधबे दिसतात ( उदा. महाडजवळचा ) दीवान खवटी स्टेशनजवळही एक छान स्पॉट होता.
पावसाळ्यात अजूनही दरडी कोसळतात म्हणून टाळतो आता हा प्रवास.

रश्मी, एकदा जाच पावसाळ्यात. गोव्यातले गौरी गणपती पण बघण्यासारखे असतात. सार्वजनिक नसतात फारसे पण एखाद्या घरातला गणपती, सार्वजनिक गणपतीच्या तोडीचा असू शकतो.

आम्ही दर वर्षी जुलै महिन्यांत गुरुपौर्णीमेसाठी गोव्याला जातो. कोणत्यातरी देवळांतच बहुतेक करून कार्यक्रम असतो...पावसांत व सुरांत अंतर्बाह्य चिंब भिजून नवी उमेद घेवून परत येतो. सपाटून पाउस पडत असताना एखाद्या शांत देवळात बसून अभिजात संगीताचा आनंद घेणे हा एक जबरदस्त अनुभव असतो.

गोव्यात, प्रत्येक गावच्या देवळाचा वार्षिक महोत्सव असतोच आणि खुप ठिकाणी दर्जेदार कार्यक्रम सादर होतात.
पर्वरीतल्या पुंडलीकाच्या देवळात डॉ. अलका देव मारुलकर यांचे गायन ऐकले होते. अजूनही लक्षात अहे ती मैफील.